नानासाहेबांच्या मार्गदर्शनामुळेच मी समाजवादी चळवळीत सतत काम करत राहिलो...

माझ्या जीवनाचे शिल्पकार- भाग 2

स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तीन महान मूल्यांवर ज्यांचे जीवन अधिष्ठित होते, अशा नेत्यांनी व विचारवंतांनी माझ्यावर जे संस्कार केले; त्यामुळे मी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर समाजवादी चळवळीत काम केले. या नेत्यांचे जे लेखन मी वाचले आणि त्यांची जी भाषणे मी ऐकली, त्यांच्यामुळे माझे मन संवेदनशील झाले आणि समतेचा विचार माझ्या मनात रुजला. या थोर व्यक्तींच्या सहवासात माझ्या जीवनाची घडण कशी झाली आणि ते मला कसे दिसले, याचे निवेदन हा माझ्या आत्मकथनाचा केंद्रबिंदू आहे.- ग. प्र. प्रधान


नानासाहेब गोरे यांची पहिली ओळख मला त्यांच्या लेखनातून झाली. मी त्या वेळी इंग्रजी सहावीत (आताच्या दहावीत) होतो आणि पंडित जवाहरलाल नेहरूंच्या आत्मचरित्राचा नानासाहेब गोरे यांनी केलेला अनुवाद वाचल्यावर मी अतिशय प्रभावित झालो. जवाहरलालजींच्या त्या आत्मकथनामुळे मला स्वातंत्र्य चळवळीबद्दल आकर्षण वाटू लागले. त्या वयात मी मूळ इंग्रजी आत्मचरित्र वाचू शकलो नसतो, परंतु नानासाहेबांनी केलेल्या रसपूर्ण अनुवादामुळे माझा पंडित नेहरूंच्या समर्पित जीवनाशी व उदात्त विचारांशी परिचय झाला. स्वातंत्र्य चळवळीबद्दल माझ्या मनात संस्कारक्षम वयात जी ओढ निर्माण झाली, ती नानासाहेब गोरे यांच्यामुळे. मी त्या वयातही साहित्य आवडीने वाचत असे आणि पंडित नेहरूंच्या आत्मचरित्राचा तो अनुवाद साहित्य म्हणूनही सुंदर आहे, हे मला उत्कटपणे जाणवले.

पुढे 1938 मध्ये कॉलेजमध्ये प्रथम वर्षात असताना मी समाजवादी पक्षाच्या राजकीय अभ्यासवर्गाला जाऊ लागलो आणि तेथे माझी नानासाहेब गोरे यांच्याशी भेट झाली. मी ज्या वेळी त्यांना सांगितले की, त्यांनी केलेला पंडित नेहरूंच्या आत्मचरित्राचा मराठी अनुवाद मी दोन वर्षांपूर्वी वाचला होता आणि मला तो फार आवडला; तेव्हा नानासाहेबांनी प्रेमाने माझ्या पाठीवर थाप मारली आणि म्हणाले, ‘‘तू आता राजकीय वाचनही भरपूर केले पाहिजेस. मराठी आणि इंग्रजीतील ग्रंथ वाचले पाहिजेस.’ नानासाहेब गोरे यांच्या बोलण्यातील, लिहिण्यातील रेखीवपणा मला आवडत असे. हीच टापटीप त्यांच्या वागण्यात आणि पोषाखात होती. त्यांचा पांढराशुभ्र खादीचा पोषाख आणि विशेषत: ते त्या वेळी घालीत असलेली खादीची कोचदार टोपी चट्‌कन कोणाच्याही मनात भरत असे. मी पोषाखात व वागण्यात कमालीचा गबाळा असल्यामुळे नानासाहेब नेहमी माझी थट्टा करीत.

