सहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण !

आंतरधर्मीय विवाह केलेल्यांच्या मुलाखती : 3

ब्राम्हण घरातील लग्न फार पद्धतशीर असतात, मोजक्याच लोकांना बोलावलं जातं, असं ऐकलं होतं. मी ताईच्या लग्नाला येत नाही, असं मी प्रज्ञाला म्हणत होतो. तिने आग्रह केल्यावर एक-दोन मित्रांबरोबर लग्नाला गेलो खरा...पण खूपच विचित्र वाटायला लागलं. एकदम 'ऑड मॅन आउट'...फार वेळ थांबण शक्य नव्हतं. तिच्या ताईला स्टेजवर जाऊन शुभेच्छा दिल्या आणि लगेचच काढता पाय घेतला. जेवणाचा घास काय, पाणीही घशाखाली उतरणं शक्य नव्हतं. तेव्हा खऱ्या अर्थानं पहिल्यांदा टेन्शन आलं होतं आमचं लग्न होईल का याबाबत...

प्रज्ञा केळकर - बलविंदर सिंग. मॉडर्न कॉलेजमध्ये शिकत असताना दोघांची भेट झाली. अभ्यासू, हुशार असणार्‍या प्रज्ञासाठी परीक्षेपुरता अभ्यास करणारा बलविंदर आणि त्याचा ग्रुप म्हणजे वाया गेलेली मुलं अशी पक्की धारणा होती... पण तिच्या अभ्यासूपणामुळं आणि आता झालाच आहे मित्र तर त्याला शिकवण्याच्या ऊर्मीतूनच दोघांचा सहवास वाढला. अभ्यासू नसणं इज इक्वल टू वाया जाणं हे प्रज्ञाचं समीकरण या सहवासातच चूक ठरत गेलं. दोघंही प्रेमात पडले. दरम्यान दोघांवरही एक मोठं संकट कोसळलं. दोघंही आईच्या मायेला पारखे झाले. आयुष्यात पाहिलेल्या या पहिल्यावहिल्या जवळच्या मृत्यूनं आणि खोल जखम देणार्‍या काळानं दोघं अधिक घट्ट बांधले गेले. याच काळात प्रज्ञाच्या घरच्यांना दोघांच्या मैत्रीविषयी संशयही येऊ लागला. शेवटी दोघांनी घरच्यांना सांगून टाकलं. इकडं सुरुवातीला नाराजी, मग नाइलाज आणि नंतर समंजसपणा दाखवत प्रज्ञाच्या घरचे राजी झाले. खरंतर बल्लीचे वडील मूळचे पंजाबचे आणि नोकरीतल्या निवृत्तीनंतर पंजाबला माघारी जाण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलेलं होतं. त्यांनीही मुलापायी स्वतःच्या स्वप्नाला मुरड घातली. प्रज्ञा आणि बलविंदर, दोघं गुरुद्वारात विवाहबद्ध झाले. 

पुण्यात घोरपडी इथल्या रेल्वे क्वॉर्टर्समध्ये बलविंदरचं लहानपण गेलं. मम्मी, डॅडी, ताऊ, दादी आणि एक लहान बहीण हे बलविंदरचं कुटुंब. बलविंदरचे आईवडील दोघंही मूळचे पंजाबचे. बलविंदरची आई रंजबंत कौर ही गृहिणी तर डॅडी गुरुदेव सिंग हे रेल्वे विभागात वायरमन होते. नोकरीच्या निमित्तानं त्यांची बदली पुण्यात झाली आणि ते पुण्यातच स्थायिक झाले. कॅम्पमधल्या चैतन्य इंग्लीश स्कुलमधून बलविंदरनं शालेय शिक्षण घेतलं तर मॉडर्न कॉलेजमधून बी. एस्‌सी. केलं. पुढे त्यानं आयएमएसएसआर या संस्थेतून एमसीएमची पदवी घेतली. बलविंदर सध्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रामध्ये नोकरी करत आहे. 

...तर प्रज्ञा केळकर हिचं बालपण चिंचवड परिसरात गेलं. प्रज्ञाच्या घरी आईवडील आणि एक बहीण असं चौकोनी कुटुंब होतं. प्रज्ञाची आई चारुशीला केळकर गृहिणी तर वडील चंद्रशेखर केळकर खासगी कंपनीत नोकरीला होते. यमुनानगरमधल्या मॉडर्न स्कुलमध्ये तिनं शालेय शिक्षण घेतलं. मॉडर्न कॉलेजमधून तिनंही बी. एस्‌सी.ची पदवी घेतली. तिला पुढं एम. एस्‌सी. किंवा बल्लीप्रमाणे मॅनेजमेंट कोर्सही करण्यात रस नव्हता. लेखन-वाचनाची आवड असल्यानं तिचा ओढा पत्रकारितेकडे होता. तिनं एमएमसीसी कॉलेजमधून पत्रकारितेचं शिक्षण घेतलं आणि सुरुवातीला लहानमोठ्या नियतकालिकांतून तिनं अनुभव घेतला. सध्या ती लोकमत या दैनिकात बातमीदार-उपसंपादक म्हणून काम करत आहे. साहित्य-सांस्कृतिक बीटच्या बातम्यांमध्ये प्रज्ञाला विशेष रूची आहे. 

मॉडर्न कॉलेजमधली मैत्री-प्रेम, दोन्ही पुढं शिक्षणाच्या वाटा बदलल्यानंतरही कायम राहिलं आणि दोघांच्या पडत्या काळात फुलतही गेलं. शिक्षण संपताच दोघंही 25 ऑक्टोबर 2009मध्ये विवाहबद्ध झाले. त्यांना अंगद नावाचा आठ वर्षांचा मुलगा आहे. सहजीवनाची तपपूर्ती होत आलेल्या प्रज्ञा आणि बल्ली यांच्याशी झालेला हा संवाद.

प्रश्न : बलविंदर तुला मराठीत बोलायला आवडेल की हिंदीत?
बलविंदर : हिंदीत... म्हणजे मला मराठी बोलता येतं... पण अधल्यामधल्या काही शब्दांना मी अडखळू शकतो. तिथं हिंदीचा आधार घ्यावा लागेल. त्यापेक्षा हिंदीतच बोलणं मला अधिक सोपं जाईल.

प्रश्न : तुम्ही दोघं एकमेकांशी कोणत्या भाषेत बोलता?
प्रज्ञा : मराठीत. अर्थात त्याची मराठी काही वेळा हिंदी-इंग्लीशमिश्रित असते... मात्र आमचा संवाद मराठीतूनच चालतो. डॅडींशी म्हणजे बल्लीच्या वडलांशी आम्ही हिंदीत बोलतो. ते दोघं बापलेक पंजाबीत बोलतात. त्यामुळं घरात एकाच वेळी मराठी, पंजाबी, हिंदी अशा तिन्ही भाषा बोलल्या जातात.

प्रश्न : हे मस्तंय! बलविंदरऽ तुझा जन्म महाराष्ट्रातला की पंजाबातला? तू पुण्यात किती वर्षांपासून आहेस?

बलविंदर : माझा जन्म इकडचाच. हे खरंय की, माझे आईवडील दोघंही पंजाबमधले आहेत. मम्मी फगवाड्याची आणि डॅडी फिल्लौरचे. मात्र मी जन्मापासून पुणेकरच आहे असं म्हणायला हरकत नाही. 

