आचार्य जावडेकर हे ‘लोकशक्ती’ या दैनिकाचे संपादक असताना 1940 मध्ये मी त्यांचे त्यांतील अग्रलेख वाचले. त्या अग्रलेखांतील ब्रिटिश साम्राज्य-विरोधी विचार आणि स्वातंत्र्य चळवळीचे निर्भय समर्थन यांमुळे ते मला फार आवडले. त्या वेळी ‘लोकशक्ती’चे सहसंपादक पां. वा. गाडगीळ यांच्याकडे मी मधू लिमयेबरोबर जात असे. एकदा आम्ही पां. वा. गाडगीळांना भेटायला ‘लोकशक्ती’च्या कार्यालयात गेलो तेव्हा आचार्य जावडेकर, पां. वा. गाडगीळ, लोकशक्तीच्या संपादकीय मंडळातील श्रीधरराव कुलकर्णी आणि एस. आर. देशपांडे यांची राजकीय विषयावर चर्चा चालू होती. मी थोडा दूर बसून ती चर्चा ऐकत होतो. इतरांचे ऐकून घेऊन आचार्य त्यांचे म्हणणे शांतपणे पण ठामपणे मांडत होते. त्या वेळी मी त्यांना प्रथम पाहिले आणि ऐकले. त्यांचा साधेपणा मला फार आवडला. त्याच सुमारास आचार्य जावडेकरांनी लिहिलेला ‘आधुनिक भारत’ हा ग्रंथ प्रसिद्ध झाला होता. राष्ट्र सेवादलातील तरुण कार्यकर्त्यांनी ‘आधुनिक भारत’ वाचलेच पाहिजे, असे एस्. एम्. जोशींनी सांगितल्यामुळे आम्ही काही जणांनी या ग्रंथाचे सामुदायिक वाचन केले. स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते पाठ्यपुस्तकासारखे ‘आधुनिक भारत’ वाचीत असत. त्यातील विषयाची माहितीपूर्ण मांडणी आणि विवेचन यामुळे तो ग्रंथ केवळ वाचणे पुरेसे नसे. त्याचा अभ्यास करावा लागे. राष्ट्र सेवादलात कोल्हटकर मास्तर ‘आधुनिक भारता’वर आधारलेली पाच व्याख्याने देत.
आचार्य जावडेकर आणि आचार्य भागवत यांची भाषणे मी वसंत व्याख्यानमालेतही ऐकली. आचार्य भागवत यांचे वक्तृत्व असामान्य होते. आचार्य जावडेकर वक्ते म्हणून प्रभावी नव्हते, परंतु त्यांच्या भाषणात अनेक नवे विचार ते तर्कशुद्ध रीतीने मांडत असत. एस्. एम्. जोशींनी आम्हाला जावडेकरांबद्दलची माहिती सांगितली. कॉलेजमध्ये विद्यार्थी असतानाच 1920 मध्ये शं. द. जावडेकर हे महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावित झाले. पुढे ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र शिकवू लागले. त्या काळात जावडेकर व भागवत या दोघांची विद्वत्ता, व्यासंग व अध्यापनकुशलता यांच्यामुळे या दोघांनाही त्यांचे विद्यार्थी ‘आचार्य’ असे म्हणत आणि त्याच नावाने हे दोघेही विचारवंत त्यांच्या आयुष्यभर ओळखले जाऊ लागले. या काळात ‘लोकशिक्षण’ या विचारप्रधान मासिकात आचार्य जावडेकर विपुल लेखन करीत. ‘लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी’ हा त्यांचा विस्तृत लेख खूप गाजला. लोकमान्य टिळकांचे अनुयायी म्हणवणारे तात्यासाहेब केळकर आणि अन्य काही जण म. गांधींच्या विचारांवर टीका करीत. आचार्य जावडेकर यांनी लो. टिळक आणि म. गांधी या दोनही नेत्यांची भूमिका ‘स्वातंत्र्यासाठी जनआंदोलन केलेच पाहिजे’ हीच होती, हे तर्कसंगत विवेचन करून दाखवून दिले. टिळक आणि गांधी या दोघांचे ध्येय व कार्यपद्धती यातील साम्य दाखवताना आचार्य जावडेकर यांनी टिळक व गांधी यांच्या विचारांचे अत्यंत मार्मिक विश्लेषण केले आणि तात्यासाहेब केळकरांच्या विचारांचे पूर्णपणे खंडन केले.
