विवेकी जोडीदाराची निवड म्हणजे सुंदर सहजीवनाकडं वाटचाल !

आंतरधर्मीय विवाह केलेल्यांच्या मुलाखती : 1

आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांच्या मुलाखतींची 'धर्मारेषा ओलांडताना' ही मालिका प्रत्येक महिन्यातील दुसर्‍या आणि चौथ्या रविवारी कर्तव्यवरून प्रसिद्ध केली जाणार आहे. आजच्या द्वेष आणि भीतीच्या वातावरणात तरूणांना आश्‍वस्त वाटावं, त्यांना कमी अधिक प्रमाणात का होईना प्रेम-सहजीवनाविषयी मार्गदर्शन मिळावं आणि आपल्या माणूसपणाच्या जाणिवा अधोरेखित व्हाव्यात हा या  मुलाखतींचा उद्देश आहे.

समीना पठाण आणि प्रशांत जाधव. विचारी, विज्ञाननिष्ठ जोडपं. या दोघांची वर्ष 2004 मध्ये ऑनलाईन मैत्री झाली. आभासी जगात पुरतं गुंतवून टाकणार्‍या समाजमाध्यमांचा अजून उदय झाला नव्हता. इंटरनेटचं जाळंही आजच्या इतकं पसरलं नव्हतं. प्रत्येकाच्या हाती मोबाईल हीसुद्धा तेव्हा स्वप्नवतच भानगड. त्यावेळेस नाही म्हणायला याहू मेसेंजर होता. नवनव्या पण अपरिचित लोकांशी दोस्ती करण्यासाठी तेवढाच काय तो मार्ग होता. अर्थात त्यासाठी पुन्हा सायबर कॅफेसाठी ताशी दहावीस रुपये खर्चण्याची ब्याद मागे होतीच. अशा परिस्थितीत जळगावला असणार्‍या प्रशांत आणि नाशीकला असणाऱ्या समीनाची मैत्री झाली. संपर्काच्या शक्यतांचं गणितही नीट न जुळण्याच्या त्या दिवसांमध्ये हे दोन जीव अंतराच्या-आंतरधर्माच्या सीमा लांघून अलगद एकमेकांच्या प्रेमात पडले...! आणि 2010 मध्ये कुटुंबियांच्या विरोधाला कायदेशीर उत्तर देत विशेष विवाह कायद्यांतर्गत विवाहबद्ध झाले.

समीना मुळची नाशीकची. तिचं मध्यमवर्गीय कुटुंब. कुटुंबात आईवडील, दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. समीना दोन नंबरची. तिचे वडील नाशीकच्या इंडिअन सिक्युरिटी प्रेसमध्ये छोटीशी नोकरी करत होते. आई सातवीपर्यंत शिकलेली. घरचं वातावरण जुन्या वळणाचं, पारंपरिक...नातेवाईकांचा शिक्षणाचा विरोध पत्करत समीनाने बी. एसस्सी, बी. एड् केलं. एका शाळेत नोकरी करता करता एम. एसस्सी केलं. आणि लग्नानंतर  एम. एड्, एम. फील केलं.

तर प्रशांत जळगावचा. त्याचे वडील रावेरजवळच्या एका गावी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक होते. आई दहावीपर्यंत शिकलेली. प्रशांत घरात थोरला. त्याच्या पाठी एक भाऊ, एक बहीण. प्रशांतचं पाचवीपर्यंतचं शिक्षण वडलांच्या शाळेत तर सहावीनंतर पुढं भुसावळच्या नवोदय शाळेत शिक्षण घेतलं. पुढे त्यानं जळगावला इंजिनीअरींग केलं आणि पुण्यात नोकरीसाठी गेला.

नाशीक-जळगाव, खिरोदा-जळगाव, नाशीक-पुणे असं करत करत त्यांच्या प्रेमानं पुण्यात मुक्काम ठोकला. लग्नानंतर दोघंही पुण्यात स्थायिक झाले आहेत. दोघंही सोळा वर्षांची सोबत आणि त्यातल्या दहा वर्षाचं सहजीवन अनुभवत आहेत. आज त्यांच्यासोबत  ईशान आणि इरा अशी दोन मुलं आहेत. या मुलाखतीत दोघांचं प्रेम आणि त्यांच्या आनंदमयी सहजीवनाविषयी जाणून घेऊयात.

