मृणालचं पत्र

रवींद्रनाथ टागोर यांचा 79 वा स्मृतिदिन

फोटो सौजन्य: epicchannel.com

गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या बहुविध साहित्यकृती आशयघन आणि सौंदर्यपूर्ण तर होत्याच... शिवाय तत्कालीन रूढिवादी समाजाच्या दृष्टीनं प्रागतिक आणि बंडखोरही होत्या. टागोरांच्या निवडक कथांची पुस्तकं इंग्लीशमध्ये उपलब्ध आहेत. त्यांचे अनुवाद अनेक भाषांमध्ये झालेले आहेत. मराठी-हिंदीतल्या अनुवादित कथा मी वाचल्यात... पण इंग्लीश असो की मराठी, टागोरांच्या निवडक कथा प्रसिद्ध करताना त्यांच्या प्रखर स्त्रीवादी कथांना (कदाचित हेतुपुरस्सर) वगळलं गेलंय. 

2015 मध्ये अनुराग बासू या प्रतिभावंत बंगाली दिग्दर्शकाने ‘स्टोरीज्‌ बाय रवींद्रनाथ टागोर’ या मालिकेतून टागोरांच्या अनेक स्त्रीवादी कथांना टीव्हीवर आणलं. मृण्मयी (कथा - 'समाप्ती' - 1893), गिरीबाला (कथा - 'मानभंजन' - 1895), मृणाल (कथा - 'स्रीर पत्र' - 1914), कल्याणी (कथा - 'अपरिचित' - 1916), कमला (कथा - 'मुसलमानेर गोल्पो' - 1941) ही सर्व स्त्रीपात्रं अत्यंत बुद्धिमान, मनस्वी, स्वाभिमानी, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊन त्यांच्या परिणामांना सामोरं जाण्याचं सामर्थ्य ठेवणारी आहेत. त्यांचा जीवनसंघर्ष आजही कालसुसंगत आणि प्रेरक वाटतो. 

शंभर वर्षांपूर्वीच्या रूढिवादी समाजाला मात्र ही स्वतंत्र वृत्तीची स्त्रीपात्रं पचवणं जडच गेलं असणार आणि कदाचित म्हणूनच 'निवडक टागोर' प्रसिद्ध करताना त्यांच्या प्रखर स्त्रीवादी कथांना वगळलं गेलं.

1914 मध्ये टागोरांनी लिहिलेली ‘स्रीर पत्र’ (‘पत्नीचं पत्र’) ही कथा आज शंभर वर्षं उलटून गेल्यानंतरही कालबाह्य वाटत नाही.  मृणाल नावाच्या एका मनस्वी स्त्रीनं आपल्या पतीला लिहिलेलं हे पत्र. कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता अत्यंत प्रगल्भतेनं मृणाल तत्कालीन समाजव्यवस्थेच्या अवगुणांवर, दांभिकतेवर आपल्या लेखणीतून मार्मिक प्रहार करते. 

शिक्षणानं आत्मभान जागृत होऊन अंतर्बाह्य उजळलेली स्त्री म्हणजे मृणाल. तिची कथा मला मराठीत कुठेच न दिसल्यानं मी वाचलेल्या इंग्लीश कथेच्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा अनुवाद करून मृणालला मराठी वाचकांसमोर आणतेय. 'मृणालचं पत्र' वाचताना इतक्या सुंदर आणि समर्थ स्त्रीपात्राची निर्मिती करणाऱ्या रवींद्रनाथ टागोरांबद्दलचा आदरही आपसूकच वृद्धिंगत होत जातो.

जगन्नाथपुरीच्या यात्रेला गेलेली मृणाल आपल्या कोलकातास्थित पतीला लिहिलेल्या पत्राची सुरुवातच 'चरणकमलांना स्पर्श' या शब्दांनी करते. शंभर वर्षांपूर्वी पत्नीनं पतीच्या चरणांना स्पर्श करणं ही बाब सार्वत्रिक होती. (अजूनही अनेक कुटुंबांत हा सर्वमान्य रिवाज आहे.)

मृणाल पुढे लिहिते, "आपल्या लग्नाला उणीपुरी पंधरा वर्षं झाली... पण पत्र लिहिण्याची गरज पडावी इतके दूरही आपण कधी गेलो नाही आणि तेवढे जवळही कधी आलो नाही. (लग्नाला पंधरा वर्षं होऊनही 'अनुबंध' जुळलेच नाहीत हे ती सूचकपणे नमूद करते.) माझी बांधिलकी फक्त तुमच्याशी, तुमच्या कुटुंबाशी नसून संपूर्ण विश्वाशी आहे याचा साक्षात्कार आज इतक्या वर्षांनंतर पुरीच्या समुद्रकिनाऱ्यावर आभाळाची विशालता आणि सागराची अथांगता न्याहाळताना होतोय आणि म्हणूनच हे पत्र लिहिण्याचं धाडस करतेय. एका छोट्या, दुर्गम खेड्यातल्या साधारण परिवारातल्या बारा वर्षांच्या मुलीला तुम्ही कोलकात्यातल्या ऐश्वर्यसंपन्न परिवाराची सून म्हणून आणलंत. इतक्या दूरवर वधूसंशोधनासाठी यावं असं माझ्यात होतं तरी काय? माझं रूप, माझं बाह्यसौंदर्य! माझी थोरली जाऊ रूपानं अगदीच सामान्य होती. माझ्या सौंदर्यामुळे न्यूनगंडानं ग्रस्त होऊन तिनं कायम सोशीक मर्यादेत जगावं यासाठी तुम्ही मला पसंत केलंत. थोरल्या भावाचा विवाह सामान्य रंगरूपाच्या मुलीशी झाल्यामुळे समाजात जी नाचक्की झाली तिची भरपाई करण्यासाठी तुम्ही माझ्यासारखी 'सुंदर' मुलगी आपल्या घरी आणलीत. 

