एकमेकांविषयीचा आदर आणि विश्‍वास हाच आमच्या सहजीवनाचा पाया 

आंतरधर्मीय विवाह केलेल्यांच्या मुलाखती : 15

आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांच्या मुलाखतींची 'धर्मारेषा ओलांडताना' ही मालिका प्रत्येक महिन्यातील दुसर्‍या आणि चौथ्या रविवारी कर्तव्यवरून प्रसिद्ध होत राहिली. आजच्या द्वेष आणि भीतीच्या वातावरणात तरूणांना आश्‍वस्त वाटावं, त्यांना कमी अधिक प्रमाणात का होईना प्रेम-सहजीवनाविषयी मार्गदर्शन मिळावं आणि आपल्या माणूसपणाच्या जाणिवा अधोरेखित व्हाव्यात हा या मुलाखतींचा उद्देश होता. 28 फेब्रुवारी 2021 रोजी सुरु झालेल्या या मालिकेतील शेवटची मुलाखत आज प्रसिद्ध होत आहे.

रूपाली नाईक आणि मॅकेन्झी डाबरे. लहानपणीचे मित्र, मोठेपणीचे सखेसोबती आणि आयुष्यभराचे जीवनसाथी असं फार कमी जणांच्याबाबत जमून येतं. बालपणीच्या निरागस मैत्रीतून तारुण्यात प्रेमाचा अंकुर उमलत जाणं आणि पुन्हा आपल्या आयुष्यात ते प्रेम लाभणं याइतकं नितांतसुंदर आयुष्य काय असू शकेल? 

रूपाली आणि मॅकेन्झी यांच्याबाबतीत हाच योग जुळून आला. मामाच्या गावी सुट्टीसाठी येणार्‍या रूपाली आणि तिथंच असणारे मॅकेन्झी यांच्यातलं मैत्र वयानुसार वृद्धिंगत होत गेलं. अर्थात विनासायास, विनासंकट प्रेम मिळत नाही. प्रेमाचा माणूस आयुष्यात मिळवण्यासाठी थोडी मेहनत घ्यावीच लागते. या दोघांनीही संकटांची चिंता न करता, वसईतल्या ब्राह्मण-ख्रिश्‍चन ऐतिहासिक घडामोडींचं दडपण न घेता आपल्या प्रेमावर विश्‍वास ठेवला आणि आज चौदा वर्षांपासून ते त्यांच्या मुलासोबत आनंदानं जगत आहेत.

वसईतलं उमराळे हे रूपाली यांचं गाव. आईवडील आणि एक बहीण असं त्यांचं छोटेखानी कुटुंब. वडलांची सरकारी नोकरी तर आई गृहिणी. घरची स्थिती चांगली असल्यानं शिक्षणात कधी कुठली आडकाठी झाली नाही. त्यांनी लग्नानंतर मुंबई विद्यापीठातून एमकॉम केलं. त्या गृहिणी आहेत आणि मॅकेन्झी यांच्या सामाजिक कार्यात त्यांना मदत करतात.

मॅकेन्झी वसईतल्या भुईगावचे. आईवडील, एक बहीण आणि एक भाऊ हे मॅकेन्झी यांचं कुटुंब. वडील मुंबईत बीएसटीमध्ये कंट्रोलर होते. आई गृहिणी. मॅकेन्झी यांनी समाजसेवा विषयातून पदवी घेतली. मॅकेन्झी यांचं शिक्षण संपलं त्या काळात वसईतल्या समाजसेविका नवलीन कुमार यांचा खून झाला होता. त्या घटनेनं मॅकेन्झी अस्वस्थ झाले. समाजकार्याची पदवी घेतल्यानंतरही वर्षभर आपण भ्रमंती करू असा विचार त्यांनी केला होता. मात्र या खुनाच्या घटनेनंतर त्यांनी लगेचच समाजसेवेत झोकून दिलं. सुरुवातीला नवलीन कुमार यांचं आदिवासी पाड्यांवरचं काम पुढं नेण्यासाठी ते कार्य करत राहिले. पुढं झोपडपट्टीतल्या कामगार, मजूर यांच्या हक्कांसाठी ते काम करायला लागले. सध्या ते युवा नावाच्या संस्थेतून झोपडपट्टीतल्या कष्टकर्‍यांसाठी आणि आदिवासी पाड्यांवरच्या लोकांसाठी काम करतात. 

त्यांना रूहान नावाचा एक मुलगा आहे. तो सध्या आठवीत शिकत आहे. दोघांच्याही सहजीवनाला चौदा वर्षं पूर्ण झाली आहेत. त्या दोघांचं सहजीवन समजून घेण्यासाठी त्यांच्यासोबत साधलेला हा संवाद...

प्रश्‍न - तुम्ही दोघं वसईतलेच. तुम्हा दोघांच्या जडणघडणीविषयी सांगा...
मॅकेन्झी - वसईतलं भुईगाव हेच आमचं मूळ गाव. घरी आईबाबा, एक भाऊ आणि एक बहीण. वडलांची बीएसटीतली नोकरी असल्यानं घरची मध्यमवर्गीय सुस्थिती होती. माझे बहीणभाऊ दोघंही शिक्षकी पेशात आहेत. वसईतल्या बर्‍याच जणांना शेतीची आवड आहे. तशीच माझ्या आईबाबांनासुद्धा होती. आमच्या घरी छोटीशी शेती होती. आईबाबा दोघंही आवडीनं शेती करायचे. 

घरातलं वातावरण मोकळंढाकळं होतं. आईबाबा दोघांनाही सामाजिक भान होतं. इथं ख्रिश्‍चन, कोळी, भंडारी, आदिवासी, ब्राह्मण अशा वेगवेगळ्या जातिधर्मांचे लोक एकत्र राहतात. सांस्कृतिकदृष्ट्या आमच्या आणि इतर समाजाच्या प्रथा-परंपरा सारख्याच आहेत. इथं सर्वच समाजांचे लोक शेती करतात. त्यांच्या रितीभाती, चालीरिती यांच्यात बर्‍यापैकी साधर्म्य आहे. त्यामुळं आपण कुणी वेगळे आहोत असा फरक कधीच जाणवला नाही. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढल्यानं आर्थिक चटके बसले नाहीत. बाहेरचं जग अनुभवलेलं नव्हतं. वसईतल्या आमच्या छोट्याशा विश्वात मी रमलेलो होतो.

सामाजिक मूल्यं, सामाजिक भेदाभेद यांची ओळख कॉलेजमध्ये झाली. बारावीपर्यंतचं शिक्षण वसईतच करून पुढं बीएसडब्ल्यू करण्यासाठी निर्मला निकेतन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या कॉलेजनं मला खूप सामाजिक भान दिलं. 