नानासाहेब आणि मी आमच्या समाजवादी पक्षाच्या ऑफिसमधून 1941 मध्ये संध्याकाळी घरी चाललो असताना, एका सबइन्स्पेक्टरने आणि दोन पोलिसांनी आम्हाला थांबवले. नानासाहेबांनी काही दिवसांपूर्वी गुलबर्गा येथे केलेल्या भाषणाबद्दल त्यांना अटक करण्याचे वॉरंट दाखवून तो सबइन्स्पेक्टर म्हणाला, ‘‘तुम्हाला आत्ताच फरासखान्यात आले पाहिजे.’’ मी एकदम गडबडून गेलो. परंतु नानासाहेब शांतपणे मला म्हणाले, ‘‘घरी जाऊन तू सुमतीबाईंना आणि शुभाला फरासखान्यात घेऊन ये. माझे कपडेही घेऊन ये. नंतर एस.एम.ला कळव.’’ मी त्याप्रमाणे नानासाहेबांच्या पत्नी सुमतीबाई आणि त्या वेळी लहान असलेल्या शुभाला टांग्यातून फरासखान्यात आणले. नानासाहेबांच्या धीरगंभीर वृत्तीचा माझ्यावर फार परिणाम झाला. नानासाहेब सुमतीबाईंना म्हणाले, ‘‘हा काही माझा पहिला तुरुंगवास नाही. चळवळीत पडल्यावर माझ्या आयुष्यात मला सगळं सोसावं लागणारच. माझी आणि तुझीही याला तयारी आहे. आई, अण्णा यांना धीर दे. तू, शुभा जपून राहा.’’

चले जाव आंदोलन 1942 मध्ये सुरू झाले, तेव्हा नानासाहेब गुलबर्गा तुरुंगातच होते. पुढे नोव्हेंबरमध्ये ते सुटले. त्यांच्यावर वॉरंट होतेच, परंतु गुलबर्गा जेलमधून सुटताच एका भूमिगत कार्यकर्त्याच्या मदतीने ते चट्‌कन निसटले. तिथून सोलापूर, मनमाड मार्गे ते मुंबईला पोहोचले. तेथे माधव लिमये त्यांना दादरला भेटला आणि नानासाहेब तिथून ताडदेवला भूमिगतांच्या निवासस्थानी येऊन पोहोचले. दुपारचा एक वाजला होता आणि एस्‌. एम्‌., मधू लिमये व साने गुरुजी नुकतेच जेवायला बसले होते. माधव लिमयेच्या पाठोपाठ नानासाहेब आत येताच, एस्‌. एम्‌. पानावरून उठून धावले आणि नानासाहेबांना मिठी मारून म्हणाले, ‘‘भले बहाद्दर! मला वाटले, तुला तुरुंगाच्या दारातच पकडणार.’’ साने गुरुजी म्हणाले, ‘‘आधी आमच्याबरोबर जेवायला बसा.’’

नानासाहेब म्हणाले, ‘‘दोन दिवस मला अंघोळ करायला मिळाली नाही. आधी मी अंघोळ उरकतो.’’ मधू लिमये नानासाहेबांना म्हणाला, ‘‘धुळ्यातल्या जेलरने साने गुरुजींना 9 ऑगस्टला पहाटे सोडले आणि म्हणून पोलीस वॉरंट घेऊन येण्याच्या आत ते निसटले आणि दोन दिवसांनी इथं आले. तुमचा जेलर तुमचा दोस्त होता का?’’ नानासाहेब म्हणाले, ‘‘मी निजामाच्या तुरुंगात होतो आणि मला ब्रिटिश हद्दीत पकडणार होते. सोलापूरच्या बाबा कुसूरकरने ही माहिती काढली आणि मी गुलबर्गा जेलमधून बाहेर पडताच त्याने मला चटकन एका मशिदीत नेले. तेथे ही टोपी मी घातली, कपडे बदलले आणि कसाबसा दोन दिवसांनी इथं पोहोचलो. दादरला तुम्हाला कोणी तरी भेटेल, असं बाबानं मला सांगितलं होतं. माधव दादर स्टेशनसमोरच्या हॉटेलजवळ उभाच होता.’’

मधू म्हणाला, ‘‘रावसाहेब पटवर्धनांना येरवड्यातून सोडल्यावर ते घरी गेले आणि पुन्हा लगेचच येरवड्यात त्यांची रवानगी झाली. तुम्ही बरे पुण्याला घरी उतरला नाही!’’ नानासाहेब म्हणाले, ‘‘मलाही रावसाहेबांसारखी घरची ओढ होतीच. पण दौंडहून मी मनमाडला गेलो. त्यामुळे मला वाटेत पुणं लागलंच नाही.’’

