महात्मा फुलेंचा आजचा सत्यशोधकीय वारसा - प्रा. हरी नरके

जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पताका घेऊन तो जात राहिला, गर्जत राहिला, लढत राहिला.

जातिव्यवस्थेला गंभीरपणे न घेणाऱ्या पुरोगामी अभिजनांच्या हातात मार्क्सवादी चळवळ सापडली होती, तर जातिव्यवस्थेने सर्वांत नीच ठरवलेल्या दलित चळवळींना आंबेडकरी वारसा लाभला होता. पण या दोहोंच्या मधल्या काही जाती विलक्षण कात्रीत सापडल्या आहेत; त्यांना उच्चवर्णियांत स्थान नाही आणि दलित जातीइतकी टोकाची दडपणूकही नाही पण आपल्या अंगभूत नैसर्गिक गुणशक्तींना विकसित करण्याचे स्वातंत्र्यही नाही अशा वेळी म. फुलेंच्या विचारांची दिवटी हातात घेऊनच या जातींच्या प्रबोधनाकरता उतरले पाहिजे, हे हरीतल्या कार्यकर्त्याला जाणवले असावे.

भारतीय स्वातंत्र्याच्या तिशीत म्हणजे सत्तरच्या दशकात स्वातंत्र्योत्तर जन्मलेली पहिली पिढी तरुण होत होती. तरुणाईतल्या नैसर्गिक बंडखोर वृत्तीने भवताली दिसणाऱ्या वास्तवाला भिडत होती. सत्ताधाऱ्यांचा सत्तेतून येणारा माज, प्रस्थापितांचे हितसंबंध सांभाळणाऱ्या परंपरेतून चालत आलेल्या गोष्टी अस्वस्थपणे अनुभवत होती. त्याच वेळी आपल्या पूर्वसूरी महात्म्यांच्या विचारांवर चिंतन करत होती. त्यातून ऊर्जा घेत आपल्याला हवे तसे आदर्श जग निर्माण करण्याच्या भावनेतून पेटून उठत होती. संघटीत होत होती. मीही याच दशकात जन्माला आलो आणि भोवताली लाभत गेलेल्या वातावरणाने या धडधडणाऱ्या समविचारी मित्रांच्या सहप्रवासात सामील झालो. हा प्रवास नव्या जगाचे स्वप्न पाहणाऱ्या आणि त्यासाठी तडजोडीने दुरुस्त करू पाहणाऱ्या उदारमतवादी मित्रांपासून ते ‌‘जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळुनि किंवा पुरूनी टाका’ या जिद्दीने पेटलेल्या नवक्रांतिकारक मित्रांसोबत होता. या काळातल्या या पिढीने हा काळ घडवला आणि या काळानेही या पिढीला घडवले. नुकताच गमावलेला माझा मित्र हरी नरके या काळाचा आणि या पिढीचा चालताबोलता अक्षररूपी प्रतिनिधी होता.

