फक्र-ए-अफगान

खान अब्दुल गफारखान यांचे आत्मचरित्र ‘माय लाईफ माय स्ट्रगल’ हे पश्तू भाषेमधून आता प्रथमच इंग्रजीत अनुवादित झाले आहे.

खान अब्दुल गफारखान यांचे आत्मचरित्र ‘माय लाईफ माय स्ट्रगल’ हे पश्तू भाषेमधून आता प्रथमच इंग्रजीत अनुवादित झाले. निवृत्त पाकिस्तानी सनदी अधिकारी इम्तियाज अहमद साहिबजादा यांनी त्याचा अनुवाद केला आहे. या आत्मचरित्राच्या आधारे लिहिलेला खान अब्दुल गफारखान यांच्या कार्यकर्तृत्वाविषयीचा हा लेख.

अफगाणिस्तान या देशाचा इतिहास पाहता असे दिसते की, हा देश कायमच एक धगधगता अंगार राहिला आहे. आजही अफगाणिस्तानवर तालिबानी कब्जा मिळवतात, तेव्हा असा प्रश्न पडतो की, टोळीयुगातून हा देश आजही बाहेर पडला आहे की नाही? पण याच पठाणांच्या देशात एक असा पठाण जन्माला आला होता, ज्याने कधीही आपल्या हातात शस्त्र धरलं नाही. मुळात ही कल्पनाच डोक्यात उतरत नाही की, एका पठाणाने गेल्या शतकात ब्रिटिशांच्या विरोधात एक मोठं संघटन उभं केलं आणि त्याचा लढण्याचा मार्ग मात्र अहिंसेचा होता! पण हे खरं आहे की, असा एक 'वीर' या मरूभूमीत जन्मला होता. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेश म्हणजेच अवाढव्य अशा भारतीय उपखंडाचा इतिहास लिहिताना ज्यांना टाळून पुढे जाणे शक्यच नाही ते नाव म्हणजे खान अब्दुल गफारखान. बऱ्याच जणांना तर हे नावही ओळखीचं नसेल. स्वातंत्र्याच्या अगोदरची पिढी त्यांना 'खानसाहेब' किंवा 'बादशहाखान' म्हणत असे. इंग्रजीत 'फ्रंटिअर गांधी', हिंदीत 'सीमान्त गांधी', मराठीत 'सरहद्द गांधी' तर अफगाणी लोक त्यांना 'बच्चा खान' म्हणत. पश्तू भाषेत 'बच्चा' शब्दाचा अर्थ होतो 'राजा'. खान अब्दुल गफारखान यांचं आत्मचरित्र हे प्रथमच पश्तूमधून इंग्रजीत अनुवादित झालं आहे. ‘माय लाईफ माय स्ट्रगल’ या नावाने तो अनुवाद केला आहे, पाकिस्तानातील निवृत्त सनदी अधिकारी इम्तियाज अहमद साहिबजादा यांनी.

बादशहा खान यांचा जन्म 1890 मधला. बादशहा खान यांचा जन्म झाला, त्यावेळी त्यांच्या घरातली कोणतीही व्यक्ती शिकलेली नव्हती. त्यामुळे त्यांच्या जन्माची तारीख कुणीही नोंदवून ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांचे उथमनजाई हे गाव पेशावरपासून साधारण वीस मैल इतकं लांब आहे. उथमनजाई हे आज पाकिस्तानच्या चारसदा या जिल्ह्यात येतं. चारसदा हा जिल्हा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर येतो. बादशहा खान हे ‘मुहम्मदजा’ या पठाणी जमातीतले. त्याकाळी हा उथमनजाई परिसर अतिशय मागासलेला होता. आजही त्यात विशेष काही बदल झालेला नाही. ब्रिटिशांनी भारतीयांसाठी शाळा सुरु केल्या होत्या पण त्या जास्तकरुन शहरांमध्येच. शहरातील शाळांमध्ये सोईसुविधा चांगल्या असायच्या. त्या तुलनेत ग्रामीण भागातील शाळांचा दर्जा मात्र फार खालावलेला असायचा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ब्रिटिशांनी इतर भागात ज्या शाळा सुरु केल्या त्या त्यांच्या त्यांच्या मातृभाषेतून सुरु केल्या होत्या. तर पश्तू भागात ज्या शाळा सुरु केल्या त्या मात्र पश्तू या त्यांच्या मातृभाषेतून केलेल्या नव्हत्या. भरीस भर म्हणजे स्थानिक मौलाना असा प्रचार करत की, ब्रिटिशांच्या शाळांमधून जर शिक्षण घेतलं तर त्या व्यक्तीचा आपल्या समूहातील आदर कमी होतो. तसंच त्या शिक्षणाचा जीवनावरही गंभीर परिणाम होतो. त्यामुळे पश्तूंना या ‘धोक्यापासून’ दूर ठेवा! बादशहा खान यांना मात्र या गोष्टीचं फार वाईट वाटायचं. ते म्हणत, “इस्लामच्या नावावर मुलांना शिक्षणापासून वंचित का ठेवलं जात आहे?” बादशहा खान यांनी मात्र आपल्या मुलांना-नातवंडांना उच्च शिक्षण देऊ केलं.

