कैफी आझमी:व्यापक जीवनदर्शनाची हकीकत

कैफी आझमी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने

आज 14 जानेवारी 2020 रोजी उर्दूचे महान शायर कैफी आझमी यांची 100वी जयंती आहे. कैफीच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचे ‘कैफी आझमी : जीवन व शायरी’ हे पुस्तक लोकवाङ्मयतर्फे प्रकाशित होत आहे, त्यातील हे एक प्रकरण.

राह में टूट गये पाँव तो मालूम हुआ
जुज़ मेरे और मेरा राहनुमा कोई नही।
(मार्गात चालताना पाय तुटले तेव्हा समजलं, माझ्या खेरीज माझा मार्गदर्शक कोणी नाही.)

1962 सालच्या 'आवारा सजदे' मधल्या कैफींच्या गाजलेल्या कवितेच्या या दोन ओळी. ज्याला आजवर आपल्या जीवनाचं मार्गदर्शक मानलं, त्या कम्युनिस्ट पार्टीच्या विघटनामुळे झालेला त्यांचा मोहभंग आणि श्रद्धाभंजन ख्रिन्नपणे उजागर करणार्‍या आहेत.

1950चे दशक म्हणजे भारतात संविधानिक लोकशाहीचा मजबूत पाया उभारणीचा व देश निर्माणाचा काळ होता. भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली देशात परिवर्तनाचे वारे वाहू लागले होते. नेहरूंना देश आधुनिक आणि विज्ञाननिष्ठ बनवायचा होता. कम्युनिस्ट पार्टीचे बी. टी. रणदिवे यांच्या काळातले सशस्त्र क्रांतीचे आंदोलन फसल्यानंतर कम्युनिस्ट पार्टीने संसदीय लोकशाही प्रणाली मान्य करीत 1952 च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाग घेतला होता आणि चांगलं यश व जागा मिळवत तो देशातला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनवला होता. स्वातंत्र्यपूर्व काळात पी. सी. जोशींनी नेहरूंसोबत स्वातंत्र्य लढ्याच्या काळात चांगले संबंध ठेवले होते. कारण काँग्रेस अंतर्गत समाजवादाचा पुरस्कार करणारे नेहरू हे महत्त्वाचे नेते होते.

पण कम्युनिस्ट पक्षाला सोव्हिएत युनियनसोबत आता दुसरा मसिहा चीनच्या रूपाने मिळाला होता. बहुसंख्य नेत्यांनी मात्र समाजवाद भारतात आणण्यासाठी काँग्रेसमधील डाव्या गटाशी सहकार्य करणे आवश्यक आहे, असे धोरण स्वीकारले होते. ख्रुश्चेव्ह पर्वात भारत-सोव्हिएट युनियनचे संबंध मैत्रीपूर्ण होते व सहकार्याचे एक मधुर पर्व सुरू झाले होते. पण पक्षातल्या एका कडव्या गटाला हे धोरण व काँग्रेसशी सहकार्य करणे पसंत नव्हते. त्याचे एक कारण, 1957मध्ये केरळ राज्यात, लोकशाही मार्गाने निवडून सत्तारूढ झालेले, नंबुद्रीपादांच्या नेतृत्वाखालचे कम्युनिस्ट सरकार पंडित नेहरूंनीच अ-लोकशाही मार्गाने बरखास्त केले होते, हेदेखील होते.

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोव्हिएट युनियन व चीनचे संबंध बिघडत होते व ते युद्धाच्या सीमेपर्यंत गेले होते.  याच काळात म्हणजे 1962 साली चीनने भारतावर आक्रमण केले; तेव्हाही कम्युनिस्ट पक्षाचा एक गट, प्रक्षुब्ध जनमताविरुद्ध जात व शाब्दिक कसरती करत चीनची बाजू घेत होता आणि नेहरू सरकारला विरोध करीत होता. पक्षाच्या सुजाण नेतृत्वानं मात्र स्पष्ट भूमिका घेत भारत-चीन युद्धाच्या वेळी नेहरूंना पूर्ण समर्थन व पाठिंबा दिला. त्याची परिणिती पक्षफुटीत झाली. आणि पक्षातून बाहेर पडलेल्या एका गटानं पक्षाचं नाव तेच ठेऊन व पुढे कंसात (मार्क्सवादी) असं जोडून 1964मध्ये सी.पी.आय.(एम) ची स्थापना केली.

पक्षाशी एकनिष्ठ असणारे कैफी ही सारी घडामोड पहात होते, विचार करीत होते. पक्षात पडणारी फूट विद्ध मनानं अवलोकित होते. ते कार्यकर्ते होते, रस्त्यावर पक्षासाठी लढणारे सैनिक होते. त्यांना पक्षाच्या पॉलिट ब्यूरोपर्यंत आपले विचार पोचवण्यासाठी शायरी हाच एक मार्ग होता. देशात वाढत जाणारी भांडवलशाही, तिची निर्घृणता आणि औद्योगिक धोरणातून निर्माण झालेली शोषणाची नवी रूपं ते पहात होते. त्यावर शायरीच्या माध्यमातून, कलावंत मनानं प्रतिक्रिया देत होते.

