अमेरिकेतून प्रकाशित होणाऱ्या 'टाईम' या जगप्रसिद्ध साप्ताहिकाच्या ताज्या (19 ऑक्टोबर 2020) अंकात 'नव्या पिढीचे नेतृत्व' म्हणून भारताची पॅराबॅमिंटनपटू मानसी जोशी हिचा गौरव करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने 2019 च्या साधना युवा दिवाळी अंकातील मानसीचा जीवनप्रवास रेखाटणारा हा लेख कर्तव्यच्या वाचकांसाठी इथे पुनर्मुद्रित करीत आहोत.
दि. 25 ऑगस्ट 2019 रोजी स्वित्झर्लंडमध्ये डब्ल्यूएफ पॅरा-बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या स्पर्धा पार पडल्या. यात SL3 वुमन्स सिंगल या गटात वयाच्या तिसाव्या वर्षी सुवर्णपदक मिळवणाऱ्या मानसी जोशी हिची कहाणी आपल्याला स्वतःच्या आयुष्याचे सिंहावलोकन करायला लावणारी आहे. मूळची राजकोटची असलेली मानसी वडिलांच्या भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरच्या नोकरीमुळे मुंबईत स्थायिक होती. आई, वडील, लहान भाऊ, बहीण असा तिचा परिवार. लहान असल्यापासून तिच्या वडिलांनी तिला विविध खेळांचा परिचय करून द्यायला सुरुवात केली होती. वयाच्या सहाव्या वर्षापासून वडिलांसोबत ती बॅडमिंटन खेळायची.
त्यांच्या घरी एकच रॅकेट असल्याने वडील तिच्या हातात ती रॅकेट द्यायचे आणि स्वतः मात्र हाताने शटलकॉक (बॅडमिंटनच्या खेळातील फूल) फेकायचे. आपल्या उंचीपेक्षा मोठी रॅकेट हाताळत ती ते शटलकॉक मारण्याचा प्रयत्न करायची. त्यानंतर शाळा आणि शहर पातळीवर बॅडमिंटनच्या काही स्पर्धादेखील ती जिंकली होती. पुढे शिक्षण आणि नोकरीसोबत वेळ मिळेल तसं ‘वर्क अँड लाईफ बॅलन्स’ साधत तिने हा छंद केवळ फिटनेससाठी जोपासला होता. तोपर्यंत बॅडमिंटनकडे तिने कधीच करिअर म्हणून पाहिले नव्हते. कारण सर्वसामान्य तरुणींप्रमाणे तिचीही स्वप्ने चांगली नोकरी, घर, गाडी इथपर्यंत मर्यादित होती. त्यानुसार तिने आपले आयुष्य जगायला सुरुवात केली होती.
लहानपणापासून विज्ञान व इंजिनिअरिंग या विषयांमध्ये आवड असल्यामुळे तिने इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगमध्ये डिग्री घेतली आणि ॲटोस इंडिया कंपनीत सिनिअर इंजिनिअर म्हणून नोकरी करू लागली. आयुष्यात सगळं सुरळीत सुरू असताना 2 डिसेंबर 2011 रोजी वयाच्या बाविसाव्या वर्षी, टू-व्हीलरने ऑफिसला जात असताना तिचा भीषण अपघात झाला. ट्रकने तिच्या गाडीला धडक दिली. या भीषण अपघातात इतर अनेक जखमांबरोबरच तिला संपूर्ण डावा पाय गमवावा लागला. दहापेक्षा जास्त तास सुरू असलेल्या शस्त्रक्रिया करूनही गँगरिन झाल्याने तिचा डावा पाय कापावा लागला. ती पन्नास दिवस हॉस्पिटलमध्ये होती. त्यानंतर तिला उभं राहण्यापासून ते पुन्हा चालणं शिकण्यासाठी रिहॅबिलिटेशन करावं लागलं. अशा प्रकारे, काही गोष्टी विसरण्याचा आणि अनेक गोष्टी पुन्हा नव्याने शिकण्याचा तिचा प्रवास सुरू झाला.
