तक्रार करण्यासाठी जागा मिळाली की निम्मी भांडणं कमी होतात

आंतरधर्मीय विवाह केलेल्यांच्या मुलाखती : 8

मुमताज शेख - राहुल गवारे. दोघंही जमिनीवर राहून काम करणारे कार्यकर्ते. दोन व्यक्ती परस्परसंमतीनं एकमेकांचा स्वीकार करू शकतात आणि न पटल्यास वेगळं होऊ शकतात या संविधानाच्या मूल्यावर विश्‍वास ठेवणारं जोडपं. दोघांचंही आयुष्य रखरखीत उजाड राहिलं. त्यांच्या आयुष्यात प्रेमाची पखरण केली ती एका चिमुकलीनं. पहिल्या लग्नातून होरपळून निघालेल्या मुमताजची मुलगी हा दोघांच्याही प्रेमाचा बिंदू ठरला. केवळ धर्माची बंधनं झुगारून ते पुढं आले नव्हते तर अविवाहित पुरुषानं घटस्फोटित आईशी लग्न करणं या रूढ  नसलेल्या मान्यतेलाही धक्का दिला  होता. साहजिकच गलिच्छ भाषेत त्यांच्या नात्याचा अपमानही करण्यात आला पण ते डगमगले नाहीत. समाजातल्या लहानमोठ्या प्रश्‍नांसाठी उभं राहता-राहता त्यांना स्वतःसाठी उभं राहणं ठाऊक झालं होतंच आणि मग 2006मध्ये त्यांनी चिमुकल्या साक्षीदारासोबतच आनंददायी सहजीवनाची सुरुवात केली.

मुमताज शेख मूळची अहमदनगरची पण तिचं बालपण मुंबईच्या सह्याद्रीनगर वस्तीत गेलं. घरच्या बेताच्या परिस्थितीत नववीपर्यंतच शिक्षण घेतलं आणि वयाच्या पंधराव्या वर्षीच तिचा निकाह झाला. पुढच्या दीडेक वर्षांत तिच्या पदरात एक मुलगीही आली. पारंपरिक घरात नेटानं, आनंदानं संसार करण्याचं स्वप्न ती पाहत होती पण त्याहून अधिक कार्य तिच्या हातून घडायचं होतं. वस्तीत आलेल्या कोरो (कमिटी ऑफ रिसोर्स ऑर्गनायझेशन) या संस्थेनं तिच्या आयुष्याचा चेहरामोहराच बदलला. तिच्यात दडलेली कार्यकर्ती या संस्थेच्या सोबतीनं उजळत गेली. महिलांच्या हक्कांची जाणीव झाल्यानंतर तिनं स्वतःसाठी उभं राहण्याचा निश्‍चय केला. स्वतः पुढाकार घेऊन तिनं नवर्‍यापासून फारकत घेतली. लहानग्या मुलीला घेऊन तिचा ‘एकल’ प्रवास सुरू झाला. दरम्यान कोरोतल्या तिच्या कामानं गती घेतली होती. लीडर्स क्वेस्ट फेलोशीप प्रोग्रॅमची फेलोशीपही तिला मिळाली. 2011मध्ये मुंबईतल्या ‘राईट टू पी’च्या चळवळीनं मुमताजला ओळख मिळवून दिली. तिच्या कार्याचा आलेख उंचावत गेला. 2015मध्ये बीबीसीच्या शंभर प्रेरणादायी व्यक्तींमध्ये तिची निवड झाली. मुमताज आता कोरोच्या महिला सक्षमीकरण कार्यक्रमाच्या प्रोग्राम मॅनेजर आणि महिला मंडळ फेडरेशनच्या सचिव आहे. कोरोने तिला फक्त तिची ओळख मिळवून दिली नाही तर तिचा जोडीदारही मिळवून दिला. इथंच तिची राहुलशी भेट झाली.

राहुल गवारे मुळचा मुंबईचाच आहे. चेंबूरच्या वस्त्यांमध्ये राहुलचं बालपण गेलं. वडील महानगरपालिकेत चतुर्थश्रेणी कामगार होते तर आई धुण्याभांड्याची कामं करून घर चालवत होती. राहुल घरात थोरला आणि त्याच्यापाठी एक बहीण व भाऊ. या तिघांच्या शिक्षणासाठी आईनं केलेल्या संघर्षाची छाप राहुलच्या मनावर कोरली गेली. एकोणीसशे नव्वदच्या दशकातच राहुलच्या राहुलनगर या वस्तीतही कोरोनं काम सुरू केलं होतं. या संस्थेत सुरुवातीला त्यानं इक्बाल कुरेशी यांच्या पथनाट्यातून जनजागृती कार्यक्रमांत भाग घेतला. इथं त्याच्या स्वतःच्या सामाजिक जाणिवा वाढण्यास मदत झाली.  शिक्षणाचं महत्त्व पटत गेलं. राहुलनं इकॉनॉमिक्समधून बीएची पदवी घेतली आहे. अलीकडं त्यानं एमबीएही पूर्ण केलं आहे. शिक्षण घेत असतानाच तो कोरो संस्थेशी जोडला गेला. सुरुवातीला एका वस्तीवर  'वस्ती विकास उपक्रम समन्वयक' म्हणून त्यानं कामाला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात त्यानंही लीडर्स क्वेस्ट फेलोशीप मिळवली. आज राहुल महाराष्ट्राच्या आणि राजस्थानच्या ग्रासरुट डेव्हलपमेंट प्रोग्रामचा 'प्रोग्राम मॅनेजर' आहे... मुख्यत्वेकरून संस्थात्मक विकासावर त्यानं लक्ष केंद्रित केलं आहे. याबरोबरच तरुणांसोबत लिंगसमानता, रोजगार, तरुणांचे प्रश्‍न अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर काम करत आहे. 

