सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका)चे साहित्य व समाजकार्य पुरस्कार 2023 जाहीर झाले..

डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते हे नऊ पुरस्कार 15 जानेवारी 2024 रोजी, सायंकाळी 5 वाजता पुणे येथील एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या सभागृहात होणाऱ्या समारंभात प्रदान केले जाणार आहेत.

अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेच्या वतीने 2023 या वर्षासाठीचे साहित्य व समाजकार्य पुरस्कार जाहीर केले आहेत. साहित्य क्षेत्रात चार, सामाजिक क्षेत्रात चार आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार अशा एकूण नऊ पुरस्कारांची घोषणा आज पुण्यात करण्यात आली. 'महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका'चे सदस्य डॉ. सुरेश तलाठी, साहित्य पुरस्कार निवड समितीचे समन्वयक मुकुंद टाकसाळे आणि 'साधना ट्रस्ट'चे विश्वस्त विनोद शिरसाठ या तिघांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती दिली. मासूम आणि साधना ट्रस्ट या दोन संस्थांच्या वतीने या पुरस्कारांचे संयोजन केले जाते. 

यावर्षीचा दिलीप वि. चित्रे साहित्य जीवन गौरव पुरस्कार डॉक्टर तारा भवाळकर (सांगली) यांना, ललित ग्रंथ पुरस्कार सतीश तांबे (मुंबई) यांच्या 'काम तमाम @ वाघा बॉर्डर' या कथासंग्रहाला, अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार कालिदास शिंदे (पालघर) यांच्या 'झोळी' आत्मकथनाला, तर रा. शं . दातार नाट्यसंहिता पुरस्कार चैतन्य सरदेशपांडे (पुणे) यांच्या 'रविवार डायरीज' आणि 'उकळी' या दोन एकांकिकांना देण्यात येणार आहे. जीवनगौरव पुरस्कार दोन लाख रुपये व स्मृतिचिन्ह अशा स्वरूपाचा असून, दोन ग्रंथ पुरस्कार आणि नाट्यसंहिता पुरस्कार प्रत्येकी पन्नास हजार रुपये व स्मृतिचिन्ह या स्वरूपात दिले जाणार आहेत. 

समाजकार्याच्या क्षेत्रात दोन विशेष कार्य पुरस्कार दिले जात आहेत. त्यामध्ये शांताराम चव्हाण (नाशिक) यांना 'असंघटित कष्टकरी' या क्षेत्रातील कामासाठी, तर नितीन पवार (पुणे) यांना 'सामाजिक प्रश्न' या विभागातील कामासाठी विशेष कार्य पुरस्कार दिले जाणार आहेत. दोन कार्यकर्ता पुरस्कार आहेत. त्यामध्ये निसार अली सफदर अली सय्यद आणि वैशाली निसार अली सय्यद-महाडिक (मुंबई ) यांना कार्यकर्ता संघर्ष पुरस्कार, तर विजय देठे (चंद्रपूर) यांना कार्यकर्ता प्रबोधन पुरस्कार दिला जाणार आहे. दोनही विशेष कार्य पुरस्कार प्रत्येकी एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह या स्वरूपात असून, दोन्ही कार्यकर्ता पुरस्कार प्रत्येकी पन्नास हजार रुपये व स्मृतिचिन्ह या स्वरूपात आहेत. याशिवाय, एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह या स्वरूपातील डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार या वर्षी शिवकुमार भारती (कानपूर, उत्तर प्रदेश) यांना दिला जाणार आहे. 