नानासाहेब गुलबर्गा तुरुंगातून सुटताच भूमिगत झाले, ही बातमी मला, माझ्या मित्रांना येरवडा तुरुंगात कळली तेव्हा आम्ही सर्व जण फार खूश झालो. त्या दिवशी संध्याकाळी सर्वांना हे समजले. तेव्हा रावसाहेब काहीशा खिन्नपणे नवलभाऊ फिरोदियांना म्हणाले, ‘‘मला नाही जमलं हे. माझा स्वभावच तसा नाही.’’

नानासाहेब गोरे पुढे काही महिन्यांनी मूषक महालातच साने गुरुजी, एस्‌. एम्‌. जोशी, शिरुभाऊ लिमये यांच्याबरोबर पकडले गेले. त्यांना काही दिवस आर्थर रोड तुरुंगात ठेवले होते. मी तेव्हा नुकताच सुटलो होतो. सुमतीबाईंनी नानासाहेबांसाठी दिलेले सामान घेऊन मी आर्थर रोड जेलवर गेलो. मला भेट नाकारण्यात आली. परंतु का कोण जाणे, मला जेल सुपरिटेंडेंन्टने ऑफिसात बसवले. थोड्या वेळाने नानासाहेबांना घेऊन जेलचा पोलीस तिथे आला. मला पाहून नानासाहेब चकितच झाले. सुपरिटेंडेंन्टने आम्हाला बोलायची परवानगी दिली नाही. पण ‘तुमचे हे सामान घ्या’ म्हणून त्याने कपडे, पुस्तके, फराळाचा डबा त्यांना दिला. नानासाहेबांनी आणि मी एकमेकांकडे पाहून हात उंचावला आणि जेलचा पोलीस त्यांना आत घेऊन गेला. माझ्या मनात भावनांचा कल्लोळ उठला. मी उदास मनाने जेलच्या बाहेर आलो.

नानासाहेबांना 1941 मध्ये रस्त्यात अटक झाल्यावर शिक्षा होऊन ते गुलबर्गा तुरुंगात गेले. तिथून सुटताच भूमिगत झाले, त्यांना पुन्हा अटक झाली. महाराष्ट्र कटाच्या खटल्यातले ते एक आरोपी होते, परंतु तो खटला उभा राहिलाच नाही. त्यांना येरवडा तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आले. अखेरीस 1945 च्या अखेरीस एस्‌. एम्‌. जोशी, नानासाहेब गोरे, शिरुभाऊ लिमये, बापू साळवी, बाबूराव चव्हाण, रामसिंग परदेशी, वसंत बापट, राम तेलंग, किशाभाऊ पटवर्धन, चिंतू गुप्ते, निळूभाऊ व हरि लिमये आदी आमच्या मित्रांची तुरुंगातून सुटका झाली. नानासाहेब गोरे साडेचार वर्षांनी घरी परत आले. 1941 मध्ये माझ्या कडेवर बसलेली शुभा आता शाळेत जायला लागली होती. तिने ज्या वेळी ‘नानाऽ’ म्हणून नानासाहेबांच्या गळ्याला मिठी मारली, तेव्हा सुमतीबाईंना हुंदका आवरला नाही.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही महिन्यांनी समाजवादी पक्ष काँग्रेसच्या बाहेर पडला आणि जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली नव्या जोमाने काम करू लागला. त्या वेळी ‘जनता’ हे इंग्रजी साप्ताहिक समाजवादी पक्षाचे अखिल भारतीय पातळीवरील मुखपत्र होते. महाराष्ट्रात समाजवादी पक्षाने ‘जनवाणी’ हे साप्ताहिक सुरू केले आणि नानासाहेब गोरे ‘जनवाणी’चे संपादक झाले. बुद्धिसागर हे सहसंपादक होते. मी त्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली जनवाणीत नियमाने लिहू लागलो. ‘जनता’ साप्ताहिकात अच्युतराव पटवर्धन आणि जयप्रकाश नारायण जे इंग्रजी लेख लिहीत, त्यांचे भाषांतर करण्याचे काम नानासाहेब माझ्यावर सोपवीत. मी केलेले भाषांतर ते काळजीपूर्वक तपासत असत. एकदा नानासाहेब मला म्हणाले, ‘‘तुझ्या लेखनाला खास मराठी वळण यायचे असेल, तर लो. टिळकांचे सर्व अग्रलेख काळजीपूर्वक वाच. तुझ्या लिहिण्याला इंग्रजी वळण असते, ते बदलले पाहिजे.’’ नानासाहेब तांबडी पेन्सिल घेऊन बसत आणि माझ्या लेखनात त्यांना आवश्यक वाटतील ते बदल करीत. अर्थांच्या छटांबद्दल नानासाहेब फार काटेकोर असत. मला ते एकदा म्हणाले, ‘‘बूर्झ्वा हा शब्द जयप्रकाशजींनी दोन ठिकाणी वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये वापरला आहे. तुझे भाषांतर चुकीचे नाही; पण जाणत्या वाचकाला त्यातली उणीव कळेल.’’ नानासाहेब म्हणत, ‘‘तू कोणाचेही अनुकरण करीत जाऊ नकोस. तुझ्या स्वभावाप्रमाणे तू साधे-सरळ लिहीत जा. शैलीचा डौल आणण्याचा अट्टहास सोडून दे.’’ 1946 पासून 1952 पर्यंत नानासाहेबांच्या हाताखाली काम करताना मी विषयाचा अभ्यास व सरळ शुद्ध लिहिणे यांबद्दलचे धडे घेतले आणि मला ते माझ्या लेखनात आयुष्यभर उपयोगी पडले.

