प्रधान चरित्र

ग. प्र. प्रधान यांच्या जन्मशताब्दी समाप्तीनिमित्ताने...

स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणारा स्वातंत्र्य सैनिक, राष्ट्र सेवा दल व समाजवादी चळवळीत बौद्धिके घेणारा अभ्यासू कार्यकर्ता, फर्ग्युसन महाविद्यालयातील इंग्रजीचे नामवंत प्राध्यापक, व्यासंगी वक्ते, उत्तम लेखक, विधान परिषदेतील प्रभावी आमदार व विरोधी पक्षनेते, साने गुरुजींच्या ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष- अशा विविध रूपांनी प्रा. ग. प्र. प्रधान अवघ्या महाराष्ट्राला परिचित होते. 2007 मध्ये समीर शिपूरकर यांच्या संकल्पनेतून 'प्रधान विचार प्रधान चरित्र' या नावाने प्रधान सरांवरील माहितीपटाची निर्मिती झाली. त्या माहितीपटाच्या पहिल्या भागात (प्रधान विचार) प्रधान सरांनी लोकशाही समाजवादी चळवळीचं मूल्यमापन केलेलं आहे. 26 ऑगस्ट 2022ला प्रधान सरांचे जन्मशताब्दी वर्ष संपत आहे. त्यानिमित्ताने त्या माहितीपटाच्या दुसऱ्या भागाचे हे शब्दांकन.. 

‘‘साधारणत: साडेपाचला उठतो. सव्वा सहा-साडे सहाला फिरायला जातो. फिरून आलो की, चहा पितो. अंघोळबिंघोळ सर्व आठ-साडेआठपर्यंत पुरं करतो. वर्तमानपत्र नऊ वाजेपर्यंत वाचून संपवतो. नऊ ते साडे बारा रिगरसली इंटेलेक्च्युअल वर्क; वाचन-लेखन! त्या वेळी कुणाला सहसा भेटत नाही. जेवल्यावरती एक तासभर विश्रांती. मग तीननंतर लाइट पत्रव्यवहार इत्यादी. चार ते सहा कोणीही आलं तरी भेटायचं. संध्याकाळी फिरायचं. रात्री साडेआठ-नऊ झाले की, वाचत पडायचं आणि झोप आली नाही, तरीदेखील दहा वाजता अंथरुणात जायचं’’.

प्रधान सरांच्या या माहितीपटाचा ड्राफ्ट त्यांनाच दाखवायला गेलो होतो. स्वत:ला असं बघताना सर आनंदून जात होते. ‘आपण सलग इतका वेळ कसं बोललो’, म्हणून विस्मयचकितही होत होते. (‘‘छान! उत्तम रेकॉर्ड केलंय’’) नंतर सर नेहमीसारखं म्हणाले, ‘‘मी काही इतका मोठा माणूस नाही. मला उगीच मोठेपण देता’’. जुने फोटो बघताना समोरच्या दृश्यांना ते मनापासून प्रतिसाद देत होते. ही उत्स्फूर्तता आणि निरागसता आपल्यातनं कधी गेली? आपण आताचे लोक असे पहाडासारखे घट्ट कसे? आपल्याला काहीच भावत नाही; उचंबळून येत नाही! मार्क्सचा फोटो दिसला, तेव्हा सरांनी चटकन हात जोडले. हे नेमकं काय होतं? जे जे उत्तुंग पाहिलं, त्याच्यासमोर झुकावं, हे खरंतर आपोआपच होत असणार. श्रद्धा, तर्क, रॅशनॅलिटी या सगळ्यांच्या पलीकडचं निखळ माणूसपण आम्ही बघत होतो.

संस्कारक्षम वयात ज्या अनेक साध्यासुध्यादेखील घटना घडतात, त्यांच्यामुळे आपलं मन घडत असतं. आता घरातल्या वातावरणाचा किती संस्कार होतो, हे मी अनुभवलेलं आहे. आमच्या घरात आमच्याभोवती - म्हणजे मी, माझी बहीण यांच्याभोवती - नेहमी पुस्तकं असायची. माझे वडील 1910 मध्ये संस्कृत विषय घेऊन बी. ए. झाले होते. त्यांना वाचनाची विलक्षण आवड होती आणि त्यांच्या सहवासात राहिल्यामुळे चौथी पास झालेल्या माझ्या आईलादेखील मासिक मनोरंजन या साप्ताहिकामधल्या गोष्टी वाचणं किंवा इतरही वाचनाची आवड होती. त्यामुळे ‘आपल्या मुलांनी वाचलं पाहिजे. तरच ती मोठी होतील’, असं आई-वडील दोघांनाही वाटत होतं. त्यामुळे अगदी मला आठवतं, पुणे जिल्ह्यात इंदापूरसारख्या खेड्यात, तालुक्याच्या गावी वडलांची त्या वेळी नोकरी होती. 1927 साल होतं ते; आणि या 1927 साली आमच्या घरी वासुदेव गोविंद आपटे यांनी चालवलेलं आनंदविवेक हे मासिक, शालापत्रक हे मासिक अशी दोन्हीही मासिकं नियमाने येत असत आणि ती आम्ही वाचत असू. वाढदिवस आला की, वडील मला खेळणं घेऊन देत नसत. दर वाढदिवसाला तीन पुस्तकं घेऊन देत असत. याचा मनावर फार परिणाम झाला.

इंदापूरला आम्ही चार इयत्ता शिकलो. मग वडलांची बदली सातारला झाली आणि सातारला एका दुसऱ्याच घटनेने माझ्या मनावर संस्कार झाला, आणि तो घराच्या संस्कारापेक्षा वेगळा झाला. म्हणजे आमच्या घरात पारंपरिक वातावरण होतं. आषाढी एकादशी, शिवरात्र हे उपवास सगळ्यांनी करायचे. रामनवमीचा उत्सव व्हायचा. नवरात्रामध्ये नऊ दिवस उत्सव व्हायचा. हे आमच्या घरात चालायचं. कर्मठ नव्हतं घर, पण असं होतंच. जातीयता फार तीव्रतेने व्यक्त होत होती, असं नाही, पण आईचा कप वेगळा आणि कामवाल्या बाईचा कप वेगळा हे मात्र मला लहानपणीदेखील दिसत होतं. त्या वेळी मी सातारा हायस्कूलमध्ये शिकत होतो. तिथे माझ्या वर्गात कर्मवीर अण्णांचा मुलगा आप्पा होता आणि आप्पा माझा दोस्त होता; वर्गातल्या मित्रांशी आपली दोस्ती असते त्याप्रमाणे. धनीणीच्या बागेत कर्मवीरांनी मुलांसाठी जे वसतिगृह चालवलं होतं, तिथे आप्पाबरोबर मी एक दिवस गेलो. त्या वेळी कर्मवीरांना पाहिल्यावर माझी छाती दडपून गेली. त्यांची भव्य शरीरयष्टी, त्यांची दाढी, त्यांचं मोठ्याने हसणं, त्याचप्रमाणे रागावले की संतापाने बोलणं हे सगळं वेगळं होतं. म्हणजे आदिमानव जसा असावा, तसंच मला त्यांचं दर्शन वाटलं; पण तसं नाही. मी मधनंमधनं जायला लागलो आणि मला असं दिसलं की, या वसतिगृहामध्ये जात-धर्म न पाळता सगळे विद्यार्थी एकत्र बसतात, खेळतात, मुलं आपापला स्वयंपाकही करतात; भांडीही घासतात आणि तरीदेखील त्यांच्यातले काही पहिला नंबरही मिळवतात. तिथलं जे मनमोकळं वातावरण मी पाहिलं, त्या वेळी ‘आपलं घरकुल क्षुद्र आहे, संकुचित आहे’, असं मला वाटायला लागलं. माझ्या पांढरपेशा जगाच्या भिंतींना त्या वेळी जबरदस्त हादरा बसला आणि मला असं वाटलं की, ‘मी या जगात नाही राहणार. मी कर्मवीर अण्णांच्या वसतिगृहाच्या जगात जाईन’. हा माझ्यावरचा समतेचा संस्कार फार दीर्घकाल झाला. कारण तिथे तीन-चार वर्षं मी जात होतो आणि याचा मला आयुष्यात फार मोठा फायदा झाला, असं मला वाटतं.