या पुन्हा नव्याने शिकण्याच्या प्रवासात तिला कृत्रिम पाय लावून रिहॅबिलिटेशन देणाऱ्यांमार्फत धावायला शिकण्याच्या एका शिबिरात जायची संधी मिळाली. त्यात जर्मनीचे पॅरा-ऑलिम्पियन (विकलांग खेळाडू) धावपटू आणि सुवर्णपदकविजेता हेन्रिक पोपोव यांनी मार्गदर्शन केले. तिथे ते क्रिकेट, व्हॉलिबॉल, डॉजबॉल यांसारखे खेळ खेळले. पुन्हा धावायला मिळाल्याने ती भारावून गेली. शिबिरानंतर तिने आयोजकांना विनंती करून तो विशेष कृत्रिम पाय पुढील काही आठवडे वापरण्यासाठी मागून घेतला.
त्या आठवड्यात, रोज ऑफिसमधून घरी आल्यावर ती धावायला जायची. आपल्याला धावायला मिळतंय, यामुळे तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मात्र काही दिवसांनी ठरल्याप्रमाणे तिला तो विशेष कृत्रिम पाय परत करावा लागला आणि त्यानंतर तिचं धावणं पुन्हा थांबलं. आयुष्यातल्या या अपघाताबद्दल एका मुलाखतीत मानसी म्हणाली, ‘‘हे माझ्या नशिबात होतं आणि आता हेच माझं आयुष्य आहे, वगैरे गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाही! माझं विकलांग असणं इतकंच माझं आयुष्य कसं असू शकेल? तो माझ्या आयुष्यात घडलेला केवळ एक अपघात होता. त्यानंतरचा माझा रिकव्हरी पिरियड जरी खूप लांबलचक असला, तरी मी नकारात्मक गोष्टींना माझ्या आत्मविश्वासावर ताबा कधीच मिळवू दिला नाही. कोणत्याही परिस्थितीत स्वतःला मदत करण्याचा आपला निर्णय पक्का असेल; तर आजूबाजूला असे अनेक लोक आपोआप तयार होताना दिसतात, जे मनापासून आपल्या मदतीला येतात. ज्या गोष्टी मी करू शकणार नाही असं मला वाटतं, त्याच गोष्टी करण्यासाठी माझी फॅमिली मला कायम प्रोत्साहन देते. मलाही चॅलेंजेस स्वीकारायला आवडतं. कारण मी या मताची आहे की, मला किंवा कुणालाही ते विकलांग असल्यामुळे नव्हे, तर त्यांच्या कामगिरीमुळे ओळखलं गेलं पाहिजे आणि त्यांच्या परिश्रमाचं व कर्तृत्वाचं कौतुक झालं पाहिजे.’’
ऑगस्ट 2012 मध्ये कंपनी लेव्हलला आयोजित केलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत, मानसी अपघातानंतरची तिची पहिली मॅच खेळली. तिथे ती वुमन सिंगलमध्ये पहिली आली. तिच्या परिवारातील सदस्यांनी, मित्रमंडळींनी आणि ऑफिसमधल्या लोकांनी तिला पुढे खेळण्यासाठी प्रोत्साहित केले. या मॅचमुळे तिच्या लक्षात आले की, तिच्यामध्ये या खेळासाठी लागणारी स्किल्स अजूनही आहेत. मग तिने आपला जॉब सांभाळत प्रॅक्टिस सुरू केली. पहाटे साडेचारला उठायची, जेणेकरून ऑफिसला जाण्याअगोदर प्रॅक्टिस करायला भरपूर वेळ मिळावा. तेव्हा तिच्याकडे कोणीही कोच (प्रशिक्षक) नव्हता. तिचा लहान भाऊ बॅडमिंटन खेळतो. तोच तिला घरी शिकवायला लागला. शरीर आणि मन हे दोन्ही फिट ठेवण्यासाठी ती सातत्याने योगासुद्धा करायला लागली.
