ऑस्ट्रेलिअन ओपन - टेनिसचा महासंग्राम

वर्षातील पहिल्या ग्रँड स्लॅमला सुरुवात

फोटो सौजन्य - https://www.insidesport.co/

सामना सुरू होऊन तीन, साडेतीन अथवा चार तास उलटून गेलेले असतात. दोन्ही टेनिसपटूंच्या अंगावरून घाम निथळत असतो. गौरवर्णीय खेळाडू लालबुंद होऊन जातात. कितीही दमछाक झाली तरी कुणीच तसूभरही मागे हटायला तयार नसते... उलट पूर्वीपेक्षा अधिक जोमाने, शरीरात आहे तेवढी सर्व ऊर्जा पणाला लावत दोन्ही खेळाडू आपापल्या रॅकेटने जणू आग ओकत राहतात आणि प्रेक्षक श्वास रोखून, पापणीही न लवता तो रणसंग्राम अनुभवत राहतात.

टेनिस जगतातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या अशा चार ग्रँडस्लॅम टुर्नामेंटपैकी वर्षातील पहिल्या ग्रँड स्लॅमला - ऑस्ट्रेलिअन ओपनला सोमवारी (8 फेब्रुवारी) मेलबर्न येथे प्रारंभ झाला आहे. दोन आठवडे चालणाऱ्या या स्पर्धेत जगभरातील सर्वोत्तम असे 128 पुरुष आणि 128 महिला टेनिसपटू विजेतेपदासाठी संघर्ष करण्यास सज्ज झाले आहेत.

क्रिकेटसारख्या सांघिक खेळात एखादा सामना गमावला तरी पुढील सामन्यांत विजय मिळवून मालिका जिंकता येते. टेनिस, बॅडमिंटन यांसारख्या वैयक्तिक खेळांत तसे नसते. एक पराभव तुम्हाला थेट स्पर्धेबाहेर फेकून देतो. त्यामुळेच प्रत्येक सामन्यात खेळाडूंसाठी ‘करो या मरो’ परिस्थिती असते. ग्रँड स्लॅममध्ये 128/64/32/16 अशा प्रकारे चौथ्या फेरीनंतर उप-उपान्त्य फेरीत (क्वार्टर फायनलमध्ये) आठ टेनिसपटू पोहोचतात. त्यांतून चार उपान्त्य फेरीत (सेमी फायनलमध्ये) आणि दोन अंतिम फेरीत पोहोचतात आणि एकाच्या हातात येतो विजेतेपदाचा झळाळता चषक!

जागतिक क्रमवारीतील प्रथम 104 खेळाडूंनाच स्पर्धेत थेट प्रवेश मिळतो. त्यापुढील 105 ते 232 क्रमांकांच्या खेळाडूंना पात्रता फेरीचे सामने खेळावे लागतात. पात्रता फेरीतील तीनही सामन्यांत जे 16 खेळाडू विजयी होतात तेच ग्रँड स्लॅम खेळण्यास पात्र ठरतात. याव्यतिरिक्त आठ खेळाडूंना ‘वाइल्ड कार्ड’द्वारे प्रवेश मिळतो. जागतिक क्रमवारीत एके काळी उच्च स्थानावर असणाऱ्या मात्र सद्यःस्थितीत अपरिहार्य कारणास्तव पीछेहाट झालेल्या, प्रेक्षकांच्या पसंतीच्या, मायदेशाच्या मैदानावर खेळणाऱ्या खेळाडूंना वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळू शकतो.

या वर्षीच्या ऑस्ट्रेलिअन ओपनमध्ये भारताचे प्रज्नेश गुणेश्वरन, रामकुमार रामनाथन या पुरुष खेळाडूंना आणि अंकिता रैना, करमन कौर थांडी या महिला खेळाडूंना पात्रता फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला. सद्यःस्थितीत जागतिक क्रमवारीत 136व्या स्थानावर असणाऱ्या सुमीत नागलला वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळाल्याने त्याच्यावर पात्रता फेरीचे सामने खेळण्याची वेळ आली नाही.