नंतर आम्ही पुण्यालाच आलो. वडलांची तालुक्याच्या गावी बदली झाली. ‘मुलं शिकली पाहिजेत’, म्हणून पुण्याला बिऱ्हाड केलं, आणि 1935 साली पुण्याला जे बिऱ्हाड झालं, ते अजूनपर्यंत मी पुण्यातच आहे, असं या शहराशी माझं नातं जुळलेलं आहे. या शहरातल्या ग्रंथांनी, या शहरातल्या भाषणांनी मला घडवलेलं आहे. इथल्या नगर वाचनालयात वडलांनी माझं नाव घातलं आणि तिथे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या इंग्रजी आत्मचरित्राचा नानासाहेब गोरेंनी केलेला मराठी अनुवाद प्रथम माझ्या हातात पडला. मी त्या वेळी सहावीत, म्हणजे आजच्या दहावीत होतो. पण ते पुस्तक वाचत असताना ‘स्वातंत्र्य चळवळ म्हणजे काय’, हे मला उमगलं. त्याच दरम्यान माझे मामा माझ्याकडे आले होते. हे खादी वापरणारे माझे मामा आम्हा मुलांना समजून घेत. आम्ही कोणतेही प्रश्न विचारले, तरीदेखील आमचं समाधान करीत. त्या मामांवर आईचं, वडलांचं फार प्रेम होतं. आई माझ्या वडलांना म्हणायची, ‘आपला जगू भाऊ इतका चांगला आहे, पण तो देवाची पूजा का नाही करत?’ तेव्हा माझे वडील म्हणाले, ‘नसेल करत, पण तो चांगला वागतो की नाही!’ हे खरं महत्त्वाचं आहे. जवाहरलाल नेहरू ज्या वेळी पुण्यात आले, त्याच वेळी मामा पुण्यात होते. ते मला जवाहरलालजींचं भाषण ऐकायला घेऊन गेले आणि ते भाषण ऐकताना मी विलक्षण प्रभावित झालो. ‘जवाहरलालजी जणू माझ्याशीच बोलतायत’, असं मला वाटलं. त्याचा माझ्या मनावर परिणाम झाला. ते ज्या वेळी म्हणाले की, ‘तरुणांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला पाहिजे’, त्या वेळी ‘आपल्याला असा भाग पुढे घेता येईल का?’, असं माझ्या मनामध्ये आलं. पुढे सुभाषबाबू इथे आले होते, तेव्हा त्यांच्या गाडीच्या भोवती साखळी धरणारा मी एक विद्यार्थी होतो. याही गोष्टींचा परिणाम होतो.

पुढे मी कॉलेजमध्ये गेलो आणि मधू लिमये, अरविंद टिपणीस या माझ्या मित्रांमुळे विद्यार्थी चळवळीत, म्हणजे स्टुडंट्‌स युनिअनमध्ये सामील झालो. तिथे मी सभेला गेलो. तर आम्हांला सांगितलं ‘सेनापती बापट बोलणार आहेत’. खादीचे साधे कपडे घातलेले सेनापती आले, त्या वेळी मला वाटलं, ‘हे कसले सेनापती!’ नंतर ते म्हणाले, ‘मी एक कविता म्हणणार आहे’. त्यामुळे तर मी अधिकच चकित झालो. पण ते म्हणायला लागले, आई स्वतंत्र नाही, आम्ही मुले कशाला / आईस सोडवाया, येणार कोण बोला... पुढे ते म्हणाले, ‘काय रे मुलांनो, स्वातंत्र्य चळवळीत मातृभूमीला मुक्त करण्याकरता येणार की नाही?’ आणि आम्ही सगळे म्हणालो, ‘हो!’ त्याच वेळी मनामध्ये ही गाठ बांधली गेली, हे लक्षात ठेवा. त्यानंतर साने गुरुजी पुण्याला आले होते. साने गुरुजींचा साधा पोशाख, त्यांचं अगदी सामान्य व्यक्तिमत्त्व यांमुळे खरं म्हणजे माझी थोडी निराशा झाली. त्यामुळे मला वाटलं, ‘काय! आपण कशाकरता आलो!’ आम्ही फर्गसन महाविद्यालयाच्या मागच्या बाजूच्या टेकडीवर चढायला लागलो. चढत चढत गोखलेंचं स्मारक असलेल्या ठिकाणी पोहोचल्यावर गुरुजी एकदम म्हणाले, ‘आता आपण इथेच बसू या’. पुढे ते म्हणाले, ‘हे नामदार गोखलेंचं स्मारक आहे, हे माहितीये ना?’ तेवढं मात्र आम्हांला माहिती होतं.

गुरुजी नंतर म्हणाले, ‘मी ज्या वेळी सिनिअर बी.ए.ला होतो, त्या वेळी मी गोखलेंचं चरित्र लिहिलं होतं. ते लिहायला सुरुवात करण्यापूर्वी मी प्रथम इथे आलो आणि शपथ घेऊन आणि गोखलेंच्या स्मृतीला प्रणाम करून लिहायला सुरुवात केली’. त्यानंतर गुरुजी 35-40 मिनिटं गोखलेंच्या जीवनाबद्दल जे बोलले, त्यामुळे आम्हांला गोखलेंच्या जीवनाचं वेगळंच दर्शन झालं. नाहीतर माझ्यासारख्या मुलांना टिळक जहाल, गोखले मवाळ एवढंच माहिती होतं, पण गांधीजी गोखलेंना गुरू का मानत, ते गुरुजींनी सांगितलं. ते सांगितल्यानंतर गुरुजी म्हणाले, ‘नामदार गोखलेंनी इथे देशभक्तीची प्रतिज्ञा केली. मुलांनो, तुम्हीपण प्रतिज्ञा करा की, येत्या स्वातंत्र्य चळवळीत तुम्ही सहभागी व्हाल. प्रतिज्ञा जाहीररित्या बोलून करायची नाही. तुम्ही ती स्वत:शीच करा. तुमच्या सदसद्विवेकबुद्धीवर माझा विश्वास आहे’. आणि आम्ही सर्वांनी ती प्रतिज्ञा घेतली आणि मला सांगताना अभिमान वाटतो की, त्या दिवशी आम्ही जे दहा-बारा जण होतो, ते सर्व जण पुढल्या 1942च्या चले जाव चळवळीत भाग घेऊन तुरुंगामध्ये गेलो. आमच्या कुवतीप्रमाणे आम्ही काम केलं, पण आम्ही तुरुंगामध्ये गेलो.

