‘पक्षी उन्हाचा : सात विद्यापीठांच्या आवारात’ या पुस्तकाची प्रस्तावना

साधना प्रकाशनाचे डॉ. राजन हर्षे लिखित नवे पुस्तक गिरीश कुबेर यांच्या हस्ते उद्या (15 डिसेंबर) पुणे येथे प्रकाशित होते आहे. 

पक्षी उन्हाचा : सात विद्यापीठांच्या आवारात हे साधना प्रकाशनाचे नवे पुस्तक उद्या (15 डिसेंबरला) पुणे येथे प्रकाशित होते आहे. अलाहाबाद विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन हर्षे यांनी मागील वर्षभर साधना साप्ताहिकात लिहिलेल्या 12 दीर्घ लेखांचे हे पुस्तक आहे. या पुस्तकाचे प्रकाशन दैनिक 'लोकसत्ता'चे संपादक गिरीश कुबेर यांच्या हस्ते होणार असून, समारंभाच्या अध्यक्षस्थानी साधना ट्रस्टचे अध्यक्ष विवेक सावंत हे राहणार आहेत. त्यानिमित्ताने या पुस्तकाला त्यांनी लिहिलेली प्रस्तावना येथे प्रसिद्ध करत आहोत. 

मी भारतातील प्रमुख विद्यापीठे व संशोधन करणाऱ्या काही संस्था यांच्याशी मागील पाच-सहा दशके जोडला गेलो होतो. त्यामुळे उच्च शिक्षण माझ्या अनुभवांच्या केंद्रस्थानी असणे अगदी स्वाभाविक होते. पण अशा अनुभवांवर आपण लेखमाला किंवा पुस्तक लिहू अशी कल्पना केली नव्हती. कारण त्यातील काही अनुभव नक्कीच सुखद आणि अतिशय आल्हाददायक होते; परंतु, काही इतके यातना देणारे होते की, त्यांची आठवण झाली तरी माझा मानसिक त्रास वाढत असे. मात्र, एखाद्या व्रतासारखे आपले आयुष्य उच्च शिक्षणाचा विकास करण्यासाठी द्यायचे, ही माझी फार प्रामाणिक इच्छा होती. मला ध्येयवादी लोकांचे खूप आकर्षण वाटत असे आणि तोच ध्येयवाद स्वत:मध्ये वाढवायचा मी मनस्वी प्रयत्न केला.

पॅरिसमध्ये दोन वर्षे वास्तव्य करून मी भारतात परतलो आणि परतल्यानंतर दोन महिन्यांच्या आतच म्हणजे 1976 च्या जानेवारीमध्ये मी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात काही काळ शिकवायला लागलो. मागे वळून आपल्या ॲकॅडमिक कारकिर्दीकडे पाहतो, तेव्हा वाटते की 1976 ते 2020 पर्यंत मी काही ना काही शैक्षणिक जबाबदाऱ्यांमुळे कामात कायम व्यग्रच होतो. व्यावहारिक दृष्टीने बघितले तर, मी माझ्या प्रदीर्घ कालखंडात पुष्कळ यश मिळवले. अनेक बुद्धिमान विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी व सहकाऱ्यांनी माझे आयुष्य समृद्ध केले. विशेषत:, विद्यार्थिवर्गाने माझ्या कामाला (एक प्राध्यापक, संशोधक आणि विचारक म्हणून) खूप दाद दिली. तरीही, भारतात मला जशी विद्यापीठे हवी होती, तशी मी बघू शकलो नाही. तशी विद्यापीठे मला आणि माझ्या सहकाऱ्यांना सामूहिक काम करूनही उभारता आली नाहीत, याची मला कायमच खंत वाटत आली आहे.