शोषणमुक्त समाज निर्माण करण्याच्या व त्यासाठी समाजवादाचा मार्क्सप्रणीत मार्ग चोखाळण्याच्या कम्युनिस्ट पार्टीच्या या तत्त्वज्ञानावर विश्‍वास ठेवून भारतात सुशिक्षित व संवेदनशील तरुणांचा एक मोठा वर्ग या डाव्या विचारधारेशी जोडला गेला होता. त्यातील कलावंतांना 'प्रलेस' (प्रगतीशील लेखक संघ) आणि ‘इप्टा’नं (इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन) अभिव्यक्तीचा मंच उपलब्ध करून दिला होता. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र वरील घटनांमुळे त्यांच्यात साशंकता निर्माण होऊ लागली होती. असगर अली इंजिनियर यांनी कैफीच्या काव्याची समीक्षा करणाऱ्या लेखात ही त्यांची व त्यांच्यासारख्या असंख्य संवेदनशील पक्ष कार्यकर्त्यांची दुविधा खालील शब्दांत समर्पकपणे व्यक्त केली आहे,

“स्वतंत्रता के बाद एक नया युग आरम्भ हुआ और छठा दशक आरंभ होते-होते हमारे समाज में काफी बदलाव आए। कम्युनिस्ट पार्टी को भी एक संकटापन्न युग से गुजरना पडा और अंतत: 1964 में उसके दो टुकड़े हो गये। हमारे प्रगतिशील लेखक एवं शायर भी अपने नवास्था के दौर से गुजरकर नये अनुभवों से दो चार हुए और उनका विवेक नए रूप से विकसित हुआ। इधर औद्योगिक प्रगतियों ने नए नगरों के महत्त्व में बढोत्तरी की और हम सामंती वातावरण से निकलकर औद्योगिक एवं शहरी सांस्कृतिक युग में प्रवेश कर गए। इस क्रिया में पुराने संबंध (अर्थात मानवता के रिश्ते) टूटते-बिखरते गए और पूंजीवादी समाज के नए रिश्ते उभरने लगे। उन नए रिश्तों मे पुरानी संस्कृति की कोमलताएं नहीं थीं और सारा बल मार्क्स के शब्दों में 'कैश के जुडाव' पर था। हम अब तक अर्ध सामन्ती वातावरण और उसके द्वारा जन्मी परम्पराओं के लोभी थे और औद्यागिक एवं व्यापारिक समाज की नयी परम्पराओं और औद्योगिक शहरों की मानव विरोधी तेज गति वाले जीवन से परिचित नहीं थे। इस नए वातावरण ने सांस्कृतिक भावनाओं को भी प्रभावित किया और प्रगतिशीलता की मान्यता इन नयी परिस्थितियो मे कम होती चली गयी। आधुनिकता के आन्दोलन ने 'शॉकधिरेपी' का काम किया और साहित्य के संसार में एक नयी हलचल पैदा हो गयी। निःसन्देह नवीनीकरण आन्दोलन ने नयी एन्द्रिकता पर बल दिया और प्रगतिशीलता की जडता को तोड़ दिया।

कैफी भी चुपचाप इन परिस्थितियों का प्रत्यक्षदर्शन कर रहे थे। उनमें भी आंतरिक रूप से एक मौन क्रांति आर रही थी। फिर मुंबई जैसे नगर में जीने का उत्साह भंजक संघर्ष भावुक शायर को कैसे प्रभावित किए बिना रह सकता है। शहरी जीवन में प्राचीन परम्पराओं की यही पराजय थी, इस कारण कैफी की शायरी में भी मूल परिवर्तन आया। कैफी की कमिटमेंन्ट अब सिर्फ पार्टी लाइन तक सीमित रही न ही उसकी दशा श्रद्धात्मक रह गयी । अब न केवल उसकी परिधी का विस्तार हुआ बल्कि आस्था ने आशंकाओं को रास्ता प्रदान किया।

कम्युनिस्ट इकाई के विघटन ने भी उनकी आस्था को घायल किया है। वह स्वयं कहते है कि - “इस युग की सबसे बड़ी दुर्घटना कम्युनिस्ट इकाई का विघटन है। मेरे सजदे आवारा सजदे' हो गये।'' यह बात व्यर्थ नहीं कि उन्हाने अपने काव्य संग्रह का नाम की आवारा सजदे रखा जो वास्तव में उस कविता का शीर्षक है, जो उन्होने 1962 में कम्युनिस्ट इकाई के विघटन पर लिखी थी। आस्थापूर्ण जीवन सरल है क्योंकि आस्था न केवल हमारी सम्पूर्ण आशाओं का केन्द्र बिन्दु होती है अपितु हमारे क्रियाकलापों का अभिप्राय और हमारी अभिलाशाओं का प्रणम्य भी। परन्तु यदि यह आस्था विखण्डित हो जाए तो जीना अपनी आत्मा के शव को स्वयं उठाना है:

अपनी लाश उठाना कोई आसान नहीं
दस्तों बाजू मेरे नाकारा हुए जाते है ।
जिनसे हर दौरे में चमकी हे तुम्हारी दहलीज
आज सजदे वही आवारा हुए जाते है ।
(आवारा सजदे)
यह पार्टी से मोहभंग ही है जो ऐसी पंक्तियां कहलवाता है :
राह में टूट गये पांब तो मालूम हुआ
जुज़ मेरे और मेरा राहनुमा कोई नहीं!”