हे सर्व नऊ पुरस्कार 15 जानेवारी 2023 रोजी, सायंकाळी 5 वाजता पुणे येथील एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या सभागृहात होणाऱ्या समारंभात प्रदान केले जाणार आहेत. डॉ. जब्बार पटेल हे या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. मागील 29 वर्षांपासून साहित्य पुरस्कार, तर मागील 27 वर्षांपासून समाजकार्य पुरस्कार दर वर्षी दिले जातात. या पुरस्कारांचे प्रवर्तक सुनील देशमुख यांचे गेल्या वर्षी निधन झाले, त्यामुळे या वर्षीपासून या सर्व पुरस्कारांचे नाव सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार असे करण्यात आले आहे. या पुरस्कारांच्या निवडीसाठी भारतात व अमेरिकेत स्वतंत्र निवड समिती होत्या. पुरस्कारांच्या निवड समितीचे सदस्य व अध्यक्ष आणि अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचे काही सदस्य या समारंभाला उपस्थित राहणार असल्याची माहिती, या पुरस्कारांच्या निमंत्रक व 'मासूम'च्या सहसमन्वयक मनीषा गुप्ते यांनी दिली आहे.


हेही पाहा : 1970च्या दरम्यान म्हणजे 50 वर्षांपूर्वी जे महाराष्ट्रीय तरुण अमेरिकेत गेले आणि तिथे जाऊन त्यांनी कर्तृत्व गाजवले, त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे सुनील देशमुख. त्यांनी विशेष पुढाकार घेतला आणि मग महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) यांच्या वतीने 1994 पासून मराठी साहित्य पुरस्कार तर 1996 पासून महाराष्ट्रातील समाजकार्य पुरस्कार प्रदान केले जाऊ लागले. दर वर्षी दहा ते अकरा याप्रमाणे मागील 28 वर्षे ते पुरस्कार न चुकता दिले जात आहेत. त्या पुरस्कारांना 25 वर्षे पूर्ण झाली तेव्हा त्यांची मुलाखत 'साप्ताहिक सकाळ'चे माजी संपादक सदा डुम्बरे आणि 'साप्ताहिक साधना'चे विद्यमान संपादक विनोद शिरसाठ या दोघांनी घेतली होती. जानेवारी 2019 मध्ये घेतलेली ती मुलाखत एक तासाची आहे. मुलाखतीच्या पूर्वार्धात सुनील देशमुख यांनी व्यक्तिगत जडणघडण व जीवनप्रवास यावर ओझरता दृष्टिक्षेप टाकला आहे. तर मुलाखतीच्या उत्तरार्धात 'महाराष्ट्र फाउंडेशन'चे पुरस्कार सुरू करण्यामागील भूमिका व पुरस्कारांची कार्यवाही प्रक्रिया यांचा थोडक्यात वेध घेतला आहे. महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कारांचे महत्त्व नेमके किती व का आहे, हे समजून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करून ही मुलाखत पाहायला / ऐकायला हवी..!

पूर्वार्ध

उत्तरार्ध


साहित्य पुरस्कारप्राप्त साहित्यिकांचा थोडक्यात परिचय 

दिलीप वि. चित्रे साहित्य जीवनगौरव पुरस्कार
डॉ. तारा भवाळकर 

अध्ययन, अध्यापन, संशोधन आणि लेखन यांचा आयुष्यभर ध्यास घेतलेल्या आणि तेच आपले जीवितकार्य (मिशन) मानणाऱ्या डॉ. तारा भवाळकर यांना महाराष्ट्राच्या विचारविश्वात एक ज्येष्ठ आणि व्यासंगी विदुषी म्हणून ओळखले जाते. नाटक आणि रंगभूमी, मराठी भाषा आणि साहित्य, स्त्रीमुक्ती चळवळ, अंधश्रद्धा निर्मुलन चळवळ आणि, लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती हे ताराबाईंच्या आस्थेचे विषय आहेत आणि या क्षेत्रात सक्रियपणे आणि अखंडपणे त्या सहभागी होत आल्या आहेत. या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले असून अलीकडेच प्रकाशित झालेल्या ‘सीतायन’सह त्यांचे 41 ग्रंथ प्रकाशित झाले आहेत आणि त्याला महत्त्वाचे संदर्भमूल्य प्राप्त झाले आहे. मराठी विश्वकोषासह समाज विज्ञान कोष, मराठी वाड्मय कोष, मराठी ग्रंथ कोष, शिल्पकार चरित्रकोष, इत्यादीमध्ये त्यांनी नोंदी लिहिल्या आहेत. विशेषतः लोकसाहित्य, लोककला, आणि लोकसंस्कृतीच्या व्यासंगी अभ्यासक आणि संशोधक म्हणून त्या मराठी वाचकांना सुपरिचित आहेत.

