26 ऑगस्ट 1922 ते 29 मे 2010 असे 88 वर्षांचे आयुष्य लाभले, त्या ग. प्र. प्रधान यांचे जन्मशताब्दी वर्ष आजपासून (26 ऑगस्ट) सुरू होत आहे. 1942च्या 'चले जाव' चळवळीत भूमिगत कार्य करून नंतर दोन वर्षे तुरुंगवास, स्वातंत्र्यानंतर पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात 20 वर्षे इंग्रजीचे प्राध्यापक, त्यानंतर 18 वर्षे विधान परिषदेचे सदस्य (त्यातील दोन वर्षे विरोधी पक्षनेते) आणि मग 14 वर्षे वसंत बापट यांच्यासह साधना साप्ताहिकाचे संपादक अशी त्यांची कारकिर्द होती. त्यांनी दोन डझनहून अधिक पुस्तके लिहली, त्यापैकी तीन महत्त्वपूर्ण पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या साधना प्रकाशनाकडून आल्या आहेत. त्यापैकी 'माझी वाटचाल' या त्यांच्या आत्मचरित्रातील 'माझ्या जीवनाचे शिल्पकार' हे प्रकरण 'कर्तव्य साधना'वरून पाच भागांमध्ये सलग पाच दिवस प्रसिद्ध करत आहोत.
स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तीन महान मूल्यांवर ज्यांचे जीवन अधिष्ठित होते, अशा नेत्यांनी व विचारवंतांनी माझ्यावर जे संस्कार केले; त्यामुळे मी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर समाजवादी चळवळीत काम केले. या नेत्यांचे जे लेखन मी वाचले आणि त्यांची जी भाषणे मी ऐकली, त्यांच्यामुळे माझे मन संवेदनशील झाले आणि समतेचा विचार माझ्या मनात रुजला. या थोर व्यक्तींच्या सहवासात माझ्या जीवनाची घडण कशी झाली आणि ते मला कसे दिसले, याचे निवेदन हा माझ्या आत्मकथनाचा केंद्रबिंदू आहे.- ग. प्र. प्रधान
एस्. एम्. जोशी हे नाव मी हायस्कूलमध्ये असताना वर्तमानपत्रात वाचले होते. मी कॉलेजमध्ये 1938 मध्ये जाऊ लागलो, त्या वेळी राष्ट्रीय वृत्तीच्या कॉलेज विद्यार्थ्यांची स्टुडंट्स युनियन अशी संस्था होती. स्टुडंट्स युनियनच्या सभा आमच्या आळीतच हिंदमाता मंदिरात भरत. मी माझे मित्र अरविंद टिपणीस यांच्याबरोबर एका सभेला गेलो होतो. त्या सभेत एस्. एम्. जोशी यांना विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना प्रथम पाहिले, ऐकले. ते खूप आवेशात बोलले आणि स्वातंत्र्य चळवळीत विद्यार्थ्यांनी आले पाहिजे, हे सांगताना त्यांनी पुढील आशयाचे भाषण केले- ‘‘1926 मध्ये गोरे, मी आणि खाडिलकर यांनी पुण्यात युथ लीगची स्थापना केली आणि नंतर 1930 मध्ये आम्ही युथ लीगच्या सर्व कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत हिरीरीने भाग घेतला. स्टुडंट्स युनियन हे युथ लीगचेच नवे स्वरूप आहे. तुम्ही विद्यार्थ्यांनी आमच्याप्रमाणेच आगामी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यासाठी आत्तापासून तयारी केली पाहिजे.’’
ते भाषण ऐकताना मी खूप प्रभावित झालो. तेव्हा समाजवादी पक्षातर्फे विद्यार्थ्यांसाठी राजकीय अभ्यासवर्ग (त्याला त्या वेळी स्टडी सर्कल म्हणत) चालवला जात असे. अरविंद टिपणीस काही दिवसांनी मला म्हणाला, ‘‘तू येत्या रविवारी आमच्या स्टडी सर्कलला ये.’’ ते स्टडी सर्कल फर्ग्युसन कॉलेजजवळ एल. आर. गोखले वकील (गोदूताई परुळेकर यांचे वडील) यांच्या गणेशवाडीमधील बंगल्यातील एका हॉलमध्ये भरत असे. मी अरविंद टिपणीसबरोबर स्टडी सर्कलला गेलो. त्या दिवशी ना. ग. गोरे यांचे भाषण होते. जयप्रकाश नारायण यांनी लिहिलेल्या ‘व्हाय सोशॅलिझम’ या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणातील विचार त्यांनी समजून सांगितले. मला ते खूप नवे वाटले. भाषणानंतर थोडा वेळ चर्चा झाली. स्टडी सर्कल संपल्यावर मधू लिमये यांनी गोरे आणि एस्. एम्. जोशी यांच्याबरोबर माझी ओळख करून दिली. एस्. एम्. जोशी मला म्हणाले, ‘‘तू आता नियमाने आमच्या स्टडी सर्कलला येत जा.’’
