प्रधान विचार 

ग. प्र. प्रधान यांच्या जन्मशताब्दी समाप्तीनिमित्ताने...

स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणारा स्वातंत्र्य सैनिक, राष्ट्र सेवा दल व समाजवादी चळवळीत बौद्धिके घेणारा अभ्यासू कार्यकर्ता, फर्ग्युसन महाविद्यालयातील इंग्रजीचे नामवंत प्राध्यापक, व्यासंगी वक्ते, उत्तम लेखक, विधान परिषदेतील प्रभावी आमदार व विरोधी पक्षनेते, साने गुरुजींच्या ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष- अशा विविध रूपांनी प्रा. ग. प्र. प्रधान अवघ्या महाराष्ट्राला परिचित होते. 2007 मध्ये समीर शिपूरकर यांच्या संकल्पनेतून 'प्रधान विचार प्रधान चरित्र' या नावाने प्रधान सरांवरील माहितीपटाची निर्मिती झाली. त्या माहितीपटाच्या पहिल्या भागात (प्रधान विचार) प्रधान सरांनी लोकशाही समाजवादी चळवळीचं मूल्यमापन केलेलं आहे. 26 ऑगस्ट 2022ला प्रधान सरांचे जन्मशताब्दी वर्ष संपत आहे. त्यानिमित्ताने त्या माहितीपटाच्या पहिल्या भागाचे हे शब्दांकन.. 

21व्या शतकातलं हे पहिलं दशक. मूल्यांच्या सार्वत्रिक पडझडीचा काळ म्हणून हा काळ ओळखला जातो. अस्वस्थता, विस्कळीतपणा, संशय, संभ्रम, तुटलेपण ही या काळाची वैशिष्ट्यं मानली जावीत अशी परिस्थिती आहे. ‘बाजार’ आणि ‘नफा’ म्हणजेच ‘यश’ आणि ‘माहिती’ म्हणजेच ‘ज्ञान’ असं आज बिनदिक्कत मानलं जाऊ लागलंय. रोजच्या नवनव्या बदलांना तोंड देताना माणसं थकून जातायत; ‘नांगर कुठे टाकावा’, हे न कळून बेचैन होतायत. आदर्शांचे जुने समज बदलत चाललेयत, पण हवे असूनही नवे आदर्श सापडत नाहीयेत. मोठेपण मोजण्याच्या फूटपट्‌ट्याही छोट्या होत चालल्या आहेत. माणसांचा एकंदर वकुब कमी होत चाललाय आणि कामंही चिमुकली होत चाललीयेत. आचार आणि विचार एकच असतील, असा माणूस सापडणं कठीण होत चाललंय. अशा या अवघड काळात एक स्वच्छ माणूस अजूनही कार्यरत आहे - प्राध्यापक ग. प्र. प्रधान!

प्राध्यापक प्रधान हे समाजवादी विचारवंत आणि स्वातंत्र्यसेनानी म्हणून ओळखले जातात, पण ही तर नुसती तोंडओळख झाली! शिक्षक, प्राध्यापक, लेखक, संपादक, वक्ते, कार्यकर्ते, सक्रिय राजकारणी, आमदार, विरोधी पक्षनेता, जागतिक साहित्याचा अभ्यासक अशा अनेक भूमिकांमधून प्रधान सरांनी स्वत:ला प्रवाही ठेवलंय. या पलीकडची त्यांची सगळ्यात महत्त्वाची ओळख म्हणजे, त्यांचं नितळ आणि पारदर्शी माणूसपण! असं हे व्यक्तिमत्त्व! विचारी, पण रसरशीत; भावोत्कट, पण संयमी; अत्यंत प्रांजळ, पण या प्रांजळपणाची जाण असलेलं; आताच्या व्याख्येप्रमाणे अव्यवहारी, पण अविवेकी नव्हे; नम्रतासुद्धा वरवरची नाही, खरोखरची; आतून आलेली; माणसांमध्ये रमणारा, पण व्यासंगी स्वभाव; निरागस चेहऱ्यामागे दडलेला मिश्कीलपणा; साहित्याचे अभ्यासक असूनही आचरणात कृतिशीलतेवर भर; स्वभावाने मृदू, पण सात्त्विक संतापही तितकाच; अनेक क्षेत्रांमध्ये काम करणारे, पण नव्या माणसांना जागा मोकळी करून देणारे; पक्के समाजवादी, पण इतर विचारांच्या अस्तित्वाला मान देणारे...

प्रधान सरांचा जन्म 1922 सालचा. 1942च्या चळवळीत त्यांनी तुरुंगवास पत्कराला. नंतरची दोन वर्षं ते शिक्षक आणि पुढची 20 वर्षं फर्ग्युसनमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक होते. याच काळात ते पुणे विद्यापीठाच्या सिनेटवरही होते. 1966 पासून 1984 पर्यंत ते विधानपरिषदेचे आमदार होते. नंतर राजकारणातून निवृत्ती घेऊन 1998 पर्यंत त्यांनी साधनेचं संपादक पद सांभाळलं. या सगळ्या काळात ते राष्ट्रदलाच्या कामात पूर्णपणे सहभागी होते. लेखन, चिंतन आणि देशभर अभ्यासदौरे आणि मदतदौरे करणाऱ्या प्रधान सरांनी प्रत्येक ठिकाणी ठोस भूमिका घेतली; महाराष्ट्रामधल्या अनेक संस्थांच्या उभारणीमध्ये त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं; सामाजिक चळवळींमध्ये थेट सहभाग घेतला. समतावादी विचारांचा पाठपुरावा करणारा राजकारणी म्हणून त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडली; सामान्य लोकांचे छोटे छोटे प्रश्न सोडवतानाही कमीपणा मानला नाही.