हरी मला पहिल्यांदा भेटला तो अक्षररूपाने. म्हणजे त्या काळात बहुजनांच्या आदर्शांवर अजून थेट हल्ले सुरू झाले नव्हते किंवा त्या वेळची आमची पिढी सत्ताधाऱ्यांवर कितीही नाराज असली तरी ते सत्ताधारी तोवर प्रतिगाम्यांच्या हातातले साधन झाले नव्हते. परंतु समाजाचे सांस्कृतिक नेतृत्व मात्र आज जे सत्ताधारी आहेत त्यांच्यातीलच बुद्धिजीवी वर्ग करत होता. आपल्या सावध कुटीलतेने बहुजनांच्या आदर्शांना कलंकित करून उच्छेदित करण्याच्या प्रयत्नात होता. अशाच एका उजव्या विचारसरणीच्या साप्ताहिकात  स्वत:ला अभ्यासक म्हणवणाऱ्या, वास्तवात बाळबुद्धीच्या, एका कट्टर उजव्या विचारसरणीच्या गृहस्थाची महात्मा फुलेंची बिभत्स टिंगल करणारी एक लेखमाला प्रकाशित झाली. पण आज जसे सगळीकडे सामसूम वाटते, तसे तेव्हा घडले नाही. कारण स्वातंत्र्यानंतरच्या एका संतप्त पिढीच्या संतापाच्या उद्रेकाची पातळी अजून प्रस्थापित शक्तींच्या लक्षात आली नव्हती. या लेखमालेला खडसावून प्रतिकार करण्याची ऊर्मी त्या वेळी अनेकांच्या मनात खदखदत होती. या ऊर्मीला नेमके शब्दरूप त्या वेळच्या वेगवेगळ्या चळवळींतून घडलेल्या हरी नरके नावाच्या एका नवतरुणाने दिले. अत्यंत विद्वत्तापूर्ण शैलीत, इतिहाससिद्ध आणि सत्यसिद्ध पद्धतीने या लेखमालेतून त्याने म. फुलेंची निंदानालस्ती करणाऱ्या लेखकाचे वस्त्रहरण केले; एवढेच नाही तर जातीय विद्वेषाने भरलेले त्याचे मनही नग्न केले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आतापर्यंत अशाप्रकारचे सत्य आणि विद्वत्तापूर्ण विवेचन करण्याची कुवत फक्त उच्चवर्णियांकडेच असू शकते, या भाबड्या समजूतीला या विवेचनकर्त्याने सुरूंग लावला. शाहू महाराज, महात्मा फुले आणि आंबेडकर यांनाच आपल्या वाटचालीतील दीपस्तंभ मानणाऱ्या एका बहुजन समाजातल्या नवशिक्षित तरुणाकडून हा सणसणीत टोला होता. हरीच्या त्या प्रतिवादाने अख्खा महाराष्ट्र गर्जून निघाला. महात्मा फुलेंच्यावर केलेली चिखलफेक, ती करू पाहणाऱ्यांना केवळ मातीमोलच नाही तर भुईसपाट करून गेली. हरी त्या वेळी आमच्या पिढीचा वैचारिक मार्गदर्शक झाला, तो कायमचाच. याच घटनेच्या निमित्ताने हरी कोल्हापुरात व्याख्यानासाठी आला होता. त्या वेळी कौतुक आणि आकर्षण म्हणून मी त्याच्या या व्याख्यानाला गेलो आणि मग त्याचा कायमचा सहप्रवासी जीवलग बनून राहिलो.  

हरीच्या वैचारिक व्यासंगाला, तो ज्या मराठी भाषेत जन्मला त्या भाषेच्या मातृभाषेच्या ओढीचा घट्ट पाया होता. त्यामुळे इतकी मोठी ऐतिहासिक, तात्त्विक आणि साहित्यिक परंपरा आपल्या भाषेला लाभलेली असूनही तिला अजूनही अभिजात भाषेचा दर्जा केंद्रशासनाकडून मिळालेला नाही, याची इतर सर्वच मराठीप्रेमींसारखी त्यालाही खंत होती. त्यातूनच तो या भाषेला अपेक्षित दर्जा मिळवून देण्यासाठी उभ्या असलेल्या चळवळीत एक कट्टर सैनिक म्हणून सामील झाला आणि ही बांधिलकी त्याने अखेरच्या श्वासापर्यंत निभावली. या निमित्ताने मराठी भाषेच्या व्यापकत्त्वाचा त्याने मांडलेला आलेख आणि लेखाजोखा अक्षरश: विस्मयकारक आणि चिरस्थायी आहे. विशेषत: ‘चिपळूणकरी शैलीतील संस्कृतप्रचुर पुणेरी मराठी’लाच मराठीची केवळ एकमेव प्रमाणभाषा म्हणून उच्चरवात स्थापण्याचा प्रयत्न करणाऱ्या मानभावींची खिल्ली तर त्याने उडवलीच पण भाषेची वैज्ञानिकता कशी तपासावी याचा एक शास्त्रीय आधारच घालून दिला. त्यामुळे विशिष्ट सत्तेने किंवा विशिष्ट प्रदेशाने घोषित केलेले निकष हे भाषेचे प्रमाणत्व ठरवू शकत नाहीत, हे भाषावैज्ञानिक सत्य पुनर्स्थापित झाले. दुय्यम मानून दुर्लक्षिल्या जाणाऱ्या बोलीभाषा या खरे पाहता भाषेच्या एकंदर सार्वभौमत्त्वाचे अपरिहार्य अंश असतात, हे भाषाविज्ञानाचे सत्य अधोरेखित करून मराठीतल्या जवळपास 52 बोलीभाषांना त्यांचे भाषा म्हणून मूळ स्थान प्राप्त करून देत मराठी भाषेची नैसर्गिक समृद्धी किती आहे, हे भाषेच्या अभ्यासकांपुढे त्याने आणले.