मी स्टडी सर्कलला जाऊ लागलो आणि तेथील मित्रांच्या समवेत एस्. एम्. जोशींच्या नारायण पेठेतील खोलीवरही जाऊ लागलो. तेथे एस्. एम्. जोशी, ना. ग. गोरे, बंडू गोरे, मधू लिमये, विनायकराव कुलकर्णी आदींच्या राजकारणावरील चर्चा, त्याचप्रमाणे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांबद्दलच्या त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया ऐकण्याची मला संधी मिळू लागली. या चर्चा ऐकताना एस्. एम्. यांच्या स्वभावाचे दोन अगदी वेगवेगळे पैलू मला समजून येऊ लागले. काही वेळा ते अत्यंत आग्रहाने आपला मुद्दा मांडीत आणि काही वेळा विनायकराव कुलकर्णींच्या प्रतिपादनावर खट्याळपणे काही तरी बोलून त्यांना डिवचत असत.
दुसरे महायुद्ध 1939 मध्ये सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातील समाजवादी कार्यकर्त्यांची पुण्यात बैठक झाली. एक श्रोता म्हणून मला बैठकीस हजर राहण्याची परवानगी मिळाली होती. त्या बैठकीत एस्. एम्. जोशी यांनी प्रखर स्वातंत्र्यवादी भूमिका मांडली. ‘आपण समाजवादी फॅसिझमचे कट्टे विरोधक आहोत- त्याचप्रमाणे साम्राज्यवादाचेही आम्ही विरोधक आहोत. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे’, हे त्यांच्या भाषणाचे मुख्य सूत्र होते. एस्. एम्. जोशींनी त्यांची ही भूमिका काही दिवसांनी महाड तालुक्याच्या शेतकरी परिषदेत मांडली. त्या भाषणाबद्दल अटक होऊन त्यांना कारावासही सोसावा लागला.
एस्. एम्. जोशी सुटून आल्यावर आम्हा कार्यकर्त्यांच्या समोर त्यांनी जे भाषण केले, ते मला अद्यापही आठवते. त्या भाषणात त्यांनी प्रथम रॉयवादी आणि कम्युनिस्ट पक्ष यांच्या युद्ध सहकार्याच्या भूमिकेचे पूर्णपणे खंडन केले. एका वेळी या युद्धाला साम्राज्यवादी युद्ध म्हणणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाने रशिया या युद्धामध्ये सामील होताच ‘हे लोकयुद्ध आहे’ अशी घोषणा करून ‘आता स्वातंत्र्यलढा न करता आपण ब्रिटिशांना सहकार्य केले पाहिजे’ अशी जी भूमिका घेतली, त्यावर एस्. एम्. जोशींनी त्यांच्या भाषणात कठोर टीका केली. स्वतंत्र हिंदुस्थानच स्वत:चे फॅसिस्ट आक्रमणापासून संरक्षण करू शकेल, या गांधीजींच्या स्वातंत्र्यवादी भूमिकेचे अत्यंत मार्मिक विवेचन करून भाषणाच्या शेवटी एस्. एम्. म्हणाले, ‘‘गांधीजींनी आता वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला असला, तरी ते लवकरच देशव्यापी स्वातंत्र्य आंदोलन करतील, असा मला पूर्ण विश्वास आहे.’’