याच वेळी समाजवादी पक्षातर्फे विद्यार्थ्यांसाठी जो अभ्यासवर्ग चालवला जायचा, त्याला मी मधू लिमयेंबरोबर जायला लागलो. जयप्रकाश नारायण यांनी लिहिलेल्या ‘व्हाय सोशलिझम’ या पुस्तकाच्या नानासाहेब गोरेंनी केलेल्या मराठी अनुवादाचं सामुदायिक वाचन आम्ही त्या वर्गात करत होतो. मधून मधून एस. एम. आणि गोरे त्याच्यावर भाष्य करत होते. त्यामुळे एक वेगळाच विचार मला कळला. तो मला माहिती नव्हता. मला स्वातंत्र्य चळवळ माहिती होती, ‘पण उद्याचं स्वातंत्र्य गरिबासाठी असलं पाहिजे’, हा विचार मला तिथे कळला. त्यानंतर मी तिथे बौद्धिक ऐकत असे. त्याहीपेक्षा तिथल्या चर्चा फार महत्त्वाच्या असत. उदाहरणार्थ, बंडू गोरे हा माझ्यापेक्षा पाच-सहा वर्षांनी मोठा होता, पण त्याचं व्यक्तिमत्त्व अगदी प्रखर होतं. तो एकदा आम्हांला चर्चेमध्ये काय म्हणाला? ‘आपण ज्या वेळी मोठे होतो, आपल्याला समजायला लागतं, त्या वेळी आपल्या बुद्धीप्रमाणे आपण राजकीय पक्ष निवडतो. पण आपल्या धर्माचं काय? मी हिंदू आईबापांच्या पोटी जन्माला आलो, म्हणून हिंदू होतो. मला हे मान्य नाही. विसाव्या वर्षानंतर सर्व तरुण मुलामुलींना सगळे धर्म समजावून सांगितले पाहिजेत आणि त्यांना जो पटेल, तो धर्म त्यांनी स्वीकारला पाहिजे’. आता बंडूच्या या विचाराने मी थरारून गेलो. पण या सगळ्यातून ‘स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला पाहिजे’, हा संस्कार मनावर प्रामुख्याने झाला. तिथे मग आमचा शिरूभाऊंशी परिचय झाला आणि मी शिरूभाऊंच्या खोलीवर जायला लागलो. शिरूभाऊ लिमये हे एस. एम., नानासाहेब यांच्यापेक्षा थोडेसे लहान. त्यांच्या खोलीमध्ये क्रांतिकारकांच्या जीवनावरची प्रक्षिप्त पुस्तकं असायची आणि ती वाचल्यानंतर मला क्रांतिकारकांबद्दल ओढ वाटायला लागली. मला वाटलं की, ‘किती तेजस्वी यांचं जीवन! यांच्या मानाने आपलं जीवन ते काय!’ त्याचा मनावरती परिणाम झाला.

1941 साली एस. एम. जोशींनी ज्या वेळी राष्ट्रसेवा दल सुरू केलं, त्या वेळी यदुनाथ थत्ते, वसंत बापट, नाना डेंगळे, मी असे आम्ही सगळे पहिल्या दिवशी सेवादलात गेलो आणि ‘तुम्ही उद्याच्या स्वातंत्र्य चळवळीत आलं पाहिजे’, असं आम्हांला सेवादलात मुख्यत्वे सांगितलं गेलं. त्या वेळी आमचे जे संघातले मित्र होते, त्या सर्वांना हिटलरबद्दलच आकर्षण वाटत होतं. हिटलरचा वंशश्रेष्ठत्वाचा मुद्दा आणि एकचालकानुवर्तित्व, हुकूमशाही या गोष्टींबद्दल त्यांना आकर्षण वाटत होतं. मात्र एस.एम.नी आम्हांला सांगितलं की, ‘आपल्याला लोकशाही मार्गानेच गेलं पाहिजे. तसंच कृपा करून हे लक्षात ठेवा की, संघाच्या विरोधी म्हणून मी सेवादल काढलेलं नाही. तुम्ही स्वातंत्र्य चळवळीत भाग घ्यावा, या सकारात्मक भूमिकेतून मी सेवादल काढलेलं आहे. संघ चुकीच्या मार्गाने जातो आहे. त्यांचा विरोध तर आपण करूच, पण याच्यापेक्षादेखील आपल्याला स्वातंत्र्य चळवळीत भाग घ्यायचा आहे’. नंतर 1942 साली सेवादलाचं एक शिबिर झालं. त्या शिबिरामध्ये आम्ही मित्रांनी चळवळीत सामील होण्याची एक प्रतिज्ञा केली.

पण या शिबिरानंतर शिरूभाऊ म्हणाले की, ‘आता वेगवेगळी स्क्वॉड्‌स करायची. एक डिस्ट्रकशन स्कॉड, ज्याच्यामध्ये सॅबोटिजिंग करणारे शूर लोक असतील. दुसरी प्रचाराची, तिसरी बुलेटिनची अशा वेगवेगळ्या स्कॉड्‌स करायच्या’. तर आमच्यातले जे शूर होते - म्हणजे प्रभाकर साळवी, बाबुराव चव्हाण, वसंत बापट, वसंत नगरकर, रामसिंग, हरी लिमये, निळू लिमये - ते हिमतीने म्हणाले की, ‘आम्ही डिश स्कॉडमध्ये येऊ’. पण मी काय म्हणालो? ‘मी बी स्कॉडमध्ये जाईन’. शिरूभाऊ म्हणाले, ‘का रे?’ तर म्हटलं, ‘शिरूभाऊ, मी महाविद्यालयात स्कॉलर विद्यार्थी आहे. मी कधी साहस केलं नाही आणि समजा मी या स्कॉडमध्ये आलो आणि पकडला गेल्यावर पोलिसांच्या माराला भिऊन कुणाचं नाव सांगितलं, तर मला ते जन्मभर टोचत राहील. त्याच्यापेक्षा मला तुम्ही सत्याग्रह करून दहा वेळा तुरुंगात जायला सांगा किंवा बुलेटिन्स वाटायला सांगा, मी त्याच्यामध्ये भाग घ्यायला तयार आहे’. असं सांगून मी माझी मर्यादा प्रांजळपणे कबूल केली. महाविद्यालयात मी खरोखर स्कॉलर विद्यार्थी होतो. मला पहिल्या वर्गात यायचं होतं, पण चळवळ जवळ आल्याने मन विचलित झालं आणि मला जेमतेम सेकंड क्लास मिळाला.

1942 साल आलं आणि घरदार सोडून ऑगस्ट महिन्यामध्येच मी चळवळीत प्रवेश केला. या चळवळीत काही दिवस काम केल्यानंतर मी पकडला गेलो आणि येरवडा तुरुंगात माझी रवानगी झाली. मग आम्हांला आचार्य भागवत, आचार्य जावडेकर, काकासाहेब गाडगीळ यांची व्याख्यानं ऐकायला मिळाली. तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या विषयांवरची व्याख्यानं ऐकून माझं मन संपन्न झालं आणि पुढच्या काळामध्ये माझी जी वैचारिक भूमिका घडली, ती तुरुंगवासात घडली, असं मी तुम्हांला सांगीन. काही दिवसांनी साने गुरुजींना आमच्या बराकीत आणल्यामुळे मला अतिशय आनंद वाटला. साने गुरुजींचं व्यक्तिमत्त्व असामान्य होतं; ते साधूच होते. म्हणजे साने गुरुजींनी तुरुंगाधिकाऱ्याला सांगितलं की, मला मैला काढण्याचं काम द्या. तुरुंगाधिकाऱ्याने ते नाकारलं, पण संडास साफ करण्याचं काम आपणहून मागणारा हा खरा असामान्यच माणूस! अशा साने गुरुजींजवळ मी राहिलो. त्यांचं ते बोलणं, चालणं यांचा किती संस्कार झाला, हे मला शब्दांत सांगता येणार नाही, पण हे वेगळ्या कोटीतले. या माणसाचं मनच वेगळं होतं. या माणसाची संवेदना वेगळी होती.