नानासाहेबांच्या हाताखाली काम करताना त्यांच्या लेखनातील सामाजिक व आर्थिक समतेच्या आग्रही आणि खंबीर समर्थनाचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला. नानासाहेब गोरे यांनी समाजवादी कार्यकर्त्यांच्या एका शिबिरात भारताच्या राज्यघटनेवर दोन व्याख्याने दिली. या व्याख्यानात ते म्हणाले, ‘‘स्वातंत्र्य चळवळीत भाग घेताना आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या द्रष्टेपणाची कल्पना आली नव्हती; परंतु भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांनी जे कार्य केले, त्यामुळे त्यांचे मोठेपण आम्हाला उमगले. राजेशाहीने आणि सरंजामी प्रवृत्तीने ग्रासलेल्या भारतात ‘आम्ही भारताचे नागरिक ही घटना स्वत:ला अर्पण करीत आहोत’, हे शब्द क्रांतिकारक आहेत, हे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.’’ नानासाहेबांनी घटनेच्या सरनाम्यावर केलेले भाषण अविस्मरणीय होते. समता या संकल्पनेचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय आशय समजून सांगितल्यावर नानासाहेब म्हणाले, ‘‘आपण आज भारतात एका विसंगतिपूर्ण परिस्थितीत जगतो आहोत. कारण राजकीय जीवनात आपण लोकशाहीचा म्हणजेच समतेच्या मूल्याचा स्वीकार करीत असलो, तरी भारतात जोपर्यंत तीव्र सामाजिक व आर्थिक विषमता आहे तोपर्यंत ही लोकशाही यशस्वी होणे शक्य नाही, हे बाबासाहेबांचे उद्‌गार आपण लक्षात ठेवले पाहिजेत.’’ सामाजिक आणि आर्थिक विषमतेचे निर्मूलन करणे हे भारताच्या भविष्याच्या दृष्टीने कसे आवश्यक आहे, हे नानासाहेबांनी विस्ताराने सांगितले. माझ्या विचारांना योग्य वळण देणाऱ्या नानासाहेबांच्या या मार्गदर्शनामुळेच मी समाजवादी चळवळीत सतत काम करीत राहिलो.