(बाह्यसौंदर्यावरून स्त्रीचं मूल्यमापन करण्याच्या रोगट सामाजिक मानसिकतेमुळे सामान्य रंगरूपाच्या स्त्रियांना आयुष्यभर किती मानभंग, न्यूनगंड सहन करत जगावं लागतं याची विदारक झलक या शब्दांमधून दिसते.)

मृणाल पुढे लिहिते, "...पण माझ्याजवळ सौंदर्यासोबत बुद्धिमत्ताही होती. कालांतरानं माझ्या सौंदर्याचा तुम्हांला विसर पडला... पण बुद्धिमत्तेचा नाही. कारण ती बुद्धिमत्ता पावलापावलावर तुमच्यासाठी 'अडसर' ठरत होती. खरंच... माझी बुद्धिमत्ता अत्यंत असामान्य आहे असंच मला वाटतंय. तुमच्या घरात स्वतःला वर्षानुवर्षं फक्त घरकामाला जुंपून घेतल्यानंतरही जी बुद्धिमत्ता माझी साथ सोडून गेली नाही ती असामान्यच असणार ना!" 

(या एकाच वाक्यात मृणालनं स्वतःच्या बुद्धिमत्तेबद्दलचा सार्थ अभिमान, चाकोरीबद्ध जीवनाविषयीचा खेद आणि सासरच्या रूढिवादी वातावरणाबद्दल उपहासात्मक विषाद प्रकट केलाय.)

मृणाल पुढे लिहिते, "माझ्या जन्मदात्या आईलाही माझ्या बुद्धिमत्तेचा खूप त्रास व्हायचा. मुलींमध्ये जास्त चौकसपणा असू नये... तो त्यांच्या दुःखाचं, वेदनेचं कारण ठरतो असं तिला वाटायचं. तिचं मत मान्य नसलं तरी सत्य आहे असं अनुभवांती म्हणावंसं वाटतंय... कारण याच चौकसपणामुळे तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय माझ्यासाठी कायम 'पोक्त', 'उद्धट' अशी शेलकी विशेषणं वापरून मला दुःख, वेदना देत आलात. तुम्हांला ठाऊक आहे का की, मी एक कवयित्री आहे? माझ्यातली तरल संवेदनशीलता जपत मी कविता करत होते ही गोष्ट इतक्या वर्षांत तुम्हांला कळलीच नाही, तुमच्या घरातल्या कुणालाच कळली नाही... किंबहुना कळूनही न कळण्याचा आव तुम्ही आणलात आणि कदाचित त्यामुळेच इतकी वर्षं तुमच्या कुटुंबासाठी राबूनही मी मनानं तुम्हां सर्वांपासून 'अलिप्तच' राहिले.” 

(कुटुंबात प्रेम, आदर या भावना एकतर्फी नसतात, नसाव्यात. स्त्रियांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांची कदर त्यांच्या कुटुंबीयांकडून झाली नाही तर त्या कुटुंबात असूनही अलिप्त असतात हे कटू परंतु शाश्वत सत्य मृणालच्या माध्यमातून टागोरांनी सांगितलंय.)

मृणाल लिहिते, "तुमच्या गोठ्यातल्या गायीवासरांवर प्रेम करून मी माझ्या मनातल्या वात्सल्याला वाट मोकळी करून देत होते. पण तुमच्या कुटुंबीयांना त्याचाही त्रास व्हायचा. ही मुलगी नक्की उच्चकुलीन आहे की गायीगुरं सांभाळणाऱ्या कुठल्यातरी नीच कुळातली आहे... असे खोचक टोमणे मारून सासूबाई मला दुःख द्यायच्या." 

(सांसारिक जबाबदाऱ्या यांत्रिकपणे पार पाडत असताना स्त्रियांनी आपल्या विरंगुळ्यासाठी चार क्षण आपल्या पद्धतीनं जगलेले कटुंबीयांना कसं खपत नाही याचं प्रत्यंतर यातून येतं.

