व्हाय युवर वाईफ इज इम्पॉरटेंट टू मी?

Photo Courtesy: gadgetnow.com

जागतिक महिला दिनानिमित्त अनेक घडामोडी आपल्या अवती-भोवती घडताना दिसतात. विविध लेख, कार्यक्रम, सिनेमा, नाटक इत्यादी मध्ये आपण कुठेतरी कळत नकळत स्वतःची कहाणी शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आपलं आयुष्य जितकं पर्सनल आहे असं आपल्याला वाटतं तितकंच ते युनिव्हर्सल असू शकतं. अशाच एका पर्सनल व्हॉट्सअप चॅटींगद्वारे, स्त्री-पुरुष किंवा कोणत्याही दोन व्यक्तींमध्ये असणाऱ्या नात्यात डोकावण्याची संधी देणारी ही नाटिका...

ती: "तुम्ही माझ्याशी बोलत आहात, हे तुमच्या बायकोला माहिती आहे का?"

तो: "नाही."

ती: "बरं, मग कधी सांगणार आहात?"

तो: "अरे, मला हे तिला सांगायचं नाहीये, असा अर्थ का घेतेस तू? अजून आपलीच ओळख होऊन एक महिना झाला आहे. सांगेल मी तिला निवांत."

ती: "ठीक आहे. पण मग तुम्ही व्हाट्सअप चे मेसेज का डिलीट केले?"

तो: "मला माहित नाही..."

ती: "बरं…"

(थोडावेळ शांतता)

तो: "बोल ना… काय झालं?" 

ती: "नाही, झालं काही नाही. पण थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं आहे."

तो: "कशाबद्दल?"

ती: "मलासुद्धा माहित नाही."
 
तो: "अरे यार! तू अजून त्याच विषयात आहेस का? डोन्ट वरी. मी हँडल करतो. माझी बायको नाही बघणार मेसेज."

ती: "आणि पाहिले तर…?"

(तो तिला एक स्क्रीनशॉट पाठवतो, ज्यात पूर्वीचा संपूर्ण चॅट डिलीट केलेला आहे असे दिसते करंट चे काही मेसेज दिसतात)

ती: "अरे बापरे हे काय!?"

तो: "काय झालं? इतकं काही विशेष नाहिये हे. ती माझा मोबाईल बघते आणि व्हाट्सअप मेसेजेससुद्धा वाचते… त्यामुळे मी मेसेजेस डिलीट केले. खरंतर मी तिला तुला भेटायला आणणार होतो पण राहून गेलं."

ती: "तिला भेटू एकदा नक्की प्लीज... मी किती सहज माझ्या नवऱ्याला घेऊन आले भेटायला. तुम्ही का इतकं बिचकता मग?"

तो: "अरे यार! तुला माहित नाही. साधं मैत्रीण आहे असं जरी सांगितलं तरी कटकट होऊन जाईल इथे. एखाद्या पुरुषाला, तो जरी नवरा आणि एका बाळाचा बाप असला तरी, एखादी मैत्रीण असू शकते यावर विश्वासच नाहीये तिचा."

ती: "मी तुमची भीती समजू शकते. मला ती पटत नसली तरी ती नाकारण्यासारखी नाहीये. कधी कधी मला प्रश्न पडतो की - एखादी व्यक्ती आपल्यासोबत आलेल्या दुसऱ्या व्यक्तीला ‘आहे तसं’ का नाही स्वीकारत? अजूनही आपल्या समाजात, नवऱ्याला मैत्रीण असावी की नसावी आणि बायकोला मित्र असावा की नसावा, या विषयांवर चर्चा करावी लागते. एक समाज म्हणून केवढा मोठं फेलियर आहे हे! या मुद्द्यावर भाषणबाजी करण्यापेक्षा हा मुद्दा मला समजून घ्यायलाच जास्त आवडेल. एकदा, मी या मुद्याच्या खूप खोलवर गेले तेव्हा मला तिथे काही गोष्टी सापडल्या ज्या महत्त्वाच्या आहेत आणि कदाचित या समस्येचं मूळ तिथे आहे…"

तो: "बापरे ! इतका विचार करून जगते तू? असं जमतं ठरवून जगायला?"