कॉलेजमध्ये प्रवेश घेईपर्यंत मी दलित चळवळींविषयी ऐकलंही नव्हतं किंवा झोपडपट्टीतल्या लोकांचे प्रश्‍नही मला फारसे माहीत नव्हते. मी वसईच्या ज्या पश्‍चिम पट्ट्यात राहतो तिथं आम्ही कधीही झोपडपट्टी, तिथल्या समस्या अनुभवल्या नव्हत्या किंवा त्याबाबत काही ऐकलंही नव्हतं. 

माझ्या परिघाबाहेरचं जग बघण्याची, वेगवेगळे संघर्ष आण आंदोलनं समजून घेण्याची संधी मला कॉलेजजीवनातून मिळाली. आमच्या बालपणात हरित वसई संरक्षण समिती नावाची चळवळ चालायची... वसईतला हिरवा पट्टा वाचावा यासाठी लढत होती. या सगळ्याचेही पडसाद मनावर उमटत होते. 

सामाजिक समतेची, सामाजिक न्यायाची, मानवी हक्काची ही लढाई, हा संघर्ष यांची ओळख कॉलेजच्या या तीन वर्षांमध्ये खूप चांगल्या तर्‍हेनं मला झाली. समाजाला सोबत घेऊन समतेचा, न्यायाचा मार्ग चोखाळला पाहिजे ही जाणीव इथंच निर्माण झाली. तोपर्यंत आपण कुणीतरी वेगळे आहोत, भारी आहोत अशीच भावना होती. ख्रिस्ती समाजात एकच ईश्‍वर ही संकल्पना आहे आणि ती सर्वश्रेष्ठ आहे असंच वाटायचं. पण खरा धर्म आणि त्याचं व्यापक स्वरूप नंतर लक्षात आलं. आपण सर्व मानवाची लेकरं आहोत ही शिकवण अधिक महत्त्वाची याचा अनुभव आला. 

रूपाली - माझंही मध्यमवर्गीय आयुष्य राहिलं. आम्ही वसईतल्या उमराळे गावचे. मला एक मोठी बहीण आणि आईवडील. मात्र आमची जॉइंट फॅमिली होती. त्यामुळं आम्ही एकत्र राहत होतो. माझे वडील, काका सरकारी नोकरीत होते. घरी कुठलीही चणचण नव्हती. कुठल्याही प्रकारे आर्थिक कोंडी झाली नाही. परिसरात आमच्या कुटुंबाला एक प्रतिष्ठा होती आणि म्हणूनच मी लग्नाचा निर्णय स्वतःहून घेतला हे आमच्या कुटुंबीयांना मानहानीचं वाटलं असणार. 

प्रश्‍न - शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच सामाजिक कार्य करायचं असं काही ठरवलं होतं? 
मॅकेन्झी - शिक्षण पूर्ण झाल्यानंतर खरंतर मी कसलंच काम करायचं नाही, तर उलट वर्षभर भरपूर भ्रमंती करायची असा विचार केला होता. जून 2002मध्ये शिक्षण पूर्ण झालं आणि त्यानंतर लगेचच एक घटना घडली. वसईतल्या  आदिवासींसाठी काम करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या नवलीन कुमार यांचा वसईतल्या काही माफियांनी खून केला होता. या घटनेनं मी अस्वस्थ झालो. त्यांच्या कार्याला आपण काहीतरी मदत करायला हवी असा विचार सतत डोक्यात घोळायला लागला. 

नवलीन कुमार काम करत असलेल्या मुंबईच्या युवा या संस्थेत काही ओळखीचे लोक होते. मी त्यांच्याशी संपर्क केला. वसईतला जमीनमाफिया आणि स्थानिक संघर्ष पाहता स्थानिक व्यक्तीनं या कामात मदत केली तर चांगलंच राहील असा विचार समोर आला आणि मी त्यांच्यासोबत जोडला गेलो. नालासोपारा इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांसोबत आदिवासींसाठी काम सुरू केलं. आदिवासी मुलांसाठी शाळा घेणं, त्यांचे क्लासेस घेणं, त्यांचे मानवी हक्क, त्यांचे जमिनीच्या संदर्भातले हक्क आणि अधिकार या संदर्भात त्यांना जागृत करणं अशा स्वरूपाचं काम होतं.

...पण हे काम करत असतानाच तिथले फेरीवाले, घरकाम करणारे, बांधकाम मजूर यांचे प्रश्‍नही दिसायला लागले. त्यांच्यासाठीपण काम करण्याची गरज आहे असं वाटायला लागलं. त्यातूनच मग नालासोपारा झोपडपट्टीत राहणार्‍या लोकांनाही पाणी मिळावं, रेशनकार्ड मिळावं, जातीचा दाखला मिळावा यासाठी संघर्ष सुरू केला. 

2004मध्ये असंघटित श्रमिक पंचायत म्हणून कामगारांची संघटना उभी केली. त्याच वेळेला वसईतल्या विविध सामाजिक कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन दहशतवाद विरोधी कृती समिती उभी केली. नवलीन कुमार यांच्या हत्येनंतर परिसरात भीतीचं वातावरण होतं. ते कमी करण्यासाठी आम्ही जमीन माफिया, चाळ माफिया यांच्या विरोधात  आवाज  उठवण्याचं काम या समितीच्या वतीनं केलं. 

अशा रितीनं माझ्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली. याच कामात माझी समरसता वाढली, कामात गुंतून गेलो. पुढं या क्षेत्रातली विविध माणसं जोडली गेली आणि समाजकार्य माझ्या जगण्याचा मुख्य भाग झालं. त्यातूनच नालासोपारा वसई या भागातल्या झोपडपट्टीतल्या लोकांचे प्रश्‍न, शिक्षणाचे प्रश्‍न, कामगारांचे प्रश्‍न अशा समस्यांवर मी काम करत राहिलो.

प्रश्‍न - वसईतल्या वेगवेगळ्या गावांत तुम्ही दोघं राहायला होतात तर तुमची भेट कुठं आणि कशी झाली?
मॅकेन्झी - रूपालीचे मामा आमच्या घरासमोर राहत होते. तिथं ती सुट्ट्यांमध्ये यायची तेव्हा आमची भेट व्हायची. आम्ही तेव्हा क्रिकेट, कॅरम, विटीदांडू असे खेळ खेळायचो. त्यातूनच आमची मैत्री वाढली. पुढं तिच्याविषयी आपुलकी निर्माण झाली आणि मग तिचं प्रेमात रूपांतर झालं. 