मृणाल उच्छृंखल नाही. आपल्या मनातल्या प्रेमाचा, वात्सल्याचा वर्षाव करण्यासाठी ती कुठलाही वाममार्ग न निवडता मुक्या प्राणिमात्रांना लळा लावते. पण तिला तितकंही स्वातंत्र्य अनुभवू द्यायला तिचे कुटुंबीय तयार नाहीत. स्त्रियांनी आपल्या सुखाचा विचार क्षणभरही न करता फक्त कर्तव्यबुद्धीनं वडीलधाऱ्यांच्या आज्ञांचं पालन करत राहावं या पारंपरिक मानसिकतेचं दर्शन यातून घडतं.)

अर्थात आपल्या अंतकरणातलं प्रेम व्यक्त करण्याचा अजून एक समाजमान्य मार्ग म्हणजे मातृत्व. मृणालच्या जीवनातही मातृत्वाची चाहूल लागली होती. त्याबद्दलचे अनुभव ती शब्दबद्ध करते, "प्रसूतीकाळात माझी प्रकृती बिघडल्यानंतर तुम्ही एका इंग्लीश डॉक्टरला घरी बोलवलं... तेव्हा प्रसूतीची खोली बघून तो थक्कच झाला. जी जागा जनावरांनी राहायलाही योग्य नाही अशा अंधाऱ्या,  घाणेरड्या, कुबट खोल्यांमध्ये तुम्ही बायकांची प्रसूती कशी करता... म्हणून तो चिडला होता. आपल्या घरातले प्रशस्त दिवाणखाने सजावटीच्या अनेक वस्तूंनी सुशोभित झालेले आहेत. तिथे तुम्ही पुरुष भरपूर हवाउजेडात, प्रसन्नचित्तानं आयुष्याचा आस्वाद घेता... पण जिथे स्त्रिया कार्यरत असतात अशा घरातल्या आतल्या खोल्यांमध्ये कुठलंही सौंदर्य किंवा चैतन्य नसतं. तिथे सदैव अंधाऱ्या उदासीनतेची ग्लानी रेंगाळत असते. वारा कधीतरी चोरपावलांनी तिथे शिरतो. तिथल्या भिंती वर्षानुवर्षं अनेक प्रकारच्या डागांनी कळकटलेल्या असतात… आम्ही स्त्रिया अशा नरकप्राय वातावरणात कशा जगतो याचं त्या इंग्लीश डॉक्टरला आश्चर्य वाटत होतं. त्याला कसं सांगावं की, जेव्हा स्त्रियांचा आत्मसन्मान नष्ट होतो तेव्हा त्यांना आपल्यावर होणारा प्रत्येक अन्याय योग्यच वाटायला लागतो. आपल्याला दुःख, वेदना होत आहेत याची कबुली द्यायलाही स्त्रियांना लाज वाटते, संकोच वाटतो... कारण त्यांचा आत्मसन्मान मेलेला असतो." 

(मृणालनं बाळंतिणीच्या खोलीचं जे वर्णन केलंय ती परिस्थिती शंभर वर्षांनंतरही अनेक खेड्यापाड्यांत तशीच आहे. सुइणीच्या हातून अस्वच्छ, अशास्त्रीय रितीनं केलेल्या बाळंतपणामुळे अद्यापही अनेक बाळ-बाळंतिणी दगावत आहेत. घरांच्या अंतर्गत रचनेबद्दल मृणालनं जे भाष्य केलंय ते आजच्या काळातही काही प्रमाणात तसंच आहे. आजही घरांची अंतर्गत वास्तुरचना करताना दिवाणखाना प्रशस्त ठेवला जातो... मात्र जिथे स्त्रियांचा बराच वेळ वावर असतो अशा स्वयंपाकाच्या खोल्या इतक्या छोट्या, अरुंद असतात की, तिथे जेमतेम उभं राहून, घाम गाळत, केविलवाण्या अवस्थेत स्त्रिया दिवसभर राबत राहतात. 

स्त्रियांच्या सोशीकतेबद्दलचे मृणालचे उद्गार आजच्या काळातही तंतोतंत लागू आहेत. स्त्रियांची टोकाची सोशीकता त्यांच्या समंजसपणाचं लक्षण नसून भ्याडपणाचं लक्षण आहे. आपल्यावर अन्याय होतोय हेच मुळात चाकोरीबद्ध जीवन जगणाऱ्या स्त्रिया मान्य करत नाहीत. कारण ते मान्य केलं की त्या अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्यासाठी स्वतःचा 'कम्फर्ट झोन' सोडावा लागतो; चार भिंतींतल्या सुरक्षित, सुखकर जीवनावर पाणी सोडून स्वाभिमानास्तव बाहेरच्या व्यावहारिक जगाचे चटके सहन करावे लागतात. बाह्यजगातल्या वादळवाऱ्याला तोंड देण्याचं दिव्य पेलण्यापेक्षा चार भिंतींतली घुसमट अधिक सोयीस्कर असं मानून स्त्रिया त्यांच्यावरच्या अन्यायाकडे पद्धतशीरपणे डोळेझाक करतात. त्यांच्यावर अन्याय होतोय हे मान्य करण्याचंच नाकारतात!)