ती: "काय प्रॉब्लेम आहे न जमायला ? आणि किती दिवस असं अज्ञानात जगत राहायचं? मग ‘अडल्ट होणे’ म्हणजे दुसरं तरी काय असतं ? चिकित्सा करत विचारपूर्वक समजून घेऊन जगता यायला लागलं की आपण अडल्ट आहे असं समजू शकतो…"

तो: "ह्म्म्म... हम्म्म्म… असं पण असतं होय! मला तर वाटलं होतं की…. म्हणजे… आपण अडल्ट होतो म्हणजे…."

ती: "...म्हणजे आपल्याला फक्त सेक्स कळायला लागलं किंवा आपण सेक्स करायला लागलो की आपण अडल्ट होतो! हो ना? हा अत्यंत थुकरट अर्थ आहे! अडल्ट होण्याच्या प्रक्रियेत मी सांगितलेल्या गोष्टी पण येतात बरं का !"

तो: "अगदीच येतात. मी फक्त गंमत करत होतो. एक मिनिटं बहुतेक माझी बायको उठली आहे. काही वेळ अजिबात मेसेज करू नकोस. मी येऊन 'हाय' म्हणेल तेव्हाच मेसेज कर..."

ती: "ओके."

(काही वेळ ती विचार करत बसते… थोड्या वेळाने)

तो: "हाय! बोल आता."

(ती बराच वेळ रिप्लाय देत नाही.)

(तो खूप मेसेज करतो. 'हाय, हॅलो, झोपलीस का? बोलायचं नाहीये का? काय झालं? अरे यार!)
(साधारण तासाभराने ती रिप्लाय करते.)

ती: "बोला."

तो: " काय झालं? इतका वेळ कुठे होतीस? रिप्लाय का नाही दिला? तुझा नवरा झोपेतून उठला का?"

ती: "माझा नवरा जागीच आहे. तो त्याचं काहीतरी काम करतोय आणि मी त्याच्या शेजारी बसूनच बोलते आहे."

तो: "काय सांगते तू?? वेडी आहेस का? त्याने मेसेज पाहिले तर? मला काही प्रॉब्लेम नकोय हं... म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे, माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये काही प्रॉब्लेम व्हायला नको असं म्हणतोय मी."

ती: "आमच्यामध्ये कुणामुळेही कधीच प्रॉब्लेम होत नाही आणि जरी झाले तर ते आमच्या दोघांमुळेच होत असतात आणि त्याची पूर्ण जबाबदारी आम्ही दोघे घेत असतो. महत्त्वाचं म्हणजे आम्ही दोघे एकमेकांना अडल्ट प्रमाणे ट्रीट करण्याचा प्रयत्न करत असतो. उगीचच एकमेकांना बेबीइंग आणि बाबुइंग करणे आम्हाला पटत नाही. दोघेही समजदार आहोत आणि दोघांना आपापलं आयुष्य कसं जगायचं हे कळतं यावर आमचा विश्वास आहे. त्यामुळे लपून छपून काही करायची वेळ अजून तरी आलेली नाहीये. अर्थात आमचं नातं काही हे असं एका रात्रीत तयार झालेलं नाहीये. It was a process."

तो: "तू खरंच आता त्याच्या बाजूला बसून बोलतेस? म्हणजे, तू खरंच सांगत असशील पण मला पचायला थोडं जड जातंय हे. मला वाटतं की आपण आता नको बोलायला. उद्या तो नसेल तेव्हा बोलू. आता तुम्ही दोघे आराम करा."

ती: "तुम्हाला आराम करायचा असेल तर आपण बोलणं थांबवू शकतो. पण केवळ माझा नवरा आहे म्हणून आपण बोलणं थांबवणार असू तर असं काही करण्याची गरज नाहीये. तो समोर असला तरी आणि नसला तरी मी जशी आहे तसंच तुमच्याशी बोलणार आहे... आणि लपून-छपून बोलण्यासारखं काही नाहिये आपल्यात. सो?"