प्रश्न : तुझ्या बालपणाविषयी, कुटुंबाविषयी सांग ना...
बलविंदर : मम्मीडॅडी त्यांच्या लग्नानंतर काही काळ पंजाबमध्येच राहिले. डॅडी रेल्वेत नोकरीला होते... त्यामुळं त्यांची ठिकठिकाणी बदली व्हायची. पंजाब मग कोलकाता आणि मग तिथून मुंबईत झाली. डॅडींना मुंबई शहर फारसं रुचलं नाही. मग त्यांनी पुण्यात बदली मागून घेतली. पुण्यात सुरुवातीला रेल्वे क्वार्टर्स मिळाले नाहीत... त्यामुळं मग आम्ही दौंडला राहायचो. ते तिथून रोज अपडाऊन करायचे. त्यानंतर ते रेल्वेत पर्मनंट झाले आणि काही वर्षांनी आम्हाला पुण्यात घोरपडी परिसरात रेल्वे क्वार्टर्स मिळाले. लहानपण तिथंच गेलं. क्वार्टर्स परिसर असल्यानं विविध प्रदेशांतले सर्व जातिधर्मांचे लोक तिथं राहत होती. शेजारही चांगला होता. आमच्यासोबत आजीही राहत होती आणि माझे मोठे ताऊ... डॅडींचे भाऊ. त्या दोघांनाही माझ्या वडलांचा लळा होता. वडलांना बर्‍याचदा कामाच्या ठिकाणी मुक्काम करायला लागायचा... पण घरात आजी-काका असल्यानं आम्हालाही त्यांचा आधार होता. घरची आर्थिक स्थितीही चांगलीच होती. त्यामुळं लहानपण अगदी सुखासमाधानात गेलं. लहानपणापासून इथंच वाढल्यानं आपण परराज्यातले आहोत असं कधीच वाटलं नाही. डॅडींना तसा काही अनुभव आला असेल तर माहीत नाही. त्यांची मुळं पंजाबात रुजलेली होती ना. पण त्यांनाही तसा काही अनुभव आला नसणार. अन्यथा त्याविषयी कधीतरी बोलणं झालंच असतं.

प्रश्न : आणि नातेवाईक होते... आहेत?
बलविंदर : नाही. डॅडीसुद्धा नोकरीमुळं इकडं आलेले... नाहीतर इकडं येण्याचा तसा काहीच प्रश्‍न नव्हता. मम्मी-डॅडी, दोघांकडचेही नातेवाईक पंजाबमध्येच आहेत. डॅडी रेल्वेत असल्यामुळं आम्हाला पास मिळायचे. मग सुट्ट्यांमध्ये आम्हीच तिकडं जायचो... पण वडील किंवा आईकडचे पुण्यात कुणीच नाही. आमच्यानंतर दोन वर्षांनी बहिणीचं- कुलदीप कौर हिचं लग्न झालं. सुदैवाने तिलाही पुण्यातीलच स्थळ चालून आलं..आता ती पुण्यातच स्थायिक आहे.लोढी, बैसाखी असे सण साजरे करायला आम्ही आवर्जून तिच्या घरी जातो. अंगदला तिचा विशेष लळा आहे.

प्रश्न : आणि प्रज्ञाऽ तुझी जडणघडण कशी झाली?
प्रज्ञा : माझं बालपण चिंचवडमध्ये गेलं. घरातलं वातावरण मोकळंढाकळं होतं. कुठल्याही प्रकारची बंधनं आमच्यावर नव्हती. उलट आम्हा दोघी बहिणींना आई म्हणायची, ‘स्वयंपाक, घरकाम पुढं लग्नानंतर आहेच. आत्ता अभ्यास नीट करा.’ शिक्षण चांगलं घ्यावं आणि त्यावर लक्ष केंद्रित करावं असं तिला नेहमी वाटायचं. आईचं लग्न १८ व्या वर्षी झालं आणि तिचं पदवीचं शिक्षण अपूर्ण राहिलं. मग मी चौथीत आणि ताई सातवीत असताना आईनं एसएनडीटी कॉलेजमधून तिचं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. भाषेवरील प्रभुत्व, वाचन याबद्दल ती कमालीची आग्रही होती. तसेच संस्कार तिनं आमच्या दोघींवरही केले. ती एकदम कडक शिस्तीची होती. तितकीच धार्मिकही होती. आम्ही राहत असलेला परिसर असेल किंवा शाळा-कॉलेजमध्येही मला एकही ब्राह्मणेतर मित्रमैत्रीण नव्हती. ती का नव्हती किंवा केवळ ब्राह्मणच का होते हे मला सांगता येणार नाही... त्यामुळं इतर धर्मांविषयीची माझी पाटी कोरी राहिली. बल्ली हाच माझा पहिला वेगळ्या धर्मातला मित्र. मी म्हणाले तशी आई धार्मिक होती. माझ्या मोठ्या बहिणीसाठी स्थळ शोधतानाही तिचं असं होतं की, कोकणस्थच कुटुंब असावं. देशस्थ स्थळ आलं तरी तिचा नकार असायचा. कोकणस्थांचे सणसूद सुटसुटीत असतात. पैपाहुणेही मोजकेच असतात. देशस्थांमध्ये देवदेव खूप. पाहुण्यांची वर्दळही खूप. तिला वाटायचं की, हे इतकं आपली मुलगी करू शकणार नाही. वेगळी संस्कृती, संस्कार वेगळे पडतात. अर्थात मी प्रेमात होते तेव्हा डोक्यात यातली कुठलीही गोष्ट नव्हतीच.

प्रश्न : अच्छा! मग पुढं मॉडर्न कॉलेजमध्ये बी. एस्‌सी. करताना तुम्ही एकाच वर्गात होतात?

बलविंदर : सुरुवातीला नाही. मी मुळातच फार काही अभ्यासू, हुशार मुलगा नव्हतो. त्यातच कॉलेजमध्ये तर अभ्यास सोडून बंक करणं, मुव्हीज्, टाईमपास असे उद्योग जास्त सुरू होते... त्यामुळं एक वर्ष डाऊन गेलं आणि त्यामुळंच प्रज्ञाशी ओळख झाली.

प्रज्ञा : पहिल्यापासूनच माझा ग्रुप एकदम अभ्यासू मुलींचा राहिला. इअर डाऊन झालेली मुलं म्हणजे वाह्यात अशी एकूण आमच्या मनात इमेज होती. त्यामुळं सुरुवातीला मैत्री होण्याचीही तशी काही शक्यता नव्हती... पण तेव्हा एक गोष्ट घडली. वनस्पतीशास्त्र हा बल्लीचा आणि माझा एक कॉमन विषय होता. त्यानंतर मला बायोटेक्नॉलॉजीचं लेक्चर असायचं... पण मधल्या वेळेत ब्रेक असायचा.. माझ्या इतर मैत्रिणींचे वेगळे लेक्चर असत. बल्ली आणि त्याचा मित्र नितीन, दोघं वर्गात असायचे. माझ्याकडे त्या दोघांसोबत गप्पा मारणं, वेळ घालवणं यांशिवाय पर्याय नव्हता. बल्ली स्वभावानं खूप शांत आणि समंजस होता. मला खूप बोलायला लागायचं. थोड्याच दिवसांत आमच्या तिघांचीही चांगली मैत्री झाली. बॉटनीचे जर्नल्स असतील किंवा कॉलेजमधले इतर उपक्रम... आमचा सहवास वाढला. परीक्षांच्या वेळेसही आम्ही एकत्र अभ्यास करायचो. बल्ली आणि नितीन, दोघंही परीक्षेच्या वेळेपुरताच अभ्यास करणारी मंडळी होती. हा असला अचाट प्रकार मी तोवर पाहिलेलाच नव्हता. परीक्षेच्या वेळेस दोघं चांगलेच गांगरलेले असायचे... म्हणून मग आम्ही जंगली महाराज रस्त्यावरच्या पाताळेश्‍वर मंदिरात अभ्यासाला बसायचो. त्यासाठी मी निगडीहून तासाभराचा बसचाप्रवास करून सकाळीच यायचे. वर्गात शिकवलेला अभ्यास मी यांना परत शिकवायचे. 

