‘भारतीय’ गोरखा सैनिक

सध्या भारत-चीन सीमावादामुळे वातावरण तंग असताना भारत-नेपाळ सीमावादानेही डोके वर काढलेय. ‘नेपाळ हे एक स्वतंत्र, सार्वभौम राष्ट्र असल्याने नेपाळी नागरिकांनी परकीय देशांची चाकरी करू नये अन गोरखा सैनिकांनी भारतीय लष्करात भरती होऊ नये’ असा एक राजनैतिक मतप्रवाह नेपाळमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर गोरखा सैनिकांचा भारतीय लष्करातील प्रदीर्घ इतिहास समजून घेणे महत्त्वाचे ठरेल.

19 व्या शतकाच्या सुरुवातीसच शारीरिकदृष्ट्या अत्यंत काटक अन चपळ असलेल्या गोरख्यांची लढवय्यी वृत्ती ब्रिटिशांच्या चाणाक्ष नजरेतून सुटली नाही. त्यामुळे त्यांनी ब्रिटीश लष्करात गोरख्यांचा समावेश केला अन 24 एप्रिल 1815 रोजी गोरख्यांची स्वतंत्र ‘गुरखा रेजिमेंट’ उभारली. स्वातंत्र्योत्तर काळात त्याचे नामकरण ‘गोरखा रेजिमेंट’ असे झाले. (मराठीत आजही गुरखा हाच शब्द प्रचलित आहे. रात्रीअपरात्री आपल्या परिसराची रखवाली करणारा गुरखा हा सीमेवरही नजरेत तेल घालून, प्रसंगी प्राणांची आहुती देऊन देशाचे संरक्षण करीत असतो, तो देश त्याचा नसला तरीही!) 

परंतु 'भारत हा गोरख्यांचा देश नाही', असं म्हणणं गोरखा अन भारतीय दोहोंसाठीही अन्यायकारक ठरेल इतके ते भारतीय लष्कराशी एकरूप झाले आहेत. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत, नेपाळ आणि ब्रिटन यांच्यात झालेल्या त्रिस्तरीय करारानुसार एक गोरखा रेजिमेंट ब्रिटिश लष्करात अन सहा गोरखा रेजिमेंट भारतीय लष्करात कार्यरत झाल्या. त्यानंतर भौगोलिक, सांस्कृतिक भिन्नतेमुळे ब्रिटिश लष्करातील गोरख्यांचे प्रमाण उत्तरोत्तर कमी होत गेले. याऊलट भारतीय लष्करात मात्र गोरख्यांचे प्रमाण वाढतच गेले, इतके की त्यांची एक नवीन रेजिमेंट भारताला उभारावी लागली. आजमितीस सात गोरखा रेजिमेंटचे 25,000 सैनिक भारतात कार्यरत आहेत. (त्यातील 70 टक्के गोरखा सैनिक नेपाळी असून 30 टक्के गोरखा भारतातील दार्जिलिंग, धर्मशाळा, डेहराडून येथील रहिवासी आहेत). ईशान्य भारतात कार्यरत असणाऱ्या आसाम रायफल्स या निमलष्करी दलात 20,000 गोरखा कार्यरत आहेत. जवळपास एक लाख गोरखा सैनिक आणि 10,000 गोरखा विधवांना भारतीय लष्कराकडून निवृत्तीवेतन मिळतेय.

गोरखा रेजिमेंटमधील जवान (सैनिक) हे गोरखा असले तरी अधिकारी मात्र भारतातील कुठल्याही प्रांतातील असू शकतात. गोरखा रेजिमेंटमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना गोरख्यांची मातृभाषा ‘गोरखाली’ शिकणे अनिवार्य असते. गोरखाली भाषेतच हे बहुप्रांतीय अधिकारी सर्वसामान्य जवानांशी संवाद साधतात, त्यांच्या प्रेमास, आदरास, विश्वासास पात्र ठरतात आणि व्यापक गोरखा परिवाराचे सदस्य बनतात. लष्करातून निवृत्त झालेले अधिकारी आपापल्या प्रांतात परतल्यानंतरदेखील गोरख्यांची प्रतीके, सन्मानचिन्हे मोठ्या अभिमानाने आपल्या पोशाखात, घरात प्रदर्शित करतात. उदाहरणार्थ गोरखा हॅट (टोपी). विशिष्ट प्रकारची गोरखा हॅट ही प्रत्येक गोरखा अधिकाऱ्यासाठी अतीव अभिमानाची गोष्ट. ती हॅट परिधान करण्यासारखा दुसरा कुठलाच सन्मान नाही असे प्रत्येक अधिकाऱ्याला वाटते.