राष्ट्र सेवादलाची स्थापना 1941 मध्ये झाली आणि एस्. एम्. जोशी दलप्रमुख झाले. त्या वेळी त्यांनी जे भाषण केले, त्याचाही माझ्या मनावर मोठा परिणाम झाला. त्या भाषणाचा आशय पुढीलप्रमाणे होता- ‘‘तरुणांनी स्वातंत्र्यलढ्यात समर्पण वृत्तीने सामील झाले पाहिजे. हा संस्कार तरुणांच्या मनावर करावा, त्यांना स्वातंत्र्यासाठी त्याग करण्याची प्रेरणा द्यावी याकरिता आम्ही राष्ट्र सेवादल सुरू करीत आहोत. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हुकूमशाही वृत्तीला पाठिंबा देत आहे आणि राष्ट्राच्या ऐक्यास तडा जाईल अशी संकुचित हिंदुत्ववादी भूमिका घेत आहे, त्या दोन्हीला माझा कडवा विरोध आहे. परंतु हा विरोध आर. एस. एस.वर टीका करून व्यक्त करण्याऐवजी स्वातंत्र्यासाठी संघर्ष करण्याचा संस्कार तरुण मनांवर करून मी संघाच्या नकारात्मक भूमिकेला उत्तर देईन. आपला प्रमुख शत्रू ब्रिटिश साम्राज्य हा आहे. या साम्राज्यविरोधी लढ्यात आपण अग्रभागी राहिलो, तरच आपले विरोधक निष्प्रभ होतील.’’ एस्. एम्. जोशी हे कधी नकारात्मक भूमिका घेत नसत. मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढताना सर्वस्व देणे या मार्गानेच आपण आपल्या विरोधकांना उत्तर दिले पाहिजे, हा विचार त्यांनी राष्ट्र सेवादलात सतत मांडला आणि त्यामुळेच आम्ही राष्ट्र सेवादलाच्या सर्व प्रमुख तरुण कार्यकर्त्यांनी 1942 च्या ‘चले जाव आंदोलना’त हिरीरीने भाग घेतला. 1939 ते 1942 या काळात एस्. एम्. जोशी यांच्या सहवासात मला राहायला मिळाले, त्यांची भाषणे व त्यांची मित्रांबरोबरची संभाषणे मला ऐकायला मिळाली आणि त्यातूनच माझ्या मनाची घडण होऊन मी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालो.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्र सेवादलातील आम्हा कार्यकर्त्यांशी बोलताना एस्. एम्. जोशी म्हणाले, ‘‘स्वराज्याचे सुराज्य होण्याकरिता स्वातंत्र्याला समतेची जोड दिली पाहिजे. शोषणकर्ता श्रीमंतांचा वर्ग आणि गरिबांचा शोषित वर्ग यांच्या संघर्षात आपण सतत शोषितांच्या बाजूने राहून त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे. यापुढचा लढा समतेचा, समाजवादाचा आहे आणि राष्ट्र सेवादलात समतेचा संस्कार घेतलेल्या तुम्ही तरुणांनी समाजवादी आंदोलनात सामील झाले पाहिजे.’’ पुढे एस्. एम्. जोशी हे स्वत: समाजवादी आंदोलनाचे नेतृत्व करत असताना आमच्यापैकी अनेक जण कामगार संघटनांत आणि ग्रामीण भागातील विधायक कामांत उत्साहाने सामील झाले. माझ्या जीवनावर हा संस्कार खोलवर झाला आणि त्यामुळेच श्रमिकवर्गाशी माझे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले.
पुढे मी एम. ए. झाल्यानंतर फर्ग्युसन कॉलेजमध्ये लेक्चररच्या जागेसाठी अर्ज केला. त्या वेळी इंग्रजी विभागाचे प्रमुख आणि मला शिकवणारे प्रा. भाटे यांनी मला स्पष्टपणे सांगितले की, कॉलेजमध्ये अध्यापन करताना राजकीय काम करता येणार नाही. मी त्यांना, ‘मला सेवादलात काम करता येईल का?’ असं विचारलं. अध्यापनासाठी करावे लागणारे सततचे वाचन आणि प्रत्यक्ष कॉलेजमधील काम यांत अडचण न येता शैक्षणिक स्वरूपाचे काम सेवादलात करता येईल, असे त्यांनी सांगितले. राजकीय काम न करण्याची अट मी स्वीकारली. नंतर काही दिवसांनी मी एस्. एम्. जोशींना हे सांगितले. त्यावर ते म्हणाले, ‘‘तुला सेवादलात तरुणांना बौद्धिक, वैचारिक शिक्षण देण्याचे काम करता येणार आहे ना? तेच तू नीट कर.’’