1942 सालानंतर मी सुटलो. आता माझ्या मनात एक रुखरुख होती की, माझ्या बरोबरीच्या अनेक मित्रांनी त्या वेळी भूमिगत चळवळीत साहसाची अनेक कामं केली होती. मला असं वाटलं, ‘आपल्याला हे काही करायला मिळालं नाही!’ पण भूमिगत चळवळीशी त्यानंतर माझा जास्त संबंध आला; मात्र तो अगदी वेगळ्या रितीने. 1944 साली गांधीजी तिथे आले असताना ते डॉ. दिनशांच्या निसर्ग केंद्रात राहत होते. तिथे मी स्वयंसेवक म्हणून काम करत होतो. एक दिवस प्यारेलालजी म्हणाले, ‘जोखमीचं काम दिलं तर करशील का?’ मी म्हणालो, ‘काय काम आहे ते सांगा’. मग म्हणाले, ‘एका ठिकाणी जा, म्हणजे तुला ते सांगतील’. मी त्या ठिकाणी गेलो. तिथे गेल्यावर मला एका गृहस्थांनी सांगितलं, ‘अरुणा असफअली गांधीजींना भेटायला येणार आहेत. त्या तिथे पकडल्या जाता कामा नयेत. ही जबाबदारी तुझी आहे. आम्ही अरुणाबाईंना मदत करू. आम्ही आमच्या बाजूने खटपट करू, पण तुम्ही तुमच्या बाजूने खटपट करा’. मी म्हणालो, ‘मी तुम्हांला काय ते उद्या सांगतो’. मग मी माझा मित्र दत्तू जगताप याला भेटलो. हा डेअरडेव्हिल होता. वाटेल ते करायचा. त्याच्याजवळ नेहमी रिव्हॉल्वर असायचं. भूमिगत चळवळीत त्याने खूप काम केलं होतं. मी दत्तूकडे गेलो. दत्तूला आम्ही ‘दत्तू काँग्रेस’ म्हणायचो. म्हटलं, ‘काय दत्तोबा, एक साहसाचं काम आहे. येणार का?’ तो म्हणाला, ‘काय आहे?’ मी काम सांगितल्यावर म्हणाला, ‘येणार!’ मला सांगितलं गेलं होतं, त्याप्रमाणे रात्री नऊ वाजता एका गाडीतून अरुणा बाई आल्या. त्यांनी मध्यमवयीन पारशी स्त्रीसारखा पोशाख केला होता. त्यांनी गाडी थांबवली. मी दार उघडलेलं होतं. मला विचारलं, ‘काय रे मिसेस कापडिया आज बऱ्या आहेत की नाही?’ तर मी म्हणालो, ‘अहो, त्या किती वेळची तुमची वाट पाहतायत’. मग म्हणाल्या, ‘चल, मला आत घेऊन चल. मला त्यांना एक अर्धा तास भेटायचंय’. हे सगळं पोलिसांच्या देखत मोठ्याने चाललं होतं. मी त्यांना आत नेलं आणि पारशी बायकांच्या वॉर्डने गांधीजींच्या कुटिरापाशी पोहोचवलं. मग त्यांचं ‘चाय का चर्चा’ का काय ते सुरू झालं. मी बाहेरच्या दारावरती होतो. अर्धा तास झाल्यानंतर माझ्या छातीत धडधडायला लागलं. ‘केव्हा एकदा संपतंय, नाहीतर पोलीस आत आले, तर भलतंच व्हायचं’, असं माझ्या मनात आणि दुसऱ्या बाजूला ‘पोलीस अजून आत का येत नाहीत!’ म्हणून आमच्या दत्तू काँग्रेसचे हात शिवशिवत होते. शेवटी 10 वाजले आणि अरुणाबाई पूर्वीसारख्याच बाहेत आल्या आणि गाडीतनं निघून गेल्या. काही झालं नाही! दत्तूची निराशा झाली, पण मला मात्र कृतकृत्य वाटलं. नंतर आम्ही प्यारेलालना भेटलो. प्यारेलाल म्हणाले, ‘इथे नाही संपलं. तुम्ही स्टेशनवर जा आणि पहाटेच्या गाडीने अरुणाबाई जेव्हा रेल्वेच्या डब्यात सुखरूप शिरतील, तेव्हा इथे सांगायला या’. त्याप्रमाणे आम्ही स्टेशनवर गेलो. त्या वेळी मद्रास मेल पहाटे जायची. तेव्हा गाडीला 10 मिनिटं असताना अरुणाबाई पुन्हा पारशीणीच्या पोशाखात आल्या. त्यांच्याबरोबर एक वृद्ध पारशी आले. ते दोघं डब्यात चढले. गाडी सुटली. आम्ही निघालो आणि प्यारेलालजींकडे गेलो. मला वाटलं, प्यारेलालजी वाट पाहत असतील, पण त्या व्हरांड्यामध्ये प्रत्यक्ष गांधीजी बसले होते आणि माझी चाहूल लागल्यावर त्यांनी डोळे उघडले. मी हात करून त्या सुखरूप गेल्याचं सांगितलं, त्या वेळी ते हसले आणि झोपायला गेले. मी त्या वेळी डायरीत लिहिलं की, ‘मुलगी सासरी जाताना बापाला काय वाटत असावं, हे मला त्या वेळी बापूजींच्या डोळ्यात दिसलं आणि त्यांना सुभाषबाबू राष्ट्रपिता का म्हणाले होते, तेही मला त्या वेळी उमजलं’.

स्वातंत्र्य चळवळीतून मी ज्या वेळी सुटून आलो, त्या वेळी माझे वडील मला काय म्हणाले? ‘तू एकटा मुलगा असल्याने मी आणि तुझी आई यांची जबाबदारी तुझी आहे. तुझ्या बहिणीचं लग्न व्हायचं आहे. हे सगळं तुला करावं लागेल. पुढल्या महिन्यापासून नोकरी धर’. मग मी शिक्षकची नोकरी धरली. म्हणजे एका अर्थाने, ‘आपल्याला राजकारण करता येणार नाही’, याची मला त्या वेळी कठोर जाणीव झाली. त्या वेळी महाविद्यालयात ट्युटर कम लेक्चररची जागा होती. मी अर्ज करायला गेलो. तेव्हा प्रोफेसर भाटे मला म्हणाले, ‘मी तुझा अर्ज आज स्वीकारणारच नाही. तू घरी दोन दिवस विचार कर. तुला राजकारण करायचंय का शिक्षक व्हायचंय? शिक्षक व्हायचं असेल, तर राजकारणाला रामराम ठोकला पाहिजे. हा डी. ई. सुसाईटचा नियम नाही. ही शिक्षकाची नैतिकता आहे. तुला राजकारणापासून पूर्णपणे दूर व्हावं लागेल. याला जर तयार असशील, तर तुझा अर्ज स्वीकारीन’. मी दुसऱ्या दिवशी गेलो. कारण मला नोकरी करणं भागच होतं. मी म्हणालो, ‘सर मला हे मान्य आहे. मी राजकारण करणार नाही; जाहीर सभेत बोलणार नाही; सत्याग्रह करणार नाही; मिरवणुकीत जाणार नाही; कुठल्याही राजकीय नेत्याशी संबंध ठेवणार नाही, पण मला सेवादलात काम करता येईल का?’ ते म्हणाले, ‘शैक्षणिक स्वरूपाचं काम करता येईल, पण एकही तास चुकता कामा नये. मी सांगतो तसं पाच वर्षं तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, सौंदर्यशास्त्र इत्यादी विषयांचं, जागतिक साहित्याचं वाचन केलं पाहिजे. उत्तम शिकवायला लागलं पाहिजे. पहिल्या वर्षी नीट शिकवता येणार नाही; चार-पाच वर्षं लागतील आणि तू चांगला शिक्षक असल्याची माझी खात्री पटली आणि राजकारणापासून दूर होत असल्याची माझी खात्री पटली, तरच तुला पर्मनंट केलं जाईल’. आणि ते म्हणाले होते, त्याप्रमाणे सात वर्षांनी मला पर्मनंट केलं गेलं. ही माझ्या जीवनातली एक हकिकत आहे.