म. गांधींनी सत्याग्रह आंदोलन 1930 मध्ये सुरू केले, तेव्हा आचार्य जावडेकर यांनी शिरोडा येथील सत्याग्रहात भाग घेऊन कारावास भोगला. आचार्यांचे टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील अनेक शिष्य सत्याग्रहात सामील झाले. याच काळात आचार्य जावडेकर यांनी मार्क्स व एंगल्स यांचे साहित्य वाचले आणि त्यांच्या आर्थिक समतेच्या विचारांचे महत्त्व आचार्यांना मनोमन पटले. महात्मा गांधींच्या विचाराला मार्क्सच्या आर्थिक समतेची जोड देणे आवश्यक आहे, असे आचार्यांना तीव्रतेने वाटले. मात्र मार्क्सचा कामगारवर्गाच्या हुकूमशाहीचा विचार आचार्यांना मुळीच मान्य झाला नाही. त्याचप्रमाणे समाजवादाच्या स्थापनेसाठी सशस्त्र क्रांती करणे आवश्यक आहे, हा मार्क्सचा विचारही आचार्यांना योग्य वाटला नाही. समाजवादाला सत्याग्रहाचीच जोड दिली पाहिजे, अशी आचार्य जावडेकर यांची भूमिका होती. साध्य व साधन यांच्यासंबंधी मार्क्स आणि महात्मा गांधी यांच्या विचारांमध्ये मूलभूत फरक होता. साध्य उदात्त असेल तर कोणतीही साधने वापरण्यास हरकत नाही (एण्ड जस्टिफाइज दि मीन्स), असा विचार मार्क्सने मांडला. याउलट म. गांधींनी, ‘साधने ही साध्याला अनुरूपच असली पाहिजेत (मीन्स मस्ट बी इन कीपिंग वुईथ दि एण्ड)’, असा विचार स्पष्टपणे मांडला आणि स्वराज्य हे उदात्त ध्येय शुद्ध साधनांनीच साध्य केले पाहिजे, हे सांगून सत्याग्रहाच्या मार्गाचे समर्थन केले.
सन 1942 च्या ‘चले जाव’ आंदोलनात येरवडा तुरुंगात असताना ‘व्हॉट मार्क्स रिअली मेंट’ आणि ‘टुवर्ड्स दि अंडरस्टँडिंग ऑफ मार्क्स’ ही दोन पुस्तके आम्ही काही जणांनी आचार्य जावडेकरांच्या मार्गदर्शनाखाली वाचली. त्या वेळी भाष्य करताना आचार्य केवळ मार्क्सबद्दल बोलत नसत; तो विचार, ते सूत्र घेऊन त्यासंबंधी अन्य तत्त्वज्ञांनी आणि म. गांधींनी काय विचार मांडले, हेही ते सांगत. त्या वेळी मला हे सर्व आकलन होत नसे, हे माझ्या नंतर लक्षात आले. आचार्यांची भाषणे मी 1947 ते 1954 या काळात ऐकली आणि त्यांचे ‘साधना’तील अनेक लेख व ‘सत्याग्रही समाजवाद’ हे त्यांचे पुस्तक जेव्हा मी वाचले, तेव्हा मला आचार्य जावडेकरांच्या विचारांची मौलिकता समजून आली. म. गांधींच्या विचारांचे आणि समाजवादाचे चिकित्सकपणे विवेचन करून असा मौलिक व स्वतंत्र विचार आचार्य जावडेकरांव्यतिरिक्त अन्य कोणीही मांडलेला नाही, असे मला वाटते.