**

ग्रंथ पुरस्कार (ललित)
सतीश तांबे
काम तमाम अ‍ॅट वाघा बॉर्डर (कथा संग्रह)

आशय, विषय आणि शैली यांच्या अनोख्या आविष्कारातून सतीश तांबे यांनी मराठी कथा विश्वात स्वतःची अशी स्वतंत्र नाममुद्रा निर्माण केली आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये ‘कथा’ हा हिणकस साहित्य प्रकार आहे अशी कठोर टीका नेमाडेंसारख्या ज्येष्ठ कादंबरीकाराने केली होती. अशा काळात कथेची ताकद केवढी आहे हे ज्या कथाकारांनी आपल्या समर्थ कथा लेखनाने दाखवून दिले, त्यातील एक अग्रगण्य कथाकार म्हणून सतीश तांबे यांचे नाव आवर्जून आणि आदराने उल्लेखता येईल. विविध वाङ्‌मय प्रकारात संचार न करता अव्यभिचारी निष्ठेने आणि आपली अवघी प्रतिभा पणाला लावून तांबे यांनी कथा लेखन केले आहे.

‘काम तमाम अ‍ॅट वाघा बॉर्डर’ या त्यांच्या प्रस्तुत संग्रहातील कथांमध्ये प्रामुख्याने मध्यमवर्गीय जीवनाचा दंभस्फोट करणाऱ्या आहेत. मात्र या संग्रहामधल्या कथांमधून कथाकार सतीश तांबे यांनी पुढचा टप्पा गाठला असून त्यामधून समकालीन वास्तवातील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय स्वरूपातील उन्मादाचा, दहशतीचा, अनिश्चिततेचा आणि जातीय विश्वाचा अंतर्वेध घेतला आहे. या प्रदूषित पर्यावरणाच्या व्यक्तिगत जीवनावर होणाऱ्या परिणामांचा वेध तांबे यांनी घेतला आहे. एक लेखक म्हणून तांबे यांचा दृष्टकोन पुरोगामी आणि आधुनिक राहिला आहे. अशा लेखकाला वाटणारी चिंता म्हणजे या कथा होत. या कथा म्हणजे समकालीन वास्तवाची ‘समालोचना (critique)’ आहेत असे म्हणणे सार्थ ठरेल.

**

ग्रंथ पुरस्कार (वैचारिक / अपारंपरिक)
डॉ. कालिदास शिंदे 
आत्मकथन - ‘झोळी’ 