बलविंदर : प्रज्ञा शिकवायची तेव्हा ते चांगलंच लक्षात राहायचं. घोकंपट्टी करण्यापेक्षा हे बरंच बरं होतं. ती आम्हाला अमकं महत्त्वाचं, तमकं महत्त्वाचं वाटतंय असं म्हणून जे-जे शिकवायची तेवढ्यावर आम्ही भर द्यायचो आणि गंमत म्हणजे तोवर कधी साठ टक्केच्या वर मार्क पडले नव्हते... पण प्रज्ञामुळं अडुसष्ट टक्के गुण मिळाले. प्रज्ञाची हुशारी, सांस्कृतिक कार्यक्रमांमधला सहभाग, तिची मदत करण्याची वृत्ती या सगळ्यांमुळं ती आवडायला लागली होती. मग बी. एस्‌सी.च्या दुसर्‍या वर्षात असताना मी थेट तिला मनातल्या भावना सांगितल्या... पण म्हटलं की, तुझ्या मनात जे असेल ते स्पष्ट सांग. नाही म्हणालीस तरी हरकत नाही... पण नाही म्हणून मग आपण तरीही मित्र राहू वगैरे नको. मनात एक ठेवून मैत्रीचं लेबल लावून भावना लपवता येणार नाहीत. मी काही तुला त्रास देणार नाही आणि वाट्यालाही जाणार नाही. फक्त स्पष्ट सांग. मग तिनं पंधरा दिवस घेतले आणि होकार कळवला.

प्रश्न : पंधरा दिवस घेण्यामागं काही कारण होतं?
प्रज्ञा : बल्लीनं प्रपोज केल्यानंतर मला त्यावर पटकन रिअ‍ॅक्ट करता येत नव्हतं. दरम्यानच्या काळात मला त्याचा सहवास, तो आवडायला लागला होता... तरीही मी उगाच थांबून राहिले. अर्थात बल्ली शीख आहे किंवा पुढं जाऊन काय होणार असा कुठलाच विचार तेव्हा मनात नव्हता. तेवढा विचार करावा इतकी समज होती की नाही हेच आता कदाचित सांगता येणार नाही. त्या वेळेस माझ्या जवळच्या एका मैत्रिणीनं मात्र मी नकार द्यावा म्हणून मला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. तिचं म्हणणं होतं की, तो धड महाराष्ट्रीयही नाहीये. त्याचे घरचे पंजाबचे. त्याचं प्रेम खरंच आहे का आणि एवढं सगळं करून तुझे घरचे मानणार आहेत का? घरचे लग्नासाठी परवानगी देणार आहेत का? आणि या सगळ्यांची उत्तरं नकारार्थी असतील तर आपण त्या वाट्याला जावंच कशाला? तिनं परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला. तिची भावना मैत्रिणीची काळजी अशाच स्वरूपाची होती. सरतेशेवटी मीही बल्लीला प्रेमाची कबुली दिली. तेव्हा पुढच्या आयुष्याविषयी कुठलाच विचार केलेला नव्हता. जोडीदाराविषयीच्या अमक्याढमक्या कल्पना वगैरेही मनात नव्हत्या. आत्ताच्या मुली जशा जोडीदार असा असावा, त्याचा आर्थिक स्तर अमका असावा याबाबत पुरेशा स्पष्ट असतात तसं माझं काहीही नव्हतं. कॉलेजच्या वयात, त्या प्रवाहात जे जसं होत गेलं ते तसं होत गेलं. फार समजून-उमजून असं नाहीच.

प्रश्न : कॉलेजचे मित्रमैत्रीण म्हणून एकमेकांच्या घरी गेला असाल ना... त्या वेळी तुमच्या प्रेमाविषयी घरात कुणाच्या काही लक्षात आलं का?
प्रज्ञा : कॉलेजजीवनात मी कधीच बल्लीच्या घरी गेले नव्हते. पण बल्ली माझ्या इतर मित्रमैत्रिणींसह आला होता. कुणास ठाऊक कसं... पण आईला आमच्या प्रेमाविषयी शंका आली होती आणि आधी सांगितलं तसं आई याबाबत फारच काटेकोर होती. खरंतर पदवीनंतर बल्लीला बीएसएनएलची नोकरी चालून आली होती. हा म्हणत होता की, नोकरी करतो म्हणजे जरा पैसेही हातात येतील. सेटल होतो वगैरे... पण माझ्या आईचा स्वभाव मला आधीच माहीत होता. म्हटलं ती जर म्हणाली की, मी पोस्ट ग्रॅज्युएट, तू नुसता ग्रॅज्युएट तर ते उगीच गुंतागुंतीचं होईल. नोकरी मग आयुष्यभर करायची आहेच. मग एमसीएसाठी आम्ही दोघांनीही एकाच संस्थेत प्रवेश घेतला होता. आई संशयानं विचारत आहे म्हटल्यावर आम्ही एकाच संस्थेत आहोत हे तिला सांगितलंही नव्हतं... पण तिला खातरी करून घ्यायची होती... त्यामुळं ती पहिल्या दिवशी कॉलेजमध्ये आली. मी तोवर बल्लीला फोन करून सांगितलं होतं की, तू आज येऊ नको म्हणून. तसा तो आला नाही. आईची खातरी पटली आणि मग आम्ही जरा सुटकेचा निःश्‍वास टाकला.  

प्रश्न : पण तू तर पत्रकारितेचं शिक्षण घेतलंस ना...
प्रज्ञा : त्याचीही एक गमंतच आहे. मला पत्रकारितेचंच शिक्षण घ्यायचं होतं... पण आईचा याला विरोध होता. तिचं म्हणणं होतं की, लेखन-वाचनच करायचं असेल तर इतर नोकरी करूनही करता येईल... शिवाय पत्रकारितेत फार काही पैसा नाही असंही तिचं म्हणणं होतं. त्या वेळेस बायोटेक्नॉलॉजी हे इमर्जिंग क्षेत्र होतं... शिवाय बी. एस्‌सी.त 82 टक्के गुण होते. कॉलेजमध्ये तिसरी होते... त्यामुळं माझं त्यात चांगलं करिअर आहे असं तिला वाटत होतं... पण बल्लीचं म्हणणं होतं की, पैसा असो नसो... पण तुला ते करायचं आहे नाऽ ती तुझी आवड आहे नाऽऽ तर मग कर. याबाबत पप्पांचाही पाठिंबा राहिला. पुणे विद्यापीठाच्या जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या या पदवीची म्हणजेच रानडे इन्स्टिट्युटमधल्या प्रवेश परीक्षा आणि गरवारेमधल्या एम. एस्‌सी.ची प्रवेशपरीक्षा, दोन्ही एकाच दिवशी आल्या... त्यामुळं साहजिकच आईनं मला एम. एस्‌सी.ची प्रवेशपरीक्षा द्यायला लावली. त्याच दरम्यान बल्लीला कुठून तरी कळलं की, एमएमसीसी कॉलेजमध्येही प्रवेश घेता येऊ शकतो. फक्त आम्हाला माहीत झालं तो अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्या काळी अर्जापुरतेही अधिकचे पैसे नसायचे. बल्लीनंच ते पैसे भरून अर्ज आणला. भरला. घरी मी पप्पांना सांगितलं. पप्पाही म्हणाले, ‘आत्ता काहीच बोलू नकोस. प्रवेशपरीक्षा होऊ दे. निकाल काय येतोय ते पाहून आईला सांगू.’ एमएमसीसीत प्रवेश घेतानाच मग तिला सांगितलं. ती खूप रागावली, चिडली... पण  मग तयार झाली.