लहानपणी बादशहा खान जेव्हा पेशावरमध्ये आले, तेव्हा त्यांच्या शाळेचे हेडमास्तर होते डॉ. विग्रॅम. शाळेत असताना खान यांना पायाला जखम होऊन त्यातून पू येऊ लागला होता. हे समजताच डॉ. विग्रॅम तात्काळ खान यांना तपासायला आले. डॉ. विग्रॅम यांनी केलेली सुश्रृषा पाहून खान स्वतःशीच विचार करु लागले की, या लोकांना पगार कमी असतानाही हे लोक आमची मदत करत आहेत, आम्ही आमच्या देशातील गरीब मुलांसाठी मात्र काहीही करत नाही.

खान यांच्यावर त्यांच्या आजुबाजूच्या परिस्थितीचा गंभीर परिणाम झालेला दिसून येतो. त्यांच्या लहानपणी त्यांच्या आसपासचे मौलाना हे लोकांना आक्रमकपणे एका गोष्टीवर विश्वास ठेवायला भाग पाडत असत की, हे जग अल्लाहने तयार केलं आहे आणि अल्लाहच त्याचा राजा आहे. त्यामुळे राजाला कर आणि भेटस्वरुप म्हणून वस्तू द्याव्याच लागणार आहेत! खान म्हणतात की, या लोकांना (मौलानांना) हे माहीत नाही का की, अल्लाहला कोणत्याही वस्तूची गरज नाही. ना दान, ना भेटवस्तू, ना प्रार्थना, ना उपवास, ना हज. तुम्ही या जन्मात काय चांगली कर्मे करता, तीच तुमच्यासोबत नंतर येणार आहेत.

इस्लाममधील जनाज्याच्या वेळेस गोळा केलं जाणारं वित्त या संदर्भात खान हे मौलानांसोबत कायमच चर्चा करण्यास उत्सुक असत. त्यावेळी मौलाना खान यांना कायमच मोहम्मद पैगंबरांचा दाखला देत असत की, ‘समर्पण हे दुष्टांना अटकाव करतं.’ अशा वेळी खान मौलानांना प्रतिप्रश्न करत की, तुम्हाला माहीत आहे का दुष्टता कशाला म्हणतात ते? जनाज्याच्या वेळेस हे जे वित्त गोळा केलं जातं, त्यामध्ये श्रीमंत जास्त खर्च करु शकतात व गरीब कमी खर्च करतो. या तफावतीमुळे या दोन वर्गांत तिरस्कार निर्माण होतो आहे. तो कमी करण्याऐवजी इस्लाममधील या प्रथा पाळून त्याला खतपाणी का घालता आहात? ज्या मृतांचे नातेवाईक जनाज्याचा खर्च करु शकत नाहीत, त्यांना कर्ज काढावं लागतं व सावकार त्यावर अवाच्या सवा व्याज आकारतो. हे कर्ज फेडणं काहींना अवघड होऊन बसतं. मौलानांनी अशाप्रकारे हे पटवून दिलं की, दारोदारी दान मागण्यामुळे आपण देश म्हणून कधी उभे राहू शकत नाही. त्यामुळे ही आपली जबाबदारी आहे की, आपण शिक्षण व संगोपन याकडे लक्ष दिलं पाहिजे. इस्लाम हा तलवारीच्या बळावरच पसरलेला आहे. त्यामुळे धर्माच्या मूळ अर्थाला आपण अजून स्पर्श केलेला नाही, मूळ अर्थाला आपण अजूनही दुर्लक्षित केलेलं आहे.”

खान यांना सैन्यात भरती व्हायचं होतं. त्यासाठी त्यांनी एक रितसर अर्जही भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय यांच्याकडे केला होता. त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे ज्या उमेदवारांची निवड सैन्यात केली आहे, त्यांची स्थानिक महसूल अधिकाऱ्यामार्फत चौकशी केली जाते. अशी चौकशी करण्यासाठी जेव्हा असा एक अधिकारी खान यांच्या घरी आला, तेव्हा अब्दुल गफार खान याच्या वडिलांना वाटलं की, तो अधिकारी आपली जमीनच हडप करण्यासाठी आला आहे की काय! म्हणून अब्दुल गफार खान यांच्या वडिलांनी व घरच्यांनी त्यांना काही जमिनीची माहिती दिली नाही. मग त्या अधिकाऱ्याने गावातल्या लोकांकडून यांच्या जमिनीची माहिती काढली. तेवढ्यात अब्दुल गफार खान यांचे एक काका मुंबईहून शिकून घरी आलेले होते. त्यांनी घरच्या मंडळींना समजावलं की, आपला अब्दुल गफार याने सैन्यात भरती होण्यासाठी अर्ज केला आहे, त्यासाठी ही सगळी चौकशी झाली आहे. तो अधिकारी आपली जमीन हडप करण्यासाठी आलेला नव्हता. पण पुढे मात्र अब्दुल गफार हे काही सैन्यात भरती झाले नाहीत. ब्रिटिशांच्या सेवेत आपण जायचं नाही यावर त्यांचं व त्यांच्या आईचं एकमत झालेलं होतं.