ग्रामीण आणि दलित साहित्याच्याही पुढे जाऊन वंचित आणि उपेक्षित असलेल्या भटक्या आणि विमुक्त जातींचं चित्रण करणाऱ्या साहित्याची निर्मिती होऊ लागली आहे.. ‘झोळी’ या आत्मकथनाच्या रूपानं नाथपंथीय डवरी/गोसावी या फिरस्त्या समाजाचे भणंग जगणं मराठी साहित्यात प्रथमच अक्षरबद्ध झाले आहे. हा समाज मराठी संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे, बहुजन समाजामधे अध्यात्मिक जागरण करणारा आहे पण त्याचे जगणं मात्र प्रचंड हलाखीचं आणि विवंचनेचं आहे. भगवे कपडे घालून, हाताल त्रिशूळ आणि डमरू घेऊन आणि खांद्यावर झोळी अडकवून हे गोसावी लोक गावोगाव भटकतात आणि भिक्षा मागून गुजराण करतात. त्यांची स्वतः‌ची जमीन असत नाही, घर असत नाही, रहिवासी पुरावा असत नाही, रेशनकार्ड असत नाही. गावाबाहेर पालांतून राहणं आणि वारंवार स्थलांतर करणं, भिक्षा पुरेशी मिळाली नाही तर अर्धपोटी, उपाशी राहणं असं लाचारीचं जीवन त्यांच्या वाट्याला आलेलं असतं. हे आत्मकथन अत्यंत प्रांजळ आहे, वाचनीय आहे, आणि आपल्या एकूण व्यवस्थेवर प्रकाशझोत टाकणारं आहे. कालिदासने आपल्या समाजाच्या बोलीभाषेत केलेलं हे कथन आहे. हा एक प्रांजळ धगधगता समाजानुभव आहे आणि तो अपूर्व आहे.. डॉ.कालिदास शिंदे हे अशा प्रतिकूल परिस्थितीत जन्मून शिकले, त्यांनी डॉक्टरेट मिळवली, हे नक्कीच उल्लेखनीय आहे. 

रा.शं. दातार नाट्यसंहिता पुरस्कार
चैतन्य सरदेशपांडे
एकाकिंका - ‘उकळी’ आणि ‘रविवार डायरीज’

गेली चार-पाच वर्षे प्रायोगिक रंगभूमीवर चैतन्यने सातत्याने लिखाण केलेले आहे त्याची ही दोन नाटके - रविवार डायरीज आणि उकळी - सद्य परिस्थितीमध्ये महत्त्वाची वाटतात. आशय, विषय, वैविध्य, रचना, तंत्र, प्रयोगशीलता या निकषांवर हे लिखाण समाधानकारक वाटते. उकळी या नाटकाचा भाषिक संस्कार चांगला आहे. गावाकडून शहराकडे जगण्यासाठी आलेल्या माणसांना ज्या अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागते त्याचा खुसखुशीत परामर्श हे नाटक घेते.

रविवार डायरीज या नाटकाचा विषय जास्त व्यापक आणि खोलवर परिणाम करणारा आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यानंतर सर्वसामान्य माणसाचे जगणे बदलून गेले आहे. इ. स. 2000 नंतर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खुले मार्केट तयार झाले. यासाठी माणसांमध्ये क्रयशक्ती निर्माण करण्यात आली. या शक्तीला वाट फुटावी यासाठी प्रचंड वैविध्य असलेली बाजारपेठ निर्माण करण्यात आली. या बाजारपेठेमध्ये सुख मिळणार असल्याची जाहिरात केली गेली. बेसुमार चंगळवाद आणि पराकोटीचा व्यक्तिवाद हा माणसाला एकटेपणाकडे घेऊन गेला. मॉल असेल किंवा हातातला मोबाईल असेल, माणूस आता तिथे एकटा होऊन सुखाचा शोध घेतो आहे हे चित्रण फार मजेशीर आणि प्रत्ययकारी आहे.

**

समाजकार्य पुरस्कार 2023

डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृति पुरस्कार
शिवकुमार भारती (कानपूर, उत्तर प्रदेश)

शिवकुमार भारती हे उत्तर प्रदेशातील कानपूरचे रहिवासी आहेत. सध्या ते अर्जक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. अर्जक साप्ताहिकाचे ते संपादकही आहेत. अर्जक संघ ही उत्तर भारतातील एक प्रमुख सत्यशोधक चळवळ आहे.  पुनर्जन्म, नियतीवाद, जातिभेद, अस्पृश्यता, कर्मकांड, धर्मांधता, कुप्रथा, सरंजामशाही, विषमता, अनादर आणि गरिबी यासह अनेक प्रकारच्या समस्या भारतीय समाजात होत्या आणि आजही आहेत. त्या समुळ नष्ट होण्यासाठी मानवतावादी संस्कृती विकसित करणे, मानवांमध्ये समानता विकसित करणे, उच्च-नीच भेदभाव दूर करणे आणि सर्वांच्या प्रगतीसाठी कार्य करणे हे अर्जक संघाचे उद्दिष्ट आहे.