बलविंदर : माझ्या घरी त्या वेळेस आजारपण सुरू होतं. माझ्या आईला 2000मध्ये कॅन्सरचं निदान झालं होतं आणि आजीलाही ब्रेनस्ट्रोक येऊन गेला होता. केमोथेरेपीमुळं आईची तब्येत खालावलेली होती... पण प्रज्ञाची भेट कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये झाली होती. खरंतर एमसीएला ती माझ्यासोबत नव्हती... पण एमएमसीसीत जाण्याआधी महिनाभर एकाच कॉलेजात असल्यानं शिक्षकांनाही ती माहीत होती. त्यामुळं ती आमच्या या कॉलेजच्या गॅदरिंगमध्येही सहभागी व्हायची. ती दोनेक डान्समध्ये सहभागी झाली होती. तेव्हा मम्मी, डॅडी, आजी, बहीण, ताऊ, सगळेच आले होते... पण तिला कधी घरी नेलं नाही.

प्रश्न : ...आणि मग घरी कधी सांगितलं? 
प्रज्ञा : घरी सांगण्याआधी खूप मोठी घटना घडली. माझ्या आईपप्पांचा खूप मोठा अपघात झाला. दोघंही आयसीयूत होते. आई तर कोमामध्ये गेली. तिचा मेंदू फुटला होता. हे घडलं तेव्हा रात्रीची वेळ होती. बल्लीला फोन करून कळवलं होतं. तो आणि इतर काही मित्र रात्रीतून हॉस्पिटलमध्ये आले. मी आणि ताई आम्ही दोघीच होतो. काकाकाकूही आले. महिनाभर आई हॉस्पिटलमध्येच होती. चारपाच दिवसांनी पप्पा आयसीयूतून बाहेर आले. त्या वेळेस हा रोज मला भेटण्यासाठी पुण्यातून निगडीला यायचा. अगदी पंधरावीस मिनिटंच भेटायचा पण रोज यायचा... शिवाय हा रोज सर्वांची विचारपूस करायचा. आईकडं आत जाऊन भेटून यायचा. आईची अवस्था मला पाहवत नव्हती. मी आत जातही नव्हते. काकाकाकूंना संशय आला. कितीही चांगला मित्र असला तरी तास-दीडतासाचा प्रवास करून रोज काय येतो? त्यांनी आडून विचारण्याचा प्रयत्न केला... पण मी काही सांगितलं नाही.

बलविंदर : माझ्या घरात मम्मीचं आणि दादीचं आजारपण मी पाहत होतो... त्यामुळं अशा वेळी आधाराची गरज असते हे कळायचं. पेशंटला आपण सोबत आहोत ही भावना देणंही महत्त्वाचं असतं. त्या वेळेस प्रज्ञाचा प्रियकर आहे अशा कर्तव्यभावनेतून मी अजिबात भेटत नव्हतो. मी खरंच घरात हे सारं जवळून अनुभवलं होतं. मुंबईच्या टाटा हॉस्पिटलमध्ये मम्मी आणि दादी दोघीही अ‍ॅडमिट असायच्या. डॅडी त्यांच्यासोबत. मी रोज सकाळी सिंहगड रेल्वे पकडून मुंबईला जायचो... डबा घेऊन. संध्याकाळी पुन्हा घरी यायचो. डॅडींना आणि त्यांनाही घरचा डबा मिळावा शिवाय आपल्यालाही जितकं शक्य होईल तितकं भेटता यावं हा हेतू असायचा... त्यामुळं अगदी त्याच भावनेतून मी प्रज्ञाच्या आईपप्पांची भेट घ्यायचो... पण त्या काही कोमातून बाहेर आल्या नाहीत. 2007मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्या सगळ्या प्रकारात आमचा विषय मागे पडला. 

प्रज्ञा : आई गेल्यानं वर्षभरात मोठ्या मुलीचं लग्न केलं पाहिजे या विषयानं जोर धरला. काही महिन्यांतच ताईसाठी स्थळ आलं. आईला हवं होतं तसं अगदी. तिचं लग्न झालं. त्या लग्नातही बल्ली एकमेव वेगळा दिसत होता. त्यामुळं त्याचं लग्नात असणं चर्चेचा विषय झाला होता. हा कोण पगडीवाला अशी एकूण विचारणा सुरू होती. तो तर त्या सगळ्या नजरांनी इतका अस्वस्थ झाला की, जेवणासाठी न थांबता लगेच गेला. शेवटी मार्च 2009मध्ये आम्हीच घरी सांगितलं. 

प्रश्न : म्हणजे नेमकं काय वाटलं होतं तुला... त्या नजरांनी?
बलविंदर : खूप अवघडलो होतो मी. ब्राम्हण घरातील लग्न फार पद्धतशीर असतात, मोजक्याच लोकांना बोलावलं जातं, असं ऐकलं होतं. मी ताईच्या लग्नाला येत नाही, असं मी प्रज्ञाला म्हणत होतो. तिने आग्रह केल्यावर एक-दोन मित्रांबरोबर लग्नाला गेलो खरा...पण खूपच विचित्र वाटायला लागलं. एकदम 'ऑड मॅन आउट'...फार वेळ थांबण शक्य नव्हतं. तिच्या ताईला स्टेजवर जाऊन शुभेच्छा दिल्या आणि लगेचच काढता पाय घेतला. जेवणाचा घास काय, पाणीही घशाखाली उतरणं शक्य नव्हतं. तेव्हा खऱ्या अर्थानं पहिल्यांदा टेन्शन आलं होतं आमचं लग्न होईल का याबाबत...