प्रधान सर एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते. दुसऱ्या वर्गातले विद्यार्थीसुद्धा त्यांच्या वर्गात येऊन बसायचे, असं त्यांचं शिकवणं होतं. त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि उत्कटपणे शिकवण्यामुळे अनेक विद्यार्थी घडले. त्यांनी शिकवलेल्या शेक्सपिअर आणि डिकन्सची आठवण अजूनही काढली जाते. पुणे विद्यापीठातल्या सिनेटवर असतानासुद्धा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

प्रधान सरांनी चाळीसेक पुस्तकांचं लिखाण करताना अनेक लेखनशैली हाताळल्या. ‘साता उत्तराची कहाणी’ या पुस्तकातला परकायाप्रवेश, टॉलस्टॉयला पत्रं लिहिणं, डॉ. आंबेडकरांची मुलाखत घेणं, याचबरोबर आपली मानलेली नात शिवानी हिला साने गुरुजींसारखी सुंदर पत्रं लिहिणं... त्यांनी लिहिलेली व्यक्तिचरित्रं मुळातूनच वाचण्यासारखी आहेत. महत्त्वाचं काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांवर त्यांनी मोकळेपणाने लिखाण केलं आणि सरांचं लिखाण अजूनही सुरूच आहे.

आपला प्रपंच आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत ही सगळी कामं त्यांनी केली आणि वेळ आली तेव्हा या साऱ्यातून ते प्रयत्नपूर्वक बाजूलाही झाले. उतारवयातल्या व्याधी आणि एकटेपण यांवर मात करत राहणारा विलक्षण ताकदीचा हा साधासुधा निर्मळ माणूस! बोलणं इतकं सरळ की, आयुष्यभर याने इतकं काम केलं, याचा थांगपत्ताही आपल्याला लागणार नाही; आणि या माणसाला त्या गोष्टीशी काही देणंघेणंही नाही.

त्यांनी एका पत्रात लिहिलंय, ‘जीवन निरर्थक वाटावं, अशा क्षणांना सामोरं जायला मोठी ताकद लागते. ती माझ्याजवळ नाही. म्हणूनच जीवन अर्थपूर्ण आहे, असं वाटायला लावणाऱ्या क्षणांच्या मागे मी जीवाच्या आकान्ताने धावत असतो’. असा हा माणूस जेव्हा मागं वळून बघतो आणि स्वत:च्या वैचारिक प्रवासाबाबत सांगतो, तेव्हा ती कहाणी केवळ त्याच्या भूतकाळाची न राहता आपल्याला भविष्यकाळासाठी ऊर्जा देणारा एक सामाजिक दस्तऐवज बनते.


हेही वाचा : माहितीपटाच्या निमित्ताने... - समीर शिपूरकर 


गेल्या 25 वर्षांत आपलं समाजजीवन मुळी आमूलाग्र बदलून गेलं आहे. या जीवनात, विशेषत: तंत्रविज्ञानाच्या क्षेत्रात जी क्रांती झाली, त्याचे फार दूरगामी परिणाम झालेले आहेत. पूर्वी मध्यमवर्ग सर्व पुरोगामी चळवळींचं नेतृत्व करत होता. आता त्या मध्यमवर्गाचं रूपच पालटलेलं आहे. आपल्या देशात लोकमान्य टिळक, नामदार गोखले, महात्मा गांधी यांच्यापासून ते जयप्रकाश नारायण आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची आमची पिढी यांच्या कार्यकाळात झालेल्या प्रत्येक चळवळीत - मग राजकीय चळवळ असो, ट्रेड युनियन चळवळ असो, शेतकऱ्यांचं आंदोलन असो, महिलांचं आंदोलन असो - मध्यमवर्गातली तरुण मुलं झपाट्याने पुढं येत होती. मात्र या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे मध्यमवर्गाच्या जीवनात प्रचंड फरक पडला आणि त्याला अगदी अनपेक्षित सधनता प्राप्त झाली. त्यामुळे या वर्गाने गरिबांशी असलेली नाळच तोडून टाकली; पुरोगामी चळवळीशी असलेलं नातंच तोडून टाकलं आणि आता तो धनवंतांच्या गटामध्ये सामील झाला आहे. यामुळे सामाजिक जीवनात फार बदल झाला आहे, असं मला वाटतं.

‘‘दुसरं मला वाटतं की, पूर्वीपेक्षा आता विषमता तीव्र झाली आहे. म्हणजे एका टोकाला लोकांकडे अब्जावधी-कोट्यवधी रुपये आहेत आणि दुसऱ्या टोकाला कोट्यवधी लोकांचं दिवसाचं उत्पन्न 20 रुपये असल्याचं नुकतंच जाहीर झालेलं आहे. आणखी एका गोष्ट म्हणजे, आम्ही ज्या कालखंडात जगलो, त्या कालखंडातला ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध दिलेला लढा असो, भांडवलदारांविरुद्ध कम्युनिस्ट-सोशलिस्ट यांनी केलेल्या चळवळी असोत, पण तिथे चळवळींना अस्तित्व होतं. मीही स्वातंत्र्य चळवळीत होतो. स्वातंत्र्य चळवळीचं मोठेपण म्हणजे या चळवळीमुळे सामान्याचं असामान्यत्व जागृत होत असे. मी सामान्य माणूस होतो. माझ्या जागी तुमच्यापैकी कोणीही असता, तरीही तो चळवळीत पडला असता, असं मला वाटतं. मी काही भगतसिंग किंवा जयप्रकाश नारायण नव्हतो, जो आपणहून चळवळ उभी करील, पण ‘तू या चळवळीत सहभागी होऊ शकशील’, असं या चळवळींनी सामान्य माणसाला दाखवून दिलं.