कोरोमध्येच त्याची ओळख मुमताजशी आणि तिच्या मुलीशी -मुस्कानशी- झाली. तिच्या पूर्वेतिहासाचा तोही साक्षीदार राहिला आहे. मुमताजच्या आधी त्याची मुस्कानशी मैत्री झाली. मुमताज-राहुलच्या प्रेमाचा बिंदूच मुस्कान ठरली. दोघांनीही 11 जुलै 2006 रोजी लग्न केलं. त्या तिघांचं कुटुंब कबीर या चौकोनानं पूर्ण केलं. या कुटुंबात प्रणाली या मदतनीस मुलीची आणि नेहा या मानसकन्येचीही भर पडली. सुशिक्षित कुटुंबातल्या नेहाला शिक्षणावरून घरी मारहाण व्हायची. तिला बाहेर पडून पुढचे शिक्षण घ्यायचे होते. तेव्हा मुमताज यांना नेहाच्या मित्राने नेहाविषयी माहिती दिली. कायदेशीर लढाई लढून नेहा घरातून बाहेर पडली व यांच्यासोबतच कामही करू लागली. पुढे मुमताजने आणि राहुलने नेहाचं पालकत्व स्वीकारलं आणि ती त्यांच्यासोबतच राहू लागली. नेहा आता मुमताज आणि राहुल यांना 'मां- बाबा' म्हणते. तर प्रणालीला तिच्या आईने यांच्याकडे कामासाठी म्हणून पाठवले होते. ती जवळच राहायची. तिच्या शिक्षणाची जबाबदारी या दोघांनी उचलली. तिच्या आयुष्याशी निगडीत काहीही निर्णय असले तरी त्याविषयी मुमताज आणि राहुल यांचा सल्ला घेतला जातो. कबीरच्या जन्माआधीपासून ती त्यांच्यासोबत आहे. या आगळ्यावेगळ्या कुटुंब, सहजीवनाविषयी मुमताज-राहुलशी केलेला हा संवाद.

प्रश्‍न - मुमताजदीऽ तुझ्या पूर्वायुष्याविषयी तुकड्या-तुकड्यांत माहिती आहे. ही आंतरधर्मीय विवाहितांच्या मुलाखतीची मालिका आहे मात्र तुझ्या आंतरधर्मीय विवाहाकडं वळतानाच तुझ्या पहिल्या लग्नाविषयीही ओघानं येणारच. तुझी पूर्वायुष्याविषयी बोलण्यास काही हरकत नाही ना? 
मुमताज - नाही. अजिबातच नाही. मी याआधीही कधी ते लपवलेलं नाही. फक्त ते सांगत असताना माझ्या भूतकाळाशी जोडून असलेला अम्मीचा भूतकाळही सोबत येतो. ते सगळं सांगितल्यानं ती दुखावते. माझा सांगण्याचा उद्देश कुठंही तिला दोष देणं नसतं. अर्थात तिचं खंतावणं तिच्या जागी योग्यही असेल. ती एक अत्यंत धाडसी स्त्री आहे. परिणामांची भीती न ठेवता तिला तिच्यासाठी जे योग्य वाटले ते निर्णय तिनं घेतले. मी आता पूर्वायुष्याचा टप्पा ओलांडून बरीच पुढे आलीये. 

प्रश्‍न - मग तुझ्या आणि राहुलदादाच्या बालपणापासूनच सुरुवात करू या...
मुमताज - बर्‍याचदा बालपण म्हटलं की चांगल्या आठवणी असं एक सूत्र असतं. मी मात्र माझ्या बालपणाविषयी फारशी आनंदी नाही. माझा जन्म पुण्यातल्या इस्पितळात झाला. पुढं माझ्या माँ-अब्बांनी मला आजोळी नेलं. अहमदनगरमध्ये कर्जत तालुक्यातलं गाव. आजीनंच मी पहिलीत जाईपर्यंत सांभाळ केला. वडील मूळचे केरळचे. त्यांचं बाकी कुटुंबही केरळमध्येच. आजोळी माझी माँ घरातली मोठी मुलगी होती. आजी-आजोबा, मावशी-मामा यांची जबाबदारी तिच्यावरच होती त्यामुळं ती सतत कामाच्या शोधात राहायची. साहजिकच माझ्याकडं दुर्लक्ष झालं. पुढं पोटापाण्यासाठी माँ-अब्बांनी मुंबई गाठली. मी, माझा मोठा भाऊ आणि माँ-अब्बा. आम्ही चेंबूर, वाशीनाकामधल्या सह्याद्रीनगर वस्तीत येऊन जागा करून राहिलो. त्या काळी गल्फ देशांत नोकरी करण्याची टूम होती. वडलांनाही दुबईला जायचं होतं. माँनं दागदागिने विकून, कर्ज काढून पैशांची जुळवाजुळव केली. दुबईला जाण्याआधी केरळला एकदा आईवडलांची भेट घ्यावी, नातवालाही भेटवून आणावं असं म्हणून वडील भावाला घेऊन गेले ते परत आलेच नाहीत. पुढं ते दुबईलाही गेले मात्र आमच्याशी संपर्क तोडला. 

आम्ही मायलेकी मागं उरलो. माँ काबाडकष्ट करून घर चालवत होती. त्या वेळी वस्त्यांमध्ये वेगवेगळे माफिया असायचे- पाणी माफिया, घर माफिया, रेशन माफिया, रॉकेल माफिया इत्यादी. एकटी राहणारी बाई म्हणून अशीच एक व्यक्ती अम्मीच्या मागं लागली. अम्मी त्याला दाद देत नव्हती पण एक प्रसंग घडला आणि ती घाबरली. मी दुसरीत असेन. गणपती विसर्जनाच्या वेळेस काही गुंडांनी माझं अपहरण केलं आणि पंचवीस हजारांची रक्कम मागितली. माँनं उधारीपाधारी करून पैसे जमवले. माझी सोडवणूक केली मात्र या प्रसंगानं ती घाबरली. कुणाचातरी आधार असायला हवा असं तिला वाटायला लागलं आणि तिनं पाठी लागलेल्या त्या हिंदूधर्मीय माणसात आधार शोधला. त्यांच्यासोबतच आम्ही राहायला लागलो.  

डोक्यावर छप्पर तर मिळालं पण मायेचा आसरा मिळाला नाही. वडलांच्या जागेवर असणारी ती व्यक्ती प्रचंड संतापी होती. कुठल्याही कारणासाठी माँला मारहाण व्हायची. पुढं तशीच मारहाण, उपासमार मलाही व्हायला लागली. छळवणूक पाहतच मी मोठी होत होते. माझी मासिक पाळी सुरू झाल्यावर मात्र माँनं मला मुंबईतच मामाकडं राहायला पाठवलं. तेव्हा आठवीत असेल. तेही मोठं खटल्याचं घर. त्यात पुन्हा माझी भर. कुठंही, कुणीही मला आनंदानं स्वीकारलेलंच नव्हतं. तिथंही ओढगस्तीचं जगणं. बेताची परिस्थिती, काम भरपूर. घरकाम करून मी बालवाडीच्या मुलांना शिकवायचे. कशीबशी माझी नववी झाली. दहावीत नापास झाले आणि शिक्षण सुटलं. मग काय... पंधराव्याच वर्षी मला उजवून टाकण्यात आलं.

