भाई एन. डी. पाटील : संत नामदेवांचा आधुनिक अवतार

महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचा आधारस्तंभ डॉ. एन. डी. पाटील यांना वाहिलेली आदरांजली...

महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचा आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जायचे ते शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे वयाच्या 93व्या वर्षी निधन झाले. गेल्या साठ-सत्तर वर्षांच्या सक्रिय सार्वजनिक आयुष्यात त्यांनी सर्वसामान्य, कष्टकरी, शोषित-वंचितांसाठी सत्याग्रही मार्गाने अनेक आंदोलने केली. त्यांचे निकटवर्ती, ज्येष्ठ लेखक, कार्यकर्ते राजा शिरगुप्पे यांनी त्यांना वाहिलेली आदरांजली...

एव्हरेस्टच्या पायथ्याला उभं राहिलं, की त्याची आकाशगामी उंची म्हणजे काय हे पाहणाऱ्याच्या लक्षात येतं. पण एखाद्या निसर्गतःच पंख लाभलेल्या पाखराला त्या शिखराच्या माथ्यावर विहार करण्याची संधी मिळाली तर त्या बिचाऱ्याला त्या शिखराच्या उंचीची काय कल्पना येणार? तशी माझी काहीशी अवस्था झाली आहे. मला लाभलेल्या नैसर्गिक वातावरणामुळे एरवी आकाशातील दूरस्थ वाटणारे ग्रहतारे माझ्यापुरते अगदी सहजगामी झाले आहेत. आणि हे दैदीप्यमान तारे जेव्हा दृष्टीआड होत गेले, तेव्हा त्यांचे अफाट अद्‌भुतपण माझ्या लक्षात येत गेले. पण हे सारे उशिरा आलेले शहाणपण आहे. कारण सूर्यप्रकाशात सूर्याचे तेज कळत नाही. त्यासाठी अंधार समजून घ्यावा लागतो.

काहीशा सुंदर योगायोगाने का होईना, माझे बालपण आणि एकूणच सामाजिकीकरण पुरोगामी चळवळीच्या वातावरणात झाले. तीन पिढ्यांची वारकरी परंपरा, वडिलांपासून आलेली समाजवादी परंपरा, निपाणीच्या बिडी कामगार आया-बहिणींनी भेटवलेली स्त्री व कामगार शक्ती, त्या निमित्ताने झालेली जगभरच्या कामगार आणि परिवर्तनवादी चळवळीची ओळख, याच धामधुमीत कधीतरी एन. डी. पाटील नावाचे वादळ भेटले. त्या वेळी तर चळवळीच्या अगदी पहिल्या इयत्तेत होतो. कामगार शक्ती ही एकमेव परिवर्तनशील शक्ती आणि बाकी सगळे निसर्गदत्त दुश्मन वाटायचे. त्या विद्यार्थीवयात मी आणि माझे समानप्रेरित, समवयस्क मित्रमंडळी सायकलवरून निपाणीहून सांगली जिल्ह्यातील विटा गावी गेलो होतो. तिथल्या काही चळवळखोर मित्रांनी तिथे शेतमजूर, गरीब शेतकऱ्यांचे कसलेसे आंदोलन उभे केले होते. बहुधा जी. डी. बापू लाड, संपत पवार, आमचा त्या वेळचा समवयस्क मित्र भारत पाटणकर इ. मित्रमंडळी हे आंदोलन उभे करण्यात आघाडीवर होते. विटा शहरातल्या भर चौकात आंदोलकांनी ठिय्या आंदोलन मांडले होते. आजूबाजूला खाकी वर्दीतील पोलिसांची मोठीच गर्दी दिसत होती. तीन-चार मोठ्या निळ्या गाड्याही दिसत होत्या. अनेक आंदोलक नेते राणा भीमदेवी थाटात प्रस्थापित सरकारला नावे ठेवत भाषणे करीत होते. ते ऐकून आम्हा युवकांना चेव येत होता. क्रांतिशिवाय पर्याय नाही असे काहीसे मनात घट्ट होत होते. आणि अशा वेळी एक उंचेपुरे, भरदार शरीरयष्टीचे, पँट, बूट, शर्ट घातलेले एक गृहस्थ बोलायला उभे राहिले आणि जमलेल्या गर्दीतून एकच जयजयकाराची घोषणा उठली, ‘‘कॉम्रेड एन. डी. पाटील सरांचा विजय असोऽऽ’’ ही घोषणा ऐकताच आम्ही थरारून गेलो. कारण सरांचे नाव खूप ऐकले होते. पण प्रथमच त्यांना आज पाहत होतो. सरांनी हात उंचावून सगळ्यांना शांत केले आणि मग पुढे त्या कडाडल्या उन्हात ते अखंड दीड तास न थांबता बोलत होते. सुरुवातीलाच त्यांनी आम्हा तरुण मुलांकडे कौतुकाने पाहत म्हटले, ‘‘आता मी निर्धास्त आहे. कारण ही नवी पिढी समर्थपणे आपल्या खांद्यावर हे जग बदलण्यासाठी क्रांतीचे जू घेऊन सिद्ध झाली आहे. 'अखेरीस या जगात फक्त शेतकरी आणि कामगारांचे राज्य येणार आहे' याचा शंभर टक्के दिलासा, विश्वास देणारी ही निर्णायक खूण आहे.’’ आमच्याही नकळत आम्ही या वाक्याला टाळ्या वाजवल्या. कारण आमच्यावर एवढ्या लहान वयात इतका मोठा विश्वास पहिल्यांदाच कुणीतरी टाकला होता.