प्रश्न : घरी सांगितल्यानंतर त्यांची सुरुवातीची प्रतिक्रिया काय होती?
प्रज्ञा : पप्पा तर खूप नाराज झाले. नाराजपेक्षाही त्यांना टेन्शनच आलं. एक तर आई नाही. ताईचं नुकतंच लग्न झालेलं. त्यात मी असं काहीतरी सांगतेय हे कसं हाताळावं हे त्यांना समजतच नव्हतं... शिवाय ताईच्या सासरचे चिडले तर... त्यांना या सगळ्याचा खूप ताण होता. काही नातेवाईक  तर म्हणाले की, कॉलेजात प्रेमबिम होतंच असतं... पण ते इतकं गांभीर्यानं घ्यायचं कारण नाही. आपली संस्कृती वेगळी पडते, झेपणार आहे का? ‘मुव्ह ऑन’ कर... पण माझ्या काका-काकूंनी खूप समजून घेतलं. त्यांनीच पप्पांना समजावलं. ती तिच्या भावना सांगतेय तर टोकाची भूमिका घ्यायला नको. आजच्या जमान्यात कुठं धर्मजाती घेऊन बसायचं? पाहायचं असेल तर एक वेळ आर्थिक स्तर काय आहे? किमान आपल्या घरी होती तशी ती दुसर्‍या घरी राहू शकते का हे बघ. आजीसुद्धा जातीपेक्षा तिला मुलगा आवडलाय ना... ती खूश आहे ना... म्हणाली. पप्पा नाराजीनं आणि नाइलाजानं तयार झाले. तोवर आमच्या दोघांच्या घरात तीन मृत्यू झाले होते. माझ्या आईचा. बल्लीच्या आईचा आणि आजीचा... त्यामुळं बल्लीच्या इथंसुद्धा त्याची लहान बहीण सोडली तर निर्णयप्रक्रियेत सहभागी होणारी कुणी स्त्रीच नव्हती.

बलविंदर : डॅडींना सांगितल्यानंतर त्यांनी वस्तुस्थिती सांगितली. पुण्यात आल्यानंतर मुलांच्या शिक्षणात सातत्यानं बदल होऊ नयेत म्हणून त्यांनी पुण्यानंतरच्या बदल्या नाकारल्या होत्या. निवृत्तीपर्यंत मुलांची शिक्षणंही पूर्ण होतील आणि मग पुन्हा पंजाबला जाता येईल असा व्यवहारी विचार त्यांनी केलेला होता. निवृत्तीनंतर येणार्‍या पैशांतून पंजाबमध्ये घर, शेती घेण्याचा विचार होता... त्यामुळंच त्यांनी पुण्यात कुठल्याही प्रकारची गुंतवणूक केलेली नव्हती. घर घेतलेलं नव्हतं. वर्ष-दोन वर्षांत ते निवृत्त होणार होते. त्यांचं म्हणणं एवढंच होतं की, प्रज्ञाच्या घरचे काय म्हणताहेत ते पाहा. तूही अजून सेटल नाहीस, शेवटी सगळं तुला निभवायचं आहे, अशा सर्व स्थितीतही ते लग्नाला तयार असतील तर माझी हरकत नाही. पंजाबला जाण्याची त्यांना प्रचंड इच्छा होती... मात्र आमच्यामुळे ते इकडेच अडकले. कदाचित मम्मी जिवंत असती तर ते दोघं का होईना... पंजाबला माघारी गेलेही असते... पण तीही नसल्यानं मुलांसोबत राहणं त्यांनी आनंदानं स्वीकारलं. प्रज्ञाच्या काकांनी पुढाकार घेतला. दोन्ही घरच्या मंडळींनी बैठक करू यात असं ठरवलं. 

प्रश्न : बैठकीत कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली?
प्रज्ञा : दोन्ही घरच्या मोठ्या माणसांची भेट व्हावी हाच साधारण मुद्दा होता. नाइलाजानंच माझ्या घरचे बोलायला लागले... मात्र हळूहळू गप्पांचा सूर लग्नाच्या बोलणीपर्यंत गेला. बल्लीला मात्र लगेच लग्न नको होतं. कॉलेज संपवून नुकतेच कुठं नोकरीसाठी धडपडत होतो... त्यामुळं आधी सेटल व्हावं असा विचार होता. मलाही त्याचं पटत होतं. 2008-09मध्ये जागतिक मंदी सुरू होती... त्यामुळं नोकर्‍याही मिळत नव्हत्या. निराश होऊन कॉलसेंटरची तरी नोकरी पत्करतो अशी बल्लीची अवस्था होती... पण सुदैवानं त्याला हवी तशी नोकरी मिळाली. मीही एका नियतकालिकात काम करत होते. मोठे आमचं ऐकणार नाही म्हणता आम्हीही लग्नाला तयार झालो. आता आमच्या घरी लग्नाचा खर्च वधूवराकडचे अर्धा अर्धा उचलतात. बल्लीकडे तसं नव्हतं. सर्व खर्च मुलगीच करते. बल्लीला म्हटलं की, हे तू डॅडींना सांग... पण त्याला भीती वाटत होती की, एवढ्यातेवढ्यावरून काही बिनसू नये. लग्नातल्या मानपानाचा किंवा देण्याघेण्याचा प्रश्‍न नव्हता... कारण दोन्ही घरांत त्याबाबत कुठली प्रथा नव्हती. शेवटी बैठकी होण्याआधी मीच डॅडींना भेटायला गेले. त्यांना आमच्याकडची परिस्थिती सांगितली. या गोष्टीलाही त्यांची हरकत नव्हती. बैठकीत भाषेचा अडसर ठरू नये म्हणून डॅडींनी त्यांच्या मित्रांना तांबोळकर काकांना आणि नाशीकच्या सूर्यवंशी काकांना बोलावून घेतलं. 

त्या वेळेस पप्पांचं म्हणणं होतं की, लग्न ब्राह्मणी पद्धतीनं करू... मात्र आळंदीला करू. लग्न साग्रसंगीत करणार असू तर आळंदीला कशाला करायचं असं आम्हा सगळ्यांनाच वाटत होतं. पप्पांच्या डोक्यात तेव्हा काय सुरू होतं ठाऊक नाही. डॅडींचा कुठल्याही गोष्टीला विरोध नव्हता. रिसेप्शन करू म्हणालात तर करतो किंवा दोन्ही पद्धतीनं लग्न करायचं ठरवलं तर त्यालाही त्यांची हरकत नव्हती. त्या वेळेस बल्लीच्या बहिणीनं लग्न शीख पद्धतीनं करू यात असं सांगितलं. त्या वेळी सूर्यवंशी काकांनी सांगितलं की, लग्नाचे विधी फार वेगळे नसतात. जसे आपण सात फेरे घेतो तसे ते गुरूग्रंथसाहिबभोवती चार फेरे घेतात. मग माझी काकूच म्हणाली, ‘गुरुद्वारात लग्न करून द्यायला ते तयार आहेत... तर मग आपण त्या पद्धतीनं लग्न करू.’ पप्पाही तयार झाले. नाश्ता, जेवण यांत मेनू काय ठेवायचा अशा किरकोळ गोष्टींवरून वाद असं नव्हे पण चर्चा बर्‍याच लांबल्या.

प्रश्न : थोडक्यात फार संघर्ष झाला नाही...
बलविंदर : माझे कुटुंबीय पंजाबात असते तर कदाचित लग्न इतक्या सहजासहजी होणं शक्य नव्हतं... पण इथं आम्हाला आडकाठी करणारं कुणीच नव्हतं. पंजाबमध्ये मामालोकांना वाटत होतं की, आम्ही तिकडं येऊ. स्थायिक होऊ आणि मग माझ्यासाठी तिथलीच मुलगी शोधू. पुण्यातला मुलगा म्हणून त्यांनी तिकडं उगीच एक हवा तयार केली होती. डॅडींनी लग्नाचं कळवल्यावर त्यांच्या फारच थंड प्रतिक्रिया आल्या. डॅडी स्वत: लग्नासाठी तयार होते... त्यामुळं त्यांनी विरोध करण्याचा प्रश्‍न आला नाही... शिवाय केळकर कुटुंबीयांनीही फारच समजूतदारपणे हे सगळं प्रकरण हाताळलं. प्रज्ञाला किंवा मला बोलण्याची संधी तरी दिली. अनेकदा पालक ऐकूनच घेत नाहीत... पण त्यांनी बघू तर मुलं काय म्हणताहेत अशी भूमिका घेतली... त्यामुळं सुरुवातीला थोडी नाराजी राहिली, मनवामनवी करावी लागली तरी ते काही फार अवघड नव्हतं.

