स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणारा स्वातंत्र्य सैनिक, राष्ट्र सेवा दल व समाजवादी चळवळीत बौद्धिके घेणारा अभ्यासू कार्यकर्ता, फर्ग्युसन महाविद्यालयातील इंग्रजीचे नामवंत प्राध्यापक, व्यासंगी वक्ते, उत्तम लेखक, विधान परिषदेतील प्रभावी आमदार व विरोधी पक्षनेते, साने गुरुजींच्या ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष- अशा विविध रूपांनी प्रा. ग. प्र. प्रधान अवघ्या महाराष्ट्राला परिचित होते. 26 ऑगस्ट 2022ला त्यांचे जन्मशताब्दी वर्ष संपत आहे. त्यानिमित्ताने साहित्य परिषद पुणे, साधना साप्ताहिक पुणे, साहित्य शिवार पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एस. एम. जोशी सभागृहात सायंकाळी 5.30 वाजता कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याच कार्यक्रमात प्रधानसरांच्या 'टॉलस्टॉय यांच्याशी पत्रसंवाद' या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन होणार आहे. या पुस्तकात प्रधान सरांनी टॉलस्टॉय यांना उद्देशून लिहिलेली 13 अनावृत्त पत्रे व दोन परिशिष्टे आहेत. त्यातील हे पहिले परिशिष्ट.
दि. 30 जानेवारी 1948 ला महात्मा गांधींची हत्या झाल्यावर परलोकात प्रवेश करताना त्यांना टॉलस्टॉय उभे असलेले दिसले. टॉलस्टॉय यांना पाहताच गांधीजींना अतिशय आनंद झाला आणि त्यांच्याजवळ जाऊन गांधीजींनी त्यांना वाकून नमस्कार केला. क्षणभर स्तिमित झालेले टॉलस्टॉय यांनी गांधीजींचे हात प्रेमाने हातांत घेतले आणि ते म्हणाले, “केवढे भाग्यवान तुम्ही! कर्तव्य करीत असताना तुमच्या शत्रूने गोळी घालून तुमची हत्या केली. तुमचं मरण खरोखरीच उज्ज्वल! तुम्ही हिंदू धर्माची सहिष्णुतेची, प्रेमाची शिकवण लोकांना देत असताना तुमच्या जीवनाचा आणि हिंदू धर्माचाही अर्थ न समजणाऱ्या धर्मांध व्यक्तीने तुमचे प्राण घेतले. त्या वेड्याला कळलेही नसणार की, तुमचे शरीर नष्ट केल्याने तुमचा विचार नष्ट होणार नाही; उलट तो अधिक उज्ज्वल होईल.'
गांधी म्हणाले, “हिंसेचा प्रतिकार अहिंसक मार्गानेच केला पाहिजे, हा माझा विचार आपले लेखन वाचल्यावर अधिक खंबीर झाला.
टॉलस्टॉय म्हणाले, “मला आठवतंय, तुम्ही मला दक्षिण आफ्रिकेतून लिहिलेल्या पत्रात असंच म्हटलं होतंत. पण मी विचार मांडला, तुम्ही त्याचं आचरण केलंत; इतकंच नाही, तर अनेकांना तुमच्या सत्याग्रहाच्या चळवळीत त्या मार्गाने बरोबर घेऊन गेलात.” गांधीजींनी यावर केवळ स्मित केले. थोडे थांबून टॉलस्टॉय म्हणाले, “मला तुमचा हेवा वाटतो की, मनोमन पटलेला विचार आचरणात आणताना तुम्हाला मृत्यू आला. माझ्या जीवनात हे घडलं नाही. मला माझा जमीनजुमला कुळांना वाटून टाकायचा होता. कारण जो कसतो, त्याचीच जमिनीवर मालकी असते, असे मी मानत असे. आमची कुळे पिढ्यानपिढ्या आमच्या जमिनीत राबली आणि आमच्या अनेक पिढ्यांनी जमीनदार म्हणून त्यांच्या श्रमांवर चैन केली. हा अन्याय संपवावा, असे मला वाटत होते; परंतु माझी एक मुलगी सोडली, तर माझ्या पत्नीचा आणि बाकीच्या मुला-मुलींचा याला कडवा विरोध होता. त्याच म्हणणं असं होतं की, या वडिलोपार्जित मालमत्तेबाबत निर्णय घेण्याचा मला अधिकारच नाही, कारण मी ती मिळविलेली नव्हती. त्यामुळे मी त्या बाबतीत माघार घेतली. मी जे बोललो त्याप्रमाणे वागू शकलो नाही. वडिलोपार्जित मालमत्तेची गोष्ट सोडा पण माझे लेखन तर मीच केले होते; ते लेखन प्रकाशित करून कोणालाही नफा मिळू नये, अशी मी माझ्या मृत्युपत्रात तरतूद केली होती. यामुळे माझी पत्नी भयंकर संतापली. तिला माझ्या सर्व साहित्याच्या प्रकाशनाचे हक्क हवे होते. अखेर कोणालाही न कळवता एके दिवशी पहाटे चार वाजता फक्त डॉ. मॅकोव्हिट्स्कीला बरोबर घेऊन आणि माझी मुलगी साशा हिचा निरोप घेऊन मी घर सोडून निघालो. नंतर पुढे थोड्या दिवसांनी मी आजारी पडल्यावर माझी इच्छा नसतानाही डॉक्टर माझा मृत्यू लांबवीत होते. मी त्यांना म्हणत होतो, “या जगात लिओ टॉलस्टॉयखेरीज असंख्य लोक आहेत. आणि तुम्ही मात्र एकट्या लिओकडेच लक्ष देत आहात. माझ्या अखेरच्या वा प्रवासात मला मानसिक क्लेश झाले.”