हेही वाचा : ग. प्र. प्रधान : आदर्शांचा पाठपुरावा करणारा लेखक - विनोद शिरसाठ 


याच्यामुळे काय झालं? माझ्या बरोबरचे मधू लिमये, नाथ पै हे चळवळीतनं बाहेर पडल्याबरोबर पुन्हा राजकारणात गेले. त्यांची पंचविशीतली धडक होती. त्यामुळे दोघांनीही पार्लमेंटमध्ये कर्तृत्व दाखवलं. अनेक जण वेगवेगळ्या चळवळींमध्ये गेले. त्यांचंही तिथे कर्तृत्व दिसलं. मी मात्र चळवळीपासून दूर राहिलो; परंतु राष्ट्रसेवा दलात कार्यकर्त्यांचे एकामागून एक गट मी तयार केले. म्हणजे त्यांना केवळ राजकीय विचार द्यायचा नाही, तर त्यांचा दृष्टीकोन व्यापक असला पाहिजे, यासाठी गाइट टू मॉडर्न थॉट यांसारख्या पुस्तकांबद्दल भाई वैद्य, बापू काळदाते, बाबा आढाव यांना मी सांगत असे. ‘आयडियाज्‌ दॅट मूव्ह द वर्ल्ड’ याच्यावरती मी दहा बौद्धिकं घेतली होती. अशी मी किती बौद्धिकं घेतली... त्यांना दर आठवड्याला मी एका इंग्रजी कादंबरीचा सारांश सांगत असे. याचा आमच्या कार्यकर्त्यांवर मोठा संस्कार झाला, हे मी मोठ्या अभिमानाने सांगू शकतो. बापू काळदाते त्यांच्या भाषणात अजून सांगतात की, ‘मास्तरांनी आम्हांला वाचायला शिकवलं’. हे सगळं मी वेगवेगळ्या वयोगटांसाठी केलं. म्हणजे, क्रांतिकारकांच्या गोष्टी संस्कारक्षम वयातल्या मुलांना सांगायच्या. त्यानंतर ‘गांधीजींची कार्यपद्धती’ याबद्दल एका गटाला सांगायचं. असे वेगवेगळ्या तऱ्हेचे प्रयोग मी केले आणि याच्यातून राष्ट्रसेवा दलातल्या बौद्धिक विभागात मी एक वैशिष्ट्यपूर्ण काम करू शकलो, याबद्दल माझ्या मनाला कृतार्थता आहे.

पण हेही तितकंच खरं की, 20 वर्षं राजकारणापासून दूर राहिल्यामुळे 1965 मध्ये मी ज्या वेळी प्रत्यक्ष राजकारणात उतरलो, त्या वेळी माझ्यात तो बेधडकपणा राहिला नव्हता. त्यामुळे उशिरा पोहणारा जसा सूर मारत नाही, काठाजवळ पोहतो आणि जास्तीत जास्त ब्रेस स्ट्रोक मारतो, त्याप्रमाणे माझं राजकारण दुय्यम दर्जाचंच झालं, हे मला प्रांजळपणाने कबूल केलं पाहिजे.

आता मी माझ्या व्यक्तिगत जीवनाबद्दल थोडं सांगतो. मी एका बाजूला राष्ट्र सेवा दलात जसं हे काम करत होतो, तसं माझ्या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक म्हणूनही मी विकसित होत होतो, असं मला वाटतं; आणि सगळा विनय सोडून मी तुम्हांला सांगतो की, शिक्षक म्हणून मला खूप यशही मिळालं आणि साफल्यही मिळालं. डॉ. अशोक केळकरांसारखे कितीतरी असामान्य विद्यार्थी माझ्या हाताखालून तयार झाले. या सर्वांना एका विशिष्ट तऱ्हेने साहित्य शिकवण्याकरता मी पुष्कळ प्रयोग केले. मी त्याबद्दल जास्त काही सांगत नाही, परंतु मला असं वाटतं की, मला जीवनाबद्दल एकूणच जी उत्कटता वाटते, त्यामुळे साहित्याचा शिक्षक म्हणून मी यशस्वी होऊ शकलो. नाहीतर ज्याला स्कॉलरशिप म्हणतात, ती माझ्यापेक्षा अधिक असलेले प्राध्यापक होते, पण त्यांच्यापेक्षा माझं शिकवणं अधिक जिवंत होतं, असं मला वाटतं. ते अधिक चैतन्यपूर्ण होतं.

हे जसं एका बाजूला चालू होतं, तसं दुसरीकडे माझे काही मित्र मला म्हणाले की, ‘अरे, तू आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह का नाही केलास?’ तर मी त्यांना म्हणालो की, ‘विवाहाला दोन पार्टीज्‌ लागतात. माझी तयारी होती, पण परजातीतल्या ज्या दोन मुलींना मी विचारलं, त्या दोघींनीही मला नकार दिला’. तेव्हा मला हे कळून चुकलं की, ‘आपण आपलं सांकेतिक मार्गानेच लग्न केलं पाहिजे. नाहीतर आपला काही निभाव लागणार नाही’. म्हणून मग माझ्या आईवडलांनी प्रथम जी मुलगी पाहिली आणि पसंत केली, तिला मी भेटायला गेलो. त्या मुलीमध्ये मला असं वैशिष्ट्य जाणवलं होतं की, ती आमच्यापेक्षा गरीब परिस्थितीतली होती. त्यामुळे जीवनाकडून तिच्या फार अपेक्षा नव्हत्या. माझ्या आईने तिला एकच प्रश्न विचारला होता की, ‘माझा मुलगा एम. ए. झालेला आहे. तू इंटर सायन्स पास झालीस. तू ग्रॅज्युएट झालं पाहिजेस. तर तू शिकशील का?’ त्यावर ‘मी शिकेन’, असं ती म्हणाली होती. मीही तिला एकच प्रश्न विचारला. ‘मी एकुलता एक मुलगा आहे आणि माझ्या आईवडलांची जबाबदारी माझ्यावर आहे. तू जर ‘वेगळं बिऱ्हाड करू’ म्हणशील, तर माझ्याच्याने ते होणार नाही. याचा नीट विचार कर आणि माझ्या आईवडलांची जबाबदारी अखेरपर्यंत माझ्याबरोबर पार पाडशील, अशी खात्री असेल, तरच मला हो म्हण. नाहीतर आपण लग्न करायचं नाही’. तिने मला होकार दिला आणि नंतर आमचं ठरावीक पद्धतीने लग्न झालं. एका दृष्टीने विवाहोत्तरपण आमची मनं पूर्णपणे जुळली आणि 1950पासून 2003पर्यंत, 53 वर्षं माझं वैवाहिक जीवन सुखात गेलं.

आमच्या वैवाहिक जीवनात एक मोठा अडसर निर्माण झाला होता. तो म्हणजे, दोन-तीन वर्षं झाली, तरीदेखील आम्हांला मूल होईना. या कठोर वास्तवाचा आम्ही स्वीकार केला. हे काही सोपं नसतं. कारण ‘आपल्याला मूल असावं’, असं प्रत्येकाला वाटत असतं. तसेच आम्हीही होतो. पण मला वाटतं की, माझी बायको माझ्याहीपेक्षा खंबीर होती. 1960 साली माझी बायको म्हणाली, ‘केवळ संसार करणं मला पटत नाही. मला पूर्वी डॉक्टर व्हायचं होतं, पण आमच्या घरच्या परिस्थितीमुळे मला होता आलं नाही. आता मला डॉक्टर होता येईल का?’ तेव्हा मी म्हणालो, ‘आपण प्रयत्न करू’. मग आयुर्वेदाच्या शाखेत बी.ए.एम.एस.ला तिला प्रवेश मिळाला आणि तिने वयाच्या 34व्या वर्षी त्या अभ्यासक्रमाला सुरुवात केली. याचं माझ्या आईला पुष्कळ श्रेय आहे. वास्तविक, घरामध्ये मी स्वयंपाकाला बाई ठेवली होती. सर्व वेळ कामाला दुसरी एक बाई होती, पण तरीही आईने म्हातारपणातही या सगळ्यावर देखरेख केली; सगळा संसार पाहिला. कारण बायको दिवसभर कोर्सला जायची. अखेरीस 39व्या वर्षी बायको डॉक्टर झाली. आईने तोवर सगळी घरची जबाबदारी पार पाडली, बायको डॉक्टर झालेली आईने पाहिलं आणि वय झाल्याने त्याच सुमारास ती गेली.