प्रज्ञा : कदाचित माझी आई जिवंत असती तर जास्त संघर्ष झाला असता किंवा कदाचित आमचं लग्न झालंही नसतं. बल्लीचं म्हणणं होतं की, घर सोडून लग्न करायचं नाही, कितीही थांबावं लागलं तरी आपण त्यांच्या सहभागानंच लग्न करायचं. आई असती तर तिला मनवणं अवघड गेलं असतं. माझ्या एका चुलत आतेबहिणीनं एका सिंधी मुलाशी लग्न केलं तर त्यावरून आईनं माझ्या आत्याला कितीतरी सुनावलं होतं. मुलांवर लक्ष नाही का? वेगळ्या संस्कारात तिला जमणार आहे का? आणि असं बरंच काही. तिचं बोलणं जिव्हारी लागायचं. ती आत्याला रागावत होती तेव्हा मी मनातून खूपच टरकले होते. आपणही उद्या हेच करणार आहोत आणि आई दुसर्‍यांच्या मुलीसाठी इतका रागराग करतीये तर आपल्यासोबत काय करेल? पण नियतीच्या मनात कदाचित काहीतरी वेगळंच होतं. ती असायला हवी होती असं खूप वाटतं. 

प्रश्न : मग लग्न गुरुद्वारात केलं? त्यांना तुमचा आंतरधर्मीय विवाह आहे हे सांगितलं होतं?
बलविंदर : लग्न शीख पद्धतीनं करायचं ठरल्यानंतर प्रज्ञाच्या घरच्यांना लांब पडू नये म्हणून आकुर्डीतल्या गुरुद्वारात लग्न करायचं ठरलं. गुरुद्वारात जाऊन लग्नाबाबत कल्पना दिली. ती शीख नसल्याचंही सांगितलं. तिथल्या पाठींनी आनंदानं लग्न करण्यास परवानगी दिली. उलट ते म्हणाले, ‘तुम्ही आणि तुमचे कुटुंब आनंदी आहात नाऽ मग झालं तर. लग्नविधीत जे काही म्हटलं जातं ते आम्ही तुम्हाला हिंदीतून सांगू. एरवी ते पंजाबीत असतं... पण मुलीकडच्यांच्या मनात शंका नको की, हे काय पुटपुटत आहेत.’ त्यांनी आमच्यासाठी तेवढा त्रास घेतला. लग्नात, वरातीत तर माझ्या घरचे कमी आणि प्रज्ञाचे नातेवाईक खूप नाचले. आम्ही आता त्याचा व्हिडिओ पाहतो तर त्यांना म्हणतो, ‘हा डान्स बघून कोण म्हणेल मनाविरुद्ध तुम्ही लग्नाला तयार झालता?’ यांच्याकडे वरात प्रकार नाही त्यामुळं इकडं लोकांनी दिलखुलास मजा लुटली... पण मी तर हिंदू पद्धतीची लग्नं पाहिलेली होती. तिच्या घरच्यांनी नव्हती... शिवाय लग्नासाठी तिनं पंजाबी ड्रेस घालणं, हातात चुडा, डोक्यावर ओढणी धरणं. हे सगळं पाहून ते थोडे अवघडले होते.

प्रज्ञा : थोडे नाही चांगलेच अवघडले होते. वरात आल्यानंतर नातेवाइकांनी गळाभेट घेण्याचा ‘मंगनी’ हा प्रकार यांच्याकडे आहे. तेव्हा ते गळ्यात प्लास्टीकच्या फुलांचे हार घालतात. ते पाहूनही माझ्या घरचे म्हणत होते, ‘अरेऽ असले हार तर फोटोला घालतात.’ 

...पण मग त्यांना रिवाज सांगितल्यावर ते गप्प राहिले. माझे काही नातेवाईक तर मुद्दाम धोतराचा पोशाख करून आले होते. मी स्वतःही त्या सगळ्या पेहरावात किंचित अवघडले होतेच. हातात 80 बांगड्यांचा चुडा होता. पंजाबहून पंधराएक जण लग्नासाठी आले होते. त्यांपैकी केवळ आत्यालाच हिंदी बोलता येत होतं. रितीरिवाजानुसार काय करायचं होतं ते सांगायला त्याच सोबत होत्या. खरंतर लग्नाच्या आदल्या दिवशी बल्लीचा छोटा अपघात झाला होता. त्यात हात फ्रॅक्चर झाला होता. माझ्या घरच्यांना टेन्शन आलं की, शकुनअपशकुन काही म्हणाले तर... मनाविरुद्ध लग्न करताय म्हणून असं झालं म्हणाले तर... पण बल्लीच्या घरचे याबाबतही कुल होते. त्यांच्या डोक्यातही हा मुद्दा येणार नाही असं बल्लीनं सांगितलं तेव्हा सर्वच जण शांत झाले. मग लग्नानंतर तीनचार महिन्यांनी मी पंजाबला गेले होते. जाण्याआधी थोडी भीती होतीच. तिकडं हातातला चुडा सव्वा वर्षं ठेवतात. मी तर इथं लगेच काढून ठेवलेला... पण डॅडी म्हणाले, ‘काही नाही, घरात जाण्याआधी बसस्टँडवर हातांत घालत जा. तिथून बाहेर पडलीस की काढून ठेवत जा.’ डॅडींनी कायमच असा पाठिंबा दिला. 

प्रश्न : लग्नानंतर मग खाणंपिणं, राहणीमान अशा वेगळ्या कल्चरमुळं कधी काही खटके उडाले?
प्रज्ञा : कधी तसा प्रश्‍नच आला नाही. घरात जर बाई असती तर दोन बायकांचा संघर्ष होण्याची शक्यता असते. बल्लीची बहीण होती पण ती वयानं लहान असल्यानं तिनं मला कधी कशासाठी दबाव आणला नाही. त्याअर्थी मी एकटी स्त्री असल्यानं ‘हम करे सो कायदा’ असं झालं... पण डॅडी किंवा सुरुवातीला ताऊसुद्धा (आता ते हयात नाहीत) यांनी कधीच कुठल्या गोष्टींचा हट्ट केला नाही. कुठल्या प्रथापरंपरासाठी दबाव आणला नाही. लग्न झालं तेव्हा रेल्वे क्वार्टर्समध्ये होतो. मी नोकरी करत होते. लहान बहीण संध्याकाळचा स्वयंपाक करायची. मी सकाळचा. बल्ली इतर मदत करायचा. ही वाटणी झाली होती. दोनेक वर्षांत तिचं लग्न झालं. डॅडी निवृत्त झाले. आम्ही वारज्याजवळ उत्तमनगरमध्ये भाड्यानं राहायला आलो. माझीही पुढं लोकमतची पूर्ण वेळ नोकरी सुरू झाली. घरी यायला उशीर व्हायचा. तेव्हा संध्याकाळी ताऊ भाजी करायचे आणि डॅडी चपात्या. रात्री मी येईपर्यंत ते अजिबात वाट पाहायचे नाहीत. उलट मी हातपाय धुऊन थेट ताटावर बसायचे. बर्‍याचदा सकाळीही मदत असायचीच.