बालपणापासून आणि वारसा परंपरेने कैफी राष्ट्रप्रेमी होते. त्यामुळे पार्टीतील काही लोकांनी व्यर्थ काथ्याकूट व शाब्दिक कसरत करत चीन विरुद्ध भारतावर केलेल्या आक्रमणाचा निषेध न करणं, कैफींना वेदना देऊन गेलं. पी. सी. जोशींप्रमाणेच त्यांनाही काँग्रेसचं ‘भारत छोडो’ आंदोलन व एकूणच स्वातंत्र्यलढा मान्य होता. संसदीय लोकशाही आणि दिराष्ट्रावादामुळे देशाची धार्मिक फाळणी होऊनही नेहरूंनी स्वीकारलेला सेक्युलॅरिझम, त्यांची आधुनिक वैज्ञानिक दृष्टी आणि समाजवादावरची आस्था मान्य होती. पण स्वातंत्र्यलढ्याला बुर्ज्वा मानीत त्याकडे ब्रिटिश साग्राज्यशाहीपेक्षा जर्मनीचा नाझीवाद अधिक धोकादायक आहे, म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळात पाठ फिरवणं कैफींना जसं मान्य नव्हतं, तसंच चीन युद्धातली पार्टीच्या काही नेत्यांची चायना लाईन स्वीकारत चीनचा निषेध न करणंही साफ नामंजूर होतं. या दोन्ही वेळी गरिबांचा पक्ष म्हणून ज्याच्याशी आपण आपली जीवननिष्ठा वाहिली, त्या पक्षाचं राष्ट्रवादाशी असणारं वावडं त्यांना आत्मचिंतनास प्रवृत्त करून गेलं होतं!

या पार्श्वभूमीवर जेव्हा त्यांच्याकडे चेतन आनंद “हकिकत साठी गीतं लिहावीत म्हणून प्रस्ताव घेऊन आले, तेव्हा हा चित्रपट चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जवानांचं देशप्रेम व असीम बलिदानाची गाथा रूपेरी पडद्यावर मांडणारा आहे त्यामुळे कुठे तरी आपली देशभक्ती आणि चीन विरोध प्रभावीपणे प्रगट करता येईल, असं त्यांना वाटलं आणि त्या चित्रपटाला त्यांनी होकार दिला.

1962 सालच्या मानहानीकारक पराभवानंतर देशात एक बेचैनी होती, पराभूत मानसिकता होती. 'हिंदी-चिनी भाई भाई' या उच्चरवाच्या घोषणा चालू असतानाच, चीननं एकतर्फी आक्रमण करून भारताच्या व नेहरूंच्या पाठीत विश्‍वासघातानं खंजीर खुपसल्यामुळे पंडित नेहरूंची आंतरराष्ट्रीय शांतता व मानवतावादावरची श्रद्धा डळमळीत झाली होती. या पार्श्वभूमीवर कैफींचा इप्टा आणि कम्युनिस्ट विचारधारेचा सहप्रवासी असणाऱ्या चेतन आनंदला 'हकिकत'द्वारे भारतीयांना या पराभूत मानसिकतेतून बाहेर काढत भावनिकदृष्टीने उभारी द्यायची होती, पुन्हा देशभक्ती जागवायची होती आणि आत्मविश्‍वास बहाल करायचा होता. कैफींचीही हीच भावना होती, म्हणून हे दोन समविचारी सहप्रवासी कलावंत एकत्र आले आणि त्यांनी अक्षरश: एक नवा इतिहास घडवला!

आज मागे वळून पाहाताना हे निःशंकपणे सांगता येईल की, चेतन आनंदची 'हकिकत' हा भारताचा आजवरचा सर्वश्रेष्ठ युद्धपट आहे. त्यानं पराभूत भारतीय मानसिकतेला उभारी दिली. या सिनेमातील कैफींच्या लेखणीचं उत्तुंग कैलासलेणं म्हणजे चित्रपटाच्या शेवटी येणारं “कर चले हम फिदा' हे अजोड गीत होय! हिंदी सिनेमात मानवी पातळीवरची देशभक्ती उजागर करणारं याच्यासारखं दुसरं गीत अजून लिहीलं गेलेलं नाही. अपवाद असेल तर केवळ कवी प्रदीप यांच्या 'ए मेरे वतन के लोगो' या सेंटिमेंटल गीताचा.