राहुल - माझा जन्म मुंबईचाच. 1978च्या दुष्काळात आमचं कुटुंब मुंबईत येऊन वसलं. त्याच वर्षी माझा जन्म झाला. बालपण चेंबूरमधल्या वस्त्यांमध्ये गेलं. वडील महानगरपालिकेत चतुर्थश्रेणी कामगार होते पण त्यांना दारूचं-मटक्याचं व्यसन होतं त्यामुळं आईला काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. तिनंच धुणंभांडी, घरकाम करून आमचं शिक्षण करून आम्हाला आणि घर सांभाळलं. माझ्या घरीही लहानपणापासूनच मी आईला मारहाण होताना पाहत होतो. वस्तीतही छळवणुकीचे इतर प्रसंग पाहत होतो. आपल्याला अशी व्यक्ती व्हायचं नाही हे मनाशी ठरत होतं. वडलांच्या वागणुकीमुळं न्यूनंगडही बळावला होता. आमच्या वस्तीत कोरो संस्थेचं काम सुरू झालं होतं. 

कोरोच्या कार्यकर्त्यांमुळं हक्क-अधिकार तर कळायला लागले होतेच शिवाय माझं ‘दलित’ असणं म्हणजे काय याचंही एक ‘ओरिएंटेशन’ मिळायला लागलं होतं त्यामुळं आपण शिकायला हवं हे प्रकर्षानं जाणवायचं. अभ्यासातही तसा हुशार होतो. पहिल्या तिनात क्रमांक असायचा पण दहावीत मला टीबी झाला. आजारपणामुळं दहावीत नापास झालो. त्यातून जरा बॅकफुटवर गेल्यासारखं झालं. पुढं नाईट कॉलेजमधून बारावी करून रेग्युलर कॉलेजमध्ये शिक्षण सुरू केलं. मोठं होऊन भारतीय सेवेत अधिकारी व्हायचंय आणि घरची गरिबी दूर करायचीय अशी स्वप्नं मी पाहायला लागलो होतो. दरम्यान मी छोटेमोठे कामधंदे केले. 

बीएच्या तिसर्‍या वर्षात असताना मला एकानं कोरोचा सहा महिन्यांचा पॅरासोशल कोर्स करण्याचा सल्ला दिला. सकाळी कॉलेज आणि नंतर हा कोर्स करायला लागलो. तिथं पथनाट्यांतून जनजागृतीचा पार्ट होता. यातून माझा न्यूनगंडही कमी होत गेला. पुढं मला सह्याद्रीनगरच्या वस्ती विकास उपक्रमामध्ये समन्वयाचं काम मिळालं. त्याचवेळी मला कामाची गरज होतीच. कोरोच्या या कामासाठी थोडा का होईना पगार मिळणार होता. शिक्षण तिथंच थांबलं आणि कोरोतच मी आकारू लागलो तसतसं अधिकारी होण्याचं स्वप्नही विरत गेलं. 2004च्या आसपास मी आयएएस होण्याचं डोक्यातून पूर्णपणे काढून टाकलं पण शिक्षण घेण्याची ऊर्मी संपली नव्हती. पुढं एमबीएचं शिक्षण घेतलं.

प्रश्‍न - घरगुती हिंसा पाहतच तुम्ही मोठे झालात... मुमताजदी पंधराव्याच वर्षी लग्न झालं तेव्हा तुझी समज ती काय असणार... पण तरीही तुझ्या मनात तेव्हा काय सुरू होतं?
मुमताज - माझी त्या वेळसची जी परिस्थिती आणि मनःस्थिती होती ती पाहता मला लग्न हा त्या परिस्थितीतून सुटकेचा मार्ग वाटत होता. माझ्या आईनं हतबल होऊन एका ‘हिंदू’ माणसाचा हात धरला या वास्तवाचा विपरीत परिणाम माझ्या आयुष्यावर झाला होता. तिनं तिच्यासाठी जे योग्य वाटलं तो निर्णय घेतला होता पण समाज माझ्याकडे त्या निर्णयाच्या चश्म्यातून पाहत होता. मला ‘जज’ करत होता, त्यामुळं माझं लवकरात लवकर कल्याण झालं पाहिजे या हेतूनं लग्नाचे प्रस्ताव यायला लागले... विदूर, माझ्यापेक्षा दुप्पट वयाचे, मूलबाळ होत नाही म्हणून दुसरं लग्न करू इच्छिणारे अशा स्वरूपाचे. अशा प्रकारच्या प्रस्तावांची भीती वाटायची. आपण असा काय गुन्हा केलाय, ज्यासाठी अशी स्थळं येताहेत असा प्रश्‍न पडायचा. दरम्यान मामाच्या ओळखीतून एक स्थळ आलं. इतरांच्या मानानं हे स्थळ चांगलं होतं. लग्न केल्यावर आपलं हक्काचं एक घर असेल, कुणाचा त्रास नसेल अशा समजुतींवर मी लग्नाला तयार झाले. लग्न झालं की सुखी संसार असणार या हिंदी सिनेमांचा प्रभावही होता पण माझ्या भूतकाळामुळं सासरच्यांना मी पसंत नव्हते. हे कुटुंब प्रचंड मोठं, कामही भरपूर आणि छळ ही. 

याच काळात एक वेगळ्या प्रकारची धडपडही होती. धर्मावरून मी कुणी कमअस्सल मुस्लीम आहे असं म्हणू नये यासाठी मी आटापिटा करायला लागले होते म्हणजे लग्नानंतर बुरखा घालायला लागले. बुरखा, कुरआनपठण, नमाजपठण, रोजे हे सर्व नियमितपणे केल्यानंतर लोक मला एक ‘चांगली मुस्लीम मुलगी’ मानतील असं समजून मी नित्यनेमानं ते करतही होते. एक तर्‍हेचा आयडेंटिटी क्रायसिस चालू होता. मला आठवतंय की, मी अगदी कुंडे ची नियाज, ग्यारहवी अशा लहानमोठ्या ईदसाठी पायांतले पैंजणच वीक, कधी कुणाच्या घरी तेवढ्यासाठीच काम कर असेही प्रकार केले. आपण योग्य धर्माचार ठेवला तर आपल्याला कुणीही नावं ठेवणार नाही हे माझ्या मनात पक्कं होतं. चांगली मुलगी, चांगली सून, चांगली बायको होण्याच्या नादातही मी बरंच काही सहन केलं. घरकाम, टोमणे, धाकात ठेवण्याचे प्रकार, आईवडलांवरून पाणउतारा हे तर चालूच होतं पण बर्‍याचदा अन्नालाही मोताद व्हायला लागायचं. मी फारसा मांसाहार करत नाही. सासरी तेच जास्त असायचं. कशातही मासमच्छी असायची पण मी ते खात नाही म्हणून वेगळी भाजी करण्याची सोयही नसायची. चांगली सून म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी मी ते सारं सहन केलं.

