एकमेकांचा सर्वार्थानं स्वीकार करणं हे आनंदानं, समाधानानं राहण्याचं सूत्र...

आंतरधर्मीय विवाह केलेल्यांच्या मुलाखती : 7

महावीर जोंधळे आणि इंदुमती जोंधळे. प्रेमात पडून आणाभाका घेण्याचा क्षण त्यांच्या आयुष्यात आला नाही. परिवर्तनवादी चळवळीतल्या पालकांनी त्यांची भेट घडवून आणली पण योग असाच कुणाच्या-ना-कुणाच्या निमित्तानं जुळून येतो. तसाच तो घडून आला आणि बघताबघता त्यांनी सहप्रवासाचा दीर्घ पल्लाही ओलांडला. या काळात हालअपेष्टा सहन करताना, चढउतारांमध्ये सोबत करताना त्यांची मुळं एकमेकांशी घट्ट होत गेली. इतकी की, प्रेमाची सावली होऊन ते आज एकमेकांची काळजी घेतात. आता आपण भेटायला जातो तेव्हा अगदी सहज बोलता-बोलता त्यांच्यात नोकझोक होते. त्या लुटूपुटूच्या भांडणांत रुसणंफुगणंही ओघानं आलंच. मग बोलता-बोलता भाईंना नावसंदर्भ आठवत नाही ते ताईंना नेमकं माहीत असतं. ताईंना एखादं पुस्तक-कागद सापडत नाही ते भाई बरोबर काढून देतात. कदाचित यालाच मुरत गेलेलं प्रेम आणि पूरक झालेलं सहजीवन म्हणत असावेत.

महावीर जोंधळे हे पत्रकार-संपादक. बालसाहित्यिक आणि लेखक म्हणूनही त्यांचा नावलौकिक आहे. त्यांचा जन्म मराठवाड्यात पिंपळगावलिंगी, जिल्हा उस्मानाबाद इथल्या शेतकरी कुटुंबात झाला. घरची स्थिती हलाखीची होती. वयाच्या चौथ्या वर्षी त्यांच्या डोक्यावरचं पित्याचं छप्पर हरपलं. दोन भाऊ, एक बहिण आणि आई हे त्यांचं कुटुंब. आईनं कष्टानं त्यांना वाढवलं. घरात पारंपरिक कर्मठ वातावरण मात्र पुढे-पुढे त्यांना नामवंत साहित्यिक-विचारवंत शांता शेळके, शिरीष पै, श्रेणिक अन्नदाते, सदानंद रेगे, दामू केंकरे यांचा सहवास लाभला. व्याख्यानं, वाचन यांच्या आणि विचारवंतांच्या प्रत्यक्ष सहवासातून त्यांची वैचारिक जडणघडण होत गेली. औरंगाबादच्या अनंत भालेराव यांच्या दैनिक मराठवाडा या वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून रुजू झाले. इथं अकरा वर्षं पत्रकारिता केल्यानंतर जून 1979मध्ये लोकमतमध्ये रुजू झाले आणि 2001मध्ये लोकमतमधून ते संपादक म्हणून निवृत्त झाले. त्यांनी बालसाहित्य, लघुकथा लेखन, कथालेखन केले. ललित वाड़्मयप्रकारात त्यांची अकरा पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.

...तर इंदुमती जोंधळे या पूर्वाश्रमीच्या इंदुमती जाधव. त्यांचे वडील शिक्षक आणि आई किराणामालाचे दुकान सांभाळायची मात्र वडलांच्या क्षणिक क्रोधामुळं त्यांच्या आईचा मृत्यू झाला. वडलांना तुरुंगवास झाला आणि इंदुमतींना लहान वयात अनाथपण आलं. त्या आणि त्यांच्या पाठची श्रीराम आणि रमेश ही भावंडं या तिघांचीही अनाथालय, छात्रालय इथं रवानगी झाली. कोल्हापूर छात्रालयात दीर्घ काळ राहून त्यांनी बीएबीएड्‌चं शिक्षण पूर्ण केलं. बीएड्‌ होताच कोल्हापूरच्या ‘आंतरभारती’ (सध्याची वि.स. खांडेकर) शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाल्या आणि लग्नानंतर औरंगाबादच्या सरस्वती भुवन विद्यालयात इंग्लीश-मराठीच्या अध्यापिका म्हणून पस्तीस वर्षं नोकरी केली. तिथून त्या मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या. ‘बिनपटाची चौकट’ हे इंदुमती यांचे आत्मकथन प्रसिद्ध आहे. 

बेचाळीस वर्षांच्या संसारात सायली आणि मानसी अशा दोन मुलींचा जन्म झाला. दोघींनीही उच्च शिक्षण घेतले. सायलीनं इंग्लीश आणि इतिहासातून एम. ए. झाली आहे. एम. एड. केलं शिवाय मास्टर ऑफ जर्नलिझम ही पदवीही घेतली आहे. आता तिने मार्गच बदलला आहे. अमेरिकेत जाऊन तिने ऑनलाईन बिझनेसमध्ये पाय रोवले आहेत तर मानसीनं हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली. यु.के.ला गेली तिथं तिने एमबीए केलं. आज तिनेही वेगळ्या क्षेत्रात भरारी घेतली आहे.ती आयटी कंपनीत उच्चपदस्थ म्हणून कार्यरत आहे. त्या दोघीही जणी आंतरजातीय विवाह करून आपापल्या आवडत्या जोडीदाराबरोबर आनंदी आहेत. महावीर आणि इंदुमती जोंधळे यांच्या या दीर्घ सहप्रवासाच्या अनुषंगानं मारलेल्या या गप्पा...