पुढे एस्. एम्. म्हणाले, ‘‘राजकीय काम करायला अनेक जण उत्सुक असतात, परंतु कसलीही प्रसिद्धी न मिळणारे शैक्षणिक काम करायला फारसे कोणी येत नाहीत. तू आता नानासाहेब गोऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर वाचन कर आणि राष्ट्र सेवादलात राजकीय व सामाजिक समतेचा विचार तरुण मुलांना समजावून सांग.’’ एस्. एम्. जोशींच्या या उद्गारांमुळे माझ्या मनाला वाटणारी खंत दूर झाली आणि मी सेवादलात बौद्धिक विभागात उत्साहाने काम करू लागलो. नानासाहेब गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मी जे वाचन केले, त्यामुळे मी वर्षभरातच हे काम आत्मविश्वासाने आणि उत्कटपणे करू लागलो. भाई वैद्य, बापू काळदाते, बाबा आढाव यांच्यासारख्या बुद्धिमान तरुण मित्रांना नवनवीन ग्रंथांचा, त्यांच्यातील आधुनिक विचारांचा परिचय करून देणे आणि त्यांना वाचनाला व विचार करायला प्रवृत्त करणे यात मला अपार आनंद मिळाला. एस्. एम्. जोशी यांचे माझ्या कामाकडे सतत लक्ष असे आणि ते मला नेहमी सांगत, ‘‘ठोकळेबाज रीतीने एखादी राजकीय विचारसरणी तरुणांच्या मनावर ठसवणे फारसे कठीण नसते. तू ते करू नकोस. सेवादलातील कार्यकर्त्यांत वाचनाची शिस्त आली पाहिजे आणि ते स्वतंत्रपणे विचार करू लागले पाहिजेत, अशी माझी अपेक्षा आहे.’’ एस्. एम्. जोशी हे राजकीय नेते होतेच, पण त्याचबरोबर शिक्षक म्हणूनही त्यांचा दृष्टिकोन अत्यंत उदार व विशाल होता, याचा प्रत्यय मला सतत आला.
एस्. एम्. जोशी यांनी 1962 नंतर काही दिवस ‘पूना डेली न्यूज’ हे वृत्तपत्र वा. रा. कोठारी यांच्याकडून चालवायला घेतले. त्यांनी मला बोलावले आणि ते म्हणाले, ‘‘कॉलेजचे काम सांभाळून तू मला संपादकीय लेखनात नियमाने मदत केली पाहिजेस.’’ मी ते आनंदाने मान्य केले. माझे ज्येष्ठ स्नेही विनायकराव कुलकर्णी हेही त्या वेळी नियमाने लिहीत. आम्ही रोज एस्. एम्.बरोबर चर्चा करीत असू आणि एस.एम. आम्हाला कोणत्या विषयावर काय लिहायचे ते सांगत. दीड-दोन तासांत कॉलमभर मजकूर लिहावा लागे. काही वेळा मनासारखे लेखन झाले नाही की, मी अस्वस्थ होत असे. एस.एम. कमालीचे सहिष्णू होते आणि स्पष्टवक्तेही होते. ते म्हणत, ‘‘आपण उत्तम लिहायचा प्रयत्न करावा; पण ते जमले नाही म्हणून मनाला लावून घ्यायचे नाही. आपल्या ‘पूना डेली न्यूज’मध्ये तू लिहिलेला अग्रलेख फारसा कोणी वाचत नाही, याचे तुला ‘प्रोटेक्शन’ आहे. पण याचा अर्थ ढिसाळपणे लिहिले तरी चालेल, असा मात्र नाही.’’
एस्.एम्. जोशी सतत दौऱ्यावर जात. त्या वेळी बऱ्याच वेळा मीच अग्रलेख लिहीत असे. एस्. एम्. मला म्हणाले, ‘‘प्रधान, मी तुला एक खास सूचना देतो. मी पुण्यात नसताना अग्रलेख कोणत्या विषयावर लिहायचा याचे तुला पूर्ण स्वातंत्र्य आहे; परंतु विषय ठरल्यावर तुझ्या मनात येईल ते लिहायचे नाही. या प्रश्नाबाबत एस.एम.ची प्रतिक्रिया काय असेल, याचा विचार पंधरा मिनिटे तरी करायचा आणि नंतर एस्. एम्. लिहिताहेत असे वाटेल, अशा मजकुराचा अग्रलेख लिहायचा.’’ ही सूचना ऐकून मी गडबडून गेलो आणि म्हणालो, ‘‘हे कसे काय जमणार?’’