टॉलस्टॉय यांना त्या आठवणींनी फार वेदना होत होत्या. गांधीजी मूकपणे ऐकत होते. थोडे थांबून टॉलस्टॉय पुढे म्हणाले, “पण माझं भाग्य की, ज्या चर्चने मला धर्मभ्रष्ट मानलं, त्या चर्चच्या धर्मगुरूशिवाय माझी शवपेटी जंगलात एका शांत ठिकाणी पुरण्यात आली. मला बोलता येत नव्हते. मला सांगायचे होते. शवपेटीतून माझे शव बाहेर काढा आणि धरणीमातेच्या कुशीत मला झोपू द्या.” टॉलस्टॉय पुढे म्हणाले, “तुझा मृत्यू इतका उदात्त, पण तुझ्या शवाचे मात्र धिंडवडे झाले. लष्करी गाडीवरून नेण्यात आले आणि त्याला तोफांची सलामी दिली गेली. ते नेहरू, पटेल, राजेंद्रप्रसाद यांना तुझे जीवन, तुझे विचार आणि तुझी अंतयात्रा यांतील विसंगती समजली नाही, हे तुझे दुर्दैव.” गांधीजी खिन्नपणे म्हणाले, “आणि माझ्यावर गोळी झाडणाऱ्या व्यक्तीला ते आता फाशीही देतील. त्याला फाशी देऊ नका, असे माझा एक जरी अनुयायी बोलला, तरी मला समाधान वाटेल.”
टॉलस्टॉय आणि गांधी यांचा नेहमी एकमेकांशी संवाद चाले. गांधीजी एकदा टॉलस्टॉय यांना म्हणाले, “माझ्यावर माझ्या आई-वडिलांमुळे धर्माचा, ईश्वरभक्तीचा संस्कार झाला. पण तुमच्या घरात सैन्यात जाण्याची परंपरा होती. तुम्हीही तरुणपणी रणभूमीवर गेला होतात. तुमचे ‘कोझॅक्स’ हे पुस्तक तसंच सेव्हॅस्टोपोलच्या रणभूमीवरचे अनुभव सांगणारे पुस्तक मी वाचले होते. तुम्ही अहिंसेच्या विचाराकडे कसे वळलात?” टॉलस्टॉय म्हणाले, “मी ‘वॉर अॅण्ड पीस’ ही कादंबरी लिहिताना माझ्या मनात सतत वादळ चालले होते. त्यातला एक प्रसंग मी सांगतो. प्रिन्स आंद्रे हा सैन्यातील तरुण अधिकारी ऑस्टरलिट्झच्या लढाईत मातृभूमीसाठी प्राण अर्पण करण्याच्या भावनेने बेभान होऊन ज्या वेळी शत्रुसैन्यावर तुटून पडतो, त्या वेळच्या त्याच्या मनःस्थितीचे मी वर्णन केले आहे. लढाईत आंद्रे जखमी होतो आणि बेशुद्ध पडतो. त्या रणभूमीवरच, रात्री तो प्रथम अर्धवट शुद्धीवर येतो. तो डोळे उघडून पाहतो, तर आकाशात तारे चमकत असतात. एक ढग मधूनच हलके-हलके जात असतो. सगळीकडे निरव शांतता असते आणि आंद्रेच्या मनातही अननुभूत शांतता पसरते. त्याला दुपारची घनघोर लढाई आठवते आणि त्याच्या मनात विचार येतो की, ‘दुपारी युद्धाच्या धामधुमीत ज्या त्वेषाने मी लढलो, ती अवस्था खरी की आताची शांतता खरी?’ ती कादंबरी लिहिताना युद्ध आणि शांतता यांचे द्वंद्व माझ्या मनात काही वेळा होत असे; पण वास्तव चित्रण करणारी कलाकृती निर्माण करण्यात मी स्वतःला विसरून गेलो होतो. पुढे 1878 मध्ये झारच्या विरोधात सशस्त्र क्रांतिकारकांनी एक उठाव केला. त्या वेळचा झार भयंकर जुलमी होता. सैन्याच्या बळावर त्याने हा उठाव चिरडून टाकला. ओळीने 193 लोकांना फाशी दिले. झारच्या या अमानुष क्रौर्याविरुद्ध जनतेचा उद्रेक होणे अपरिहार्य होते. एक दिवस व्हेरा या तरुण मुलीने एका नीच सत्तांध पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला केला. हिंसेला हिंसेनेच प्रत्युत्तर दिले जात होते. जुलमी झार आणि क्रांतिकारक यांच्यातील परस्परद्वेषाचा वणवा देशभर भडकला होता. मला फार विषाद वाटला आणि मग मला ख्रिस्ताच्या शिकवणुकीमुळे प्रकाश दिसला. दंडशक्तीने अन्यायाचा प्रतिकार करणे योग्य नाही, तो प्रतिकार वेगळ्या पद्धतीने केला पाहिजे हे मला सुचले आणि मी तो विचार लोकांपुढे मांडला. अनेकांना मी स्वप्नाळू वाटलो. अनेक तरुण क्रांतिकारकांना माझा संतापही आला. पण मी माझा विचार मांडत राहिलो.”