मृणालची मुलगी जन्माला आल्यानंतर लगेचच मरण पावते. अपत्यवियोगाच्या चिरंतन दुःखाबद्दल मृणाल लिहिते, "एखाद्या विद्युल्लतेप्रमाणे माझी मुलगी क्षणभर प्रकाशित होऊन अनंत काळासाठी विझून गेली. ती मलाही तिच्यासोबत नेणार होती पण मी राहिले. मृत्यूचे दूत माझ्या उशाशी उभे असताना मला त्यांचं भय वाटत नव्हतं. ज्यांच्या जीवनाचे पाश प्रेमाच्या धाग्यांनी घट्ट विणलेले असतात त्यांना मृत्यूचं भय असतं. माझ्यापाशी असे कुठलेही पाश नव्हते आणि म्हणूनच मी निर्भय होते... पण मृत्यूनं फक्त माझ्या चिमुकलीला नेलं, मला नाही. जर माझी छकुली जगली असती तर मी तिचं संगोपन माझ्या पद्धतीनं केलं असतं. माझ्या अंतःकरणात जे जे काही सुंदर, उदात्त आणि स्नेहमय आहे... त्या सगळ्याचा वर्षाव मी तिच्यावर केला असता. जे स्वातंत्र्य मला मिळालं नाही ते तिला देऊन मी माझ्या मुक्ततेचा मार्ग शोधला असता... पण माझ्या नशिबी फक्त मातृत्वासाठीचा 'विलाप' होता, स्वातंत्र्य नव्हतं... 

(अनेक अपरिहार्य कारणांस्तव आपल्या कितीही आशाआकांक्षा अपूर्ण राहिलेल्या असल्या तरी आपल्या अपत्यांच्या सर्व आशाआकांक्षा पूर्ण व्हाव्यात या ध्यासापोटी मातापिता दिवसरात्र झटत राहतात. जे सुख, स्वातंत्र्य आपल्याला लाभलं नाही ते आपल्या अपत्याला लाभलंय हे समाधान मानवाच्या अंधकारमय, दुःखद आयुष्याची रुपेरी किनार असते. मृणालच्या नशिबी मात्र ही रुपेरी किनार नव्हती.)

अपत्यवियोगाच्या दुःखात होरपळलेली मृणाल पुन्हा आपल्या वात्सल्याचा वर्षाव गायीवासरांवर करत राहते, त्यासाठी कुटुंबीयांचे टोमणे सहन करत राहते. काळ सरत राहतो आणि कदाचित अवघं आयुष्य असंच यांत्रिकपणे सरलं असतं... पण काहीतरी घडतं. वाऱ्यानं उडालेलं बीज एखाद्या सिमेंट काँक्रीटच्या फटीत रुजून अंकुरण्याचा चमत्कार घडावा त्याप्रमाणे मृणालच्या रूक्ष आयुष्यात 'बिंदू' नावाची हिरवळ येते.

बिंदू ही मृणालच्या जाऊबाईंची धाकटी बहीण, मातापित्याच्या मृत्यूनंतर अनाथ झालेली तेराचौदा वर्षांची किशोरी. कुणीही नातेवाईक सांभाळायला तयार नाहीत म्हणून आपल्या बहिणीच्या (मृणालच्या जाऊच्या) सासरच्या आश्रयाला ती येते. पण तिथेही ती साऱ्यांना नकोशीच होते. कुठून ही ब्याद आपल्या घरी आली, असंच सगळ्यांना वाटतं. त्या गरीब, अनाथ, दुःखी मुलीची केविलवाणी अवस्था बघून मृणालचं अंतःकरण द्रवतं आणि ती बिंदूच्या पाठीशी ठामपणे उभी राहते. त्याबद्दल ती लिहिते, "एखाद्या मनुष्याला आपल्या इच्छेविरुद्ध स्वाभिमान गहाण ठेवून कुणाच्यातरी आश्रयाला यावं लागणं हीच मुळात केवढी मोठी शोकान्तिका आहे!" 

(आत्मसन्मानाशी तडजोड करून जो गरजू मनुष्य दुसऱ्याकडे आश्रय मागतो त्याची मनःस्थिती संकोचानं, शरमेनं आधीच नाजूक झालेली असते. अशा वेळी त्याच्याशी प्रेमानं, सन्मानानं वागून; त्याचं मनोबल वाढवून त्याला पुन्हा उभारी देण्याचं काम आश्रयदात्यांनी करायला हवं... पण त्याउलट त्याच्या असहायतेचा, प्रतिकारहीनतेचा गैरफायदा घेऊन त्याच्याशी हीन वर्तन करणारे लोक किती असंवेदनशील असतात!) 