2019च्या अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या प्रथम फेरीत सुमित नागलचा सामना टेनिसमहर्षी रॉजर फेडररशी झाला होता आणि त्यात त्याने फेडररविरुद्ध पहिला सेट 6 - 4 असा जिंकून खळबळ उडवून दिली होती! त्यापुढील तीन सेट्‌स गमावून तो पराभूत झाला हे खरे, पण फेडररसारख्या दिग्गजाविरुद्ध एका नवख्या (हरयाणातील ग्रामीण मध्यमवर्गीय परिवारातील) भारतीय टेनिसपटूने पहिला सेट जिंकल्याचे बघताना धम्माल आली होती हे नक्की!

टेनिसविषयी...

टेनिस हा खेळ ज्यांच्यासाठी नवा आहे त्यांनी पॉइंट, गेम, सेट या गोष्टी व्यवस्थित समजून घ्यायला हव्यात.

किमान 4 पॉइंट्‌स - 1 गेम

6 गेम्स - 1 सेट

3 किंवा 5 सेट्‌स - 1 मॅच असे साधारणतः सामन्याचे सूत्र असते. 

सामन्यात दोन्ही टेनिसपटू एकमेकांच्या दिशेने बॉल फटकावत असताना जेव्हा एक टेनिसपटू चुकतो तेव्हा त्याच्या प्रतिस्पर्ध्यास एक ‘पॉइंट’ मिळतो. एक ‘गेम’ मिळवण्यासाठी किमान 4 पॉइंट्‌स जिंकणे आवश्यक असते. एक पॉइंट जिंकल्यावर 15 गुण मिळतात, दुसऱ्या पॉइंटचे 30, तिसऱ्या पॉइंटचे 40 गुण आणि चौथा पॉइंट जिंकल्यावर 1 गेम मिळतो. प्रत्येक गेममध्ये 15/30/40/ गेम्स असे गुण जिंकत गेम मिळवावा लागतो.

जेव्हा एकाच गेममध्ये दोन्ही खेळाडू तीन-तीन पॉइंट्‌स जिंकून 40/40 अशी बरोबरी साधतात तेव्हा त्याला ड्यूस (Deuce) असे म्हणतात. ड्यूसनंतरच्या पॉइंटला ॲडव्हान्टेज असे म्हणतात. ड्यूस झाल्यावर जो टेनिसपटू सलग दोन पॉइंट्‌स (ॲडव्हान्टेज, game) जिंकतो त्याला गेम मिळतो. एका टेनिसपटूला ॲडव्हान्टेज मिळाल्यावर जर त्याला सलग दुसरा पॉइंट जिंकता आला नाही तर पुन्हा ड्यूस होतो. प्रतिस्पर्धी तुल्यबळ असतील तर ड्यूस, ॲडव्हान्टेज यांचा हा उत्कंठावर्धक खेळ कितीही वेळ चालू शकतो आणि एक गेम अनेक मिनिटे लांबू शकतो. असा गेम बघताना प्रेक्षकही क्षणाक्षणाला आशानिराशेचे हिंदोळे अनुभवत राहतात.

इतकी मेहनत करून फक्त एक गेम खिशात पडतो. एका सामन्यात महिला खेळाडूंना जास्तीत जास्त 39 गेम्स आणि पुरुष खेळाडूंना 65 गेम्स खेळावे लागू शकतात. प्रत्येक गेममध्ये, प्रत्येक पॉइंटसाठी एकाग्रचित्ताने, जीवतोड मेहनत करून वाऱ्याच्या वेगाने अनेक शॉट्स मारावे लागतात. मैदानाच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत सुसाट धावावे लागते, प्रसंगी धडपडलात तर लगेच सावरून फटका मारावा लागतो.