आपल्या पहिल्या कंपनी लेव्हलच्या मॅचनंतर ऑगस्ट 2014 मध्ये एशियन गेम्स स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या निवडप्रक्रियेत तिने भाग घेतला. पण त्यात तिची निवड झाली नाही, त्याबद्दल तिचं मत वाचण्यासारखं आहे- ‘‘या स्पर्धेमुळे मला बॅडमिंटनमधील पॅरा- ऑलिम्पिक स्पर्धांबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टींची माहिती मिळाली. आणि पॅरा-ॲथलिट क्षेत्रातील माझ्यासारख्या विविध लोकांशी मैत्री झाली. विकलांग असलेल्या किंवा झालेल्या व्यक्तींसाठी त्यांच्या विकलांगतेच्या पातळीवरून विविध गट तयार केले जातात. या गटांमध्ये स्पर्धकांची शारीरिक क्षमता लक्षात घेता, स्पर्धेचा प्रकार आणि त्यांच्या काठिण्याची लेव्हल ठरवली जाते. या खेळासाठीचे नियमसुद्धा सामान्य खेळापेक्षा वेगळे असतात. मी पॅरा-बॅडमिंटन जेव्हा SL3 गटातून खेळते, तेव्हा ते केवळ हाफ कोर्ट असतं (बॅडमिंटनच्या अर्ध्याच कोर्टमध्ये खेळणे). माझ्यासारख्या व्यक्तीसाठी ही महत्त्वाची माहिती होती.
तिथे भेटलेल्या केरळच्या नीरज जॉर्ज या पॅरा- ऑलिम्पियनने मला सांगितले की, ‘तू नॅशनल आणि इंटरनॅशनल लेव्हलच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला हवा.’ त्याने हेही सांगितले की- मी माझे ध्येय मोठे ठेवावे, कारण त्याच्या निरीक्षणानुसार माझ्याकडे तितकी विविध कौशल्ये आहेत. म्हणून मी माझ्या खेळाचं काही श्रेय नीरजला देते. त्यामुळे माझं सिलेक्शन झालं नसलं तरी त्या प्रक्रियेतून खरं तर मला खूप काही मिळालं.’’
डिसेंबर 2014 मध्ये मानसीने नॅशनल लेव्हलवर खेळलेल्या तिच्या पहिल्या बॅडमिंटन टुर्नामेंटमध्ये सिल्व्हर मेडल मिळवले. ही स्पर्धा तिच्यासाठी स्पेशल होती, कारण तिला अर्जुन ॲवॉर्डविजेती पारुल परमारच्या विरुद्ध खेळण्याची संधी मिळाली होती. तिथूनच तिला स्पॅनिश पॅरा-बॅडमिंटन इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमध्ये खेळण्यासाठी निवडले गेले. पहिल्या इंटरनॅशनल लेव्हलच्या खेळाची तयारी करण्यासाठी ती आपली नोकरी सांभाळत, सोमवार ते शुक्रवार रोज दोन तास आणि शनिवार-रविवारी प्रत्येकी चार तास असा सराव करू लागली. यामध्ये ती पायाची ताकद, कोअर स्ट्रेंदनिंग, तोल सांभाळणे आणि समन्वय अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करून सराव करू लागली. योगा, श्वासांचे व्यायाम आणि मेडिटेशन हे तिच्या दिनक्रमाचा भाग होते. याबद्दल तिचं मत असं आहे की-
‘‘आपण आयुष्यात गोष्टी बॅलन्स करायला शिकणं गरजेचं आहे. आपल्या शरीराला नव्या गोष्टींशी जुळवून घ्यायला थोडा वेळ लागतो. माझ्याबाबतीत माझा कृत्रिम पाय जड व टाईट असल्याने शरीराला त्याच्याशी जुळवून घ्यायला लागणारा वेळ देणं महत्त्वाचं होतं. एकदा तुम्ही या गोष्टींशी जुळवून घेतलं की, मग तुमच्यासाठी त्याच गोष्टी फार सोप्या होऊन जातात. असंच काही तरी माझ्या बाबतीत झालं. कृतज्ञतापूर्वक हे सांगायला आवडेल की, माझ्या अवतीभवती अनेक लोक होते, ज्यांनी मला मदत केली. हे सगळे लोक अत्यंत संयमाने वागत होते.’’
