ओसाका आणि जोकोवीच ठरले अजिंक्य!

ऑस्ट्रेलिअन ओपनची सांगता 

ऑस्ट्रेलिअन ओपन 2021 चे विजेते : नोवाक जोकोविच व नेओमी ओसाका

ऑस्ट्रेलिअन ओपनच्या उपान्त्य फेरीत एकोणचाळीसवर्षीय सरीना विरुद्ध तेवीसवर्षीय नेओमी (Naomi चा अचूक उच्चार नाओमी असा नसून नेओमी असा आहे.) ओसाका सामन्याची उत्सुकता टेनिसप्रेमींमध्ये होती. ओसाकाचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून सरीना आंतरराष्ट्रीय स्तरावर टेनिस खेळत आणि जिंकत आहे. ओसाकाचे पिता हैती (अफ्रिकन) देशातील कृष्णवर्णीय आणि माता जपानी. पित्याचा वर्ण आणि मातेचा चेहरामोहरा मिळालेली ओसाका खूप सुंदर दिसते. 

1999मध्ये ओसाकाच्या वडिलांनी व्हिनस आणि सरीना या विल्यम्स भगिनींना आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये चमकदार कामगिरी करताना बघितले. या भगिनींचे पिता आणि प्रशिक्षक असलेले रिचर्ड विल्यम्स यांनी त्यांना कसे प्रशिक्षण दिले त्याबद्दल ओसाकाच्या वडिलांनी वाचले आणि त्यांच्या मनात विचार आला, ‘आपल्यालाही मारी आणि नेओमी या दोन कन्या आहेत. जसे व्हिनस-सरीनाच्या वयांत वर्षभराचे अंतर आहे तसेच मारी-नेओमीच्या वयांत वर्षभराचे अंतर आहे. विल्यम्स भगिनींप्रमाणे त्यांना आपणही टेनिसचे प्रशिक्षण दिलं तर एक दिवस त्याही प्रसिद्ध टेनिसपटू होतील.’

...आणि खरोखरच कठोर परिश्रमांच्या जोरावर मारी आणि नेओमी आंतरराष्ट्रीय टेनिसपटू झाल्या. मारीची आंतरराष्ट्रीय स्तरावर फारशी चमकदार कामगिरी झाली नसली तरी नेओमीची प्रगती होतच राहिली. 2018मध्ये अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत सरीनाला पराभूत करून एकोणीसवर्षीय ओसाकाने आपले पहिलेवहिले ग्रँड स्लॅम अजिंक्यपद मिळवले होते. 

जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकापर्यंत मजल मारलेल्या, तीन ग्रँड स्लॅम अजिंक्यपदे मिळवलेल्या ओसाकाने यंदाच्या ऑस्ट्रेलिअन ओपनमध्ये सरीनाला 6/3, 6/4 असे पराभूत केले आणि चोविसावे ग्रँड स्लॅम अजिंक्यपद मिळवण्याचे सरीनाचे स्वप्न हवेतच विरले. 

या अंतिम सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सरीनाला अश्रू अनावर झाले आणि ते बघून तिच्या चाहत्यांनाही गलबलून आले. वाढत्या वयाचा विचार करता... सरीनाला चोविसावे अजिंक्यपद मिळवता येईल का... याची अनिश्चितता आता अधिकच वृद्धिंगत झाली आहे....

महिलांच्या दुसऱ्या उपान्त्य फेरीत बाविसाव्या मानांकित जेनिफर ब्रॅडीने पंचविसाव्या मानांकित कॅरोलिना मुकोवाला 6/4, 3/6, 6/4 असे पराभूत केले. पंचवीसवर्षीय ब्रॅडीने तिच्या कारकिर्दीत प्रथमच ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली.

अंतिम फेरीत नेओमी ओसाकाने जेनिफर ब्रॅडीवर 6/4, 6/3 असा एकतर्फी विजय मिळवला. सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी 4/4 गेम्स जिंकून बरोबरी साधलेली असताना सामना प्रचंड चुरशीचा होईल असे वाटत होते... परंतु ब्रॅडीने काही टाळता येण्यासारख्या चुका (unforced errors) करून ओसाकाला सर्व्हीस ब्रेक करण्याची संधी दिली. 

पहिला सेट जिंकल्यानंतर आत्मविश्वास वृद्धिंगत झालेल्या ओसाकाला दुसरा सेट 6/3 असा जिंकण्यासाठी जास्त परिश्रम घ्यावे लागले नाहीत. तिची सर्व्हीस उत्तम होती. चपळतेने धावून, उत्तम रॅलीज्‌ करून तिने अनेक चांगले पॉइंट्स घेतले. हे ओसाकाचे दुसरे ऑस्ट्रेलिअन ओपन आणि चौथे ग्रँड स्लॅम अजिंक्यपद आहे. 