रूपाली - आमच्या मामानं भुईगावात नवीन घर घेतलं होतं. त्याच्या लहानमोठ्या दुरुस्त्यांचं काम तेव्हा सुरू होतं. महिनाभर आम्ही तिथं राहायला होतो. त्यातूनच आमची मैत्री झाली. मॅकेन्झीनं तेव्हा मला त्यांच्या घरचा लॅंडलाईन नंबर दिला होता. अर्थात आम्ही काही लगेच बोलायला लागलो नाही. पण केव्हा तरी पुन्हा तो नंबर दिसला आणि मी त्यावर डायल करून त्याच्याशी सहज बोलायला लागले. 

कालांतरानं त्याचं कॉलेज संपल्यावरही दुपारी-संध्याकाळी आमच्या भेटी व्हायला लागल्या. प्रेमाची भावनासुद्धा प्रथम मीच बोलून दाखवली. मीच त्याला प्रपोजही केलं. त्यानंतर मात्र त्यानं टाळायला सुरुवात केली. जवळपास सहासात महिने तरी त्याचा नकारच राहिला. पुढं त्याचा एक मोठा अपघात झाला. दुचाकी चालवणारा मित्र जागीच ठार झाला आणि मॅकेन्झी दूर उडून पडला. अपघात खूप भयंकर होता. त्याच्या एका हातात आणि पायात रॉड टाकावा लागला. त्या वेळेसही प्रेम-लग्नाचा विचार मी सोडून द्यावा म्हणून त्यानं खूप विनंती केली. पण माझं त्याच्यावर प्रेम होतं तर होतंच. कुठल्याही परिस्थितीत माझं प्रेम मागं हटणार नव्हतं, ते कमी होणार नव्हतं. मी म्हटलं काहीही झालं तरी माझं तुझ्यावर प्रेम आहेच. शेवटी मग त्याला त्याच्या नकाराचा हट्ट सोडावाच लागला.

मॅकेन्झी - आमच्या भिन्न धर्मांमुळं पुढं काहीतरी वाद उद्भवायला नको असं सुरुवातीला वाटत होतं. माझ्यापेक्षा तिची काळजी होती की, तिला यावरून कुठलाही त्रास होऊ नये आणि म्हणूनच सुरुवातीला मी मैत्रीची सीमा ओलांडायला तयार नव्हतो. पण पुढं रूपालीच्या प्रेमानंच नकाराचं रूपांतर होकारात झालं.

प्रश्‍न - नकाराचं होकारात रूपांतर होऊन प्रेमाच्या सोबतीची सुरुवात तर झाली... मग लग्नापर्यंतचा त्याचा प्रवास कसा राहिला?
मॅकेन्झी - प्रचंड नाट्यमय आणि संघर्षपूर्ण. रूपालीच्या घरी आमच्या प्रेमाची कुणकुण लागली. रूपाली सामवेदी ब्राह्मण आहे. वसईत ब्राह्मण-ख्रिश्‍चन संबंधांना एक ऐतिहासिक पार्श्‍वभूमी आहे. साधारण चारशे-साडेचारशे वर्षांपूर्वी सामवेदी ब्राह्मण समाजातल्या काही जणांनी धर्मांतर केलं आणि ते ख्रिश्‍चन झाले. इथल्या सामवेदी ब्राह्मणांमधल्या आणि स्थानिक ख्रिश्‍चन लोकांमधल्या चालीरिती-परंपरांमध्ये बरंच साधर्म्य दिसत असलं तरीही या दोन्ही समाजांत रोटीबेटी व्यवहार होत नाही. त्याबाबत दोन्हीकडचे समाज प्रचंड कडवे आहेत. 

एका ख्रिश्‍चन मुलावर प्रेम आहे हे माहीत होताच तिच्या घरचे सतर्क झाले. आता अशी सगळी पार्श्‍वभूमी असताना तिच्या घरी आमच्या प्रेमाची कुणकुण लागली असेल तर याचा काय अर्थ होतो तो समजून घ्या.

प्रश्‍न - रूपाली यांच्या घरी कसं माहीत झालं?
रूपाली - आपण प्रेमात असलो की आपल्याला ते कुणाला तरी सांगावंसं वाटत असतं. जवळच्या कुणाबरोबर तरी आपला आनंद वाटून घ्यावा असंही खूप वाटत असतं. मॅकेन्झी पदवी पूर्ण करून समाजकार्य करायला लागला होता. मी मात्र तेव्हा चौदावीत शिकत होते. त्या वयात मी माझ्या एकदोन मैत्रिणींना माझ्या प्रेमाविषयी सांगितलं. मला वाटलं की, त्या सिक्रेट ठेवतील पण त्यातल्या एकीनं जाऊन घरात सांगितलं. 

माझ्यासाठी हे मोठं अडचणीचं ठरलं. अर्थात माझ्या कुटुंबीयांनी त्यानंतरही माझ्यावर कुठलं बंधन आणलं नाही. त्यांनी माझं कॉलेजला जाणं बंद केलं नाही की मला त्याबाबत कुठलाही जाब विचारला नाही. माझं जर कॉलेज बंद केलं तर लोक त्यांना प्रश्‍न विचारतील म्हणून त्यांनी माझं कॉलेजमध्ये, मैत्रिणींकडं जाणंयेणं बंद केलं नाही. मात्र त्यांच्या स्तरावर ते नाराज होते. घरच्यांची धुसफुस सुरू झाली. ते समाजाला घाबरत होते आणि मात्र माझ्यावर दबाव टाकून त्यांना कुठलीच बदनामीपण नको होती. दुसरीकडं त्यांनी माझ्यासाठी स्थळ शोधायलाही सुरुवात केली. 

घरातलं वातावरण बिघडलेलं मला दिसत होतं. माझ्यावर कधीही बंधनं येतील हे मला जाणवत होतं. मी मॅकेन्झीशिवाय राहू शकत नव्हते. त्यामुळं शेवटी घरातून बाहेर पडून लग्न करण्याचा निर्णय आम्ही घेतला. घरातून फायनली बाहेर पडण्याआधी मी रोज कॉलेजला निघताना माझे काही कपडे आणि माझी कागदपत्रं बॅगेत टाकत होते. ते दुसर्‍या एका मैत्रिणीकडं ठेवत होते. दहावीबारावीची प्रमाणपत्रं, रेशनकार्ड अशी लग्नासाठी आवश्यक कागदपत्रं घेणं आवश्यक होतं. ते सारं काही मी आधीच मैत्रिणीकडं जमवून ठेवलं आणि मग जुलै 2007मध्ये घरात एक चिठ्ठी लिहून मैत्रिणीकडं जायला निघावं तशी निघाले. 