आचार्य जावडेकर हे एका भाषणात म्हणाले, ‘‘म. गांधींनी स्वातंत्र्यासाठी सत्याग्रहाच्या मार्गाने लढा देऊन जनसामान्यांना स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्याचे धैर्य आणि सामर्थ्य दिले. स्वतंत्र भारतात ग्रामस्वराज्य आहे, असे गांधीजी म्हणाले; परंतु आजच्या खेड्यांत स्वराज्य येईल, असे त्यांना वाटत नव्हते. आजच्या खेड्यांमध्ये आमूलाग्र परिवर्तन झाले पाहिजे, खेडी स्वच्छ असली पाहिजेत, तेथील घरे साधी पण नेटकी असली पाहिजेत, गावांमध्ये अस्पृश्यता पाळली जाता कामा नये आणि गाव दारूच्या व्यसनापासून मुक्त असले पाहिजे- असेच गांधीजी सांगत. गावातील लोकांनी स्वत:साठी पुरेसे अन्न आणि वस्त्र निर्माण केले पाहिजे. भारतातील शेती सुधारली पाहिजे आणि शिक्षण व शेती यांची सांगड घातली पाहिजे, असे गांधीजी आग्रहाने सांगत. गांधीजी असे म्हणत की, लोकशाही याचा अर्थ लोकांचा सहभाग असलेले राज्य आणि असा सहभाग ग्रामस्वराज्यातच असू शकेल. तसे त्यांचे प्रतिपादन असे. गावातील लोक त्यांच्या गावाचा कारभार चालवू शकतील, यावर महात्मा गांधींचा पूर्ण विश्वास होता. मात्र आजच्या गावातील अनिष्ट गोष्टी नष्ट केल्या, तरच हे शक्य आहे, असे गांधीजी म्हणत. ‘हिंद स्वराज्य’ या पुस्तकात गांधीजींनी ग्रामस्वराज्याचा हा विचार अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे.’’ आचार्य जावडेकर असे सांगत की, ‘हिंद स्वराज्य’ या पुस्तकाचा अभ्यास केल्यावरच गांधीजींचे विचार समजून येतील.
आचार्य जावडेकर इस्लामपूरला राहत असत. तेथे ते दलित वस्तीत जाऊन शिकवत असत. स्वातंत्र्य चळवळीतून सुटल्यानंतर दम्यामुळे प्रकृती बिघडल्यामुळे आचार्य जावडेकर हे इस्लामपूरलाच राहू लागले. ते मधून-मधून पुण्याला येत. वसंत व्याख्यानमालेत मात्र त्यांचे व्याख्यान दर वर्षी होत असे.
लो. टिळकांची जन्मशताब्दी 1956 मध्ये होती. माझे मित्र प्रा. अ. के. भागवत आणि मी मिळून लो. टिळकांचे इंग्रजीत चरित्र लिहायचे 1954 मध्ये ठरवले. एस्. एम्. जोशी यांना हे कळल्यावर ते आम्हाला म्हणाले, ‘‘तुम्ही आचार्य जावडेकरांच्या मार्गदर्शनाखाली हे चरित्र लिहा.’’ त्या सुमारास आचार्य जावडेकर पुण्यास आले असताना आम्ही त्यांना भेटलो आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करण्याचे मान्य केले. ते म्हणाले, ‘‘उद्या तुम्ही माझ्याकडे या आणि आपण बोलू.’’ आम्ही गेल्यावर आचार्य जावडेकर सांगू लागले. ते म्हणाले, ‘‘टिळक कॉलेजमध्ये असताना मिल् आणि स्पेन्सरचे जे ग्रंथ मी वाचले, ते प्रथम वाचा. म्हणजे त्या वेळी टिळकांच्या मनाची घडण कशी झाली, ते तुम्हाला कळून येईल.’’ पुढे आचार्य म्हणाले, ‘‘तुम्ही न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना, ‘केसरी’ सुरू करण्याचा निर्णय, टिळक-आगरकरांना कोल्हापूर प्रकरणी झालेली शिक्षा या काळाचे वर्णन करणारी सर्व पुस्तके वाचा. आगरकरांचे चरित्रही वाचा आणि नंतर इस्लामपूरला या. आपण चर्चा करू आणि नंतरच तुम्ही लिहायला सुरुवात करा.’’ टिळकचरित्र लिहिताना आम्ही दर दोन महिन्यांनी आचार्यांकडे इस्लामपूरला जात असू. जुलै महिन्यात आम्ही गेलो, त्या वेळी त्यांची प्रकृती खूपच बरी होती. आचार्यांना बोलण्याची व चर्चेची मनापासून आवड. इस्लामपूरमधील त्यांचे जीवन त्या मानाने फारच एकांतवासाचे होते. अर्थात त्यांचे वैचारिक विश्व स्वयंपूर्ण असल्यामुळे त्यांना तसा एकाकीपणा जाणवत नसावा, परंतु कोणी बोलायला असल्यावर ते एकदम उल्हसित होत. जुलै महिन्यात आम्ही 3-4 दिवस त्यांच्याकडे होतो, त्या वेळी ते जवळजवळ 8-9 तास रोज आमच्याशी बोलत. हा वेळ अतिशय आल्हाददायक असे. खरेखुरे बौद्धिक वातावरण म्हणजे काय, ते त्यांच्याशी बोलताना समजे. आम्ही प्रश्न विचारला की, ते बोलू लागत. बोलताना मधेच मौलिक विचार आला की, त्यांच्या जराजर्जर चेहऱ्यावर प्रसन्न हास्य उमटे. अभिनिवेशाने एखाद्या कल्पनेचे समर्थन करताना त्यांच्या डोळ्यांत वेगळीच चमक दिसू लागे. आवाज थोडासा चढे, डावी भुवई किंचित वर होई आणि मान मधेच जोराने हलवून ते बोलायचे थांबत. मधेच समोरच्या कपाटातील पुस्तक काढायला सांगत. कित्येकदा जवळ ठेवलेले एखादे पुस्तक उघडत आणि त्यातील उतारा वाचून पुन्हा विवेचनास सुरुवात होई. विचारांच्या एका क्षितिजावरून दुसऱ्या क्षितिजावर ते सहज झेप घेत. राज्यशास्त्राकडून नीतिशास्त्र, नीतिशास्त्रातून मेटॅफिजिक्स, मेटॅफिजिक्समधून धर्मकल्पना- असा त्यांचा अप्रतिहत संचार चाले. माझी झेप अगदीच तोकडी असल्याने बुद्धीची थोडी फरपट होई, पण ‘पंगुं लंघयते गिरिम्’ हे सामर्थ्य आचार्यांच्या अध्यापनात असल्यामुळे माझ्या बुद्धीलाही एरवी न झेपणाऱ्या विचारांशी सलगी करण्याचा धीर होई. जसजसे आचार्य अधिक बोलत तसतसे आपल्याला बरेच काही येत नाही, हे मला समजून येई आणि मन जरा वेळ संकोचाने चूर होई; पण लागलीच आचार्यांच्या उद्गारांनी मनातील गोंधळ नाहीसा होत आहे, याची जाणीव होई व धास्तावलेले मन आत्मविश्वासाने पाऊल टाकू लागे.
सप्टेंबरमध्ये त्यांची प्रकृती बरीच खराब झाली होती, परंतु तरीही बोलण्यातील उत्साह कायम होता. उशीवर कोपर ठेवून ते बसत आणि मग आजारीपणाचे भान त्यांना उरत नसे. शंकराचार्य आणि बुद्ध, भगवद्गीता आणि बायबल, रसेल आणि व्हाइटहेड, मार्क्स आणि गांधी या आणि अशा अनेक विषयांचा परामर्श घेतला जाई. शरीर थके आणि आचार्य दमून मधेच पडून राहत. काही वेळा त्यांना बोलताना विलक्षण त्रास होई; पण तरीही ‘आता थांबू या’ असे म्हणण्याचा धीर आम्हाला होत नसे. कारण एकामागून एक अशा तऱ्हेने येणाऱ्या त्यांच्या विचारांचे एक शिल्प (पॅटर्न) निर्माण होत असे आणि या सौंदर्यनिर्मितीत अडथळा आणण्याइतके आम्ही खासच अरसिक नव्हतो.