ठाणे जिल्ह्यातील आदिवासींना, गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तेथील तडफदार समाजवादी कार्यकर्ते दत्ता ताम्हणे यांच्या नेतृत्वाखाली सतत लढे चालू असत. नानासाहेबांना या लढ्यांचा, तेथील सत्याग्रहांचा फार अभिमान वाटत असे. महाराष्ट्रातील संस्थानांतील कार्यकर्त्यांच्या एका सत्याग्रहाचे नेतृत्व 1946 मध्ये करून नानासाहेबांनी तुरुंगवास भोगला होता. त्या वेळी तुरुंगात नानासाहेबांनी या कार्यकर्त्यांची जी बौद्धिके घेतली, त्यामधून प्रेरणा घेऊन जयानंद ठाकूर, नाईक आदी पंचवीस कार्यकर्ते समाजवादी चळवळीत सामील झाले.

डॉ. लोहियांच्या नेतृत्वाखाली 1946 मध्ये सुरू झालेला गोव्यातील स्वातंत्र्यसंग्राम 1954 मध्ये पुन्हा सुरू झाला. तेव्हा या संग्रामाला मदत करण्यासाठी नानासाहेब गोरे, शिरुभाऊ लिमये, मधू लिमये, जगन्नाथराव जोशी आदींनी सत्याग्रह केला आणि त्यांना दहा-बारा वर्षे अशा शिक्षा झाल्यानंतर आग्वादच्या तुरुंगात ठेवण्यात आले. त्या वेळी माझा नानासाहेबांशी नियमाने पत्रव्यवहार असे. माझ्या प्रत्ययास 1941 मध्ये आलेली धीरगंभीर वृत्तीच त्यांच्या पत्रांतून जाणवत असे. ज्या दिवशी नानासाहेबांना शिक्षा झाल्याची बातमी आली, त्या दिवशी एस्‌. एम्‌. जोशींबरोबर मी नानासाहेबांच्या आई-वडिलांना भेटायला गेलो. मी फार अस्वस्थ झालो होतो, कारण नानासाहेबांच्या आईच्या डोळ्यांना एकसारखे पाणी येत होते. एस्‌. एम्‌. काही धीर देणारे शब्द बोलले, तेव्हा वार्धक्याने थकलेले नानासाहेबांचे वडील -अण्णा- कापऱ्या आवाजात म्हणाले, ‘‘मी हिला सांगतो- आपलं आता काशीयात्रेला जाण्याचं वय. पण आपल्याऐवजी नानू काशीला गेलाय, असं समज. येईल परत केव्हा तरी.’’ मी हे उद्‌गार ऐकून स्तिमितच झालो. नानासाहेबांच्या कणखरपणाचे उगमस्थान मला दिसले. परत येताना एस्‌. एम्‌. मला म्हणाले, ‘‘ही जुनी माणसं खंबीर असतात. आपल्या वसंत बापटनं कवितेत म्हटलंय ना तसं-

 ‘वारा खात गारा खात बाभूळझाड उभेच आहे...’

पुढे नानासाहेब सुटून आले. तेव्हा शनिवारवाड्यावरील सभेत बोलताना म्हणाले, ‘‘आम्ही सुटून आलो, परंतु सुधाताई जोशी अद्याप तुरुंगात आहेत. त्यांना मागे ठेवून मी आलो. महादेवशास्त्री जोशींना काय सांगावं, मला सुचत नाही.’’

नानासाहेब 1957 च्या निवडणुकीत पुण्यातून लोकसभेसाठी संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे उभे होते, तेव्हा मी त्यांचा निवडणूक-प्रतिनिधी होतो. त्या चुरशीच्या निवडणुकीत नानासाहेब लोकसभेवर आणि एस्‌. एम्‌. जोशी विधानसभेवर निवडून गेले. संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे आम्ही पुण्यात विजयोत्सव साजरा केला.