प्रश्‍न - महावीर काका, कर्मठ कुटुंबात राहूनही जातिअंताच्या दिशेनं तुमच्या मनाची मशागत कशी होत गेली?
महावीर - मी जन्मानं जैन. माझं कुटुंब अतिशय कर्मठ; धर्मसंस्कृतीला घट्ट धरून असलेलं, विवेक आणि विज्ञानवाद यांच्यापासून खूप दूर असं घर होतं. आई खूप सोवळंओवळं पाळणारी होती. ती अन्य कुणाच्या हातचं पाणीही प्यायची नाही त्यामुळं साहजिकच घरातलं वातावरणही प्रचंड धार्मिक होतं. लहानपणीच वडलांचा मृत्यू झाला त्यामुळं आईनं आणि वडीलधार्‍या भावांनीच वाढवलं. 

वयाच्या आठव्या वर्षी कुंथुलगिरी इथं गुरुकुलात शिकायला गेलो. तिथं आपल्या रीतसर शिक्षणाबरोबरच पूजापाठ, धार्मिक प्रार्थना यांचंही शिक्षण असायचं. मीही त्या प्रार्थना, पूजापाठ शिकलो. त्या गुरुकुलात चार वाजता ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ या प्रार्थनेनं आम्हाला उठवलं जायचं. कानांवर हेही संस्कार घडत होतेच. पुढं चौदाव्या वर्षी शिक्षणासाठी बार्शीला गेलो. तिथं पन्नालाल सुराणा, कर्मवीर मामा जगदाळे असे वेगळ्या विचारांचे, वेगळ्या वाटेचे लोक भेटले. आम्ही विद्यार्थी असल्यानं भेटायला जात असू. त्या वेळी खूप व्याख्यानं ऐकायचो. अमर शेखांपासून शाहीर जंगमस्वामींपर्यंत कित्येकांच्या कार्यक्रमांना हजेरी लावत असू. पुरेशी स्पष्टता नसली तरी या सगळ्यांतून मन आकार घेत होतं. जातधर्माच्या आणि प्रथापरंपरांच्या मुळाशी शोषण आहे हे उमजायला लागलं होतं तरी पक्वता नव्हती. मग नोकरीच्या शोधात मुंबईला गेलो. 

मुंबईला मोठा गोतावळा निर्माण झाला. विठ्ठल उमप, चिं.त्र्यं. खानोलकर, अशोक जी. परांजपे, शांता शेळके, शिरीष पै यांसारख्या प्रागतिक विचारसरणीच्या माणसांचा सहवास मिळाला. त्याचा खोल परिणाम मनावर झाल्यावाचून राहिला नाही. मुंबई मात्र मानवली नाही. तिथं होतो तेव्हा तीर्थंकर नावाच्या जैन मासिकात काम करत होतो आणि त्यादरम्यान साधना साप्ताहिकात लहान मुलांसाठी लेखनही करत होतो. मुंबईतून परत आंबेजोगाईला परतलो. औरंगाबादला येऊन दैनिक मराठवाडामध्ये संपादक अनंत भालेराव यांच्या हाताखाली बातमीदारीला सुरुवात झाली. तेव्हा काही पत्रकारितेचं रीतसर शिक्षण घेतलेलं नव्हतं. उलट अनंत भालेराव आणि बाबा दळवी यांच्या हाताखाली राहून जे शिकता आलं ते पुढं आयुष्यभर पुरलं. ही दोन्ही माणसं पत्रकारितेतली विद्यापीठंच होती. तिथंच मग या कामाची आवड लागली. काय वाचावं, काय वाचू नये याची समज या संपादकांनी विकसित केली. पुढं समाजात मिसळून पत्रकारिता करताना एकूणच दृष्टीकोन रुंदावत गेला. त्यातूनच नेमका विचार आणि भूमिका स्पष्ट आणि ठाम होत गेल्या. 

प्रश्‍न - इंदूताई तुमचं बालपण खडतर गेलं... मात्र चांगल्या माणसांचा सहवासही तुम्हाला लाभला... त्या एकूण अनुभवाविषयी काय सांगाल?
इंदुमती - अनाथपण विसरायला लावणारी चांगली माणसं लाभली यासाठी मी स्वतःला भाग्यवानच समजते. अनाथपण खूप अचानकपणे येऊन ठेपलं. आंबेजोगाई तालुक्यात वरवंड हे माझं मूळ गाव. माझ्या आईवडलांचा त्या काळात आंतरजातीय विवाह. दोघांनी पळून जाऊन लग्न केलं होतं. माझे वडील शिक्षक होते. त्यांनीच गावात पहिली शाळा काढली होती. मी घरात थोरली. माझ्या पाठी दोन भाऊ, एक बहीण. आमचं जीवन सुखी, आनंदी होतं. वडलांचं एक वैगुण्य होतं ते संतापी स्वभावाचे होते. मी साधारण आठेक वर्षांची असताना घरगुती कारणांवरून वडील आईवर प्रचंड चिडले. त्याच भरात त्यांनी आईच्या पाठीत जात्याचा खुंटा मारला पण तिचं डोकं जाऊन जात्यावरच आपटलं. ती रक्तबंबाळ झाली. गावकर्‍यांनी तिला आंबेजोगाईच्या दवाखान्यात चारपाच दिवसांनंतर तिचे प्राण गेले. इकडे वडील स्वतःहून पोलीस स्टेशनात हजर झाले. 