विद्यापीठांच्या संदर्भात माझे काही ठाम विचार आहेत. मला असे वाटते की, विद्यापीठ हे तेथील सर्व घटकांना (विद्यार्थी, कर्मचारी आणि प्राध्यापक) आपलेसे वाटले पाहिजे. ते सर्वसमावेशक असले पाहिजे आणि प्रत्येकाला आपापल्या गुणांचा विकास करता यावा यासाठी कटिबद्ध असले पाहिजे. गरीब किंवा मागास कुटुंबातून आलेल्यांना, अल्पसंख्याक, दलित, आदिवासी आणि differetly abled विद्यार्थी-विद्यार्थिनींना विद्यापीठात आपुलकी आणि न्यायाने वागविले गेले पाहिजे. त्यामुळे विद्यापीठाच्या परिसरात सर्वांना सामावून घेण्यासाठी किती परिश्रम करावे लागतात, हे तसे प्रयत्न प्रत्यक्ष केल्यावरच ध्यानात येते. सामाजिक न्याय आणि समतेची जाणीव हळूहळू निर्माण करावी लागते.

मला असे वाटते की, गुणवत्ता असलेल्या आणि तळमळीने काम करणाऱ्या सर्वांना विद्यापीठात खूप वाव मिळाला पाहिजे. अर्थात गुणवत्ता हा शब्दसुद्धा आजकाल काही लोकांच्या लेखी एक आक्षेपार्ह शब्द झाला आहे. त्यामुळे तो सहज नाकारला जातो. आणि जी माणसे गुणवत्तेला महत्त्व देतात, ती हास्यास्पद वाटतात. हे सगळे चालू असताना आपण थोडाफार मूलभूत विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ, आपल्याला गणित, इंग्रजी, रसायनशास्त्र किंवा अर्थशास्त्र यांसारखे विषय शिकवायचे असले, तर त्या विषयांतील दर्दी आणि उत्तमात उत्तम मंडळींना प्राध्यापक म्हणून निवडले गेले पाहिजे. आज विद्यापीठात तळमळीने काम करणाऱ्या आणि गुणवत्तेला जपणाऱ्या प्राध्यापकांना अनेकदा क्रूरपणे वागवले जाते. हे सगळे थांबले पाहिजे. अकार्यक्षम, कारस्थानी किंवा अनेक अर्थांनी राजकारणाचा धंदा करणारी मंडळी फार मोकळेपणाने विद्यापीठात वावरतात. कधीकधी तर ती बेछूट वागतात आणि शेवटी विद्यापीठांचे किंवा उच्च शिक्षणसंस्थांचे अभ्यासाचे वातावरण बिघडवून टाकतात.

एकूणच शिक्षणक्षेत्र आज अगदी सर्वार्थाने सडलेले दिसते आहे. विद्यापीठाच्या कामात होणारा राजकारणी मंडळींचा हस्तक्षेप, कुलगुरूपद मिळविण्यासाठी लाचारी करत सगळीकडे वावरणारे उमेदवार आणि वाढत जाणारी व्यावसायिक ढिलाई बघितली की, तथाकथित ‘क्वालिटी एज्युकेशन’च्या गप्पा अगदी पोकळ वाटू लागतात. संस्था उभारणारी आणि मोठी करू शकणारी माणसे आज इतकी अदृश्य का वाटतात? अर्थात अशी परिस्थिती असली तरीही माझ्यातील आशावाद मेलेला नाही. आपण या विषयावर मोकळेपणाने बोललो तर देशात  पुन्हा नवी ध्येयवादी पिढी निर्माण होईल, असे मला वाटते.


हे पुस्तक साधना प्रकाशनाच्या वेबसाईटवरून खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

संस्था उभ्या करण्यासाठी त्याग, खरे बोलण्याचे धाडस, कर्तबगारी आणि पराक्रमी वृत्तीची गरज असते. गुणवत्तेची मानवी मूल्यांशी सुरेल सांगड घालू शकणारी, संवेदनशील माणसे आज आपल्याला विद्यापीठात प्रचंड संख्येने हवी आहेत. मला नेहमी असे वाटते की, जोपर्यंत लायक व्यक्ती मिळत नाही, तोपर्यंत विद्यापीठातील पदे भरली नाहीत तर ते फार उत्तम होईल. कारण एखाद्या अयोग्य व्यक्तीची निवड केल्यावर ती पिढ्यान्‌पिढ्या विद्यार्थिवर्गाचे नुकसानच करते. Selectios can hurt, rejections do not hurt! विद्यापीठात किंवा कोणत्याही उच्च शिक्षणाच्या संस्थेत कामाचे प्रेम आणि कामाची शिस्त जोपासली गेली पाहिजे. अधिकारांप्रमाणेच जबाबदारीची जाणीव सर्व घटकांना वेळोवेळी केली गेली पाहिजे.