तात्त्विक चर्चा थांबल्यावर जेवताना अगर चहा घेताना राजकारणाची चर्चा सुरू होई. प्रथम तात्कालिक बाबतीत आचार्य मत व्यक्त करीत, पण थोड्या वेळात एखादे सिद्धान्तवजा वाक्य बोलत आणि फिरून तत्त्वचर्चा सुरू होई. व्यक्ती अगर घटना यांपेक्षा विचारांचेच आकर्षण आचार्यांना होते आणि म्हणूनच चालू राजकारणासंबंधी त्यांची मते स्पष्ट असली व ते निर्भयपणे कोणाचेही दोष दाखवीत असले, तरी त्यांच्या विवेचनात कटुता येत नसे. व्यक्तिजीवनाबद्दल त्यांना आस्था असे. पण ती मर्यादित रीतीने व्यक्त होई, त्यामुळेच ते अनेकांना काहीसे रुक्ष वाटत. व्यक्तीपेक्षा त्यांना विचार महत्त्वाचा वाटे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, गांधीवाद ही त्यांची जीवननिष्ठा होती; परंतु गांधीजींच्या सहवासात राहावे अगर गांधीजींना सतत भेटावे, असे त्यांना कधीही वाटले नाही. आचार्यांना हे वैचारिक जीवन जगण्यासाठी लागणारे मानसिक स्वास्थ्य त्यांच्या घरातील वातावरणामुळे मिळाले होते आणि त्यांच्या पत्नी सुशीलाबाई यांनाच याचे श्रेेय प्रामुख्याने द्यावे लागेल.
आचार्यांबरोबर अनेक विषयांवर मी चर्चा केली आहे, परंतु पन्नास वर्षांपूर्वीची एक आठवण मनात अगदी सुस्पष्ट आहे. मी इस्लामपूरला आचार्यांकडे दोन-तीन तास थांबलो होतो. वेगवेगळ्या विषयांवर बोलता-बोलता नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘साधना’ दिवाळी अंकाकडे गप्पा वळल्या आणि इतका वेळ राजकारणावर बोलणारे आचार्य एकदम मंगेश पाडगावकरांच्या ‘हे पार्थिवते’ या कवितेवर बोलू लागले. ती कविता त्यांना विलक्षण आवडली होती आणि ज्या उत्कटतेने व रसिकतेने ते त्या कवितेवर बोलले, ते पाहून मी स्तिमितच झालो. बोलण्याच्या ओघात ज्ञानेश्वरांपासून केशवसुतांपर्यंत अनेक कवींच्या ओळी ते म्हणाले. मधेच पाडगावकरांच्या कवितेचा काही भाग त्यांनी वाचला आणि नंतर ते सौंदर्यातील पार्थिवतेवरच काही वेळ बोलले. काव्याच्या रसग्रहणातून पुन्हा विचारांचे जग सुरू झाले. रवीन्द्रनाथांकडून आचार्य एकदम प्लेटोकडे वळले व ग्रीक लोकांची ‘फॉर्म’ची कल्पना काय होती, याचे विवेचन सुरू झाले. मी अगदी मुग्ध होऊन गेलो आणि ‘प्रज्ञा नवनवोन्मेषशालिनी’ हे शब्द विचारवंतांच्या बाबतीतही कसे सार्थ आहेत, हे कळून आले.
