गेल ऊर्फ शलाका - ज्ञानक्षेत्रातील एक विधायक वादळ

उच्च कोटीचा मानवीय दृष्टीकोन असला की कसल्याही प्रकारची भिन्नता आपल्या समजेआड येऊ शकत नाही हे गेलने आपल्या अभ्यासातून सिद्ध केले. 

माझा पूर्वसंचितावर अजिबात विश्वास नाही. चमत्कार वगैरे गोष्टी भाकड आहेत याबद्दल ठाम खातरी आहे. तरीही या दोन्ही गोष्टी खऱ्या असव्यात असे वाटावे असे आयुष्य मला लाभले. मी जिथे जन्माला आलो त्या कुटुंबामुळे, प्रदेशामुळे आणि वातावरणामुळे मला नेहमीच संपन्न आणि परिपूर्ण माणसे परिवार म्हणून लाभत गेली. नुसती माणसेच नव्हे तर कुटुंबेही. याबद्दल चिंतन करताना कधीतरी डॉ. दाभोलकर, डॉ. आमटे, डॉ. बंग या महाराष्ट्रातील सांस्कृतिक परिवारांचे मी स्मरण केले होते. 

त्या मालिकेतील कासेंगावचे पाटणकर हे कुटुंब. महाविद्यालयीन काळात माझ्या निपाणी गावामुळे मला सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय चळवळीचे वातावरण लाभले. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारत आणि जगभरची अनेक अद्भुत व्यक्तिमत्त्वे निपाणीत भेटली. त्यांचे हात हातात घेण्याइतक्या जवळिकीने भेटली. गोऱ्या किंवा काळ्या कातडीचे वाटणारे दबदबायुक्त कुतूहल काही काळातच विरून गेले आणि त्यापलीकडे माणूस म्हणून ते आत्मीय वाटू लागले. गेल ऑम्व्हेट हे त्यांतील एक नाव. त्या विद्यार्थी वयात पहिल्याच भेटीत अमेरिकन उच्चारातून मराठी बोलणाऱ्या या गोऱ्या कातडीच्या धिप्पाड आणि उंच बाईबद्दल दरारापूर्ण कुतूहल वाटले होते. 

नंतर सततच्या भेटींतून आणि सहवासातून ‘गेल’ असे हाकारून हा दरारा आणि कुतूहल कमी होत जाऊन तिच्याशी अरे-तुरेच्या भाषेत बोलण्याइतकी जवळीक कधी आणि कशी निर्माण झाली हे समजलेच नाही. अमेरिकेसारख्या अद्भुत वाटणाऱ्या दूरवरच्या देशातून ती आली आहे आणि आपल्या शेणाने सारवलेल्या जमिनीवर मांडी ठोकून बैठक मारते याबद्दलचे अप्रुप आणि कुतूहल संपले होते. आपल्या परिवारातील ती एक सदस्य आहे असे वाटण्याइतकी कौटुंबिक जवळीक निर्माण झाली होती. 

ती आमच्या जीवलग मित्राची - भारत पाटणकरची - सहचारिणीही आहे हे त्यानंतर बऱ्याच काळाने कळले पण त्याचे आश्चर्य आणि कौतुक वाटण्यासारखे आता मनात काही उरले नव्हते इतकी जवळीक निर्माण झाली होती. पहिल्या दर्शनात अमेरिकन पाहुणी वाटलेली ही गोरी मड्डम त्या पहिल्या भेटीत निरोप घेताना केवळ भारतीय नव्हे केवळ महाराष्ट्रीयन नव्हे तर आमच्या कुटुंबाचीच एक सदस्य म्हणून माझ्याच नव्हे तर आम्हा सर्व मित्रांच्या कुटुंबामध्येही सामावून गेली.