एस.एम. म्हणाले, ‘‘जमलेच पाहिजे. गेली वीस वर्षे तू माझ्याबरोबर आहेस. माझी विचार करण्याची रीत तुला माहीत आहे. तुझी विचार करण्याची रीत वेगळी आहे. तुझ्या भावना तीव्र असतात, त्या अग्रलेखात येऊन चालणार नाहीत. तू थोडा तरी एस.एम. होण्याचा प्रयत्न कर.’’ मी हे करीत असे. किती जमले, कोणास ठाऊक! एकदा मी ‘पूना डेली न्यूज’च्या ऑफिसमध्ये बसलो असताना एस.एम. ऑफिसात आले. पाठीवर थाप मारून म्हणाले, ‘‘प्रधान, तू पास झालास.’’ ते काय म्हणतात, हे मला कळेना. त्यांनी खिशातून एक पत्र काढले आणि ते म्हणाले, ‘‘प्रधान, हे पत्र वाच. या माझ्या मित्रानं लिहिलं आहे की, ‘एस.एम., परवाचा अग्रलेख तुम्हीच लिहू शकता’ आणि तो अग्रलेख तुझा आहे! परवा मी इथे नव्हतोच. तू माझ्या सूचनेप्रमाणे विचार करून तो अग्रलेख लिहिलास. माझ्या मनातली प्रक्रिया त्यात बरोबर उमटली, म्हणून म्हणालो की, तू पास झालास.’’
समाजवादी पक्षात 1965 मध्ये फूट पडली आणि एस्. एम्. जोशी हे संयुक्त समाजवादी पक्षाचे अध्यक्ष झाले. माझा कल प्रजा समाजवादी पक्षाकडे होता. एस्. एम्. जोशींनी मला बोलावले आणि ते मला म्हणाले, ‘‘समाजवादी चळवळीतील फूट ही एक दुर्दैवी घटना आहे. या फुटीचा परिणाम आपल्या राष्ट्र सेवादलावर होऊन चालणार नाही. आमच्या राजकीय मतभेदांमुळे सेवादलातील तरुण कार्यकर्त्यांमध्ये फाटाफूट होणार नाही, याची दक्षता तुम्ही काही जणांनी घेतली पाहिजे.’’
मी महाराष्ट्र विधान परिषदेत प्रजा समाजवादी पक्षातर्फे निवडून गेलो, तेव्हा एस्. एम्. जोशींना मी भेटावयास गेलो. ते म्हणाले, ‘‘आता सर्ववेळ राजकीय काम करतानाही तू तुझी आतापर्यंतची शैक्षणिक भूमिका सोडू नकोस. विधान परिषदेतील काम करताना अभ्यास करावा लागतोच. तू तो करशीलच. त्याचबरोबर बाहेरच्या चळवळीशीही निकटचा संबंध ठेव.’’
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मी एस्. एम्. जोशी यांची अनेक व्याख्याने ऐकली. एका व्याख्यानात ते म्हणाले, ‘‘मुंबई राज्यामध्ये ज्या वेळी गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक असे तीन भाषिक प्रदेश होते, त्या वेळी विधी मंडळाचे कामकाज इंग्रजीत चाले. त्यामुळे शेतकरीवर्गातून निवडून आलेले आमदार बोलतच नसत. भाषावार राज्य पुनर्रचनेमुळे भारतातील सर्व राज्यांमध्ये विधी मंडळाचे कामकाज प्रत्येक ठिकाणच्या लोकांच्या भाषेत चालणार आहे. संयुक्त महाराष्ट्रात सर्व राज्यकारभार मराठीत चालेल आणि ग्रामीण भागातून आलेल्या लोकप्रतिनिधींचा प्रभाव आमच्या विधी मंडळावर पडेल. लोकशाहीच्या दृष्टीने हे अत्यावश्यक आहे.’’