प्रश्न : सुरवात तुमच्या जडणघडणीपासून करूयात. प्रत्येकाचं लहानपण आणि त्यावेळेस पाहत असलेला भवताल खूप महत्त्वाचा असतो. तुम्हा दोघांच्या लहानपणाविषयी सांगाल?

प्रशांत : रावेरजवळच्या आश्रमशाळेत वडील मुख्याध्यापक होते. त्यामुळे आम्ही कुटुंबासह त्या तिथंच राहायला होतो. मी घरात मोठा आणि माझ्यानंतर एक बहिण व भाऊ असे आम्ही तिघे. आमच्याप्रमाणे इतरही शिक्षक-कर्मचारी तिथंच राहायला होते. त्यांतले काही तडवी समाजाचे, काही मुस्लीम, काही ख्रिश्‍चनही होते. दर गुरुवारी मुस्लीम कुटुंबीय एका पीरबाबाच्या दर्ग्यावर जायचं. त्यांच्या मुलांसोबत आम्ही सगळीच मुलं जायचो... कारण गोड खायला मिळायचं. पुढे नवोदय शाळेत तर इतर राज्यांतली मुलं सोबत होती. विविध जातिधर्मांच्या मुलांसोबत राहिल्यानं वेगळं अप्रूप वाटावं असं काही उरलंच नव्हतं...

समीना : माझ्या घरी मात्र आईवडलांवर पारंपरिक नातेवाइकांच्या जुनाट विचारांचा प्रभाव होता. मी सातआठ वर्षांची असेपर्यंत मुस्लीम मोहल्ल्यात राहत होते. घर मस्जीदच्या जवळच होतं. आमच्याबरोबर आमचा काकाही राहत होता. त्याचं लग्न झाल्यावर वडलांनी त्या मोहल्ल्यापासून दोनतीन किलोमीटर अंतरावरच्या सोसायटीत एक फ्लॅट घेतला. तिथलं वातावरण आधीपेक्षा एकदमच निराळं. आमचं एकमेव मुस्लीम कुटुंब. तिथं लिंगायत, मद्रासी, शीख, पंजाबी, तामीळ, ब्राह्मण, मराठा अशा सर्व धर्मांतले लोक राहायला होते... त्यामुळं सभोवताल एकदमच बदलला. घरात नमाज-रोजे होत होते. मराठी शाळेतल्या नेहमीच्या शिक्षणाबरोबर अंजुमनमध्ये जाऊन कुराआन वाचायलाही आम्ही भावंडं शिकत होतो. ‘लडक्या शिक्के क्या करनेवाले?’, ‘चुल्लाच संभालनेका है।’ असा विचार करणार्‍या नातेवाइकांनी आम्ही सातवीपर्यंतच शिकायचं असं असं आधीच फर्मान काढलेलं.’

प्रश्न : असं फर्मान काढलेलं असतानाही पुढे शिक्षण कसं झालं? आणि नातेवाईकांनी कधी थेट तुझी, बहिणींची अडवणूक नाही केली?

समीना : वडील स्वतः अल्पशिक्षित होते... त्यामुळं त्यांना आपल्या मुलींनी किमान बारावी-पंधरावीपर्यंत शिकावं असं वाटत होतं... पण संकुचित विचारांच्या मावशी, आत्या, काकू, आजी तिच्या आईवडलांचं डोकं खायच्या... तुम्ही का शिकवता? त्यांच्या अपेक्षा वाढतात. तेवढा शिकलेला मुलगा मिळत नाही. लहानपणी मला सायकल शिकू देत नव्हते... नातलग मंडळी येऊन विचारायची, ‘सायकल कायको शिकती?’ आता मुली विमान चालवतात, कार चालवतात मग आम्ही सायकल चालवली तर काय बिघडलं? भावानं चालवली तर हरकत नाही... का? तर मुलींनी शिकायचं नाही... बस्स! हे उत्तर.