आमच्या परिवारात भारत पाटणकर हे आमच्या दृष्टीने अर्जेंटिनाच्या ‘चे गवेरा’सारखे आमच्यासाठी नायकत्व लाभलेले एक उफाळते क्रांतिकार वादळ. ‘गेल’ या शब्दाचा एक अर्थ ‘वादळ’ असाही आहे. ही दोन वादळे एकमेकांत सामावून गेल्यावर एक मोठाच सांस्कृतिक उत्पात महाराष्ट्राच्या आणि भारताच्याही सामाजिक, राजकीय जीवनात घडणे साहजिकच आहे आणि आम्ही अगदी जवळचे होऊन ते साक्षात अनुभवू शकलो. 

मूळ नेदरलँडचे म्हणजे युरोप खंडातील ऑम्व्हेट कुटुंब विस्थापित होऊन अमेरिका खंडात आले. गेल तिथल्या मोकळ्या लोकशाही संस्कृतीत घडली आणि मग एकदम अभ्यासाच्या निमित्ताने आशिया खंडात भारतासारख्या तिसऱ्या जगात आली. भिन्न संस्कृती, भिन्न जीवनपद्धती आणि भिन्न भौगोलिकता असूनही ‘गेल’ या देशात आली. उच्च कोटीचा मानवीय दृष्टीकोन असला की कसल्याही प्रकारची भिन्नता आपल्या समजेआड येऊ शकत नाही हे गेलने आपल्या अभ्यासातून सिद्ध केले. 

ती भारतात आली, भारतातल्या एका क्रांतिकारी राज्यात म्हणजे महाराष्ट्रात आली. महाराष्ट्रातल्या एका परिवर्तनवादी विधायक चळवळखोर परिसरात म्हणजे सातारा जिल्ह्यात आली. या जिल्ह्यातून स्वातंत्र्यपूर्व काळापासून निर्माण झालेल्या परिवर्तनवादी चळवळींचा नेमका वेध घेण्याचा तिने प्रयत्न केला. या प्रयत्नामध्ये परसंस्कृतीतून आलेले कुठलेही पूर्वग्रह तिच्या आड आले नाहीत. इतके तिचे निरीक्षण नेमके होते. दृष्टीकोन स्वच्छ होता. ज्या चळवळींचे नेमके आकलन एतद्देशीय असूनही इथल्या विचारवंतांना आणि अभ्यासकांना झाले नव्हते. ते गेलने आपल्या प्रदीर्घ, आटोकाट आणि नेमक्या अभ्यासातून केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर अख्ख्या जगाला दाखवून दिले. महात्मा फुलेंच्या सत्यशोधकत्वाचा अर्थ आणि अब्राह्मणी चळवळींचा सांस्कृतिक, धार्मिक, जातीय आणि वर्गीय अर्थ आणि विश्लेषण तिने जगापुढे नेमकेपणाने मांडले. त्याचा प्रतिवाद या संस्कृतीत वाढलेल्या विचारवंतांनाही करता आला नाही. 

गेलने या चळवळीचे केलेले विश्लेषण आणि अन्वयार्थ इतका मर्मभेदी होता आणि आहे की, त्यामुळे या देशाला धर्माच्या नावाखाली वेठीला धरले आहे. अशा धर्मवादी संघटनांनी आपले पहिले पंधरा प्रमुख शत्रू म्हणून ज्यांची यादी केली आहे त्यामध्ये गेलचे नाव प्रमुख आहे. ख्रिस्ती मिशनर्‍यांची हस्तक म्हणून तिची कुचाळकी केली आहे पण जन्माने ती ख्रिस्ताचा शांतिपूर्ण वारसा घेऊन आलीच होती आणि नंतर अभ्यासातून तिने प्राप्त केलेले बुद्धाचे सम्यकज्ञान तिला त्याच्या विश्वात्मक करुणेकडे घेऊन गेले. एक क्रांतिकारक पाऊल म्हणून तिने आणि भारतने बौद्ध धर्माचा अधिकृत वसाही स्वीकारला. 