‘हकिकत’ आणि त्यानंतरचा चेतन आनंदचा ‘हिंदुस्थान की कसम’ या वॉर फिल्मबाबत 'द प्रिंट' या इंग्रजी वेबपत्रिकेत 24 जुलै 2018 रोजी अमित उपाध्याय यांनी कारगिल विजयाच्या निमित्ताने 'हिंदुस्थान की कसम' या चित्रपटाच्या अनुषंगानं एक महत्त्वपूर्ण विधान चेतन आनंदच्या संदर्भात केलं होतं, ते त्याच्याइतकंच कैफींनाही लागू होतं,

‘After backing the British forces during World War Two, the Indian left was on the defensive in the first two decades after independence. Chetan Anand [and Kaifi two- my addition] a leading light of IPTA [Indian PeopleTheatre Association] and a communist was, in a way, bridging the nationalism gap through these war movies.’

चेतन आनंद जेव्हा कैफींकडे ‘हकिकत’ची ऑफर घेऊन आला, तेव्हा ते त्याला हसत म्हणाले, "अरे चेतन, माझ्यावर अपयशी गीतकाराचा शिक्का बसला आहे. का उगीच मला घेऊन सिनेमाच्या बॉक्स ऑफिसचं खोबरं करतोस?" त्यावर तेवढ्याच मिस्कीलपणे चेतन म्हणाला, "यार, माझ्यावरही चारदोन अपयशी चित्रपटांचा शिक्का बसलेला आहे. जर आपण दोन अपयशी कलावंत एकत्र आलो तर एक यशस्वी सिनेमा निर्माण होईल. टु मायनेसेस कॅन टर्न टुबी वन बीग प्लस!"

त्या वेळी कैफींनी गीतं लिहावीत म्हणून त्यांच मन वळविण्यासाठी चेतन जे सहज बोलून गेला, ते खरं ठरलं. हे दोघे आणि संगीतकार मदनमोहन या त्रिकुटांनी अक्षरश: एक इतिहास घडवला. युद्धपट असूनही ‘हकिकत’ हा सिनेमा ‘प्यासा’ किंवा ‘श्री 420’ प्रमाणे सुपरहिट म्युझिकल हिट ठरला. देशाच्या सीमेवर लढणाऱ्या व राष्ट्ररक्षणासाठी प्राणाचं बलिदान करणाऱ्या जवानांची (व त्या निमित्ताने आम हिंदुस्थान्यांची) देशभक्ती प्रगट करणारा आणि त्यांच्या भावभावना, प्रेम, काळजी, विरह आणि ताटातूटीच्या मानवी भावनांना उजागर करण्याऱ्या आठ गीतांनी कैफींनी ‘हकिकत’ला ज्या उंचीवर नेले आहे, त्याला तोड नाही. आजही हा चित्रपट पाहाताना मन देशभक्तीनं भरून येतं. तसंच मानवी संवेदनाच्या अंगानं प्रगट होणाऱ्या जवानांच्या भावनांनी भावविभोर व्हायला होतं. चित्रपट संपला तरी कानात व मनात कैफींची गीतं घट्ट घर करून राहतात.

देशासाठी बलिदान करणाऱ्या जवानांची देशभक्तीची भावना तीव्र असते, त्याशिवाय जीवावर उदार होत प्राण देत नाहीत. 'मरताना आम्ही हा देश आता तुमच्या हवाली करून जात आहोत' या जवानांच्या भावनेला कैफींनी असं गीतातून व्यक्त केलं आहे,

कर चले हम फिदा जानो-तन साथियो
अब तुम्हारे हवाले वतन साथियो,
साँस थमती गई, नब्ज़ जमती गई
फिर भी बढते कदम को न रुकने दिया,
कट गए सर हमारे तो कुछ गम नही
सर हिमालय का हमने न झुकने दिया,
मरते मरते रहा बाँकपन साथियो
अब तुम्हारे हवाले बतन साथियो.

या बलिदानाला कलावंत कैफी त्यांच्या अंगभूत वृत्तीने रोमँटिकता बहाल करत गीतात पुढे म्हणतात की, जिवंत राहण्याचे अनेक मोसम असतात, पण जीव कुर्बान करण्याचा ऋतू रोज येत नाही. 'हुस्न' आणि 'इश्क' दोन्हीचं, एकाच वेळी प्रियाराधन करणारी व रक्तातून सळसळणारी जवानी- तारुण्य प्रत्येकाला मिळत नाही. ते आम्हाला मिळालं- आम्ही भाग्यवान. या भूमातेला आमच्या रक्तानं रंगवून, नववधू बनवून, देशवासीयांच्या हवाली करून जात आहोत... किती उत्तुंग आणि भावपूर्ण कविकल्पना! पण ती मनात देशप्रेम पेरून जाते हे नक्की!

मुख्य म्हणजे, समाजवादाचं नाव घेत साम्राज्यवादी व आक्रमक बनलेल्या चीनला कैफी रावणाची उपमा देतात व साथीदार वीर जवानांना तुम्हीच राम व तुम्हीच लक्ष्मण आहात असं सांगतात. देशरूपी सीतामातेकडे कुणी वाकड्या नजरेनं पाहाता कामा नये असं बजावून तिचं रक्षण करा, तिच्या दिशेनं वाईट हेतूनं पुढे येणारे हात कापून टाका असं खणखणीतपणे सांगत कैफीनं जो देशप्रेमाचा पाठ दिला आहे, त्याला देशभक्तीपर गीतात तोड नाही.

