आम्हाला एकमेकांच्या सोबतीचा कधीही कंटाळा येत नाही!

आंतरधर्मीय विवाह केलेल्यांच्या मुलाखती : 9

जुलेखा-विकास... दहा वर्षांची मैत्री आणि पुढं पस्तीस वर्षांचं दीर्घ सहजीवन जगत असलेलं आनंदी जोडपं. 1976च्या आसपास गावमातीत रुजलेली ही कहाणी. मुलामुलींच्या मैत्रीभोवती लिंगसापेक्षतेनं पछाडलेला काळ. मुलामुलीनं एकमेकांना पाहिलं तरी गहजब वाटावा तिथं एका युथ क्लबच्या माध्यमातून या दोघांची भेट झाली आणि समान आवडीनिवडीच्या जोरावर त्यांनी लोकांच्या नजरांना दुर्लक्षून स्वतःभोवतीच्या बंधनांचा काच सैल केला. मैत्रीचा वेल फुलत गेला. दहा वर्षांच्या दीर्घ सोबतीनं प्रेमाच्या सहजीवनाची वाट धरली. कुटुंबीयांकडून अवहेलना झाली, आयुष्यभराचा अस्वीकार मान्य करूनही आज पस्तीस वर्षांनीही हे नातं ताजं, टवटवीत आहे. 

जुलेखा तुर्की या मुळच्या चाळीसगावच्या. आईच्या मामामामींनी त्यांचा सांभाळ केला. जुलेखा यांचे मामा सुधारणावादी, विवेकवादी बोहरा होते. त्यांच्या घरात प्रचंड कर्मकांडाला फाटा होता. शिक्षणाकडे मात्र ओढा होता. आई, एक मोठी बहीण आणि मामा-मामी यांच्यासोबत जुलेखा राहत होत्या. त्यांनी चाळीसगाव इथून सायकॉलॉजीमधून बी.ए. केलं. आर्ट्‌स विभागात त्या कॉलेजमध्ये पहिल्या आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी जळगावला अपडाऊन करून मणियार कॉलेजमधून एलएलबीचा कोर्स केला. वकील झाल्या. चाळीसगाव तालुक्यातील त्या पहिल्या महिला वकिल आहेत. पुढे त्यांनी सनद घेतली. दोन वर्षं वकिली केली... मात्र या क्षेत्रात दीर्घ काळ काम करावं असं वाटेनासं झालं म्हणून मग त्यांनी कॉम्प्युटर इन्स्टिट्युट सुरू केली. या क्षेत्रात स्वत:चं ज्ञान अद्ययावत करत सीडॅक, एनआयटी, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशी संलग्न कोर्सेस त्या चालवू लागल्या. जुलेखा या कथालेखनही करतात. सोबतच महिला व बाल या विषयांवर विविध दैनिकांतून त्या सातत्याने लेखन करत असतात.

विकास हेदेखील चाळीसगावचेच. त्यांचे वडील वकील होते. घरातलं वातावरण मात्र कर्मकांडांनी भरलेलं... विकास यांच्यावरही तेच संस्कार होते. वाणिज्य शाखेतून पदवी घेतल्यानंतर लगेचच त्यांना स्टेट बँकेत नोकरी मिळाली. नोकरी करता-करता त्यांनीदेखील मणियार कॉलेजमधून एलएलबी केलं. जुलेखा यांच्या उच्चशिक्षणातून प्रेरणा घेऊनच विकास यांनीसुद्धा कायद्याचा अभ्यास केला. 2000मध्ये त्यांनी स्टेट बँकेतून निवृत्ती घेतली आणि जुलेखा यांना व्यवसायात मदत करू लागले. त्यांनी काही अभिजात साहित्याकृतींचा मराठी अनुवादही केला आहे. मोपांसा या फ्रेंच लेखकाच्या कथांचा संग्रह आणि मारिओ पुझोच्या द गॉड फादर ही कादंबरी यांचे त्यांनी केलेले अनुवाद पुष्पा प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहेत. विकास यांना दोन भाऊ आणि आईवडील असा परिवार आहे. वडलांनी विकास यांच्या प्रेमाला विरोध केला मात्र आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यानं विरोधाची धार बोथट झाली.
विकास आणि जुलेखा यांनी स्पेशल मॅरेज अ‍ॅक्टखाली 16 जून 1986 रोजी लग्न केलं. अनुपम आणि अनिका या त्यांच्या मुलांनीदेखील उच्च शिक्षण घेतलं आहे... मुलगा आणि सून वकील आहेत तर मुलगी आर्किटेक्ट आणि जावई एमएस झालेला आहे. संघर्ष-चिंतन अशा धर्तीवर जगलेल्या या जोडप्याची ही प्रेमकहाणी...

प्रश्‍न - सर, शुक्ल हे आडनाव बहुतांश वेळा उत्तरभारतात आढळतं तर तुमचं मूळही तिकडं कुठं आहे का?
विकास - नाही. मलासुद्धा आधी तसंच वाटलं म्हणून मीही थोडा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मागच्या तीनचार पिढ्या तरी आमचे पूर्वज महाराष्ट्रातच होते. आमच्या घरातलं वातावरण पूर्ण महाराष्ट्रीय ब्राह्मण कुटुंबातलं असंच आहे. उत्तरभारतीय प्रथा-परंपराही नाहीत. कुणास ठाऊक कुणी उत्तर भारतातून इकडं आलं की इथलेच मूळ आहोत.