अर्थात, ज्या परिस्थितीत आज विद्यापीठे आहेत, ती पाहता माझे विचार कालबाह्य वाटण्याची शक्यताच  जास्त आहे. जरी विद्यापीठांचा घसरणारा दर्जा आणि तेथील गलिच्छ राजकारण मला खिन्न करीत असले तरीही सध्याची परिस्थिती प्रयत्नांनी बदलू शकेल, यावर माझा ठाम विश्वास आहे.

विद्यापीठांच्या संदर्भात या आणि अशाच तऱ्हेच्या भावना माझ्या डोक्यात घोळत असताना मी ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ यांना पुण्याच्या फर्ग्युसन रोडवरील ‘रुपाली’ या रेस्तराँमध्ये जुलै 2022 मध्ये भेटलो. गप्पांच्या ओघात एखाद्या पछाडलेल्या माणसाप्रमाणे मी माझ्या अनेक बऱ्या-वाईट अनुभवांवर आणि माझ्या सहवासात आलेल्या विविध व्यक्तींवर मनसोक्त बोललो. त्या दिवशी त्यांनी मला आत्मकथनात्मक लेख लिहायचा खूप आग्रह केला. ते म्हणाले की, ‘असे लेखन केवळ आत्मकथन किंवा आत्मचरित्र नसते, तर ते एका विशिष्ट लोलकातून बघितलेले, अनुभवलेले आणि लिहिलेले अनेक संस्थांचे चरित्रच असते.’

त्यापूर्वी हैदराबाद येथील राज्यशास्त्राचे ज्येष्ठ प्राध्यापक आणि विचारवंत न.गो. राजुरकर हेसुद्धा मी अशा तऱ्हेचे लिखाण करावे, यासाठी 2011 पासून मला खूप आग्रह करीत होते. शेवटी प्रा.राजुरकर आणि शिरसाठ यांचा सल्ला मला पटला आणि चाचपडत का होईना, साधनेत लेखमाला लिहायला सप्टेंबर 2022 पासून सुरुवात केली, आणि नोव्हेंबर 2023 पर्यंत लेखमाला संपली. मागील 52 वर्षे मी महाराष्ट्राच्या बाहेर आहे. आणि माझ्या घरातही मराठी बोलली जात नाही. परंतु, एकदा काम सुरू झाल्यावर भाषेची कोणतीही अडचण मला आली नाही.

या लेखमालेतील लेख लिहिताना आपले अनुभव मी जास्तीत जास्त सच्चेपणाने व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबरोबरच माहितीही अचूक दिली आहे. अशा लेखांतून लेखकाचा ‘अहंभाव’ व्यक्त होण्याचा संभव असतो. परंतु, तशी संभावना टाळण्याचा मी माझ्या बाजूने तरी काटेकोरपणे प्रयत्न केला आहे.

या लेखमालेतील बहुतांश लेख हे माझ्याशी संबंधित असलेल्या अथवा मी काम केलेल्या विविध उच्च शिक्षणसंस्था किंवा विद्यापीठांशी निगडित आहेत. त्यामुळे एक महाविद्यालयीन संस्था म्हणून पुण्याचे फर्ग्युसन कॉलेज, उच्च शिक्षणातील एक प्रसिद्ध संशोधन संस्था म्हणून पॅरिसची इन्स्टिट्यूट ऑफ पोलिटिकल स्टडीज्‌ यावर मी लिहिले आहे. त्याचप्रमाणे पुणे, जे.एन.यू. हैदराबाद, कोलंबिया आणि अलाहाबाद विद्यापीठांतील अनुभव हे मी विस्ताराने लिहिले आहेत.