“याची सुरुवात बंगालच्या फाळणीच्या वेळी झाली आहे. त्या वेळी ‘सशस्त्र क्रांती करावी’, असं एकीकडे अरविंदबाबूंना वाटत होतं. दुसऱ्या बाजूला नामदार गोखलेंना ‘घटनात्मक सनदशीर मार्गाने स्वत:ची बाजू मांडावी’, असं वाटत होतं; आणि लाल-बाल-पाल म्हणजे लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांना मात्र ‘स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण या मार्गांचा अवलंब करून स्वराज्य मिळवण्यासाठी जनआंदोलन करावं’, असं वाटत होतं. अरविंदबाबू टिळकांना म्हणाले, ‘तुमचा हा कार्यक्रम तर मवाळ आहे. यात काय जहाल आहे!’ तेव्हा टिळक म्हणाले, “‘जहाल म्हणजे काय’, ते तू आधी लक्षात घे.” ते म्हणाले, “आम्ही गोखलेंवर का टीका करतो? तेदेखील देशभक्त आहेत, पण त्यांचं राजकारण व्यक्तिवादी आहे. असामान्य बुद्धिमत्ता असणारी आणि पार्लमेंटसमोर डेलिगेशन नेऊ शकणारे किती लोक आहेत? पाच-पंचवीस लोक! मग त्यांनी देशभक्ती करायची आणि बाकिच्यांनी काय टाळ्या वाजवायच्या का!” त्यानंतर टिळक म्हणाले, “तुझा मार्ग हा सशस्त्र क्रांतीचा मार्ग आहे. तू आणि तुझ्याबरोबरचे अनुयायी हसत हसत फासावर जाल. पण किती जण जातील? दहा टक्केदेखील जाणार नाहीत! फार तर 100 लोक जातील. मग त्यांनी फासावर जायचं आणि बाकीच्यांनी काय त्यांचे पोवाडे म्हणायचे! हे मान्य नाही! आमच्या चळवळीमध्ये ‘स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण’ ही त्रिसूत्री असल्याने त्यात सामान्य माणूस सहभागी होऊ शकतो. आम्ही त्याद्वारे जनआंदोलन करू शकतो. तुमची चळवळ कुठल्यातरी कोपऱ्यात आणि मूठभरांची असेल, पण आमचं आंदोलन मात्र देशभर पसरणारं आहे. म्हणून ते जहालांचं आहे.” गांधीजींनी एकदा उद्गार काढले होते, “क्रांतिकारकांच्याबद्दल, त्यांच्या त्यागाबद्दल माझ्या मनात आदर आहे, परंतु the revolutionary believes in maximum sacrifice by minimum people.. मूठभरांनी सर्वस्व द्यायचं. and I want some sacrifice by all people.” आणि टिळकांचं सूत्र गांधीजींनी पुढं चालवलं. म्हणून आमच्यासारखी सामान्य माणसं त्या चळवळीत गेली. माझ्यासारख्याला वाटलं, ‘आपल्याला थोडंच फाशी जायचंय!’ एक-दोन वर्षं तुरुंगात जाणं, हे काही विसाव्या वर्षी जड नसतं! म्हणून सामान्याचं असामान्यत्व चळवळीमुळे जागृत होतं, हे लक्षात ठेवलं पाहिजे.

मात्र दुर्दैवानं आज चळवळच नाही! आज जी आहेत, ती कामाची बेटं आहेत. मेधा पाटकरची चळवळ एका ठिकाणी आहे, विधायक काम करणारे अभय बंग-राणी बंग दुसऱ्या ठिकाणी आहेत, मोहन हिराबाई हिरालाल किंवा प्रकाश आमटे अशा सगळ्यांचंच कामाचं एकेक बेट आहे. यांना जोडणारी चळवळ कुठे आहे! म्हणजे ज्या वेळी मेधाची चळवळ मध्यप्रदेशात चालू असते, त्या वेळी महाराष्ट्रातले लोक त्यात सहभागी असतातच, असं नाही! हे सर्व ठिकाणी झालेलं आहे; मग ती शेतकऱ्यांची चळवळ असो नाहीतर कामगारांची! आणि चळवळ नसल्यामुळे सामान्य माणसाच्या कर्तृत्वाचा आविष्कारच होत नाही. त्यामुळे आमच्या सर्वांची अतिशय गोची झालेली आहे, असं आम्हाला वाटतं. म्हणून आज समाजजीवन अतिशय कठीण झालेलं आहे.

दुसऱ्या बाजूला राजकीय विचारधारा आता कालबाह्य झालेली आहे आणि ‘आर्थिक बाबतीतलं आपलं धोरण हेच देशाचं आणि व्यक्तीचं भवितव्य ठरवणार आहे’, असं ग्लोबलायझेशनचे पुरस्कर्ते सांगत असतात. त्यांना पाठिंबा देणारे राजकीय पक्ष, त्यांना पाठिंबा देणारे भांडवलदार यांची चळवळ देशभर आहे. म्हणजे आमच्या विरोधी प्रतिगामी चळवळ देशभर आणि पुरोगाम्यांची बेटं यांमुळे परिस्थिती कठीण आहे, असं मला वाटतं.