प्रश्‍न - साधारण साठ-सत्तरच्या दशकातलं तुमचं बालपण. दोघंही चाळीसगावातलेच. त्या काळातल्या तुम्हा दोघांच्या बालपणाविषयी सांगा ना...
जुलेखा - माझं लग्नापूर्वीचं नाव जुलेखा सालेभाई तुर्की. आम्ही दाऊदी बोहरा. माझे वडील खामगावचे पण मी चाळीसगावात जन्मले, वाढले आणि इथंच आयुष्य गेलं. मी आमच्या घरातलं तिसरं अपत्य. माझ्या आधी घरात दोन बहिणी होत्या. माझ्या वडलांनी आईला सांगितलं होतं की, तिसरी मुलगी झाली तर तुला तलाक देईन. आईनं या धमकीचा धसका घेतला होता. होताहोईतो तिनं पाळणा लांबवला होता. माझ्या दुसर्‍या बहिणीनंतर अकरा वर्षांनी माझा जन्म झाला आणि वडलांनी खरोखर माझ्या आईला तलाक दिला. आई तिच्या मामांकडं म्हणजे चाळीसगावला बाळंतपणासाठी आली होती. ती तिथंच राहिली. 

माझ्या जन्माच्या वेळेस माझी मोठी बहीण शाळेसाठी वडलांकडे होती आणि लहान बहीण आईसोबत आली होती. त्यामुळं तलाक झाल्यानंतर आम्ही दोघी बहिणी चाळीसगावलाच राहिलो. आईच्या मामांना मूलबाळ नव्हतं. त्यामुळं त्यांनी मला त्यांची लेक म्हणून दत्तक घेतलं. मुस्लीम व्यक्तिगत कायद्यामुळं कायदेशीररीत्या दत्तक घेता येत नव्हतं. मात्र त्यांनी माझा सांभाळ स्वतःच्या मुलीसारखंच केला. आईच्या मामामामींना मीही मामामामीच म्हणायचे. मामा मुंबई विद्यापीठाचे सुवर्णपदक विजेते वकील होते. तालुक्यात प्रसिद्ध हार्डवेअरचं दुकान होतं, म्हणजे अजून आहे. मी चाळीसगावातूनच मराठी माध्यमाच्या शाळेतून अकरावी झाले. पुढं सायकॉलॉजीमधून बीए केलं. मला सायकॉलॉजीमधून एमए करायचं होतं मात्र त्या काळात जळगावला एमए सायकॉलॉजी शिकण्याची सोय नव्हती. मामांनी सध्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात माझा प्रवेश करून दिला. मात्र दोन वर्षं मी तिकडंच राहणार म्हटल्यावर त्यांनी हाय खाल्ली आणि ते मला सोबतच घेऊन परतले. एमए करण्याचा विचार रद्द करावा लागला. पण इथं राहून काय करता येईल मग जळगावला अपडाऊन करून लॉ करता येईल असा विचार करून मणियार कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. एलएलबी केलं. मामामामी, आई, विकास, बहिणीची मुलगी आणि माझी दोन मुलं, आम्ही सगळे एकत्रच आनंदानं राहत होतो. पंचवीसएक वर्ष मामामामीसोबत होते, वृद्धपकाळानं दोघांनी जगाचा निरोप घेतला. आम गुजराती ही मातृभाषा असल्यानं माझ्या घरात गुजराती, मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी एवढ्या भाषा आम्ही बोलतो.  

विकास - माझं घर सुशिक्षित होतं. वडील चाळीसगावात ‘शुक्ल वकील’ म्हणून प्रसिद्ध होते. सायकॉलॉजीमधून एमए आणि एलएलबी झाले होते. त्या काळात माझ्या वडलांएवढं शिकलेलं गावात कुणीही नव्हतं त्यामुळं गावात त्यांचा लौकिक होता... शिवाय ते श्रीकृष्ण टॉकीज या चित्रपटगृहाचे मालक होते. लहानपणी बरेच सिनेमे आणि गाणी माझ्या अगदी तोंडपाठ होती. मात्र असं असलं तरीही घरातलं वातावरण अगदी कर्मठ होतं. आईवडील दोघंही अत्यंत धार्मिक. सकाळच्या पूजा, पोथीपारायणात वडलांचा दोनअडीच तास जायचा. माझ्यावरही साहजिकच हेच संस्कार होते. वडलांना जर बाहेरगावी जावं लागलं तर पूजाअर्चनेचा भाग माझ्याकडे यायचा. आणि मीही मनोभावे अगदी तासभर पूजापाठ करायचो. गुरुवारी दत्ताची आरती करायचो. मला सगळ्या आरत्या पाठ होत्या. आता एक गमंत सांगतो, माझं चाळीसगावातच बीकॉम झालंय. त्यानंतर लगेचच मी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये नाव नोंदवलं. आई म्हणाली, ‘तू गुरुचरित्राची पारायणं कर. तुझं कल्याण होईल. नोकरी लागेल.’ मी गुरुचरित्राच्या पारायणाला बसलो आणि आश्‍चर्य म्हणजे दुसर्‍या दिवशीच स्टेट बँकेच्या नोकरीचा कॉल आला. घरातल्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. आई म्हणाली, ‘बघ मी म्हणाले होते नाऽ’ अशा एकूण वातावरणाचा मनावर परिणाम होता. पण पुढं मी या सगळ्याच कर्मकांडातून बाहेर पडलो ते श्याम मानव यांच्या व्याख्यानमालेनं. त्यांच्या भाषणातून, मांडणीतून माझ्या सर्व समज-गैरसमजांचा धुव्वाच उडाला. त्यानंतर मी देवधर्मातून बाहेर पडून तर्कसुसंगतता, रॅशनॅलिटी यांकडे वळलो. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे खेचला गेलो. 