ओसाका फक्त 23 वर्षांची असल्याने पुढील कालावधीत सरीना विल्यम्सच्या 23 ग्रँड स्लॅम अजिंक्यपदांना गाठेल काय याबाबत आत्तापासूनच तर्कवितर्क सुरू झालेत. ओसाका मात्र त्याबद्दल फारशी चिंता करत नाही. खेळाचा आनंद घेत विजयासाठी परिश्रम करणे, दीर्घ काळ खेळत राहणे हेच तिच्यासमोरील उद्दिष्ट आहे. 

विजयानंतरच्या पत्रकार परिषदेत ओसाका म्हणाली, ‘मला तोवर खेळत राहायचे आहे जोवर मी त्या नवोदित खेळाडूशी खेळत नाही जिने तिच्या बालपणी मला बघून, मला आदर्श मानून टेनिसचे धडे गिरवले आहेत.’ सरीनासारख्या खेळाडूंना बालपणी बघून ओसाका टेनिसमध्ये कारकिर्द घडवण्यासाठी प्रेरित झाली आणि आज सरीनालाच नमवून विजेती झाली. तसेच भविष्यात कुणीतरी तिच्यापासून प्रेरित होऊन तिला आव्हान द्यावे असे तिला वाटते. ओसाकाचे हे स्वप्न पूर्ण व्हावे आणि एका पिढीने दुसऱ्या पिढीला प्रेरणा देण्याचे हे इष्टचक्र असेच सुरू राहावे अशीच सर्व टेनिसप्रेमींची इच्छा असेल.

पुरुषांच्या प्रथम उपान्त्य फेरीत प्रथम मानांकित जोकोवीचने अनेक आश्चर्यकारक विजय मिळवलेल्या बिगरमानांकित अस्लन करॅटसेवला 6/3, 6/4, 6/2 असे सरळ सेट्समध्ये पराभूत करून त्याची स्वप्नवत वाटचाल रोखली. प्रथम आणि द्वितीय सेट्‌समध्ये चांगली सर्व्हीस करून आणि काही अप्रतिम शॉट्स मारून करॅटसेवने जोकोवीचसमोर चांगले आव्हान निर्माण केले होते... परंतु जोकोवीचने अचूक फटके मारून त्याची सर्व्हीस ब्रेक करण्यात यश मिळवले. दोन सेट्‌स गमावल्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये करॅटसेवचा प्रतिकार मंदावला आणि जोकोवीचने सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.

द्वितीय उपान्त्यपूर्व फेरीचा सामना चतुर्थ मानांकित रशिअन टेनिसपटू डॅनिअल मेदवेदेव आणि पाचवा मानांकित स्टेफॅनोस त्सित्सिपास यांच्यात होता. प्रत्येक वर्षाच्या अखेरीस ATP फायनल्सच्या स्पर्धा होतात ज्यांत जगातील फक्त आठ सर्वोत्तम टेनिसपटू अजिंक्यपदासाठी एकमेकांशी खेळतात. त्सित्सिपासने 2019च्या ATP फायनल्सचे अजिंक्यपद मिळवले होते आणि मेदवेदेवने 2020चे. दोघे तुल्यबळ प्रतिस्पर्धी असल्याने त्यांच्यातील सामना रोमांचक होईल असे वाटले होते... परंतु मेदवेदेवने त्सित्सिपासचा 6/4, 6/2, 7/5 असा सरळ सेट्‌समध्ये पराभव केला.

अंतिम फेरीत पंचवीसवर्षीय मेदवेदेवचा मुकाबला तेहेतीसवर्षीय जोकोवीचशी होता. जोकोवीच ऑस्ट्रेलिअन ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचल्यावर कधीही पराभूत झालेला नाहीये... परंतु तीन महिन्यांपूर्वी ATP फायनल्सचे विजेतेपद मिळवताना मेदवेदेवने जोकोवीचला पराभूत केले होते. कदाचित त्यामुळेच ऑस्ट्रेलिअन ओपनच्या अंतिम फेरीत दबाव माझ्यावर नसून जोकोवीचवर असेल असे वक्तव्य मेदवेदेवने केले होते.

