पुणे पुस्तक महोत्सवात ठरलेला साधना प्रकाशनाचा कार्यक्रम एन.बी. टी. कडून ऐनवेळी रद्द

21 डिसेंबर 2023 / पुणे 

पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर 16 डिसेंबर पासून सुरु झालेल्या पुणे पुस्तक महोत्सवात साधना प्रकाशनाच्या, राजन हर्षे लिखित 'पक्षी उन्हाचा : सात विद्यापीठांच्या आवारात' या पुस्तकावर गुरुवार 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या चर्चेचा कार्यक्रम रद्द करावा लागत आहे, असे नॅशनल बुक ट्रस्ट (एन. बी. टी.) कडून ऐनवेळी सांगण्यात आले. त्या निर्णयाचा निषेध करून तो कार्यक्रम आता शुक्रवार 22 डिसेंबर 2023 रोजी, सकाळी 10.30 वाजता, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सभागृह, टिळक रोड, पुणे या ठिकाणी करण्याचे साधना प्रकाशनाने ठरवले आहे. 

16 ते 24 डिसेंबर या काळात होणाऱ्या या महोत्सवात पुस्तक व लेखक यांच्याशी संबंधित कार्यक्रम आयोजित करायचा असल्यास प्रस्ताव द्यावा, असे पत्र एन.बी. टी. ने 5 डिसेंबर रोजी अन्य अनेक प्रकाशकांसह साधना प्रकाशनालाही पाठवले होते. त्यानुसार 8 डिसेंबर रोजी साधना प्रकाशनाने, राजन हर्षे लिखित 'पक्षी उन्हाचा' या नव्या पुस्तकावरील चर्चेचा प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्तावाला उत्तर देताना, या संदर्भातआमच्या प्रतिनिधी आकांक्षा बिष्णोई यांच्या संपर्कात राहावे, असे एन. बी. टी.ने कळवले होते. त्यानंतर 12 डिसेंबर रोजी, फर्ग्युसन महाविद्यालयाच्या गेस्ट हाऊस वर साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी आकांक्षा व त्यांच्या सहकारी निहारिका यांची भेट घेतली होती. तेव्हा सुहास पाटील, गोपाळ नेवे व साईनाथ जाधव हे साधनाचे तीन सहकारीही उपस्थित होते. 

त्या भेटीतच आकांक्षा व निहारिका यांनी महोत्सवाचे वेळापत्रक पाहून, 21 डिसेंबर दुपारी 2 ते 3 ही एक तासाची वेळ निश्चित केली होती . लेखक डॉ राजन हर्षे हे फर्ग्युसनचे माजी विद्यार्थी असल्याने आणि कार्यक्रमाला येणारा वाचक समूह लक्षात घेऊन फर्ग्युसनचे अँफी थियेटर हे स्थळही कार्यक्रमासाठी तेव्हाच त्यांनी निश्चित केले होते, कार्यक्रमाचे पाहुणे व स्वरुप कळविण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे, चर्चेचे स्वरूप व वक्त्यांची नावे त्यांना दुसऱ्या दिवशी कळवण्यात आली होती. अलाहाबाद विद्यापीठाचे माजी कुलगुरू असलेले लेखक डॉ. राजन हर्षे, नांदेड येथील स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, मुंबई विद्यापीठाचे माजी रजिस्ट्रार डॉ. सतीश बागल हे चौघे या पुस्तकावर चर्चा करणारे होते. डॉ. संकल्प गुर्जर हे या चर्चेचे संचलन करणार होते. 

कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी साधनाचे सुहास व सुदाम हे दोन सहकारी आकांक्षा यांना भेटले तेव्हा त्यांना कार्यक्रमाचे स्थळही (अँफी थियेटर ऐवजी बुक कट्टा) त्यांनी दाखवले होते. मात्र कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी सायंकाळी 7 वाजता आकांक्षा बिष्णोई यांनी साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांना फोन करून कळवले की, महोत्सवाच्या ठिकाणी अनेक कार्यक्रम होणार असल्याने तुमचा कार्यक्रम रद्द करावा लागत आहे. या पुस्तकाचा विषय, कार्यक्रमाला येणारे निमंत्रित वक्ते आणि साधना प्रकाशनाचा पाऊण शतकाचा वारसा हे सर्व लक्षात घेता, कार्यक्रम रद्द झाल्याचे असे ऐनवेळी सांगणे योग्य नाही, असे साधनाच्या संपादकांनी आकांक्षा यांना सांगितले. तेव्हा, वरिष्ठांशी बोलून थोड्या वेळाने फोन करून सांगते, असे त्या म्हणाल्या. मात्र अर्धा तासाने फोन करून त्यांनी, कार्यक्रम रद्दच करावा लागत आहे असे कळवले. 

त्यामुळे, या निर्णयाचा आम्ही निषेध करीत आहोत. मात्र सर्व वक्त्यांची वेळ व हॉल ची उपलब्धता हे सर्व काल रात्री ठरवले असून, तेच सर्व वक्ते घेऊन तो कार्यक्रम शुक्रवार 22 डिसेंबर 2023 रोजी, सकाळी 10.30 वाजता, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सभागृह, टिळक रोड, पुणे येथे आयोजित करीत आहोत. धन्यवाद!

- विनोद शिरसाठ
संपादक, साधना (साप्ताहिक व प्रकाशन)



 

Tags: pune book fair national book trust of india sadhana prakashan Load More Tags

Comments:

Avinash Yamgar

such kind of fascist ideology has to be condemned.. down with automatic rule

Damodar Mauzo

बोलविता धनी कोण आहे ह्याचा अंदाज येतो. साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांवर अंकुश ठेवल्याने समाजमनाला लगाम घालतां येईल अशा भ्रमांत ते आहेत.

Add Comment

संबंधित लेख