प्रश्‍न - आर्ट्‌स आणि कॉमर्स अशा भिन्न शाखांत असूनही तुम्ही कुठं भेटलात? कॉलेजात?
विकास - आम्ही कॉलेजपासूनचे मित्र आहोत हे खरं पण आमची खरी मैत्री झाली ती रोटरॅक्ट क्लबमध्ये. रोटरी संस्थेची युवकांसाठीची ही एक विंग होती. 1976च्या आसपासची ही गोष्ट. त्या वेळी मुलगामुलगी एकत्र बोलताना जरी दिसले तरी फार मोठा गहजब व्हायचा. त्या काळात आमचा सात जणांचा, मित्रमैत्रिणींचा ग्रुप होता. एकमेकांच्या घरी जाणंयेणं, सहली काढणं, एकमेकांचे वाढदिवस साजरे करणं अशा आमच्या एकत्र अ‍ॅक्टिव्हिटीज्‌ चालायच्या. हळूहळू इतर मुलींची लग्नं झाली आणि मुलं शिक्षण-नोकरीच्या निमित्तानं गाव सोडून गेली. शेवटी गावात राहणारे आम्ही दोघंच उरलो. कालांतरानं आमच्या लक्षात यायला लागलं की, आमचं नात फक्त मैत्रीपुरतं सीमित नाहीये. आम्हाला एकमेकांची सोबत आवडायला लागली होती. प्रेमाची जाणीव फुलत होती. 

जुलेखा - आमच्या दोघांनाही उर्दू गजलची आणि शायरीची फार आवड होती. त्या दिवसांमध्ये आमची मैत्री फुलायला हेही एक साम्य राहिलं. कॅसेट्‌समध्ये गजल आणि शायरी यायची. ते आम्ही एकत्र टेपरेकॉर्डरवर ऐकण्यात तासन्‌तास घालवले. एकही दिवस असा जायचा नाही की, आम्ही भेटायचो नाही. एकमेकांच्या घरी तर जाणं फार वाढलेलं होतं. कालांतरानं तर रोटरॅक्टही सोडून दिला होता. मात्र मैत्री कायम राहिली होती. आमच्या ध्यानात आलं की, आपण कुणाशी तरी लग्न करणार आहोत तर एकमेकांचा विचार करायला काय हरकत आहे? आमची सोबत उत्साही आणि आनंददायी असायची. असं इतरांसोबत होईलच याची खातरी नव्हती. हळूहळू लक्षात आलं की, आपण प्रेमात आहोत. जवळपास दहा वर्षं आमची मैत्री राहिली आणि त्यानंतर आम्ही 1986मध्ये लग्न केलं. लग्नाआधीची दोन वर्षं आम्ही खूप प्रेमात होतो. 

विकास - आमच्या मैत्रीच्या टप्प्यावरच जुलेखा एलएलबी झाली होती. पण शिक्षणाच्या पातळीवर मी बीकॉमच होतो. म्हणून मग शिक्षणात तिच्या बरोबरीचा होण्याकरता मीपण मणियार कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेतली. स्टेट बँकेतली नोकरी करता-करता मीही बाहेरून परीक्षा देऊन एलएलबी पूर्ण केलं, म्हणजे तिच्या मामांनी म्हणायला नको की, विकास तुझ्यापेक्षा कमी शिकला आहे. 

प्रश्‍न - लग्नाआधीच तुमचं एकमेकांकडं जाणंयेणं होतं. ते घरच्यांना रुचत होतं?
जुलेखा - आमचे मामा हे सुधारणावादी बोहरी होते. घरातलं वातावरण हे माणुसकी जपणारं आणि जातधर्म न मानणारं होतं. मामांप्रमाणेच मामी, आईसुद्धा कट्टर पारंपरिक नव्हत्या. आपल्या वागण्यातून कुणाला त्रास होऊ नये इतकी साधीच अपेक्षा असणारी साधी माणसं होती त्यामुळं घरात विकासच्या येण्यावर काही बंधनं नव्हती की आक्षेप. 

विकास - माझ्या आईला मात्र जुलेखाचं येणं फारसं आवडायचं नाही. तिच्या मनात काहीतरी शंका होतीच. आम्ही ग्रुपसह घरी जायचो. ती आमच्या इतर मैत्रिणींनाही सांगायची की, तुम्ही जुलेखाशी कशाला मैत्री करता? म्हणजे त्यांनी हिच्याशी मैत्री तोडली तर ग्रुप तुटेल आणि मग माझा मुलगा हिच्या संपर्कात राहणार नाही असा तिचा काहीतरी बाळबोध समज होता. शेवटी आईचं अंतःकरण असंच असतं. शेवटी आम्ही कुणाचं ऐकणार नव्हतोच. 

प्रश्‍न - लग्नाबाबत घरी सांगितल्यावर काय प्रतिक्रिया उमटली?
जुलेखा - प्रेमातली दोन वर्षं पूर्ण झाल्यावर घरात सांगून टाकायचं ठरवलं तेव्हा मामांनी मला एक कागद दिला आणि त्यावर या लग्नाचे फायदे आणि तोटे लिहायला सांगितले. मी त्यावर लिहिलं - मी मुलाला ओळखते. आमचं शिक्षण समान आहे. आमचे विचार आणि वेवलेंग्थ जुळतात. त्याच्यासोबत मी खूप खूश असते आणि व्यावहारिकदृष्ट्या पाहता त्याच्याकडे नोकरीसुद्धा आहे. 

तोटे काही लिहिता आले नाहीत. मामांनी ते वाचलं आणि पाठीशी उभे राहिले. त्यांनी एक टक्काही विरोध केला नाही. मामांचा स्वभावच असा होता की, ते दबाव टाकत नसत. विकासच्या घरातल्या धार्मिक वातावरणामुळं त्यांना तशी काळजी होती. आपल्या मुलीला हे सर्व झेपेल का असाही विचार त्यांच्या मनात यायचा. पण त्यांनी माझ्या प्रेमाखातर सारं काही स्वीकारलं. मामीनं आणि आईनंही विरोध दाखवला नाही.