एका क्षणात आम्ही पोरके झालो. पुढं त्यांना जन्मठेप झाली. नातेवाइकांनी मात्र आमची आबाळ केली. त्यामुळंच दूधपित्या तान्ह्या बहिणीचा मृत्यू झाला. वडलांना आमच्या भविष्याची चिंता होतीच. त्यांनीच जेलरसाहेबांची मदत घेऊन रिमांड होममध्ये आम्हाला भरती करण्यासाठी प्रयत्न केले. आमच्या शिक्षणाची सोय व्हावी हा त्यांचा मूळ हेतू होता मात्र यामुळं बहीणभावांची ताटातूट झाली. कोल्हापूर, शिरूर, औरंगाबाद इथली छात्रालयं, समाजकल्याणची वसतिगृहं इथं राहून शिक्षण घेतलं. अकरावीपर्यंत छात्रालयात शिक्षण घेतलं. तिथून पुढे औरंगाबादला  बीए केलं. सेवाग्रामला बी.एड. करताना गांधींच्या सुनेचा सहवास मिळाला. 

आपल्याला कुणीही सांगणारं, शिकवणारं नाही म्हटल्यावर टीपकागदासारखं लोकांकडून निरनिराळ्या गोष्टी टिपत गेले. आपल्याला आचारविचार नाही असं कुणी म्हणू नये म्हणून धडपडत राहिले. डॉ.गजानन गायकवाड, पद्मविभूषण अण्णासाहेब सहस्रबुद्धे, मामा क्षीरसागर, राष्ट्रसेवा दलाचे श्यामराव पटवर्धन, एस.एम. जोशी, भाई वैद्य यांच्यासारख्या थोरामोठ्यांचं प्रेम, संस्कार, मार्गदर्शन लाभलं. गायकवाडकाकांनी वाचनाची आवड लावली. योग्य वयात योग्य माणसं मिळाल्यामुळं अनाथपण विसरायला मदत झाली. भलीबुरी माणसं भेटली, कटू आणि गलिच्छ अनुभव आले मात्र त्या सगळ्यांतूनच धीटपणा आला. 

प्रश्‍न - आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह करण्याचा विचार दोघांच्याही मनात आधीच होता का?
इंदुमती - माझं कशाचंच काही ठरलेलं नव्हतं. लग्न ठरलं तेव्हा नुकतंच बीएड्‌ होऊन नोकरीला लागले होते. मी शिवाजी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात राहून बहिस्थ विद्यार्थिनी म्हणून एमए इंग्लीशचा अभ्यासही करत होते. नोकरीतून चार पैसे येतील, भावंडांसोबत घर करून राहता येईल एवढाच विचार मनात होता. लग्नासंबंधी कसलाच विचार नव्हता.

महावीर - माझं तसं ठरलेलं होतं. मला जातीत विवाह करायचा नव्हता. या अनुषंगानं आमच्या आजोळकडं प्रथा सुरू झाली होती. माझे मामा कट्टर गांधीवादी होते. त्यांच्या मुलानं - मामेभावानं - आंतरधर्मीय विवाह केला होता. मी अगदी चौदापंधरा वर्षांचा होतो तेव्हा आणि ते खूप आनंदानं गुण्यागोविंदानं राहत होते. माझ्या डोळ्यांसमोर हा आदर्शही होता. पुढं मला आणि इंदूलाही गांधी जगलेली माणसं भेटली. गांधींना नुसतं पाहिलेली नाहीत तर गांधीविचारांना आतपर्यंत झिरपवलेल्या माणसांचा सहवास लाभला. गांधी कधीही सजातीय विवाहाला जायचे नाहीत त्यामुळं यातूनच आपल्याला प्रथापरंपरांमध्ये अडकायचं नसेल तर ते मोडावं लागेल हे पक्कं झालं होतं. 

प्रश्‍न - मग तुम्हा दोघांना एकमेकांविषयी कुणी आणि कसं सांगितलं?
महावीर - माझा आंतरजातीय/आंतरधर्मीय लग्न करण्याचा विचार जगजाहीर केला होता. दरम्यानच्या काळात मी आणि इंदूचा भाऊ श्रीराम, आम्ही दोघं युवक क्रांतिदलाच्या चळवळीतले कार्यकर्ते मराठवाडा आंदोलनात व नामांतर चळवळीत बरोबर राहून काम केलेले मित्र म्हणून परिचित होतो... त्यामुळं आम्ही एकमेकांशी लग्न करण्याबाबत विचार करायला हरकत नाही असा एक प्रस्ताव आला. तिच्याबाबतचे सर्व निर्णय तिचं पालकत्व घेतलेले अण्णासाहेब सहस्रबुद्धे घेत असल्याचं माहीत झालं. ते अणीबाणीचं वर्ष होतं. माझे पालक अनंतराव भालेराव हे नाशीक तुरुंगात जिल्ह्यात होते मात्र त्यांनी तुरुंगातूनच या लग्नसंदर्भात अण्णासाहेबांना एक पत्र लिहिलं होतं. सर्वोदय नेते गंगाप्रसाद अग्रवाल यांनीही एक पत्र धाडलं होतं. निर्णय घेण्यासाठी प्रत्यक्ष भेट आवश्यक होतीच. 