तुम्ही एखाद्या गोष्टीला विरोध करता तेव्हा त्यात काहीतरी लॉजीक हवं ना... तुम्ही जर समाधानकारक उत्तरं दिली तर आम्हीपण मान्य करूच की. आम्हाला काय विरोध करायची हौस आहे का? पण तशी उत्तरं मिळत नव्हती. मुलींनी तर प्रश्‍नच विचारायचा नाही हे दुसरं समर्थन. आम्हाला कुतूहल वाटायचं... एखाद्या गोष्टीची चिकित्सा करावी म्हणून प्रश्‍न करायचो... पण नातेवाईक त्याचा वेगळाच अर्थ काढायचे. त्यांना वाटायचं की, आम्ही ‘शिकतोय’ म्हणून अशी उलट उत्तरं देतोय. एक तर बुद्धीला पटतील अशी समाधानकारक, नीट उत्तरं आमच्या प्रश्‍नांना देण्यास ते असमर्थ असायचे आणि वर आम्हालाच गप्प करायचे. यातून माझी घुसमट व्हायची.

थोरल्या बहिणीचं लग्न होईपर्यंत तरी माझ्या शिक्षणाची वाट मोकळी होती. कॉलेजही घरापासून जवळच्या अंतरावर होतं. तिथून केमिस्ट्रीमधून बीएस्‌स्सी केलं. एमएस्‌सीसाठी मिळालेलं कॉलेज नाशीकमध्येच होतं पण घरापासून दूर होतं. बसने कशी जाणार. एकटी कशी जाणार असे प्रश्न छळायचे त्यांना. मग शिक्षण थांबलं... पण मला रिकामं बसून राहण्यात आनंद नव्हता.   किमान नोकरी तरी करते सांगून परवानगी मिळवली. ओळखीच्या ताईच्या माध्यमातून मला सायबर कॅफेत नोकरी मिळाली. कॉम्प्युटर शिकता येईल, इंटरनेट समजून घेता येईल आणि चार पैसे मिळवता येतील असा व्यवहारी विचार करून ती नोकरी पत्करली आणि तिथंच याहू मेसेंजरवर प्रशांतशी ओळख झाली.

प्रश्न : पण मग अनोळखी मुलाशी कसं काय बोलू लागलीस ?

समीना : सुरवात प्रशांतनेच केली. त्याच्याकडून मेसेज आल्यावर मी जरा भीतभीतच प्रतिसाद दिला. अपरिचित मुलाशी बोलायचं म्हणून खोटं नाव सांगितलं. सावध पवित्रा घेऊन बेताचं बोलणं सुरू झालं होतं. मी त्याच्याशिवाय अन्य कोणाशीही बोलत नव्हते. तो मोकळेपणानं बोलत होता. त्याचा दिनक्रम, मित्र, कुटुंब अशा कुठल्याही विषयावर बोलत होता. मी मोजकं बोलत होते.  पण त्याच्या आडपडदा न राखता बोलण्याने, शिवाय एकमेकांचे विचार जुळू लागल्याने त्याच्याबरोबरचं बोलणं आवडायला लागलं. दोघंही ठरवून विशिष्ट वेळेला ऑनलाईन यायला लागलो.. पण सहा महिन्यांतच मी ही नोकरी सोडली आणि अ‍ॅक्वागार्ड कंपनीत बॅकएंडची नोकरी धरली.

प्रश्न : कोणत्याही नात्याच्या सुरवातीच्या टप्प्यावर प्रत्यक्ष सहवास नसला तरी किमान अधून मधून संपर्क हवा, त्यात तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी...एकमेकांना पाहिलेलं नाही, अशावेळी पुढचा संपर्क कसा टिकवला?

समीना : सायबर कॅफेसाठी दहावीस रुपये खर्च करण्याची सोय नव्हती. बसप्रवासापुरतेच पैसे मिळत होते... त्यामुळं मी अनेकदा बसचा प्रवास टाळून पायी चालत घरी यायचे. वाचलेल्या पैशांत कॉईन बॉक्सवरून प्रशांतला फोन करायचे. त्या वेळी त्याच्याकडंही मोबाईल नव्हता. त्यानं त्याच्या मित्राचा मोबाईल नंबर दिला होता... अशा तर्‍हेनं आमचा संवाद-संपर्क टिकून होता. दरम्यान मार्च 2005मध्ये प्रशांत त्याच्या मित्रासह नाशीकमध्ये आला तेव्हा आम्ही भेटलोही. भेटीनंतर आमचा संवाद अधिक घट्ट झाला. 