...परंतु घडले विपरीतच. जोकोवीचने अत्यंत आत्मविश्वासाने 7/5, 6/2, 6/2 असा सरळ सेट्समध्ये मेदवेदेवचा पराभव केला. प्रथम सेटमध्ये दोन्ही खेळाडूंची 5/5 अशी बरोबरी असेपर्यंत सामना चुरशीचा होता... मात्र जोकोवीचने प्रथम सेट जिंकल्यानंतर मेदवेदेवला पुढील दोन सेट्समध्ये वरचढ होण्याची एकही संधी दिली नाही. त्सित्सिपासविरुद्धच्या सामन्यात ज्या तडफेने मेदवेदेव खेळला होता ती तडफ अंतिम सामन्यात दिसली नाही हे जरी खरे असले तरी जोकोवीचला विजयाचे श्रेय द्यायलाच हवे. 

उपान्त्यपूर्व फेरीत पोहोचेपर्यंत अनेक सामन्यांत त्याची लय गेली आहे असे वाटत होते, प्रत्येक सामन्यात विजयी होण्यासाठी त्याला चारपाच सेट्स झगडावे लागत होते... परंतु उपान्त्य फेरीत आणि अंतिम फेरीत त्याने अत्यंत आत्मविश्वासाने उत्तम खेळ करत सरळ सेटमध्ये विजय मिळवला. 

महिलांच्या अंतिम सामन्याप्रमाणेच पुरुषांचा अंतिम सामनाही एकतर्फी झाला. हे जोकोवीचचे नववे ऑस्ट्रेलिअन ओपन आणि अठरावे ग्रँड स्लॅम अजिंक्यपद आहे. अजिंक्यपद स्वीकारल्यानंतरच्या भाषणात मेदवेदेवचे सांत्वन करताना तो म्हणाला, ‘विजेतेपद मिळवणे ही गोष्ट कालसापेक्ष आहे. भविष्यात तुला अजिंक्यपद नक्कीच मिळेल, फक्त त्याची वाट पाहण्याइतका संयम तुझ्याकडे असू दे.’

ऑस्ट्रेलिअन ओपनमध्ये भारतीय टेनिसपटूंची कामगिरी निराशाजनक असली तरी दुहेरीत भारतीय वंशाचा अमेरिकन टेनिसपटू राजीव रामने चमकदार कामगिरी केली आहे. मिश्र दुहेरीत चेक प्रजासत्ताकच्या बार्बरा क्रॅचिकोवाच्या साथीने त्याने ऑस्ट्रेलिअन ओपनचे अजिंक्यपद मिळवले आणि पुरुष दुहेरीत ब्रिटनच्या ज्यो सॅल्सबरीसोबत त्याने उपविजेतेपद मिळवले. 

मिश्र दुहेरीत जेव्हा राजीव राम - बार्बरा क्रॅचिनोवा यांनी मॅथ्यू एब्डेन - समँथा स्टोसूर या ऑस्ट्रेलिअन जोडीला पराभूत केले तेव्हा एक गोष्ट ध्यानात आली. स्पर्धा ऑस्ट्रेलियात असल्याने ऑस्ट्रेलिअन जोडीला पाठिंबा देण्यासाठी अनेक प्रेक्षक ऑस्ट्रेलिअन राष्ट्रध्वज फडकवत होते. राजीव रामची जोडीदार क्रॅचिनोवाचे पाठराखे चेक प्रजासत्ताकचा राष्ट्रध्वज फडकवत होते. राजीव रामला पाठिंबा देण्यासाठी मात्र कुणीही अमेरिकन राष्ट्रध्वज फडकवत नव्हते.

या ऑस्ट्रेलिअन ओपनमध्ये तरुण नेओमी ओसाकाने चौथे ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवून भविष्यात अनेक विक्रम करण्याचे संकेत दिले आहेत आणि नोवॅक जोकोवीचने अठरावे विजेतेपद मिळवून प्रत्येकी 20 ग्रँड स्लॅम विजेतीपदे मिळवणाऱ्या फेडरर - नदालला समर्थ आव्हान निर्माण केले आहे. फेडरर - नदाल - जोकोवीचमध्ये सर्वोत्तम कोण याबद्दलची चुरस आणि टेनिसप्रेमींची उत्कंठा प्रत्येक ग्रँड स्लॅमगणिक अधिकच तीव्र होत आहे...

- डॉ. प्रगती पाटील, पुणे.
pragati.rationalist@gmail.com

(लेखिका, भारतीय सैन्यदलात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.)

Tags: प्रगती पाटील ऑस्ट्रेलिअन ओपन ग्रँडस्लॅम क्रीडा नोवाक जोकोविच नेओमी ओसाका Pragati Patil Sports Australian Open Tennis Grandslam Novak Djokovic Naomi Osaka Load More Tags

Comments:

नम्रता

टेनिस स्पर्धेविषयीचे सारे लेख उत्कृृृृृृष्ट.

Add Comment