यातील दोन लेख दोन व्यक्तींशी असलेल्या माझ्या संबंधांवर आहेत. त्यातील एक माझे गुरू अनिरुद्ध गुप्ता यांच्यावर आहे. हा लेख आमच्या परस्पर संबंधांवर आणि त्या वेळच्या जे.एन. यू.च्या वातावरणाबद्दलही पुष्कळ काही सांगून जातो. दुसरा लेख माझ्या आणि माननीय अर्जुनसिंग यांच्या संबंधांवर आहे. अशा संबंधांमुळे विद्यापीठाची प्रगती कशी होते, किंवा अशा संबंधात थोडा तणाव आल्यावर त्याचा विद्यापीठावर काय परिणाम होतो, हे दाखवायचा मी प्रयत्न केला आहे. या दोनही लेखांत कोणावर व्यक्तिगत टीका करण्यापेक्षा मानवी प्रवृत्तींचे आकलन करायचा प्रयत्न मी केला आहे. लेखमालेतील शेवटून दुसरा लेख ‘जिप्सी’वर आहे. जिप्सी ही माझ्या जगण्याचा गाभा असलेली प्रवृत्ती आहे. ती प्रवृत्ती आयुष्यभर माझ्यात टिकून आहे. अशा प्रवृत्तीच्या आधारावर जगताना मी अनेक तऱ्हेच्या विचारांना आणि विचारसमूहांना कसा सामोरा गेलो, तेच सांगायचा प्रयत्न केला आहे. 

डॉ. राजन हर्षे त्यांच्या नव्या पुस्तकासह

जाता जाता, मला आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. या लेखमालेत चर्चा केलेल्या संस्थांव्यतिरिक्त माझा आणखी दोन महत्त्वाच्या संस्थांशी दाट संबंध आला. त्यातली पहिली, दिल्लीतील साउथ एशियन युनिव्हर्सिटी (एस.ए.यू.) तिथे मी आंतरराष्ट्रीय संबंधांवर 2012 पासून 2017 पर्यंत अध्यापन केले. तिथेही मला वेगवेगळे अनुभव नक्कीच आले. परंतु, आज मी त्या अनुभवांपासून काळाच्या दृष्टीने खूप जवळ आहे. आणखी थोडा काळ जाऊ दिला तरच त्या कालखंडाला मी न्याय देऊ शकेन, असे मला वाटते. शिवाय एस.ए.यू. हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ असल्याने त्याबद्दल लिहिताना अधिक जपून लिहिले पाहिजे, याची मला पूर्ण कल्पना आहे. म्हणून त्या विद्यापीठाबद्दल मी थोडक्यातच लिहिले आहे.

दुसरी संस्था म्हणजे जी. बी. पंत इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स; ती प्रयागराजच्या अलाहाबाद केंद्रीय विद्यापीठांचा एक अंतर्गत- पण स्वायत्त भाग आहे. मी त्या संस्थेचा 2014 ते 2020 पर्यंत म्हणजे दोन टर्म्स अध्यक्ष होतो. तेथील माझ्या अनुभवांवर खूप लिहिण्यासारखे असले तरी तेही कालांतरानेच लिहिणे योग्य होईल. वरील दोनही संस्था सरकारी अनुदानावर अवलंबून आहेत. कधीकधी सरकारे बदलतात किंवा अशा संस्थांमध्ये जबाबदारीच्या जागांवर असलेली मंडळी निवृत्तही होतात. आणि माझ्या लिहिण्याचा उद्देश काहीतरी लिहून नवे विवाद निर्माण करायचे किंवा त्या संस्थांच्या कामात वा तिथे काम करणाऱ्या लोकांसाठी अडथळे निर्माण करण्याचा मुळीच नाही. त्यामुळे या दोन संस्थांवर कालांतराने लिहिणे श्रेयस्कर ठरेल. या लेखमालेतील बाराव्या प्रकरणात मात्र मी जी.बी. पंत संस्थेबद्दल थोडक्यात लिहिले आहे.