मानसीचं हे म्हणणं केवळ कोणत्याही डिसेबल व्यक्तीसाठीच नव्हे, तर सर्वसामान्यांसाठीसुद्धा किती खरं आहे; नाही का? या स्पॅनिश टुर्नामेंटनंतर मानसी 2015 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या पॅरा-बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये खेळली. ही स्पर्धा तिच्या आणि तिचा पार्टनर राकेश पांडे याच्यासाठी खूप यादगार होती, कारण अनेक वर्ल्ड चॅम्पियन्सच्या विरुद्ध खेळण्याची संधी त्यांना मिळाली. यामुळे त्यांना स्वतःचे पोटॅन्शियल समजायला मदत झाली, वेगळ्या प्रकारचा खेळ बघायला मिळाल्याने आपण आपल्या खेळात काय बदल करायला हवेत, हेही त्यांना समजले.
त्यानंतर 2016 ते 2018 च्या दरम्यान विविध देशांमध्ये झालेल्या पॅरा-बॅडमिंटन स्पर्धेत मानसीने कांस्य पदकं मिळविली. नंतर मात्र पुढील तयारीसाठी मानसीने हैदराबाद येथे पी.गोपीचंद यांची ॲकॅडमी जॉईन केली. तिथेच पूर्ण वेळ बॅडमिंटनचा परिश्रमपूर्ण सराव आणि सिन्सिअरली ट्रेनिंग घेत मानसीने 2019 चे हे सुवर्णपदक मिळविले आहे. ती या स्पर्धेपूर्वी तिच्या ट्रेनरला म्हणाली होती, ‘‘मी या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कशी परफॉर्म करणार आहे, मला माहीत नाही; पण हा सगळा खेळाचा प्रवास मी एन्जॉय करते आहे.’’ यावर ट्रेनर तिला म्हणाले, ‘‘जर तू हा प्रवास एन्जॉय करत असशील, तर तू ऑलरेडी विनर आहेस.’’ सगळे तिच्यावर विश्वास ठेवून होते. तिला कल्पनासुद्धा नव्हती की, गोल्डमेडल ती जिंकेल. तिचा विश्वास केवळ ती कालपेक्षा आज कशी बेटर असेल, यावरच होता आणि हेच तिला पुढच्या आयुष्यात करायचे आहे, असे ती एका मुलाखतीत म्हणाली.
2019 च्या बीडब्ल्यूएफ पॅरा-बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मानसीने वर्ल्ड चॅम्पियन क्रमांक एक असलेल्या पारुल परमार या उत्तम पॅरा-बॅडमिंटनपटूला 21-12, 21-7 अशा गुणांनी हरवून सुवर्णपदक जिंकले. याबद्दल मानसी म्हणाली, ‘‘पारुल परमार इज बेस्ट! मॅच संपल्याबरोबर वय वर्ष 46 असणाऱ्या पारुलने येऊन माझे अभिनंदन केले. ती खूश होती की, तिला हरवणारं कुणी तरी तयार झालेलं आहे. पारुल परमार चॅम्पियन आहे, यात वादच नाही. ती आजही पहिल्या क्रमांकावर आहे. तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला अजून अनेक टुर्नामेंट खेळायच्या आहेत. त्यामुळे अजून तरी पारुल परमारची जागा मी घेऊ शकत नाही.’’