अनेक खेळांमध्ये पॉइंट, गेम, सेट अशी पद्धत नसून फक्त पॉइंट, सेट अशीच पद्धत असल्याने त्यांच्यावर टेनिसपटूंइतका दबाव नसतो. टेनिसपटूंनी मात्र 40/0 अथवा 40/15 अशी आघाडी घेतली तरी त्यांना क्षणभरही गाफील राहून चालत नाही... कारण सलग दोन-तीन पॉइंट्‌स जिंकून प्रतिस्पर्धी 40/40 अशी बरोबरी साधू शकतो आणि नंतर गेम जिंकूही शकतो.

2019च्या विम्बल्डनच्या अंतिम फेरीत सर्वाधिक 20 ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवलेला रॉजर फेडरर एकविसाव्या विजेतेपदाकडे वाटचाल करत होता. पाचव्या सेटमध्ये मोक्याच्या क्षणी 40/15ची आघाडी घेतलेल्या फेडररला इतिहास घडवण्यास त्याला फक्त एका पॉइंटची आवश्यकता होती आणि दोन मॅच पॉइंट्‌स त्याच्या हातात होते. फेडरर कितीही महान टेनिसपटू असला तरी अखेरीस तोही मनुष्यच. चूक त्याच्याही हातून झाली. त्याने दोन्ही मॅच पॉइंट्‌स गमावले. नोवाक जोकोवीच विम्बल्डन विजेता ठरला. त्यानंतर आजतागायत फेडरर कुठल्याही ग्रँड स्लॅमच्या फायनलमध्ये पोहोचू न शकल्याने ते दोन मॅच पॉइंट्‌स गमावल्याची खंत त्याला आयुष्यभर वाटत राहील हे नक्की!

टेनिसमध्ये एक सेट मिळवण्यासाठी सहा गेम्स जिंकणे आवश्यक असते... तेही प्रतिस्पर्ध्याशी दोन गेम्सचे अंतर राखून. 6/4 अथवा 7/5 असा सेट जिंकता येतो... पण 6/5 असा जिंकता येत नाही. 6/6 अशी बरोबरी झाली असेल तर ‘टाय-ब्रेकर’ खेळून 7/6 असा सेट जिंकावा लागतो. क्रिकेटमधील ‘सुपर ओव्हर’सारखे, फुटबॉलमधील ‘पेनल्टी शूट आऊट’सारखे हे टेनिसमधील ‘टाय-ब्रेकर’ अत्यंत रोमहर्षक असतात. फरक इतकाच की, क्रिकेटपटू, फुटबॉलपटू यांना या प्रकारचा तणाव सामन्याच्या अंतिम क्षणांमध्ये अनुभवावा लागतो. टेनिसमध्ये मात्र प्रत्येक सेटअखेर टाय-ब्रेकर होऊ शकतो. तुल्यबळ प्रतिस्पर्धी असतील तर एकेका सामन्यात 3 किंवा 4 सेट्‌सचा निर्णय ‘टाय-ब्रेकर’ने लागतो. अगोदरच वेगवान असलेला टेनिसचा खेळ टाय-ब्रेकरमध्ये एका वेगळ्याच उंचीवर पोहोचतो. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचते.

टेनिसचा प्रेक्षकवर्ग तसा शांत, सभ्य असतो. खेळ चालू असताना प्रेक्षक ढोल बडवत नृत्य अथवा आरडाओरडा करत नाहीत. खेळाडूंची एकाग्रता टिकून राहण्यासाठी प्रेक्षकांनी शांत राहणे गरजेचे असते. खेळाडूंनी पॉइंट जिंकल्यावर प्रेक्षक टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करतात आणि दुसरा पॉइंट सुरू होण्यापूर्वी शांतही होतात. परंतु टाय-ब्रेकर सुरू झाला की भावनातिरेकाने प्रेक्षक टाळ्या, आरडाओरडा सुरू करतात. प्रेक्षकांनी शांतता पाळावी यासाठी चेअर अम्पायर पुनःपुन्हा सौजन्यपूर्वक आवाहन करत राहतात. प्रत्येक, किंबहुना प्रत्येक शॉटसोबत आनंद, तणाव, उत्साह, निराशा, रोमांच, उद्वेग अशा विविध भावभावना क्षणोक्षणी बदलत राहतात....