गोरख्यांचे शस्त्र म्हणजे खुकरी (एक विशिष्ट प्रकारचा सुरा). गोरखा रेजिमेंटमध्ये कार्यरत असणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या घरातील दर्शनी भागात मोठ्या सन्मानाने ही खुकरी विराजमान झालेली असते.  दोन खुकरी एकमेकांत गुंफल्यासारखे गोरख्यांचे सन्मानचिन्हही प्रत्येक अधिकाऱ्याच्या घरात असते. निवृत्तीनंतरही त्या सन्मानचिन्हाचे ‘ब्रूच’ अधिकारी आपल्या कोटावर परिधान करतात. कुठल्याही विशेष प्रसंगी घरात मेजवानीसाठी चिनीमातीची जी सुबक भांडी (क्रॉकरी) वापरली जाते तिच्यावरदेखील हे खुकरीचे सन्मानचिन्ह अंकित केलेले असते. Once a gorkha, always a gorkha  (जो मनुष्य एकदा गोरखा बनतो, तो आयुष्यभर गोरखाच राहतो), या उक्तीनुसार भारताच्या विविध प्रांतांतून आलेले लष्करी अधिकारी मनाने गोरखाच झालेत. गोरखा संस्कृती अशाप्रकारे लष्कराच्या माध्यमातून भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचलीये.

फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ हेही गोरखा अधिकारी होते. त्यांचे सुप्रसिद्ध उद्गार अनेकांना ठाऊक असतील, “जर तुम्हाला मृत्यूचे भय वाटत नसेल तर त्याचे दोनच अर्थ निघतात, एकतर तुम्ही खोटं बोलत आहात किंवा तुम्ही गोरखा आहात.” आपल्या रेजिमेंटबद्दल, जवानांबद्दल असा अभिमान प्रत्येक अधिकाऱ्याला वाटत असतो. कमी उंचीचे, काटक शरीरयष्टीचे अन हसतमुख चेहऱ्याचे गोरखा आपल्या अधिकाऱ्यांनी नेमून दिलेले प्रत्येक कर्तव्य अगदी चोखपणे पार पाडतात. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हैद्राबादच्या मुक्तीसंग्रामातही भारताची एकात्मता राखण्यासाठी गोरख्यांनी प्राण पणास लावले. 

‘परमवीरचक्र’ हा युद्धकाळातील सर्वोच्च लष्करी सन्मान आणि ‘अशोकचक्र’ हा शांतता काळातील सर्वोच्च लष्करी सन्मान आहे. हैद्राबाद मुक्तीसंग्रामात स्वतंत्र भारतातील पहिले अशोकचक्र प्राप्त करण्याचा सन्मान नायक नर बहादूर थापा या गोरख्याचा! 1962 च्या भारत-चीन युद्धात मेजर धनसिंग थापा या गोरखा अधिकाऱ्याला परमवीरचक्र मिळाले होते. त्यानंतर प्रत्येकवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये मेजर थापा सहभागी होत होते. प्रत्येक प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या आरंभी परमवीरचक्र विजेते वीर एका जीपमधून राजपथावर मार्गक्रमण करत राष्ट्रपतींना अभिवादन करतात आणि त्यांच्या मागोमाग सर्व सैनिक परेड करतात. 2005 मध्ये वयाच्या 77 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन होण्याअगोदर प्रत्येकवर्षी मेजर धनसिंग थापा प्रजासत्ताक दिनी सर्वांच्या अग्रभागी राहून राष्ट्रपतींना अभिवादन करीत होते!

लेफ्टनंट पुनीतनाथ दत्त या गोरखा अधिकाऱ्याला 20 जुलै 1997 रोजी वयाच्या 24 व्या वर्षी काश्मीरमधील नौशेरा येथे आतंकवाद्यांशी लढताना वीरमरण आले. 1998 मध्ये त्यांना अशोकचक्र जाहीर झाले. त्यांच्या मातोश्री अनिता दत्त यांनी तो सन्मान स्वीकारला. मूळचे राजस्थानातील जोधपूरचे असलेल्या पुनीत नाथ दत्त यांचे वडील प्रमोद नाथ हेही गोरखा रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. लहानपणी पुनीत वडिलांची गोरखा हॅट घालून फिरायचे. एका अपघातात वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन लेफ्टनंट पुनीत गोरखा रेजिमेंटमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत झाले आणि देशासाठी हौतात्म्य पत्करून अमर झाले.