माँला हा त्रास दिसत होता. तिनं मग एक वेगळं दहा बाय दहाचं घर घेऊन दिलं. जावयाला गाडी घेऊन दिली. म्हटलं, ‘चलाऽ दोघंच राहू तर जाचातून सुटका होईल.’ पहिल्याच वर्षी मुस्कानचा जन्मही झाला. घर-गाडी घेऊन दिल्यानं आपल्या मुलीला जावई त्रास देणार नाही असं माँला वाटलं पण झालं उलटंच. कामधंदे सोडून तो माझ्यावर प्रत्येक गोष्टीसाठी पाळत ठेवायला लागला. पाणी भरायचंय, टॉयलेटला जायचंय तर बुरखा घालून जायचं. तेवढ्यासाठी परवानगीही घ्यायची. मी इतकी नादान होते की, मला ते वागणं बरोबरच वाटायचं. बायकांचं आयुष्य असंच असतं, माझंही तसंच असणार. त्यात वावगं काहीच वाटत नव्हतं.

त्याच दरम्यान कोरो संघटना माझ्या आयुष्यात आली. वस्तीपातळीवरल्या कामासोबतच सांविधानिक मूल्यं, स्त्रियांचे हक्क, हिंसा, जेंडर, सन्मानानं जगण्याचा हक्क असं एक नवंच विश्‍व खुलं व्हायला लागलं. मी कार्यकर्त्यांना विचारलं की, सन्मानानं जगण्याच्या अधिकारात काय काय येतं? ते म्हणाले, ‘तुला कुणीही शिवी देऊ शकत नाही, मारहाण करू शकत नाही, तुझ्या मर्जीशिवाय केलेली कोणतीही गोष्ट ही हिंसाच आहे.’ हे ऐकून मी अवाक झाले. प्रश्‍न पडला, ‘मला कधी कुणी माझी मर्जी विचारली?’ इथून माझ्या बदलाचा प्रवास सुरू झाला. समज वाढायला लागली तसा संघर्षही वाढायला लागला. जोवर आपल्याला आपल्या अधिकारांची जाणीव नसते तोवर आपण निवांत असतो पण एकदा त्यांची जाणीव झाली की मग झोप उडते. सुरुवातीला मी त्याला तू कामधंदा कर, सुखी संसार करू असं म्हणून समजावण्याचा खूप प्रयत्न केला. तो कमवत नाही म्हणून त्याचं कुठलंही काम करणं बंद केलं पण त्याच्या वागण्यात काहीच बदल झाला नाही. शेवटी मुस्कान दहाअकरा महिन्यांची असेल तेव्हा घरातून त्याला हाकललं, ते घर माझ्या नावे होतं म्हणून शक्य झालं आणि 2003मध्ये त्या बेकार, बेदरकार नवर्‍याला मी इस्लाम धर्माच्या खुलानामाद्वारे तलाक दिला. या कोरो संघटनेतच राहुलची आणि माझी भेट झाली.

प्रश्‍न - कोरोमुळं तुम्हा दोघांची भेट झाली. भेटीगाठीचं रूपांतर प्रेमात कधी झालं? 
मुमताज - राहुल सुरुवातीपासूनच माझा संघर्ष पाहत आला होता. पहिल्यापासूनच त्याचा मला खूप पाठिंबा राहिला होता. पुढे मी संस्थेत पूर्ण वेळ काम करायला लागले. मला दरमहा तीन हजारांची फेलोशीपही मिळाली त्यामुळं मला आर्थिक आधार मिळाला. हळूहळू सावरणं सुरू झालं होतं. राहुल आमचा प्रकल्प समन्वयक होता. मी आणि माया म्हणून कार्यकर्ती... तिचीही एक मुलगी होती. आम्ही वस्तीत काम करून येईपर्यंत तो आमच्या मुलींना सांभाळायचा एवढाच सुरुवातीला संबंध होता, पण एका घटनेमुळं तो पूर्णपणे आयुष्यात आला. नवर्‍याशिवाय एकटीनं मुलीला घेऊन मी राहतीये या गोष्टीचा माझ्या आईला धक्का बसला होता. मला धडा शिकवावा म्हणून ती एका रात्री घरी आली. मारहाण, शिव्याशाप, रॉकेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न असा सगळा हिंसक प्रकार मुस्कानच्या समोरच घडला. त्याचा परिणाम असा झाला की, तिचं बोलणं-खेळणं बंद झालं. तिला काउन्सेलरकडं घेऊन जावं लागलं. या काळात राहुलची खरी एंट्री झाली. तो तिच्यासोबत खेळायला लागला; तिच्यासाठी रंग, चित्रकलेचं सामान, वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट्‌स, चॉकलेट्‌स आणून द्यायला लागला. मुस्कान त्याच्याकडं चांगली राहायला लागली. तिला त्याच्याजवळ सेफ वाटायला लागलं. हळूहळू मुस्कान कोषातून बाहेर आली. तिला राहुलचा माझ्याहीपेक्षा जास्त विश्‍वास वाटायला लागला. माझ्यासाठी ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट होती. 

त्यानंतर राहुलने मला तीनदा लग्नाची विचारणा केली. मी दरवेळी नकार देत होते. त्याच्यासोबत प्रचंड कम्फर्टेबल होते, आमची तीन वर्षांची मैत्री होती तरीही मला भीती वाटत होती. तसं आम्ही मित्रमैत्रिणींसारखं एकत्र सिनेमा पाहणं, कधीमधी हॉटेलमध्ये जाणं, एकत्र फिरणं, तासन्‌तास गप्पा करणं असं विश्‍वासानं चालू होतं. त्या सगळ्यातून मनाला आनंदही मिळत होता. बाहेरून बघणार्‍या कुणाही व्यक्तीला आम्ही रिलेशनशीपमध्ये आहोत असं सहज वाटू शकत होतं. पण लग्नाचं बंधन नको वाटत होतं. एका लग्नानं आलेलं शहाणपण पाहता दुसर्‍या लग्नाचा विचारही नको होता. आगीतून उठून फुफाट्यात पडायचं नव्हतं.

...शिवाय आपला भूतकाळ वर्तमान म्हणून समोर येतोय असं वाटत होतं. वयाच्या सातव्या वर्षी मी आईलापण पारखी झाले होते. आपल्या लेकीसोबतही तेच घडतंय की काय असं वाटायला लागलं होतं. मुस्कान तेव्हा सातच वर्षांची होती. माझ्या कुठल्याही निर्णयानं तिच्यावर परिणाम नको व्हायला असं वाटत होतं पण जगात सगळीच काही वाईट माणसं नसतात. मुस्कानला वडलांचं प्रेम मिळत असेल तर आपण विचार करायला हवा हे कळत होतं. एक दिवशी मुस्कानच मला म्हणाली, ‘माँऽ तू राहुल से शादी कर ले.’ माझी सगळी भीती तिच्यासाठीच होती पण तिनंच ते इतकं सहज स्वीकारलं होतं की, मग मीही लग्नाला तयार झाले.

