वो सुबह हमीं से आयेगी!

स्मृतिदिनानिमित्त शायरे आझम साहिर लुधियानवीस जाहीर पत्र

Photo Source- The Better India

प्रिय साहिर,
काही दिवसांपूर्वी एका संगीतमय कार्यक्रमात तुझं ‘चित्रलेखा’ सिनेमातलं  रोशननं संगीतबद्ध केलेलं ‘संसार से भागे फिरते हो’ हे गीत ऐकलं आणि मी अंतर्मुख झालो. त्यातील हे चरण तर मला सतत विचार करायला प्रवृत्त करीत आहे -

‘ये पाप है क्या? ये पुण्य है क्या?
रीतोंपर धर्म की मोहरे है
हर युग मे बदलते धर्मो को
कैसे आदर्श बनाओगे?’

तू 1940 ते 1970 च्या कालखंडातला एक उर्दू शायर व हिंदी फिल्मी गीतकार. डावी विचारसरणी मन व बुद्धीनं स्वीकारलेला, प्रगतीशील लेखक चळवळीचा बिनीचा शिलेदार. किसान व कामगार, दलित-पीडित-वंचित वर्गासाठी कला वापरायची यावर श्रद्धा असणारा. तेव्हा तुला भारतीय रसिकांनी डोक्यावर घेतलं होतं! 

पण, पण आज तू हयात असतास तर? आणि ‘हर युग मे बदलते धर्मो को कैसे आदर्श बनाओगे?’ हा रोकडा सवाल विचारला असतास तर काय झालं असतं? या विचारानंही मी तुझा निस्सीम चाहता अस्वस्थ होतो. कारण काळच तसा विपरीत आला आहे शायरे आझम !
‘लाहौल वलाकुवत’ असं म्हणत कट्टर इस्लामी तुझ्यावर तुटून पडला असता. तुला त्यांनी संघी ठरवलं असतं. धर्मद्रोही तर नक्कीच! कारण त्यांच्यासाठी त्यांचा धर्म हा अपरिवर्तनीय आहे. आणि त्याविरुद्ध मत प्रदर्शन करणं म्हणजे तोबा-तोबा !

दुसरीकडे कट्टर सनातनी धार्मिक हिंदू या गाण्यातला पुढील चरण ऐकून तेवढेच दचकले असते, खवळले असते,

‘ये भोग भी एक तपस्या है
तुम त्याग के मारो क्या जानो?
तुम जनम गवाकर जाओगे
हम जनम बीताकर जायेंगे’

सनातनी हिंदूंना तर पुरातन धर्मपरंपरेचा जाज्वल्य अभिमान. त्यात त्याग म्हणजे फारच महान. आणि तू तर भोगाचं समर्थन करतोस. या जगातील चांगल्या जगण्याचं समर्थन करतोस... म्हणजेच तू मुस्लिम चष्म्यातून हिंदूंच्या महान संन्यासी धर्माची टिंगलटवाळी करतोस... मग तू धर्मविरोधी. पाकिस्तानी. तुझ्या या गाण्यावर बंदीच आणली पाहिजे आणि जमलंच तर ज्या पाकिस्तानात धर्माधिष्ठीत राज्य आलं आहे म्हणून व हिंदू - शीख मित्रांची तिथे उणीव भासत होती, म्हणून तू फाळणीनंतर अवघ्या नऊ महिन्यात भारतात परतला होतास, त्याच पाकिस्तानात तुला परत पाठवावं, अशी मागणी या मंडळींनी केली असती!

असा कसा आजच्या भारतात-हिंदुस्थानात साहिर तू अप्रासंगिक - इररिलिव्हंट झालास? आजचा मुस्लिम तुला काफीर म्हणेल तर हिंदू तुला स्युडो-सेक्युलर व पाकिस्तानी संबोधेल. तू आजच्या भारतात काही कामाचा नाहीस यावर या दोघांचं जरूर एकमत होईल. 
तुझी प्रेमगीतं-विरहगीतं आम्ही एक वेळ सहन करू, पण धर्मावर टीका करणारी शायरी खपवून घेतली जाणार नाही. आम्ही सोशल मीडियावर तुझ्यावर ट्रोल सेना ‘छूऽ’ करून सोडून देऊ, आणि तसं करताना तुझी सेक्युलॅरिझम, हिंदू-मुस्लिम भाईचारा आणि ‘गंगा-जमनी’ तहजीबची महती गाणारी कविता-गाणी नजरेआड करू ! 