साधना साप्ताहिकात नियमितपणे प्रकाशित झालेल्या लेखांना अनेक वाचकांनी फोन अथवा ई-मेलच्या माध्यमातून भरभरून दाद दिली. लेखांवर येणाऱ्या विविध तऱ्हेच्या प्रतिक्रिया साधनाच्या संपादकांनी छापण्याची तसदीही घेतली. त्यामुळे आपल्या लेखांची प्रतिमा आरशात बघण्याची प्रचिती आली. माझ्या असंख्य वाचकांचा नामोल्लेख करणे शक्य होणार नसले, तरीही मी त्या सर्व वाचकांचे अगदी मनापासून आभार मानतो. काही प्रतिक्रियांचा मात्र मला आवर्जून इथे उल्लेख करावासा वाटतो. माझे काही लेख विशेष आवडले तेव्हा पॉप्युलर प्रकाशनाच्या रामदास भटकळ यांनी मला अगदी मोजक्या शब्दांतच (एक किंवा दोन ओळींची) पत्रे लिहिली. आपले विचार इतक्या कमी शब्दांत आणि अतिशय नेमकेपणाने मांडणे फार अवघड असते. त्यांच्या प्रतिक्रिया वाचून मला स्फूर्ती मिळाली. तसेच मराठी सांस्कृतिक विश्वातील आदरणीय न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनीही त्यांचे अभिप्राय थोडक्यात पत्रांद्वारे कळविले. प्रा.न.गो. राजुरकर आणि डॉ. मनोहर इंगळे यांनी प्रत्येक लेख चिकित्सकतेने वाचून कधी कधी सकारात्मक सूचना किंवा संकेतही दिले. तसेच प्रा. मंगेश कुलकर्णी यांनी लेखांचा गाभा पूर्णपणे समजून घेऊन अगदी छोट्या छोट्या चुका काटेकोरपणे माझ्या निदर्शनास आणल्या. अनुपमा जोशी यांनी काही प्रतिक्रिया खूप विचारपूर्वक लिहिल्या, त्या वाचताना मी मोहरून गेलो. कारण, वाचकाला आपले म्हणणे समजले हे कळल्यावर लेखकाला होणारा आनंद काही वेगळाच असतो. वरील सर्वांचा मी विशेष आभारी आहे.

माझ्या गेल्या 11 वर्षांच्या लिहिण्याच्या प्रवासात माझे तरुण मित्र व विद्यार्थी डॉ.संकल्प गुर्जर यांनी मला कायमच साथ दिली आहे. त्यांचा स्पष्टवक्तेपणा मला भावतो. त्यांनी वेळोवेळी अनेक सकारात्मक सूचना दिल्या. त्याशिवाय, या प्रवासात साधनाचे संपादक विनोद शिरसाठ हे माझे नेहमीच सहप्रवासी होते. आमच्या अनेक चर्चांमधून या पुस्तकाच्या प्रक्रियेला वरचेवर वेगळीच गती मिळत गेली.

एक संपादक म्हणून विनोद शिरसाठ हे कोणतीही गोष्ट उत्तमात उत्तम करायचा प्रयत्न करतात. उदा.पॅरिसच्या माझ्या दिवसांवर लेख छापताना मी जेव्हा पॅरिसला विद्यार्थी होतो, त्याच काळातला माझा फोटो त्यांना हवा होता. सुदैवाने माझा एक जिवलग मित्र नयन चंदा याने तसा फोटो काढला होता आणि तोच साधनामध्ये छापून आला. त्यामुळे मी नयनचेही मन:पूर्वक आभार मानतो. संकल्प आणि विनोद यांच्या आग्रहास्तव वाचकांशी संवाद साधण्यासाठी मी ‘ध्येयासाठी मरणे सोपे, जगणे अवघड!’ हे शेवटचे प्रकरणही लिहिले. पुस्तकाच्या शेवटी परिशिष्ट आहे, त्यात माझ्या चार पुस्तकांबद्दल थोडक्यात माहिती आहे.

मराठीत लिहिली गेलेली ही माझी पहिलीच लेखमाला आणि आता हे माझे पहिलेच मराठी पुस्तक. लेखमाला लिहीत असताना माझ्या घरातून (‘घर’ हा शब्द मी इथे सर्वसमावेशक आणि व्यापक अर्थाने वापरत आहे.) मला कायमच खूप प्रोत्साहन मिळाले. थोडक्यात, मी अनेकांचा आभारी आहे. अर्थात, पुस्तकातील त्रुटींबद्दल आणि कमतरतांबद्दल मी स्वत:च जबाबदार आहे.

- राजन हर्षे, नवी दिल्ली
rgharshe@gmail.com


Tags: पक्षी उन्हाचा राजन हर्षे पुस्तक साधना प्रकाशन गिरीश कुबेर पुस्तक प्रकाशन विद्यापीठ लेखमाला Load More Tags

Add Comment