गांधीजी म्हणाले, “आपल्या विचाराने माझ्या विचारांना बळ मिळालं; पण आपण अशा अहिंसक लढ्याचं नेतृत्व केलं असतंत, तर जगावर त्याचा प्रभाव पडला असता.” टॉलस्टॉय उत्तरले, “मी विचारांप्रमाणे आचरण करायला हवं होतं, परंतु राजकीय नेतृत्व करणं हा माझा स्वभाव नव्हता. तू त्या बाबतीत माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेस, हे मान्य करतो. तुझ्या विचारांतील आणि आचारातील सुसंगतीमुळेच तुझ्या देशातील लोकांवर आणि जगावरही तुझा प्रभाव पडला. मी इथून तुझं वागणं पाहत होतो. दक्षिण आफ्रिकेत गोरे लोक गोरेतरांवर जो अन्याय करीत होते, त्याविरुद्ध शांततामय प्रतिकार करायला तू लोकांना शिकवलंस. तू ज्या वेळी 1920 मध्ये असहकार आंदोलन सुरू केलंस, त्या वेळी हे आंदोलन ब्रिटिश साम्राज्यवाद्यांच्या जुलमापुढे किती टिकेल, याचा मला अंदाज येईना. एक मात्र खरं की, तोपर्यंत राजसत्तेला विरोध करताना लोक हिंसक मार्गच अवलंबीत होते; परंतु तुझ्या सत्याग्रह आंदोलनातील सत्याग्रही शांततेच्या मार्गाने सरकारचा कायदा मोडीत होते आणि कोर्टात ‘हो, आम्ही कायदा मोडला’, असे निर्भयपणे सांगून शिक्षा स्वीकारीत होते. तू तर न्यायाधीशाला, ‘मला जास्तीत जास्त शिक्षा द्या’, अशी विनंती केलीस, अशा अहिंसक प्रतिकारामुळे ब्रिटिश सरकारच्या अंतःकरणातील माणुसकी थोडी तरी जागी झाली. रशियातील झारच्या सरकारने क्रांतिकारकांना गोळ्या घातल्या. ब्रिटिशांनी सत्याग्रहींना तुरुंगात डांबले. गोळ्या घातल्या नाहीत, याचे श्रेय मी अन्यायाचा प्रतिकार अहिंसक मार्गाने करण्याच्या तुझ्या निर्णयालाच देतो. तू लोकांना निर्भय बनवलंस. नंतर चौरीचौऱ्याला पोलिसांनी अकारण केलेल्या गोळीबारामुळे प्रक्षुब्ध झालेल्या जमावाने त्या पोलिसांचीच हत्या केली, त्या वेळी तू लढा मागे घेण्याचा निर्णय घेतलास. नेहमीसारखे तुझे सहकारी, तुझे अनेक अनुयायी तुझ्यावर नाराज झाले; पण तू तुझ्या निर्णयाला ठामपणे चिकटून राहिलास. असा अप्रिय निर्णय घ्यायला फार मोठं धैर्य लागतं, ते तू दाखवलंस. माझ्या मनातलं तुझ्याबद्दलचं प्रेम आणि आदर द्विगुणित झाला. तुझी 1930 मधील साबरमती ते दांडी पदयात्रा हा एक आगळाच प्रयोग होता. हा तुझा लढा चिरडून टाकण्यासाठी ब्रिटिशांनी ज्या वेळी सत्याग्रहींची डोकी फोडली, त्या वेळी त्यांनी ती मारहाण निर्भयपणे सोसली. स्त्री सत्याग्रहींनीही असेच धैर्य दाखवले, तेव्हा सगळे जग चकित झाले.”