तो: "तू फार बोल्ड मुलगी आहेस आणि तुला खूप समजून घेणारा नवरा मिळालाय. पण आमच्यासारख्या सर्वसाधारण माणसांचं असं नसतं. आम्हाला भीती वाटते. त्यामुळे आता आपण नको बोलायला. आपण उद्या बोलूया इतकच मी सांगतोय…"

ती: (हसणारे स्माईली टाकत) "व्हॉट डू यु मिन बाय तू अशी आहेस आणि तुला असा समजदार वगैरे नवरा मिळाला आहे ? रिलेशनशिप इज नॉट अ मार्केट! कुणाला काहीतरी मिळायला…"

तो: "पण लग्न तर आहे ना! ते तर लॉटरी सारखं असतं. लग गई तो लग गई ! नाहीतर मग आमच्यासारखं ! लपूनछपून, चॅट डिलीट करत, आपलं जमेल तेवढं मनाप्रमाणे जगत राहायचं…"

ती: "सिरियसली? लग्न हे लॉटरी सारखा असतं? एंड यु बिलीव्ह इन धिस? आय डोंट बिलिव्ह इन धिस नॉनसेन्स! त्याउलट मला वाटतं की- नाती जपावीसुद्धा लागतात. आपण एकत्र येण्याचा निर्णय घेतो तेव्हा आपण कुठेतरी एकमेकांना काहीसं स्वीकारलेलं असतं. मात्र इतर काही गोष्टीना लक्षपुर्वक स्विकारायला आपण कधी कधी विसरतो... आपण हे समजायला विसरतो की ‘नोबडी इस परफेक्ट अँड स्टील एव्हरीबडी इज कम्प्लीट.’ अशा दोन इम्परफेक्ट लोकांना एकत्र येऊन कायमचं एकत्र राहयचं असतं आणि ‘हे सगळं’ म्हणजे लग्न! आणि ही काय सोपी गोष्ट नाहीये. भारतात किंवा इतर देशातही कदाचित, लोकं नातं या गोष्टीकडे ‘आपोआप घडणारी गोष्ट’ असं म्हणूनच बघत असतात…"

तो: (मधेच थांबवत) "...नातं ही आपोआपच घडणारी गोष्ट आहे… ती थोडी तशी ठरवून, रिसर्च करून मग बनवण्याची गोष्ट आहे ? त्यातली मजाच जाईल ना जर असं ठरवून नातं तयार केलं तर!"

ती: "हो. आय अग्री की नातं ही आपोआप घडणारी गोष्ट आहे पण ती आपोआप टिकणारी किंवा आपोआप सुदृढ होणारी गोष्ट नाही!  इट इज जस्ट लाईक अ न्यू बॉर्न बेबी! त्याची वेळ आली कि ते बाळ आपोआप आईच्या पोटातून बाहेर येतं. मात्र तेच बाळ सुदृढ राहायचं असेल तर वि नीड टू केअर फोर इट, राइट? ...आणि त्याच्या वाढीच्या टप्प्यात आपण त्याला जे काही फीड करतो- फिजिकली, मेंटली आणि सोशियली तसंच ते बाळ घडत जातं. पुढे एका ठराविक टप्प्यावर येऊन जेव्हा ते स्वतंत्र होतं तेव्हा ते बाळ कसं वागणार आहे, कसं जगणार आहे हे सगळं लहानपणी मिळालेल्या केअर आणि नरशमेंट वरून ठरत असतं. रिलेशनशिप्स आर अल्सो सेम लाईके देट…"

तो: "बापरे ! रात्री दोन वाजता इतक्या जड विषयावर तुझ्याशी बोलायचं म्हणजे चॅलेंजिंग आहे!"

ती: "...एंड यू लाईक चॅलेंजेस, असं तुम्ही पहिल्या भेटीत मला खुप स्टाईलमध्ये म्हणालेलं आठवतंय…"

तो: "हो, आवडतातच मला चॅलेंजेस. पण सगळे चॅलेंजेस पार करायला जमतीलंच असं नाही. मी फार साधारण माणूस आहे आणि माझ्यात सुधारणा करायला तुला खुप फार स्कोप आहे."

ती: "तुम्ही फार साधारण माणूस आहात आणि तुमच्यात सुधारणा करायला मला फार स्कोप आहे याचा अर्थ मला असा कळतो कि- मी असाधारण आहे किंवा कदाचित माणूसच नाही देवी वगैरे आहे आणि मला सगळं येतं. म्हणून आता मी तुमच्यात सुधारणा वगैरे करणार !! हे फार अनरिअलिस्टिक आणि व्यक्तिपूजे कडे जाणारं वाटत नाही का ?"