पुढे नोव्हेंबरपासून आचार्यांची प्रकृती फार बिघडत गेली. अखेरच्या आजारात त्यांना पुण्याला प्रथम रावसाहेब पटवर्धनांच्या घरी आणले. मी त्या वेळी रात्री जागायला जात असे. आचार्यांचे चिरंजीव प्रभाकरपंत तेथे असतच. आचार्य मधून-मधून थोडे शुद्धीवर येत. अशीच त्यांना शुद्ध आली असताना, त्यांनी मला ओळखले आणि मुलाला विचारले, ‘‘प्रभाकर, प्रधान आलाय का रे?’’ मी चटकन जवळ जाऊन ‘‘मी इथंच, आपल्याजवळ आहे’’, असे म्हणालो. तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुझ्यासाठी एक टिपण आणलंय.’’ आचार्यांनी त्यांची छोटी बॅग उघडण्यास प्रभाकरला सांगितले आणि वरतीच ठेवलेले टिपण त्यांनी मला दिले. ‘टिळक व क्रांतिकारक यांचे संबंध’ या विषयावरील ते टिपण होते. माझे डोळे एकदम भरून आले. आचार्य जावडेकर मृत्युशय्येवर होते, परंतु त्यांच्यातील ज्ञानोपासक शिक्षक जागृत होता.
दुसऱ्या दिवशी त्यांना जहांगीर नर्सिंग होममध्ये हलवले आणि दोन दिवसांनी त्यांचे निधन झाले. मृत्यू समीप आहे, हे त्यांनी जाणले होते आणि तरीही त्या क्षणी आपल्या शिष्याला जे त्यांना सांगायचे होते, ते त्याच्यासाठी त्यांनी लिहून आणले होते. अशा थोर ऋषितुल्य गुरूच्या पायाशी बसून लोकमान्य टिळकांच्या चरित्राचा अभ्यास करण्याची संधी अ. के. भागवतांना व मला लाभली, यापरते अधिक भाग्य ते कोणते?
आचार्य जावडेकरांनी सत्याग्रही समाजवादाची एक नवी वैचारिक भूमिका आतापर्यंत मांडली असली, तरी राजकारण व तत्त्वज्ञान यांतील अनेक सूक्ष्म विचारांसंबंधी वेगवेगळ्या नव्या छटा त्यांना व्यक्त करायच्या होत्या. या सर्व छटा त्यांच्या भाषणांतून अगर लेखनातून व्यक्त झाल्या असत्याच असे नाही; परंतु चर्चा करताना जे सूक्ष्म व मार्मिक मुद्दे ते मांडीत असत, त्यांतून त्यांच्या मतांचे स्पष्टीकरण होई. आचार्य जावडेकरांच्या मृत्यूने विचारांच्या अशा अनेक सुवर्णकणांना आपण मुकलो आहोत. त्यांनी फारसे लिहिले नसते, अगर भाषणे दिली नसती, तरीही त्यांच्याकडे जाऊन चर्चा करणाऱ्याला नवा प्रकाश मिळाला असता. मिल या तत्त्वज्ञासंबंधी मोर्लेने असे उद्गार काढले की, "We lit our rush lights at the benign lamp of his learning." त्याप्रमाणेच आचार्य जावडेकरांच्या ज्ञानदीपावर अनेकांना आपल्या दिवट्या उजळता आल्या असत्या. हा ज्ञानदीप आता मालवला आहे!
- ग. प्र. प्रधान
वाचा माझ्या जीवनाचे शिल्पकार या प्रकरणातील इतर भाग :
एस्. एम्. पाठीवर थाप मारून म्हणाले, ‘‘प्रधान, तू पास झालास!’’
नानासाहेबांच्या मार्गदर्शनामुळेच मी समाजवादी चळवळीत सतत काम करत राहिलो...
साने गुरुजींचे विचार माझ्या पिढीला मार्गदर्शक ठरले
साधना प्रकाशनाकडून आलेली ग. प्र. प्रधान यांची तीन महत्त्वपूर्ण पुस्तके साधना मिडिया सेंटरसोबतच Amazon वरही उपलब्ध असून ती खरेदी करण्यासाठी क्लिक करा :
लोकमान्य टिळक - पेपरबॅक हार्डकवर
Tags: ग. प्र. प्रधान जन्मशताब्दी माझी वाटचाल माझ्या जीवनाचे शिल्पकार पुस्तक व्यक्तिवेध ग. प्र. प्रधान आचार्य जावडेकर G.P. Pradhan Acharya Javdekar Majhi vatchal Majhya jivanache shilpkar Load More Tags
Add Comment