एवढं करूनही जर सामान्य रसिकांना अजूनही तू आवडत राहिलास तर आमच्या बेहद्द आवडत्या ‘लव्ह जिहाद’ संकल्पनेचा तुला जनक ठरवून टाकू. कारण तुझी शीख अमृता प्रितम, आणि हिंदू सुधा मल्होत्रा सोबतची अधुरी प्रेमप्रकरणं त्याचा अविष्कार होता असं म्हणू! समजलास बच्चमजी?

माफ कर मला साहिर. या हिंदू व मुस्लिम कट्टर पंथियांच्या चष्म्यातून तुझं ‘चित्रलेखा’तील वरील गाणं तपासत तुझा उपहास केल्याबद्दल. पण तू तर प्रतिभावंत शायर! तुला माझ्या या उपहासामागची वेदना कळतेय ना...?
साहिर तू जन्मजात बंडखोर. अय्याशी बापानं अम्मीचा लिहाज ठेवला नाही, म्हणून जमीनदारी ठोकरत व फकिरी पत्करत तू आईबरोबर बडी हवेली सोडून गेलास. कुराणसोबत शीख धर्माची गुरूबाणी तू वाचली होतीस आणि हिंदू धर्म परंपरेचा तुला चांगला अभ्यास होता. पुढे तरुण वयात मार्क्सवादाकडे आकृष्ट झालास आणि स्वत:ला प्रगतीशील लेखक चळवळीशी जोडून घेतलंस. त्यातूनच मग तुझ्यातला इन्कलाबी व सेक्युलर शायर जन्मास आला. 

तुझ्यासाठी धर्म-परंपरेपेक्षा कामगार-शेतकर्‍यांचं दैन्य व शोषण जास्त महत्त्वाचं होतं आणि त्यामुळे शोषण करणार्‍या धर्म परंपरेविरुद्ध शायरीच्या माध्यमातून तू आवाज उठवलास. तो काळ किती वेगळा होता. तेव्हा तरुणांनी तुला डोक्यावर घेतलं. तुझी ‘ताजमहल’ ही नज्मही प्रेमाची नाही तर ती निर्माण करण्यार्‍या गरीब कामगारांची वेदना आहे, हे तुझं सांगणंही तरुण मनाला भावलं होतं. तेव्हाही टीका व्हायची, पण लेखणीबंद होईल इतपत नाही. आज पेरुमल मुरुगनसारख्या साहित्यिकाला आपल्यातला लेखक मारून टाकल्याची फेसबुकवर घोषणा करून आपली लेखणी मोडून टाकावी लागते, आजच्या काळात तू हयात असतास तर तुझ्यावरही ती वेळ जरूर आली असती...

साहिर ज्या काळात तू हिंदी सिनेमाची गाणी लिहायचास, त्या काळातल्या सिनेमात फाशीची शिक्षा ‘दफा 302’ तहत सुनावून होताच ज्या लेखणीनं फाशीच्या आदेशावर सही केली, ती लेखणी न्यायाधीशाकरवी मोडून टाकलेलं दाखवलं जायचं. पेरुमलनं शब्दश: व वाच्यार्थ्यानं नाही पण तत्वत: असंच केलं ना? तू आमचा आवडता शायर. तुलाही आज अशी अंगावर बसरणार्‍या शब्दांना प्रसवणारी लेखणी मोडावी लागली असती का? नुसती कल्पना केली तरी अंगावर शहरा येतो.