मॅकेन्झी - त्या वेळेस तिचं वय 20 वर्षं होतं आणि मी चोवीस वर्षांचा होतो. तिचं शिक्षण अजून बाकी होतं. त्यामुळं सुरुवातीला मी तिलाच समजावण्याचा प्रयत्न केला. सगळं जुळून, सगळ्यांची राजीखुशी घेऊन आपण लग्न करू असा विचार होता. मात्र तिच्या घरचे मान्य करणार नाहीत हे तिला जाणवलं होतं आणि म्हणूनच ती घराबाहेर पडली होती.

प्रश्‍न - धाडस करून घर सोडलंत पण मग तिथून पुढं कुठं गेलात आणि तुम्ही घर सोडलंय हे घरच्यांना कधी कळलं?
रूपाली - मी घर सोडलं आणि नायगावला मॅकेन्झीच्या एका मित्राच्या कुटुंबीयांकडे गेले. मी लोकलचा पास काढण्यासाठी त्यांचा पत्ता दिलेला होता. मात्र दुर्दैवानं माझा पास घरीच राहिला आणि मग मी कुठं असणार याची कल्पना त्यांना आली. त्यांना पत्ता मिळतोय हे लक्षात आल्याबरोबर मी तिथून मीरा रोडला मॅकेन्झीच्या आणखी एका मित्राच्या कुटुंबाकडे गेले. 

दरम्यान या प्रकरणात पोलीसही इनव्हॉल्व्ह झाले होते. मॅकेन्झीविरूद्ध गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

मॅकेन्झी - ती घरातून गायब झाल्यामुळं त्यामागं माझाच हात आहे असं पोलिसांना तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं होतं. त्यामुळं ते माझ्या घरी चौकशीसाठी आले. तोपर्यंत सामाजिक कामामुळं पोलीस मला चांगल्या तर्‍हेनं ओळखत होते. रूपाली काही माझ्या घरी नव्हती. शिवाय ती तेव्हा सज्ञान होती. तिनं विशी पूर्ण केली होती त्यामुळं रूपालीच्या कुटुंबीयांनी कितीही दबाव आणला तरी ते मला काही करू शकत नव्हते.

त्या वेळेस या प्रकरणाला काही राजकीय नेते आणि स्थानिक विश्‍व हिंदू परिषदेचे लोक ख्रिश्‍चन आणि हिंदू असा रंग देण्याचा प्रयत्न करत होते. माझ्याविरुद्ध तक्रार घेण्यासाठी तेच पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्नही करत होते. 

दुसर्‍या दिवशी ती मीरा रोडला पोहोचली तेव्हा तिनं मला फोन केला आणि माझा फोन टॅप झाला. त्यामुळं पोलिसांना तिथला पत्ताही माहीत झाला... मात्र काही चांगल्या पोलीस मित्रांनी आधीच आम्हाला त्याची कल्पना दिली आणि पोलीस पोहोचण्याआधीच ती कशीबशी तिथून निघून नवी मुंबईला आमच्या मित्राच्या घरी पोहोचली  होती. 

हे असं खूप ताणून चालणार नव्हतं. ती समोर आली नाही तर माझ्यावर अपहरणाची केस पडणार होती त्यामुळं पोलिसांना सामोरं जायचं आम्ही ठरवलं. दरम्यानच्या काळात पोलीस तिला काय प्रश्‍न विचारू शकतात यासंदर्भात आम्ही इतर पोलीस मित्रांच्या मदतीनं तिचा सराव करून घेतला. गंमत अशी होती की, तोपर्यंत ख्रिस्ती मुलाला ब्राह्मण मुलीशी लग्न करण्यास मदत करणारे सगळे हिंदूच मित्र होते.

त्यानंतर आम्ही रूपालीला घेऊन ठाणे इथले पोलीस अधीक्षक रामराव पवार यांच्याकडे गेलो. त्यांना सगळी हकिगत सांगितली. नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी फोन केल्यानंतर कळलं की, मुलगी सज्ञान आहे आणि ती तिच्या मर्जीनं लग्न करत आहे तेव्हा 'त्या मुलीकडून तसं लिहून घ्या आणि तिच्या घरच्यांना कळवा.' असं रामरावांनी सांगितलं. 

पोलिसांसमोर आणि घरच्यांना पाहून किंवा पोलिसांच्या उलटसुलट प्रश्‍नांना घाबरून रूपाली मागे हटेल का अशी धाकधूक होती. पण तिनं हा प्रसंग खूपच धीरानं सांभाळला. अत्यंत खंबीररीत्या त्या सगळ्या प्रसंगाला ती सामोरी गेली. तिच्या आईनं भावनिकरीत्या तिला कमकुवत करण्याचा खूप जास्त प्रयत्न केला. घरच्यांची, कुटुंबीयांची आठवण करून दिली तरीही तिनं तिचं मन घट्ट ठेवलं. तिनं माझी सोबत सोडली नाही आणि ती आजतागायत खंबीरपणे माझ्यासोबत उभी आहे.

रूपाली - दरम्यान तात्पुरती सोय म्हणून आम्ही मंदिरात लग्न केलं होतं. जेणेकरून अगदीच कुणी आम्हाला विरोध केला तर आमचं लग्न झालंय हे आम्हाला सांगता येईल.

प्रश्‍न - पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर, कुटुंबीयांना पाहिल्यानंतर नेमक्या काय भावना होत्या?
रूपाली - माझं प्रेम मिळवण्यासाठी मलाच झगडावं लागणार हे स्पष्ट होतं. त्यामुळं आई, मामा, काका माझे सर्व दूरवरचे नातेवाईक, गावकरी यांना पाहून थोडी भीती वाटली पण माघारी फिरणं माझ्यासाठी शक्य नव्हतं. 

मॅकेन्झी - आम्ही नालासोपारा पोलीस स्टेशनला पोहोचलो. तोपर्यंत परिसरातले विश्‍व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या तीनशे-चारशे कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला घेराव घातलेला होता. 

ख्रिश्‍चन मुलगा जबरदस्तीनं हिंदू मुलीशी लग्न करतोय असा त्यांचा पवित्रा होता. ते पोलिसांवर दबाव टाकत होते. पण याही वेळी खूप सारे मित्र आणि त्यांचे संपर्क मदतीला आले. त्याच वेळेस सांगलीचे प्रतीक पाटील हे केंद्रीय मंत्री होते. सांगलीमध्ये फेरीवाल्यांची युनिअन पाहणाऱ्या शहान शेख या आमच्या मित्रानं पाटील यांना घटनाक्रम सांगितला. त्या वेळेस आरपीआयचे रामदास आठवले आणि चंद्रकांत खंडोरे यांच्यासोबत माझे चांगले संबंध होते. या तिघांनीही पोलीस स्टेशनला फोन केला. ‘आमच्या कार्यकर्त्याला काही त्रास होता कामा नये याची काळजी घ्या.’ 