महिला टेनिसपटूंचे सामने बेस्ट ऑफ थ्री सेट्‌सचे होतात, तीनपैकी दोन सेट्‌समध्ये जी महिला विजयी होते ती सामना जिंकते. ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये पुरुषांचे सामने बेस्ट ऑफ पाच सेट्‌सचे होत असल्याने (पाचपैकी तीन सेट्‌स जिंकणे आवश्यक असल्याने) सामन्याचा निकाल लागण्यासाठी तीन, चार अथवा पाच सेट्‌स खेळणे आवश्यक असते. दोन तुल्यबळ खेळाडू जेव्हा 2 - 2 सेट (टाय-ब्रेकरमध्ये!) जिंकून सामना पाचव्या सेटपर्यंत खेचत नेतात तेव्हा मैदानावरील जल्लोष अभूतपूर्व असतो.

सामना सुरू होऊन तीन, साडेतीन अथवा चार तास उलटून गेलेले असतात. दोन्ही टेनिसपटूंच्या अंगावरून घाम निथळत असतो. गौरवर्णीय खेळाडू लालबुंद होऊन जातात. कितीही दमछाक झाली तरी कुणीच तसूभरही मागे हटायला तयार नसते... उलट पूर्वीपेक्षा अधिक जोमाने, शरीरात आहे तेवढी सर्व ऊर्जा पणाला लावत दोन्ही खेळाडू आपापल्या रॅकेटने जणू आग ओकत राहतात आणि प्रेक्षक श्वास रोखून, पापणीही न लवता तो रणसंग्राम अनुभवत राहतात.

अगोदरच्या सेटमध्ये ‘टाय-ब्रेकर’ला जशी उत्कंठा असते तशी उत्कंठा आता पाचव्या सेटमध्ये प्रत्येक क्षणाला असते. अनेक आशाअपेक्षांचे ओझे पेलवत, सर्वस्व पणाला लावत जो खेळाडू विजयी होतो त्याचे तर अभिनंदन करावेसे वाटतेच... पण जो पराभूत होतो त्याच्याही झुंजार वृत्तीला दाद द्यावीशी वाटते. अनेक खेळाडूंच्या तुलनेत टेनिसपटूंना अधिक पैसा मिळतो तो उगीचच नव्हे... त्यासाठी त्यांनी अक्षरशः रक्ताचे पाणी केलेले असते!

यंदाचे ऑस्ट्रेलिअन ओपन

सोमवारी ऑस्ट्रेलिअन ओपनच्या प्रथम फेरीत अनेक मानांकित खेळाडू विजयी झाले तर काहींना पराभव पत्करावा लागला. पुरुषांमध्ये नोवाक जोकोवीच ( 1  मानांकन), डोमिनिक थीम (3), अलेक्झांडर झ्वेरेव (6), मिलोस राओनीच (14), स्टॅन वावरींका (17) प्रथम फेरीत विजयी झाले. सद्य स्थितीत मानांकित नसलेले परंतु एके काळी जागतिक क्रमवारीत दहाच्या आत असलेले मारीन चिलीच, के निशीकोरी प्रथम फेरीतच पराभूत झाले. चिलीचला अठराव्या मानांकित ग्रीगोर दिमित्रोवने 6/4, 6/2, 7/6 असे नमवले आणि निशीकोरीला पंधराव्या मानांकित पाब्लो करिनो बुस्टाने 7/5, 7/6, 6/2 असे नमवले. दहावा मानांकित गेल मोंफिल्स हा जागतिक क्रमवारीत चौऱ्याऐंशीव्या स्थानावर असलेल्या फिनलंडच्या एमिल रसुवरीकडून 3/6, 6/4, 7/5, 3/6, 6/3 असा पाच सेटमध्ये पराभूत झाला. जागतिक क्रमवारीत बत्तिसाव्या स्थानावर असलेला यानिक सीनर आणि अकरावा मानांकित डेनिस शापावालोव यांच्यातील सामना हा पहिल्या दिवसाचा शेवटचा आणि सर्वाधिक उत्कंठावर्धक सामना. 4 तास चाललेल्या या सामन्यात शापावालोव 3/6, 6/3, 6/2, 4/6, 6/4 असा विजयी झाला.