टॉलस्टॉय पुढे म्हणाले, “दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर तू युद्धविरोधी भूमिका घेऊन वैयक्तिक सत्याग्रह सुरू केलास आणि पुढे ब्रिटिश साम्राज्यवाद्यांना तू हिंदुस्थानातून चालते व्हायला सांगितलेस. या वेळी अहिंसक लढ्यासाठी तू तयारी करायला हवी होतीस, असे मला वाटले.” गांधीजी म्हणाले, “तयारी करायला मला वेळ नव्हता. माझ्या नेतृत्वाखाली लढा झाला असता, तर तो अहिंसक ठेवण्याची मी पराकाष्ठा केली असती. मात्र लोकांनी भ्याडपणे ब्रिटिश साम्राज्यवाद्यांपुढे माघार घेऊ नये, अशीच माझी भूमिका होती. लढा अहिंसक मार्गांनी व्हावा, पण भ्याडपणापेक्षा स्वातंत्र्य चळवळीला हिंसक वळण लागले तरी माघार घ्यायची नाही, असे मी ठरवले होते.” टॉलस्टॉय म्हणाले, “ज्या काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली ही चळवळ होणार होती, त्या पक्षाने तुझ्याप्रमाणे अहिंसा हे तत्त्वज्ञान म्हणून स्वीकारले नव्हतेच; देशव्यापी चळवळीचे प्रभावी साधन म्हणून त्या पक्षाने अहिंसा स्वीकारली होती.” गांधीजी म्हणाले, “राजकारणातील ही अपूर्णता आहे आणि मी ती स्वीकारली होती.”
हेही वाचा : नानासाहेबांच्या मार्गदर्शनामुळेच मी समाजवादी चळवळीत सतत काम करत राहिलो...- ग. प्र. प्रधान
काही दिवसांनी टॉलस्टॉय व गांधी बोलत बसले असताना, फाळणीच्या वेळच्या परिस्थितीवर बोलणे झाले. टॉलस्टॉय म्हणाले, “नोआखलीला जेव्हा हिंदूंच्या कत्तली झाल्या, त्या वेळी तिथे जाऊन तू हिंदूंना पुन्हा जगण्याची हिंमत देण्याचा आटोकाट प्रयत्न केलास आणि मुसलमानांच्या मनातील द्वेष कमी करण्यासाठीही धडपड केलीस. तुझी ही एकाकी वाटचाल पाहून मी चकित झालो. तू 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात सामील न होता, कलकत्त्याला एका झोपडीत राहून दंगलग्रस्त भागात शांतता प्रस्थापित व्हावी, म्हणून प्राण पणाला लावीत होतास. अंधाऱ्या झोपडीत उपोषण करून तू एकटाच प्रार्थना करीत होतास. हे धैर्य तुझ्यात कोठून आले?” गांधी म्हणाले, “फाळणीच्या काळातील अमानुष हत्याकांडामुळे मला माझा पराभव झाला, असे वाटत होते; परंतु सत्याग्रहीने पराभव न स्वीकारता अखेरपर्यंत द्वेषाविरुद्ध हिंसेविरुद्ध लढायचे असते, ही माझी भूमिका असल्यामुळे जे शक्य झाले, ते मी केले. मात्र एक गोष्ट मला मान्यच केली पाहिजे. ‘माझ्या प्रेतावरून जाऊनच तुम्हाला भारताची फाळणी करावी लागेल’ असे मी म्हणालो होतो, परंतु परिस्थितीने केलेला पराभव स्वीकारणे मला भाग पडले. काँग्रेसमधील माझ्या सहकाऱ्यांनी फाळणीला अपरिहार्य म्हणून मान्यता दिल्यावर, स्वतंत्र होताना भारताचे दोन तुकडे झालेले मान्य करून नंतर पुन्हा ऐक्याचे प्रयत्न करायचे, असे मी ठरविले. त्या कसोटीची वेळ माझ्या जीवनात आलीच नाही.”