यापूर्वी पारुल परमार विरुद्ध तीन इंटरनॅशनल मॅचेस मानसी खेळली होती, मात्र तेव्हा ती जिंकली नव्हती. पारुल परमारकडून आपण खूप गोष्टी शिकलो, असे मानसीला वाटते. जसे की- खेळताना मनगटाचा योग्य वापर कसा करावा, कोर्टवरती व्यवस्थित मूव्हमेंट कशी करावी, बॅडमिंटनमध्ये सर्व्हिसचे महत्त्व किती आहे वगैरे.
‘खेळामुळे आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे’ असे म्हणणारी मानसी आपल्या क्षेत्राबद्दलसुद्धा तितकीच विचारशील आहे. Ordinary ME या नावे मानसी ब्लॉगही लिहित होती. आपल्या अपघाताबद्दल, उपचाराच्या उशिरा मिळालेल्या सुविधेबद्दल, शस्त्रक्रियेच्या प्रक्रियेबद्दल, त्यानंतर तिच्या आयुष्यात सुरू झालेल्या ‘इन्स्पिरेशन पॉर्न’बद्दल मानसी आपल्या ब्लॉगमध्ये अगदी ठळकपणे लिहिते. त्यासोबत आपले आवडते खेळ, खाद्य पदार्थ, छंद आणि नवनवीन प्रयत्न, करत असलेले ॲडव्हेंचर याबद्दलचे मानसीचे अनुभव वाचण्यासारखे आहेत.
पॅरा-ॲथलेटिक्स नेमके कोणत्या प्रकारचे चॅलेंजेस फेस करतात? आपल्या देशातल्या इतर विकलांग व्यक्तींसाठी कोणत्या आणि कशा संधी उपलब्ध होऊ शकतील, याबद्दल तिचे विचार स्पष्ट आणि अभ्यासपूर्ण आहेत. त्याबद्दल ती असं सांगते की, चालता येणे ही एक बेसिक गरज आहे, तो आपला जन्मसिद्ध हक्कसुद्धा आहे. तर, प्रोस्थेटिक्स (कृत्रिम अंग) वर जीएसटी का द्यावा लागतो? मानसीने जीएसटी काऊन्सिलला एका व्यासपीठावरून विनंती केली की, ‘व्हीलचेअर आणि प्रोस्थेटिक्स डिव्हायसेसवरून जीएसटी हटवण्यात यावा.’ याबद्दल ती पुढे समाजाला असे आवाहन करते की- ‘आपला देश टेक्नॉलॉजीमध्ये बऱ्यापैकी प्रगत झालेला आहे. आपण मंगळ ग्रह आणि चंद्रावर यान पाठवत आहोत. तर मग इंजिनिअर्स आणि टेक्निकल एक्सपर्ट्सनी नावीन्यपूर्ण टेक्नॉलॉजी तयार करत, अशा प्रोस्थेटिक डिव्हायसेसना अधिक पॉकेट फ्रेंडली बनवण्यासाठी का प्रयत्न करू नयेत? तसे झाले तर या सुविधा हजारो लोकांना स्वस्तात उपलब्ध होतील.’