मी कॉलेजमध्ये 20 वर्षे अध्यापन केल्यानंतर नानासाहेब गोरे आणि नाथ पै मला म्हणाले, ‘‘तू आता समाजवादी पक्षाचे सर्व वेळ काम करायला ये.’’ माझ्या मनात ती ऊर्मी होतीच. माझी पत्नी डॉक्टर झाल्यामुळे परिस्थितीही अनुकूल होती. त्यामुळे मी प्राध्यापकपदाचा राजीनामा देऊन सर्व वेळ समाजवादी पक्षाचे काम करू लागलो. पुढे एका वर्षानंतर पदवीधर मतदारसंघाची विधान परिषदेसाठी होणारी निवडणूक आली. माझ्या मनात निवडणूक लढण्याचा विचारही नव्हता. साठे म्हणून माझे एक मित्र निवडणूक लढायला उत्सुक होते. नानासाहेबांचा पाठिंबा मागण्यासाठी जाताना त्यांनी मला बरोबर घेतले. नानासाहेबांनी साठे यांना ‘याबाबतचा निर्णय समाजवादी पक्षाची कार्यकारिणी घेईल’ असे सांगितले आणि मला थांबण्यास सांगितले. साठे गेल्यानंतर नानासाहेब हसत मला म्हणाले, ‘‘प्रधान, तू शहाणाच आहेस. आम्ही तुला उभे करायचा निर्णय घेतला आहे. तुला साठ्यांचे नाव सुचवण्याचे कारणच काय? आम्ही तुमचे लग्न करायला निघालो आणि तुम्ही दुसऱ्याची पानसुपारी वाटायला निघालात!’’ मी चकितच झालो. नानासाहेब म्हणाले, ‘‘तू पुणे विद्यापीठात कार्यकारिणीत काम केले आहेस. कॉलेजमध्ये 20 वर्षे शिकवले आहेस. तुझे विद्यार्थी तुला पाठिंबा देतील याची मला खात्री आहे.’’ नानासाहेब गोरे यांच्या आदेशाप्रमाणे मी उभा राहिलो आणि निवडून आलो. अशा रीतीने विधान परिषदेतील माझ्या कामाची सुरुवात नानासाहेबांमुळे झाली. पुढे 1980 मध्ये मी विरोधी पक्षनेता झाल्यावर एस्‌. एम्‌. जोशी व नानासाहेब मुंबईला माझ्याकडे आले. त्या वेळी नानासाहेब एस्‌. एम्‌.ना म्हणाले, ‘‘प्रधान 1966 मध्ये उभा राहायला तयार नव्हता. माझे त्या वेळी ऐकले; पुढे काम केले म्हणून तीन वेळा निवडून आला आणि आता विरोधी पक्षनेता झालाय.’’

यापुढे निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय 1983 मध्ये मी घेतला आणि आमच्या पक्षाचे त्या वेळचे प्रांताध्यक्ष राजारामबापू पाटील यांना माझा निर्णय कळवला. तेव्हा ते फार रागावले. ते म्हणाले, ‘‘तुम्हाला असा निर्णय घेता येणार नाही. आपल्या पक्षाची सीट जाऊन चालणार नाही. तुम्हाला उभे राहावेच लागेल.’’ परंतु मी पुन्हा उभे राहण्याचे नाकारले. तेव्हा राजारामबापू म्हणाले, ‘‘प्रधान, नानासाहेब गोरे हे आपले सुप्रीम कोर्ट. तू तुझी बाजू मांड, मी माझी मांडतो. नानासाहेब देतील तो निर्णय आपण दोघेही मान्य करू.’’

त्याप्रमाणे आम्ही नानासाहेब गोरे यांच्याकडे गेलो. राजारामबापूंनी त्यांची भूमिका मांडली. त्यानंतर मी म्हणालो, ‘‘नानासाहेब, मी 18 वर्षे विधान परिषदेत काम केले. आता मला काही पुस्तके लिहायची आहेत. साने गुरुजींच्या ‘साधना’साठी थोडे लेखन करायचे आहे. साने गुरुजींबरोबर मी 1942 मध्ये तुरुंगात होतो. मला थोडे तरी गुरुऋण फेडायची संधी द्या.’’ नानासाहेब गोरे राजारामबापूंना म्हणाले, ‘‘प्रधानच्या मनाची ओढ तुम्ही समजून घ्या आणि त्याला विधान परिषदेतून निवृत्त व्हायला परवानगी द्या.’’ बापूंनी ते मान्य केले. अशा रीतीने विधान परिषदेतील माझ्या कामाची सुरुवात आणि शेवटही नानासाहेबांमुळे झाला.