विकास - खरंतर मुस्लीम समाज कट्टर असते असा एक समज असतो. त्यामुळं त्यांच्याकडून आकांडतांडव होईल, कडाडून विरोध होईल असं आम्हाला वाटत होतं. पण तसं झालं नाही. धर्मगुरूंची सत्ता न मानणारे बोहरा समाजात काही जण असतात. मामा तसे सुधारणावादी बोहरा होते. स्वतः विवेकवादी होते. त्यामुळं त्यांच्याकडून विरोध येण्याचा काही प्रश्‍नच नव्हता. पण इतर ही कोणाकडून झाला नाही. मात्र माझ्या घरून विरोध होणार हे उघड होतं, कारण माझं घर अगदी कर्मठ ब्राह्मणी कुटुंब आणि बोहरी म्हटलं तरी ती मुसलमान. अशा पोरीशी लग्न म्हणजे तोबा तोबा! मात्र आम्ही सुरुवातीपासूनच दोन गोष्टी पक्क्या ठरवल्या होत्या. पळून जायचं नाही, गावातच लग्न करायचं आणि कुणीही धर्मांतर करायचं नाही. आहे तोच धर्म पुढंही पाळायचा त्यामुळं आम्ही स्पेशल मॅरेज अ‍ॅक्टखाली नोंदणी करायचं ठरवलं. 

...पण एक आगळीक घडली. आम्ही जिल्ह्याच्या गावी जाऊन एक महिना आधी लग्नाची नोटीस देऊन आलो. आम्ही घरी येण्याच्या आधी ही बातमी गावात आणि आमच्या घरी येऊन पोहोचलेली होती त्यामुळं माझ्या घरी विरोधाचं नाटक सुरू झालं. आईवडलांनी आत्महत्या करण्याची धमकी दिली. वडील नगराध्यक्षांकडे गेले, स्थानिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांकडे गेले. पण तुम्हाला सांगतो, आमचं नेतृत्व इतकं समजंस- समजदार होतं की, त्यांनीच माझ्या वडलांची समजूत काढली की, ते दोघंही सज्ञान आहेत. तुम्ही मन उदार करा आणि या लग्नात सहभागी व्हा... पण माझ्या वडलांनी ऐकलं नाही. अबोला धरला. आईचा लग्नाला होकार होता असा भाग नाही. तरीही ती कैचीत सापडली होती. तिला मीही हवा होतो, पण वडलांच्या विरोधात जाता येत नव्हतं. माझा भाऊ तर लग्न नोंदवायला येणार्‍या रजिस्ट्रारला धमकी देऊन आला- तू येऊ नकोस... कारण गावात या लग्नावरून दंगल होणार आहे. 

...त्यामुळे घाबरून तो रजिस्ट्रार आलाच नाही. शेवटी आम्हालाच जाऊन त्याला घेऊन यायला लागलं होतं. 

प्रश्‍न - इतका विरोध असतानाही लग्नासाठी मार्ग कसा काढला?
विकास - आर्थिकदृष्ट्या मी सक्षम होतो. नोकरी होती. जुलेखाचीही सुरुवातीला प्रॅक्टीस चालू होती. गृहकर्ज काढून मी घरही घेऊन ठेवलं होतं त्यामुळं वडलांवर कुठल्याही प्रकारे अवलंबून नव्हतो. ही बाब जुलेखाच्या मामांनाही दिसत होती. त्यामुळं स्वतंत्र होऊन मार्ग काढणं सोपं होतं. आम्हाला घरूनच विरोध झाल्यामुळं तर रीतसर लग्न करण्यावरचा आमचा विश्‍वास दुणावला. आम्ही लग्नासाठी एक छान पत्रिका तयार करून घेतली. त्यावर आम्ही दोघं आमचं लग्न करत आहोत तुम्ही आमच्या लग्नाला जरूर या... असा मायना छापला.

जुलेखा - आम्ही गावातच लग्न केलं. सबंध गाव लग्नाला उपस्थित होतं. मी प्रॅक्टीस करत असल्यानं माझ्या लग्नाला पाच जजेस आले होते. त्यांतल्या एका जजसाहेबांनी मला बहीण मानलं होतं. त्यांच्या प्रोटोकॉलनुसार ते सार्वजनिक समारंभात जात नाहीत मात्र बहिणीचं लग्न आहे म्हणत ते लोक हजर झाले होते. विकासचे वडील हे माझ्या धाकट्या मामांचे वर्गमित्र. मामा स्वतः त्यांना लग्नासाठी बोलवायला गेले. 

‘चल रेऽ वकील मुलं लग्न कराताहेत, तू काय रागवून रुसून बसलास?’ 

...पण ते म्हणाले, ‘माझं तुझ्याशी नातं पण त्याच्याशी संबंध नाही.’ माझ्या घरचे सगळे होते, मात्र विकासच्या बाजूनं त्याची बहीण आणि मेहुणे होते. मामांच्या घरासमोर मांडव टाकून गावातल्या सर्व प्रतिष्ठित नागरिकांसमोर आणि गावातल्या मान्यवर नगराध्यक्षांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या आशीर्वादानं आमचं नोंदणी पद्धतीनं लग्न  लागलं.

प्रश्‍न - सासरच्या कुटुंबीयांनी तुमचं नातं कधी स्वीकारलं?
जुलेखा - विकासच्या घरच्यांनी विकासशीच अबोला धरलेला होता. त्याच्याशी नातं ठेवलं नव्हतं त्यामुळं माझ्याबरोबर लगेचच बोलणं दुरापास्तच होतं. वर्ष-सव्वावर्षात माझ्या पहिल्या मुलाचा, अनुपमचा जन्म झाला आणि थोडं-थोडं करत बोलणं सुरू झालं. अर्थात त्यात अढी होतीच. अगदी अनुपमला पाहायला माझे सासरे आले तर ते माझ्याकडे पाठ करून बसले आणि बाळाला घेतलं. अशा गोष्टींनी हर्ट व्हायचं. त्याचदरम्यान विकासच्या भावाचं लग्न ठरलं. नाशीकची मुलगी होती. आता लग्नात मोठा भाऊ का नाही अशी विचारणा होईल म्हणून त्यांनी बोलाचाली सुरू केल्या होत्या. नातेसंबंध म्हणून येणंजाणं सुरू झालं तर त्यांच्या देहबोलीतून कधीही त्यांनी मला पूर्णतः स्वीकारलं आहे अशी भावना निर्माण झाली नाही. परकेपणा जाणवत राहिला. माझ्या मुलांनाही माझी आई, मामामामीच जवळचे वाटायचे. ते आजीआजोबा कधी वाटतच नव्हते. लळा लागलाच नाही.