खींच दो अपने खूँ से ज़मी पर लकीर
इस तरफ आने पाए न रावन कोई
तोड़ दो हाथ अगर हाथ उठने लगे
छू न पाए सीता का दामन कोई
राम भी तुम, तुम्हीं लक्ष्मण साथियो
अब तुम्हारे हवाले वतन साथियो

हे गीत लिहिणं कम्युनिस्ट कैफींसाठी वैचारिक बंडखोरी होती, पण त्या काळात त्यांचे पक्षाप्रतीचे 'सजदे' (प्रार्थना) ‘आवारा सजदे’ (बंडखोर प्रार्थना) झाले होते व खुदा- ईश्वर बदलणे (म्हणजे सोव्हिएट युनियनऐवजी स्फूर्तीस्रोत म्हणून चीनकडे पाहणे) यामुळे तंग होत कैफींनी आता यापुढे माझा मार्गदर्शक मीच आहे आणि आता दुनियेत खुदा नाही असं निर्भीडपणे बजावलं होतं. कैफींची पक्षनिष्ठा झापडबंद न राहता डोळस झाली आहे आणि समाजवादावर विश्‍वास ठेवूनही, ‘जगातील कामगारांनो एक व्हा!’ ही श्रद्धा कायम ठेऊन राष्ट्रवाद ही पण जगण्याची व अस्तित्वाची अभिमानस्पद निशाणी आहे, याचा खणखणीत उच्चार कैफीचं हे गीत करतं. त्यामुळेच या गीताला कम्युनिस्ट विचारधारेच्या परिप्रेक्षात विशेष महत्त्व आहे.

‘हकिकत’ नंतर सुमारे दशकानं चेतन आनंदचा दुसरा युद्धपट 'हिंदुस्तान की कसम' 1973 साली प्रदर्शित झाला, तेव्हा पाकिस्तानसोबत 1965 व 1971 साली दोन युद्धं होऊन गेली होती. एकीकडे विस्तारवादी व साम्राज्यवादी चीन तर दुसरीकडे कट्टर धर्मांध पाकिस्तान यांचा सामना करणारा हिंदुस्थान हा लोकशाहीवादी व सेक्युलर देश आहे आणि  काही प्रमाणात डाव्या विचारधारेवर चालणारा आहे, तेव्हा स्पष्टपणे देश सुरक्षेला प्राधान्य दिलं पाहिजे व देशाचे रक्षण करणारे भारतीय जवान हे खरे तारणहार आहेत, या भावनेतून चेतन आनंदनी ‘हिन्दुस्तान की कसम’ निर्माण केला, तेव्हा त्याच्या शीर्षक गीतातून पुन्हा एकदा जवानांची दिलेरी व देशाभिमान कैफींनी सार्थपणे व्यक्त केला आहे.

हिन्दुस्तान की कसम, हिन्दुस्तान की कसम
न झुके सर वतन का हर जवान की कसम
जिन्हे प्यार हे वतन से, वो जाँ से खेलते हें
मिले राह में जो तूफां तूफां से खेलते हें
ख्बाबों से खेलते हें, अरमा से खेलते हें
न रुकेंगे हम किसी से, इस उड़ान की कसम
हिन्दुस्तान की कसम
दिल होगा जितना घायल उतन मगन रहेगा
दुनिया को याद अपना बो बाँकपन रहेगा
लहराएगां तिरंगा, जब तक गगन रहेगा
ये निशाँ है हमारा, इस निशान की कसम 
हिन्दुस्तान की कसम!

पण ‘हकिकत’ आणि ‘हिन्दुस्तान की कसम’ या चेतन आनंदच्या युद्धपटाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, सैनिकांच्या कौटुंबिक जीवनाचं व भावभावनांचं तरल आणि वास्तव दर्शन. त्यात त्याला कैफींच्या भावोत्कट रूमानी गीतांची सुरेख साथ लाभली. किंबहुना या दोन्ही सिनेमांना गीत-संगीतामुळे अभिजाततेचा स्पर्श झाला आहे.

एका गुहेत जखमी अवस्थेत काही सैनिक लपून रहात आहेत. आक्रमक चिनी सैन्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी जखमी आणि कुटुंबाच्या आठवणीनं व्याकूळ. बाहेर बहुतेक साऱ्यांना आपण मरण पावलो आहोत, असंच वाटत असणार. आपल्यावर प्रेम करणारी आपली जीवनसाथी किती दु:खी व सैरभैर असेल याबाबत सैनिकांच्या मनातील भावना व्यक्त करणारं कव्वालीसदृश समूहगीत कैफींनी 'अंदेशे' या नज्ममध्ये काही भर टाकून लिहीलं आहे. आपला प्राणसखा गमावल्याचं दु:ख त्या सखीच्या नजरेतून व्यक्त करण्याचा अनोखा प्रयोग इथं कैफींनी परिणामकारकरीत्या केला आहे.