आता, ‘विचारधारा’ खरोखर कालबाह्य झाली आहे का?’ या मुद्‌द्याकडे आपण येऊ. म्हणजे मी समाजवादी विचारांचा होतो. हा ‘समाजवाद’ आज कालबाह्य झाला आहे का? जर खरोखर कालबाह्य झाला असेल, तर लोक तो फेकूनच देतील; पण मला वाटतं की, समाजवाद कालबाह्य झालेला नाही. पण हे सांगण्याच्या अगोदर ‘मी समाजवादी कसा झालो’, हे मला सांगितलं पाहिजे. जयप्रकाश नारायण यांचं ‘Why Socialism’ हे पुस्तक आम्ही प्रथम वाचलं. मग नंतर मार्क्सचं साहित्य वाचलं, लेनिनचे इतर काही लेख वाचले आणि मी समाजवादी झालो. मार्क्सच्या लेखनामध्ये एक विलक्षण सामर्थ्य आहे. तुम्ही जर ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’ वाचलात, तर तो तुम्हाला एखाद्या वेळी जाहीरनामा वाटेल, पण तो फक्त जाहीरनामा नाही. त्याच्यात एका बाजूला काव्य आहे आणि दुसऱ्या बाजूला आगीची धगही आहे. मार्क्सचं साहित्य वाचल्यानंतर माणसाचं मन कसं बदलतं, हे कोत्सलरने ‘द सायकॉलॉजी ऑफ कन्व्हर्जन’ या स्वत:च्या आत्मचरित्राच्या एका प्रकरणात सांगितलेलं आहे. एके काळी ज्यूंच्या चळवळीत असलेला कोत्सलर कम्युनिस्ट झाल्यावर त्याने स्वत:च्या मन:स्थितीचं वर्णन केलंय, ‘मार्क्सवाद वाचल्यानंतर जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला गवसलं, अशा तऱ्हेची माझी भावना होती; आणि हे गवसल्यामुळे आता दुसऱ्या बाजूला बघायलाच नको!’ काही विचारसरणींमध्ये हे सामर्थ्य असतं. शंकराचार्यांच्या ‘शांकरभाष्या’तही आपल्याला अशाच प्रकारच्या सामर्थ्याचं साम्य सापडतं. ते वाचल्यानंतर लोकांना वाटतं की, ‘आता सगळी उत्तरं यात मिळाली!’ काही जणांना वाटतं, ‘सगळ्या प्रश्नांची उत्तरं भगवद्गीतेत आहेत’. म्हणजे धर्मात असं सामर्थ्य असतं; राजकारणात मार्क्ससारखा माणूस असला की हे सामर्थ्य निर्माण होतं; पण हे फार घातक आहे, असं मी मानतो.

कारण हे खरोखर  बरोबर आहे का? कारण मार्क्सला फक्त औद्योगिकीकरण झालेला युरोप माहिती होता आणि त्यावर त्याची विचारसरणी आधारित होती. त्याने भारताचाही या अनुषंगाने उल्लेख केलेला आहे. त्यामुळे त्याला भारताच्या एकूण चलनवलनाची अजिबात जाणीव नव्हती, असं मी म्हणणार नाही, पण त्याचं लेखन त्या वेळच्या भारताच्या किंवा आजच्या भारताच्या संदर्भात आहे का? नाहीये! औद्योगिक क्रांतीनंतर पहिल्या पिढीमध्ये भांडवलदार कामगारांचं जे शोषण करीत - ज्याचं अत्यंत उत्तम चित्रण डिकन्सच्या कादंबऱ्यांमध्ये केलेलं आहे - त्याला मार्क्सने उत्तर दिलेलं आहे. आजच्या आमच्या प्रश्नाला कुठे उत्तर दिलेलं आहे याची जाणीव आम्हांलादेखील अनेक वर्षं नव्हती. म्हणून आपल्याला असं दिसेल की, समाजवादीदेखील स्वातंत्र्य मिळेपर्यंत कम्युनिस्टांप्रमाणे ठोकळेबाज मार्क्सवादी होते. चळवळीत आल्यानंतर, गांधींचा संबंध आल्यानंतर ‘गांधींच्या विचाराची जोड आपल्या विचारसरणीला दिली पाहिजे’, असं जयप्रकाश नारायण आणि डॉ. लोहिया यांना वाटायला लागलं. त्यामुळे जेव्हा आमचा समाजवादी पक्ष काँग्रेसमधून बाहेर पडला, त्या वेळचं जयप्रकाश नारायण यांचं नाशिकचं भाषण मी ऐकलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी साधनशुचितेची भूमिका मांडलेली आहे. म्हणजे गांधीजी म्हणत असत की, ‘आपलं ध्येय जर उदात्त असेल, तर साधनं शुद्ध असली पाहिजेत’ आणि मार्क्स म्हणत असे की, ‘तुमचं ध्येय जर उदात्त असेल, तर साधनं कशीही असली तरी चालतील’. म्हणजे मार्क्सची भूमिका - end justifies the means. आणि गांधीजींची भूमिका – means must be in keeping with the end. अशी होती. ही दोन टोकं आहेत. मात्र जयप्रकाश नारायण आणि डॉ. लोहिया या दोघांना गांधीजींची भूमिका पटलेली होती. म्हणून जयप्रकाशजींनी नाशिकच्या भाषणात साधनशुचितेची भूमिका मांडली. लोहियांनी पंचमढीला समाजवादी विचाराला आणखी एक वळण देण्याचा प्रयत्न केला. ते काय म्हणाले? ते म्हणाले, ‘कम्युनिस्ट काय, भांडवलदार काय किंवा पंडित नेहरू काय, हे सगळे अर्थसत्तेचं आणि राजसत्तेचं केंद्रीकरण करू पाहतात आणि गांधीजींचं राजकारण विकेंद्रीकरणावर आधारलेलं आहे. गांधीजींच्या भूमिकेमुळे खऱ्या अर्थाने मानवाचं स्वातंत्र्य प्रस्थापित होऊ शकतं आणि म्हणून माझा विकेंद्रीकरणाला पाठिंबा आहे’. त्यानंतर ते म्हणाले, ‘या देशाचं औद्योगिकीकरण झालं पाहिजे, यासाठी यंत्र, मोठी यंत्र आपण सारखी देशामध्ये आणतो आहोत आणि या यंत्रांमुळे इथे जर बेरोजगारी निर्माण झाली तर? म्हणून युरोप, अमेरिका, जिथे लोकसंख्या मर्यादित आहे, तिथे जे तंत्रज्ञान योग्य असेल, ते भारतात असेलच असं नाही. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात, ज्याच्यातून सर्वांच्या हाताला काम मिळेल, असं सुयोग्य तंत्रविज्ञान वापरलं पाहिजे’.