डॅडींनी अगदी पहिल्या महिन्यातच मला देव्हारा करायचा असेल तर कर म्हणून सांगितलं. शीख धर्मात देव्हारा नसतो. मी छोटा देव्हारा केला. मला माझ्या घरात असल्यासारखं वाटायला लागलं. आम्ही दोन्हीकडचे सण साजरे करायचं ठरवलं. शीख धर्मात खरंतर फार थोतांड नसतात. सण एकदम सुटसुटीत असतात. शिवाय गुरुद्वारात जाऊन माथा टेकवला की पुरे. सणासुदीलाही लोक गुरुद्वारातच असतात. इतकं सोपं.

डॅडींना पुढं त्यांच्या निवृत्तीनंतर जी रक्कम मिळाली त्यांतली निम्मी रक्कम त्यांनी आम्हाला घर घेण्यासाठी दिली. त्यानंतर अंगदचा जन्म झाला. तेव्हाही आई नसल्यानं बाळंतपण कुठं करायचा हा प्रश्‍न होता. पप्पा म्हणाले, ‘आजीला बोलावू, बाई लावू, तू ये इकडे.’ तेव्हा पप्पांची नोकरी सुरू होती. डॅडी मात्र रोज दुपारी उत्तमनगरहून निगडीला यायचे आणि संध्याकाळी जायचे. आजीला काही होत नव्हतं. मेसचा डबा लावलेला होता... बाळंतपणाच्या वेळी सव्वा महिना माहेरी होते त्यावेळी तिन्ही काकू, ताई आणि तिच्या सासूबाई यांनी आळीपाळीने रहायला येऊन हातभार लावला. त्यामुळं सव्वा महिन्याचा आराम असा काही मिळाला नाही... त्यामुळं मी लगेच सासरी गेले. सासरी डॅडी, ताऊ होते... त्यामुळं खूप हायसं वाटलं. डॅडी रोज भाकरी-पालेभाजी करून देऊ लागले. जेवणाची आबाळही थांबली. अंगदला भरवण्यापासून त्याचे शीशू, लंगोटटी धुण्यापर्यंत सगळं काही त्यांनी केलं. तो सहा महिन्यांचा असताना मी कामावर परत रुजू झाले. तेव्हा तर पूर्ण वेळ त्यांनीच लक्ष दिलं. एखाद्या आईनं किंवा सासूनं केलं नसतं इतकं डॅडींनी केलं. अजूनही करत आहेत. त्यांच्या जिवावर घर सोडून तर मी दोन दोन दिवसांच्या, आठवड्यांच्या मुक्कामांच्या असाईनमेंट्‌सही करू शकते.

प्रश्न : डॅडींचं खरंच कौतुक, अंगदलाही त्यांचा चांगलाच लळा लागला असणार! अंगदचेही तुम्ही शीख धर्माप्रमाणे केस वाढवलेत ना... त्यामागं काही विचार?
बलविंदर : डॅडींचे आहेत, माझे आहेत म्हणून त्याचेही वाढवले. त्याला ज्या क्षणी वाटेल की, नको... त्या क्षणी कापून टाकणार... पण आपली संस्कृती त्याला माहीत असावी एवढाच त्यामागं उद्देश. फारच कट्टर श्रद्धेचा मुद्दा नाही. तसं असतं तर लग्नच होऊ शकलं नसतं.

प्रज्ञा : सुरुवातीला मला वाटत होतं की, ठेवू नये. मी तसं याला सांगितलंही. मग नंतर वाटलं की, डॅडींना कदाचित अपेक्षित असेल की, त्यानंही पगडी बांधावी. आम्ही तसं केलं नाही तर कदाचित ते काहीच म्हणणार नाहीत... पण ते इतका मनापासून सगळ्यांचा विचार करतात तर त्यांचंही मन राखायला हवं असं वाटलं. केस ठेवण्यातून धर्माची जपणूक होईल की नाही सांगता येत नाही... पण डॅडींचं मन जपलं जाईल असा भाव होता. डॅडीही म्हणतात, उद्या तो जर फॅशन किंवा कशामुळंही म्हणाला नकोत हे केस... तर लगेच कापून टाकायचे. त्याउपर त्याला काहीही विचारायचं नाही. अंगद हे नावही आम्ही असंच फार शोधून-शोधून ठेवलं होतं. मला फार मोठी मोठी नावं नको होती. मग अंगद हे नाव सापडलं. शीखांच्या दुसऱ्या गुरूंचं नाव आहे आणि हिंदू मिथककथांमध्येही हे नाव सापडतं. प्रत्येक वेळी ताणून चालत नाही. मधला मार्ग काढून पुढं जावं लागतं. 

प्रश्न : मगाशी तू म्हणालीस तुम्ही घरात तीन भाषा बोलता. अंगदला येतात या भाषा?
प्रज्ञा : त्याला तिन्ही भाषा कळतात... पण तो अगदी चार वर्षांचा होईपर्यंत बोलत नव्हता. आम्ही खूप घाबरलो. मी बल्लीप्रमाणेच त्याच्याशी मराठीत बोलायचे. डॅडी आणि बल्ली हिंदीत बोलायचे. पंजाबीही होतीच अधूनमधून. त्याला ते तिन्ही भाषांतलं कळायचं. तो तसा प्रतिसाद द्यायचा... पण मुक्यानंच. मग डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टर म्हणाले, ‘त्याला तिन्ही भाषा कळतात हे चांगलंय पण आपण कुठल्या भाषेत बोलावं हे त्याला कळत नाहीये. कुठला शब्द निवडून उत्तर द्यावं... त्यामुळं तुम्ही त्याच्याशी संवादाची एकच भाषा ठेवा. तो बोलायला लागेल. घरात इतर दोन भाषा त्याच्या कानांवर पडतातच... त्यामुळं तो पुढं त्याही शिकेल. झालं तसंच. आम्ही हिंदीतून त्याच्याशी बोलायचं ठरवलं आणि सहा महिन्यांत तो बोलायला लागला.

प्रश्न : अंगदला दोन्ही कुटुंबांकडच्या खानपान-राहणीमानातला फरक समजू लागलाय का?
प्रज्ञा : होऽ आता आता त्याच्या ते लक्षात येतंय. तो त्यानुसार प्रश्‍नही करतो. पूर्वी मी देव्हाऱ्यातल्या देवांना नमस्कार करायचे आणि गुरूगोविंदांच्या प्रतिमेला नाही... म्हणजे ती प्रतिमा देवार्‍यात नसल्यानं माझ्या ते लक्षात आलं नाही... तर एकदा तोच म्हणाला, ‘तू भगवान में फर्क क्यों करती?’ तो तसं म्हणाल्यानं मग मी जाणीवपूर्वक त्या प्रतिमेलाही नमस्कार करू लागले. सणांच्या बाबतही त्याला गणपतीसाठी मुंबईच्या माझ्या काकांकडे जायचं असतं. सणासुदीला आरत्यांप्रमाणेच आम्ही पंजाबीतला अरदासही करतो.