शिवकुमार भारती यांनी आपले कटियार हे आडनाव बदलून भारती असे केले आहे. ते सध्या अर्जक संघाचे वतीने कोणतेही धार्मिक कर्मकांड न करता अर्जक पद्धतीने (सत्यशोधक) विवाह करण्यासाठी मोठी चळवळ चालवतात. असे शेकडो अर्जक विवाह त्यांनी आजपर्यंत लावले आहेत. उत्तर भारतात मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणात मृत्यू भोज दिला जातो. मृत्यु भोज बंद करून आणि मृत्यूनंतरची कर्मकांडे नाकारून अर्जक पद्धतीने मृत्यूनंतरचे संस्कार करण्यासाठी लोकांना ते प्रोत्साहित करतात.

शिवकुमार भारती हे अर्जक संघाच्याव्दारे गौतम बुद्ध, रविदास, कबीर, जोतिराव फुले, छत्रपती शाहूजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पेरियार रामास्वामी नायकर, जगदेव प्रसाद, चौधरी महाराज सिंह भारती, ललाईसिंग यादव यांच्या विचारांच्या प्रसाराचे काम करतात. देशभरात अर्जक संघाच्या विस्तार करण्यात भारती यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.\शिवकुमार भारती हे मानवतावादाचे खंबीर समर्थक आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की, मानवतावाद ही विचारधारा आहे जी मानवांसाठी समानता, आनंद आणि समृद्धीचा मार्ग आहे.

**

समाजकार्य विशेष पुरस्कार 
(असंघटीत कष्टकरी, विशेष कार्य पुरस्कार)
साथी शांताराम चव्हाण (नाशिक)

राष्ट्र सेवा दल आणि समाजवादी चळवळीत रचनात्मक काम आणि संघर्ष यामध्ये गेली 55 वर्षे सहभाग. आणीबाणीत तुरुंगवास भोगणार्‍या शांताराम चव्हाण यांनी असंघटित कष्टकरी चळवळ यांच्या माध्यमातून फेरीवाले, हातगाडीवाले, यांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर आणि न्यायालयीन संघर्ष केला. त्यातून नाशिक महानगर पालिकेला फेरीवाला झोन राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा लागला. फेरीवाल्यांची ‘डॉ. राममनोहर लोहिया पतसंस्था' स्थापन करून त्यांना आर्थिक आधार देण्यात पुढाकार घेतला. राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा या विषयावर काम करतानाच त्यांचे ‘हरवलेल्या वाटेवरचा प्रवासी’ हे आत्मकथनपर पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.

**

समाजकार्य विशेष पुरस्कार 
(सामाजिक प्रश्न, विशेष कार्य पुरस्कार)
नीतिन पवार (पुणे)

अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येताना ‘विधायक युवा’ नावाच्या संघटनेच्या माध्यमातून शिक्षणासाठी विविध उपक्रम राबवत सामाजिक कामांची सुरुवात केली. त्यानंतर साक्षरतेसाठी सुरू झालेले अक्षर आंदोलन असो, किंवा भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन असो, त्यांनी राज्यपातळीवर प्रभावी नेतृत्व केले. विविध कलाजत्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती करणे, कारागृहातील कैद्यांना शिक्षणासाठी प्रेरणा देणे, बाबरी पडल्यावर पुण्याच्या महापौरांसह नगरसेवकांचे एक कलापथक तयार करून सामाजिक सलोख्यासाठी प्रयत्न करणे, असे नावीन्यपूर्ण विधायक उपक्रम राबविण्यात त्यांचा पुढाकार होता. 

