आता उरले केवळ चार टेनिसपटू!

ऑस्ट्रेलिअन ओपनच्या उपांत्य फेरीला कालपासून सुरुवात झाली

ऑस्ट्रेलिअन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीचे सामने नुकतेच संपले. या स्पर्धेत आतापर्यंतचा सर्वाधिक अनपेक्षित विजय मिळविला तो रशियाच्या अस्लान करॅटसेवने. जागतिक क्रमवारीत 114 व्या स्थानावर असलेल्या, पात्रता फेरीचे सामने खेळून ग्रँड स्लॅम खेळण्यास पात्र ठरलेल्या करॅटसेवने आठव्या मानांकित दिएगो श्वार्ट्झमनला चक्क 6/3, 6/3, 6/3 असे सरळ सेटमध्ये पराजित करून खळबळ उडवून दिली. 

ग्रँड स्लॅममध्ये अनेकदा 100 च्या आत नसलेले टेनिसपटू मानांकितांना चुरशीच्या सामन्यात, चार किंवा पाच सेटमध्ये पराभूत करतात. पण या सामन्याचे वेगळेपण असे की हा सामना पूर्णतः एकतर्फी झाला. बिगरमानांकित करॅटसेवने श्वार्ट्झमनला एकदाही वरचढ होण्याची संधी दिली नाही. तो स्वतः अत्यंत अचूक सर्व्हिस करून पॉईंट्स जिंकत होता आणि श्वार्ट्झमच्या सर्व्हिसवर असे उत्तम रिटर्न विनर्स मारत होता की श्वार्ट्झमन हताशपणे बॉलकडे पाहण्याव्यतिरिक्त फारसे काही करूच शकत नव्हता. तिसऱ्या सेटमध्ये तीन ब्रेक पॉईंट गमावण्याची घोडचूक श्वार्ट्झमनने केली आणि त्यानंतर लवकरच करॅटसेवने आपल्या कारकिर्दीतील सर्वाधिक नेत्रदीपक विजय मिळविला! 

यानंतर चतुर्थ फेरीत करॅटसेवचा मुकाबला होता तो 20 व्या मानांकित फेलिक्स ओजे ऍलियाजीशी. पाच सेट चाललेल्या या सामन्यात सुरुवातीचे दोन सेट गमावूनही करॅटसेवने 3/6, 1/ 6, 6/3, 6/3, 6/4 असा विजय मिळविला आणि श्वार्ट्झमनविरुद्धचा विजय योगायोगाने मिळविला नव्हता हे सिद्ध केले. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत त्याने 18 व्या मानांकित ग्रीगोर दिमित्रोवला 2/6, 6/4, 6/1, 6/2 असे पराभूत केले आणि पात्रता फेरी खेळून उपांत्य फेरीत पोहोचणारा तो ऑस्ट्रेलिअन ओपनच्या इतिहासातील पहिलाच खेळाडू ठरला. आपल्या 10 वर्षांच्या टेनिस कारकिर्दीत त्याने जितका पैसा कमावला नव्हता तितका त्याने मागील एका आठवड्यात कमावला आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्याने टेनिसप्रेमींचा आदर कमावला. त्याने सर्व उदयोन्मुख खेळाडूंना आशा दिली की प्रामाणिकपणे प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यास एक दिवस ते सुद्धा सर्वोच्च स्तरावर टेनिस खेळू शकतील.

तृतीय फेरीत प्रथम मानांकित नोवाक जोकोविचला 27 व्या मानांकित टेलर फ्रिट्झविरुद्ध विजयासाठी बराच संघर्ष करावा लागला. जोकोविचने प्रथम दोन सेट जिंकल्यावर फ्रिट्झने पुढील दोन सेट जिंकले अन निर्णायक पाचव्या सेटमध्ये जोकोविचने विजय मिळविला. चतुर्थ सेटमध्ये खेळ उत्कंठावर्धक अवस्थेत असताना अचानक सामना थांबविण्यात आला. 

ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नवीन विषाणूचे काही रुग्ण ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया प्रांतातही आढळल्याने तेथील सरकारने 5 दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले होते. या कालावधीत सर्व सामने प्रेक्षकांविना खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रात्री 12 नंतर लॉकडाऊन अधिकृतपणे सुरू होणार होते, परंतु पाच सेटचा सामना बराच लांबल्याने तो रात्री 12 अगोदर संपण्याची शक्यता दिसत नव्हती. स्थानिक वेळेनुसार रात्रीचे 11:30 झाल्याने सर्व प्रेक्षकांना मैदान सोडून घरी परतण्याचे आवाहन करण्यात आले. सर्व प्रेक्षक रंगात आलेला सामना सोडून अत्यंत शांतपणे अन शिस्तबद्धपणे मैदानाबाहेर गेले आणि अवघ्या 10 मिनिटांत रिकाम्या मैदानावर पुनःश्च सामना सुरू झाला. 

जोकोविचने पाचवा सेट जिंकून ही अटीतटीची लढत 7/6, 6/4, 3/6, 4/6, 6/2 अशी जिंकली. मनात विचार आला की भारतात सामना उत्कंठावर्धक स्थितीत पोहोचला असताना प्रेक्षकांना कोरोनाकाळातील नियमांचे भान ठेवून मैदान रिकामे करण्यास सांगितले असते तर त्यांनी त्या सुचनेचे पालन केले असते का? त्वरित, शांतपणे अन शिस्तबद्धपणे मैदान रिकामे झाले असते का?

चतुर्थ फेरीत जोकोविचचा सामना 14 व्या मानांकित मिलोस राओनिचशी होता. जोकोविच- राओनिच यांच्यात जे 11 सामने आजवर झालेत ते सर्व जोकोविचनेच जिंकल्याचे राओनिच निश्चितच आपला प्रतिस्पर्धी बघून नाराज झाला असेल. दुसरा सेट जिंकून त्याने थोडाफार प्रतिकार केला. परंतु जोकोविचने चार सेटमध्ये सामना 7/6, 4/6 6/1, 6/4 असा जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

उपांत्यपूर्व फेरीत 33 वर्षीय जोकोविचची लढत सहाव्या मानांकित 23 वर्षीय अलेक्झांडर झ्वेरेवशी होती. सामन्यात पहिला सेट जिंकून अन पुढील दोन सेटमध्ये 3-0 अशी आघाडी घेऊनही झ्वेरेवने अनेक टाळता येण्यासारख्या चुका (unforced errors) केल्या. चतुर्थ सेटमध्ये दोन्ही खेळाडू अतिउत्तम खेळले अन जोकोविचने सामना 6/7, 6/2, 6/4, 7/6 असा जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

ऑस्ट्रेलिअन ओपनमध्ये द्वितीय मानांकित राफेल नदाल अत्यंत आत्मविश्वासाने एकही सेट न गमावता आपले सर्व सामने जिंकत होता. तृतीय फेरीत ब्रिटनच्या कॅमेरून नोरीविरुद्ध जेव्हा त्याने 7/5, 6/2, 7/5 असा विजय मिळविला तेव्हा ग्रँड स्लॅममध्ये एकही सेट न गमावता सलग 30 सेट जिंकणारा तो जगातील तिसरा टेनिसपटू ठरला. त्याच्याअगोदर फक्त जॉन मॅकन्रो (35 सेट) आणि रॉजर फेडरर (36 सेट) यांनीच हा विक्रम केलेला आहे. चतुर्थ फेरीतही नदालने 16 व्या मानांकित फॅबीओ फॉनिनीचा 6/3, 6/4, 6/2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून ग्रँड स्लॅममध्ये सलग 33 सेट जिंकण्याचा विक्रम प्रस्थापित केला.

उपांत्यपूर्व फेरीत 34 वर्षीय नदालची लढत होती ती पाचव्या मानांकित 22 वर्षीय स्टेफॅनोस त्सित्सिपासशी या ग्रीक टेनिसपटूशी. त्सित्सिपासने यापूर्वी अनेक मानांकित खेळाडूंना पराभूत केल्याने त्याला 'भावी चॅम्पियन' असे म्हटले जाते. त्याच्याविरुद्ध खेळताना सुरुवातीच्या दोन सेटमध्ये नदालने जो झंझावाती खेळ केला त्याला तोड नव्हती.

