प्रकाशन : 'धर्मरेषा ओलांडताना' या पुस्तकाचे...

कर्तव्यवर प्रसिद्ध झालेल्या मजकुराचे प्रकाशित झालेले हे पहिले पुस्तक आहे.

ऑक्टोबर 2021 मध्ये भारतातील सर्व प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये आलेली 'तनिष्क'ची (सोन्याचे दागिने) जाहिरात टाटा कंपनीकडून मागे घेतली गेली. तेव्हा देशात त्यावर झालेली चर्चा पेल्यातील वादळ ठरले. त्यानंतरच्या आठवड्यात समीना दलवाई यांनी, त्यांच्या कुटुंबात अनेक आंतरधर्मीय विवाह झालेले असूनही सर्वांचे सहजीवन किती सुखी समाधानी पद्धतीने चालू आहे, हे सांगणारा लेख 'इंडियन एक्सप्रेस'मध्ये लिहिला होता.

त्यानंतरच्या आठवड्यात सुहास पळशीकर यांनी प्रस्तुत संपादकाला असे सुचवले की, साधना साप्ताहिक किंवा कर्तव्य साधनावरून या विषयावर लेखमाला किंवा विशेषांक करता येईल का? ती सूचना साधनाच्या तेव्हाच्या पाच जणांच्या (हिनाकौसर खान, मृदगंधा दीक्षित, समीर शेख, सुहास पाटील आणि सुदाम सानप) संपादकीय टीम समोर ठेवली.  

त्यातून असे ठरले की, आंतरधर्मीय विवाह केलेल्या 12 ते 15 जोडप्यांच्या मुलाखती घ्याव्यात आणि त्या कर्तव्य साधना या डिजिटल पोर्टल वरून प्रसिद्ध कराव्यात. त्यासाठी काही निकष ठरवले आणि सर्व मुलाखती एकाच व्यक्तीने घेणे सोयीचे ठरेल, यावरही शिक्कामोर्तब केले. 

अशा मुलाखती घेण्यासाठी अनुभव, समज आणि लेखनशैली या तिन्ही घटकांची आवश्यकता असते, हे लक्षात घेऊन सर्व मुलाखती घेण्याची जबाबदारी हिनाकडे सोपवली. मग मुलाखतीसाठी व्यक्तींची निवड अंतिम करणे, त्यांच्याशी संपर्क साधणे, प्रश्न तयार करून प्रत्यक्ष मुलाखती घेणे आणि अर्थातच त्या लिहून काढणे ही सर्व कार्यवाही हिनानेच केली. 

त्या सर्व मुलाखती कर्तव्यवर प्रसिद्ध करण्यासाठीचे संपादकीय व तांत्रिक काम समीरने केले. प्रत्येक 15 दिवसांनी एक मुलाखत प्रसिद्ध होत राहिली. 14 फेब्रुवारी 2021 रोजी पहिली मुलाखत प्रसिद्ध केली आणि 24 ऑक्टोबरला 15 वी मुलाखत प्रसिद्ध करून मालिका थांबवली. 

आंतरधर्मीय विवाहितांच्या मुलाखत मालिकेला काहीतरी आकर्षक व अर्थपूर्ण शीर्षक द्यायला हवे, असे प्रारंभीच वाटले. तेव्हा सर्वपरिचित अशी 'लक्ष्मणरेषा ओलांडणे' ही कल्पना मनात चमकली आणि त्यातूनच धर्माची रेषा ओलांडून केलेले विवाह, हा अर्थ पुढे आला आणि 'धर्मरेषा ओलांडताना' हे शीर्षक आकाराला आले, तेच त्या मालिकेचे आणि आता पुस्तकाचे नाव ठरले.

कर्तव्य साधना हे डिजिटल पोर्टल 15 ऑगस्ट 2019 रोजी सुरू झाले. तेव्हापासून कर्तव्यवर प्रसिद्ध झालेल्या काही लेखमाला आणि अनेक लेख पुस्तकरूप द्यावे या दर्जाचे निश्चितच आहेत, तशी पुस्तके आगामी काळात येतीलही. मात्र कर्तव्यवर प्रसिद्ध झालेल्या मजकुराचे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक धर्मरेषा ओलांडताना हेच आहे . 

या पुस्तकाचे प्रकाशन आज 14 फेब्रुवारी 2023 रोजी, पुणे येथील साधना कार्यालयात अगदी अनौपचारिक पद्धतीने केले. कर्तव्य साधना आणि साधना साप्ताहिक यांचे आजी-माजी सहकारी आणि हिनाचे काही मित्र, अशा निवडक 25 लोकांच्या उपस्थितीत प्रकाशनाचा कार्यक्रम झाला.

त्या कार्यक्रमाचा हा 47 मिनिटांचा व्हिडिओ आहे.


या पुस्तकाच्या निमित्ताने घेतलेली हिनाकौसर खान यांची अर्ध्या तासाची व्हिडिओ मुलाखत लवकरच कर्तव्यवर प्रसिद्ध होईल.

Tags: आंतरधर्मीय विवाह लव्ह जिहाद धर्मरेषा ओलांडताना हिनाकौसर खान नवे पुस्तक साधना प्रकाशन Load More Tags

Add Comment

संबंधित लेख