मृणाल लिहिते, "मी माझ्या जाऊबाईला बघत होते. तिच्या मनातला बिंदूबद्दलचा स्नेहभाव जराही दिसू न देता ती तुम्हां मंडळींसमोर बिंदूचा सतत पाणउतारा करत होती. जणू बिंदूचं आपल्या घरातलं अस्तित्व हे तिच्यावरचं असह्य ओझं आहे आणि ती घरातून निघून जावी अशीच तिचीही इच्छा आहे असंच ती तुम्हां मंडळींना दाखवत होती. आपल्या अनाथ धाकट्या बहिणीवर सर्वांसमक्ष प्रेम करण्याची हिंमतही जाऊबाईमध्ये नव्हती कारण ती एक आज्ञाधारक पत्नी होती! तिच्या मनातली चलबिचल बघून मी अधिकच अस्वस्थ होत होते. बिंदूचं खाणंपिणं, तिची वस्त्रं यांबाबत जाऊबाई जाणूनबुजून हेळसांड करत होती, बिंदूकडून मोलकरणीप्रमाणे घरातली सगळी कामं करून घेत होती आणि मुद्दाम क्षुल्लक चुका काढून चारचौघांत तिचा अपमान करत होती. कितीही तिरस्कार सहन करूनही, तोंडातून ब्र न काढता मुकाट्यानं पडेल ते काम करणारी स्वस्तातली मोलकरीण मिळाल्याबद्दल तुम्ही मंडळींनी समाधानी असायला हवं असाच जाऊबाईचा प्रयत्न होता. ती स्वतः रूपानं सामान्य असल्यानं या ऐश्वर्यसंपन्न कुटुंबाच्या लायक नाही असं तिला सतत वाटायचं. तिचं हे लाजिरवाणं वर्तन बघून मला स्वतःलाच दुःख आणि शरम वाटत होती." 

(मृणालची जाऊबाई ही जणू तमाम मूक (तथाकथित) आदर्श गृहिणींची प्रतिनिधी.  प्रिय आप्तस्वकीयांवर स्नेह करण्याचा अधिकार असतानाही त्यांचा दुस्वास करण्याचा दांभिकपणा ज्यांना करावा लागतो त्यांच्यासारखं केविलवाणं, लाजीरवाणं जिणं दुसऱ्या कुणाचंच नाही... आणि हे सर्व कशासाठी? काही गर्विष्ठ लोकांचा अहंभाव गोंजारण्यासाठी! कथेत बिंदूची अवस्था तर केविलवाणी आहेच... पण तिच्यापेक्षाही अधिक केविलवाणी आहे ती मृणालची जाऊबाई.)

मृणाल लिहिते, "मुलीचा जन्म साऱ्यांनाच नकोसा असतो. बिंदू तिच्या पित्याच्या घरातही नकोशा कचऱ्याप्रमाणे होती आणि या घरातही तिची तीच परिस्थिती होती. ती सतत भेदरलेली दिसायची... जणू काही या अनंत विश्वात जन्माला येऊन तिनं मोठा अपराध केलाय. कुणी तिच्याकडे नुसता कटाक्ष टाकला तरी ती भीतीनं थरथर कापायची!" 

(सततची उपेक्षा आणि अपमान व्यक्तीचा आत्मविश्वास नष्ट करून त्याची अवस्था किती दयनीय करून टाकतो!)

मृणाल लिहिते, "मी बिंदूला माझ्या खोलीत राहायला सांगितलं. मी तिला अत्यंत ऋजुतेनं समजावलं की, माझ्या खोलीतली एक जागा कायम तिच्यासाठी मोकळी असेल. त्यानंतर बिंदू माझ्यावर प्रेम करायला लागली. बिंदूला मी इतकी आवडायला लागले की, तिचा तो निरागस प्रेमाविष्कार बघून मी आश्चर्यानं थक्क झाले. इतकं उत्कट, निर्व्याज प्रेम मी फक्त पुस्तकातच वाचलं होतं... कधी अनुभवलं नव्हतं. ती माझी केशभूषा करायची, माझ्या सौंदर्याची सतत स्तुती करायची, माझ्या चेहऱ्याकडे अनिमिष नेत्रांनी बघत राहायची. माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या ज्या पैलूंबाबत मी अद्याप अनभिज्ञ होते ते तिच्या निखळ प्रेमामुळे माझ्यासमोर आले. मी अधिकाधिक मुक्त होत गेले, स्वतःच्या भावभावनांशी अधिकाधिक प्रामाणिक होत गेले." 

(आयुष्यभर ज्या व्यक्तीला कायम कसपटासमान वागणूक मिळालीये तिला प्रेमाचा, आपुलकीचा ओलावा लाभला की तिच्या चित्तवृत्ती कशा प्रफुल्लित होतात... तसं बिंदूच्या वागण्यातल्या बदलावरून जाणवतं. निर्मळ मनानं केलेल्या एखाद्या सत्कृत्यातही अवघं आयुष्य बदलण्याची क्षमता असते. ज्याच्यासाठी सत्कृत्य केलं जातं त्याचंही आणि जो सत्कृत्य करतो त्याचंही. अपत्यवियोगामुळे दुःखी असलेल्या मृणालला बिंदूच्या रूपानं जणू कन्याच गवसली. स्त्रीचा जन्म मिळाल्यानं दोघींनीही लहानपणापासून फक्त उपेक्षाच अनुभवली होती... पण एकमेकींवरच्या निरागस, निरपेक्ष प्रेमामुळे दोघींच्याही जीवनात सकारात्मकता आली.)