महिलांमध्ये सिमोना हॅलेप (2), नाओमी ओसाका (3), बियांका आंद्रेस्क्यू (8), पेट्रा क्विटोवा (9), सरीना विल्यम्स (10), इगा श्वाटेक (15), व्हिनस विल्यम्स प्रथम फेरीत विजयी झाल्या. 40 वर्षांची व्हीनस आणि 39 वर्षांची सरीना आपल्या वयाच्या चौदाव्या वर्षापासून सर्वोच्च स्पर्धात्मक टेनिस खेळत आहेत आणि या क्षणी खेळत असलेल्या महिला टेनिसपटूंमधील सर्वाधिक यशस्वी खेळाडू आहेत. टेनिससारखा आव्हानात्मक खेळ, ज्यात वेग, ताकद आणि स्टॅमिना अत्यावश्यक असतो... त्यात सर्वोच्च स्तरावर 25 वर्षांपासून अधिक काळ कार्यरत राहणाऱ्या या दोन वाघिणींची प्रशंसा करावी तितकी कमीच!

भूतपूर्व नंबर 1 टेनिसपटू एंजलिक कर्बर मात्र प्रथम फेरीतच जागतिक क्रमवारीत बासष्टाव्या स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या बर्नान्डा पेराकडून 6/0, 6/4 अशी सहजगत्या पराभूत झाली. जागतिक क्रमवारीत चोविसाव्या स्थानावर असलेली अमेरिकेची एलिसन रिस्के हीसुद्धा पहिल्याच फेरीत पराभूत झाली. एलिसन रिस्के ही भारताची सून आहे. भूतपूर्व भारतीय टेनिसपटू आनंद अमृतराज यांचा मुलगा स्टीफन अमृतराज यांच्याशी एलिसनचा विवाह झालेला आहे. विजय अमृतराज, आनंद अमृतराज या टेनिसपटू बंधूंनी सत्तरच्या दशकात जागतिक स्तरावर अनेक वर्षे भारताचे प्रतिनिधित्व केले.

ऑस्ट्रेलिअन ओपनच्या पहिल्याच दिवशी अनेक चुरशीचे सामने झाले आणि काही अनपेक्षित पराभव झाले. दोन आठवडे चालणारी ही स्पर्धा जसजशी पुढे सरकत जाईल तसतशी तिची रंगत अधिकच वाढत जाणार आहे, लढती अधिकच तीव्र होत जाणार आहेत. ऑस्ट्रेलिअन ओपनचे थेट प्रक्षेपण सोनी टेन आणि सोनी सिक्स या वाहिन्यांवर सुरू आहे. टेनिसच्या या महासंग्रामात पुढे काय होतेय ते बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

- डॉ. प्रगती पाटील, पुणे.
pragati.rationalist@gmail.com

(लेखिका, भारतीय सैन्यदलात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.)

Tags: प्रगती पाटील टेनिस ऑस्ट्रेलिअन ओपन ग्रँड स्लॅम pragati patil sprots australian open tennis grand slam Load More Tags

Add Comment