प्रशांत : ती भेट होईपर्यंत माझ्या मनात ही काही नव्हते. मैत्रीची भावना अधिक होती. तिचे आचार विचार पटत होते. कमी बोलत होती तरी स्पष्ट मते होती. ते सारं आवडू लागलं होतं. आणि यानंतर लवकरच आम्हालाही सहवास लाभण्याच्या दृष्टीनं एक चांगली संधी चालून आली. समीनानं बीएड्‌ची प्रवेशपरीक्षा दिली होती आणि तिला भुसावळजवळच्या खिरोदा गावातलं कॉलेज मिळालं होतं. तेव्हा मी जळगावला होतो.

प्रश्न : पण नाशीकमध्येच एम.एसस्सीसाठी तुला पाठवलं नाही मग इतक्या दूर कसं पाठवलं?

समीना : प्रवेशपरीक्षा देताना नाशीकमध्येच शिकणार असंच सांगितलं होतं... मला ही तसंच वाटत होतं. पण परीक्षा पास झाले आणि कागदपत्रांसह मुलाखतीला पुण्यात बोलावलं. घरच्यांची मनधरणी करून, काकांना सोबत नेऊन मुलाखत दिली. त्यातही पास झाले. मग मला दोनतीन कॉलेजचे पर्याय देण्यात आले. एक कॉलेज तर नाशीकमधलेच होते... मात्र ते नॉनएडेड असल्यानं त्याची फी दीडेक लाख होती आणि खिरोदाचं शासकीय असल्यानं दहा हजार रुपये फक्त. तरी सुरुवातीला शिकूच नको, मग इतक्या लांब काय जायचंय असा खोडा घातला गेला... पण मग खूप रडारड करून घरच्यांना मनवलं. आमच्या खानदानात तोवर कुणीही शिकायला बाहेर गेलेलं नव्हतं. त्यात आत्या-मावशी होत्याच म्हणायला... ‘मत भेजो, नाक काटेगी, मुँह काला करेगी।’ पण घरचे तयार झाले होते.

प्रश्न : समीना खिरोद्याला आली तेव्हा प्रशांत इंजिनिअरिंगसाठी जळगावला होता. म्हणजे अंतराचा प्रश्न इथंही तर होताच?

प्रशांत : हो. माझं तेव्हा इंजिनिअरिंगचं शेवटचं वर्ष सुरू होतं. जळगाव खिरोदा ऐंशी-नव्वद किलोमीटर अंतर होतं. पण आधीच्या अंतराच्या तुलनेत बरंच कमी होतं. शिवाय तोवर माझ्या मनात तिच्याविषयीची ओढ निर्माण झाली होती. मला ती नाशीकच्या आमच्या भेटीतच आवडून गेली होती. त्यामुळे दर  रविवारी तिला भेटायला खिरोद्याला जाऊ लागलो.

समीना : खरं तर तिथे गेल्यावर मी खूप घाबरून गेले होते. मी नाशीकसारख्या शहरात राहिलेले होते. तिथं रात्री बारा वाजता ही शहर जागं असायचं, पण खिरोद्याला तसं नव्हतं. खूप आतल्या भागात गावापासून दूर कॉलेज होतं. सहा वाजता सगळं चिडीचूप होऊन जायचं. दूरदूरपर्यंत फक्त केळीच्या बागा. खूप धास्ती घेतली होती. मी मोठी हिंमत करून  गेले तर होते पण एकटीनं राहायची सवय नसल्यानं सुरुवातीला खूप जड गेलं... पण प्रशांतच्या मदतीनं हळूहळू तिथं रमले. त्या काळात त्यानं मला खूप मानसिक आधार दिला.

प्रश्न : भेटीगाठी तर सुरु झाल्या पण तुमची गाडी आता प्रेमापर्यंत आली हे कधी जाणवलं? त्याबाबतची कबुली कशी दिली?

प्रशांत : मी तिला भेटायला मित्राची बाईक घेऊन जळगावहून खिरोद्याला जायचो. मला डायरी लिहायची सवय होती. आमच्या पहिल्या भेटीपासूनच्या नोंदी त्यात होत्या. मी तिला तेच वाचायला दिलं होतं. त्यातून तिला माझ्या डोक्यात काय आहे हे कळलंच होतं. त्या काळात आम्ही खूप वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करायचो. प्रेम, धर्म, लग्न, जात या विषयांवर गप्पा मारत असू. याचदरम्यान मी तिला माझ्या प्रेम भावना सांगितल्या... पण या तर्‍हेनं नात्याचा विचार केला नाही... अजून तरी मित्र म्हणूनच पाहत आहे असं तिचं टिपिकल म्हणणं होतं.