माझ्या बायकोने पहिल्यांदा नानल रुग्णालयात नोकरी धरली. नंतर दोन महिन्यांनी मी तिला विचारलं, ‘आता तू डॉक्टर झालेली आहेस, तर तू प्रपंचाची जबाबदारी घेऊ शकशील का?’ ती म्हणाली, ‘माझ्या मनाप्रमाणे मला डॉक्टर होता आलं. मी जबाबदारी घेईन. तुम्हांला काय करायचं ते तुम्ही करा’. तेव्हा मी म्हणालो, ‘मी नोकरी सोडणार आणि मी राजकारणात जाणार’. ती म्हणाली, ‘खुशाल जा! मी तुम्हांला पाठिंबा देते’. मग मी नोकरीचा राजीनामा दिला आणि सर्व वेळ समाजवादी पक्षाचं काम करायला लागलो. हा निर्णय धाडसी होता. माझे मित्र म्हणाले, ‘असं करू नकोस. तू लिंक ठेव’. पण मी त्यांना म्हणालो की, ‘भाटे सरांना मी शब्द दिलाय की, ज्या क्षणी राजकारण करावंसं वाटेल, त्या क्षणी नोकरी सोडेन, तेव्हा आता मी नोकरी सोडणार’. आणि मी नोकरी सोडून दिली. माझ्या बायकोला फार आत्मविश्वास होता. आमच्या घरातल्या तळमजल्यावरच्या दोन खोल्यांमध्ये तिने दवाखाना सुरू केला आणि अल्पकाळातच तिचा दवाखाना चांगला चालायला लागला. विशेषत: चाळीतल्या स्त्रिया तिच्याकडे फार विश्वासाने येत. मी सर्व वेळ राजकीय काम करत होतो. मात्र माझ्या बायकोने बाकी सगळी जबाबदारी सांभाळल्याने खरोखर मला राजकारण करता आलं. म्हणजे एस.एम. जोशींच्या पत्नीने, नानासाहेबांच्या पत्नीने शिक्षिकेची नोकरी केली. माझ्या बायकोने डॉक्टरी व्यवसाय केला. या तीनही स्त्रियांमुळे आम्ही राजकारणात काम करू शकलो, हे मी मोठ्या अभिमानाने सांगतो आणि यासाठी मी माझ्या पत्नीशी कृतज्ञ आहे.

हे झाल्यानंतर 1965 साली, म्हणजे एक वर्षाने पदवीधर मतदारसंघात एक निवडणूक आली आणि त्यात मला उभं करण्याचं आमच्या पक्षाने ठरवलं. प्रथम माझी त्याला तयारी नव्हती, पण नानासाहेब गोरे म्हणाले, ‘तू महाविद्यालयात जे काम केलं आहेस; विद्यापीठामध्ये, सीनेटमध्ये, सिंडिकेटमध्ये तू जो काही चांगुलपणा मिळवला आहेस, त्यामुळे तू निवडून येशील, असं मला वाटतं’. त्यामुळे नानासाहेबांनी निर्णय घेतला आणि मी उभा राहिलो, असं खरं त्या वेळी झालं. मी उभा राहिलो, पण माझ्याजवळ पैसे कमी होते. बायकोपाशी फार दागिने नव्हतेच; होते त्यातलेही दोन मोडायला लागले; पण आम्ही कसंतरी ते केलं; थोडं कर्जही काढलं; काही मित्रांनी 100-100 रुपये दिले आणि अशी आमची निवडणूक झाली. पण मी जिंकलो! पूर्वी जनसंघाच्या दोन्हीही सीट्‌स येत असत, पण त्या वेळी त्यांना एकच सीट मिळाली आणि दुसरी जागा उत्तमराव पाटलांच्या बरोबरीने मी जिंकली. नंतर 1972 साली तर मी पहिल्या क्रमांकाने निवडून आलो. कारण सहा वर्षं मी उत्तम काम केलं. मग निवडून आल्यानंतर ग्रामीण भागात जे कार्यकर्ते होते, त्यांच्या मदतीने मी अनेक प्रश्न विचारले, अनेकांच्या समस्या उपस्थित केल्या. त्या वेळी एका तऱ्हेने वातावरण थोडं वेगळं होतं. कारण मी विरोधी पक्षातला होतो, तरी काँग्रेस पक्षामध्ये वि.स.पागे, भारदे हे आमच्याबरोबरच तुरुंगात असलेले ज्येष्ठ स्नेही पदाधिकारी होते. वैराळे, तिडके हे विदर्भातल्या स्वातंत्र्य चळवळीत; मी इकडे. ते मला ओळखत होते. त्यामुळे आमच्यात विरोध असला, तरी वैर नव्हतं. त्यामुळे त्या वेळी राजकारणात काम करणं हा आनंददायी अनुभव होता. हे मी त्या वेळी केलं. मी काय केलं, हे सांगता येणार नाही, पण गरीबांच्या प्रश्नांना शक्य तितकं तोंड फोडण्याचा मी प्रयत्न केला.

मात्र मला एक वाटतं की, विधानसभा किंवा विधान परिषद ही काही डिबेटिंग सोसायटी नाही. म्हणून केवळ वक्तृत्व चांगलं असणं किंवा अभ्यासपूर्ण भाषणं करणं हे तिथे पुरेसं नाही. ते मी केलं, पण हे पुरेसं नाही. तुमच्या मागे ज्या वेळी चळवळ असते, त्या वेळी तुमच्या शब्दाला सामर्थ्य प्राप्त होतं. हे मी मृणाल गोरेच्या बाबतीत पाहिलं. मृणालतार्इंची बाहेर चळवळ असल्यामुळे त्यांचं वक्तृत्व कदाचित बापू काळदातेंपेक्षा कमी असलं, तरी त्यांच्या शब्दाला अधिक सामर्थ्य होतं. मात्र माझ्या शब्दाला सामर्थ्य नव्हतं. कारण मी मुळी उशिराच राजकारणात आलो होतो. पण तरी, संसदीय राजकारण ज्या रीतीने करायचं असतं, ते मी प्रभावीपणे आणि निष्ठापूर्वक केलं आणि त्याच्याबद्दल मला अनेकांनी धन्यवादही दिले, हे मला सांगता येईल. विशेषत: 1980-1982 या कालखंडात विरोधी पक्षनेता म्हणून मी जे काम केलं, त्याच्यात महाराष्ट्रातल्या अनेक समस्यांना मी तोंड देऊ शकलो. त्याचप्रमाणे आमदार म्हणून ज्या ज्या वेळी मला सत्याग्रह करायला मिळाला, त्या वेळी मी कच्छ सत्याग्रहात गेलो, आदिवासींना जमिनी मिळाव्यात म्हणून सत्याग्रहात गेलो... याप्रमाणे मी तिथे काम करत राहिलो. आणीबाणीमध्ये मला 18 महिने कारावास सोसावा लागला. त्या वेळी खरंतर माझी पन्नाशी उलटून गेली होती. माझी बायको एकटी घरी होती. माझ्या मनावर याचा ताण येत होता, पण या सर्व दिव्यांमधून आमचा निभाव लागला आणि 18 वर्षं मी आमदारकी केली. दोन वर्षं मी विरोधी पक्षनेता असताना महाराष्ट्रातले कार्यकर्ते माझ्या घराला स्वत:चं घर समजून राहत असत, त्याचा मला अभिमान वाटे. एस. एम. आणि गोरे माझ्याकडे उतरल्यानंतर मला किती आनंद होत असे, हे मला शब्दांत व्यक्त करता येणार नाही; आणि तेही म्हणाले की, ‘अरे, तू उशिरा राजकारणात आलास, पण तरीदेखील शक्य तितकं तू केलंस’.