गेलने आपल्या प्रदीर्घ अभ्यासातून महात्मा फुलेंच्या या चळवळीचे ऐतिहासिक महत्त्व संपूर्ण भारतातल्या सामाजिक चळवळीच्या दृष्टीने अधोरेखित केले आणि ते संपूर्ण जगभर नेले. महात्मा फुलेंच्या विचारांचे वैश्विकपण विश्वासमोर आणण्यासाठी कदाचित गेलचे हे भारतात येणे आणि भारतीय होणे आम्हा सर्व भारतीयांच्या दृष्टीने अतिमहत्त्वाचे, आदराचे आणि कृतज्ञतापूर्ण आहे. 

माझ्या माहितीप्रमाणे गेल आपल्या उपरोक्त प्रबंधाचा अभ्यास करत असताना तिच्या भारतातल्या व्हिसाची मुदत संपत आली पण ज्ञानपिपासेने पछाडलेल्या विदुषीला आपला अभ्यास पूर्ण करण्यासाठी कशाचीही तडजोड करायची नव्हती. त्याच भूमिकेतून भारतातला आपला मुक्काम वाढवण्यासाठी तिने भारतातल्या एखाद्या तरुणाशी लग्न करायची तयारी दाखवली. त्याची गोड परिणती म्हणजे भारतशी तिचे लग्न. हे लग्न करताना केवळ एक व्यवहारीक तडजोड म्हणून तिने केले असेलही कदाचित... पण नंतर अनुरूप जीवन साथीदार कसे असावेत याची एक मिसालच केवळ चळवळीतल्याच नव्हे तर सर्वच लग्नाळू तरुण-तरुणींसाठी ते झाले. 

एकदा इंदूताईच (भारत पाटणकरांच्या आई) मला सांगत होत्या, ‘भारतने गेलशी लग्न करायचे ठरवले तेव्हा मी हादरूनच गेले होते. ही अमेरिकन बाई आता माझ्या पोराला माझ्यापासून तोडणार आणि अमेरिकेला घेऊन जाणार याची मला भयंकर धास्ती वाटत होती. नंतर मात्र हळूहळू कळत गेले की, ही अमेरिकन सूनच मला हवी तशी देशी सून आहे.’ 

ताईंचे हे शब्द अक्षरशः खरे आहे कारण विद्यापीठीय संशोधनासाठी गेलने सुरू केलेला हा महाराष्ट्राचा आणि भारताचा अभ्यास केवळ प्रबंधापुरता सीमित राहिला नाही. अभ्यास करता-करता ती अंतर्बाह्य भारतीय आणि त्यातही महाराष्ट्रीय होत गेली. भारतने तर आपले पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण सोडून स्वतःला जीवनदानी चळवळीतल्या कार्यकर्ता म्हणून झोकून दिलेच होते. गेलनेही तेच केले. भारतच्या सर्व सामाजिक चळवळींमध्ये आणि संघर्षामध्ये ती ठामपणे कृतिशील कार्यकर्ती म्हणून उभी राहिली. आपल्या तात्त्विक अभ्यासाला सामाजिक कृतीची जोड देत राहिली. मग ती दुष्काळग्रस्तांची चळवळ असो, धरणग्रस्तांची चळवळ असो, विज्ञानप्रसाराची चळवळ असो, स्त्रीमुक्ती किंवा परित्यक्तांची चळवळ असो... सर्वच ठिकाणी आपल्या आंतरराष्ट्रीय स्थान विसरून त्या भारतबरोबर आणि सासू इंदूताईंबरोबर कडक उन्हातान्हात, खेड्यापाड्यात, दगडधोंड्याच्या रस्त्याने ठामपणे चालत राहिल्या. 