विकास - तिला कधीही हे फिलिंग आलं नाही की, तिला स्वीकारलं गेलंय. तो मान ते देऊ शकले नाहीत.

प्रश्‍न - कुटुंबातल्या अपमानजन्य वागणुकीवरून तुमच्यात भांडणं झाली?
जुलेखा - नाही... कारण विकासला दिसतंच होतं की, मला कशा तर्‍हेनं वागवलं जात आहे. धर्म या विषयावरून तर कधीच भांडणं झाली नाहीत. एक मिलीसेकंदही वाद झाला नाही. आम्ही लग्न केलंय तुम्हाला पटलं नाही याचा आम्ही आदर राखला आणि स्वतंत्र राहिलो मात्र त्यांना हे जमलं नाही. विकासच्या आई तशा खूप प्रेमळ होत्या. एका शब्दानं दुखावत नसायच्या. कालांतरानं त्या आमच्या घरी यायला लागल्या. तेव्हा हॉलमध्ये आई, मामी आणि विकासची आई तिघी मिळून खूप गप्पा मारायच्या. हे चित्र तर फारच छान होतं. सासूचा प्रेमळ, सभ्य स्वभाव असूनही मला त्यांची भाग्यवान सून होता आलं नाही. 

प्रश्‍न - लहान गावांमध्ये आंतरधर्मीय विवाह कसा स्वीकारला गेला?
विकास - लहान गाव असूनही गावानं आम्हाला मनापासून स्वीकारलं. दोघंही नास्तिक असल्यानं धर्मपालनाबद्दल मुळीच आग्रही नाही. दिवाळी साजरी करतो, ईदचा शिरखुर्मासुद्धा आवडीनं खातो. इतर नवरा-बायकोप्रमाणे आमची भरपूर भांडणं होतात... पण धर्म या विषयावरून आमचं आजतागायत एकही भांडण झालेलं नाही. नास्तिक असलो तरी आम्ही एकमेकांच्या धर्माचा आदर करतो. आम्हाला फक्त एकच खंत आहे आमचे कुणी फॉलोअर्स झाले नाहीत. 

जुलेखा - लोकांनी चांगल्या तर्‍हेनं स्वीकारलं तरी ते आपल्याला बदलण्याचा प्रयत्न करत असतात. ‘शुद्धीकरण’ करायचं असतं. आता मी हिंदू वस्तीत वाढल्यानं हिंदू संस्कृती मला चांगली ठाऊक आहे. तरीही मी जन्मानं मुस्लीम आहे आणि घरातल्या मुस्लीम वातावरणाचाही माझ्यावर खोल परिणाम आहे हेही नाकारता येत नाही. आता मला आवडतं म्हणून मी कधीतरी मंगळसूत्र घालते. साडीवर छान वाटतं म्हणून टिकली लावते मात्र हे पुन्हा माझ्या आवडीचा भाग म्हणून. मात्र जेव्हा काही जण आपल्याला हळदीकुंकवाला बोलावतात आणि हळदीकुंकू लावण्याविषयी विचारणा करतात तेव्हा ते ऑड वाटतं. हळदीकुंकवाला बोलावलं आहे तर लावा ना. काही जण याहून पुढची हाईट करतात, ‘अरेऽ आता काय ती आपलीच झाली आहे...’ अशाही प्रतिक्रिया काही जण देतात. त्यांना मी सांगते, ‘नाही! तुम्ही हळदीकुंकू लावल्यानं मला काहीही फरक पडत नाही पण तुम्ही जर मला तुमच्यातलीच समजून राहाल आणि माझं मूळ अस्तित्व विसराल तर मला हे खपणार नाही.’ 

मी सरळ सांगायचे, ‘मी मुस्लीम आहे तर आहे. जन्मानं आहे तशी मरेपर्यंत राहणारच.’ 

माझ्या बाळंतपणात कॉम्पिलेक्शन्स झाली त्यामुळं बारशाला वेळ लागला. तेव्हा गावात अफवा पसरली होती की, आता त्यांच्यात काही वाद निर्माण झालेत. आता हे लग्न तुटणार म्हणून पैजा लागल्या होत्या. असे लहानमोठे संघर्ष झाले मात्र लक्षणीय असं काही नाही.

प्रश्‍न - मुलांच्या वाढीच्या काळात त्यांना आंतरधर्मावरून प्रश्‍न पडले? किंवा त्यांना कुणी प्रश्‍न केले?
जुलेखा- आम्ही मुलांच्या डोक्यात कुठल्याही कर्मकांडांच खूळ भरवलं नाही. अनुपम तीन वर्षांचा असताना शेजारी खेळायला गेल्यावर त्यांनी विचारलं, ‘तू मुसलमान आहे की हिंदू आहेस?’ अनुपम अगदी ब्रिलियंट आहे. त्यानं शरीरावर हातानं उभा चिरा मारून सांगितलं की, ‘एक बाजू आईची आणि दुसरी वडलांची आहे.’ हा किस्सा तर त्या बाईंनीच येऊन सांगितला. हा एवढाच प्रसंग. मुलांना कधी कुणी विचारलं असेल तरी आमच्याजवळ तर मुलं काहीच बोलली नाहीत. मुलं कधी काही बोलली नाही. उलट त्यांना आमचा खूप अभिमान वाटतो. आम्ही दोघंही नास्तिक आहोत. घरात कुठल्याही तसविरी नाहीत की पूजाअर्चा... पण आमच्या घरात अन्य कुणाला जर धर्माचं काहीही करायचं असेल तर आमचा त्याला विरोध नाही. माझी बहीण, भाच्या येतात तर त्या बिनधास्त नमाजपठण करतात. आम्ही मज्जाव करत नाहीत किंवा विकासच्या कुटबीयांना मंदिर दाखवायचं असेल तर आम्ही तेही आनंदानं करतो. फक्त कुणीही आम्हाला ते करत असलेलं आम्ही करावं किंवा ते किती भल्याचं आहे हे सांगितलं की आम्ही खडे बोल सुनावतो. 