दरम्यान त्याच वेळी मला कोल्हापुरात जाण्याची संधी मिळाली. कोल्हापुरात राज्य नाट्यमहोत्सवाचा परीक्षक म्हणून नेमणूक झाली होती. पंधरा दिवसांचा मुक्काम तिथं होणार होता. 

इंदुमती - मला श्रीरामचं पत्र आलं होतं... तुझ्यासाठी एक मुलगा बघितला आहे अशा आशयाचं. अनंतराव भालेराव यांच्या पत्रात महावीरविषयी जिव्हाळा होता. त्याच वेळी नाशीक तुरुंगातून डॉ. बापू कळदाते यांचंही पत्र आलं. माझ्या परिवारातला हा मुलगा हुशार आहे, कर्तबगार आहे. चहूबाजूंनी पत्र यायला लागल्यानं मी गोंधळले. योगायोग की आणखी काय... 1976मध्ये महावीर कोल्हापुरात परीक्षक म्हणून आले. माझ्या पालकांना भेटले. अण्णासाहेब, गायकवाडकाका, पटवर्धनकाका सगळ्यांनाच. लग्न मला निभवायचं असल्यानं याबाबत माझा विचारही महत्त्वाचा आहे असं अण्णासाहेबांनी सांगितलं. त्यानंतर आम्ही भेटलो.

मी त्यांना विचारलं, ‘माझा इतिहास-भूगोल तुम्हाला माहीत आहे का?’ त्यांनी सांगितलं, ‘श्रीरामकडून मला सर्व समजलं आहे. नियतीमुळं आलेले भोग भोगावेच लागतात.’ त्यावर मी, ‘तरीही माझ्यासारख्या अनाथ आणि घरदार, आईवडील नसलेल्या मुलीशी लग्न करणार? का? उपकाराच्या भावनेतून हे लग्न करणार असाल तर त्याचाही विचार करून घ्या. उपकाराचं ओझं बाळगून मला मुळीच जगायचं नाहीये. शिवाय तुमच्या घरातून आंतरजातीय लग्नाला विरोध आहे. या सगळ्याचा नीट विचार करा... की, मी दिसायला जरा बरीये, त्यात मिळवतीये... म्हणून लग्न करताय.’ असं मी खूप बोलून घेतलं. तोवर आमच्या चारपाच भेटी झाल्या होत्या. त्यांनी असं काहीच नसल्याची स्पष्टता दिली. आम्ही समाजवादी, सर्वोदयी विचारांच्या माणसांत वाढल्यामुळं आमचे विचार जुळतील याची खातरी पटली शिवाय त्यांचा स्वाभिमानी, कष्टाळू आणि सरळ स्वभाव पाहून मीही होकार दिला... मात्र एक महत्त्वाची अट घातली. मी नोकरी सोडणार नाही. माझ्या मनात भीती की, उद्या जर लग्न नाही टिकलं तर मला कशाचा आधार...? आपलं आर्थिक स्थैर्य सोडणं मला मान्य नव्हतं. त्यांनी तेही मान्य केलं आणि... 

प्रश्‍न - आणि मग तुम्ही लग्न केलंत?
इंदुमती - 30 डिसेंबर 1976ला अत्यंत साध्या पद्धतीनं आम्ही लग्न केलं. थाटामाटाच्या लग्नाचा विचार आम्हा दोघांचाही नव्हता.

महावीर - फक्त 27 रुपयांत लग्न झालं. रजिस्टर पद्धतीनं लग्न केलं आणि संध्याकाळी मराठवाडा साहित्य परिषदेत जवळच्या मित्रांना अल्पोपाहार दिला त्यासाठी जो काही खर्च झाला तेवढाच.

इंदुमती - लग्नानंतर आम्ही सर्वात आधी नाशीकच्या जेलमध्ये गेलो. आमचं पालकत्व घेतलेली माणसं तर तुरुंगातच होती. त्यांची भेट घेण्यासाठी आणि आशीर्वादासाठी आम्ही तिथं गेलो.