विधान परिषदेतून मी निवृत्त झाल्यानंतर नानासाहेब गोरे ‘साधना’च्या संपादकपदावरून निवृत्त झाले आणि त्यांच्या जागी वसंत बापट हे संपादक झाले. मी सहसंपादक म्हणून काम करू लागलो. एका वर्षाने एस्‌. एम्‌. व नानासाहेब यांना वसंत बापट म्हणाले, ‘‘प्रधान आणि मी बरोबरीचे. त्याला माझ्याबरोबर साधनाचा संपादक करा.’’ त्यानंतर एस्‌. एम्‌. आणि नानासाहेबांनी मला बोलावले आणि नानासाहेब म्हणाले, ‘‘साधना हे कोणत्याही राजकीय पक्षाचे मुखपत्र नाही. ते स्वायत्त आहे. ‘साधना’च्या संपादकाचे स्थान स्वतंत्र आहे. तू संपादक असताना आजच्या जनता दलाच्या भूमिकेवर टीका केलीस, तर तू जनता दलाचा एक पदाधिकारी असल्यामुळे पक्ष तुला जाब विचारेल. आम्हाला हे मान्य नाही. तुला ‘साधना’चा संपादक व्हायचे असेल, तर तुला पक्षाचा पदाधिकारी राहता येणार नाही. तू विचार करून काय ते ठरव.’’ मी जनता दलाच्या कार्यकारिणीचा राजीनामा दिला आणि नंतरच बापटांच्या बरोबरीने माझ्यावर संपादकपदाची जबाबदारी टाकण्यात आली. एस्‌. एम्‌. जोशी आणि नानासाहेब गोरे हे दोघेही माझे राजकीय गुरू; ते पत्रकारितेतील नीतिमूल्ये कशी जपत होते, याचा मला प्रत्यय आला.

नानासाहेब गोरे यांनी धकाधकीच्या राजकीय जीवनातही उत्कृष्ट ललित लेखन केले. गुलबर्ग्याच्या तुरुंगातील अनुभवांचे ‘कारागृहाच्या भिंती’ हे त्यांचे पहिले पुस्तक. नानासाहेबांचा ‘सीतेचे पोहे’ हा कथासंग्रह आणि ‘डाली’ हा ललित लेखांचा संग्रह ही मराठी साहित्याची भूषणे आहेत. त्यांनी नवसाक्षरांसाठी ‘मुरारीचे साळगाव’ हे सुंदर पुस्तक लिहिले. त्यांनी शुभाला लिहिलेली पत्रे साने गुरुजींच्या ‘सुंदर पत्रां’सारखीच विलोभनीय आहेत. नानासाहेबांना मराठीतील एक शैलीकार लेखक म्हणून मान्यता मिळाली. माझी ‘साता उत्तरांची कहाणी’ ही राजकीय कादंबरी त्यांच्या हस्ते प्रसिद्ध झाली, तेव्हा मला धन्यता वाटली.

नानासाहेब गोरे त्यांच्या भाषणांतून आणि लेखांतून समतेचा विचार हिरीरीने मांडीत असत. तो विचार केवळ आर्थिक समतेचा नव्हता. हिंदू धर्मातील चातुर्वर्ण्यामुळे समाजाच्या चिरफळ्या झाल्या, असंख्य लोक ज्ञानापासून वंचित राहिले आणि दलितांना अस्पृश्य मानून आपण त्यांच्यावर घोर अन्याय केला- असे नानासाहेब सतत सांगत आणि लिहीत असत. आगरकरांच्या विचारांचा नानासाहेबांवर मोठा प्रभाव होता आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे या क्रियावान विचारवंताबद्दल त्यांच्या मनात नितांत आदर होता. ते मला एकदा म्हणाले, ‘‘स्वत:च्या कुटुंबासह हरिजन वस्तीत राहायला जाणे, तिथल्या मुलांची स्वच्छता करणे, त्यांना शिकवणे हे अद्वितीय आहे. माझ्या हातून हे घडले नाही, हे मला कबूलच केले पाहिजे.’’ एकदा ते म्हणाले, ‘‘तू फर्ग्युसनमध्ये शिकवलेस, तुला तुझ्या कॉलेजचा अभिमान आहे; परंतु टिळक-आगरकरांनी सुरू केलेला ज्ञानाचा प्रवाह तुमच्या कॉलेजने, डेक्कन एज्युकेशन सोसायटीने ग्रामीण भागात नेला नाही, हे विसरून चालणार नाही. हे मोठे काम कर्मवीर भाऊराव पाटील यांनी प्रथम केले. ते खरे महात्मा फुल्यांचे वारस होते. स्वत:ला सत्यशोधक म्हणवणारे आणि ब्रिटिशांच्या रावसाहेब, रावबहादूर पदव्या घेणारे हे खरे सत्यशोधक नव्हेत.’’