हेही वाचा : पुरोगामी चळवळीतील एक लढवय्या नेता : प्रा.डॉ.एन.डी. पाटील - आबासाहेब सरवदे


भाषण संपल्यावर सरांनी प्रत्येकाला जवळ बोलावून आमची विचारपूस केली. सोबतच्या कार्यकर्त्यांना आमच्या पोटापाण्याची नीट काळजी घेण्याची, थोडीशी दरडावण्याच्या स्वरूपातच सूचना केली. ही सरांशी झालेली पहिली भेट; पण ती जन्मांतरीची गाठ घालून गेली. यानंतर आजतागायत महाराष्ट्रातल्या कुठल्याही सामाजिक आंदोलनात सरांनी हाक दिली आणि आम्ही गेलो नाही असे घडले नाही. अगदी बेळगावपासून जळगाव, धुळेपर्यंत आणि मुंबईपासून नागपूरपर्यंत विविध ठिकाणी, विविध आंदोलनांसाठी, मोर्चांसाठी, शिबिरांसाठी आम्ही पुन्हा पुन्हा एकत्र येत राहिलो. आणि त्या योगाने चळवळीतील आमची इयत्ता सरांच्या स्पर्शाने वाढवित राहिलो. समग्र क्रांती म्हणजे समाज बदलण्यासाठी स्वतःलाही आमूलाग्र बदलत राहणे. एन. डी. सरांची होणारी प्रत्येक भेट ही दरवेळी कार्यकर्ता म्हणून स्वतःला एक नवीन पैलू पाडण्याची संधी असायची.

प्रत्येक श्वास हा केवळ परिवर्तनासाठीच कसा घ्यायचा आहे याचे सर म्हणजे आमच्यासाठी एक नखशिखांत उदाहरण होते. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत चाललेल्या विविध चळवळी एन. डी. पाटील सर किती समग्रतेने पाहायचे. एका निर्णायक आदर्श जगासाठी त्या चळवळीचे एकत्रीकरण कसे करता येईल याचा सातत्याने विचार करायचे. त्यासाठी वेगवेगळ्या प्रश्नांवर चालवलेल्या - मग ती स्त्री मुक्तीची असो, उद्योग-व्यवसायाची असो, खासगीकरणाची-सेझची असो, विनाअनुदान संस्कृतीने निर्माण केलेल्या शिक्षणाच्या व्यापारीकरणाविरुद्ध असो किंवा सांस्कृतिक पातळीवर ब्राह्मणी व्यवस्थेला आव्हान देणारी विद्रोही चळवळ असो - सर या साऱ्यांना कार्यकर्ता म्हणून तर भिडायचेच पण आपल्या आयुष्यात कमावलेले संघटनकौशल्य पूर्ण ताकदीनिशी वापरून त्या चळवळीला एक मोठाच आयाम प्राप्त करून द्यायचे.