गेलच्या ज्ञानक्षेत्रातील आवाका पाहिला तर तिने उपरोक्त अतिशय महत्त्वाच्या ग्रंथाबरोबर इतरही जवळपास पंचवीसच्यावर अत्यंत महत्त्वपूर्ण विषयांवर पुस्तकलेखन तर केलेच... शिवाय जगभरच्या विविध विद्यापीठांतून अध्यापनाचे व मार्गदर्शनाचेही काम केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पुणे विद्यापीठात फुले-आंबेडकर चेअरच्या प्रमुख, समाजशास्त्र विभागाच्या प्राध्यापक, ओरिसामधील निरवासमध्ये आंबेडकर चेअरच्या प्रोफेसर, नोर्डीक येथे आशियाई अतिथी प्राध्यापक, इन्स्टिट्यूट ऑफ एशिअन स्टडीज, कोपन हेगन, नेहरू मेमोरिअल म्युझिअम आणि लायब्ररी नवी दिल्ली, सिमला इन्स्टिट्यूटमध्ये प्रोफेसर म्हणून काम केले आहे. Food and Agriculture Organization (FAO), United Nations Development Programme (UNDP), Netherlands Organization for International Development Cooperation (NOVIB) च्या सल्लागार राहिल्या आहेत. Indian Council of Social Science Research (ICSSR) च्या वतीने भक्ती या विषयावर संशोधन केले. The Economic and Political Weekly (EPW) या प्रतिष्ठित नियतकालिकामध्ये व The Hindu सारख्या प्रतिष्ठित इंग्लीश वर्तमानपत्रामध्ये त्यांचे विविध विषयांवरचे लेख प्रकाशित झालेले आहेत. विरप्पन नावाच्या कुख्यात तस्करानेही द हिंदूमधला तिचा लेख वाचून आभाराचे आणि कौतुकाचे पत्र पाठवले होते. एकाच वेळी रणमैदानावर आणि वैचारिक मैदानावरही सहजपणे ती वावरत होती.

गेल एका अतिशय भिन्न संस्कृतीतून इथल्या संस्कृतीत आली होती आणि तरीही तिचे आधी म्हटल्याप्रमाणे इथल्या संस्कृतीचे आकलन अद्भुत वाटावे असेच होते. विशेषतः अब्राह्मणी विचाराचा आधार असलेल्या आणि त्यामुळेच फुलेंच्या सत्यशोधकीय विचारपरंपरेचा गाभा असलेल्या वारकरी चळवळीबद्दलचे तिचे आकलन तर मार्क्स आणि इथले वारकरी संत यांच्यातील आंतरिक नातेसंबंध कशाप्रकारचे आहेत याचा बोध करून देणारेच आहे.

गेलने वारकरी चळवळीचे केलेले समाजशास्त्रीय विश्लेषण मराठी आणि भारतीय संस्कृतीतील भक्ती चळवळीला एक वेगळा आणि निर्णायक आयाम देणारे आकलन आहे... शिवाय गेलने भारतच्या मदतीने केलेले तुकोबांच्या अभंगांचे इंग्लीश भाषांतर हे तुकोबारायांचे जागतिक साहित्यिकांमधले स्थान अधोरेखित करणारे काम आहे. खरेतर तिला खूप मोठ्या प्रमाणात तुकोबारायांचे हे सर्व अमृतसाहित्य जगाच्या मंचावर न्यायचे होते पण आधी कामाच्या व्यग्रतेने व नंतर शारीरिक आजारामुळे ते राहून गेले. तरीही तिने या विषयावर केलेले काम हे तुकोबांचे जागतिक स्थान निश्चित करण्यासाठी निर्णायक आहे.