समाजप्रबोधनासाठी महत्वाची भूमिका बजावणार्‍या ‘पुरोगामी सत्यशोधक’ तसेच ‘जनआंदोलन’ या नियतकालिकांचे संपादन त्यांनी केले आहे. एकीकडे प्रबोधनाचे काम सुरू असतानाच शोषितांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांचा रस्त्यावरचा संघर्षसुद्धा सातत्याने सुरू होता. डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली विविध असंघटित कष्टकर्‍यांच्या ‘अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समिती’चा 20 वर्षे त्या निमंत्रक म्हणून कार्यरत आहेत. एकीकडे रिक्षा-टॅक्सीचालक यांच्या विविध मागण्यांसाठी लढत असतानाच त्यांनी बांधकाम कामगारांच्या विकास आणि न्यायासाठी बांधकाम मजदूर सभेची स्थापना केली. त्याचबरोबर अंगणवाडी कर्मचारी सभा, महाराष्ट्र यांच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांचे मानधनवाढ, कर्मचाऱ्यांचा दर्जा, इ. साठी मोर्चे, आंदोलन करून न्याय मिळवून देण्यात पुढाकार घेतला आहे. 

स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, इ. भारतीय राज्यघटनेतील मूल्ये प्रत्यक्षात साकार व्हावीत आणि जाती-धर्मनिरपेक्ष, विज्ञाननिष्ठ समाजाची निर्मिती व्हावी यासाठी त्यांनी रचना, संघर्ष, प्रबोधन ह्या त्रिसूत्रीद्वारे केलेल्या कामातून बांधकाम मजुरांसाठी सुरक्षिततेसाठी ‘बांधकाम कामगारांचा रोजगार व सेवाशर्ती नियमन आणि कल्याणकारी कायदा’, ‘असंघटितांचा सामाजिक सुरक्षा कायदा’ लागू होण्यामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. 

**

कार्यकर्ता (प्रबोधन) पुरस्कार
विजय देठे, विरूर

चंद्रपूर जिल्ह्यातील गोडपिंपरी तालुक्यातले पाचगाव हे गोंड जमातीच्या आदिवासींचे गाव. कधीकाळी रोजगाराची संधी नसल्याने असलेले दारिद्र्य, त्यातच व्यसनाधीनता याने त्रस्त झालेल्या गावाचे चित्र पर्यावरणमित्र संघटनेचे विजय देठे यांनी पत्नी स्मिता आणि सहकार्‍यांसह बदलले. सर्वात प्रथम जनजागृती करून, लोकांना एकत्र आणून गावाभोवती असणार्‍या जंगलातल्या वनसंपत्तीवरील सामूहिक वन हक्काचा लढा दिला. तीन वर्षांच्या संघर्षांनंतर 2012 मध्ये हा वन हक्क गावाला मिळाला. बांबूची तोड आणि विक्री करण्याचा अधिकार गावाला मिळाला, त्यासोबतच जंगल राखण्याची जबाबदारीही गावाने स्वीकारली. यात सरकारी यंत्रणांनी अडचणी आणल्या. मात्र विजय देठे आणि पर्यावरणमित्र संस्थेच्या मार्गदर्शनातून गावाने शांतता आणि अहिंसेच्या मार्गाने लढा दिला. त्यानंतर ग्रामसभा नियमित आणि सक्षम करण्यात आली. गावात दारू आणि खर्रा बंदी करण्यात आली. ग्रामसभेने हिशोबाची व्यवस्थाही केली. मुलींच्या शिक्षणाचे प्रमाणही वाढले. याबरोबरच वनोपजातून रोजगारनिर्मिती झाल्याने उत्पन्न वाढून लोकांचे जीवनमान सुधारले.