वर सांगितल्याप्रमाणे अब्दुल गफार जेव्हा पेशावरमध्ये मिशनरी शाळेत शिकत होते, तेव्हा त्या शाळेचे हेडमास्तर डॉ. विग्रॅम यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन खान यांनी आपल्या उथमनजाई या भागात मदरसे (शाळा) सुरु करायच्या ठरवल्या. पण हे मदरसे पारंपरिक नसतील याकडे त्यांनी लक्ष पुरवलं. थोड्याच कालावधीत खान यांनी असे बरेच मदरसे सुरु केले. एक दिवस चित्रालीचे मौलाना हातात बंदूक घेऊन त्यांच्या समोर उभे ठाकले आणि त्यांना जाब विचारू लागले, “हे काय चालवलं आहे तुम्ही?” हे मौलाना अशा हेतूने आले होते की, अब्दुल गफार यांनी ‘एकतर बंदूक नाही तर पुस्तक’ यापैकी एक काहीतरी निवडावं. अब्दुल गफार यांनी मौलानांना समजावलं की, ज्ञान मिळवणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे आणि ते मिळवायलाच हवं हे अल्लाह आणि प्रेषितांनीच सांगितलं आहे. देश उभा करायचा असेल तर तो केवळ नमाज अदा करून उभा राहू शकत नाही. त्यासाठी निस्वार्थ वृत्तीने, प्रामाणिकपणे, झोकून देणारी माणसं हवी असतात. या लोकांच्याच प्रयत्नामुळे प्रेम, स्वीकार, सौंदर्य, बंधुभाव ही मूल्यं देशात रूजली जातात आणि देश प्रगती करतो. जर समाज नमाजने प्रगती करत असता तर प्रेषितांना इतका संघर्ष का करावा लागला असता? वस्तुस्थिती ही आहे की, प्रयत्नवादाविना नमाजही कबूल होत नसते!"

इतकं सगळं समजावूनही मौलाना लोकांचा खान यांच्या मदरशांना विरोध काही कमी झाला नाही. खान यांच्या मदरशांत उर्दूत शिकवलं जातं हे कारण पुढे करत ते विरोध करतच राहिले. इतर मदरशांत अरबी भाषेत शिकवले जात असे पण लोकांची बोलायची भाषा मात्र उर्दू होती. खान यांनी विचारले असता एकही मौलाना ‘आयत’ या शब्दाचा अर्थ सांगण्याची हिम्मत करत नसे. इस्लाममध्ये ज्ञान मिळवणे ही गोष्ट अत्यंत अनिवार्य आहे असं प्रेषितांनी सांगितले आहे. या मूळ उद्देशालाच ही मौलाना मंडळी हरताळ फासत होती. इतकं करूनही मौलानांचा विरोध कमी होत नव्हता, तेव्हा खान यांनी तोरंगजाईच्या हाजी साहेबांना पाचारण केले व स्वतःचे मदरसे या मौलानांच्या विरोधामुळे बंद होण्यापासून वाचवले. शाळेत असतानाच्या गोष्टी सांगताना खान म्हणतात की, ब्रिटिशांनी सुरु केलेल्या शाळेत हिंदू मुलं जशी शिकत होती तशीच मुस्लीम मुलंही शकत होती. पण हिंदू मुलांमध्ये देशप्रेम, लोकसेवा करण्यासाठी समर्पणाची भावना उभी केली जायची आणि मुस्लीम त्या वेळेपर्यंत राष्ट्र, राष्ट्रीयत्व, वगैरे गोष्टींबद्दल जागरूक नव्हते. खान अब्दुल गफारखान हे ‘शिवाजी जन्मावा पण तो शेजारच्या घरात’ या उक्तीनुसारही वागणारे बोलघेवडे सुधारक नव्हते. खान अब्दुल गफारखान यांचे पहिले लग्न ठरले तेव्हा त्यांचे सासरे यार मोहम्मद खान यांनी लग्नातला 'वालवर' (नवऱ्या मुलाकडील लोकांनी नवऱ्या मुलीला दिले जाणारे वित्त. आपल्याकडील मुस्लीम याला 'माहेरा' असे म्हणतात) स्वीकारला नाही. अब्दुल गफारखान यांनी आपल्या पत्नीला जेवताना आपल्यासोबत जेवण्यास सांगितलं. त्यावेळी बायकोने नवऱ्याच्या आधी जेवायचं नाही अशी पद्धत होती. पण अब्दुल गफारखान यांनी मात्र ही पद्धत मोडायची असे ठरवले होते. ते आपल्या पत्नीला आपल्या सोबतच जेवायला सांगत असत. त्यांनी परिसरातील मौलानांचा कित्येकदा रोषही पत्करला पण आपल्या मुलीला शाळेत घातलंच. वर्गात सगळी मुलं व ही एकटी मुलगी. खान यांना शिक्षणाचं महत्त्व फार लवकर उमजलं होतं. मौलानांच्या डोक्यात ही गोष्टच शिरत नव्हती की, इस्लाममध्ये स्त्री असो वा पुरूष सर्वांना शिकणं अनिवार्य आहे.