तिसरा सेट जिंकून तो आरामात सामना जिंकेल असेच त्याक्षणी साऱ्यांना वाटत होते. पण त्सित्सिपासने त्याच्या खेळाचा दर्जा उंचावला अन नदालला अतिआत्मविश्वास नडला. पुढील अत्यंत अटीतटीचे असे तिन्ही सेट त्सित्सिपासने जिंकून सामना 3/6, 2/6, 7/6, 6/4, 7/5 असा जिंकला. 21 वे विक्रमी ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकून रॉजर फेडररला मागे टाकण्याचे नदालचे स्वप्न तूर्तास तरी पूर्णत्वास येणार नाही.

तृतीय फेरीत सरीना विल्यम्सने ऍनास्टेशिया पॉटपोवाला 7/6, 6/2 असे पराभूत करून ऑस्ट्रेलिअन ओपनमधील  90 सामन्यांत विजयी होण्याचा विक्रम केला. ऑस्ट्रेलिअन ओपन, विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन या तीनही ग्रँड स्लॅममध्ये प्रत्येकी 90 सामने जिंकणारी सरीना जगातील पहिली अन एकमेव टेनिसपटू आहे. (एका ग्रँड स्लॅमचे विजेतेपद मिळविण्यासाठी सात सामने जिंकणे आवश्यक असतात, 90 सामने जिंकण्याचा सरीनाचा विक्रम किती असामान्य आहे याची यावरून कल्पना येऊ शकते). 

चतुर्थ फेरीत तिने सातव्या मानांकित अरिना सबालेंकाचा 6/4, 2/6, 6/4 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत 39 वर्षीय सरीना विल्यम्सची गाठ पडली ती द्वितीय मानांकित 29 वर्षीय सिमोना हॅलेपशी. एकेकाळी जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेली सिमोना अत्यंत प्रतिभावंत टेनिसपटू आहे. उपांत्यपूर्व फेरीत सरीनाने सिमोनाला 6/3, 6/3 असे सहजगत्या पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत सरीनाचा सामना तृतीय मानांकित तीन ग्रँड स्लॅम विजेत्या नाओमी ओसाकाशी आहे.  39 वर्षीय सरीना आणि 23 वर्षीय ओसाकामधील लढतीची उत्सुकता टेनिसप्रेमींमध्ये आहे.

प्रथम मानांकित ऍशली बार्टीची उपांत्यपूर्व फेरीपर्यंत दमदार वाटचाल सुरू होती. उपांत्यपूर्व फेरीत कॅरोलिना मुकोवाविरुद्ध तिने प्रथम सेट 6/1 असा जिंकला होता अन द्वितीय सेटमध्ये ती 2/0 अशी आघाडीवर असताना मुकोवाने वैद्यकीय अवकाश (medical time out) घेतला. (प्रतिस्पर्ध्याची एकाग्रता भंग करण्यासाठी वैद्यकीय अवकाश अनेक टेनिसपटू घेतात. अगदी अग्रमानांकित नोवॅक जोकोविचही यास अपवाद नाही.) त्यानंतर खेळाची लय बिघडलेली बार्टी पुढील दोन सेट 3/6, 2/6 असे गमावून स्पर्धेबाहेर झाली अन ऑस्ट्रेलिअन टेनिसप्रेमींची घोर निराशा झाली…

उपांत्यफेरीत अग्रमानांकित जोकोविचला बिगरमानांकित अस्लन करॅटसेव कशी लढत देतो, आपल्याहून 16 वर्षे तरुण असलेल्या ओसाकाशी सरीना कशी लढते ते बघण्याची उत्सुकता टेनिसप्रेमींमध्ये आहे. या संघर्षानंतर अंतिम फेरीत कोण पोहोचेल अन विजयाचा झळाळता चषक कोण मिळवेल, नेहमीचेच टेनिसपटू जिंकतील की कोणी नवीन विजेता जगासमोर येईल ते जाणून घेण्याची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे.

- डॉ. प्रगती पाटील, पुणे.
pragati.rationalist@gmail.com

(लेखिका, भारतीय सैन्यदलात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.)

Tags: ऑस्ट्रेलिअन ओपन ग्रँडस्लॅम Pragati Patil Sports Australian Open Tennis Grandslam Load More Tags

Add Comment