टॉलस्टॉय काहीशा खिन्नपणे म्हणाले, “इतिहासाचे चक्र अत्यंत गतिमान असते. आपण माणसं कितीही तत्त्वनिष्ठ असलो, तरी काही वेळा परिस्थिती आपल्यावर मात करते. वुई आर आफ्टरऑल क्रीएचर्स ऑफ सरकम्स्टन्सेस.” दोघेही किती तरी वेळ स्तब्धपणे बसून होते.. उठता-उठता टॉलस्टॉय म्हणाले, “इतिहासाचे गतिचक्र फिरतच राहणार. हिंसेने प्रश्न सुटत नाहीत, हे समजत असतानाही माणसांच्या मनातील हिंसा वारंवार उफाळून येते. म्हणूनच अन्यायाचा प्रतिकार अहिंसात्मक मार्गाने केला नाही, तर सूडाचे चक्र सुरू राहील, हे लोकांना सतत सांगून जनसामान्यांवर सुसंस्कार करीत राहिले पाहिजे. हा अहिंसक प्रतिकाराचा संस्कार शब्दांनी पुरेसा होणार नाही, तुझ्यासारख्यांच्या हौतात्म्यामुळे-बलिदानामुळे तो होईल.”
पुन्हा एकदा टॉलस्टॉय आणि गांधीजी चर्चा करीत बसले असताना, टॉलस्टॉय म्हणाले, “मला तुम्ही हिंदू लोक फार आवडता. कारण तुम्ही पापभीरू आणि परमेश्वरावर श्रद्धा ठेवणारे आहात.” गांधीजी म्हणाले, “तुम्हाला आमच्या समाजाची केवळ एकच बाजू माहीत आहे. आमच्याकडील जातिव्यवस्थेमुळे समाजाच्या चिरफळ्या कशा झाल्या आहेत आणि आम्ही तथाकथित वरच्या जातींतील लोकांनी कोट्यवधी लोकांना अस्पृश्य म्हणून जनावरांपेक्षाही किती वाईट वागवले आहे, याची तुम्हाला कल्पना नाही. अस्पृश्यता हा मला माणुसकीवरचा कलंक वाटतो. मी माझ्या मार्गाने अस्पृश्यतेचे निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला, पण मला त्यात यश आले नाही. मी पूर्वायुष्यात आमची वर्णव्यवस्था मान्य केली होती, परंतु प्रदीर्घ अनुभवानंतर मी ती भूमिका सोडली. आमच्या देशातील दलितांचे पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांचा स्वाभिमान जागृत केला. त्यांनी आणि त्यांच्या अनुयायांनी बौद्ध धर्म स्वीकारला, पण आजही सामाजिक विषमतेचे निर्मूलन झालेले नाही. कायदा करून हे होणार नाही. मला या बाबतीत फार खंत वाटते.”
टॉलस्टॉय म्हणाले, “मी तुझे दुःख समजू शकतो. आम्ही युरोपियन राष्ट्रांनी आफ्रिकेतील आणि आशियातील गोरेतर लोकांवर किती जुलूम केले, त्यांची कशी पिळवणूक केली हे तुला ठाऊकच आहे. वंश, धर्म आदींच्या भिंती बांधून मूठभरांनी त्यांचा स्वार्थ साधला. विशाल मानवधर्माची भाषा आपण अनेक जण बोललो; पण प्रत्यक्षात मात्र जग हा विशाल सागर न होता, आपण ठिकठिकाणी डबकी बांधून त्यात राहण्यातच स्वतःला धन्य मानीत आहोत. जगाची केवळ रचना बदलून चालणार नाही; माणूस बदलला पाहिजे. त्याचे अंतःकरण विशाल झाले पाहिजे, जगातील राजकारणी बदलणार नाहीत; पण लहान मुलांवर शिक्षणातून चांगले संस्कार केले, तर मात्र जग सुधारू शकेल.” गांधी म्हणाले, “शिक्षणातून श्रमांची प्रतिष्ठा कळली पाहिजे. ‘जीवन आणि शिक्षण यांची फारकत होऊ देऊ नका’, असे मी कंठरवाने सांगितले, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. माझ्या आयुष्यातला फार मोठा काळ स्वातंत्र्यासाठी चळवळी करण्यात गेला. त्यामुळे मला हवे असलेले प्रयोग शिक्षणक्षेत्रात करता आले नाहीत.”
टॉलस्टॉय म्हणाले, “तुमच्यासारखीच मलाही लहान मुले फार आवडतात. मी ग्रामीण भागात वास्नाया पोल्याना येथे राहत असताना मुलांना जंगलात नेऊन झाडांची, पशू-पक्ष्यांची ओळख करून देत असे आणि ती मुले सारे भराभर आनंदाने शिकत असत. आपल्या आजच्या शाळा म्हणजे कोंडवाडे आहेत.” गांधीजी म्हणाले, “आपण एक असामान्य शिक्षक आहात. आपण मुलांसाठी ज्या गोष्टी लिहिल्या आहेत, त्या जगातल्या मुलांना आवडतात. माझ्या स्वभावात एक मोठा दोष आहे. मी मुलांचे रंजन नाही करू शकत. राजकारणात जन्म गेल्यामुळे मी रुक्षपणे उपदेश करतो.” टॉलस्टॉय यावर हसून म्हणाले, “कोणाला बिघडवायचे असेल, तर त्याला राजकारणात ढकलून द्यावे.” गांधीजी म्हणाले, “पण ते टाळूनही चालणार नाही. शासनसंस्थेत अनेक दोष आहेत, पण मानवी समाजासाठी ती आवश्यक आहे.” टॉलस्टॉय म्हणाले, "मला नाही हे फारसं पटत. निसर्गाची एक लय आहे. ती लय आणि माणसाच्या जीवनाची लय यांत सुसंवाद असला म्हणजे पुरे.”