तो: "काय बोलू आता मी ? माझा प्रत्येक मुद्दा खोडून काढायचा, असे ठरवूनच ततू माझ्याशी चॅटिंग करते आहेस की काय असं मला आता वाटायला लागलं आहे."


ती: "ओह ! नो. नो. असा काहीही माझा हेतू नाही. आणि तसं जर होत असेल तर आय मस्ट से सॉरी. ऍक्च्युअली, मी आपल्यातल्या काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करते आहे आणि म्हणून कदाचित माझं बोलणं खूप क्लिष्ट वाटू शकतं."

(बराच वेळ तो रिप्लाय करत नाही. ती अस्वस्थ चेहरा असणारे स्मायली पाठवते. काही वेळाने तो रिप्लाय करतो.)

तो: "सॉरी. बायको उठली होती…"

(ती फक्त डोळे असलेला ब्लांक चेहरा असलेला स्माईली पाठवते.)

तो: "हो, आय नो पण आता लगेच तिला उठवून तर नाही ना सांगू शकत तुझ्याबद्दल! सांगेन जमेल तेव्हा आणि मी सांगितल्यावर तिने नाही समजून घेतलं तर ? 'आजपासून तिच्याशी बोलायचं नाही' असं बजावलं वगैरे तर… ? आय डोन्ट वॉन्ट टू लूज अ फ्रेंड लाईक यू… खुप काळानंतर मला समजून घेणारी आणि जिच्याशी मी मोकळेपणाने बोलू शकतो अशी व्यक्ती मला मिळाली आहे. अदर वाईज आय एम अ व्हेरी इंट्रोवर्ट पर्सन… यु नो ईट…"

ती: "मला इतकंच समजतं की खोटं बोलून आणि लपून-छपून केलेल्या गोष्टींनी नाती तुटतात. अशा भीतीच्या बेस वर उभी राहिलेली मैत्री किती दिवस टिकणार ? आय रिस्पेक्ट युवर वाइफ जरी मी तिला अजून भेटलेली नसली तरीसुद्धा !"
 
तो: "मी तिला कुठेही फसवत नाहीये. खरं सांगितल्यावर तीच मला समजून घेणार नाही मग मी तरी काय करायचं?"

ती: "तुमच्या ‘या’ जजमेंटल समस्येबद्दल 'तिच्याशी' संवाद साधायचा, माझ्याशी नाही."

तो: "प्रयत्न करेल. पण संवाद साधल्यामुळे जर काही बिघडलं आणि आपल्याला बोलण्यास तिने बंदी घातली तर मात्र याला तू जबाबदार असशील."

ती: (खूप मोठ्याने हसणारी स्माइली पाठवते) एक, संवादाने गोष्टी बिघडत नाही कधीच! आणि दोन, तुम्ही दोघं काय संवाद करता याची जबाबदारी माझी कशी असेल?"

तो: "तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाहीये. तू बोलण्यात कुणालाही न जिंकू देणारी मुलगी वाटतेस!"

ती: "अच्छा! गेल्या एक तासापासून अशा गप्पा करते म्हणून? आणि जर तुमची आणि तुमच्या बायकोची कोणतीही काळजी न करता, कोणताही विचार न करता, गेल्या तासाभरात नुसतं तुमच्या हो ला हो म्हणत काहीतरी उथळ फ्लिर्टिंग करत तुमच्या मेसेजेस मध्ये वाहवत गेली असती, तर मी तुम्हाला कशी मुलगी वाटली असती? आणि मग तुमची बायको तुम्हाला कशी मुलगी वाटते?"

(तो डोक्याला हात मारणारी स्माइली पठवतो)

ती: "हे बघा, आपली मैत्री तरच पुढे जाऊ शकेल जर तुम्ही माझी आणि तुमच्या बायकोची ओळख करून देणार असाल तर. कदाचित आपण त्यानंतरच बोलूय आता."
 
तो: "अरे यार! व्हाय इज माय वाइफ सो इम्पॉरटेंट टू यू?"