प्रश्‍न - आणि राहुलदादा तू काय विचार करत होतास तेव्हा? मुस्कानमुळं एकत्र येणं हे समजतंय तरीही मुमताजदीमधल्या कुठल्या गोष्टींनी तू प्रभावित झालास? ती घटस्फोटित आई आहे हे तिचं वास्तव छळत नव्हतं?
राहुल - आमचं सह्याद्रीनगर वस्तीत काम सुरू झालं तेव्हापासून तिला पाहत होतो. अगदी पहिल्या टप्प्यात, वस्तीतल्या इतर स्वयंसेवकांची भेट घेत शेवटी आम्ही तिच्या घरी जायचो. लहानग्या मुस्कानशी खेळण्यात माझा वेळ जायचा. तेवढ्या वेळात चहागप्पाही व्हायच्या. हळूहळू मुमताजकडंही भावनिक ओढा वाढायला लागला. अर्थात तारुण्यातलं आकर्षण-मैत्री हे टप्पेही असणारच. सहवास वाढत गेला तसं प्रेमही वाटायला लागलं. म्हणजे हे सगळं आत्ता विचार केल्यावर लक्षात येतं. तेव्हा सगळं ओघानं घडत गेलं आणि होऽ ती घटस्फोटित आहे किंवा तिला एक मुलगी आहे या गोष्टी माझ्या मनातही यायच्या नाहीत. मुस्कान समोर असूनही कधी ती मुमताजहून भिन्न अंग आहे हे डोक्यातच आलं नाही. माझं मुमताजवर प्रेम आहे एवढी एकच गोष्ट मला कळत होती. तिनं आधी नकार दिल्यावर कोरोतले काही कार्यकर्ते, आमचे मित्र यांनी मध्यस्थी केली तरीही ती निर्णय घेत नव्हती. शेवटी मुस्कानची मात्रा तिच्यावर चालली. आम्ही 11 जुलै 2006ला स्पेशल मॅरेज अ‍ॅक्टअंतर्गत रजिस्टर लग्न केलं.

प्रश्‍न - तुमचं प्रेमलग्न घरच्यांनी स्वीकारलं? प्रेमविवाह-आंतरधर्मीय विवाह याही पुढं घटस्फोटित आई असलेली स्त्री आणि अविवाहित पुरुष असं हे लग्न होतं... त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या?
मुमताज - आमचं लग्न ही सोपी गोष्ट नव्हतीच. राहुलनं घरच्यांना एखाद्या मुस्लीम मुलीशी लग्न करतोय असं सांगणं वेगळं होतं आणि एका मुलीच्या आईशी लग्न करतोय हे सांगणं वेगळं होतं... शिवाय त्या वेळेस राहुलवर घरची जबाबदारी होती. त्याचे वडील निवृत्त झाले होते. त्यांना हार्टअ‍ॅटॅक येऊन गेला होता. त्यांचं ऑपरेशन होतं. बहिणीचं लग्न, भावाचं शिक्षण बाकी होतं. घरात शिकलेला-कमवता मुलगा तोच होता. त्यांची मनःस्थिती प्रेम-लग्न समजून घेण्यासारखी नव्हती त्यामुळं आम्ही जवळपास दीडेक वर्ष कुणालाही लग्नाबाबत खबर लागू दिली नाही. राहुलनं त्याच्या घरच्या जबाबदार्‍या मार्गी लावून, कुटुंबासाठी एखादं छोटंसं घर घेऊन द्यायचं आणि मगच लग्नाविषयी सांगायचं असं आम्ही ठरवलं होतं. 

जबाबदारी टाळली असं उद्या कुणीही म्हणू नये हा विचार होता शिवाय मीपण माझ्या आईला काहीही विचारलं, सांगितलं नव्हतं. त्या दिवसांत माझं आईशी बोलणं बंदच होतं मात्र मामामामींनी कुठलंच ऑब्जेक्शन घेतलं नाही. शिवाय एकटी राहायला लागल्यापासून मी कधीही मामांकडं हात पसरले नव्हते. मी सगळं एकटीनंच सांभाळतीये हे ते पाहतच होते, त्यामुळंही ते एका शब्दानं मला काहीही म्हणाले नाहीत. त्या काळात कोरोचा व्यापही वाढला होता. माझं स्वतःचं कामही प्रचंड वाढलं होतं. पाण्याचा, रेशनचा भ्रष्टाचार उघड केला होता त्यामुळं बड्या-बड्या लोकांना तुरुंगाची हवा खायला पाठवलेलं होतं. त्याअर्थी माझीही एक छोटीशी ओळख निर्माण झाली होती. या कारणामुळंही कदाचित माहिती झाल्यावरही मला कुणी काहीच बोललं नाही. 

एकीकडं लग्नानंतरही माझं कोरोचं काम, बाहेरून बारावीची परीक्षा देणं, मुलीचं सुरळीत शिक्षणपाणी असं सारं काही दिलासा देणारं चालू होतं पण नेमका तेव्हाच राहुलचा स्ट्रगल सुरू झाला होता. लग्नाबाबत माहीत होताच घरच्यांनी त्याला हाकलून लावलं होतं. ते त्यांच्या-त्यांच्या समजेप्रमाणे वागत होते.

राहुल - लग्नाला घरातून विरोध होणार याची कल्पना होती त्यामुळंच लग्नाची गोष्ट घरी सांगितली नव्हती पण लग्नानंतर एकदा मुमताज खूप आजारी पडली. तिच्या पाठीचं दुखणं निघालं होतं. उठता, बसता येईना अशी अवस्था झाली होती. अशा वेळेस आपण तिच्याजवळ असावं, तिला आधार द्यावा असं सतत वाटायला लागलं. तिच्या आजारपणात तिला सोबत करता येणार नसेल तर लग्न करून काय मिळवलं असा विचार यायला लागला. शेवटी मी निर्णय घेतला आणि घरी सांगायचं ठरवलं. घरी सांगितल्यावर अपेक्षितच प्रतिसाद मिळाला. आईला धक्का बसला. वडलांनी निवृत्तीनंतर लहान भावाला नोकरी लावीन, तू घराबाहेर हो असं सुनावलं. मी म्हटलं, ‘ठीक आहे.’ तोवर बहिणीचं लग्न झालं होतं. भावाचं तसं काही म्हणणं नव्हतं पण निर्णय घेऊन मी घराबाहेर पडलो.  