हरीच्या या भाषिक कार्याला केवळ त्याचे भाषिक प्रेम एवढेच कारण नाही; तर भाषा हे सांस्कृतिक प्रकटीकरण आहे आणि हरी ज्या शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा सच्चा पाईक होता, ते विचार भाषेचेच माध्यम करून पायदळी तुडविले जात आहेत, हे त्याच्यातल्या दूरदृष्टीच्या विचारवंताला प्रकर्षाने जाणवत होते. प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना गैरसोयीची वाटणारी आणि त्यांच्या सत्तेला धक्का पोहोचवणारी बहुजनांची भाषा आणि तिचे सामर्थ्य फुले-शाहू-आंबेडकरांना झालेल्या राजकीय आणि सामाजिक विरोधामुळे हरीच्या चांगलेच लक्षात आले असावे. त्यामुळेच या महानुभावांच्या विचारांचा खरा जागर व्हायचा असेल तर दडपली गेलेली शोषितांची भाषा उंचावली पाहिजे, हे हरीने नक्कीच ओळखले असावे. त्यामुळेच कदाचित हरीने आपल्या आयुष्याचा बराच मोठा कालखंड या कामासाठी प्राधान्याने अर्पण केला.


हेही वाचा : ओबीसींचे राजकीय प्रशिक्षण बंद करणारा निर्णय - हरी नरके


हरी स्वत: बहुजन समाजातला होता. म्हणजे उच्च जातीने इतर जातींना दिलेले दुय्यमत्व त्याने साक्षात अनुभवले होते आणि अनुभवत होता. आणि त्यामुळेच आपला संघर्ष केवळ सांस्कृतिक नाही, तर सामाजिक आणि राजकीय आहे हेही त्याने मनोमन जाणले होते. त्यासाठी तो कृतिशीलपणे या संघर्षासाठी मार्ग शोधत राहिला. जातिव्यवस्थेला गंभीरपणे न घेणाऱ्या पुरोगामी अभिजनांच्या हातात मार्क्सवादी चळवळ सापडली होती, तर जातिव्यवस्थेने सर्वांत नीच ठरवलेल्या दलित चळवळींना आंबेडकरी वारसा लाभला होता. पण या दोहोंच्या मधल्या काही जाती विलक्षण कात्रीत सापडल्या आहेत; त्यांना उच्चवर्णियांत स्थान नाही आणि दलित जातीइतकी टोकाची दडपणूकही नाही पण आपल्या अंगभूत नैसर्गिक गुणशक्तींना विकसित करण्याचे स्वातंत्र्यही नाही. आणि याचा फायदा त्या त्या जातीतील काही मूठभर संधीसाधू पुढारी आपापल्या जातीवर वर्चस्व ठेवण्यासाठी घेत आहेत, अशा वेळी म. फुलेंच्या विचारांची दिवटी हातात घेऊनच या जातींच्या प्रबोधनाकरता उतरले पाहिजे, हे हरीतल्या कार्यकर्त्याला जाणवले असावे. प्रस्थापित राजकारणात आपल्या कर्तृत्वाने पुढे आलेल्या छगन भुजबळांचे या तरुणाकडे लक्ष गेले. माळी समाजाचेच असल्याने या नेत्याला आरंभी म. फुलेंबद्दलही कौतुक असावे. आलेली संधी हेरण्याइतका हरीही चाणाक्ष होता. त्यानेही भुजबळांना स्नेहाचा हात दिला आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे महात्मा फुलेंच्या सत्यशोधकीय विचाराकडे भुजबळांना आकृष्ट केले. त्यातूनच भुजबळांनी आपला संघटनेच्या ‘ओबीसी सेल’चे धुरीणत्व हरीकडे सोपविले. हरीनेही या संधीचा उपयोग करत म. फुलेंचा सत्यशोधकीय विचार सांस्कृतिक माध्यमाचा उपयोग करत राजकीय हत्यार बनविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तीसेक वर्षांच्या आपल्या सार्वजनिक आयुष्यात हरीने ग्रंथालयातील ज्ञानसाधनेला रस्त्यावरच्या लढाईचा आधार दिला आणि रस्त्यावरल्या लढाईला पुस्तकातील विचारांचा! जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पताका घेऊन तो जात राहिला, गर्जत राहिला, लढत राहिला.