सन 1946 पासून नानासाहेबांबरोबर काम करताना असे त्यांचे विचार मला सतत ऐकायला मिळाले आणि माझ्याही विचारांना योग्य दिशा मिळाली. असे असले तरी, मी नानासाहेबांसारखा निखळ बुद्धिवादी होऊ शकलो नाही, हे मात्र मला मान्य केले पाहिजे.

नानासाहेब गोरे हे खरे बुद्धिवादी होते. ‘तिमिरातुनी तेजाकडे’ या त्यांच्या विस्तृत लेखातून त्यांची सामाजिक समतेची भूमिका स्पष्ट झाली आहे. ही भूमिका परखडपणे मांडल्यामुळे नानासाहेबांना उत्तरायुष्यात खूप अप्रियता सहन करावी लागली. कडव्या सनातनी वृत्तीच्या हिंदुत्ववाद्यांकडून त्यांना अभद्र पत्रे येत, फोनवरून धमक्या दिल्या जात; परंतु ते कधीही विचलित झाले नाहीत. ते एकदा मला म्हणाले, ‘‘या आपल्या सनातनी पुण्याने महात्मा फुले, आगरकर यांचा जो छळ केला तसाच थोडा माझ्या वाट्याला आला, यामुळे मला धन्यता वाटते.’’

एस्‌. एम्‌. जोशींचे निधन झाले, तेव्हा नानासाहेबांच्या शेजारीच मी उभा होतो. नानासाहेबांच्या भावनांचा उद्रेक मला कधीही दिसला नव्हता. पण आयुष्यभराच्या मित्राच्या निधनाच्या वेळी त्यांच्या मनाची जी कालवाकालव झाली, ती मात्र मला तीव्रतेने जाणवली.

- ग. प्र. प्रधान


वाचा: ना. ग. गोरे यांचा तिमिरातून तेजाकडे हा लेख


साधना प्रकाशनाकडून आलेली ग. प्र. प्रधान यांची तीन महत्त्वपूर्ण पुस्तके साधना मिडिया सेंटरसोबतच Amazon वरही उपलब्ध असून ती खरेदी करण्यासाठी क्लिक करा :

माझी वाटचाल 

स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत

लोकमान्य टिळक - पेपरबॅक  हार्डकवर

Tags: ग. प्र. प्रधान जन्मशताब्दी नानासाहेब गोरे माझी वाटचाल माझ्या जीवनाचे शिल्पकार G. P. Pradhan Nanasaheb Gore Majhi vatchal Majhya jivanache shilpkar Load More Tags

Comments:

पांडूरंग आत्माराम थोरात

श्री प्रधान सरांनी अत्यंत आत्मियतेने नानासाहेबांच्या सहवासातील दिवस वर्णन केले आहेत. मुळ ग्रंथ वाचण्याची तीव्र इच्छा निर्माण होते. उपलब्ध करून दिल्याबद्दल कर्तव्य साधनास धन्यवाद.

विष्णू दाते

नानासाहेब गोर्यांचा धिरोदात्तपण त्यांचे ज्वलंत विचार, खूप सुंदरपणे प्रधानसरांनी मांडले आहेत!

Add Comment