प्रश्‍न - मुमताजदीऽ लग्न लपवण्याच्या गोष्टीची तुला कधी धास्ती वाटली नाही?
मुमताज - अजिबात नाही. उलट माझ्यामुळं जर राहुलच्या कुटुंबावर काही संकट कोसळणार असेल तर थोडया काळासाठी लग्न लपवून ठेवण्यात मला काहीच वावगं वाटत नव्हतं. जबाबदार्‍या तर त्यानं तशाही पूर्ण केल्याच असत्या पण लग्नाची गोष्ट कळल्यावर घरच्यांनी हाकललं किंवा जबाबदारी घ्यायला मज्जाव केला तर काय हा मोठा प्रश्‍न होता. तो मला सोडून जाईन, धोका देईन अशी कुठलीच भीती मनात नव्हती. तो विश्‍वास त्यानं कमावला होता. मैत्रीनंतरही पुरेसा वेळ घेऊन लग्नाचा निर्णय घेतला होता आणि दोघांनी मिळूनच समंजसपणे ते लपवण्याची अपरिहार्यता मान्य केली होती त्यामुळं कसलीच भीती वाटली नाही.

प्रश्‍न - आणि राहुलदादा तुला या लग्नापासून परावृत्त करण्यासाठी काही प्रयत्न झाले का?
राहुल - थोडासा झाला होता. काही जवळच्या माणसांनीच सुचवलं होतं की, आवडत असेल तरी लग्न काय करायचंय? मजा घे आणि सोडून दे असे वाह्यात सल्ले दिले गेले. मुस्लिमेतर व्यक्तीला मुस्लीम करण्यासाठीचेच हे धंदे आहेत. तू यात पडू नकोस, तुझी फसवणूक होईल असं बरंच काही लोकांनी सुचवलं. मी धर्मांतर केलंय असं लग्नानंतरही अनेकांना वाटत होतं. त्याचं कारण मुमताजनं तिचं नाव बदललं नव्हतं म्हणजे तिनं धर्मांतर केलं तर चालणार होतं...! वस्तीतून जाताना काही जण मला मुद्दामहून सलाम वालेकुम म्हणायचे. पथनाट्यामध्ये मी मुस्लीम घरातल्या हिंदीचा टोन शिकलो होतो. मीही मग त्यांना वालेकुम सलाम असा प्रतिसाद देताना मुद्दामच तो टोन वापरायचो. लोकं इतकी भाबडी असतात की, त्यांना खरंच वाटायचं. 

प्रश्‍न - पुढं कुटुंबीयांनी कधी कसं स्वीकारलं?
मुमताज - असं नेमकं सांगता येणार नाही पण हळूहळू विरोध मावळला. मी मंगळसूत्र घालत नाही, कुंकू लावत नाही, राहुलचं नाव लावत नाही अशा साधारण तक्रारी आईंच्या होत्या पण तेही तेवढंच. आम्ही वेगळेच राहत असल्यानं बाकी काही त्रास होण्याचा प्रश्‍नच नव्हता. कबीरच्या जन्मानंतर आमचे नातेसंबंध अधिक सुधारले असावेत. आम्हाला सुरुवातीला मुलबाळ नको होतं पण नंतर वाटलं की, आपल्या कुटुंबीयांच्या अपेक्षा साध्या असतात. या नव्या कुटुंबाचं म्हणून एखादं मूल झालं तर सासरच्या माणसांना आनंद वाटेल म्हणून मग आम्ही बाळाचा चान्स घेतला. कबीरचा जन्म झाला त्या वेळेस सगळेच आनंदित झाले पण पुढं नामकरण विधी आला. लग्न करताना आम्ही कुणालाही कळू दिलं नव्हतं म्हणून बारसं जरा मोठं करू असा विचार आम्ही केला.

निमंत्रणपत्रिका छापून आल्यावर बाळाच्या आईचं नाव मुमताज शेख आणि वडलांचं नाव राहुल गवारे अशी नावं वाचून बाबा - सासरे चिडले. बाबांच्या नाराजी व्यक्त करण्याच्या पद्धतीप्रमाणे ते उठून बाहेर गेले. आमच्या घराचं वैशिष्ट्य आहे की, आईबाबा चिडले तरी मला कधीच काही बोलत नाहीत. त्यांची नाराजी ते राहुलकडं सांगतात. माझंही सेम तेच. मला त्यांचं काही पटलं नाही तरी मी राहुललाच सांगते. राहुल काही आमचं एकमेकांना सांगत नाही पण आम्हाला तक्रार केल्याचा आनंद होतो. तक्रार म्हणजे तरी काय व्यक्त होणंच असतं. प्रत्येक घरात जर अशी तक्रार करण्याची जागा मिळाली नाऽ तर निम्मी भांडणं कमी होतील.

हं तर मी ते नामकरण विधीचं सांगत होते. आम्ही दोघांनी दोन्ही घरच्या मंडळींचं मन राखावं म्हणून कबीर नाव ठरवलं होतं. पण माईकवरून ‘कबीर’ नाव पुकारलं तशा आई उठल्या. त्यांनी यशवंत नाव ठेवल्याचं जाहीर केलं. आम्ही एकमेकांकडं पाहत राहिलो. त्यांना कबीर नाव नको होतं तर त्यांनी आधी सांगायला हवं असं आमचं म्हणणं होतं. त्या दिवशी तेवढाच जरा रागलोभाचा, भांडणाचा प्रसंग घडला. त्यानंतर मात्र असं काही घडलं नाही. लहानमोठ्या गोष्टींत राहुलनं त्यांना छान सांभाळून घेतलं.

...पण आता राग अगदीच निवळला आहे. उलट त्या आता अभिमानानं ही माझी सून आहे म्हणून सांगतात. माँशीपण संबंध पूर्ववत झाले. माझ्या घरी येऊन मारहाणीचा प्रसंग झाला त्यानंतर तिनं मुंबईच सोडली. ती गावी असते. आता पेपरमध्ये किंवा टीव्हीवर दिसले तर गर्वानं माझी मुलगी, माझा जावई असं सांगते. जावयाचं नाव आधी ती घेत नव्हती पण आता सोशल मिडियामुळं गावाकडं लोकांना आपोआपच माहीत झालं. गावातल्या वेगवेगळ्या कामांत आमची मदत असतेच त्यामुळं त्यांनीही आता स्वीकारलंय.

राहुल - मुमताजच्या मामांनीही खूप समजूतदारपणा दाखवला. त्यांच्या कुटुंबात माझा प्रवेश मामांमुळंच सहज झाला.
 
प्रश्‍न - तुमच्या लग्नाचं सत्य मुस्कानच्या समोरच घडलं मात्र कबीरला हे सत्य कसं सांगितलं...?
मुमताज - कबीरला बाहेरून कुणाकडून कळू नये याची कायमच भीती वाटली. मुस्कानच्या आणि कबीरच्या नात्यावर त्याचा परिणाम होऊ नये असं वाटत राहिलं. मुस्काननं काही वर्षांपूर्वी राहुलचं नाव लावायचं ठरवलं त्यामुळं मी तसं गॅझेट बनवून आणलं मात्र घरात तिचं जुनं रिपोर्टकार्ड होतं. त्यावर मुस्कान बेग असं नाव होतं. कबीर दहा वर्षांचा होता तेव्हा त्यानं ते रिपोर्टकार्ड पाहिलं. तेव्हा मात्र ठरवलं की, आता आपण त्याला खरं सांगून टाकू. मी मुस्कान आणि तो, आम्ही रक्षाबंधनाच्या दिवशी मिठाई आणायला बाहेर गेलो होतो.