वास्तविक, हे दोन विचार भारतीय चळवळीत होते. आम्ही ते विचार ऐकले, ते मांडले, पण त्याप्रमाणे समाजवादी चळवळ फार काम करू शकली, असं म्हणता येणार नाही. याची दोन कारणं आहेत. एक कारण म्हणजे, जयप्रकाश नारायण दुर्दैवाने भूदानात गेले आणि त्यांनी राजकीय नेतृत्व करायचंच सोडून दिलं. आणि दुसरं, काँग्रेसला काहीही करून सत्तेपासून पदच्युत करण्यासाठी लोहिया यांनी सर्व पक्षांची एकजूट घडवून आणण्यासाठी 1967 साली जी भूमिका देशभर मांडली, त्यामुळे आयडिऑलॉजीचा कस कमी झाला, असं मला वाटतं. कारण हे करत असताना ‘आपल्याला जनसंघाबरोबर हातमिळवणी करायला काय हरकत आहे’, असंही ते म्हणाले आणि त्या वेळी त्यांनी ती केलीच. आणि जे त्यांनी 1967 साली केलं, तेच नेमकं 1977 नंतर जयप्रकाश नारायण यांनी जनता पक्षाच्या प्रयोगाच्या वेळी केलं. ‘हे बरोबर नाही’, असं त्या वेळी आम्हांला अनेकांना वाटत होतं, पण जयप्रकाशजींच्या समोर कोण बोलणार! शिवाय निवडणुका जिंकण्यासाठी त्या वेळी ते आवश्यक होतं. त्यामुळे आम्ही मान्य केलं. मला वाटतं की, ज्या वेळी जनता पक्ष फुटला, त्या वेळी पुन्हा समाजवादी पक्ष निर्माण केला असता, तर खरोखर आमच्या आयडिऑलॉजीला, आमच्या विचारधारेला एक प्रकारची प्रखरता आली असती, पण ते आमच्या नेत्यांनी केलं नाही; जनता पक्ष चालू ठेवला. मग त्याच्यात अनेक तऱ्हेच्या फाटाफुटी झाल्या आणि शेवटी या देशातला समाजवादी पक्षच नष्ट झाला.

पण मी तुम्हांला सांगतो की, नेत्यांच्या आपसातल्या भांडणांमुळे किंवा त्यांच्या अपुरेपणामुळे किंवा आम्हा कार्यकर्त्यांच्यादेखील अपुरेपणामुळे समाजवादी पक्ष नष्ट झाला असला, तरी समाजवादी विचारधारा नष्ट होऊ शकत नाही. ती काही आमच्यावरती अवलंबून नाहीये! विचारधारेचं स्वतंत्र अस्तित्व असतं; पण तिचा कन्टेन्ट किंवा आशय कालानुरूप बदलायचा असतो. तरच ती खरोखर प्रभावी ठरत असते. म्हणजे उदाहरणार्थ, मार्क्सने क्रांतीचा अग्रदूत कोणाला म्हटलेलं आहे? कामगाराला. भारतामध्ये कामगार किती होते? एक टक्कादेखील नव्हते. पण आम्ही आपलं पाठ केलेलं म्हणायचो -  Dictatorship of proletariat. Proletariat म्हणजे संघटित कामगार. आणि भारतात काय झालं? मिलमधला कामगार, शिक्षक किंवा सरकारी कर्मचारी यांना त्यांचा महागाई भत्ता, बोनस हे फायदे मिळाल्यानंतर त्यांनी आम्हांला अच्छा केलं. ते कुठे राहिलेत चळवळीत? कुठल्या क्रांतीचे अग्रदूत आहेत ते? स्वत:चा स्वार्थ बघणारा असा हा मध्यम वर्ग आहे. याचा काय संबंध आहे? म्हणून इथल्या समाजवादी चळवळीचा मुख्य बिंदू ‘शेतकरी’ असला पाहिजे. म्हणजे या संदर्भात शंकरराव मोरे यांना फार मोठी मान्यता नसेल, पण शेतकरी कामगार पक्ष स्थापन करत असताना शंकरराव मोरे यांनी ही भूमिका बरोबर मांडली होती. शेतकरी हा केंद्रबिंदू असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. कामगार हा त्याला पाठिंबा द्यायला. आता मुंबईचे जे कामगार आहेत, ते मुळात लहान गावांमधनंच आले आहेत ना! मी तुम्हांला सांगतो की, ज्या वेळी महाराष्ट्रात दुष्काळ पडला, त्या वेळी मी त्या कामगारांच्या युनियनला सांगितलं की, ‘तुमच्या गावाकडे दुष्काळ पडलेला आहे. तर तुम्ही किती लाख रुपये गोळा करता सांगा’. तर ते म्हणाले, ‘आम्ही दहा हजार रुपये गोळा करू’. म्हणजे त्या कामगारांनी शेतकऱ्याशी मुळी फारकतच घेतलेली आहे. त्याला कसला क्रांतीचा अग्रदूत म्हणता! म्हणून इथल्या शेतकऱ्याचा प्रश्न हा खरा केंद्रबिंदू करायला पाहिजे. हे लक्षात ठेवलं पाहिजे.