सर मुळात संघर्षावर विश्वास ठेवणारे संघर्षशील कार्यकर्ते होते हे जितके खरे, तितकेच ते एक निर्मितीक्षम विधायक नेते होते. जे नको आहे त्याला निर्णायकपणे नकार देणे हा जसा त्यांचा स्थायीभाव होता, तसेच जे हवे आहे - असे काही सुंदर फुलवण्यासाठी सर्व विधायक शक्ती वापरणे हे त्यांचे बलस्थान होते. त्यामुळे संघर्षाचे राजकारण करताना त्यांनी विधायक निर्मितीकडे कधी दुर्लक्ष होऊ दिले नाही. त्यामुळेच, नंतरच्या काळात इतर शिक्षण संस्थांचे बाजारीकरण झाले तरी भाऊराव पाटलांच्या रयत संस्थेमध्ये सरांनी रयतेचे रयतपण त्यातील शेतकरी कामगार निष्ठा कायम ठेवून अबाधित राखले. सर चळवळीचे कार्यकर्ते होते, क्रांतिकारी पक्षाचे राजकीय नेते होत, पण भाऊराव पाटलांच्या तालमीत तयार झालेले अंतर्बाह्य शिक्षकही होते. त्यामुळे त्यांनी केवळ चळवळीची आणि राजकीय पक्षाची फौज निर्माण केली नाही तर समाज बदलण्यासाठी कायमस्वरूपी स्थित असलेल्या शिक्षकांचा एक सागरच निर्माण केला. त्यामुळे सरांनी घडवलेले शिक्षक सरांचे काम त्यांच्याच निष्ठेने अखंडीतपणे पुढे चालवित आहेत.

आपल्याला लाभलेल्या दीर्घ आयुष्यात सरांनी एकही क्षण अयोग्य ठिकाणी व अयोग्य कारणांनी व्यतीत केल्याचं मला आठवत नाही. जर त्यांनी आपले मेव्हणे शरद पवार यांच्यासारखी राजकीय तडजोड केली असती तर ते महाराष्ट्राचे तहहयात मुख्यमंत्री दिसले असते. पण म. फुलेंच्या सत्यशोधक विचारांवर जडलेली भक्ती, जगभराच्या शेतकरी कामगार शक्तींवरील दृढ विश्वास आणि महाराष्ट्रातल्या बहुजन शेतकऱ्यांबद्दल असलेले गाढे प्रेम यांमुळे एन. डी. सर आपल्या भूमिकेपासून ढळू शकले नाहीत. त्याग आणि धैर्य त्यांचे महामेरूपण काय असते हे एन. डी. सरांनी आपल्या वर्तनातून अनेकवेळा दाखवून दिले. अनेक वेळा त्यासाठी त्यांनी सामाजिक निंदा स्वीकारली. राजकीय पिछेहाट, विजनवास स्वीकारला. पण आपण स्वीकारलेल्या तत्त्वाशी त्यांनी कधी तडजोड केली नाही. वाढणाऱ्या वयातून येणारा सरळपणा त्यांनी कधीच सोडला नाही. सदैव नव्या आणि आधुनिक विचारांची कास धरून त्या पद्धतीने स्वतःला आपल्या भूमिकेला ठाम व अत्याधुनिक ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यासाठी प्रसंगी अवहेलना स्वीकारण्याची वेळ आली तरी त्यांनी ती धिरोदात्तपणे स्वीकारली. त्यांचे नावच नामदेव होते. तेराव्या शतकात होऊन गेलेले संत नामदेव ज्या पद्धतीने अलांछित जगले तसेच आयुष्य सरही जगले. हा केवळ योगायोग नसावा.

- राजा शिरगुप्पे
rajashirguppe712@gmail.com

(लेखक व कार्यकर्ता अशा दुहेरी भूमिकेत वावरणाऱ्या राजा शिरगुप्पे यांनी केलेल्या महाराष्ट्र, बिहार, ईशान्य भारत या तीन प्रदेशांतील दुर्गम भागांच्या शोधयात्रांवरील तीन पुस्तके विशेष महत्त्वाची आहेत. सांगली येथे झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.)

Tags: एन डी पाटील श्रद्धांजली सामाजिक चळवळ राजा शिरगुप्पे Load More Tags

Add Comment