मात्र मृणालनं बिंदूवर इतकी माया करावी ही बाब घरातल्या कुणालाच रुचत नाही. जाऊबाई मनातून सुखावते... पण 'बिंदूला लाडानं बिघडवू नकोस' असं मृणालला सर्वांसमक्ष बजावते. घरातली कुठलीही वस्तू हरवली की सर्व जण बिंदूवर चोरीचा आळ घेतात, छोट्याछोट्या गोष्टीवरून तिच्यावर चिडतात, आगपाखड करतात. 

मृणाल लिहिते, "बिंदूबद्दलचा माझा स्नेहभाव तुमच्या डोळ्यांत इतका सलत असतानाही तुम्ही तिला घरातून हाकलून कसं दिलं नाही? तुमच्यात ते धैर्य नव्हतं... कारण तसं केलं तर माझ्या उद्वेगाच्या उद्रेकाचं भय तुम्हांला होतं. वरवर तुम्ही सर्व जण माझ्याशी कितीही कठोरतेनं वागलात तरी आतून तुम्हां सर्वांना माझ्यातल्या 'बुद्धिमान स्त्री'बद्दल आदरयुक्त भीती वाटत होती!" 

(मृणालचे हे उद्गार तिच्या प्रचंड आत्मविश्वासाचं द्योतक आहेत. बुद्धिमान व्यक्तीवर तुम्ही प्रेम करू शकता किंवा असूयेपोटी तिचा तिरस्कार करू शकता... पण बुद्धिमत्तेकडे तुम्ही कधीही उपेक्षेनं दुर्लक्ष करू शकत नाही... कळत-नकळत सर्व जण मूल्याधिष्ठित बुद्धिमत्तेचा मनोमन आदर करत असतात!)

बिंदूला समाजमान्य रितीनं घरातून हाकलून देण्यासाठी तिचा विवाह ठरवला जातो. वरपक्ष आपल्या स्वगृही, तेही हुंडा न घेता विवाह संपन्न करणार आहे हे ऐकून सुखावलेले मृणालचे कुटुंबीय वराला न पाहताच विवाह ठरवून मोकळे होतात. आपल्या घरात मोलकरणीप्रमाणे जीवन जगणाऱ्या बिंदूच्या आयुष्याला विवाहामुळे सुख आणि स्थैर्य लाभेल असा विचार करून मृणालही विवाहाला संमती देते, मात्र लग्नानंतर थोड्याच दिवसांत बिंदू सासरहून पळून मृणालकडे येते. तिचा पती वेडसर असतो. तिची खाष्ट सासू तिला सतत मारहाण करत असते. बिंदूची व्यथा ऐकूनही... सासरी जाऊन पत्निधर्माचं पालन करण्याचा आग्रह सर्व जण तिच्याकडे धरतात. मृणाल पोटतिडकीनं वादविवाद करून त्यांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करते आणि सर्वांचा रोश ओढवून घेते. आपल्यामुळे मृणालदीदीला त्रास सहन करावा लागतोय या जाणिवेनं संकोचून ओशाळलेली बिंदू कुणालाही कळू न देता आल्यापावलीच माघारी फिरत सासरी परतते. त्याबद्दलचा उद्वेग व्यक्त करताना मृणाल म्हणते, "तुम्ही बिंदूला कसला पत्निधर्म शिकवताय? तुमचे पुराणकथाकार बायकांना सतीची कथा सांगतात... तिचा दुर्गुणी, रोगट, विकलांग पती वेश्येकडे जाण्याची इच्छा प्रकट करतो तेव्हा ती सत्शील पतिव्रता त्याला पाठुंगळी घेऊन वेश्येकडे जायला निघते. असल्या घाणेरड्या कथा सांगताना तुम्हांला लाज कशी वाटत नाही? हे कृत्य पातिव्रत्याचं नसून जगातला सर्वांत मोठा भ्याडपणा आहे! पत्नीच्या कर्तव्याबद्दलच्या तुमच्या बेगडी संकल्पना आता मी क्षणभरही सहन करू शकत नाही!" 

(शंभर वर्षांपूर्वी ज्या पुराणकथेचे टागोरांनी वाभाडे काढले होते ती कथा आजही मोठ्या भक्तिभावानं सांगितली आणि ऐकली जाते यापेक्षा अधिक शरमेची गोष्ट दुसरी कुठली असणार!)