मला त्या वेळी एस्. एम्. जोशींच्या या मुद्द्याचे फार महत्त्व वाटले नाही. परंतु, 1966 मध्ये मी विधान परिषदेत निवडून गेल्यावर विदर्भातील एक शेतकरी आमदार श्री. बुचके यांनी जेव्हा कापसाच्या प्रश्नावर बोलताना तेथील शेतकऱ्यांचा प्रश्न प्रभावी रीतीने रांगड्या मराठीत मांडला, तेव्हा मला एस्. एम्. जोशींच्या त्या भाषणाची आठवण झाली. भाषावर राज्य पुनर्रचनेमुळे भारताची लोकशाही समृद्ध कशी झाली आहे, हे विधी मंडळाचे कामकाज मराठीत चालत असल्यामुळे मला उमगले.
आणीबाणीत आम्ही अनेक कार्यकर्ते तुरुंगात असताना एस्. एम्. जोशी, नानासाहेब गोरे, डॉ. मंडलिक, लालजी कुलकर्णी हे आमच्या सर्वांच्या घरी जाऊन कुटुंबीय मंडळींची चौकशी करीत आणि काही अडचण आल्यास दूर करीत. त्यामुळे माझ्या मनावरचा ताण खूप कमी होई.
महाराष्ट्रात 1978 मध्ये जनता पक्षाला बहुमत मिळाले नाही आणि वसंतरावदादांचे मंत्रिमंडळ आले. त्या वेळी विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद कोणाला द्यावयाचे, हा प्रश्न आला. मी सर्वांत ज्येष्ठ आमदार होतो. एस्. एम्. जोशी यांनी मला बोलावले आणि ते म्हणाले, ‘‘बुलढाणा जिल्ह्यातील एक दलित आमदार अर्जुनराव कस्तुरे जनता दलात आले आहेत. त्यांना विरोधी पक्षनेता करावे, असे मला वाटते.’’ मी तत्काळ म्हणालो, ‘‘तुम्हाला योग्य वाटेल तेच करा, माझा कसलाही आग्रह नाही.’’
पुढे काँग्रेस पक्षात फूट पडली आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन करून जनता दलाने मंत्रिमंडळात सामील होण्याचा निर्णय झाला. त्या वेळी वेगवेगळ्या घटक पक्षांना सांभाळून मंत्रिमंडळ बनविणे, ही एक मोठी कसोटीच होती. पुण्यातून कोणाला मंत्रिपद द्यायचे हा प्रश्न आला, तेव्हा मी कोणाला भेटलोही नाही. पुढे मला समजले की, बैठकीत एस्. एम्. जोशी म्हणाले, ‘‘शांता नाईक 1942 मध्ये चळवळीत होती. आणीबाणीतही ती दीड वर्ष जेलमध्ये होती. पुण्यातून स्त्री आमदाराला मंत्रिपद दिले पाहिजे. प्रधानला मंत्री केले नाही, तरी तो नाराज होणार नाही. पक्षाचे काम करीत राहील, ही मला खात्री आहे.’’ मृणालताई गोरे या त्या बैठकीत होत्या, त्यांनी नंतर मला हे सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘एस्. एम्. जोशींचा तुमच्यावर विलक्षण विश्वास आहे.’’ मला हे ऐकून धन्य वाटले.
पुढे 1980 मध्ये मी विरोधी पक्षनेता झालो. तेव्हा एस्. एम्.ना फार आनंद वाटला. ते मला म्हणाले, ‘‘तुला आता काम करण्याची फार मोठी संधी आहे. महाराष्ट्रभर दौरे करीत राहा. म्हणजे खरे महत्त्वाचे प्रश्न कोणते ते तुला समजतील आणि विरोधी पक्षनेता म्हणून तू ते आग्रहाने मांडशील.’’
शेवटच्या कॅन्सरच्या आजारात एस्. एम्.ची प्रकृती खालावली होती. यापुढे उपचारांचा फारसा उपयोग होणार नाही, म्हणून त्यांना पुण्याला घरीच आणले होते. यातना होत होत्या. पण एस्. एम्.च्या चेहऱ्यावरचा आनंद कधी मावळला नाही. ते टीव्हीवर क्रिकेट मॅच पाहायचे, बातम्या ऐकायचे. किशोरी आमोणकरांच्या गाण्याच्या कॅसेट्स ऐकताना त्यांचे मन एकदम प्रसन्न व्हायचे. कांचन, अजेय शुश्रूषा करीत होते. कार्यकर्ते येऊन बसत होते. एस्. एम्. सर्वांशी खेळीमेळीने बोलत. थट्टामस्करी करीत. स्वत:च्या दुखण्यावरही विनोद करीत. त्यांच्या कमरेच्या हाडाच्या आत कॅन्सर पसरला होता. ते एक दिवस म्हणाले, ‘‘मी आयुष्यभर मागासांसाठी, पिछड्यांसाठी काम केले, म्हणून कॅन्सरही माझ्या शरीरात पिछडा होऊन आला.’’