गांधीजी म्हणाले, “माझेही निसर्गावर प्रेम आहे. औद्योगिकीकरणामुळे निसर्गाचा जो विनाश होतो, त्याला मी विरोध केला आहे. माणूस यंत्राचा गुलाम होऊ नये, या माझ्या मताची माझ्या देशात खूप टवाळी झाली. तुम्हाला मला साधेपणाने राहण्यातील सौंदर्य कळतं. असा साधेपणा, तसेच निसर्गावर प्रेम करायला आपण मुलांना शिक्षणातून शिकवलं पाहिजे. मुलांवर निसर्गावर प्रेम करणारे शिक्षकच हे करू शकतील. पण यासाठी मी तयार केलेल्या वर्षा शिक्षण योजनेचा शिक्षकांनीच बोजवारा उडवला.” टॉलस्टॉय म्हणाले, “शिक्षणातल्या संस्कारांप्रमाणेच साहित्याने प्रौढ वाचकांच्या मनावर उदात्ततेचा संस्कार केला पाहिजे, असं मला वाटतं.” गांधीजी म्हणाले, “तुम्ही तुमच्या ‘कला म्हणजे काय?’ या पुस्तकात ते मांडलंच आहे.” टॉलस्टॉय म्हणाले, “बहुसंख्य रशियन लेखकांनी आणि समीक्षकांनी माझ्या भूमिकेवर टीकाच केली.” गांधीजी म्हणाले, “मला साहित्यातील फारसं कळत नाही; पण तुमच्या ‘अॅना करेनिना’पेक्षा मला तुमची ‘रिसरेक्शन’ (पुनरुत्थान) हीच कादंबरी श्रेष्ठ आहे, असे वाटते.” टॉलस्टॉय म्हणाले, “मी ललित साहित्य लिहिण्यात आयुष्याची अनेक वर्षे घालवली, त्याऐवजी एकीकडे उपजीविकेसाठी शेती करायची आणि त्याच वेळी लहान मुलांना शिकवायचे हे केले असते, तर मला अधिक साफल्य वाटले असते.”
हेही वाचा : एस्. एम्. पाठीवर थाप मारून म्हणाले, ‘‘प्रधान, तू पास झालास!’’ - ग. प्र. प्रधान
एकदा टॉलस्टॉय यांना गांधीजी म्हणाले, “आपला आध्यात्मिक प्रवास कसा झाला, ते ऐकण्याची मला फार उत्सुकता आहे.” टॉलस्टॉय म्हणाले. “अनेक खाचखळग्यांतून झालेला आहे हा माझा प्रवास. सारेच काही विस्ताराने सांगायचे, तर वेळ फार लागेल आणि ते इतके महत्वाचे नाही.” यावर गांधीजी म्हणाले, “निदान आपल्या या आध्यात्मिक प्रवासातील महत्त्वाचे टप्पे तरी सांगा.” यावर टॉलस्टॉय म्हणाले, “तुझा आग्रहच आहे तर काही सांगतो, थोडेसे...” आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली, “तुला माहीत आहे की, एका सरंजामदार कुटुंबात माझा जन्म झाला आणि मला आयुष्यात कधी गरिबीची झळ लागली नाही. माझ्या चोविसाव्या वर्षापर्यंतच्या आयुष्याबद्दल मी फारसे सांगणार नाही. मी ते लिहिले आहे. मी भरपूर वाचन केले. अभिजात साहित्याचे आणि वैचारिक साहित्याचेही सैन्यात नोकरी करताना क्रिमियन युद्धात भी भाग घेतला. माझी धर्मावर श्रद्धा होती, पण चर्चवर मात्र नव्हती. मला धर्माचे शुद्ध स्वरूप समजून घ्यावे, असे 1877 च्या सुमारास वाटू लागले आणि मी मग बायबलचा व गॉस्पेल्सचा अभ्यास सुरू केला. जीवनविषयक मूलगामी प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी इतिहास, भौतिकशास्त्रे वाचली; परंतु जडवादी विद्वानांच्या लेखनाने माझे समाधान होईना, म्हणून मी सॉक्रेटिस, प्लेटो, स्थिनोझा, कांट, बुद्ध आदी तत्त्वचिंतक वाचले. माझी जिज्ञासा जागृत झाली होती. मी परमेश्वराचा विचार करीत होतो आणि मग एक दिवस माझ्या लक्षात आले की, ज्या वेळी बालकाच्या निरागस वृत्तीने परमेश्वराचे अस्तित्व आपण गृहीत धरतो, त्या वेळी आपले मन प्रसन्न असते; ज्या वेळी आपल्या मनात शंका-कुशंकांचा कोलाहल सुरू होतो, त्या वेळी मन