अनुपम अगदी चार वर्षांचा होता तेव्हा विकासनं मुलाला नेऊन तिथं भूत आहे का हे दाखवलं होतं. मुलं अशा वातावरणात वाढल्यानं त्यांच्यावर धर्मविषयक काहीच जाणिवा रुजल्या नाहीत. मुलगी जरा विचित्र धार्मिक आहे. म्हणजे ती दर्ग्यावर जाऊन दुवा करू शकते आणि मंदिरात जाऊनही मनोभावे प्रार्थना करते. डोक्यात ती असा कसा बॅलन्स आणते तो तीच जाणे. मुलगा मात्र स्वतःला पूर्णतः नास्तिक मानतो. दोघंही मात्र कुटुंबीयांसोबत वावरताना खूप आदरपूर्वक वागतात. विकासच्या कुटुंबात किंवा कुठल्याही हिंदूधर्मीय कुटुंबात जावोत... त्यांची आई मुस्लीम आहे याचा पत्ता लागू देत नाहीत. तसंच मालेगावला नातेवाइकांकडे मोहरमच्या वेळेस मातम करतात तेव्हा तिथं वडील हिंदू आहेत याची जाणीव होऊ देत नाहीत. 

प्रश्‍न - पुढं मुलांच्या लग्नासाठी काही अडचणी निर्माण झाल्या?
जुलेखा - मुलानं स्वतःच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केलं. ती बंगाली आहे. त्यामुळं त्याचा प्रश्‍न आला नाही. मात्र मुलीच्या लग्नाच्या वेळेस आम्हाला थोडं टेन्शन आलं होतं. विवाहासाठी वधूवर सूचक मंडळात नोंदणी केली तेव्हा योग्य वर पाहिजे इतकंच ठरवलं होतं. त्या वेळी फॉर्ममधून जात कॉलम काढून टाकला. उलट आमच्या लग्नाची हकिकत लिहिली. एखाद्या स्थळानं फोन केला की, मी मुलीची आई आहे असं सांगून मी मुस्लीम आहे हे आधी सांगायचे. काही जण धर्मांतर केलं आहे का हे विचारायचे. त्यावरही नकार ऐकून लोक पुन्हा विचारणा करायचे नाहीत. आम्हाला थोडा गंड निर्माण व्हायला लागला होता की, आपल्यामुळं मुलीचं लग्न ठरेना की काय. तेव्हा अनिकाच म्हणायची, ‘ज्यांना तुमच्या लग्नाबाबत आपत्ती असेल त्या घरात तुम्ही काय मला पाठवता? मी स्वतःच जाणार नाही.’ 

...पण सुदैवानं आम्हाला समजूतदार कुटुंब मिळालं.

प्रश्‍न - तुम्ही सातआठ जण एकत्र कुटुंब म्हणून राहिलात तेव्हा काही अडचणी आल्या का?
जुलेखा - नाही. विकास माझ्या आईचा, मामामामींचा लाडका होता. भाच्याही ‘अंकल अंकल’ म्हणून त्याच्या मागंपुढं करतात. खूप आनंदानं सगळे एकत्र आले त्यामुळं विविध प्रकारची खाद्यसंस्कृती मुलांना मिळाली. भाषेच्याबाबतही तेच. बोहरा गुजराती, उर्दू बोलतात. आसपास मराठी आणि शाळा इंग्लीश त्यामुळं मुलांना या पाचही भाषा येतात. 

मामांचा विकासवर इतका विश्‍वास होता की, लग्नाच्या दहा वर्षांनी त्यांनी प्रॉपर्टीचे हक्क विकासला दिले. विकासनंही ती इमानेइतबारे सांभाळली. त्याचं एकच म्हणणं आहे, ही मालमत्ता आपली नाहीये. त्यांनी त्यांच्या नातवांसाठी हा आशीर्वाद दिला आहे. आपला रोल फक्त सांभाळण्यापुरता आहे, असं म्हणूनच विकासनं ते चालवलं. विकासवर जीव असण्याचं दुसरं महत्त्वाचं उदाहरण म्हणजे मामींनी मृत्यूनंतर अंत्यविधी विकास करेल असं लिहून ठेवलं. जातीतल्या लोकांनी फार विरोध केला. गोंधळ घातला. असं होणार हे माहीत असल्यासारखं मामींनी कागदावर लिहून ठेवलं होतं की, मला माझ्या कबरीत फक्त माझा जावई आणि नातूच उतरवतील. मग या दोघांनीच मामीची अंत्यक्रिया केली. 

आई, मामामामी यांचं खरं कौतुक. आम्ही दोघं तरी प्रेमात होतो म्हणून एकमेकांचा स्वीकार केला होता. मात्र त्यांनी तर कशाचंच काही नसताना हळूहळू आमचं नातं स्वीकारलं, विकासला स्वीकारलं. ही किती मोठी गोष्ट आहे. काही काळासाठी विकासनं नॉनव्हेज खाणं बंद केलं होतं. तेव्हा जावई खात नाहीये म्हणून त्या तिघांनीही खाणं बंद केलं होतं. इतकं प्रेम ते करत होते. आम्हीही आमच्या मुलांना तशीच माया देण्याचा प्रयत्न करत आहोत. आता माझ्या मुलीनं, सुनेनं आडनावं बदलली नाहीत. तो त्यांचा चॉईस आहे. ती बंगाली धर्माप्रमाणं राहते की आणखी कुठल्या त्यासाठी मी कशाला डोकेफोड करू? ती माझ्या मुलासोबत आनंदानं राहते. दोघं एकमेकांना आवडतात. ती दोघं एकमेकांसोबत आनंदी आहेत. महिना-पंधरा दिवसांनी कुठं फिरायला गेली की एकत्र आनंदात काढलेले फोटो पहायला दाखवतात आणि आम्हाला मिळून जातं त्याचं उत्तर... की ‘येसऽऽ दे आर हॅप्पी.’ 

लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळसणात सून विचारायला आली की, आई विचारतीये आमच्याकडे 21 दिवे लावतात तुम्ही किती लावता? म्हटलं, ‘तुला तुझ्या आईनं 21 सांगितलेत नाऽ वेल अ‍ॅन्ड गुड. तेवढे लाव. मी एकही लावते की नाही मला आठवत नाही. तू माझी काळजी करू नकोस. तुला हवं तसं कर.’ मी तिला असं म्हटल्यानं ती सुखावली. असं जर तुमचं रिलेशन ठेवलं तर 'यार काय छान लोक भेटले ज्यांनी माझा आनंद पाहिला' असं वाटतं. 

प्रश्‍न - तुम्हाला आजच्या काळात आंतरधर्मीय विवाहाचं महत्त्व काय वाटतं? 
विकास - आंबेडकरांनी जातिअंत पुस्तकात जातीचा अंत करायचा असेल तर आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह मोठ्या प्रमाणावर झाले पाहिजेत असा विचार मांडलाच आहे. मात्र आम्ही एकमेकांशी लग्न केलं ते आम्हाला आंतरधर्मीय विवाह करायचाच होता म्हणून नव्हे, तर आमचं एकमेकांवर प्रेम होतं म्हणून. आणि आम्ही दुसर्‍या कुणाबरोबर लग्न केलं तर इतकं आनंदी आणि सुखी राहू शकणार नाही याचा आम्हाला साक्षात्कार झाला होता. आमच्या लग्नाचा पाया प्रेम आणि एकमेकांशी कम्पॅटॅबिलिटी हा आहे... पण जे लोक जातिधर्मामुळं आपला दायरा मर्यादित ठेवतात त्यांना कसं समजवायचं असा प्रश्‍न पडतो. लोकांचा आपल्याच जातीपुरतं, पोटजाती, गोत्र एवढंच बघण्याकडं कल असतो. तुमची चॉईस तुम्ही किती लिमिटेड करून ठेवता? किती स्थळं, किती चांगली माणसं मिळण्याची शक्यताच आपण नाकारतो. या जातींच्या साखळदंडांनी अडकून पडतो. हे होता कामा नये असं खूप वाटतं.

जुलेखा - मुस्लीम म्हटलं की, लोकांची मनं लगेच पूर्वग्रहित होतात. प्रत्येकाला एका ठरावीक नजरेनं बघितलं तेव्हा तर फार वाईट वाटतं ‘आपण माणूस म्हणून एकमेकांना पाहू शकत नाही. का?’ धर्म थोडा बाजूला ठेवता आलं पाहिजे. उलट आजकाल आपल्या कर्मकांडांचंही प्रदर्शन झालंय. दिखाऊपणा वाढला आहे. अशा वेळी वाटतं की, अशा विवाहांमुळं त्या भिंती गळायला मदत होईल का? लग्नात किंवा जगण्यात धर्म नसला तरी फरक पडत नाही. 

आमचं उदाहरण आहे, बिनाधर्म आम्ही जगलो. तरी आमची जॉइंट फॅमिली आहे. इतकी सहज होऊ शकतं तर बाकीचे का करू शकत नाहीत? ऑनर किलिंगसारखे प्रकार घडतात. कुठला धर्म सांगतो आपल्या मुलांचा जीव घ्या?. आपल्याच मुलांचा जीव घेणं हे किती निर्घृण आहे. किती तरी मुली सासरी मरून जातात. त्या तर त्यांच्याच जातीतल्या असतात तरी मारलं जातं. लग्नासाठी काय पाहायला हवं? दोघांचं आरोग्य, दोघांचं शिक्षण, दोघांची समज, स्थान, प्रेम, समजंसपणा... पण हे सोडून बाकीच्या गोष्टींना महत्त्व दिलं जातं. उलट प्रेमविवाहात लोक प्रेमाची जबाबदारी घेतात त्यामुळं एकमेकांना जीवापाड जपतात. एकमेकांवर उगीच दबाव आणत नाहीत आणि लग्नं फुलत जातात. सुख आणि आनंद बाह्य गोष्टींवर अवलंबून नाहीत. अनुरूपता पाहता आली पाहिजे. ते पाहताना जातधर्म पाहण्याची गरजच नाही. 

प्रश्‍न - तुमच्या दीर्घ सहजीवनाचा आधार काय वाटतो?
विकास-जुलेखा - प्रेम! प्रेमच आमच्या सहजीवनाचा आधार आहे.
जुलेखा - आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो. कालांतरानं ते विरून जातं पण आमच्याबाबत असं झालं नाही. आम्हाला एकमेकांची कंपनी खूप आवडते. परस्परांबरोबर खूप आनंदी, कंफर्टेबल असतो. आम्हाला एकमेकांच्या सोबतीचा कधीही कंटाळा येत नाही. शिवाय विकासच्या आणि माझ्या आवडीनिवडी खूप जमतात त्यामुळं आम्ही प्रत्येक क्षण एन्जॉय करतो. भरपूर मजा घेत हिंडतो, फिरतो, वाचतो. भरभरून जगतो. हे सगळंच आमच्या सहजीवनाची खुंटी अजून अजून बळकट करत असेल.