गेल सामाजिक चळवळींची आणि त्या निमित्ताने भारतातल्या भक्ती चळवळींची एक निष्ठावंत अभ्यासक होती. आम्ही म्हणजे मी, धनाजी गुरव, भारत, बाळासाहेब पाटील आदी मित्रांनी कर्नाटकातील ‘शरण’ चळवळींचा व बसवण्णांचा विचार समजून घेण्यासाठी कर्नाटकात एक अभ्यासयात्रा काढली होती. या यात्रेमध्ये गेलही आवर्जून सहभागी झाली होती. या वेळीही गेलची संशोधक, अभ्यासू वृत्ती पटकन दिसून आली. प्रवासाला निघण्यापूर्वीच या विषयावरची अनेक पुस्तके तिने जमा केली होती आणि संपूर्ण प्रवासात तिचे अखंड वाचन व टिप्पणी काढणे चालू असायचे. कर्नाटकातल्या विविध विचारवंतांबरोबर या आधारे ती नेमकेपणाने प्रश्न विचारायची. काही वेळा तर या विषयावरच्या तज्ज्ञांपेक्षाही तिचे मुद्दे अधिक नेमकेपणाने असायचे आणि तिच्याशी चर्चा करणाऱ्या कर्नाटकी विचारवंतांना आपल्यालाच अधिक ज्ञानलाभ झाला असे वाटायचे. 

धारवाडमध्ये डॉ. एम. एम. कलबुर्गींना भेटायची संधी मिळाली. त्या वेळी तिला नेमके घाईघाईने मुंबईला जावे लागले. कलबुर्गींरख्या विद्वानाला आपल्याला भेटता येत नाही याच्या तीव्र वेदना तिच्या चेहऱ्यावर जाणवत होत्या. 

कलबुर्गी सरांची ती निर्घृण हत्या झाल्यावर मला गेलचा फोन आला. फोनवर बोलताना तिचा कंठ दाटून आला होता. या विद्वान माणसाला भेटण्याची संधी मिळूनही भेटता आले नाही याचेच दुःख तिच्या बोलण्यात सतत येत होते. 

एखाद्या विषयाचा अभ्यास करणे आणि तो अभ्यास समाज बदलण्यासाठी समाजाभिमुख कसा करता येईल हे बघणे हे खरेतर खऱ्या ज्ञानसाधकाचे उद्दिष्ट असते. गेल या अर्थाने अंतर्बाह्य ज्ञानसाधक कार्यकर्ता होती. 

एक आदर्श समाज जो गौतम बुद्ध आणि कार्ल मार्क्स म्हणजे करुणा आणि शास्त्रीयता यांच्या संयोगातूनच निर्माण होऊ शकतो तो निर्मिण्याचा ध्यास तिच्या प्रत्येक शब्दातून जाणवतो... मग ते तिचे लेखन असो नाहीतर कृती. 

गेल वारशाने युरोपिअन होती. संस्कृतीने अमेरिकन होती आणि मानवतेने भारतीय झाली होती. भारतने विवाहानंतर तिचे नाव शलाका ठेवले होते. शलाका म्हणजे तेजाचा किरण. गेल इंग्लीश नावाप्रमाणे वादळ होती, हिंदी नावाप्रमाणे तेज होतीच. त्या अर्थाने आपल्या कृतिशील ज्ञानतेजाने सगळे जग उजळून टाकणारी ती तेजस्वी वादळ होती. जागतिक असूनही ती आमच्यासाठी स्थानिक होती. वंश, देश आणि संस्कृती याच्या पल्याड जाऊन मानवजात म्हणजे काय असते याचं ती एक तेजस्वी उदाहरण होती.

 - राजा शिरगुप्पे
rajashirguppe712@gmail.com

(लेखक व कार्यकर्ता अशा दुहेरी भूमिकेत वावरणाऱ्या राजा शिरगुप्पे यांनी केलेल्या महाराष्ट्र, बिहार, ईशान्य भारत या तीन प्रदेशांतील दुर्गम भागांच्या शोधयात्रांवरील तीन पुस्तके विशेष महत्त्वाची आहेत. सांगली येथे झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.)

Tags: लेख राजा शिरगुप्पे गेल ऑम्व्हेट Raja Shirguppe Gail Omvedt व्यक्तिवेध Load More Tags

Comments:

Dr. Anand Shankarrao Jarag

Throws more light on Dr. Gale's thought-process and impact on Indian intellectual upbringing.

Add Comment