संशयग्रस्त होऊन आपण दुःखी होतो. ईश्वरावरील श्रद्धेच्या या जाणिवेमुळे मला सात्विक आनंद लाभला. पन्नाशी उलटल्यावर मी प्रत्येक गोष्टीचे नैतिक अधिष्ठान शोधू लागलो. माझी श्रद्धा हरपली आणि मी फार अस्वस्थ झालो. मी 1879 मध्ये चर्चमध्ये जाणे सोडून दिले, कारण कर्मकांडांवरील माझा विश्वास पूर्णपणे उडाला होता. त्यानंतर मी चार गॉस्पेल्सचे भाषांतर केले आणि त्यांचा मला जाणवलेला आशय सांगितला. चर्चला माझे हे विचार मान्य झाले नाहीत, परंतु मला मात्र आपण शुद्ध ख्रिश्चॅनिटी स्वीकारल्याचा आनंद मिळाला. 1981 ते 83 या दोन वर्षांत माझा जणू आध्यात्मिक पुनर्जन्म झाला आणि मी ‘व्हॉट आय बिलिन्स’ (माझी श्रद्धा) हे पुस्तक लिहून माझ्या मनातील श्रद्धेचे स्वरूप स्पष्टपणे मांडले. माझ्या या पुस्तकाच्या सर्व प्रती सरकारने जाम केल्या. मी माझ्या श्रद्धेप्रमाणे शक्य तितका साधेपणाने जगू लागलो. श्रमांची प्रतिष्ठा कळल्यावर मी रोज शारीरिक श्रमांची कामे करू लागलो. मी वेगळा पंथ मात्र काढला नाही. 1891 मधल्या भीषण दुष्काळात काम केले. ‘द किंगडम ऑफ गॉड इज विदिन वू’ हे पुस्तक 1893 मध्ये लिहून माझा जीवनविषयक दृष्टिकोन सम्यक् रीतीने मांडला. मी रोज प्रार्थना करीत असे, परंतु रशियातील ऑर्थोडॉक्स चर्चच्या निकषानुसार मात्र मी पाखंडी होतो.
अखेर 24 फेब्रुवारी 1901ला मला धर्मातून बहिष्कृत करण्यात आले. मी माझी धर्मविषयक आणि ईश्वरविषयक मते स्पष्टपणे मांडत होतो. मी चर्चच्या अधिकाऱ्यांना लिहिले की, कोणत्याही गोष्टीपेक्षा मी सत्य हे श्रेष्ठ मानतो. ख्रिस्ताच्या शिकवणुकीचे जे सत्य स्वरूप मला उमगले, त्याप्रमाणे मी वागत आहे. माझी श्रद्धा मी बदलू शकणार नाही. असा झाला माझा प्रवास. धर्मगुरूंनी मला धर्मभ्रष्ट मानले आणि मी माझ्या अंतः प्रेरणेप्रमाणे वागत होतो, म्हणून माझी पत्नी माझ्यावर भयंकर रागवू लागली. माझा गृहत्याग आणि अखेरच्या प्रवासाबद्दल मी तुला पूर्वी सांगितले आहे.”
दुसऱ्या दिवशी टॉलस्टॉय गांधींना म्हणाले, “काल मी स्वतःच्या आध्यात्मिक प्रवासाबद्दल सांगितले. तुझ्या या प्रवासाची कहाणी मला ऐकायची आहे.” गांधीजींना हे अपेक्षित होते. ते म्हणाले, “माझ्या बुद्धीचा आवाका आपल्या बुद्धीच्या मानाने अगदीच लहान आहे. मी आपल्यासारखे चौफेर वाचन करून सत्याचा शोध घेतला नाही. मी माझ्या आयुष्यात सत्याचे प्रयोग केले. आपल्यासारख्या महान व्यक्तीसमोर या प्रयोगांची कहाणी सांगायला मला संकोच वाटतो. माझ्या आत्मकथेत मी हे सारे लिहिले आहे, तीच मी आपल्याला देतो.” असे म्हणून गांधीजींनी त्यांचे ‘माय एक्सपरिमेंट्स विथ ट्रुथ’ हे आत्मकथन टॉलस्टॉयना दिले. ते वाचून झाल्यावर एक दिवस दोघे जण बोलत बसले असताना गांधीजी म्हणाले, “मी बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडमध्ये गेलो असताना बायबल वाचले. बायबलचा, ख्रिस्ताच्या शिकवणुकीचा माझ्या मनावर खूप प्रभाव पडला. पण ख्रिस्ती धर्म स्वीकारावा, असे मात्र मला वाटले नाही. भगवद्गीतेचा अभ्यास मी पुढे दक्षिण आफ्रिकेत केला. हिंदुस्थानात परत गेल्यावर भगवद्गीतेची जी मुख्य शिकवण आहे, असे मला वाटले, तो ‘अनासक्ती योग’ मी शक्य तितक्या सोप्या शब्दांत मांडला.”