खान म्हणत, “इतका मोठा माझा देश (पश्तूनिस्तान) पण त्याच्या मातृभाषेत (पश्तू) एक वर्तमानपत्र नाही. लोक कर्माकांडात, अर्थहीन धार्मिक कामात पैसे खर्च करतील पण वर्तमानपत्र मात्र विकत घेणार नाहीत! खान यांचं आपली मातृभाषा पश्तूवर खूप प्रेम होतं. परंतु इतर पश्तू भाषिक लोकांचं मात्र या भाषेवर फार प्रेम नव्हतं. ते म्हणत की, पश्तू ही भाषाच नाही! तेव्हा खान म्हणत, “मग आपण तिला तो दर्जा देऊ. इतर भाषा काय ढगातून पडलेल्या नाहीयेत! त्या भाषा बोलणाऱ्यांनी त्या भाषेचा विकास केला आहे.”

खान अब्दुल गफार खान जेव्हा शेख-अल-हिंद साहेबांना भेटायला गेले तेव्हा 'खुदाई खिदमतगार' या चळवळीविषयी सांगताना म्हणाले, “मी माझ्या सहकाऱ्यांना सांगत असतो की, ते खुदाचे खिदमतगार आहेत, शेख नाही!” 1914 मध्ये पहिल्या महायुद्धाला तोंड फुटलं. भारतीय मुसलमानांना या महायुद्धात तेव्हाच रस वाटू लागला, जेव्हा तुर्कांनी जर्मनीच्या बाजूने युद्धात उडी घेतली. तुर्कस्तान एक मुस्लीम राष्ट्र, त्याचा राजा हा मुस्लिमांसाठी 'खलिफा' होता. समजा या महायुद्धात ब्रिटिशांचा पराभव झाला तर आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यास तुर्कस्तान, जर्मनी मदत करतील अशी भाबडी आशा त्यांना होती. पण त्यांना हे लक्षात येत नव्हतं की, ब्रिटिश गेले तरी त्यांची जागा तुर्की किंवा जर्मन घेऊ शकतात! ब्रिटिशांनी विविध जमातींच्या म्होरक्यांना, मुल्ला-मौलवींना पैसे देऊन त्यांच्याकरवी, धर्मात सुधारणा घडवू पाहणाऱ्या मौलवींना धर्मद्रोही ठरवलं. त्यांना पलायन करण्यास भाग पाडलं. ब्रिटिशांना कित्येक टोळ्यांशी दोन हात करावे लागत असत. उदाहरणार्थ, नवागाई इथली खिंड व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाची. ती आपल्या ताब्यात असणं आवश्यक आहे, हे ब्रिटिश जसं ओळखून होते तसंच स्थानिक टोळीवालेही ओळखून होते. त्यामुळे या नवागाई खिंडीत ब्रिटिशांच्या व स्थानिक टोळ्यांच्या बऱ्याच लढाया झाल्या होत्या. समजा ब्रिटिशांना जर संशय आलाच की एखाद्या व्यक्तीचं आपल्या देशावर पश्तूनिस्तानवर, आपल्या लोकांवर (पश्तू) किंवा इस्लामवर खूप प्रेम आहे तर त्या व्यक्तीवर प्रथम दबाव आणला जात असे. त्याने काम झालं नाही की पैसा फेकला जात असे. या दोन्हींनी ती व्यक्ती बधली गेली नाही तर सरळ उचलून त्या व्यक्तीला तुरुंगात टाकलं जाई. तुरुंगातही त्या व्यक्तीचे हाल केले जात असत.

पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान भारतीय उपखंडात मलेरियाची मोठी साथ पसरली. खान अब्दुल गफार खान यांच्या प्रथम पत्नीचं या साथीमध्ये निधन झालं. भारतीय मुस्लीम ब्रिटीशांच्या बाजूने महायुद्धात लढले त्याबदल्यात भारतीयांच्या पदरात काय पडलं? तर रौलेट कायदा. ‘महायुद्धात जर ब्रिटीशांचा विजय झाला तर ते भारताला स्वातंत्र्य देतील’ असं आश्वासन देऊन ब्रिटिशांनी गांधींना फसवलं होतं. रौलेट कायद्याच्या विरोधात खान यांनी मोठा मोर्चा उभारला. या कायद्याच्या विरोधात अफगाणिस्तानचे राजे अमानुल्ला खान यांची मदत घ्यायला व अफगाणिस्तानची स्वतंत्र ओळख मिळवण्यासाठी पश्तू, अफगाणी भाषांना पुनर्जीवित करावं लागेल याबाबत त्यांनी अमानुल्ला खान यांच्यासोबत बऱ्याच चर्चेच्या बैठका घेतल्या. खान म्हणत की, पश्तू ही अफगाणिस्तानची राष्ट्रीय भाषा आहे आणि ती अफगाणिस्तानमध्ये सर्वात जास्त बोलली जाते. जी भाषा सर्वात जास्त बोलली जाते ती देशाची अधिकृत भाषा असते आणि देवाणघेवाणीचं माध्यमदेखील!