प्रश्‍न - लग्नानंतर सहजीवनाला कशी सुरुवात झाली? सुरुवातीचे दिवस कसे होते?
इंदुमती - अडीच खोल्यांच्या भाड्याच्या घरात आमचा संसार सुरू झाला. संपूर्ण घर त्यांच्या माणसांनी भरून गेलं होतं. लहानपणापासूनच माणसांची, प्रेमाची भुकेली मी एवढी नाती एकत्र पाहूनच स्वतःला भाग्यवान समजत होते. नंतर घरात उरलो आम्ही दोघं आणि सासूबाई. आता माझाही संसार सुरू झाला. आठदहा प्लास्टीकचे, पत्र्याचे डबे; एक भरार्‍या स्टोव्ह; पाणी साठवण्याची पितळेची हंडाकळशी; पितळेचीच चारपाच ताटं, वाट्या, तांबे; एक लोखंडी पलंग, गादी; अंथरुणं, पांघरुणं... बस्स! जरुरीपुरत्या चीजवस्तू. स्वतंत्र बाथरूम, सार्वजनिक संडास. संसाराला अजून काय लागतं? खूश होते मी. वयाची 22-23 वर्षं मी अनाथाश्रमात घालवली होती पण आता मी माझ्या हक्काच्या घरात सुरक्षितता अनुभवत होते. महावीरांचं प्रेम मला जगण्याचं बळ आणि उमेद देत होते. माझ्या भावांनाही बहिणीचं हक्काचं घर झालं. मी खूश होते. लग्नानंतर पंधरा दिवसांतच मी कोल्हापूरला निघून गेले होते. त्या पंधरा दिवसांत मी एकाही कामाला हात लावला नव्हता म्हणजे सासूबाई-जाऊबाईंनी आणि इतरांनी काहीच करू दिले नाही. नवी नवरी म्हणून काम करू दिलं नाही असा विचार मी केला.

...मात्र सहा महिन्यांनंतर औरंगाबादच्याच सरस्वती भुवन शाळेत माझी शिक्षक म्हणून नोकरी पक्की झाली आणि मी औरंगाबादला आले. आता माझ्या घरात मी हक्कानं राहणार असाच माझा विचार होता पण परतल्यावरही सासूबाई कशालाच हात लावू देईनात. बाहेरची खोली झाड, अंगण झाडून सडासारवण कर, रांगोळी काढ, संडास-बाथरूम धू अशी कामं त्या सांगत होत्या आणि मी आनंदानं करत होते. मी पाणी मागायच्या आत त्या ग्लास भरून खिडकीत ठेवायच्या. स्वयंपाक खोलीत येऊच द्यायच्या नाहीत. माझी ताटवाटी वेगळी. जेवताना वरून वाढायच्या. मला सुरुवातीचे चारआठ दिवस लक्षातच नाही आलं त्यांचं वागणं पण नंतर महिना उलटला, दोन महिने झाले. जणू मी त्यांच्या दृष्टीनं अस्पृश्यच होते. कामावरून आल्याबरोबर अंग चोरून बाथरूममध्ये जायचं. सगळे कपडे भिजवायचे. पिळून वाळत घालायचे. मग त्या मला माझ्या ठेवलेल्या कपात चहा करून द्यायच्या. 

मला खूप त्रास होत होता. आतल्या आत घुसमट होत होती पण मी पुन्हा माझी समजूत घालत होते. डोक्यावर हे छप्पर तरी आहे. प्रेमळ जोडीदार तरी आहे. दुसरं मन म्हणायचं, इथंही उपरीच आहेस. वाटायचं की, महावीरना हे सगळं सांगावं पण धीर व्हायचा नाही. मायलेकराचं भांडण नको होतं पण एक दिवस रविवारी महावीर जेवायला घरी थांबले. त्यांनी स्वतः हा प्रकार पाहिला. जेवणानंतर मला जवळ घेऊन त्यांनी विचारलं, ‘हे असं कधीपासून चालू आहे?’ 

‘तुमच्या घरात आल्यापासून...’ मी सांगितलं आणि माझ्या डोळ्यांतून घळाघळा अश्रुधारा वाहायला लागल्या. दुसर्‍या दिवशी महावीरच त्यांच्या आईला म्हणाले, ‘आईऽ आजपासून आम्ही दोघं एकाच ताटवाटीत जेवणार आहोत.’ 

त्या दुखावल्या पण त्यानंतर भाजी-पोळी, भाकरी ताटावरून न पडता नीट व्यवस्थित वाढली जायला लागली. सासूबाई काही कायमस्वरूपी राहिल्या नाहीत मात्र ते ओरखडे उमटलेले तसेच राहिले.

प्रश्‍न - सासूसुनेतलं अंतर कधी कमी झालं?
इंदुमती - अठरावीस वर्षं जाऊ द्यायला लागली. तसं त्यांनी मला कधीही शब्दानं दुखावलं नाही मात्र त्यांच्या वागण्यात प्रचंड सोवळेपणा होता. माझ्याचबाबत असं नाही तर महावीर यांचा मित्रपरिवार आल्यानंतरही त्या चहाचे कप हातात न देता त्यांच्या पायाशी ठेवायच्या. तो त्यांच्या संस्काराचा भाग होता. त्या माझ्या खरोखरच आई झाल्या. त्यांच्या शेवटच्या दहा वर्षांत त्या सर्वाधिक आमच्याकडंच राहिल्या. संपूर्ण काळात महावीरचा खंबीर-प्रेमळ आधार आणि माझी सहनशील चिकाटी यामुळं ते अंतर कापून पुढं जाण्यात आम्हाला यश आलं.