इथली सबंध परिस्थिती काय आहे? इथली परिस्थिती, इथली विषमता यांच्यामध्ये आणखीनही एक भाग आहे. तो डॉ. आंबेडकरांनी सांगितला आहे. ते म्हणाले आहेत, ‘भारतातली सामाजिक विषमता ही आर्थिक विषमतेपेक्षा अधिक तीव्र आहे. आणि तुम्हांला समतेसाठीचं कुठलंही आंदोलन करायचं असेल, तर सामाजिक समतेच्या आंदोलनाला अग्रक्रम दिला पाहिजे. नंतर आर्थिक समतेचं आंदोलन येईल’; आणि हे बरोबर आहे. पण आम्हांला या जाणिवा केव्हा झालेल्या आहेत? दहा वर्षांपूर्वी-वीस वर्षांपूर्वी झालेल्या आहेत. मी 1987 साली स्वातंत्र्य संग्रामाचं महाभारत लिहिलं, त्यात आंबेडकरांबद्दल दहा वाक्यं आहेत. आज जर ते मी लिहिलं, तर आंबेडकरांवर कितीतरी लिहू शकेन! कारण सामाजिक समतेचा आशय स्वातंत्र्य चळवळीत नसल्यामुळे किती नुकसान झालं, ते आज मी प्रत्यक्ष पाहतोय. म्हणून समाजवाद याचा आशय काय? त्याचा आशय, एका बाजूला सामाजिक समता; दुसऱ्या बाजूला डॉ. लोहियांनी सांगितलं त्याप्रमाणे या देशात सगळ्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, असं आर्थिक धोरण आणि असं तंत्रविज्ञान; आणि तिसऱ्या बाजूला शेतकरी, शेतमजूर यांच्या संघटना. या तिन्हींवर जर आधारित असेल, तर समाजवादाला भवितव्य आहे आणि तर या विचारधारेला कोणी पराभूत करू शकत नाही. तसंच सुदैवाने आम्ही घटनेने लोकशाही स्वीकारलेली आहे. म्हणून ज्या समाजवादातून रशियामध्ये किंवा चीनमध्ये हुकूमशाही निर्माण झाली, त्याच्यापेक्षा ‘लोकशाही समाजवाद’ वेगळा आहे. या देशात आम्ही घटनेने लोकशाही स्वीकारलेली असल्यामुळे जे रशियात घडलं किंवा जे चीनमध्ये घडलं, ते आमच्याकडे घडण्याची खरोखर भीतीच नाही. (भारतीय राजकारणाचे दोन पैलू - लोकशाही आणि समाजवाद, सत्याग्रही गांधीजी या पुस्तकांमधला भाग).

आता मी तुम्हांला ‘चळवळ’ या बाबतीतलं गांधींचं मोठेपण सांगतो. एक उदाहरणच घेऊन सांगतो. 1920 सालच्या चळवळीतलं हे उदाहरण आहे. पटवर्धन नावाचा रत्नागिरीकडचा एक हुशार विद्यार्थी. ‘तत्त्वज्ञान’ या विषयात त्याने बी.ए.ला प्रथम श्रेणी मिळवली होती. एम.ए.ला तो मुंबई विद्यापीठात पहिला आला होता. त्याला एलफिन्स्टन महाविद्यालयामध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळत होती. गांधींनी हाक दिली की, ‘सरकारी नोकरी करू नका आणि चळवळीत या’. त्याप्रमाणे पटवर्धन चळवळीत पडले; आप्पा पटवर्धन; सुटून आले; गांधींकडे गेले. खरंतर चौरीचौराच्या घटनेनंतर गांधींनी चळवळ परत घेतली होती. ‘मी काय करू आता स्वराज्याकरता?’ पटवर्धनांनी विचारलं. गांधींनी विचारलं, ‘तू कुठल्या जिल्ह्यातला?’ पटवर्धन म्हणाले, ‘रत्नागिरी; ब्राह्मण’. गांधीजी म्हणाले, ‘मग हातामध्ये झाडू घे आणि भंगी जे काम करतो, ते करायला लाग; ग्रामसफाईचं. गावामध्ये जा. ब्राह्मण भंग्याचं काम करतोय, हे दिसल्यानंतर लोक संतापतील, पण निष्ठेने ते काम करायचं. खादी विक आणि स्वत: खादी वापर. ‘दारू पिऊ नका’, म्हणून लोकांना सांग’. आप्पा म्हणाले, ‘मी हे सगळं करीन, पण याच्यामुळे स्वराज्य जवळ कसं येईल?’ गांधीजी म्हणाले, ‘तू हे केलंस की, तीन वर्षापर्यंत लोक तुझ्या तोंडावर थुंकतील. ‘तू वेडा आहेस’, असं म्हणतील; पाच वर्षांनी तुला ‘गांधीचा माणूस’ म्हणून ओळखायला लागतील. दहा वर्षांनी तुझ्याभोवती पाच तरी तरुण मुलं गोळा होतील; आणि दहा वर्षांनी मी जेव्हा चळवळ सुरू करीन, त्या वेळी - आज तू रत्नागिरी जिल्ह्यातून एकटा आलायस - 50 लोक चळवळीत येतील’. आणि 1930 साली ज्या वेळी शिरोड्याला मिठाचा सत्याग्रह झाला, त्या वेळी रत्नागिरी जिल्ह्यातून 250 लोक आले होते; 1942 साली 2000 लोक आले होते. याचा अर्थ, गांधी चळवळ करायचे आणि ती संपली की, विधायक काम चालू ठेवायचे. म्हणजे ‘संघर्ष’ आणि ‘रचना’ यांची गांधींनी फारकत केली नाही. आणि आज काय झालंय? मेधा ही संघर्षाची नेता आणि हे आमचे मित्र रचनात्मक कार्य करणारे आहेत. या दोघांचं नातं कुठे जुळतच नाही. मग चळवळ वाढणार कशी? म्हणून समाजवादाची पुढची बांधणी करायची असेल, तर ‘संघर्ष’ आणि ‘रचना’ यांचीदेखील आपल्याला एकत्र गुंफण करायला पाहिजे. त्यामुळे समाजवादाला भवितव्य आहे की नाही? जोपर्यंत गरिबी आहे, तोपर्यंत आहेच भवितव्य.