पंधरा वर्षं अफगाणिस्तान हिंडल्यावर खान अब्दुल गफार खान यांच्या काही गोष्टी लक्षात आल्या होत्या. ‘क्रांती ही काही एकाएकी होणारी गोष्ट नाही आणि ती गोष्ट वाटते तितकी सोपीही नाही. क्रांती ही प्रचंड परीक्षा पाहणारी गोष्ट आहे.’ यासाठी शिक्षण, ज्ञान आणि शहाणपण आवश्यक आहे. क्रांतीसाठी अशी माणसं हवीत जी लोकांना क्रांतीची गरज समजावू शकतील. आपला देश शिक्षण, आरोग्य, उद्योग, शेती या क्षेत्रांत लक्ष घालून प्रगती करण्याऐवजी चुकीच्या रूढी-परंपरांना अधिक कवटाळत आहे हे लक्षात आल्यावर खान आपल्या गावी परतले. पुन्हा नव्याने मदरशांची बांधणी करू लागले. मदरशांना चांगले शिक्षक हवेत म्हणून ते त्यांचा शोध घेत. पण ब्रिटिश सरकार यात वारंवार हस्तक्षेप करत अडचणी उभ्या करत असे. खान शिक्षकांना फार पगार देऊ शकत नसत. मदरशांमध्ये खान यांनी नियुक्त केलेल्या शिक्षकांना ब्रिटिश धमकावत. धमकीने जर ते बधले नाहीत तर मोठ्या पगाराचे आमिष देत. खिलाफत चळवळीत भाग घेतल्या कारणाने ब्रिटिशांनी खान यांना पकडलं. ब्रिटिशांनी त्यांना पकडलं होतं त्यावेळी ते राजकीय कैदी होते. यावेळी मात्र त्यांना सर्वसामान्य कैद्यांच्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. यावेळी प्रथमच त्यांना तुरूंगातील कैद्यांचे हाल पाहायला मिळाले. तुरूंगाधिकारी, इतर पोलिस कैद्यांना बेदम मारहाण करत असत. इतकी, की कैद्यांची जगण्याची हिम्मत तुटून जात असे. कैद्यांना धान्य दळण्याचं काम असे. ते पूर्ण नाही झालं तर पुन्हा मारहाण. दोन-एक महिन्यांतून किमान तीन-चार कैदी आपले प्राण सोडून देत असत. हे सर्व कशासाठी? तर, पैशासाठी. ब्रिटिश तुरूंगाधिकारी कैद्यांकडून पैशाची मागणी करत. पैसे दिले तरच तुरूंगातून सुटका अन्यथा या नरकयातना सहन करायच्या. खान यांच्यासोबत एक तुरुंगातील कैदी या जाचाला कंटाळून आपल्या शेवटी आपल्या बायकोला विकायला निघाला होता. बायकोला विकून त्याला तुरूंगाधिकाऱ्याला पैसे द्यायचे होते व स्वतःची सुटका करून घ्यायची होती. खान यांनी त्याला समजावलं व बायकोला विकण्यापासून त्याला परावृत्त केलं.

खिलाफत चळवळीत भाग घेतला असल्यामुळे तुरूंगात गेलेल्या खान यांची वारंवार वेगवेगळ्या तुरूंगात रवानगी केली जात असे. त्यात त्यांच्या दाताचं दुखणं वाढल्यामुळे त्यांना लाहोरच्या तुरूंगात हलवण्यात आलं. त्याच वेळी लाहोरच्या तुरूंगात होते, लाला लजपतराय. लालाजी हे ‘ए’ क्लास कैदी होते तर खान हे ‘सी’ क्लास. तीन वर्षांच्या तुरुंगवासानंतर जेव्हा खान यांची सुटका झाली त्यानंतर त्यांनी पहिली मोहीम हाती घेतली ती ‘नॅशनल फंड’ उभा करण्याची. या फंडाचा वापर करून त्यांना आपल्या पश्तू या मातृभाषेतून एक वर्तमानपत्र सुरु करायचं होतं, ज्याचा फायदा आपल्या मुलांना होईल असं त्यांना वाटत होतं. पण सुरूवातीला त्यांची ही इच्छा सर्वांनी धुडकावून लावली. वर्तमानपत्र, मदरसे(शाळा) यापेक्षा त्यांच्या लोकांना मेजवान्यांवर पैसे खर्च करणं जास्त पसंत होतं. मातृभाषेचा वापर न करता कोणताही देश कधीच प्रगती करू शकत नाही. खान यांना आपल्या ‘अंजुमन’ या संस्थेमार्फत मुलांना आपल्या पश्तू या मातृभाषेतून शिक्षण द्यायचे होते. शेवटी खान यांनी 1928 मध्ये ‘पश्तून’ हे पश्तू भाषेतील मासिक सुरू केलं. हे मासिक चालविण्यासाठी खान यांनी स्वतःच्या खिशातूनही पैसे खर्च केले. हे मासिक पश्तू पुरुष तसंच महिला या दोन्ही वर्गांच्या पसंतीस पडलं. या मासिकाच्या प्रसिद्धीसाठी खान यांनी सार्वजनिक मुशायरे ठेवले होते. या मुशायर्‍यात पश्तू भाषेतून कविता/ शेरोशायरी सादर केली जात असे.