मग 18 वर्षं राजकारण केल्यानंतर, 1984 साली मी ठरवलं की, ‘आता लिहायचं; साधनेत काम करायचं’, आणि म्हणून मी पक्षाला सांगितलं, ‘मी उभा राहणार नाही’. त्या वेळी जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजारामबापू पाटील होते. ते म्हणाले, ‘तू उभा राहिला नाहीस, तर आपली सीट जाईल. तेव्हा तुला उभं राहिलंच पाहिजे’. मी म्हणालो, ‘काहीही झालं, तरी मी उभा राहणार नाही’. मग आमचं असं ठरलं की, नानासाहेब गोरे देतील, तो निर्णय. नानासाहेबांच्या समोर राजारामबापूंनी पक्षाची बाजू मांडली. ‘मला साधनेत काम करायचंय आणि लिहायचंय’, असं मी सांगितलं; आणि नानासाहेबांनी माझा निर्णय योग्य असल्याचं सांगितलं आणि म्हणाले, ‘प्रधान आता 62 वर्षांचा आहे. येत्या पाच-सात वर्षांमध्येच तो काय ते चांगलं लिहील. नंतर म्हातारपणी काय तो लिहिणार आहे का!’ म्हणून त्यांनी मला मुक्त करायचा निर्णय घेतला. म्हणजे, माझ्या आमदारकीसाठी, मी उभं राहण्यासाठी जसे नानासाहेब कारणीभूत झाले, तसंच मला मुक्त करण्यासाठीही नानासाहेबांनीच साहाय्य केलं, याच्याबद्दल माझ्या मनात त्यांच्याबद्दल एस.एम.प्रमाणेच नितान्त प्रेम आहे. हे 1984 सालात घडलं.

नंतर आमचं जीवन आपलं चालू होतं. आता आमची आर्थिक स्थिती थोडी बरी झाली होती. त्यामुळे माझ्या पत्नीने तिच्या वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत काम केलं; डॉक्टर म्हणून भरपूर मिळवलं. नंतर ती मला म्हणाली, ‘आता मी असिस्टंट घेणार’. मी म्हणालो, ‘का बुवा?’ तर म्हणाली, ‘आता मला माझ्या गावासाठी काम करायचं आहे. तुम्ही जसं तुमच्या पक्षासाठी केलं, तसं मला माझ्या गावच्या आदिवासींसाठी काम करायचंय’. मग आदिवासींना जाऊन तपासणं, त्यांच्यावर उपचार करणं असं दर महिन्याला आठ दिवस अशी 10 वर्षं ती त्या गावात गेली. नंतर ती तिकडे थोडी आयुर्वेदिक औषधं ठेवून यायची आणि तिचा एक चुलत भाऊ कोणाला ताप आला, कोणाला जुलाब झाले त्याच्यावरची ती साधी औषधं द्यायचा. अशा तऱ्हेने ते सेंटर चालू राहायचं. याप्रमाणे तिने काम केलं. तिने हे जे काम केलं, याबद्दल तिच्याइतकाच मला तिचा अभिमान वाटतो. तिथे काम करत असताना तिला फॅमिली प्लॅनिंग असोसिएशननेही मदत केली. या असोसिएशनच्या कार्यकर्त्या तिथे काम बघायला गेल्या, तेव्हा त्यांच्यापैकी डॉक्टर कानिटकर मला म्हणाल्या, ‘तुमची बायको आदिवासींशी ज्या रीतीने एकरूप झालेली आहे, तसे राजकीय नेते असून तुम्हीदेखील गरिबांशी झालेला नाहीत, असं मला वाटतं’, आणि त्यांचं ते म्हणणं खरंच होतं. अशी पत्नी मला मिळाली.

नंतर काय झालं? नंतर आम्ही सत्तरीला आलो. म्हणजे आमचं म्हातारपणच सुरू झालं. तिची पंच्याहत्तरी आम्ही साजरी केली. म्हणजे तिचे नातेवाईक, माझे नातेवाईक असे मिळून आम्ही एकत्र जेवलो आणि एक साधा, घरगुती अनौपचारिक कार्यक्रम केला. नंतर दोन दिवसांनी मी तिला म्हणालो, ‘आता आपण विल करू या’. तेव्हा ती म्हणाली, ‘विल करायला जवळ पैसे फार झाले वाटतं!’ तर म्हणालो, ‘जवळ पैसे नाहीत, पण विल याचा अर्थ इच्छापत्र. आपण आयुष्यात जे चांगलं काम केलं असेल, ते आपल्या पश्चात चालू राहिलं पाहिजे की नाही?’ ती म्हणाली, ‘बरोबर आहे’. म्हटलं, ‘तू तुझं आदिवासींसाठीचं काम केलंस. ते चालू राहिलं पाहिजे की नाही?’ तर म्हणाली, ‘हो’. तर मी म्हणालो, ‘आपण स्वातंत्र्य सैनिकाचं पेन्शन स्वत:साठी वापरत नाही. त्यामुळे तुझ्यासाठी मी दोन लाख रुपये बाजूला ठेवले आहेत. ते आपण साने गुरुजी रुग्णालयाला देऊ. म्हणजे ते तुझं काम तुझ्यापेक्षा अधिक चांगल्या रितीने चालवतील’. तिला ही कल्पना एकदम पसंत पडली. मग आम्ही डॉ. गुर्जरांना बोलवलं. त्यांच्यासमोर ही कल्पना ठेवली. ते म्हणाले, ‘आम्हांला केंद्र चालवायला काय कठीण आहे! अगदी सोपं आहे’. त्यांनी तिथपासून केंद्र चालवायला सुरुवात केली आणि मी मोठ्या अभिमानाने सांगतो की, या संस्थेने माझ्या पत्नीचं काम तिच्याहीपेक्षा अधिक प्रभावीपणाने अद्यापपर्यंत तरी चालवलेलं आहे. हे जसं झालं, तसं मी म्हणालो, ‘माझं काम चालू नको का राहायला! ती म्हणाली, तुमचं काम काय?’ मी म्हणालो, ‘माझं काम म्हणजे, साधना’. मग म्हटलं ‘काय करायचं साधनेसाठी?’ म्हटलं, ‘आपल्याला मूलबाळ नाही. आपलं घर आपल्या पश्चात आपण साधनेला देऊन टाकू’. आम्हांला मूलबाळ जरी नसलं, तरी माझ्या मामांचा मुलगा माझ्याजवळ शिकायला होता. पण तो डॉक्टर झाला होता. त्याचं स्वत:चं व्यवस्थित होतं. म्हटलं, ‘त्याला आपल्याला काही द्यायला नको. तेव्हा आपण आपलं घर देऊन टाकू’. ती म्हणाली, ‘आपल्या पश्चात ना? आपल्या डोक्यावर शेवटपर्यंत छप्पर राहील ना?’ म्हटलं, ‘राहील’. मग आम्ही घर द्यायचं ठरवलं.