आपल्याला शेवटी समताधिष्ठित समाज निर्माण करायचा आहे का कल्याणकारी राज्य अधिक कल्याणकारी? म्हणजे वेलफेअर कॅपिटॅलिझम. म्हणजे मग श्रीमंतांनी या ठिकाणी आमच्या ज्या संस्था आहेत, त्या असतील आणि नंतर आम्ही बाकीच्यांना भीक वाटू; त्यांचं बघू; त्यांना देऊ आम्ही. माझं म्हणणं असं की, ज्याला आपण ह्युमन डिग्निटी म्हणतो, ती किंवा मानवी जीवनाची प्रतिष्ठा कशावर अवलंबून असते? तर मी जे बौद्धिक श्रम किंवा शारीरिक श्रम करतो आणि त्यांच्यातून मला त्याचा मोबदला मिळतो, हे योग्य, का प्रचंड आणि जगड्‌व्याळ असं यंत्र आणि त्याच्यामधला मी एक स्क्रू हे योग्य? हा खरोखर प्रश्न आहे. जीवनाची जी सबंध रिदम आहे, तिच्यात सगळीकडे फ्रॅकशन्स पडतायत आणि जे फ्रॅकशन्स पडतात, त्याच्यातच सत्य गवसतं, असं लोकांना वाटतंय, असं आपल्याला सध्याचं चित्र दिसेल. म्हणजे मी तुम्हांला आजघडीचं एक उदाहरण देतो. मुंबईतल्या एखाद्या माणसाला जर तुम्ही आज विचारलंत की, ‘बाबा रे, तू ऑफिसमध्ये जातोस. तुझी गाडी किती वाजता निघते?’ तर तो सांगेल, ‘8.33, 9.42’. कारण प्रत्येक मिनिट महत्त्वाचं आहे. पुण्यातल्या माणसाला जर विचारलंत, तर तो सांगेल, ‘8.15, 8.30’. आणखी खाली तालुक्याच्या गावी जाऊन एखाद्याला विचाराल, तर तो सांगेल, ‘8.00, 9.00’. आणखीन पलीकडे जाल, तर ‘सकाळ, दुपार, संध्याकाळ’ या भाषेत लोक उत्तरं देतील. पण असं समजू नका की, त्या फ्रॅकशन समजलेल्या लोकांना सत्य कळतं. कारण त्यांना जर विचारलं की, ‘आज पौर्णिमा आहे की अमावस्या आहे?’ तर ते त्यांना माहीत नसतं, जे सकाळ-दुपार-संध्याकाळवाल्या लोकांना माहिती असतं. म्हणून सत्य हे फ्रॅकशनमधून मिळत नाही. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सबंध समाजाचे तुकडे तुकडे होताहेत. सबंध रिदम सर्वथैव बिघडतीये. म्हणून गांधीजी जे म्हणत असत की, निसर्गाची एक लय आहे. तसंच मानवी जीवनाचीही एक लय आहे, आणि या दोहोंचा सुसंवाद झाला पाहिजे. तरच पर्यावरणाचं रक्षण होईल. नाहीतर कसं होईल? तर या तऱ्हेने सुसंवाद करण्याच्या दृष्टीने ‘माणूस’ हा केंद्रबिंदू असणारं संशोधन - आज यंत्र हा केंद्रबिंदू आहे - मानवी जीवनाची प्रतिष्ठा प्रस्थापित करायची इच्छा बाळगणाऱ्या लोकांना केव्हातरी सुरू करावंसं वाटेल. म्हणून समाजवादाच्या आशयाचा विचार करताना आपल्याला एका बाजूला सामाजिक समता, दुसऱ्या बाजूला राजकीय समता, तिसऱ्या बाजूला आर्थिक समता आणि आर्थिक समतेमध्ये निसर्गाच्या लयीशी सुसंवाद आणि सगळ्यांच्या हाताला काम असा सांगोपांग विचार करायला पाहिजे, असं मला वाटतं.