हेही वाचा : इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य: एक सुसंवाद - सॅम हॅरिस आणि माजिद नवाझ


1929 मध्ये लाहोर येथे भरलेल्या ‘ऑल इंडिया काँग्रेस’चा मेळावा आटोपून खान जेव्हा उथमनजाईला परत आले तेव्हा मेळाव्यात हिंदू पुरुषांबरोबर हिंदू स्त्रियांचाही स्वातंत्र्य संग्रामातील लक्षणीय सहभाग पाहून खान प्रभावित झाले होते. त्यांनी आपल्या प्रदेशातील स्त्री-पुरुषांनाही आवाहन केलं की, असा लढा आपणही उभा करायला हवा. त्यासाठी खान यांनी एक संघटन उभारायचं ठरवलं. त्या संघटनेला त्यांनी नाव दिलं – ‘खुदाई खिदमतगार’. या संघटनेत मुलं, स्त्रिया, पुरुष, वयस्कर व्यक्ती सगळेच सहभागी होत आहेत हे पाहून परिसरातील मौलाना यांनी खान यांच्याविरुद्ध लगेच फतवा काढला की, हे अल्लाहच्या शिकवणीच्या विरुद्ध आहे. या खुदाई खिदमतगारांना लाल रंगाचा गणवेश असायचा. खुदाई खिदमतगारांमार्फत खान यांना पश्तूमध्ये सर्वांगीण परिवर्तन घडवून आणायचं होतं. परंतु लोकांची सर्वांगीण प्रगती करण्याची त्यांची इच्छा होती. परंतु जे पारंपरिक रूढी, परंपरा, गटबाजीत अडकले आहेत; त्यांच्यातून मला पश्तूंची सुटका करायची आहे. हिंदू आणि शीख त्यांच्या- त्यांच्यात प्रेम, भातृभाव उभा करत आहेत. तसंच मी माझ्या लोकांमध्ये हे काम करतो आहे, तर मी काही पाप करतो आहे का? असा प्रश्न ते विरोधकांना विचारत.

खुदाई खिदमतगारला जसजसा मोठा प्रतिसाद मिळू लागला, तसतसा ते ब्रिटिशांच्या डोळ्यात जास्त सलू लागले. एकदा पेशावरला जात असताना खान यांना ब्रिटिशांनी वाटेतच अडवलं आणि त्यांना अटक केली. खान यांना अटक झालेली पाहून उपस्थित खिदमतगार चांगले संतापले. तेव्हा खान यांनी त्यांना सांगितलं, “माझ्या बंधुंनो! आपल्या चळवळीचा पाया हा अहिंसा हाच असेल.”  खान यांना ब्रिटिशांनी गुजरातच्या एका तुरुंगात ठेवलं होतं. खान यांच्या अटकेचे उथमनजाईमध्ये तीव्र पडसाद उमटले. उथमनजाई मधील सर्व खिदमतगार हे खुदाई खिदमतगारच्या कार्यालयात गोळा झाले. ब्रिटीशांनी ही संधी साधून त्यांच्या हातात एक कागद दिला. त्यावर त्यांनी अंगठा द्यायचा होता. कागदावर लिहिलं होतं की, आमचा खुदाई खिदमतगारशी काहीही संबंध नाही. या कागदावर अंगठा देणे म्हणजे खुदाई खिदमतगारशी तसेच पश्तूसोबत प्रतारणा करणे होय असं उपस्थितांना वाटले. त्यामुळे कुणीच त्या कागदावर अंगठा देईना म्हणून चिडून जाऊन ब्रिटिशांनी उथमनजाईमध्ये सगळीकडून नाकाबंदी केली. कुणालाही प्रवेश नव्हता. लोकांची धरपकड सुरू केली. गाई-बैल यांना वैरण नाही म्हणून ज्या गाई चारायला गावाबाहेर जाऊ लागल्या त्या गाईंना ब्रिटिशांनी गोळ्या घालून ठार मारलं. इतकं होऊनही खुदाई खिदमतगार आपल्या अहिंसा या तत्त्वाला चिकटून राहिले हे विशेष!