छेड़ की बात मे अरमाँ मचल आए होंगे
गम दिखावे की हंसी में उबल आए होंगे
नाम पर मेरे जब आंसू निकल आए होंगे
सर ना काँधे से सहेली के उठाया होगा
होके मजबूर मुझे उसने भूलाया होगा
जुल्फ ज़िद करके किसी ने जो बनाई होगी
और भी गम की घटा मुखडे पे छाई होगी
बिजली नजरों ने कई दिन न गिराई होगी
रंग चेहरों पे कई रोज न आया होगा
होके मजबूर मुझे उसने भूलाया होगा

याखेरीज घरी राहणाऱ्या व युद्धकाळात पती, प्रियकर वा पित्याच्या काळजीनं सदैव धास्तावलेल्या सैनिकांच्या स्त्रियांच्या भावना व्यक्त करणारं गीत कैफी - मदनमोहन जोडीनं चिरस्मरणीय केलं आहे. त्यात पुन्हा नेमके भाव व्यक्त करणारा लता मंगेशकरांचा दैवी स्वर. एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन!

खेलो ना मेरे दिल से, ओ मेरे साजना
मुस्कुरा के देखते तो हो मुझे
गम हे क्यों निगाह में
मंज़िल अपनी तुम अलग बसाओगे
मुझको छोड दोगे राह में

याखेरीज ‘हकिकत’ मध्ये ‘जरा सी आहट होती है, तो दिल सोचता है, कही ये वो तो नही’ हे प्रतिक्षेचे भावविव्हल गीत घ्या किंवा पुरुषाची जुदाईची व्यथा सांगणारी, ‘मै ये सोचकर उसके घरसे उठा था’ ही नज्म घ्या. ही दोन्ही मानवी संवेदना जागवणारी तरल गीतं आहेत. यातलं ‘मस्ती में छेडके तराना कोई दिलका. आज लुटायेगा खजाना कोई, दिलका’ हे मीलनोत्सुक मदमस्त गीत घ्या की ‘हिंदुस्थान की कसम’ मधलं ‘हर तरफ अब यही अफसाने है, हम तेरी आंखो के दिवाने है’ हे प्रेमगीत घ्या... कैफीमधला रोमँटिक शायर दिलखुलासपणे व्यक्त होत रसिकांना खूश करतो.

मदनमोहनला ‘किंग ऑफ गझल’ म्हणलं जातं. गझलेला चाल देताना तो त्याचं सर्वोत्तम देत असतो. त्याला कैफींनी अशीच एक भावविभोर गझल दिली, सुरेख स्वरसाज देत मदनमोहननी तिला चार चांद लावले.

कुछ धडकनों का जिक्र हो, कुछ दिलकी बात हो
मुमकिन हे इसके बाद न दिन हो न रात हो
मेरे लिए न अश्कबहा, मै नही तो क्या?
हे तेरे साथ मेरी वफा, मै नही तो क्या?
जिंदा रहेगा प्यार मेरा, मै नही तो क्या?

युद्ध हे नेहमीच मानवतेला काळीमा फासणारे असते. कारण त्यात मृत्यूमुखी पडलेल्या वीर जवानांच्या घरावर जी आपदा कोसळते, त्याची भयानकता त्या घरांनाच समजते. त्यामुळे ‘युद्धा नको - शांती हवी’ अशीच काहीशी भावना कैफींनी खाली उद्धृत केलेल्या गीतामध्ये व्यक्त केली आहे. ती एक श्रेष्ठ दर्जाची प्रार्थना आहे आणि त्या जगनियंत्याकडे एवढेच मागणे आहे की, युद्धामुळे आपली माणसं जुदा होऊ नयेत. घरातला प्रकाश तेवत राहिला पाहिजे, त्यासाठी सीमेवरचा माझ्या माणसाला सुखरूप घरी आण... हीच माझी इल्तिजा आहे.

दुनिया बनाने वाले, यही है मेरी इल्तिजा
कि हों न कभी अपने जुदा
घर के जो उजाले हें, बचाना उन्हे
जाके अपने सीने से लगाना उन्हे
तू भी उनका साथी हे बताना उन्हे
जल्दी बो आए, लुटे घर बसाए, दिल से निकले दुआ
यही हे मेरी इल्तिजा
पहना है अँधेरों का जमी ने कफन
सूनी सी दुनिया है, सहमा-सा चमन
काँटे छू न पाएं, फूलों का बदन
तेरे हवाले, बहारों के पाले, 
दुखी दिल की हे यह दुआ
यही हे मेरी इल्तिजा