या संदर्भात माझ्या ओळखीच्या राजकीय नेता असलेल्या इंग्लंडमधल्या स्त्रीने जे सांगितलं, ते मी तुम्हांला सांगणार आहे. 1979 साली नानासाहेब गोरे ज्या वेळी लंडनला हायकमिशनर होते, त्या वेळी मी तिथे गेलो होतो आणि त्या वेळी थॅचर बाईचं पहिलं इलेक्‌शन होतं. तेव्हा मजूर पक्षातर्फे जे अनेक जण उभे राहिले होते, त्यांच्यात शर्ले विल्यम्स - ज्या पूर्वीच्या लेबर मंत्रिमंडळामध्ये शिक्षणमंत्री होत्या - होत्या. त्यांची मुलाखत घ्यायला मी गेलो. मुलाखत झाल्यावर त्या म्हणाल्या,‘यू हॅव डन प्रिटी वेल’. मी म्हणालो, ‘मला असं वाटत नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आमच्या देशात जो भ्रष्टाचार आहे, त्याची मला फार खंत वाटते’. यावर शर्ले विल्यम्स हसल्या आणि म्हणाल्या, ‘मी तुला जरा इंग्लंडचा इतिहास सांगते. इंग्लंडमध्ये बॉलपोल ज्या वेळी पंतप्रधान होता, त्या वेळी तो जाहीररित्या म्हणायचा की, ‘एव्हरी मॅन हॅज हिज प्राइस’. म्हणजे पंतप्रधान हाच मुळी भ्रष्टाचाराचं समर्थन करणारा होता. तिथपासून आज आम्ही इथपर्यंत आलोय. ही प्रगती कशी झाली? आम्ही अनेक छोटे छोटे लढे दिले. त्यातून हळूहळू आमची नैतिकता वाढत गेली. आमचं शील घडत गेलं. हे तू लक्षात ठेव’. मला वाटतं, हे गांधींनी ओळखलं होतं. ज्या वेळी लुई फिशरनी त्यांना विचारलं की, ‘दुसऱ्या महायुद्धानंतर तुम्हांला स्वराज्य देण्याचं क्रीप सांगत असताना तुम्ही ते स्वीकारलं का नाही?’ तर गांधीजी म्हणाले, ‘हे पाहा, स्वराज्य ब्रिटिशांनी वगैरे देणं बाजूला राहू दे. आम्हांला स्वराज्य मिळणारच आहे. या अवस्थेला हिंदुस्थान आलेला आहे; पण मला चळवळ करायची आहे. कारण चळवळीतनं देश घडत असतो आणि म्हणून माझा देश जर चळवळीत घडला, तर पुढच्या 50 वर्षांत इथे लोकशाही रुजू शकेल’; आणि ते बरोब्बर झालं. त्या चळवळीत आमची पिढी, आमच्या आधीची पिढी वाढली. म्हणून पुढल्या 50 वर्षांमध्ये इथे लोकशाही यशस्वी झाली; आणि म्हणून शर्ले विल्यम्स मला म्हणाल्या, ‘आम्ही जे 300 वर्षांमध्ये साध्य केलं, ते तुम्ही 30 वर्षांमध्ये कसंकाय करू शकणार? तुम्हांलाही याची काही प्राइस द्यावी लागेल; किंमत द्यावी लागेल आणि 100 वर्षं तरी द्यावी लागतील’.

मला असं वाटतं की, मार्क्सच्या विचारापासून ते ‘लोकशाही समाजवाद’ जेव्हा मांडला गेला, त्याच्यापासून आपल्याला अभिप्रेत असलेला लोकशाही समाजवाद अस्तित्वात येण्यासाठी प्रदीर्घ वाटचाल करावी लागेल; काही ठेचा खाव्या लागतील; काही अपयशं स्वीकारावी लागतील. तसंच स्वतंत्र विचार करावा लागेल. त्याच्यातूनच शेवटी योग्य तऱ्हेचं व्हिजन आपल्यासमोर येईल आणि मग त्या वेळची तरुण पिढी त्याच्यासाठी समर्पण करून ‘लोकशाही समाजवाद’ ही विचारधारा प्रत्यक्षात आणील. याची बांधणी फार वेगळ्या रितीने करावी लागते. म्हणजे त्या बांधणीमध्ये तुम्हांला कम्युनिस्टांचंच टेक्निक वापरलं पाहिजे. आजची सोशलिस्ट फ्रंट फार भोंगळ आहे. कम्युनिस्टांच्या टेक्निकमध्ये ज्या रितीने त्यांचं केडर बिल्ट करतात, त्या केडरवरती ज्या रितीने वैचारिक संस्कार करतात, त्या पद्धतीने पार्टी बांधत आपल्याला पुढे जाता येईल. चारू मुजुमदारना मी 1967 साली भेटलेलो आहे. त्यांना मी विचारलं, तुम्हांला काय हे आहे? ते म्हणाले, ‘या रितीने मी काम केल्यानंतर 2067 साली काही रिझल्ट्‌स मिळतात की नाही, मला सांगा’. म्हणून संघटनेचं तंत्र कम्युनिस्टांच्या केडर पद्धतीचंच असलं पाहिजे. या बाबतीत समाजवादी पक्ष आजपर्यंत कमालीचा भोंगळ राहिला, असंच मला वाटतं. हा भोंगळपणा राजकीय संघटनेला योग्य नाही. तिथे एक वेगळ्या तऱ्हेची शिस्त, वेगळ्या तऱ्हेचं समर्पण लागतं आणि ते समर्पण पिढ्यान्‌ पिढ्या करत 50 वर्षं-70 वर्षं वाटचाल केली की, मगच ही विचारधारा प्रभावी होईल, असा मला विश्वास आहे.

(शब्दांकन : भाग्यश्री भागवत)
(प्रास्ताविक : समीर शिपूरकर)

- ग. प्र. प्रधान


प्रधान विचार प्रधान चरित्र हा माहितीपट युट्यूबवर पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. 

Tags: प्रधानसर जन्मशताब्दी साधना साप्ताहिक Load More Tags

Add Comment

संबंधित लेख