प्रश्‍न - माहेर नाही आणि कर्मठ सासूबाई अशा स्थितीत बाळंतपणं कुणी केली?
इंदुमती - लग्नाच्या दोन वर्षांनंतर पहिली मुलगी झाली. त्या वेळेस आम्ही सासूबाईंना बोलावून घेतलेलं होतं. अर्थात त्यांच्या वागण्याचा जाच व्हायचा मात्र आयतं जेवायला तरी मिळतंय अशी भावना होती. दुसरी मुलगी पाच वर्षांची झाली तेव्हा आम्ही एक सोबतीण घेतली. तोवर खरंतर बरंचसे सेटल झालो होतो. 

प्रश्‍न - संसाराला स्थैर्य येईपर्यंत अनेकदा एकमेकांना समजून घेण्याचे, आर्थिक स्वातंत्र्यासंबंधीचे काही अणीबाणीचे प्रसंग येतात... तुम्हाला असे काही अनुभव आले का?
महावीर - सायलीचा जन्म झाला तेव्हा माझा पगार दोनशे रुपये आणि इंदूचा चारशे होता पण आम्ही कधीही एकमेकांच्या कुठल्याही स्वातंत्र्यात, निर्णयात लुडबुड केली नाही. आम्हाला पुस्तकांची आवड होती त्यामुळं दागदागिन्यांचा, सोन्याचा असा काही सोस तिला नव्हता. उलट आमच्या घराचं भाडं दरवर्षाला वाढायला लागलं तेव्हा इंदूनं तिच्या शाळेच्या सोसायटीमार्फत सोडत पद्धतीनं एक प्लॉट मिळवला होता. त्यासाठी दरमहा थोडेथोडे पैसे करून तिनं त्या प्लॉटचे पाच हजार रुपये भरले. तोवर मला याबाबत काहीही माहीत नव्हतं. मग एक दिवशी तिनं जाहीर केलं की, आता आपण आपल्या स्वतःच्या मालकीच्या घरात राहायला जायचं. तीनेक महिन्यांत तिथं मोठं घर बांधलं. आमचा गोतावळाही खूप. 

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून पत्रकार-लेखक मंडळी यायची. आनंदानं राहायची. इंदू कायमच एखाद्या अनाथ, गरजू विद्यार्थ्याला शिकण्यासाठी दरवर्षी ठेवून घ्यायची. मुली म्हणतात नाऽ आम्ही फक्त चौघंच असू असं कधीच झालं नाही. कायमच घर माणसांनी भरून राहिलं. मुलींवर तोच संस्कार झाला. 2001नंतर मी पुण्यात आलो तेव्हा तिची नोकरी बाकी होतीच. पुढची बारा वर्षं मी पुण्यात, ती औरंगाबादला असा संसार केला. सुरुवातीपासूनच माझ्या फिरस्तीला, माझ्या पत्रकारितेच्या अस्थिर कमाईला तिनं कधीही बाधा आणली नाही. 

इंदुमती - ‘माणूसपण’ सदैव जागृत ठेवून अखंडपणे प्रेमाची सावली देणारा जोडीदार असला की अडचणींचा सामना आनंदानं करता येतो. सासूबाई गेल्यावर स्वयंपाकपाण्याला सुरुवात झाली. छात्रालयात शंभर-दोनशे जणांचा स्वयंपाक करायची सवय मला होती त्यामुळं सुरुवातीला दोघांपुरतंच किती करायचं हे लक्षात यायचं नाही. बर्‍याचदा स्वयंपाक खूपच जास्त व्हायचा. मग यांनीच जर्मलच्या डब्यात पातेली ठेवून वाटीच्या अंदाजानं वरणभात कसा लावायचा हे शिकवलं. महावीर उत्तम स्वयंपाकी असल्यानं बारीकसारीक अनेक गोष्टी त्यांनी मला शिकवल्या. नोकरी, धावपळ होतीच पण त्यातही मला हे नाटक दाखवायचे. संगीत मैफलीला पाठवायचे. औरंगाबादेत जे-जे उत्तम सिनेमा-नाटक-संगीत ते आम्ही पाहायचो, ऐकायचो. काही वेळेला ते मला नाटकाला पाठवायचे आणि स्वतः मुलींना सांभाळायचे. 

सुरुवातीला मी कोल्हापुरात असताना आम्ही एकमेकांना पत्र लिहायचो. मी लिहू शकते असा विश्‍वास कदाचित तेव्हाच त्यांना वाटला. ते सतत लिहिण्यासाठी आग्रह करायला लागले. मला लिहितं करण्यासाठी उत्तम साहित्य आणि महत्त्वाची स्त्री-आत्मकथनं वाचायला आणून द्यायचे. त्याच प्रेरणेतून मी ‘बिनपटाची चौकट’ हे आत्मचरित्र लिहिलं. या पुस्तकानं माझी स्वतंत्र ओळख करून दिली. या पुस्तकाचं खूप कौतुक झाल्यानंतर त्यांचे साहित्यिकमित्र त्यांची चेष्टा करायचे की, मी आता लेखिका झाले तर ते चटकन म्हणायचे, ‘माझा कधीही ‘अभिमान’ होणार नाही. उलट बायकोनं लिहावं म्हणून ते आजही माझ्या मागं लागतात.’ आजवर संपादक, लेखक, पत्रकार म्हणून माझ्या लेखनात त्यांनी कधीच हस्तक्षेप केला नाही. 