पुनीत यांच्या मातोश्री अनिता दत्त दिल्लीत एकट्याने राहतात. मी दिल्लीजवळील गुडगावमध्ये राहत असताना तीन वेळा अनिता आंटी (मी त्यांना प्रेमाने आंटी म्हणायचे, अजूनही फोनवर बोलून म्हणते) यांना भेटले होते. एकट्या राहत असूनही अनिता आंटी यांनी त्यांच्या संपूर्ण घरात पुनीतचे फोटो, त्याचे अशोकचक्र, गोरखा सन्मानचिन्हे व्यवस्थित मांडून ठेवली आहेत. ज्या चिनीमातीच्या डिशमध्ये त्यांनी आम्हाला खाद्यपदार्थ दिले त्यावरही गोरखा खुकरी अंकित होती. 20 जुलै हा पुनीत नाथ दत्त यांचा हौतात्म्य दिवस. मागील दोन वर्षे दिल्लीत मी त्यादिवशी पुनीत नाथ दत्त यांच्या स्मारकापाशी आयोजित होणाऱ्या श्रद्धांजली सभेस जात होते. लेफ्टनंट पुनीत यांना हौतात्म्य प्राप्त होऊन 22 वर्षे झाल्यानंतरही किती अभिमानाने गोरखा सैनिक आपल्या या वीर अधिकाऱ्याला आदरांजली वाहत होते! संपूर्ण लष्करी शिस्तीत, वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतील स्मारकावर पुष्पगुच्छ वाहिले जात होते. धीरगंभीर वातावरणात गोरखा जवान आपल्या वीर अधिकाऱ्याला मानवंदना देत होते. देशासाठी वीरमरण पत्कारणाऱ्या आपल्या अधिकाऱ्याबद्दल, सहकाऱ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची किती हृदयस्पर्शी पद्धत!

1999 च्या कारगिल युद्धात हौतात्म्य प्राप्त झालेले कॅप्टन मनोजकुमार पांडे हे पुनीतनाथ दत्त यांचेच ज्युनिअर ऑफिसर होते. त्यांना मरणोत्तर परमवीरचक्र जाहीर झाले. लखनौच्या मध्यमवर्गीय परिवारातून लष्करात दाखल झालेल्या कॅप्टन पांडे यांच्या बलिदानाचा अभिमान आज फक्त त्यांच्या घराला, परिसरालाच नव्हे तर संपूर्ण शहराला वाटतो. 2006 मध्ये लष्करात डॉक्टर म्हणून दाखल झाल्यावर माझे ट्रेनिंग लखनौलाच झाले होते. ट्रेनिंगनंतर काश्मीरमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून मला रुजू व्हायचे होते. तत्पूर्वी मी कॅप्टन मनोजकुमार पांडे यांच्या लखनौस्थित कुटुंबियांना भेटायला गेले होते. त्यांच्या घरातील एका खोलीचे रूपांतर त्यांनी संग्रहालयात केले होते. कॅप्टन पांडेंना मिळालेली सर्व सन्मानचिन्हे, त्यांची गोरखा मानचिन्हे ते मोठ्या अभिमानाने जपत होते, सर्वांना दाखवत होते. मी काश्मीरमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू होणार आहे असे कळल्यानंतर माझा हात हातात घेऊन कॅप्टन पांडेंच्या मातोश्री अतीव काळजीने म्हणाल्या, “काश्मीरमधील परिस्थिती फार बिकट आहे. प्रगती, स्वतःला जप.” त्यांचे स्नेहमय उद्गार ऐकून मला गहिवरून आले होते... 

'गोरख्यांनी भारतीय लष्करात भरती होऊ नये', अशी उथळ विधाने करण्याअगोदर नेपाळी राजकारण्यांनी भारतीय आणि गोरख्यांमधील अनोखे ऋणानुबंध ध्यानात घ्यायला हवेत. गोरखा फक्त पोटापाण्यासाठी नोकरी करणारे कर्मचारी नसून, भारतीय लष्कराचे ‘कुटुंबीय’ देखील आहेत. कुठलाही नवीन कायदा भारतीयांना आणि गोरख्यांना एकमेकांपासून अलग करू शकत नाही कारण अनेक वर्षांपासून ते एकमेकांच्या हृदयात वसत आहेत!

- डॉ. प्रगती पाटील, पुणे.
pragati.rationalist@gmail.com

(लेखिका, भारतीय सैन्यदलात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.)

Tags: भारतीय सेना गोरखा रेजिमेंट प्रगती पाटील डॉ. प्रगती पाटील भारत नेपाळ वाद इतिहास फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ Indian Army Gorkha Regiment Pragati Patil Dr Pragati Patil India Nepal Issue History Field Marshal Sam Manekshaw Load More Tags

Comments:

प्रदीप मालती माधव .

छान मांडणी. ... गोरखा / गुरखा बद्दल आपल्याकडे बरेच गैरसमज आहेत. ते दूर व्हायला मदत होईल.

Add Comment