आता कोणत्याच औषधांचा उपयोग होत नव्हता. भूक मंदावली होती, शरीर थकत चालले होते; परंतु मन या अखेरच्या दिवसांतही समाजचिंतनातच गुंतले होते. पुण्यात 1 एप्रिलला ‘समता परिषद’ भरणार होती. बाबा आढाव, निळू फुले, भाई वैद्य आदींनी या परिषदेसाठी अविश्रांत धडपड केली होती. दि. 30 मार्चला संध्याकाळी भाई वैद्य एस्. एम्.कडे आले. त्यांच्या शेजारी बसून भाई म्हणाले, ‘‘मी उद्या मुंबईला जाणार आहे. समता परिषदेतील ठरावाचा मसुदा निश्चित करायचा आहे.’’ एस्. एम्.च्या डोळ्यांत नेहमीचे तेज आले. ते बोलू लागले. ‘‘ठरावात दोन गोष्टी आल्या पाहिजेत. सर्व जाती-धर्मांच्या लोकांमध्ये सामंजस्य निर्माण झाले पाहिजे आणि मागास समाजांना, जातींना न्याय मिळाला पाहिजे.’’ त्यांना पुढे बोलवेना.
भाई म्हणाले, ‘‘तुमचे हे विचार मी ठरावात घालतो.’’ भाई मुंबईला जाऊन 31 मार्चला रात्री परत आले. दि. 1 एप्रिलला सायंकाळी पुण्यात साने गुरुजी स्मारकावर समता परिषद भरणार होती. त्या दिवशी सकाळीच एस्. एम्.ची शुद्ध हरपली. नानासाहेब गोरे आणि कार्यकर्ते चिंतातूर होऊन एस्. एम्.च्या घरात बसून होते आणि अखेर त्याच दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता एस्. एम्.ची प्राणज्योत निमाली. एक धगधगते यज्ञकुंड शांंत झाले.
दुसऱ्या दिवशी सकाळी अंत्यदर्शनासाठी एस्. एम्.चे शव साने गुरुजी स्मारकावर आणून ठेवण्यात आले. ‘समता परिषद’ ज्या मंडपात होणार होती, त्या मंडपातच ते ठेवले. सकाळपासून महाराष्ट्राच्या सर्व भागांतून एस्. एम्.चे असंख्य अनुयायी आणि समता परिषदेचे कार्यकर्ते अखेरची वंदना देण्यासाठी एकत्र जमले. भाई वैद्य यांनी समता परिषदेच्या ठरावाबद्दल एस्. एम्.नी त्यांना जे सांगितले होते, ते सर्वांना सांगितले. एस्. एम्.च्या अपेक्षेप्रमाणे समता परिषदेसाठी तयार केलेला ठराव वाचून दाखवला. तो एस्. एम्.च्या पायाशी ठेवून भाई रुद्ध कंठाने म्हणाले, ‘‘समतेच्या लढ्याला या थोर नेत्याचा अखेरचा संदेश म्हणजे हा ठराव.’’ कार्यकर्त्यांनी उभे राहून एस्. एम्.ना मानवंदना दिली आणि थोड्या वेळाने एस्. एम्.ची अंत्ययात्रा मार्गस्थ झाली.
- ग. प्र. प्रधान
साधना प्रकाशनाकडून आलेली ग. प्र. प्रधान यांची तीन महत्त्वपूर्ण पुस्तके साधना मिडिया सेंटरसोबतच Amazon वरही उपलब्ध असून ती खरेदी करण्यासाठी क्लिक करा :
लोकमान्य टिळक - पेपरबॅक हार्डकवर
Tags: ग. प्र. प्रधान जन्मशताब्दी माझी वाटचाल एस. एम. जोशी माझ्या जीवनाचे शिल्पकार G. P. Pradhan majhi vatchal majhya jivanache shilpkar Load More Tags
Add Comment