प्रश्‍न - आणि तुमचा हा गोड संसार मुली पाहतच होत्या...
इंदुमती - हो. मुलीही खूप प्रेमळ आणि माणसांमध्ये रमणार्‍या झाल्या. त्यांनाही खूप माणसं लागतात. लहानपणापासून उंचीनं, पदानं मोठ्या माणसांपासून सर्वसामान्य गरीब शिकणार्‍या मुलांपर्यंतची माणसं अनुभवत वाढल्यानं त्याही माणसांत रमतात. जातील तिथं गोतावळा करतात. आम्ही कुठलाही जातधर्म मानत नाही त्यामुळं त्यांनी जेव्हा त्यांच्या आयुष्याचे जोडीदार निवडले तेव्हा आम्हालाही त्यांच्यातलं माणूसपणच महत्त्वाचं वाटलं. उलट मुली सुंदररीत्या संसार करताहेत हे पाहून अभिमानच वाटतो. दोघींनाही भरपूर शिकवलं. त्या आज स्वतंत्र, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. 

प्रश्न - 60-70 च्या दशकातील परिवर्तनवादी जनचळवळींमुळे त्याकाळी आंतर-जातीय, आंतर-धर्मीय विवाह जाणीवपूर्वक घडत होते का? अलीकडच्या काळात अशा लग्नांची स्थिती काय दिसते?
इंदुमती - 60-70 च्या दशकातील युवक क्रांती दल, छात्र युवा संघर्ष वाहिनी यांसारख्या अनेक चळवळी सक्रीय होत्या. 1960 नंतरच्या काळातील सामाजिक चळवळीत आलेल्या तरुण तरुणींवर परंपरावादी सामाजिक विचारापेक्षा वेगळं कांही आपल्या हातून घडावं ही जिद्द वा इछ्या जाणवत होती. त्यातूनच आंतरधर्मीय व आंतरजातीय लग्न करण्याची प्रेरणा मिळत होती. त्याला आर्य समाज या वेगळ्या मार्गाने काम करणाऱ्या संस्थेचा पाठींबा मिळत होता. हैद्राबाद संस्थानाच्या कार्यकक्षेत त्या संघटनेचे काम सुरु होते. त्यामुळे जात-पात, धर्म यांच्या पलिकडे जाऊन लग्न करणाऱ्या तरुणाईची संख्या वाढत होती. ही सर्वसमावेशक समाजासाठी महत्त्वाची बाब होती. मराठवाडा प्रदेश या चळवळीत आघाडीवर होता.

दोन वेगवेगळ्या संस्कृती, परंपरेतून एकत्र आलेला संसार चांगल्या पध्दतीने होत असल्याचा इतिहास या चळवळीला लाभला. तरुणाई आपला जीवनसाथी अशा पध्दतीने निवडतो तेव्हा परस्परावर टाकलेल्या विश्वासावर श्रध्दा ठेवून दोघांच्याही आवडी निवडी जपल्या तर यश मिळू शकतं, हे आजच्या तरुणाईने लक्षात घ्यायला हवं. जीवनसाथीने आपल्याच विचारानं राहावं याचा आग्रह धरता कामा नये. आपणा दोघांनाही सहजीवनाचे स्वातंत्र्य दिले तर, कुंडली न बघता केलेले हे लग्न यशस्वी होतात हे त्या काळानेच दाखवून दिले होते.

प्रश्‍न - आंतरधर्मीय विवाहांचं काय महत्त्व वाटतं?
महावीर – लव्ह मॅरेजेसच्या माध्यमातून आंतरधर्मीय विवाह होतात ही चांगली गोष्ट आहे मात्र केवळ तेवढंच होऊन चालणार नाही. अतिशय समंजसपणे ठरवूनही असे विवाह व्हायला पाहिजेत. कट्टर आणि जातीय विळख्यातून समाजाची मुक्ती करायची असेल तर त्यासाठी जाणीवपूर्वक अशी लग्नं व्हायला हवीत. तरच आंतरधर्मीय विवाहांचं प्रमाण वाढीस लागेल आणि त्याचा अपेक्षित परिणाम साधता येईल. हे घडवून आणण्यासाठी काय करता येईल... तर वर्षातून एखाद्या वेळेस तरी आंतरधर्मीय विवाहितांचे मेळावे भरायला हवेत. तरुण, मुलं जी या पथावर येऊ पाहतात; ज्यांचा गोंधळ आणि शंका दूर करायला हव्यात त्यांच्यासाठी असे मेळावे मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरतील. 

इंदुमती - औरंगाबादला असताना पूर्वी असे मेळावे व्हायचे. त्यांतून कित्येक जणांना आम्ही मदतही केली आहे. आमचं घर हे हक्कानं लपून राहण्याचं ठिकाणही झालं होतं. 