समीना : (प्रशांतचं बोलणं तोडत) खरंतर मीही गुंतले होते. मला ते नीटसं उमगलेलं नव्हतं... शिवाय आमचे धर्म भिन्न. आपण मानत नसलो तरी समाजाचं अप्रत्यक्ष दडपण होतंच... त्यामुळं मी जाणीवपूर्वकच या गोष्टीकडे सुरुवातीला थोडं दुर्लक्ष केलं. त्याचा म्हणणं फारसं मनावर घेतलं नाही. त्यादरम्यान होस्टेलवर भेटायला माझी आईबहीण, दोघी आल्या. त्यांच्याशी प्रशांतची ओळख करून दिली... पण मनानं अजून कुठलाही कौल दिलेला नव्हता. वर्षभराचं माझं बीएड्‌ झाल्यानंतर मी नाशीकला आणि प्रशांत नोकरीनिमित्तानं पुण्याला गेला. नाशीकला आल्यावर मला प्रशांतशी संपर्क टिकवण्यासाठी घराबाहेर पडणं गरजेचं होतं आणि तशी लगेच संधीही चालून आली. परीक्षा संपवून मे महिन्यात घरी गेले आणि जूनमध्ये एकलहरे शाळेत शिक्षकाची नोकरी मिळाली. मग आमचं पुन्हा कॉईन बॉक्स सुरू झालं. अधूनमधून तो नाशीकला भेटायला यायचा. त्या वेळी नाशीक-पुणे अंतरही सहा सहा तासांचं पडायचं. तरीही तो भेटत होता. प्रत्यक्ष गाठीभेटींतून जीव अधिक गुंतायला लागला.

प्रश्न : तो इतका धडपड करत तुला भेटायला येत होता आणि तुही तर संधी शोधून त्याच्याशी बोलत होतीच मग तुला कशात अडचण वाटत होती?

समीना : प्रशांतचं प्रेम कळत होतं... पण हिंमत होत नव्हती. प्रेमाचाच स्वीकार करण्याची हिंमत होत नव्हती. खरं तर जोडीदाराविषयीच्या ज्या काही कल्पना होत्या त्यात प्रशांत परफेक्ट बसत होता. त्याचं सर्व म्हणणं बुद्धीला पटत होतं... पण वळत नव्हतं. प्रशांतच्या प्रेमाचा अस्वीकार केला तर आपण मूर्खपणा करू हेही कळत होतं. त्याच सुमारास बहिणीला ‘बघायला’ म्हणून पाहुणे यायचे. त्यांचे विचार ऐकून तर चीड यायची. घरातच राहायचं, नोकरी नाही करायची, बुरखा घालायचा. हे सगळं ऐकून तर डोक्यात खटके उडायचे. कधी बहिणीसोबत मलाही दाखवलं जायचं. मोठी नाही तर लहानी पाहा. एखाद्या शोपीससारखं आम्हाला दाखवलं जायचं. आपल्याला आयुष्यात काही करायचं असेल तर अशी गुलामगिरी चालणार नाही हे मनाला कळत होतं.

वेगळ्या धर्माचा वगैरे असा काही मुद्दाच डोक्यात नव्हता. फक्त एवढंच होतं जोडीदाराचं आपल्यावर प्रेम तर असावंच... पण आपला, आपल्या शिक्षणाचा त्याला आदर वाटावा. लग्नानंतरही आपल्याला स्वातंत्र्य असावं. कितीतरी मैत्रिणींची लग्नं अशा परिस्थितीत झाली की, ज्यांना त्यांच्या नवर्‍यांची फक्त नावं माहीत होती. फोटोही मोबाईलमध्येच पाहिलेला असायचा. काय करणार बघून, काय करणार भेटून अशी कुटुंबीयांची उत्तरं असायची. अरेऽ आपण काय एकदोन दिवसाच्या पिकनिकला चाललोय का... की, असला कुणीही सोम्या-गोम्या तरी दोनच दिवसांचा प्रश्‍न आहे. आयुष्यभराचा जोडीदार निवडतोय आणि ही तर्‍हा. या सगळ्याच्या नोंदी बॅक ऑफ माइंड कुठंतरी होत होत्या. त्याचा परिणाम असा झाला की त्याच्याबाबतचा निर्णय पक्का होत गेला.