हे सगळं स्पष्टपणे सांगणारी मानसी स्वतः प्रोस्थेटिक पायांचे दोन सेट वापरते. एक चालण्यासाठी, तर दुसरा खेळण्यासाठी. जो कृत्रिम पाय ती चालण्यासाठी वापरते, त्याची किंमत बावीस लाख रुपये आहे आणि दर पाच ते सहा वर्षांनंतर हा पाय बदलावा लागतो. जो कृत्रिम पाय ती खेळण्यासाठी वापरते, त्याची किंमतही चार ते पाच लाख रुपये असून त्याला गुडघा नसतो. त्यामुळे हा पाय वजनाने हलका असतो. हा पाय किती दिवस टिकेल, हे त्याच्या वापरावर अवलंबून असते. या क्षेत्रातील काही प्रश्नांबाबत मानसी सांगते,
‘‘आपल्या देशात सरकारकडून वर्षातून एकच टुर्नामेंट आयोजित केली जाते आणि रँकिंग मेंटेन करण्यासाठी अनेक मॅचेस खेळायला लागतात. या मॅचेस खेळण्यासाठी लागणारी तयारी, ट्रेनिंग, डायट आणि इतर गोष्टींसाठी भरपूर पैसे लागतात. रिओच्या 2016 च्या पॅराऑलिंपिकमध्ये भारतीय खेळाडूंना चार पदकं मिळाल्यानंतर पॅरा-स्पोर्टकडे सगळ्यांचे लक्ष अचानक वेधले गेले. यातून असं लक्षात येतं की, या क्षेत्रातले फार कमी खेळ आहेत, ज्यांच्याकडे लक्ष दिलं जातं. उदा. पॅरा-ॲथलेटिक, विकलांग-क्रिकेट, पॅरा-स्विमिंग वगैरे. अर्थातच, हे योग्य आहे. पण अजूनही पॅरा- बॅडमिंटनसारख्या खेळांकडे मात्र दुर्लक्ष आहे. आपल्या सरकारद्वारे अगदी तोकड्या आंतरराष्ट्रीय क्रिडास्पर्धा स्पॉन्सर केल्या जातात. आणि नंतर खेळाडूंना स्वतःच स्पॉन्सरर शोधावे लागतात.
सरकारने सर्व स्पोर्ट्सवर योग्य पद्धतीने पैसा वितरित केला, तर खेळाचा सराव बाजूला ठेवून स्पॉन्सररसोबत बैठका आणि इतर गोष्टींसाठी खेळाडूंना वेळ द्यावा लागणार नाही. त्याचबरोबर आपल्या क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या स्पर्धा अधिक आयोजित केल्या, तर या खेळाकडे अधिक लोकांना येण्याची संधी वाढते.’’
स्पॉन्सरशिपबद्दल मानसीचं मत आहे की, विविध ब्रँडस्मध्ये चर्चा सुरू असते की, त्यांच्या कन्झ्युमरला कसं प्रोत्साहित करता येईल. पॅरा-सपोर्ट हे कदाचित अजूनही कुणाचं लक्ष न गेलेलं एक मोठं मार्केट आहे. व्यवस्थित मार्केटिंग केले, तर पॅरा-सपोर्ट ही अनेक कंपन्यांसाठी बिझिनेस, समाधान आणि कन्झुमरला अनेक उत्तम प्रेरणादायी स्टोरीज् देणारी संधी आहे! सध्या मानसीचे लक्ष्य 2020 च्या टोकियो स्पर्धांकडे असले तरी वेळ मिळेल तेव्हा, ॲडव्हेंचर बियाँड द बॅरियर्स फाउंडेशन यांच्यासोबत स्कूबा डायव्हिंग, स्विमिंग आणि इतर ॲडव्हेंचर ती अनुभवत असते. नशीब, असमर्थता आणि अशक्यता या गोष्टींवर अजिबात विश्वास नसलेली मानसी जोशी खरंच स्वतःच्या आयुष्यात लहान-मोठे असामान्य निर्णय घेऊन ते पूर्णत्वास घेऊन जाणारी तुमच्या-आमच्यामधलीच एक सामान्य मुलगी आहे!
- दिपाली अवकाळे
deepaliawkale.25@gmail.com
(लेखिका स्वानुभव इंडिया ह्युमन डेव्हलपमेंट प्रा. लि. या संस्थेच्या संचालिका आहेत.)
Tags: व्यक्तिवेध दिपाली अवकाळे मानसी जोशी टाईम साप्ताहिक क्रीडा Deepali Awkale Manasi Joshi Time Magazine Sports Load More Tags
Add Comment