बिंदूला सासरच्या नरकवासातून सोडवण्याचा दृढ निश्चय मृणाल करते. पूर्वीच्या काळी स्त्रियांना देवाधर्माच्या नावावरच थोडंफार स्वातंत्र्य आणि विरंगुळा मिळत असल्यानं मृणालचा धाकटा भाऊ शरदसोबत जगन्नाथपुरीला जाण्याचा मानस ती कुटुंबीयांपुढे व्यक्त करते. तिचा बंडखोरपणा कमी होऊन धार्मिकपणा वृद्धिंगत व्हावा अशी कुटुंबीयांचीही इच्छा असल्यानं कुणी विरोध करण्याचा प्रश्नच नसतो. तत्पूर्वी बिंदूच्या सासरी जाऊन कुणाच्याही नकळत तिला रेल्वेस्थानकावर घेऊन येण्याची जबाबदारी ती शरदवर सोपवते. ठरलेल्या वेळी शरद रेल्वेस्थानकावर हजर होतो तो बिंदूच्या मृत्यूची बातमी घेऊन. ती किशोरवयीन मुलगी सासरच्या छळाला कंटाळून स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या करते! तिच्या मृत्यूची बातमी ऐकून मृणालची मनःस्थिती सैरभैर झालेली असताना तिचे कुटुंबीय मात्र म्हणतात, "आजकाल बायकांनी स्वतःच्या कपड्यांना आग लावण्याची जणू फॅशनच झालीये. किती नाटकं करतात या बायका!" ज्या मुलीला त्यांच्या कुटुंबानं अनेक वर्षं मोलकरणीप्रमाणे राबवून घेतलं तिच्या मृत्यूचा असा असंवेदनशील उपहास! मृणालचा रोखठोक प्रश्न असतो, "स्वतःच्या साडीला आग लावण्याची नाटकं फक्त बायकांनाच का करावी लागतात? आपल्या धोतीला आग लावण्याची वेळ पुरुषांवर का येत नाही याचा विचार कधी केलाय का?"

विदीर्ण अंतःकरणानं मृणाल पुरीला जाणाऱ्या रेल्वेत बसते. पुरीला पोहोचल्यावर तिनं आपल्या पतीला लिहिलेल्या दीर्घ पत्रातला शेवटचा भाग पुढीलप्रमाणे, "तुमच्या प्रशस्त घरात मला अन्नपाण्याची, चांगल्या वस्त्रांची कमतरता अजिबात नव्हती. तुमच्या स्वतःच्या चारित्र्यातही कुठलाही ठळक दोष नाही... पण तरीही मी कोलकात्यामधल्या तुमच्या घरात पुन्हा परत येणार नाही! तुमच्या घरात बिंदूला कसे दिवस काढावे लागले ते मी बघितलंय. तुमच्या जगात बायकांचं काय स्थान आहे ते मी अनुभवलंय. आता तुमच्या घरात आणखी काही अनुभवण्याची गरज नाही आणि इच्छाही नाही. आता मला तुमच्या बंदिस्त घराचं, तिथल्या बंदिस्त वातावरणाचं भय वाटत नाही. माझ्या पुढ्यात अथांग सागर आहे आणि माझ्या माथ्यावर पावसाळी ढगांचं कृपाच्छत्र आहे. तुमच्या प्रथापरंपरांच्या पडद्याचा फास माझ्या गळ्याभोवती घट्ट आवळला जात होता, माझा जीव त्यात गुदमरत होता. बिंदू आली आणि तिनं तो कुरूप, लज्जास्पद पाश टराटरा फाडून टाकला... स्वतः मरून तिनं मला वाचवलं. आता तुमच्या कुटुंबाच्या मर्यादांचं, मानसन्मानाचं ओझं पेलण्याची गरज मला वाटत नाही. तुमच्या कुटुंबाच्या 'धाकट्या सुनेचा' मृत्यू झालाय असंच आजपासून समजून चला. घाबरू नका. मी आत्महत्या वगैरे करणार नाहीये. बायकांच्या आत्महत्या तुमच्यासाठी उपहासाचा विषय असतो. तीच ती जुनी पद्धत वापरून तुमच्या विनोदबुद्धीला मी खाद्य पुरवणार नाही. संत मीराबाईसुद्धा एक स्त्री होती. तीसुद्धा रूढिपरंपरांच्या बेड्यांमध्ये बंदिस्त होती... पण त्या अवजड पाशांमधून ती मुक्त झाली, तगली, जगली… मीसुद्धा जगेन! तुमच्या चरणकमलांच्या कृपाच्छत्रापासून अखेरतः मी स्वतःला दूर सारतेय...."

चरणकमलांना स्पर्श करून पत्राची सुरुवात करणारी मृणाल चरणकमलांपासून दूर होऊन पत्राचा शेवट करते. या शेवटच्या वाक्यातच मृणाल जिंकते! तिच्या पुढच्या आयुष्याबद्दल टागोर काहीही भाष्य करत नाहीत... पण तिचा इथवरचा प्रवास पाहता ती तगेल आणि जगेल याची खातरी वाटते. सधन सासर आणि मारझोड न करणारा पती असलेली स्त्री जणू सुखसागरात असते, दुःखीकष्टी असण्याचं तिला काहीच कारण नाही अशी मान्यता आजही समाजात आहे. मानसिक, भावनिक हिंसा ही शारीरिक हिंसेप्रमाणे दृश्य स्वरूपात दिसून येत नसली तरी व्यक्तीच्या तनमनावर शारीरिक हिंसेप्रमाणेच तीव्र आणि दूरगामी परिणाम करते ही संकल्पना अद्यापही समाजाच्या पचनी पडलेली नाहीये. या पार्श्वभूमीवर शंभर वर्षांपूर्वी मृणालच्या तगमगीचं इतकं गहिरं, हृदयस्पर्शी दर्शन घडवणारे टागोर खरोखर द्रष्टे दार्शनिक होते. बुद्धिमान, संवेदनशील स्त्रीला जीवन जगण्यासाठी भौतिक सुखसुविधांपेक्षा उदात्त मूल्यं अधिक आवश्यक वाटतात आणि त्या मूल्यांच्या संवर्धनासाठी ती सुरक्षित, ऐश्वर्यसंपन्न जीवनाचा त्यागही करू शकते हे सत्य शंभर वर्षांपूर्वीच टागोरांनी मृणालच्या माध्यमातून सांगितलं आणि तत्कालीन समाजाच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातलं!