प्रश्‍न - अरेंज मॅरेज, त्यातही आंतरधर्मीय. अशा लग्नाची 40-42 वर्षं समाधानानं आनंदानं पूर्ण होणं आणि हा प्रवाह असाच वाहत राहणं याचं श्रेय नेमकं कुणाला?
महावीर - आनंदानं, समाधानानं राहण्याचं एक सूत्र म्हणजे एकमेकांचा सर्वार्थानं स्वीकार करणं. आम्ही एकमेकांच्या कामात कधीच अडथळे आणले नाहीत. एकमेकांशी विनाकारण भांडत राहण्यासाठी तुमच्याकडं फुकट वेळ असावा लागतो. आम्ही पूर्वीही बिझी असायचो आणि आत्ताही स्वतंत्रपणे बिझी असतोच. आमचे व्याप इतके होते की, त्यांतून भांडणाला, एकमेकांची उणीदुणी काढायला वेळच नव्हता. इंदू तर निवृत्त होऊन आली आणि त्यानंतर तिला पुन्हा लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमासाठी पाच वर्षांची वाढ मिळाली. ती दोन दिवसांचं सांगून जायची आणि पुढं जवळपासच्या इतर गावकर्‍यांनी आग्रह केला की पुन्हा दोन दिवस राहायची पण आमचे एवढ्यातेवढ्यावरून खटके उडाले नाहीत. मला गाणी ऐकायला आवडतात आणि तिला कधीही उठून पुस्तक वाचायला. माझ्या खोलीत सतत धीम्या आवाजात गाणं सुरू असतं आणि तिच्या खोलीत तिच्या हाताशी असतील अशी पुस्तकं. एकमेकांच्या पायांत गुंता न करताही आपल्याला एकमेकांच्या सोबतीनं छान जगता येतं. 

(मुलाखत व शब्दांकन - हिनाकौसर खान)
greenheena@gmail.com


'धर्मरेषा ओलांडताना' या सदरातील इतर मुलाखतीही वाचा

आंतरधर्मीय विवाहित जोडप्यांच्या लेखमालिकेचे प्रास्ताविक : धर्मभिंतींच्या चिरेतून उगवलेल्या प्रेमकहाण्या

विवेकी जोडीदाराची निवड म्हणजे सुंदर सहजीवनाकडं वाटचाल ! - समीना-प्रशांत

आंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव्याच्या जागा... -  श्रुती - इब्राहीम

सहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण ! - प्रज्ञा - बलविंदर

दोन्ही घरची (भारतीय) संस्कृती सारखीच! - अरुणा - अन्वर

छोट्या-छोट्या रूढी परंपरांना नाकारतच आपण मोठ्या बदलांकडं पाऊल टाकत असतो - दिलशाद - संजय

चांगल्या जोडीदाराची निवड आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय, हे आमच्या दीर्घ सहजीवनाचे रहस्य - हसीना - राजीव

Tags: मराठी प्रेम आंतरधर्मीय विवाह इंदुमती जोंधळे महावीर जोंधळे हिनाकौसर खान पिंजार हिंदू जैन धर्मरेषा ओलांडताना Indumati Jondhale Mahavir Jondhale Love Interfaith Marriage Hindu Jain Couple Interview Heenakausar Khan Load More Tags

Comments: Show All Comments

लक्ष्मी गायकवाड

आई बाबा,म्हणजे माझं चालत बोलत विद्यापीठ आहे,आई सतत मला स्वतःला खंबिरपणे लढायला शिकवते आणि बाबा खूप छान समजावून सांगतात आमच्या उद्याच्या पिढीच्या हातात संस्काराची शिदोरी देत आहे .खूप प्रेरणादायी आहेत बाबा आई आभाळाएवढी माणस

AMIT RAVIKIRAN MHAISEKAR

MADAM INDUMATI WAS MY TEACHER WHEN I WAS IN SARASWATI HIGH SCHOOL AURANGABAD. I REMEMBER AND CHERISH THE BEAUTIFUL MEMEORIES .God bless her.

Tulsidas Shankar Madas

Be Happy Enjoyful Successful lfieline... Apratim Lekh Ani Sahjivan...

महावीर अक्कोळे.

अतिशय अनुकरणीय आंतरजातीय विवाह. महावीरसर आणि इंदूताई.. दोघांचेही स्वीकृत पालक.. पत्रकार अनंतराव भालेराव आणि कर्मवीर समाजसेवक अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे दोघेही खरच थोर व्यक्तिमत्त्वे होती. प्रेमविवाहात घरच्यांशी पंगा घेऊनच बहुतेकदा आंतरजातीय विवाह होतात;पण या थोर पालकांनी घडवून आणले तसे "ठरवलेले आंतरजातीय विवाह.. Arranged Intercast Marriages " मोठ्या प्रमाणावर आणि सर्वमान्य व्हायला हवेत असे वाटते. खूप सुंदर मुलाखत झाली आहे. अभिनंदन !

विष्णू दाते

अत्यंत प्रांजळपणे आणि सुंदरपणे व्यक्त झालेल्या सहजीवनाची वाटचाल!

Ramesh Shahapurkar

धन्यवाद ,सुंदर सहजीवन .आजकाल आंतरधर्मीय लग्न होतात ती विशिष्ट धर्मा ची लोकसंख्या वाढवण्यासाठी. यात कुठलीही बांधीलकी वैगेरे नसते. या विषयी विचार वाचायला आवडतील.

Add Comment