पण तिची पंच्याहत्तरी झाली होती. हळूहळू तिचं आजारपण वाढत चाललं. ती एकदा पडली; पायाला फ्रॅक्चर झालं आणि नंतर तिची तब्येत ढासळायला लागली. ती म्हणाली, ‘ढासळू द्या. हे नैसर्गिक आहे. पण माझं शरीर स्वच्छ राहावं म्हणून नर्स ठेवा. डॉक्टर सांगतील, ती औषधं, इंजेक्शनं मला द्या. पण मला रुग्णालयात पाठवायचं नाही आणि नळ्या लावून माझं मरण लांबवायचं नाही. मी आता गेले, तरी ते आता तुम्ही शांतपणे स्वीकारलं पाहिजे’. आणि तिच्या 77व्या वर्षी आणि माझ्या 81व्या वर्षी तिचं 2003 साली निधन झालं. तिचं निधन झाल्यानंतर तीन-चार महिने मी घरात राहिलो, पण मला चैन पडेना. मला वाटलं, ‘इथे नाही राहायचं’. साने गुरुजी रुग्णालयाशी माझा सुरुवातीपासून संबंध होता. ‘या रुग्णालयात आपण जर राहायला गेलो, तर आपली वैद्यकीय देखभाल ते शेवटपर्यंत करतील आणि या रुग्णालयात जी सुंदर गच्ची आहे, त्या गच्चीवर कुणाचा हात न धरता आपल्याला फिरता येईल’, याची मला जाणीव होती. तेव्हा दादा गुर्जर यांना मी बोलवलं. मी म्हणालो, ‘माझ्या स्वातंत्र्य सैनिकाच्या पेन्शनमधले तीन हजार रुपये मी महिन्याला तुम्हांला भाडं म्हणून देईन, मला तुम्ही एक खोली राहायला द्या’. ते म्हणाले, ‘तुम्ही कशाला देता? तुम्ही आमच्या संस्थेचे दहा वर्षं अध्यक्ष होतात. पंधरा वर्षं ट्रस्टी होतात. तसेच या’. म्हटलं ‘नाही, ट्रस्टीने फुकट राहता कामा नाही’. मग त्यांनी माझं म्हणणं मान्य केलं. मी इथे राहायचं ठरवलं. घर देऊन टाकलं. संसार वाटताना जरा जड गेलं. कारण बायकोने जमवलेली एकेक वस्तू वाटणं हे काही सोपं नसतं, पण कठोर होऊन मी ते केलं आणि इथे येऊन राहायला लागलो.

मात्र या एकाकीपणावर मात करणं सोपं नसतं. म्हणून प्रथम काही दिवस मी संतसाहित्याचा आधार घेतला, आणि नंतर रोज नियमानं तीन-साडेतीन तास वाचन आणि लेखन यांचं जे वैचारिक काम करायला लागलो, त्याच्यामधून शेवटी मनाला कठोरता आली. तेव्हापासून आजपर्यंत तीन वर्षं झाली, मी इथे राहतोय. एक गोष्ट दुर्दैवाने खरी की, माझे अनेक सवंगडी म्हणजे, मधू लिमये, मधू दंडवते, सदानंद वर्दे असे सगळे गेले. याचा नाही म्हटलं तरी माझ्या मनावरती परिणाम झाला. या एकाकीपणावर मी मात करतो, यात काही शंका नाही, पण तरी एकाकी वाटतं. य. न. केळकरांची एक कविता आहे. ती मी तुम्हांला ऐकवतो. काही वेळेला माझ्या मनाची तशी अवस्था होते. काय वाटतं? एकामागून एक चालले / पैलतीराला सवंगडी / रानपारव्या परी एकाकी / घुमतो मी या ऐलथडी. अशी अवस्था. पण याच्यावरती वैचारिक काम करत मी चार पुस्तकं लिहिली. आंबेडकरांवर पुस्तक लिहिलं, याबद्दल मला कृतार्थ वाटतं. कारण आंबेडकरांच्या सामाजिक समतेच्या भूमिकेला मी ‘स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत’ या 1987 साली लिहिलेल्या पुस्तकातून न्याय दिला नव्हता. तो आंबेडकरांवरच्या या पुस्तकाच्या निमित्ताने देऊ शकलो. मी टॉलस्टॉय शिकवला, त्याच्यावरचं पुस्तक लिहिलं; गांधीजींवरचे काही लेख लिहिले. ‘साता उत्तराची कहाणी’ हे जे पुस्तक मी लिहिलं होतं, त्याच्यामध्ये साहित्याचा विद्यार्थी असल्यामुळे मी सर्व पक्षांना न्याय दिला होता. त्याप्रमाणे 1980 ते 2007 या कालखंडावर मी ‘आठा उत्तराची कहाणी’ हे पुस्तक लिहिलं आहे. मी साहित्याचा विद्यार्थी असल्यामुळे सर्व विचारधारांना मी न्याय देतो. ही माझी भूमिका आहे. पण माझ्या हातून ही पुस्तकं लिहून झाली, म्हणून एका अर्थाने माझं मन कृतार्थ आहे. पण ही कृतार्थता असताना एकाकीपणही आहे. पण अखेरीस ग्रंथ हे माझे सहकारी आहेत. ते ग्रंथ लिहिणारे महान लेखक माझ्या मनाला आधार देतात. आणि एक ज्ञानसाधना करणारा शिक्षक म्हणून मी त्यांच्याबरोबर वाटचाल करीत राहतो, अशी माझी आजच्या जीवनाची अवस्था आहे.

भगवी वस्त्रं घालायची नाहीत; साधे कपडे ठेवायचे; दाढीबिढी काही वाढवायची नाही; पण संन्यस्त जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा, असं मी 85व्या वर्षानंतर ठरवलं. म्हणून एकनाथांनी सांगितलेल्या तीन गोष्टी मला जमल्या. नावडे प्रपंच बैसणे - प्रपंच नाहीच. नावडे गौरव मिरविणे - त्याचंही काही नाही. बरवे खाणे नावडे - या वयात काही लागत नाही. संन्यासाच्या अवस्थेपर्यंत जायचं असेल, तर आणखीन काही करावं लागेल. म्हणजे कुठल्याच समारंभाला अजिबात जायचं नाही. हल्ली जरी गेलो, तरी मी व्यासपीठावर बसत नाही. तसं पाच वर्षांपासून भाषण करत नाही, पण आता कुठंच फारसं जायचं नाही; शक्य तोवर कानाचं यंत्र काढून विनोबांसारखा संवाद साधायचा. म्हणजे तुम्ही लिहून बोला आणि मी लिहून बोलतो, जेणेकरून एकूण संवादही कमी होईल. अशा मानसिक अवस्थेत मी आहे आणि उद्या मला 85 वर्षं पूर्ण होऊन 86वं लागेल. उद्या माझा वाढदिवस आहे. म्हणजे उद्यापासून हे संन्यस्त जीवन सुरू होणार, म्हणून शेवटच्या दिवशी तुमच्यासाठी इतकं काम केलं.”

तर असे हे प्रधान सर. समरसतेने जगणारे, पण प्रत्येक टप्प्यावर आपलं एकेक कवच काढून ठेवणारे, आतून-आतून भारतीय. प्रधान सरांकडून काय काय घ्यावं, याची मोठीच यादी मनात तरंगत राहते. प्रधान सरांनी हे सांगितलं की, परिवर्तनासाठीचे आपले प्रयत्न फुटकळ न राहता बांधीव व्हावेत आणि पुढची 100 वर्षं तरी कामाला द्यावीत, हे बरंच मान्य करण्याजोगं आहे.

‘‘चला, चला आता आपण झकास चहा पिऊ. म्हणजे हे बघा, मी संन्यास घेतला, तरी चहा घेणं सोडणार नाही’’.

(शब्दांकन : भाग्यश्री भागवत)
(निवेदन : समीर शिपूरकर)

- ग. प्र. प्रधान


प्रधान विचार प्रधान चरित्र हा माहितीपट युट्यूबवर पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. 

Tags: गणेश प्रभाकर प्रधान प्रधान मास्तर लोकशाही समाजवाद समाजवादी भारतीय राज्यघटना Load More Tags

Comments:

विष्णू दाते

"ऋषींतुल्य"जीवन प्रधान सरांचं! स्वतः संबधीच किती साधं लिखाणं! पण तरीही त्यांतूनच खूपच घेण्या सारखं!

Sangeetha bapat

सुंदर. प्रधान सर जणू समोर बसून बोलत आहेत,माझं भाग्य,त्यांच्याबरोबर साधनेत काम करता आलं

Add Comment

संबंधित लेख