- डॉ. प्रगती पाटील 
pragati.rationalist@gmail.com

(लेखिका, भारतीय सैन्यदलात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.)

Tags: कथा रवींद्रनाथ टागोर प्रगती पाटील स्त्री literature Story Pragati Patil Woman Load More Tags

Comments: Show All Comments

दिपाली

ही गोष्ट छानच अाहे, पण मधे मधे त्या कंसामधे जे लिहिले अाहे त्याने rasabhang होतो अाहे.

syata

विचार करायला लावणारी गोष्ट आहे. काळ जरी जुना असला तरी आज पण ही गोष्ट relative आहे . मी epic channel वर बघीतली होती. आणि त्यानंतर रविंद्रनाथाच्या स्टोरीज चे सगळे episodes बघीतले आज ही गोष्ट वाचताना पुन्हा तीच अस्वस्थता जाणवली.

Pro. Bhagwat Shinde

लेख खूप छान व मार्मिक आहे. त्याबद्दल अगदी सुरुवातीला लेखिकेचे व मूळ लेखक रवींद्रनाथ टागोर यांचे मनःपूर्वक अभिनंदन.खरतर हा लेख म्हणजे सादरीकरणाचा एक एक वेगळा नमुना वाटतो.मूळ लेखकाच्या पत्रातील आशयावर लेखिकेने कंसात त्यावर आधारित नोंदवलेले निरीक्षण अधिक महत्त्वपूर्ण व गरजेचे वाटते.रसभंग नाही होत. विशेषता महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजही स्त्रियांना अशीच दुय्यम वागणूक दिली जाते याचा खूप खेद वाटतो.याचा सर्वच पुरुष वर्गाने विशेषता जे स्वतःला पुरोगामी समजतात त्यांनी अधिक गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. घरची सर्व कामे स्त्रियांनीच का करायची? त्यात आपण आपला सहभाग द्यावा की नाही? याचा अंतर्मुख होऊन विचार व त्यानुसार कृतिशील आचरण व्हायला हवे. लेखिका म्हणते त्यानुसार रवींद्रनाथ टागोरांच्या निवडक साहित्यामध्ये अशा स्त्री कथा दुर्लक्षिलया जात असतील तर तो मोठाच दांभिकपणा,पक्षपातीपणा म्हटला पाहिजे.आपल्या सारख्यांनी किंवा जे स्वतःला स्त्रीवादी , मानवतावादी समजतात त्या प्रत्येकाने अशा स्त्रीप्रधान साहित्याला अधिकाधिक बळ दिले पाहिजे व त्यानुसार आपले आचरण सुधारले देखील पाहिजे.

Dhananjay Gangal

लेख आवडला

Sonusing Thakare

फारच छान लेख, रविंद्रनाथ टागोर यांच्या लेखणीतून उतरलेली त्या काळची स्त्री, मीही लहानपणी अशा सोशिक स्त्रीया पाहिलेल्या आहेत, अजुनही बर्याच स्त्रीयांवर अन्याय होतात, ते व्हायला नको..

दीपक नेसरीकर पनवेल

छान... गुरूवर्य रविंद्रनाथ टागोर यांनी लिहिलेला लेख आवडला

रमेश दोंदे

गुरुदेव रविंद्र टागोर यांनी लिहिलेली कथा सुंदर आहे, असे सांगण्याची मला गरज नाही किंवा मी तितका मोठाली नाही. स्त्रीयांची परिस्थिती आपल्याकडे थोडी सुधारली आहे, असे आपण म्हणू शकतो. परंतु अजूनही खूप अंतर कापणे आहे. साधी गोष्ट, आमच्या एका सुनेने लग्नानंतर आपले पहिले नाव बद्लले नाही, हे मला खूप आवडले. हल्ली काही जण स्वतःचे पूर्ण नाव लिहितांना मध्ये आईचे नाव लिहितात. या छोट्या छोट्या गोष्टी मनाला सुखवीतात.

Sweety

खुप छान लेख, आजही स्त्रीची व्यथा तीच आहे. . केवळ त्याचे स्वरूप बदलले. समाजघातक प्रवृत्तींना विरोध केला तर स्त्रीला आघाव म्हटल जात. तिच्या निर्णयाचा आदर केला जात नाही. बऱ्याचदा यात स्त्रियाच विरोधक दिसतात व स्वतःचा आत्मसन्मान जपतांना दिसत नाही.

Mrs.Sathe

Very nice article

Anup Priolkar

Salute to the great Author of this script. Thanks for sharing such beautiful story after 100 years which is relevant to the present situation too.

Tejaswini Patil

Apratim lekh... dhanyawad

Add Comment

संबंधित लेख