शिवाय त्याच वेळी मला कुणीतरी त्रास देतोय असं वाटून नालासोपारा नवी मुंबई झोपडपट्टी भागातले दीडशे ते अडिचशे कार्यकर्ते नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये जमा झाले होते. शेवटी उसनवारी भांडणं लावायला आलेल्या विश्व हिंदू परिषद व बजरंग दल कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं की, आपण ज्या पोराला विरोध करतोय तो अगदीच कुणी साधासुधा, सामान्य माणूस नाही. 

शेवटी मीही त्यांना सांगितलं मुलगी सज्ञान आहे. तिच्या मर्जीनं लग्न करत आहे. तिच्या कुटुंबीयांसमोर सांगते की, तिचं माझ्यावर प्रेम आहे, तिला माझ्याशी लग्न करायचं आहे. तिनं तिच्या घरच्यांसमोर जबाब नोंदवला आहे. हे सारं ऐकल्यानंतर मग तर त्यांचा उसना उत्साहही मावळला. ते हळूहळू पांगायला लागले.

प्रश्‍न - एवढं घडेपर्यंत मॅकेन्झी यांच्या कुटुंबीयांची भूमिका काय होती? त्यांना तुमच्या प्रेमाची माहिती केव्हा झाली? 
मॅकेन्झी - जेव्हा रूपाली घर सोडून बाहेर पडली आणि पोलीस माझ्या घरी आले तेव्हाच काहीतरी गडबड असल्याचं घरच्यांच्या लक्षात आलं. तोपर्यंत माझ्या घरी आमच्या प्रेमाविषयी काहीही माहिती नव्हती. बाबांचा या सगळ्याला अजिबातच विरोध नव्हता. त्यांचं म्हणणं होतं की, तो स्वतंत्र आहे आणि यासंदर्भात स्वतःचा निर्णय घेऊ शकतो. 

आई मात्र या प्रेमाच्या, लग्नाच्या विरोधात होती. त्यामागं ब्राह्मण-ख्रिश्‍चन वादाची असणारी ऐतिहासिक पार्श्‍वभूमी हे कारण होतं. हिंदू-मुस्लीम वाद जसा आहे तसाच वसईमध्ये रोटीबेटी व्यवहारावरून ब्राह्मण-ख्रिश्‍चन वाद आहे. यामुळं ती घाबरली होती. तिचं म्हणणं होतं की, तू कुठल्याही मुलीशी लग्न कर पण ब्राह्मण नको. अर्थात तिच्या या म्हणण्यालाही खूप उशीर झालेला होता. शेवटी समाजात आपली शोभा नको म्हणून तू काही दिवस घराबाहेरच राहा असं तिनं मला सांगितलं. माझ्या घरातलेही शंभर टक्के पॉझिटिव्ह होते असं नाही मात्र त्यांनी पाचसात महिन्यांतच आमचं नातं स्वीकारलं.

प्रश्‍न – पोलीस स्टेशनमधल्या सर्व नाट्यमय घडामोडींनंतर पुढं काय झालं? तुम्ही विवाह नोंदणी कुठल्या कायद्याअंतर्गत केली?
मॅकेन्झी - आम्हाला कायदेशीररीत्या स्पेशल मॅरेज अ‍ॅक्टखाली लग्न करायचं होतं. कारण आम्हाला धर्मांतर करायचं नव्हतं. या कायद्याखाली आम्ही नोंदणी अर्ज केला. मात्र त्यासाठी महिनाभर थांबावं लागणार होतं. महिनाभर काय करायचं म्हणून आम्ही काही दिवस नवी मुंबईत मित्राच्या फ्लॅटवर राहिलो. 

मग आम्ही तीन दिवस सांगली, तीन दिवस अमरावती, तीन दिवस नागपूर, चार दिवस कलकत्ता, चार दिवस उडिसा, चार दिवस दिल्ली अशा वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या स्थानिक युनिअनच्या कार्यकर्त्यांशी चर्चांचे कार्यक्रम आम्ही घेतले. धर्मापलीकडे जाऊन मानवतेच्या संदर्भातून वैचारिक देवाणघेवाणीचे कार्यक्रम केले. हे सगळं उरकून 14 सप्टेंबर 2007 रोजी आमचं वर्‍हाड घेऊन आम्ही पुन्हा कोर्टात गेलो आणि स्पेशल मॅरेज अ‍ॅक्टखाली विवाहबद्ध झालो. 

जुलैपासून सुरू झालेली ही धावाधाव, हे नाट्य 14 सप्टेंबरला पूर्ण झालं. त्यानंतर आम्ही अधिकृतरीत्या पोलीस स्टेशनमध्ये आमच्या लग्नाचं प्रमाणपत्र नेऊन दिलं. रूपालीच्या घरीही  प्रमाणपत्राची एक कॉपी पाठवली. वसईमध्ये हिंदू-ब्राह्मण आणि ख्रिश्‍चन दोन्ही समाजांत आमच्यामुळे कुठलाही वाद होऊ नये म्हणून आम्ही सातआठ महिने वसई स्टेशनजवळ भाड्याची खोली घेऊन राहिलो.

माझे आईबाबा येऊन भेटत होते, तर काही वेळा मी त्यांच्याकडे जाऊन त्यांना भेटत होतो. रूपालीचं माहेर मात्र कायमचं तुटलं. तिचे आईवडील, काका-मामा, नातेवाईक यांच्यापैकी कुणीही तिच्याशी संपर्क ठेवला नाही, ते कधी भेटायला आले नाहीत आणि आम्हीही त्यात थोड्याफार प्रमाणात कमी पडलो. आमच्याकडूनही त्यांना संपर्क झाला नाही, ही एवढीच एक खंत आहे.

रूपाली - मला माझ्या कुटुंबीयांची ख्यालीखुशाली बाहेरून कुठून-कुठून मिळत राहते. ते आनंदी आहेत याचं मला समाधान आहे. माहेरच्यांशी संपर्क तुटला याची मला तरी खंत नाही. कारण मी जो निर्णय घेतला त्यावर मी ठाम राहिले. शिवाय इकडच्या लोकांनी मला खूप छान समजून घेतलं. मी परकी आहे अशी जाणीव कधीच होऊ दिली नाही. त्यामुळं माहेरचे बोलत नाहीत हे सत्य स्वीकारणंही सोपं गेलं.