** 

कार्यकर्ता (संघर्ष) पुरस्कार
निसार अली सफदर अली सय्यद आणि वैशाली निसार अली सय्यद-महाडिक (मुंबई)

मुंबईच्या गोरेगाव पूर्वमधील आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने टिफीनचा व्यवसाय करणारी वैशाली महाडीक आणि पोलिस खात्यात असलेल्या वडिलांच्या आजारपणामुळे शिक्षण सोडावे लागलेले निसार अली सय्यद यांचे धर्म भिन्न असले तरीही सामाजिक कामातून भेट होऊन 2003 मध्ये ते विशेष विवाह कायद्यानुसार विवाहबद्ध झाले. राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून कार्यरत असणारे निसार आणि वैशाली यांनी सफल विकास वेल्फेअर सोसायटी या संस्थेची स्थापना केली आहे. डॉ. दाभोळकर यांच्या हत्येनंतर रस्त्यावर विवेक जागर परिषद आयोजित केली गेली होती. हे दांपत्य ऐन कोरोनाच्या काळात लोकांना आधार देण्यासाठी बाहेर पडले. या काळात त्यांनी 800 लोकांना जेवणाचे पाकीट वाटप, औषध फवारणी, रेशन वाटप, मास्क वाटप, तसेच जनजागृतीचे काम केले. केवळ चार महिन्यांत दोन वेळा रक्तदान शिबीर घेऊन 104 बाटल्या रक्त संकलन केले. वैशाली यांना मधुमेह आणि रक्तदाब याचा त्रास असूनही त्यांनी ‘लोक शास्त्र सावित्री’ या नाटकाचे प्रयोग सादर केले. एकल महिलांसाठी हळदी-कुंकू असे कार्यक्रम न राबवता त्यांच्यासोबत मालाड मालवणीमध्ये व्हलेंटाईन डे साजरा करतात. निसार हे सध्या मुक्त पत्रकार म्हणून कार्यरत आहेत.

साहित्य पुरस्कार निवड समिती (भारत)

  1. श्रीधर नांदेडकर (औरंगाबाद) निवड समितीचे अध्यक्ष
  2. अविनाश सप्रे (सांगली) 
  3. सिसिलिया कार्व्होलो (वसई) 
  4. जयश्री हरी जोशी (मुंबई)

रा. शं. दातार नाट्यसंहिता पुरस्कार (भारत)

  1. किरण यज्ञोपवीत (निवड समितीचे अध्यक्ष)
  2. रसिका आगाशे
  3. प्राजक्त देशमुख

साहित्य आणि नाट्य पुरस्कार समन्वयक : मुकुंद टाकसाळे 

साहित्य पुरस्कार निवड समिती (अमेरिका)

  1. विद्युल्लेखा अकलूजकर
  2. शोभा चित्रे
  3. रजनी शेंदुरे 

समाजकार्य पुरस्कार निवड समिती (भारत)

  1. देविदास वडगावकर (उस्मानाबाद)
  2. ज्योति म्हापसेकर (मुंबई) 
  3. देवेंद्र गावंडे (नागपूर)
  4. निशा शिवूरकर (संगमनेर)
  5. विजया चौहान (साधना ट्रस्ट)
  6. विनोद शिरसाठ (साधना ट्रस्ट)
  7. डॉ. रमेश अवस्थी (मासूम)
  8. डॉ. मनीषा गुप्ते (मासूम)

डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृति पुरस्कार निवड समिती

  1. डॉ. हमीद दाभोलकर (सातारा)
  2. विनोद शिरसाठ (साधना ट्रस्ट)
  3. डॉ. रमेश अवस्थी (मासूम)
  4. डॉ. मनीषा गुप्ते (मासूम)

मागील वर्षीचा (2022 चा) महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार वितरण समारंभ

 

Tags: sunil deshmukh tara bhavalkar kalidas shinde shivkumar sharma satish tambe nitin pawar chaitanya sardeshpande Load More Tags

Comments:

Arun Joshi

Correct selection and congratulations to winners and Selection Committee. Arun Joshi

Dr.Cecilia Carvalho

सर्व पुरस्कार विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.

Add Comment

संबंधित लेख