याने ब्रिटिश अजूनच चिडले. ब्रिटिशांनी खुदाई खिदमतगार यांची घरे जाळून टाकली. गोळीबार केला. त्यात महिला, बालके गंभीर जखमी झाली, काही मृत पावली. या घटनेचा पश्तू लोकांवर गंभीर असा परिणाम झाला. या घटनेनंतर पश्तू जागृत झाले. खास करून तरुणाई अधिकच पेटून उठली आणि ही चळवळ अधिकाधिक फोफावत गेली. या काळापर्यंत एकही मुस्लीम संघटना पश्तूमध्ये कार्यरत नव्हती. ‘खुदाई’च्या कार्यकर्त्यांनी लाहोरमधील मुस्लीम लीगशी संपर्क साधला. ब्रिटिशांच्याविरुद्ध लढा आणखी तीव्र करण्यासाठी मुस्लीम लीगने खुदाई खिदमतगारांना मदत करण्यास नकार दिला. कारण मुस्लीम लीग ही ब्रिटीशांच्या बाजूने होती. मग खुदाईचे कार्यकर्ते ‘ऑल इंडिया काँग्रेस’च्या नेत्यांना येऊन भेटले. काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना विचारलं, “तुम्हाला काय पाहिजे?” तर खुदाईचे कार्यकर्ते म्हणाले, “आम्हाला ब्रिटिशांकडून आमचा पश्तूनिस्तान देश स्वतंत्र पाहिजे.” काँग्रेसचे नेते म्हणाले की, तुमचा लढण्याचा मार्ग कोणता आहे? खुदाईवाले म्हणाले, “अहिंसा!” तेव्हा काँग्रेसवाले म्हणाले की, मग आम्ही तुम्हाला मदत करण्यास तयार आहोत.

काँग्रेसच्यावतीने सरदार वल्लभभाई पटेल हे खुदाई व काँग्रेसच्या युतीची बोलणी करण्यास गेले होते. काँग्रेससोबत युती केल्यामुळे पंजाबमधील मुस्लीम म्हणू लागले की, खुदाई ही मुस्लीम पार्टी असताना तिने हिंदुबहुल असणाऱ्या काँग्रेससोबत युती केलीच कशी? खुदाईवाल्यांनी त्यांना सुनावले की, काँग्रेस ही हिंदुंची नाही तर एक हिंदुस्तानी पार्टी आहे. मोहम्मद अली जीनासुद्धा त्या पार्टीचे सदस्य होते. याच दरम्यान महात्मा गांधींनी भारताचे व्हाइसरॉय लॉर्ड आयर्वीन यांना स्पष्ट सांगितलं की, बच्चा खान यांची तुरूंगातून सुटका केली नाही तर मी आपल्यात झालेला ‘गांधी आयर्वीन’ करार रद्द करीन. ब्रिटिशांना खुदाई खिदमतगार ही चळवळ काहीही करून दडपून टाकायची होती. पंजाबमधील पश्तूबहुल भागातील इंग्रजी वर्तमानपत्रातून ब्रिटिशांनी खुदाई खिदमतगार विरूद्ध लेखांची मोहीमच सुरु केली. खुदाई कशी काँग्रेसच्या मूल्यांना हरताळ फासत आहे, गांधींच्या विरोधी काम करत आहे असा प्रचार सुरू केला होता. वास्तविक खुदाई आणि काँग्रेस यांमध्ये काहीही वितुष्ट नव्हतं.

भारतीयांचे, काँग्रेसी नेत्यांचे इंग्रजी वर्तमानपत्रांमुळे जे गैरसमज झाले ते दूर करण्यासाठी गांधींनी खान यांना बार्डोलीला बोलावून घेतलं व भाषणं देऊन ते गैरसमज दूर करण्यास सांगितलं. खान व खुदाई खिदमतगारच्या प्रत्येक हालचालीवर ब्रिटिशांची करडी नजर होती. गांधी जेव्हा गोलमेज परिषदेहून भारतात परतले तेव्हा गांधींनी खान यांना मुंबईत बोलावून घेतलं. खान मुंबईत ज्या बंगल्यावर उतरले त्यावर सीआयडीमार्फत नजर ठेवली गेली होती. नंतर त्या बंगल्याला घेरा घालून खान यांना ताब्यात घेतलं. रेल्वेने त्यांना अटकपर्यंत आणलं गेलं. या दरम्यान खुदाईच्या शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली गेली. तुरुंगात त्यांना नग्न करून, पोत्यात घालून मारलं जात असे. तीन वर्षे असा अत्याचार ही मंडळी सहन करत होती. साहित्यसम्राट न.चिं.केळकर मुंबईत जेव्हा खान यांना भेटले, तेव्हा केळकर त्यांना म्हणाले, “सरहद्दीवर मुस्लिमांकडून हिंदूंवर खूप अत्याचार केला जात आहे?” खान केळकरांना म्हणाले, “तुम्ही किती वेळा सरहद्द प्रांतास भेट दिली आहे? हा अपप्रचार कोण करत आहे, हे तुम्हाला माहीत नाही का?”