प्रश्‍न - तुम्ही पुढंही स्वतंत्रच राहण्याचा निर्णय घेतला?
मॅकेन्झी - सातआठ महिन्यांमध्ये भुईगावमधलं वातावरण निवळलं. आमचे सामाजिक कार्यकर्तेही आमच्या पाठीशी उभे होतेच त्यामुळं आम्ही पुन्हा आमच्या कुटुंबासोबत राहायला लागलो. बाबांचा कधीच विरोध नव्हता. पुढं रूहानचा जन्म झाला. आता आपल्याकडे बाळ आलंय या एकाच भावनेनं सगळे एकमेकांशी जोडले गेले. 

मला वाटतं, मुलीकडच्या कुटुंबीयांना समाजात जितकी उत्तरं द्यावी लागतात आणि त्यांना जितकं सोसावं लागतं तितकं मुलाकडच्या कुटुंबीयांना सोसावं लागत नाही. त्यामुळं त्यांचा विरोधही लवकर मावळतो. लग्नानंतर साधारण महिनाभर घरातलं वातावरण थोडं तणावाचं राहिलं. 

आईचा विरोधही मला किंवा रूपालीला नव्हता. पण समाजाला द्याव्या लागणार्‍या उत्तरांमुळं ती त्रस्त होती. पण ते लवकरच निवळलं. सुदैवानं घरातलं वातावरण मोकळंढाकळं असल्यामुळे फार काही त्रास झाला नाही.

प्रश्‍न - लग्नानंतर भिन्न धर्मांमुळं तुमच्यात काही संघर्ष झाले?
मॅकेन्झी - धर्मावरून कधीच नाही झाले. खरंतर आमच्या आजूबाजूला हिंदू, ब्राह्मण, कोळी, भंडारी, ख्रिश्‍चन अशी विविध समाजांची माणसं कैक वर्षांपासून एकत्र राहत असल्यानं प्रत्येकालाच एकमेकांच्या संस्कृतीची ओळख होतीच. त्यामुळं एकत्र आल्यानंतर एकत्र राहण्याच्या दृष्टीनं संघर्ष करावा लागला नाही. सुरुवातीला माझे कुटुंबीय किंवा काही नातलग म्हणत होते की, ब्राह्मण मुलीशी लग्न केलंच आहेस तर किमान तिचं धर्मांतर करू. आमच्या कुटुंबात काही नातलग धर्मगुरू, बिशप असे कट्टर ख्रिश्‍चन आहेत. त्यामुळं ते दबाव आणायचे याचा मानसिक त्रास रूपालीला व्हायचा. घरातल्या मोठ्यांसमोर काही बोलता येत नसल्यानं तिची कोंडी व्हायची आणि तो संपूर्ण राग माझ्यावर निघायचा. सुरुवातीला दोनतीन वर्षं या विषयांवर तात्पुरत्या वादावादी झाल्या मात्र कालांतरानं आम्ही बदलत नाही आणि बदलणार नाहीये हे लक्षात आल्यानंतर घरातले मोठे आपसूक शांत झाले. 

आमचा संघर्ष कुठे होतो तर कामाच्या निमित्तानं तिला वेळ न देता येणं यावरून. बर्‍याचदा मला कामामुळं दहा ते वीस दिवस घराबाहेर राहावं लागतं. माझे कुटुंबीय, माझे नातेवाईक हेच रुपालीचेही नातेवाईक आहेत. तरी तिच्यासाठी घरातली मीच जवळची व्यक्ती. तेव्हा तिला काही वेळा एकटेपणा वाटू शकतो. त्यावरूनच थोड्याफार कुरबुरी होतात मात्र ती मला, माझ्या कामांना समजून घेते आणि पुन्हा सारं काही पूर्ववत होतं.

प्रश्‍न - नातलग, शेजारीपाजारी यांनी तुमच्या आंतरधर्मीय विवाहावरून काही प्रश्‍न केले का?
मॅकेन्झी - वसईमध्ये अर्बनाइज्ड घरं आहेत त्यामुळे कुणी कुणाच्या घरात नाक खुपसायला जात नाही आणि मी पहिल्यापासूनच सामाजिक कार्यात असल्यामुळे आमच्या भूमिका लोकांना माहीतच होत्या. कालांतरानं रूपालीही या कामात ओढली गेली. त्यामुळं त्यांची तोंडंही गप्प झाली. हां... मात्र सुरुवातीला थोडा त्रास नक्कीच झाला. 

धर्माचं राजकारण किती मोठं असतं आणि स्थानिक पातळीवर कसं हाताळलं जातं ते वास्तवात आम्हाला अनुभवयाला आलं. अशा प्रकारच्या संकटात आपले मित्र कोण हेही नेमकेपणानं लक्षात येतं. सुरुवातीच्या वर्षभरामध्ये आम्हाला त्यांची चांगलीच ओळख झाली. तसा मी मुळातच फार धार्मिक नाही. मला धर्माशी काही देणंघेणं नाही. मी थेट नास्तिक नसलो तरी कर्मकांडं करणारा, त्यातच अडकून राहणारा आस्तिकही नाही. 

काही नातेवाईक, शेजारपाजारचे लोक मात्र रूपालीला तू ख्रिश्‍चन हो. धर्मांतर कर अशा गोष्टी सुचवायचे. त्यावरून सुनवायचे तेव्हा मी त्यांना म्हणायचो की, मी स्वतः फारसा चर्चमध्ये जात नाही, धर्मपालन करत नाही तर रूपालीकडून अशी अपेक्षा करू नका.

जिवंतपणी धर्म लागत नाही किंवा आमचं त्याच्यावाचून काहीही अडत नाहीये ही गोष्ट बर्‍यापैकी समाजानं स्वीकारलेली आहे.  पण मृत्यूनंतर आमचे अंत्यसंस्कार कसे करायचे, आम्हाला कुठं पुरायचं या गोष्टींची खूप जणांना चिंता असायची, अजूनही असते. आम्ही म्हटलं, आमच्या मृत्यूचा भार इतर कुणावर का यावा? त्याची तजवीजही आपणच केलेली बरी. 

मग पाचेक वर्षांपूर्वी आम्ही दोघांनीही देहदान करण्याचा निर्णय घेतला आणि अर्ज भरून मिळालेलं प्रमाणपत्र लॅमिनेट करून घरात दर्शनी लावलं आहे. अशा तर्‍हेनं आम्ही आमच्या मृत्यूनंतरचं सेव्हिंग केलं आहे. लोकांना आमची अतिरिक्त काळजी करण्याचं काहीच कारण नाही.

लग्न झाल्या-झाल्या ब्राह्मण-ख्रिश्‍चन अशी चर्चा रंगवण्यात आली होती. मात्र कालांतरानं धर्माचं असं काहीही नसतं, दोन व्यक्ती एकमेकांना आवडल्या आणि त्या छान गुण्यागोविंदानं राहत आहेत, इतरांसाठी चांगलं कामही करत आहेत असं लोकांच्या मनातलं परिवर्तन होताना आम्ही अनुभवलं. 