(मुलाखत व शब्दांकन - हिनाकौसर खान)
greenheena@gmail.com


'धर्मरेषा ओलांडताना' या सदरातील इतर मुलाखतीही वाचा

प्रास्ताविक 

समीना पठाण - प्रशांत जाधव

श्रुती पानसे -  इब्राहीम खान 

प्रज्ञा केळकर - बलविंदर सिंग

अरुणा तिवारी - अन्वर राजन

दिलशाद मुजावर - संजय मुंगळे

हसीना मुल्ला - राजीव गोरडे

इंदुमती जाधव- महावीर जोंधळे

मुमताज शेख - राहुल गवारे

Tags: मराठी प्रेम आंतरधर्मीय विवाह जुलेखा सालेभाई तुर्की विकास शुक्ल हिनाकौसर खान पिंजार हिंदू मुस्लीम बोहरा धर्मरेषा ओलांडताना Julekha Salebhai Turkey Vikas Shukl Love Interfaith Marriage Hindu Muslim Bohra Couple Interview Heenakausar Khan Load More Tags

Comments: Show All Comments

शाहीर प्रा.तुळशीराम जाधव

विकास आणि जुलेखाचं सहजीवन म्हणजे प्रेमानं परिपक्वतेने चाललेला प्रवास आहे. मुळात दोघेही पोक्त व जमिनीवर पाय असलेले. एका बाजुला जुलेखाचे मामा पुरोगामी तर दुसऱ्या बाजुला विकासचे आई-वडील पारंपरिक पण मवाळ स्वभावाचे. त्यात त्यांचा मुलगा व्यावहारिक द्रुष्ट्या स्थिरस्थावर होत असलेला. त्यामुळे विरोधाला ताकद मिळंत नाही. शिवाय जोडीने प्रेम सिध्द केलं, सहजीवन यशस्वी केलं. मानवतेचा झेंडा फडकवला , प्रेम मुल्याची आब राखली, राष्ट्रीय एकात्मतेला बळ दिलं त्याबद्दल दोघांचेही खूप खूप अभिनंदन ! संगमनेरला आम्ही तुमचे विवेकशील सोयरे आहोत असं समजुन भेटायला, रहायला , आपला परिवार मोठा करायला जरुर येऊ शकता. शाहीर तुळशीराम जाधव

Shilpa Anup

Very interesting and inspiring interview. May God bless you both with many more years of togetherness. Love and regards to both of you.

Vinod Jaitmahal

सोयरिक आमच्या कुठल्या तरी दूरच्या मावसभावाने सोडून दिलेली असते तुमची सख्खी बहीण तुमच्या कुठल्या तरी जवळच्या चुलत आत्याने मरेपर्यंत छळलेली असते आमची लाडकी लेक आमच्या कुठल्या तरी कळलाव्या चुलत्याने मोडलेली असते तुमच्या भावाची सोयरिक तुमच्या कुठल्या तरी लांबच्या सावत्र मावशीने जाळून मारलेली असते आमची अश्राप नात तरीही... आमचे सोयर तुमच्याशी आणि तुमचे सुतक पाळतोच आम्ही नाइलाजाने तरीही... आम्ही एकाच जातीच्या चिखलात लोळत राहतो पिढ्यानुपिढ्या अभिमानाने दहशत मोडून, छळवाद टाळून, माणसे शोधून शक्य नाही का माणुसकीशी सोयरिक करणे? - विनोद जैतमहाल 15 एप्रिल 2020 https://m.facebook.com/story.php?story_fbid=4314081681956067&id=100000628328408

Dr.Siddharth

खूप छान वाटले ही लव्ह स्टोरी वाचून...काही वेळ हे माझेच आयुष्य मी वाचतोय असे वाटते पण शेवट विरूद्ध आहे..... असो, तुम्हां दोघांमध्ये नि:स्सीम प्रेम असल्यानेच हे सर्व शक्य झाले आहे... जातीपातीच्या भिंती तोडून तुम्ही संसार फुलवला हे विशेष... अनेक शुभेच्छा Thanks for Sharing

Vijay G

प्रवाहाच्या विरुद्ध बाजूने जाणं... तेही १९८० क्या दशकात..! Great... कसली वैचारिक बैठक आणि प्रगल्भता असेल, हे आज वाचल्यानंतर कळाले. माझ्या मनातील सर्वच प्रश्नांची उकल झाली. हॅट्स ऑफ टू यू विकास सर अँड जुलेखा मॅम.!!!

नरेंद्र महादेव आपटे

एक विवेकी जोडप्याच्या अनोख्या प्रेम कहाणी बद्दल वाचले. खूप प्रसन्न वाटले. शुभेच्छा!

Surekha chavan

zulekha and and Vikas happy to read your interview

Surekha chavan

I remember those days when friends Sunanda was taunting you and and I advise you Mary Vikas

Shantaram Bhuravne

त्यांनी माणूस म्हणून एक मेकाना जाणून घेतलं. मैत्री केली. सहवासात आले व प्रेम निर्माण झालं. विचार पूर्वक लग्नाचा निर्णय घेतला. तो विवेकी विचाराने आलेल्या अडचणींवर मात केली. इतरांनी आदर्श घ्यावा असे आयुष्य जगत आहेत. छानच! धन्यवाद!!

MAYUR GHAG

विवेकी जोडीदार....

Raju Inamdar

फारच छान! विचारांनी असा प्रगल्भ प्रत्येक भारतीय होईल तो सुदिन! जुलेखा व विकास यांना अगदी मनापासून प्रेम व शुभेच्छा!त्यांच्या मुलांनाही! स्वप्नातले भारतीय कुटुंब यांनी प्रत्यक्षात आणलंय. !हिना, तूलाही धन्यवाद. इतक्या छान व्यक्तींबरोबर परिचय करून दिला म्हणून!

jyotsna chavan

खूपच छान अशी प्रेमकहाणी होती. आजपर्यंत पडलेल्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर मिळाले. आदर्श असे उदाहरण विकास आणि जुलेखा होते. त्या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा व हिना मॅडम छान परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद.

Add Comment