आज गौरक्षकांच्या उन्मादात गरीब मुस्लिम मारले जात आहेत, तिकडे काश्मिरमध्ये पण शैव-बुद्ध-शीख व सुफी परंपरेनं सिद्ध झालेल्या व जिला मी हिंदुस्थानियतचं स्थानिक प्रोटोटाईप मानतो त्या काश्मिरीयतमधून पंडित समाज अलग करण्यात आला आहे आणि धर्म- जाती-परंपरेचा अभिमान रक्त बनून क्रुद्ध डोळ्यांत जमा होत तिथं अक्षरश: खूनखराबा होतोय, सीमेपलीकडून प्रायोजित दहशतवादी हल्ल्यात सामान्यजन लहू-लुहान होत आहे... अशा वेळी एक बाजू घेत दुसर्‍यावर दोषारोप करण्याचं गलिच्छ राजकारण सर्वच पक्ष खेळताना दिसतात. अशा वेळी दोघांनाही खडे बोल सुनावत ताळ्यावर आणणारी लेखणी आज आम्ही कुठे हुडकायची?

फाळणीच्या वेळच्या व उन्मादी धर्माधिष्ठीत दंगलीत तू किती परखडपणे लिहून उन्मादाला कमी करण्याचा प्रयत्न केला होतास. तुझं ते गीत आजच्या काळातही किती महत्त्वाचं आहे....
‘ये जलते हुवे घर किसके है, कटते हुवे तन किसके है?
तक्सीम के अंधे तुफां में, लुटते हुवे गुलशन किसके है?
बदबख्त फिजा ये किसकी है, बरबाद नशिमन किसना है?
कुछ हम भी सुने, हमको भी सुना
ये किसका लहू है, कौन मरा?’

या गीतातलं पुढलं चरण तर अधिकच भेदक आहे.
‘जिस राम के नाम पे खून बहे
उस राम की इज्जत क्या होगी?
इन्सान की इस जिल्लत से परे,
शैतान की जिल्लत क्या होगी?
ये किसका लहू है, कौर मरा
ऐ रहबरे मुल्क ओ कौन बता!’

साहिर, आज देशात धार्मिक उन्मादाचं जे वातावरण आहे, ते पाहून आज तू असंच लिहिलं असतंस ना?
‘ये शाखे नूर जिसे जुल्मतोंने सिंचा है
अगर  फली तो शरारों के फूल लायेगी
ये फल सभी तो फस्ले-गुल के आने तक
जमिरे अर्ज में एक जहर छोड जायेगी’

पण मूळ भारताची ही प्रकृती नाही की संस्कृती नाही. हे विद्वेषाचे काळे ढग लवकरच विरतील आणि सहिष्णुतेची पहाट निश्चित उगवेल, हा आशावाद मनात घट्ट जोपासायचा असेल, तर आम्हा सार्‍यांना तुझ्याच शायरीा आसरा घेणं भाग आहे. कारण तुझा बुलंद आवाज, कणखर आशावाद व जुल्म करणार्‍यांना ललकारण्याचे तुझे बागी तेवर वाचताना - ऐकताना आमचंही रक्त सळसळून उठतं!
‘दबेगी कब तलक आवाज-ए-आदम हम भी देखेंगे
रुकेंगे कब तलक जब्जात-ए-बरहम हम भी देखेंगे
सहर के दोशपर गुलनार परचम हम भी देखेंगे
तुम्हे भी देखना होगा ये अलम हम भी देखेंगे’

उद्याच्या पहाटे क्रांतीचा लाल झेंडा फडकणार आहे. आम्ही तर तो पाहूच, पण जुल्म करणार्‍यांनो, तुम्हालाही ते पाहावं लागेल! असा आशावाद आमच्या विपरीत परिस्थितीत मनोमन पटत असला तरी तो प्रत्यक्षात कसा आणायचा साहिर?

तू नास्तिक होतास व हे तू मुस्लिम असूनही ठामपणे म्हणत होतास. तुला काय माहीत असणार साहिर की, तुझ्या माघारी इस्लामी राष्ट्रांत तर नास्तिकता धर्मद्रोहाचा गुन्हा बनला आहे, पण घटनेप्रमाणे सेक्युलर असलेल्या भारतातही एका मुस्लिम तरुणाने नास्तिकता जाहीर केली म्हणून काही कट्टर तरुण त्याला ठार करतात. पण त्याच्या माघारी त्याचा धर्मनिष्ठ बाप हिमतीनं जेव्हा ‘आता मीही नास्तिक होतो’ असं जाहीर करतो, तेव्हा त्याचं हे कृत्य कुठे तरी तुझ्या बंडखोरीचा वारसा वाटतो. पण हा अपवाद झाला अणि तू तर जाणतोस- अपवादाने मूळ नियम सिद्ध होतो.