वाटेत मी त्याला दुसर्‍या लग्नाविषयी काय वाटतं, दुसरं लग्न करावं का? एखाद्या स्त्रीनं असा निर्णय घेतला तर काय असे प्रश्‍न त्याला विचारत होते. तो सहजपणे म्हणत होता, तिला जर दुसर्‍या लग्नात आनंद वाटत असेल तर बाकीच्यांचा काय विचार करायचाय? तिचं आयुष्य, तिचा निर्णय असं तो काहीबाही म्हणाला. तीच संधी घेऊन मी त्याला सांगितलं की, माझंही हे दुसरं लग्न आहे. दुसरं कुणी सांगण्यापेक्षा मीच तुला सांगते. याबाबत तुला काही प्रश्‍न असतील, काही विचारावसं वाटलं तर मला विचार...’ काही क्षण त्यानं विचार केला पण लगेच म्हणाला, ‘हं ठीक आहे नाऽ’ मला वाटलं होतं की, तो फार काही रिअ‍ॅक्ट होईल पण तसं काहीच झालं नाही. आज माझ्या घरी कबीर, मुस्कानच नाही तर माझ्या मानसकन्या असणारी नेहा, प्रणाली याही आमच्यासोबतच राहतात. एकमेकांशी भांडतातही आणि एकमेकांसोबतच छान राहतातही मात्र मुलांशी वेळीच बोलणं गरजेचं असतं हेच खरं. 

प्रश्न - मुलीच्या भविष्यासाठी काही प्रश्न पडतात का? त्यासाठी काय विचार केला आहे?
मुमताज - दोन्ही मुलांच्या बाबतीत आणि हो नेहाच्या भविष्याच्या बाबतीतही प्रश्न, काळजी आहे. त्यांचं शिक्षण, त्यांचं करियर नक्कीच काळजी आहे. त्यामुळे त्यांनी किमान बेसिक शिक्षण पूर्ण करावं, आपल्या पायावर उभं राहावं हे नक्कीच वाटतं. आता मुस्कान बंगलोरमध्ये 'बॅचलर ऑफ फिजियोथेरपी' करतेय, नेहा पुण्यात राहून पीएचडीची तयारी करतेय. सोबत तिने तिच्या मित्रांसोबत मिळून पाण्यावर भाज्या पिकवून उद्योग सुरु केला आहे. कबीर आता आठवीत आहे. शिकतोय, छान लिहितोय. बघू पुढे काय होतंय ते.

प्रश्न – तुम्ही घरात कोणती भाषा बोलता कारण मध्ये मध्ये तू मुलाचं सांगताना हिंदीत बोलत आहेस?
मुमताज – आम्ही दोघं एकमेकांशी मराठीमध्ये बोलतो आणि मुलांशी हिंदीत बोलतो.

प्रश्न – मुस्लीम, दलित हे उपेक्षित घटक आहेत. तरीही तू जेव्हा लग्नामुळे दलित उपेक्षित घटकाशी जोडली गेली तेव्हा तुझ्या जाणिवांमध्ये काय फरक पडला?
मुमताज - मुस्लीम, दलित हे घटक उपेक्षित आहेत याची जाणीव खरंतर कोरोमध्ये आल्यावर झाली. 
विशिष्ट लोक हे 'जयभीम वाले' असतात आणि त्यांच्याशी जास्त सलगी ठेवायची नाही अशी एकूणच समाजाची शिकवण होती, त्यामुळे 'जयभीम' म्हणणे म्हणजे काहीतरी कमीपणाचे किंवा निळा रंग 'त्यांचा' म्हणून वापरायचा नाही अश्या गोष्टी मी केलेल्या आहेत.

पण जेव्हा संविधान समजले बाबासाहेबांना वाचलं. अर्थात राहुलनं वाचनाची गोडी लावली... तेव्हा बाबसाहेबांच्या प्रेमात पडले. इथून खरा प्रवास सुरु झाला आणि या दोन्ही उपेक्षित घटकांसाठी समज घेऊन काम सुरू केले. मुस्लीम वस्त्यांमध्ये बाबासाहेब, त्यांचे विचार कसे जातील यासाठी प्रयत्न सुरू केले आणि आज तिथं जयंत्या साजऱ्या होतात, 6 डिसेंबरला लोक अभिवादन सभा घेतात, मदरशांमध्ये मौलाना मुलांना संविधान शिकवताहेत. घरात संविधानाची प्रास्ताविका लावलेली आहे. किमान दर्शनी तरी लोक हे करत आहेत. आता त्याला अंगीकृत करण्याची प्रक्रिया राबवत आहोत, अशा काही गोष्टी संघटनेच्या माध्यमातून झालेल्या आहेत.

प्रश्‍न - वेगवेगळ्या कामामुळं मुमताजदी माध्यमांतही झळकायला लागली पण माध्यमांत तिनं तिच्या पूर्वायुष्याविषयी बोलू नये, त्याची फार वाच्यता करू नये असं कधी वाटलं?
राहुल - मोकळेपणानं सांगायचं तर असं कधीच वाटलं नाही. जाणीवपूर्वक तर अजिबातच नाही. हांऽ मात्र आमचं लग्न झाल्यानंतर आईला कळू नये असा विचार नकळतपणे माझ्या मनात यायचा. आईच्या माझ्याकडून फार अपेक्षा होत्या. ती दुखावली जाऊ नये म्हणून मुमताजचं आधीचं आयुष्य लपवण्याचा फुटकळ प्रयत्नही मी केला पण तो तेवढाच. पुढं मुमताजची वेगळी ओळख निर्माण होत गेली. मीही माझ्या कामांत व्यग्र झालो. आमचा एकत्रित संसार सुरू झाला, त्यानंतर तिच्या पूर्वायुष्याचा तसा काही रिलेव्हन्सच राहिला नाही पण तिने तो लोकांना सांगावा, सांगू नये याविषयी मी तिला कधीच काही सुचवलं नाही. सुचवावसं वाटलंही नाही. तो तिच्या आयुष्याचा भागच आहे. आम्ही तो स्वीकारला आहे. फक्त कबीरसाठी ते जरा चॅलेंजिंग असू शकतं. त्याचं वय पाहता आणखी दोनेक वर्षं आम्हाला त्याचा या अर्थानं थोडा सांभाळ करावा लागेल एवढंच. 