आमच्या लग्नानंतर आमच्या भागामध्ये सात ते आठ असे विवाह झाले. आम्हाला जसा विरोध झाला तसा विरोध त्यांना झाला नाही. उलट काहींना घरातूनच परवानगी मिळाली किंवा अगदीच काही जणांच्या बाबतीत वर्षभरातच सारं काही सुरळीत झालं. महत्त्वाचं म्हणजे मी जर सामाजिक कार्यात नसतो किंवा चळवळींशी संबंधित नसतो तर कदाचित माझ्यावरही वेगळं दडपण आलं असतं. मीही आत्ता वागतोय तसा कदाचित वागलो नसतो. पण सामाजिक भान मला मिळत राहिल्यानं मी दबलो नाही. 

आम्ही दोघांनीही कधीही आमचा आंतरधर्मीय विवाह म्हणजे काहीतरी वेगळा पराक्रम केलाय असं दाखवलं नाही, तर उलट सर्वसामान्यांमध्ये मिसळून गेलो. त्यांनी काही टीका करण्याआधी आपणच त्यांच्यात मिक्स व्हायचं म्हणजे ते आपल्या जगण्यात आडकाठी करत नाहीत. त्यामुळे आम्हाला कधीच अवघडल्यासारखं झालं नाही.

प्रश्‍न - रूहानच्या कधी लक्षात आलं की, तुम्ही वेगवेगळ्या धर्मांतले आहात? त्या अनुषंगानं त्यांनी कधी काही प्रश्‍न विचारले का?
रूपाली - त्याला कळायला लागलं तेव्हा आम्हीच त्याला आई हिंदू आणि बाबा ख्रिश्‍चन आहेत हे सांगितलं. त्यातलं त्याला कळलं किती माहीत नाही. पण हे असं काहीतरी नॉर्मलच आहे असंही त्याला वाटलं असावं.

मॅकेन्झी - 2008मध्ये मुलाचा जन्म झाला. त्याचं नाव आम्ही अरेबिक शब्द रूह यावरून रूहान असं ठेवलंय. तो तीनचार वर्षांचा असताना शेजारी गणपती बसला की आई टिका लावते, तिथं हात जोडते आणि घरातले बाकीचे चर्चला जातात हे हळूहळू कळायला लागलं होतं. 

अर्थात हे त्याच्यासाठी नॉर्मल होतं म्हणून त्यानं काही प्रश्‍न विचारलेही नाहीत. पण त्याला प्रश्‍न पडायचे ते आपला मामा, आपली मावशी कुठं असते? त्याच्या मित्रमंडळींकडून मामा आला किंवा मामाकडं चाललोय. तुझे मामा-मावशी कुठं आहेत असे प्रश्‍न व्हायचे. त्यातून मग त्यानं आम्हाला तशी विचारणा करायला सुरुवात केली. 

धार्मिक अंगानं नाही मात्र नातेवाइकांच्या संदर्भातून त्याला आमचे भिन्न धर्म लक्षात आले. त्या वेळी त्याला उत्तर देणं आम्हाला शक्य नव्हतं. मात्र हळूहळू त्याची समज वाढत गेली. आपली आई हिंदू आहे, वडील ख्रिश्‍चन आहेत आणि म्हणून मामाकडचे आपल्याशी संबंध ठेवायला उत्सुक नाहीत, हे त्याच्या लक्षात आलं. 

आणखी एक बाब, आमच्या भागातले लोक खूप समजूतदार आहेत. रूहानसमोर त्यांनी कसलीही शेरेबाजी केली नाही त्यामुळं त्याच्या मनात कुठलाही न्यूनगंड तयार झाला नाही. 

रूपाली - रूहान जन्मल्यानंतर आम्ही त्याचा बाप्तिस्मा केला कारण ख्रिश्‍चन प्रथेनुसार नवीन मूल जन्माला आलं की चर्चमध्ये नोंद करावी लागते. मात्र हे केवळ आम्ही फॉरमॅलिटी म्हणून केलं आहे. मोठं होऊन धर्माची निवड करेपर्यंत त्याच्या जगण्यात त्याला कुठलीही अडचण येऊ नये एवढाच आमचा हेतू आहे.

प्रश्‍न - तुम्ही घरात कोणकोणते सण साजरे करता?
रूपाली - आम्ही सण सांस्कृतिक आनंदासाठी साजरे करतो. आम्ही राहतो त्या परिसरात तीन आदिवासी पाडे आहेत. ख्रिसमस काळात आम्ही त्या पाड्यांवरच्या लोकांसोबत काही सांस्कृतिक कार्यक्रम करतो. गाणं-नृत्य यांचा आनंद लुटतो. मला रांगोळी काढायला आवडते त्यामुळं बर्‍याचदा सणांना म्हणून रांगोळी काढते. दिवाळीला फराळ वगैरे करतो. मी तसं पाहता दहा टक्के आस्तिक आणि बाकी नास्तिकच आहे. आस्तिकही अशी की, कर्मकांडं किंवा फार ताण घेऊन कुठलीही पूजाअर्जा करत नाही. समोर आलंच तर सहजगत्या हात जोडावेत इतकी आस्तिक.

मॅकेन्झी - आम्ही धार्मिक म्हणून कुठलेही सण साजरे करत नाही. मजा आणि आनंद लुटता यावा या हेतूनं सण साजरे करतो. अमुकच सण साजरा करावा याबाबत आम्ही स्वतःला कुठली सक्ती करत नाही. आपल्याला छान वाटेल, मजा येईल या कारणानं आम्ही सण साजरे करतो. इस्टर आणि ख्रिसमस. रूहानला आणि त्याच्या मित्रांना होळी-दिवाळी हे सण साजरे करायचे असतात. दिवाळीला थोडी सजावट करतो. मुलांना रंग खेळायला आवडतात. होळीची मजा लुटायला आवडते. अशा उत्सवांतून आम्ही आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो. 

मी स्वतः फारसा आस्तिक  नाही. कर्मकांडांवर माझा विश्‍वास नाही. मी स्वतः चर्चमध्ये शेवटचा कधी गेलो हे मला नीट सांगता येणार नाही. तसा इकडचा समाज हा खूप मिक्स्ड आहे. त्यामुळं तुमचे सण हे तुमचे एकट्याचे उरत नाहीत तर ते परिसरातल्या सगळ्यांचेच होतात. इथं पहिल्यापासूनच सांस्कृतिक एक्सचेंज खूप चांगल्या प्रकारे होत आलं आहे.