असगर अली इंजिनियर यांनी निरीक्षण नोंदवल्याप्रमाणे 1964 सालच्या ‘हकिकत’चे देशभक्तीपर गीत लिहिणारे कैफी यांना कम्युनिस्ट पक्ष फुटीचा त्यांनी मनस्वी जरूर खेद झाला, त्यावर विषण्ण मनानं ‘आवारा सजदे’ लिहून आपली व्यथाही व्यक्त केली. कारण त्यांना नेहरूंचे असलेले आकर्षण कायम होते. आणि मुख्य म्हणजे चीनही जरी स्वतःला साम्यवादी देश म्हणवून घेत असला तरी अस्ताला गेलेल्या ब्रिटिश साम्राज्याप्रमाणेच तोदेखील  विस्तारवादी व साम्राज्यवादी आहे; याचं त्यांचं भान लख्ख होतं. या दृष्टीने त्यांची ‘जागिये’ ही नज्म पाहण्याजोगी आहे. त्यात बॉम्बस्फोट करणारा शेजारी देश नि:संशय चीन आहे, कारण 1964 मध्ये चीनने त्यांच्या अण्वस्त्रसज्जतेच्या परिक्षणासाठी अणुबॉम्ब स्फोट घडवून आणला होता. कैफींनी त्याचा भविष्यात भारताला असणारा धोका ओळखला होता. त्यांची ही नज्म म्हणजे त्यांची समस्त भारतीय माणसांना ‘जागे व्हा’ अशी दिलेली काव्यात्म समजावणी आहे.

दफअतन एक ऐसा भयानक धमाका हुआ
जो फरिश्ते ज़मीं पर उतर आये ते उड गए
यह सुलगती पिघलती ज़मीं छोड के
आस्मानों से इक बार फिर जुड गए
अस्र-ए-नौ के लिए जो सहीफ नया लाए थे
उसको अपने परों में छुपा भी लिया
अब सलामत कसी की है दुनियान दीं
रूई की तरह धुनकी पड़ी हे खुदा की जमीं
जिस्म-ए-इन्साँ के दुकडे दरख्तों में अटके हुए
चाँद अँधेरे की सूली पे लटके हुए
टूटे तारों को धरती ने खा भी लिया
जागिए आप के दोस्त ने बम बना भी लिया

(अचानक एक धमाका झाला अन्‌
धरतीवर आलेले देवदूत उडून गेले
ही जळणारी वितळणारी जमीन सोडून
पुन्हा ते एकदा आकाशी मार्गस्थ झाले
नव्या युगासाठी त्यांनी ग्रंथ आणला होता
त्याला त्यांनी पुन्हा आपल्या पंखात लपवलं
आता जगाची नाही की धर्माची नाही खैर
कापसाप्रमाणे देवभूमी विरविरीत झालीय आता
माणसांचे देह वृक्षाला लटकले आहेत.
चंद्रमा अंध:काराच्या सुळीवर बळी गेला आहे
तुटून पडणाऱ्या ताऱ्यांना धरतीनं खाऊन टाकलं आहे
जागे व्हा, तुमच्या मित्रानं बाँब बनवला आहे.)

इथे साम्यवादी तत्त्वज्ञानाचं प्रतिक फरिश्ते (देवदूत) आहे, ज्यांनी धरतीवर नव्या जगासाठी नवा ग्रंथ (दास कॅपिटल) आणला होता, ते भयानक धमाक्यानंतर परत घेऊन आकाशस्थ झाले आहेत. चीनमध्ये आता नावांलाही मार्क्स विचार राहिला नाही, हे खुबीनं कैफी अधोरेखित करतात आणि वृक्षांना लटकलेले मानवी देह, अंध:काराच्या सुळी गेलेला चंद्रमा अशा समर्पक प्रतिमा वापरून बॉम्बस्फोटाने होणाऱ्या संभाव्य हानीची व्यापकता अधोरेखित करीत भारताला ते सावधतेचा इशारा देतात.

नेहरू हे त्या काळातील अनेकांचे हिरो होते. आणि कम्युनिस्ट त्यांना बुर्ज्जा - भांडवलशाहीचे हस्तक व जनशत्रू जरी मानत असले तरी कैफींसाठी नेहरू हे जननायकच होते. हा पी. सी. जोशींचा प्रारंभिक प्रभाव निःसंशय होता, पण भारताला संविधानिक लोकशाही आणि लोककल्याणकारी राज्याकडे नेत, डाव्या विचारांची होता होईल तेवढी कास पकडीत नेहरू देशाला आधुनिक व विज्ञाननिष्ठ बनवण्यासाठी जीवाचं रान करत होते, हे कैफी कम्युनिस्ट विचारधारेचा चष्मा उतरवून पाहत होते. म्हणूनच 'नेहरू' ही त्यांची नज्म त्यांच्या विचार प्रवाहातली एका महत्त्वाच्या टप्प्यावरील त्यांच्या विचार व भावनांचं प्रतिबिंब स्वरूप आहे, असं माझं आकलन आहे.