प्रश्न : त्याच्या शाळाप्रवेशाला अडचण आली?
प्रज्ञा : नाही... पण आम्हाला त्याच्या प्रवेशफॉर्मवर धर्माचा उल्लेख करायचा नव्हता. आम्ही ती जागा कोरी ठेवली... पण शाळा प्रशासन त्याबाबत ऐकूनच घेत नव्हतं. शाळा बदलण्याचा विचारही झाला... मात्र हाच प्रश्‍न सगळीकडे उद्भवला. शेवटी आम्ही मग तिथं जरा घोळ करून ठेवला. धर्म शीख आणि त्यातल्या जातीच्या तिथं हिंदू असं लिहिलंय... त्यामुळं त्याच्या शाळेतल्या रेकॉर्डमध्ये अंगद सिंग, शीख (हिंदू) असं नोंदवलं गेलंय. आम्हाला तर एकही द्यायचा नव्हता... पण ते दोन्ही लिहिल्यानं कदाचित त्याचा प्रभाव शून्य ठरेल अशी आमची भाबडी अपेक्षा.

प्रश्न : ऑक्टोबर 2021मध्ये लग्नाची तपपूर्ती होईल. या बारा वर्षांच्या सहजीवनात तुम्ही एकमेकांविषयी काय जाणलंत?
बलविंदर : एकमेकांविषयी एकच विशिष्ट गोष्ट जाणावी याच्या खूप पुढं आलोय. आम्ही एकमेकांशी कुठल्याही विषयावर बोलू शकतो हा मोकळेपणा आम्ही जपलाय. मैत्री कायम राहिलीये. कॉलेजजीवनातल्या कुठल्या तरी मुलावरून/मुलीवरून आम्ही आजही एकमेकांना चिडवू शकतो. त्यांना भेटायचं ठरलं तर चल तुझ्या सासरी जाऊन येऊ असं म्हणू शकतो. हे अगदी उदाहरणादाखल. भांडणं झाली तरी दुसर्‍या दिवसापर्यंत न्यायची नाहीत हे आम्ही ठरवलंय. नवराबायकोची म्हणून भांडणं झाली की मग आम्ही एकमेकांचे मित्र होऊन त्याच परिस्थितीकडं त्रयस्थपणे पाहतो. ती किंवा मी त्या पद्धतीनं आधार देतो आणि मग आमचं भांडणही मिटतं. कधीतरी प्रज्ञाला म्हणतो, ‘रोज चिंचगुळाची आमटी करतेस. कधीतरी पंजाबी पद्धतीची कांदाटोमॅटोची फोडणी घालून आमटी कर... किंवा पराठे कर...’ पण असं म्हणालो तरी ते काही संकट वाटत नाही. आम्ही जेव्हा एकत्र येण्याचा, राहण्याचा इतका मोठा निर्णय घेतला तेव्हा असल्या छोट्यामोठ्या गोष्टीही गृहीत धरल्या. धरून बसाव्यात इतक्या मोठ्या गोष्टी नाहीतच. आपण नवंनवं ट्राय केलं तर वेगवेगळ्या संस्कृतींशी आपली चांगलीच ओळख होते... मग ती जगण्याची असो वा खाद्यसंस्कृती. पंजाबहून नातेवाईक येतात तेव्हाही हेच सांगणं असतं की, तुम्ही पराठ्यांचा आग्रह करू नका. पूर्वी ते पोहे, उपीट खात नव्हते. आता प्रज्ञा पंजाबला गेली की तिच्यासाठी म्हणून ते करतात. सहजीवनात दोनच माणसं कुठं, असं सगळं कुटुंबच एकमेकांच्या सोबतीनं उभं राहतं तेव्हा ते अधिक अर्थपूर्ण होऊन जातं.

प्रज्ञा : आमच्या नात्यात डॅडींचा रोलही तितकाच महत्त्वाचा आहे. ते कायम पाठीशी राहिले. त्यांच्याइतका प्रेमळ, समजूतदार आणि प्रचंड संयमी माणूस नाही पाहिला. बल्ली, डॅडी आणि आता अंगदही... या तिन्ही पुरुषांमुळं उलट माझं स्त्री म्हणून मुक्त होणं अधिक खुलत गेलंय.

(मुलाखत व शब्दांकन - हिनाकौसर खान)
greenheena@gmail.com


'धर्मरेषा ओलांडताना' या सदरातील इतर मुलाखतीही वाचा

आंतरधर्मीय विवाहित जोडप्यांच्या लेखमालिकेचे प्रास्ताविक : धर्मभिंतींच्या चिरेतून उगवलेल्या प्रेमकहाण्या

विवेकी जोडीदाराची निवड म्हणजे सुंदर सहजीवनाकडं वाटचाल ! - समीना-प्रशांत

आंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव्याच्या जागा... 

Tags: प्रेम आंतरधर्मीय विवाह प्रज्ञा केळकर बलविंदर सिंग हिनाकौसर खान पिंजार हिंदू शीख Prachi Kelkar Balwinder Singh Love Interfaith Marriage Hindu Sikh Couple Heenakausar Khan मुलाखत interview Load More Tags

Comments:

Rushikesh Govind Raul

@asha kulkarni tumchyaa vadilaanche pujya saanegurujinbaabat ajun kaay anubhav hote te jaanun ghyaaylaa aawadel.rushi.raul@gmail.com

नरेंद्र महादेव आपटे 

मी या सदरातील तिन्ही मुलाखती वाचल्या. मला आवडल्या.   हा उपक्रम अभिनंदनीय आहे. वाचकांनी मोकळेपणे या कुटुंबाचे अनुभव वाचावेत. कोणतेही निष्कर्ष काढू नयेत. 

Asha Kulkarni

मुलाखत / लेख खूप आवडला. मी लहानपणापासून "साधना" ची वाचक आहे. माझे वडील पूज्य साने गुरुजींचे शिष्य होते. त्यांचा गुरूजींबरोबर स्वातंत्र्य लढयात सक्रीय सहभाग होता. अमळनेरला प्रताप हायस्कूलमध्ये वडीलांना चार ते पाच वर्ष छात्रावासात गुरूजींचा निकटचा सहवास लाभला. स्वातंत्र्य प्राप्ती नंतर वडील गुरूजींबरोबर मुंबईत आले. साधनेच्या स्थापनेत अगदी पेपरचे गठ्ठे खांद्यावर वाहून आणण्यापासून त्यांचं योगदान होतं. वडील शासकिय अधिकारी असल्याने गोरेगावच्या शासकीय वसाहतीत रहायला मोठी जागा होती. साने गुरू अनेकदा मुक्कामी असत. तेंव्हाची वडीलांनी सांगितलेली आठवण, ही मुलाखत वाचतांना प्रकर्षाने आली म्हणून नमनाला घडाभर तेल ओतलं. वडीलांच्या या घरात राष्ट्र सेवा दलातील कार्यकर्त्यांचे तसेच इतर परिचीतांचे (घरून विरोध असलेले) अनेक आंतरजातीय विवाह स्वतः पुढाकार घेऊन साने गुरुजींनी लावून दिले आहेत, इतकंच नाही तर स्वरचीत मंगलाष्टके म्हणून, आशिर्वाद सुध्दा दिले आहेत.

Pankaj

माझा मित्र शंतनु केळकर याची बहीण आणि जिजु यांची ही कथा मलाही प्रथमच वाचायला मिळाली.खुपच प्रेरनादायी प्रवास

Anjani Kher

आत्ता पर्यंतच्या तीनही उदाहरणात स्त्री हिंदू महाराष्ट्रीय आणि पुरुष अन्यधर्मीय अस दिसत आहे. उलटा प्रकार सापडत नाही का ?

Add Comment