शिवाजी विद्यापीठात बऱ्याच वेळा वेगवेगळ्या परिसंवादाच्या निमित्ताने तो भेटायचा, त्या प्रत्येक वेळी त्याचा एक प्रश्न हटकून असायचा. ‘शाहू-फुले-आंबेडकरांसारखे महाउंचीचे दीपस्तंभ समोर असतानादेखील ही आपली बहुजन समाजातली पोरे भगव्या रंगाच्या पट्ट्या बांधून का हिंडत आहेत? बरे या पट्ट्या भगव्याही नाहीत तर पुणेरी केशरी आहेत! मातीचा भगवा रंग या पोरांना कधी कळणार?’ हरीच्या वेदनेला आजही माझ्याकडे उत्तर नाही.

एवढ्या प्रगत वैद्यकीय व्यवस्थेमध्ये खरे तर हरीचा आजार ही फार क्षुल्लक गोष्ट ठरायला पाहिजे होती. शिवाय नामवंत इस्पितळात त्याच्या आजाराचे निदान करण्याचा प्रयत्न झाला होता. तरीही योग्य निदान न होऊन त्याचा अंत झाला, हे सत्य समोर आले. हा केवळ अपघात आहे की प्रस्थापित व्यवस्थेचे कारस्थान आहे, असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो. कारण हरीची प्रत्येक कृती ही या व्यवस्थेच्या मुळालाच हात घालून अयोग्याला उपटून टाकू पाहणारी होती.

 - राजा शिरगुप्पे
rajashirguppe712@gmail.com
(लेखक व कार्यकर्ता अशा दुहेरी भूमिकेत वावरणाऱ्या राजा शिरगुप्पे यांनी केलेल्या महाराष्ट्र, बिहार, ईशान्य भारत या तीन प्रदेशांतील दुर्गम भागांच्या शोधयात्रांवरील तीन पुस्तके विशेष महत्त्वाची आहेत. सांगली येथे झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.)

Tags: raja shirguppe chhagan bhujbal shahu phule ambedkar obituary आदरांजली शाहू फुले आंबेडकर हरी नरके छगन भुजबळ राजा शिरगुप्पे श्रद्धांजली मृत्युलेख स्मृतीलेख Load More Tags

Comments:

बि.लक्ष्मण

मोजका आशय व वास्तव सांगणारा ऊत्तम लेख.

Sanjay Bagal

खूप सुंदर भावना प्रकट मात्र मित्रत्वाचे संबंध असताना त्रयस्थपणे मांडणी....प्रा.नरके यांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली

Kumar Ubale

शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांचा वसा आणि वारसा आयुष्यभर जपणारे आणि जगणारे थोर विचारवंत प्रा.हरी नरके सरांना वाहिलेली श्रद्धांजली मनाला स्पर्शून गेली. सरांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन.

Navnath Nagargoje,

खूपच चांगली प्रतिक्रिया प्रा. हरी नरके सरांबद्दल प्रथम वाचली, इतरही त्यांना श्रद्धांजली वाहनारे लेख मी वाचले पण आपला लेख नरके सरांच्या अधिक जवळ जाणारा वाटला, प्रा हरी नरके सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Add Comment