आम्ही मुलाला वाढवतानाही विशिष्ट एका धर्माचं काहीही त्याला सांगत नाही. आमच्या घरातलं वातावरण जाणीवपूर्वकच धार्मिक ठेवलेलं नाही. तो चर्चमध्येही जातो आणि इथल्या कुठल्याही यात्रेतही तितक्याच आनंदानं सहभागी होतो. त्याला चर्चमधल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ही हिरिरीनं भाग घ्यायला आवडतं आणि इथल्या गणपती पथकांमध्ये ढोल वाजवायलाही. उलट त्याला दोन्ही धर्मांच्या सणांमध्ये सांस्कृतिकदृष्ट्या सामावून जायला मजा वाटते.

प्रश्‍न - आंतरधर्मीय विवाह हे तुम्हाला किती महत्त्वाचे वाटतात?
मॅकेन्झी - निश्चितच महत्त्वाचे आहेत. अलीकडं त्याबाबतचा विचारही बदलत आहे. गेल्या वीस वर्षांमध्ये तर खूप फरक पडलाय असं वाटतंय, निदान मी जिथं काम करतो, राहतो त्या भागात तरी. आम्ही लग्न केलं तेव्हा वसईमध्ये आंतरधर्मीय विवाह करणारं आमचं पहिलं जोडपं असेल. अलीकडं लोकांनी खूप चांगल्या तर्‍हेनं अशा पद्धतीच्या विवाहांचं स्वागत सुरू केलंय. आमच्या भागात आदिवासी, दलित, ब्राह्मण, ख्रिश्‍चन अशा प्रकारे आंतरधर्मीय व आंतरजातीय विवाह होत आहेत. लोकांना त्यात गैर काहीच वाटत नाहीये. 

असे विवाह नॉर्मलाईज होताहेत ही चांगली गोष्ट आहे. माझ्या वेळेस अशी परिस्थिती नव्हती. माझी ओळखपाळख नसतानाही तीनशेचारशेचा जमाव पोलीस स्टेशनवर आला होता. माझी वट कळल्यामुळं ते पांगले मात्र माझ्याऐवजी जर दुसरी कुणी व्यक्ती असती तर कदाचित दबावाच्या रेटाखाली तिला मारून तरी टाकलं असतं किंवा माघार घेण्यास भाग पाडलं असतं. लग्न होऊ दिलं नसतं.

प्रश्‍न - प्रारंभीची संकटं आणि संघर्षातून मार्ग काढत तुमचं सहजीवन आकाराला येत गेलं. त्याचा पाया काय असेल असं वाटतं?
रूपाली - खरंतर मला चटकन राग येतो. मॅकेन्झी मात्र खूप शांत आणि समजूतदार आहे. आमचा एकमेकांवर प्रचंड विश्‍वासही आहे. आमचं नातं आजही मैत्रिपूर्ण आहे. 

मॅकेन्झी - नवराबायको म्हटल्यानंतर थोडेफार वाद, भांडणं हे होणारच... पण आमचा एकमेकांविषयी आदर आणि विश्‍वास हा आम्हाला दोघांनाही महत्त्वाचा मुद्दा वाटतो. घरची सगळी जबाबदारी ती एकटी छान आणि समर्थपणे सांभाळते. माझे नातेवाईक माझे कमी आणि तिचे जास्त चांगले मित्रमैत्रीण झाले आहेत. माझ्या मावस बहिणी, आते भावंडं माझ्यापेक्षा तिच्याशी क्लोज झालेले आहेत. मी हाक मारली तर कदाचित ते येणार नाहीत पण रूपालीनं त्यांना हाक मारली तर ते नक्कीच धावत येतील. तिनं माझ्या नातेवाइकांना नुसतं सांभाळून नाही घेतलं तर आपलंसं करून घेतलं. त्यांच्याशी प्रेमाचे संबंध निर्माण केले. 

सुरुवातीला माझा नकार होता. त्याचं होकारात रूपांतर रूपालीनंच केलं. आमच्या सहजीवनाचा पाया रूपालीनं माझ्या बाजूनं खंबीर उभं राहणं आणि तिचं प्रेम हाच म्हणावं लागेल. मला आठवतंय की, पोलीस स्टेशनमध्ये तिचे कुटुंबीय तिला इमोशनली ब्लॅकमेल करत होते, धमकावत होते तरीही एका क्षणासाठीही तिनं माझी साथ सोडली नाही. प्रेमाच्या आणि लग्नाच्या घेतलेल्या निर्णयाशी खंबीर राहिली. 

एवढं प्रेम करणारी व्यक्ती आपल्याला सहजासहजी लाभत नाही. मला मिळाली तेव्हा मी करंटेपणा केला नाही याचं आज समाधान आहे. आपल्या आईबाबांना सोडून ती आपल्याकडे येतीये, आपल्यावर नितांत प्रेम करतीये. अशा व्यक्तीला टाळण्यात काहीच हशील नव्हतं. मला वाटतं तिचं प्रेम हाच मजबूत पाया आहे.

(मुलाखत व शब्दांकन - हिनाकौसर खान)
greenheena@gmail.com


'धर्मरेषा ओलांडताना' या मालिकेतील मुलाखती आणि त्यांचे शब्दांकन हिनाकौसर खान-पिंजार यांनी केले. या मालिकेविषयीचे त्यांचे मनोगत लवकरच कर्तव्य साधनावरून प्रसिद्ध होईल.  


'धर्मरेषा ओलांडताना' या सदरातील इतर मुलाखतीही वाचा:

प्रास्ताविक 

समीना पठाण - प्रशांत जाधव

श्रुती पानसे -  इब्राहीम खान 

प्रज्ञा केळकर - बलविंदर सिंग

अरुणा तिवारी - अन्वर राजन

दिलशाद मुजावर - संजय मुंगळे

हसीना मुल्ला - राजीव गोरडे

इंदुमती जाधव- महावीर जोंधळे

मुमताज शेख - राहुल गवारे

जुलेखा तुर्की - विकास शुक्ल

वर्षा ढोके- आमीन सय्यद

शहनाज पठाण - सुनील गोसावी

डॉ. आरजू तांबोळी आणि विशाल विमल

वैशाली महाडिक आणि निसार अली सय्यद

सईदा शानेदिवान आणि सतीश चौगुले

Tags: मराठी प्रेम आंतरधर्मीय विवाह रूपाली नाईक मॅकेन्झी डाबरे हिनाकौसर खान पिंजार हिंदू ख्रिश्चन धर्मरेषा ओलांडताना Love Interfaith Marriage Hindu Christian Mecanzy Dabre Rupali Naik Couple Interview Heenakausar Khan Load More Tags

Add Comment