मैंने तनहा कभी उसको देखा नहीं
फिर भी जब उसको देखा वो तन्हा मिला
फिक्र सदियों अकेली अकेली रही
जेहन सदियों अकेला अकेला मिला
बोझ से अपनी उसकी कमर झुक गई
कद मगर और कुछ और बढ॒ता रहा
खैर-ओ-शर की कोई जंग हो
जिन्दगी का हो कोई जिहाद
बो हमेशा हुआ सबसे पहले शहीद
सबसे पहले वो सूली पे चढता रहा
जिन तकाजों ने उसको दिया था जनम
उनकी आगोश में फिर समायान वो

(एकटं मी त्याला कधी पाहिलं नाही
पण तरीही जेव्हा पाहिलं तो एकाकी होता
शतकानुशतके विचार एकाकीच असतात
शतकानुशतके विवेक हा एकटाच असतो.
ओझ्यानं त्याची कंबर झुकली होती
पण त्याची उंची ही वाढतच गेली
चांगल्या - वाईटांच्या संघर्षात
किंवा कल्याण-उत्पाताच्या लढाईत
जीवनाचा प्रत्येक युद्धात
तो सर्वात प्रथम शहीद झाला
सर्वात आधी सुळीवर चढला
ज्या नियतीनं त्याला जन्म दिला होता
तिच्या बाहूत तो कधीच परत गेला नाही)

हे नेहरूंच्या कार्यकर्तृत्व, विचार आणि जीवनधारणेचं वर्णन कैफींनी किती प्रभावी काव्य प्रतिम वापरून किती नेमकं केलं आहे. त्या मिषाने कैफी जणू आपल्या मूळ समाजवादी श्रद्धा कायम ठेवून नव्या विस्तारीत ध्येयधोरणाची वाच्यता करीत होते!

नेहरू हे गांधींचे शिष्य व राजकीय वारसदार होते, म्हणून नेहरूंचा आवाज हा प्रेमाचा, भाईचाऱ्याचा आवाज होता. ‘नौनिहाल’ सिनेमासाठी कैफींनी त्यांची आता आयडेंटिटी बनलेलं गीत लिहिलं,

मेरी आवाज सुनो, प्यार का राज सुनो
मैने इक फूल जो सीने पे सजा रखा था
उसके परदे में तुम्हे दिल से लगा रखा था
था जुदा सबसे मेरे इश्क का अंदाज़ सुनो
मेरी आवाज सुनो, प्यार का राज़ सुनो

नेहरू आपलं कर्तृत्व व अलिप्तवादी चळवळीमुळे, पूर्व आणि पश्‍चिम जगाचे झाले होते,आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्त्वाचे झाले होते. आणि ध्येयपथावर वाटचाल करता करता त्यांच्यासोबत जनसमूह येत गेला, त्यांचं अनुसरण करू लागला. नेहरू हे मुलांचे चाचा होते. त्यांच्यासाठी मुले भविष्याची आशा होती. "उद्याचं आकाश, उद्याची जमीन व युग त्यांचं आहे व त्यांची झेप माझ्याहून मोठी असणार आहे, म्हणून त्यांचा आवाज ऐका. माझा आवाज ऐका. प्रेमाचं रहस्य ऐका..." हा देशनिर्मात्या युगपुरुष नेहरूंचा विचार कैफी भारतीयांना सांगताना किती सहजतेनं तत्त्वज्ञानी होत जीवनावर भाष्य करतात ते पहा,

मेरी दुनिया में न पुरब हे न पश्‍चिम कोई
सारे इन्सान सिमट आए खुली बाँहो में
कल भटकता था मैं जिन राहों में तनहा-तनहा
काफिले कितने मिले आज उन्ही राहों में
और सब निकले मेरे हमदर्द-ओ-हमराज़ सुनो
मेरी आवाज सुनो, प्यार का राज़ सुनो
नौनिहाल आते हे, अर्थी को किनारे कर लो
मैं जहाँ था, इन्हें जाना हे वहां से आगे
आसमाँ इनका, जमीं इनकी, ज़माना इनका
हें कई इनके जहाँ, मेरे जहाँ से आगे
इन्हे कलियाँ न कहो, ये हें चमनसाज़ सुनो
मेरी आवाज सुनो, प्यार का राज़ सुनो

मन व विचार खुले ठेवीत ते भावसमृद्ध होत गेले. कम्युनिस्ट पक्षाचा समाजवाद आणि गांधी-नेहरूंचा गरिबांचा अश्रू पुसणारा अंत्योदय ही दोन्ही मानवतावादी तत्त्वज्ञाने आहेत व त्यात काही द्वैत नाही, असेलच तर ते साध्य करणासाठीची साधने व मार्ग यांमध्ये आहे, हे कैफींनी ओळखलं व त्यांच्या दुनियेतही आता केवळ ‘न पुरब न पश्चिम’ राहिली, तर सारी मानवजातच उघड्या विशाल बाहूंत सामावली गेली. आणि त्यांची सिग्नेचर बनलेला शेर जन्मास आला,

‘प्यार का जश्न नई तरह मनाना होगा
गम किसी दिलों मे हो, गम को मिटाना होगा’ 

ही त्यांच्या काव्यात्म जीवन दर्शनाची ‘हकीकत’ आहे.


- लक्ष्मीकांत देशमुख
laxmikant05@yahoo.co.in 

Tags: लक्ष्मीकांत देशमुख कैफी आझमी Kaifi Azmi Load More Tags

Add Comment