फाळणीच्या धर्मांध जहरी वातावरणात नास्तिक तर सोडाच पण अस्तिकांचे काय हाल झाले असा प्रश्न विचारत साहिर तू लिहिलं होतंस -
‘मेरा इल्हाद (नास्तिकता) तो खैर एक लानत था,
सो है अब तक
मगर इस आलम ए वहशत में
इमानों में क्या गुजरी?
चलो वो क्रूफ्र (काफिर) के घर से,
सलामत आ गये लेकिन
खुदा की मुम्लिकत मे (देवाच्या दुनियेत)
सोख्ता जानों पे (जाळणार्‍या जीवावर) क्या गुजरी?’

स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात ‘आयडिया ऑफ इंडिया’ विकसित झाली. त्याचा आधार व तत्त्वज्ञान होतं- सहिष्णुता, भाईचारा, धार्मिक सलोखा. आपला भारत हा बहुधर्मीय, बहुसांस्कृतिक देश आहे. साहिर, याचं तुला अचूक भान होतं. म्हणून ‘लिव्ह अँड लेट लिव्ह’चा तू पुरस्कार केलास. फाळणीची धग व धार्मिक विद्वेष विसरून हिंदू - मुस्लिम - शीख व इसाईंनी एकत्र प्रेमानं राहावं म्हणून तू शायरीतून आम्हा भारतीयांना सहिष्णुता व बंधुभाव शिकवत राहिलास. इश्क हा माणसाचा धर्म आहे असे सांगताना सार्‍याच धर्माची प्रतीकं एकाच सुफीयाना कव्वालीमध्ये किती सहजतेनं पण परिणामकारक रीतीनं आणलीस तू.
‘अल्लाह और रसूल का फरमान इश्क है
यानी हादिस इश्क है, कुरआन इश्क है
गौतम और मसिहा का अरमान इश्क है’

असं सांगत शेवटी साहिर, तू भक्त- देव म्हणजे बंदा आणि खुदामधे असलेलं अद्वैतही कसं झपकन बाण सुटावा तसं वेगानं आपला आवाज बुलंद करीत सांगितलंस.
‘खाक को बुत और बुत को देवता करता है इश्क
इंतेहा ये है कि बंदे को खुदा करता है इश्क!’

यापेक्षा मानवी जीवनाचा मुलाधार असणार्‍या प्रेमाचं-इश्कचं वर्णन दुसरं काय असू शकतं? साहिर, तुझ्या गीतांनी त्या वेळी आमची दिवाळी रोशन व्हायची, आमची ईद दीप्तीमान व्हायची. पण आज तुझ्या - माझ्या देशात धार्मिक विद्वेषाचं हे जहर असं कसं खोलवर पसरलं गेलं आहे? मुख्य म्हणजे आपण भारतीय जे मूलत: शांततामय सहअस्तित्वावर विश्वास ठेवणारे धर्मांधतेला बळी कसे पडत आहोत? बाहेरच्या कट्टर वहाबी इस्लामनं इथला सुफी परंपरेतला मुसलमान कसा बहकत आहे? ‘वसुधैव कुटुंबकम’ आणि विश्वकल्याणासाठी ‘पसायदान’ मागणारा हिंदूही कट्टर कसा होत आहे? हा देश आपली मूळ सहिष्णु प्रवृत्ती हरवून बसला तर आपलं वेगळेपण काय राहील शिल्लक?

साहिर, तुला ही जाणीव होती, म्हणून तू सेक्युलर इंडियाचं राष्ट्रगान ठरावं असं गाणं लिहिलंस व जन्माला येणार्‍या नाव-गाव-धर्म-जात नसणार्‍या मुलाला अंगाई न म्हणता विश्वबंधुतेचं बाळकडू पाजत म्हणलंस,
‘तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा
इन्सान की औलाद है इन्सान बनेगा’

उद्याच्या भारतीयांना एका मोलाचा उपदेश करीत म्हणालास,

‘नफरत जो सिखाए वो धरम तेरा नही है
इन्सां को जो रोंदे वो कदम तेरा नही है
कुरआन न हो जिसमें वो मंदिर नही तेरा
गीता न हो जिसमे वो हरम तेरा नही है
तू अम्न का और सुलह का फरमान बनेगा
इन्सान की औलाद है, इन्सान बनेगा!’