गांधीजी पुढे म्हणाले, “लो. टिळकांनी लिहिलेले गीतारहस्य मी काळजीपूर्वक वाचले होते. टिळक फार व्यासंगी, विद्वान होते. त्यांची बुद्धिमत्ताही कुशाग्र होती. म्हणून त्यांनी ‘कर्मयोग’ हा गीतेचा संदेश आहे, हे सांगताना अनेक तत्त्वज्ञानांच्या विचारधारांचे विस्तृत विवेचन केले आहे. शंकराचार्यांनी भगवद्गीतेचा संदेश संन्यासमार्ग हा आहे, हे जे लिहिले आहे, त्या मताचे टिळकांनी पूर्णपणे खंडन केले आहे. असे विवेचन करणे मला जमणार नाही. माझ्या अंतःप्रवृत्तीला भगवद्गीतेचा जो अर्थ उमगला, तो मी केवळ मांडला आहे. मात्र माझ्या आध्यात्मिक प्रवासात मी सिद्धान्तापेक्षा प्रयोगांना अधिक महत्त्व दिले आणि तेच मी माझ्या आत्मचरित्रात मांडले आहे. गांधीजी थोडे थांबून म्हणाले, “मला तात्त्विक चर्चेपेक्षा भारताचे जीवन कसे व्हावे, याबद्दल माझे वास्तवतेवर आधारलेले विचार मांडण्यात अधिक रस होता आणि ‘हिंद स्वराज्य’ या माझ्या पुस्तकात मी माझे ते विचार सूत्ररूपाने व सुस्पष्टपणे मांडले आहेत. असे म्हणून गांधीजींनी ‘हिंद स्वराज्य’ची प्रत टॉलस्टॉयना दिली.
एक दिवस टॉलस्टॉय आणि गांधीजी बोलत बसले असताना गांधीजी म्हणाले, “आपण आपल्या पूर्वायुष्यातील चुकांची कबुली देणारे ‘कन्फेशन’ हे पुस्तक लिहिलेत, ‘व्हॉट देन मस्ट वुई डू?’ (तर मग आम्ही काय करावे?) या पुस्तकात जीवनातील अनेक समस्यांना सामोरे जाताना आपण काय केले पाहिजे, हे सडेतोडपणे सांगितलेत; त्यामुळे माझ्यासारख्या असंख्य लोकांना प्रकाश मिळाला. आज जगात अधिकाधिक संहारक अस्त्रे निर्माण केली जात असताना ‘पेट्रिऑटिझम अँड गव्हन्मेंट’ (देशभक्ती आणि शासनसंस्था) या निबंधातून आपण ‘दाऊ शॅल नॉट किल’ (तू हिंसा करू नकोस) हा जो संदेश दिला आहे, तो मला फार मौलिक वाटतो. मला आज आपले ईश्वराबद्दलचे एखादे तरी वाक्य ऐकावेसे वाटते.”
टॉलस्टॉय म्हणाले, “माझ्या अखेरच्या प्रवासात आगगाडीतून जात असताना, मी तिसऱ्या वर्गाच्या डब्यात जाऊन बसलो. त्या वेळी एका विद्यार्थ्याने मला असेच् विचारले, तेव्हा मी म्हणालो- ही सृष्टी निर्माण करणाऱ्या ईश्वरावर माझा विश्वास नाही. पण प्रत्येकाच्या हृदयातील सदसद्विवेक बुद्धीत जाग्या असणाऱ्या ईश्वराच्या अंशावर माझी दृढ श्रद्धा आहे....” थोडे थांबून टॉलस्टॉय म्हणाले, “गांधी, मृत्यूपूर्वी मी जे शेवटचे वाक्य बोललो, ते काय होते ते सांगू? ते होते, ‘सत्य! त्याचेच मला सर्वांत जास्त महत्त्व वाटते...’ आणि गांधी, तू तर आयुष्यभराचा सत्याग्रही. म्हणून तर आपली मनं जुळली!”
- ग. प्र. प्रधान
Tags: sadhana publication gandhi tolstoy गांधी सत्याचे प्रयोग आत्मकथा नवे पुस्तक साधना प्रकाशन Load More Tags
Add Comment