26 ऑगस्ट 1922 ते 10 मे 2010 असे 88 वर्षांचे आयुष्य ग. प्र. प्रधान यांना लाभले. स्वातंत्र्यसैनिक व राष्ट्र सेवादलाचे सैनिक, इंग्रजीचे प्राध्यापक, विधान परिषदेचे सदस्य, साधना साप्ताहिकाचे संपादक आणि इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांमध्ये विपुल लिहिणारे लेखक अशी त्यांची पंचरंगी ओळख सांगता येईल. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या विशेष महत्त्वाच्या पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या आणण्याचे काम साधना प्रकाशनाने हाती घेतले. त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून त्यांचे 'हाजीपीर', 'कांजरकोट' आणि 'सोनार बांगला' हे त्यांचे तीन वैशिष्ट्यपूर्ण रिपोर्ताज 2021 मध्ये दोन पुस्तकांत प्रसिद्ध झाले.
1965 चे भारत-पाकिस्तान युद्ध झाले तेव्हा प्रधानसरांनी पश्चिम पाकिस्तानच्या सीमेवर जाऊन सैनिक व नागरिक यांच्याशी जो संवाद केला तो 'हाजीपीर' या पुस्तकात आला आहे. त्यानंतर 1968 मध्ये, आंतरराष्ट्रीय लवादाच्या निर्णयानुसार कच्छचा काही भूभाग भारताने पाकिस्तानला दिला तेव्हा केलेल्या सत्याग्रहात सहभागी होण्याचा अनुभव त्यांनी 'कांजरकोट' या छोट्या पुस्तिकेत लिहिला. या दोन्हींचा संदर्भ लक्षात घेऊन 'हाजीपीर' व 'कांजरकोट' हे दोन्ही आता एकत्रच प्रकाशित केले आहेत.
1971 ला भारत पाकिस्तान युद्ध झाले, त्याला बांगलादेश मुक्तिसंग्रामाची पार्श्वभूमी होती. ते युद्ध संपल्यावर ग. प्र. प्रधान यांनी बांगला भूमीत जाऊन तेथील सैनिक व नागरिक यांच्याशी संवाद करून जो रिपोर्ताज लिहिला त्याचे पुस्तक म्हणजे सोनार बांगला. 2021 मध्येच ही दोन्ही पुस्तके इ-बुक स्वरूपात 'किंडल'वर आली. प्रधान सरांच्या 101व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने ही दोन्ही पुस्तके आता ऑडिओ स्वरूपात 'स्टोरीटेल'वरही उपलब्ध करून देत आहोत. या दोन्ही ऑडिओबुक्ससाठी वाचन केले आहे, गौरी देशपांडे यांनी.
त्यातील हाजीपीर व कांजरकोट या ऑडिओबुकच्या पहिल्या प्रकरणातील हा 13 मिनिटांचा निवडक भाग आहे. एकूण ऑडिओबुक पाच तासांचे असून ते ऐकण्यासाठी स्टोरीटेलचे सबस्क्रिप्शन आवश्यक आहे.
हे पुस्तक साधना प्रकाशनाच्या वेबसाईटवरून छापील किंवा इ-बुक स्वरुपात खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
स्टोरीटेलवर हे संपूर्ण पुस्तक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
Tags: मराठी साहित्य ललित बांगलादेश ग. प्र. प्रधान भारत पाकिस्तान गौरी देशपांडे Load More Tags
Add Comment