साहिर, तुझ्या या प्रतिभाविलासापुढे मी अक्षरश: नतमस्तक होतो व उदात्त भावनेनं ऊर भरून येतो. तुझी ही कल्पनाच किती भन्नाट आहे! मंदिरात कुराण हवं तर मस्जिदीमध्ये गीतापाठ व्हावा. गुरुद्वारात सर्वधर्म प्रार्थना व्हावी. बरोबर आहे, बापूंच्या दररोजच्या सर्वधर्म प्रार्थनेबाबत तुला माहीत असणार. म्हणून तर तू ‘अल्ला तेरो नाम. ईश्वर तेरो नाम. सबको सन्मती दे भगवान’ अशी उदात्त सेक्युलर प्रार्थना लिहून गेलास. माझ्यासारख्या संदेहवाद्याचं आध्यत्म लताच्या आवाजातील या तुझ्या गाण्यानं सुरू होतं व त्यावरच संपतं. एवढी दहा ओळींची नज्म मला जीवनप्रवासात धार्मिक सहिष्णुतेसाठी पुरेशी आहे.

मला जर खरंच अधिकार असता तर ‘तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा’ या तुझ्या गीताला राष्ट्रगान सदृश गीताचा दर्जा दिला असता. खैर या विधानावरही ट्रोलसेना माझ्यावर तुटून पडणार हे नक्की! मी ट्रोलमुळे नाही तर माणसाच्या मनात भिन्न धर्मीयांच्या द्वेषाचं जहर किती खोलवर भिनलं आहे या जाणिवेनं भयभीत होतो. पण साहिर, तुझ्यातल्या इन्कलाबी आवाजानं पुन्हा कणखर व्हायला झालं.
‘ये दीन के ताजिर ये वतन बेचनेवाले
इन्सानों के लाशों के कफन बेचनेवाले
ये महलों मे बैठे हुए कातील ये लुटेरे
काटों के एवज रुहे चमन बेचनेवाले
तू इतके लिए मौत का ऐलान बनेगा’

उद्याची पिढी अशी सेक्युर व बंधुता पाळणारी व्हावी व समता व सहिष्णुतेचं संविधानिक तत्त्वज्ञान नसानसात भिनलेली व्हावी, अशी कामना आज करण्या पलीकडे माझ्या हाती काय उरलंय?
साहिर, जेव्हा जेव्हा माझं मनं उदास होतं व निराशा दाटून येते, ती कमी करण्यासाठी पुन्हा तूच उज्ज्वल भविष्याची स्वप्न घेऊन येतोस.
‘अपनी काली करतुतों पर
जब ये दुनिया शरमायेगी
वो सुबह कभी तो आयेगी !’

पण ही सुबह कोण आणणार? साहिर, त्याचं उत्तर देताना, आमच्यात दुर्दम्य आशावाद पेरत तूच पुढे म्हणाला होतास -
‘मनहूस समाजी ढांचो में
जब जुल्म न पाले जायेंगे
जब हात न कट जायोंगे
जब सर न उछाले जायेंगे
वो सुबह हमी से आयेगी !
दुनिया अमन और खुशहाली को
फुलों से सजाई जायेगी
वो सुबह हमी से आयेगी !

थँक्यू साहिर, आजच्या जहरी विद्वेषी कालखंडात तुझ्या शब्दांनी काही एक दिलासा देत आहेस त्याबद्दल.

- लक्ष्मीकांत देशमुख
laxmikant05@yahoo.co.in

(प्रशासकीय अधिकारी व सर्जनशील लेखक अशी दुहेरी ओळख असलेल्या लक्ष्मीकांत देशमुख यांनी कथा, कादंबरी व अन्य ललित लेखन केले आहे. 2017 साली बडोदा येथे  झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.)

Tags: Lakshmikant Deshmukh Birth Anniversary साहीर लुधियानवी जयंती लक्ष्मीकांत देशमुख खुले पत्र Open Letter Load More Tags

Comments:

Ravi Jagtap

अप्रतिम, वाचून आशावाद वाढला.

Add Comment