ती: "तुमची बायको नुसती तुमची शारीरक पार्टनर असती तर एकवेळ कदाचित मी 'तिला आपल्या मैत्रीबद्दल सांगायला हवे' याचा फार अट्टहास केला सुद्धा नसता पण... ती तुमच्या बाळाची आईसुद्धा आहे. नात्यात जेव्हा तुम्ही आई-वडील होण्याचा इतका मोठा निर्णय घेत असतात तेव्हा तो नात्याचा सर्वोच्च टप्पा असतो असं मी समजते. तुमचं नातं अत्यंत सुदृढ झालेलं आहे आणि म्हणून तुम्ही या टप्प्यापर्यंत पोहोचले आहे असा अर्थ मी तरी घेते. तुमच्या बायकोचा विचार नसला तर मी तुमच्या बाळाच्या आईचा विचार तरी नक्की करेन. बिकॉज, अ‍ॅज अ वुमन शी डिजर्वज् ऑल द रिस्पेक्ट फ्रॉम अनादर वुमन लाईक मी… बाय!"

- दिपाली अवकाळे
deepaliawkale.25@gmail.com

Tags: नाटिका दिपाली अवकाळे Short One Act Drama Deepali Awkale Load More Tags

Comments: Show All Comments

Haresh shelke

दिपाली मॅडम, खूप वाचनीय आणि विचारांच्या कक्षा रुंदावणारी अशी ही नाटिका आहे. खुपच सुंदर.

Bhagyashree Pethkar

दिपाली, खूप छान आणि पारदर्शक लिहिलंस.

Bhagyashree Pethkar

दिपाली, खूप छान आणि पारदर्शक लिहिलंस.

Manohar Dhondu Kajrolkar

खूप सुंदर..सुसंवाद - आवडत्या व्यक्ती बरोबर, तरीही आवश्यक नाती जपण्यासाठी आवश्यक विचारा पर्यंत जाण्यासाठी.

अभिजीत काळे

अप्रतिम! ह्याचा पुढील भाग कधी प्रकाशित होणार आहे?

मृणाल जोशी

अप्रतिम नाटिक !नाजूक विषय ,प्रत्येक व्यक्तीच्या मनातला -योग्य रितीने हाताळला जावा जेणेकरून अपेक्षित उत्तरं सापडतील नवीन भागाची उत्सुकता आहे

Shraddha Khaire

Woww... इतका नाजुक अन् किचकट वाटणारा point इतका छान मांडलाय... खुप सुंदर..

VINOD TUKARAM JADHAV

अप्रतिम संवाद आणि नाटीकेचा विषय ही सुंदर प्रत्येक पुरुषाला महिलेला लग्नानंतरही हवा असतो एक सोबती मन मोकळा करण्यासाठी ,कारण लग्नाचा जोडीदार हा चांगल्या विचारांचा असतोच असं नाही. आणि म्हणून शारिरीक सुखच महत्त्वाचा नाही तर मनाचं सुखही महत्त्वाचं असतं आणि म्हणून एक चांगला मित्र मैत्रीण असावी ,छान नाटिका

मदन शेलार

खूप आनंद वाटला हे श्रेय दिपाली च्य आई वडिलांना व सावित्रबार्इंना व फुले यांना द्यावस वाटत महाराष्ट्रात अशी माणसं होऊन गेली याचा अभिमान वाटला

SHIVAJI PITALEWAD

महिला संदर्भात लिहीताना बहुतांश मध्यमवर्गीय महिला डोळ्यासमोर ठेवल जात.पण खरी गरज आहे ग्रामीण/दिवसभर मोलमजुरी करणारी आणि संध्याकाळी घरी येवून बाळाला जन्म देणार्या स्त्रियांच्या संदर्भात लिहून वरच्या स्तरावरील स्त्री पुरूषांच्या जाणीवा वाढवण्याची

Shweta Rajendra Fuke

Atishay sunder... Tshya vicharanchya vyaktinsathi Atishy mhtvach ahe

Aman Mulla

विचाराना एक प्रगल्भ उंची देणारी नाटिका.

Vishal

कन्व्हेंशनल साहित्याच्या सीमा एक्सटेंड करणारा आणि कमी शब्दात ठोस मुद्दे मांडणारा लेख

sandhya chougule

मनातले लिहिलेय असं वाटलं

Vaishali Jamkar

खूप छान!!

Onkar N. Kumbhar

विचार प्रगल्भ करायला लावणारा लेख ( चँटिंग ). छान लेखन

हिंदूराव एस. पवार .

महिलादिनाच्या पूर्वसंधेला चांगली चर्चा ,

Add Comment