1941 मध्ये जपानचा दुसऱ्या महायुद्धात प्रवेश झाला. काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांचं म्हणणं होतं की, आपण ब्रिटिशांना मदत करु आणि त्या बदल्यात भारताला स्वातंत्र्य द्यावं ही मागणी करु. गांधींना मात्र ही कल्पना आवडली नाही. कारण असं केल्याने आपल्या अहिंसा या तत्त्वाला आपणच तिलांजली दिल्यासारखं होईल. पण ब्रिटिशांना मदत करण्यावर काँग्रेसच्या इतर नेत्यांचं मात्र बहुमत झालं. गांधी आणि खान यांना ही योजना पसंत पडली नाही. या कारणास्तव गांधी आणि खान हे ऑल इंडिया वर्कींग कमिटीमधून बाहेर पडले. बार्डोलीच्या ठरावात जे मुद्दे मांडण्यात आले होते, त्यावर पुनर्विचार करण्यासाठी वर्ध्याला एक बैठक ठेवण्यात आली होती. त्याचे अध्यक्ष होते, मौलाना अबुल कलाम आझाद. इतर सदस्यांच्या आधी मला माझे विचार मांडू द्या अशी विनंती खान यांनी मौलानांकडे केली पण मौलानांनी मात्र ती नाकारली. वर्ध्याच्या बैठकीत सर्वानुमते ठराव पास झाला. या गोष्टीने उद्विग्न होऊन खान यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आपण काँग्रेस सदस्यात्वाचा राजीनामा दिला आहे, हे वर्तमानपत्रांना सांगू नये अशी गळ मौलाना आझाद यांनी खान यांना घातली होती म्हणून ही बातमी लवकर बाहेर येऊ शकली नाही. खान काँग्रेसमधून बाहेर पडले हे समजल्यावर जीनांनी त्यांना मुस्लीम लीगमध्ये सामील व्हावं म्हणून साखरपेरणी केली होती.

पुढे जेव्हा 1947 साली भारत - पाकिस्तान फाळणी झाली, तेव्हा तेव्हा खान अब्दुल गफार खान यांना कोणतीही पूर्वकल्पना काँग्रेसने दिली नाही. काँग्रेसने फाळणीला मंजुरी दिली. फाळणीसाठी आपलं मतही विचारात घेतलं गेलं नाही याचं त्यांना अतीव दुःख झालं. आपल्याला काँग्रेसने जणू धोकाच दिला ही भावना त्यांच्या मनात आली. याबद्दल त्यांना विचारलं असता खान म्हणतात, “त्यांनी (गांधी, नेहरू) आम्हाला अक्षरशः लांडग्यांच्या समोर फेकून दिलं.” फाळणी होतच आहे तर मग आम्हालाही आमचा स्वतंत्र पश्तूनिस्तान द्या, अशी मागणी ते करत राहिले. खान यांची ही मागणी जर मान्य केली तर पाकिस्तानचा अजून एक तुकडा पडेल. उद्या ‘बलोच’वाले म्हणतील आम्हाला बलुचिस्तान वेगळा द्या म्हणून!असं वाटून जीनांनी त्यांना तुरूंगात डांबलं. पश्तूनिस्तानची मागणी जर मान्य केली असती तर अफगाणिस्तान हा खान अब्दुल गफार खान यांच्या ताब्यात गेला असता. जीनांना आणि ब्रिटिशांना हे मात्र होऊ द्यायचं नव्हतं. पाकिस्तानमध्ये लोकशाही रुजावी म्हणून एक प्रबळ विरोधी पक्ष असायला हवा म्हणून त्यांनी 1948 मध्ये एक पक्ष स्थापन केला ज्याचं नाव होतं, ‘पाकिस्तान आझाद पार्टी’. पाकिस्तानसारख्या देशात, जिथे म्हणायला फक्त लोकशाही आहे तिथे विरोधी पक्ष खपवून कसा घेतला जाईल? म्हणून त्यांना पुन्हा तुरुंगात टाकलं गेलं. फाळणीनंतर खान यांचा बराचसा काळ हा तुरूंगातच गेला.

1967 मध्ये महात्मा गांधींच्या शताब्दीनिमित्ताने खान अब्दुल गफार खान यांना भारतात प्रमुख अतिथी म्हणून बोलावण्यात आलं होतं. देशाच्या वतीने पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी, तर गांधी स्मारकाच्या वतीने जयप्रकाश नारायण यांनी त्यांचं स्वागत केलं होतं. याच दौऱ्यामध्ये त्यांना 1967 सालचा ‘जवाहरलाल नेहरू मेमोरिअल अवॉर्ड फॉर इंटरनॅशनल अंडरस्टँडींग’ प्रदान करण्यात आला. पुढे 1987 मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आलं. सत्य अहिंसेचा हा पुजारी इंग्रजी सत्तेसमोर किंवा पाकिस्तानातील हुकुमशाहांसमोर कधीही झुकला नाही.

माय लाईफ माय स्ट्रगल, ऑटोबायोग्राफी ऑफ खान अब्दुल गफारखान
अनुवाद : इम्तियाज अहमद साहिबजादा
प्रकाशक : रोली बुक्स
पृष्ठे : 576 मूल्य : 598 रुपये.

- अजिंक्य कुलकर्णी
ajjukul007@gmail.com 


 

Tags: autobiography khan abdul gaffar khan roli books Load More Tags

Comments:

Hira

आपल्याकडचा इतिहासाने ज्यांची अत्यंत आत्मीयतेने नोंद घ्यायला हवी होती असे हे उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि अशा कितीतरी व्यक्तिमत्त्वांना आपल्याकडच्या इतिहासाने डावललं .सरहद्द गांधींना अनंतकोटी प्रणाम!!!

Add Comment