प्रश्‍न -  पूर्वीसारखे तुम्ही सण साजरे करता?
मुमताज - आमच्या घरी आम्ही रमजान ईद, दिवाळी, ख्रिसमस, बुद्धमौर्णिमा, वेगवेगळ्या जयंत्या असे सर्व सण साजरे करतो. पूर्वीसारखं कर्मकांड म्हणून नाही. सणांवरून धर्माची ओळख होणं आम्हाला नको वाटतं. आपल्या मुलांना सर्व सणांचा आनंद घेता यावा एवढाच विचार. मुस्कान सात वर्षांची असतानाचा एक प्रसंग सांगते. मी तेव्हा मस्जिदीच्या गल्लीत राहत होते. शेजारीपाजारी मुस्लीमच. उलट मी संस्थेत गेले तर शेजारचं कुटुंबच तिच्याकडं लक्ष द्यायचं पण तिनं तेव्हा घरात गणपती बसवण्याचा हट्ट केला. तेव्हा माझा वैचारिक दृष्टीकोनही फारसा आकाराला आला नव्हता पण आपल्या घरात गणपती बसू शकत नाही असं तिच्या मनात येऊ नये म्हणून मी तिच्या आनंदासाठी छोटी मूर्ती आणली. ती आनंदून गेली. आता ती स्वतःला नास्तिक मानते पण तेव्हा मी ते नाकारलं असतं तर त्याचा वेगळाच अर्थ तिच्या मनात रुजला असता. आम्ही सोसायटीतल्या सर्व सण-समारंभांना, गेटटुगेदरना जातो. 

प्रश्‍न - तुम्ही लोक जेंडर सेंसटायझेशनसाठी कामं करता. घरकाम-आर्थिक वाटणी यांबाबत तुमच्या घरची स्थिती काय?
राहुल - आर्थिक भार आम्ही दोघंही पेलतो. घरकामाबाबत म्हटलं तर ते पूर्णपणे मीच सांभाळतो. अगदी सकाळच्या चहापासून. स्वयंपाक, घरकाम, बाजारहाट, मुलांचं शिक्षण या कशातच मुमताजला विशेष रस नाही. तिला आम्ही सांगतही नाही आणि ती करतही नाही. मला घरकामाची आवड आहे. मी मुस्कान, प्रणाली आम्हीच घरकाम करतो. मला अगदी बेसीक स्वयंपाक यायचा पण लॉकडाऊनमध्ये जरा वेगवेगळे पदार्थही शिकलोय. मुमताजला कधी हौस वाटली, इच्छा झाली की ती करते. बाकी आम्ही कुणीच तिला घरकामात धरत नाही. ती बाहेर आकाश मापत निघालीये तेव्हा आमचा तिला असा कृतिशील पाठिंबा आहे.

प्रश्न - आजच्या काळात आंतरधर्मीय विवाहाची गरज काय वाटते?
मुमताज - आजच्या काळात जास्त गरज आहे असं वाटतं, कारण धार्मिक भावनांना खतपाणी घालून लोक समाजात दुही निर्माण करत आहेत. त्यांना उत्तर म्हणून आणि मुळातच आपल्या देशात जोडीदार निवडीचा अधिकार संविधानाने दिलेला आहे, तेव्हा असे विवाह नक्कीच व्हायला हवेत. संविधानाचा जोडीदार निवडीचा अधिकार ज्यांना ज्यांना जाणवतं त्यांनी तर तो बजवायला पाहिजे.

आणि दुसरे म्हणजे प्रेमाला जात धर्म नसतो. प्रेम हे फक्त प्रेमच असते. त्याचा आनंद दोघांनाही घेता यायला हवा. जे लोक याचा आनंद घेऊ पाहत आहेत त्यांना आपण सर्वांनी मिळून पाठींबा द्यायला हवा.

प्रश्‍न - अनेक चढउतारांनी भरलेल्या तुमच्या सहजीवनाचा आधार काय वाटतो?
राहुल - आमच्या सहजीवनाचा आधार तीन गोष्टींवर वाटतो. एक तर मुमताजची निर्णय घेण्याची क्षमता. कुठल्याही लहानमोठ्या प्रसंगात ती ज्या तर्‍हेनं निर्णय घेते ते अनुभवण्यासारखं आहे. अनेकदा मी निराश होतो, हतबल होतो. पण ती अजिबात डगमगत नाही. हा नाही तर तो पर्याय पाहू असं म्हणून ती ज्या पद्धतीनं मार्ग काढते या स्वभावामुळंच आमचं नातंही बहरत गेलं. अनेकदा निराशेचे प्रसंग आले, मात्र तिनं छान सावरून घेतलं. दुसरं म्हणजे कोरोचं कुटुंब. लोक अडचणीत आले की नातेवाईक मदतीला धावतात. मात्र आमचं सारं काही कोरो संस्थेतला मित्रपरिवारच आहे, त्यामुळं आम्हाला कधीही एकटं वाटत नाही. आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुस्कान. तिच्यामुळं आम्ही जोडले गेलो आणि तिच्यामुळंच हे नातं आकारत गेलं. आता कबीर आणि आमच्या मानसकन्या यांच्यासह ते वृद्धिंगत होत आहे.


(मुलाखत व शब्दांकन - हिनाकौसर खान)
greenheena@gmail.com


'धर्मरेषा ओलांडताना' या सदरातील इतर मुलाखतीही वाचा

प्रास्ताविक 

समीना-प्रशांत

श्रुती - इब्राहीम

प्रज्ञा - बलविंदर

अरुणा - अन्वर

दिलशाद - संजय

हसीना - राजीव

इंदुमती - महावीर

Tags: मराठी प्रेम आंतरधर्मीय विवाह मुमताज शेख राहूल गवारे हिनाकौसर खान पिंजार हिंदू मुस्लीम धर्मरेषा ओलांडताना Mumtaz Shaikh Rahul Gaware Love Interfaith Marriage Hindu Muslim Couple Interview Heenakausar Khan राहुल गवारे Load More Tags

Comments:

Narendra Mahadeo Apte

आपल्या जीवनात असलेले धर्माचे स्थान मुमताज आणि राहुल या जोडप्याने इतके सुरेखपणे हातळले आहे की त्यांना सलाम करावा! त्यांना भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा.

Dr. Pradnya Saragade

What an inspirational story, dole pan bharun yetat, abhiman hi vatatoy ani navyane jagaycha balahi milata.... best wishes for future....

दत्ताराम जाधव

तुम्हा दोघांचे जीवन टाकीचे घाव सोसून स्वच्छ मूर्तरूप झाले आहे,दिशा उजळीत जावोत. बुद्धी आणि विचारांशी,तत्वांशी प्रामाणिक आहात. अभिनंदन!

Add Comment