प्रश्न : या काळात एकदाही तुम्हाला तुमचे धर्म भिन्न आहेत तर त्या अनुषंगाने एखाद्यावेळी तरी शंका किंवा भीती नाही वाटली? 

समीना : नाही म्हंटलं तरी आपल्या भवतालाचा, आपल्या समाजाचा प्रभाव असतोच की. एकाएकी ते सारं सोडून द्यायची, कुटुंबियांच्या विरोधात जायची मानसिक तयारी होत नव्हती. प्रशांत तर ज्या तऱ्हेनं स्वतंत्र आणि सर्व तऱ्हेच्या वातावरणात वाढला तो माझ्यापेक्षा अधिक मोकळा, खुला होता. माझ्या डोक्यातली थोडीबहुत जी काही जळमटं होती तीदेखील त्यानेच दूर केली. धर्म या विषयावर आमच्या असंख्यवेळा चर्चा व्हायच्या. पण धर्म अडसर म्हणून वाटला नाही.

प्रशांत : माझ्याबाबत तर धर्म, जातीपाती हे कधी डोक्यातच आलं नाही. मी मगाशी सांगितलं तसं आश्रमशाळा मग नवोदय विद्यालय. तिथं तर युपी, बिहार कडची वेगवेगळ्या स्तरातील मुलं. शिवाय आधीही वडील शिक्षक असल्याने त्यांची बदली होईल तिथं शिकायचं अस सुरु होतं. त्यामुळं भेदाभेद वाटावी अशी भावना मनात कधी जन्मलीच नाही... रुजण्याचा तर प्रश्‍नच नव्हता. जातिधर्मांच्या गोष्टीसुद्धा कुणीतरी शिकवल्या तरच लक्षात येतात... त्यामुळं झापडबंद ‘दृष्टी’ तयारच झाली नाही. जाणीवपूर्वक घडलं नसलं तरी नकळतपणेच मी ज्या तर्‍हेच्या वातावरणात घडत होतो... त्यातून माणूसपण महत्त्वाचं इतकंच ठसत होतं. समीनाचं तर अगदी लग्नाची जुळवाजुळव करू लागलो तरी घर सोडून कसं येणार याबाबत निश्चित ठरत नव्हतं. अर्थात दोन भिन्न धर्म आहे तर त्यातून बरेच कॉम्पलीकेशन होणार याची जाणीव होतीच. त्यासाठी कायदेशीरच मार्गानं जायचं हेही ठरत होतंच. भीती, शंका यापेक्षा चॅलेंज म्हणून त्याकडे पाहत होतो.

प्रश्न : पण मग तुम्ही कुटुंबियांना कधी सांगितलं?

समीना : प्रशांतने तरी थेट घरी सांगितलं होतं. पण माझ्या घरी मी थेट लग्न केल्यानंतरच माहीत झालं. अर्थात त्याआधी बऱ्याच गोष्टी घडल्या. त्यात एक चांगली गोष्ट होती कि आमचे कुटुंब एकमेकांना ओळखू लागले होते. त्यांच्यात मैत्रीचे नाते स्थापित झाले होते. माझी आई-बहिण प्रशांतला भेटले होतेच प्रशांतनंही त्याच्या बहिणीच्या लग्नात माझ्या कुटुंबीयांना निमंत्रण दिलं होतं. आम्ही जळगावला लग्नाला गेलो. दोन्ही कुटुंबांत कौटुंबिक नातं तयार झालं होतं.

आणखी एक घटना घडली होती, प्रशांत पुण्यात असतानाच 2007मध्ये माझ्या वडलांच्या पायाचं ऑपरेशन रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये झालं. मधुमेहाचे रुग्ण असल्यानं दोन महिने त्यांना हॉस्पिटलमध्येच राहावं लागणार होतं. तोवर प्रशांत कुटुंबीयांना माझा मित्र म्हणून माहीत होता. त्यानं तिथं त्यांना सर्वतोपरी मदत केली... त्यामुळं प्रशांतविषयी माझ्या घरच्यांच्या मनात एक जिव्हाळा निर्माण झाला. एक चांगला मुलगा म्हणून त्यांनी नोंद केली होती.

प्रशांत : अर्थात तरी त्यांनी माझा विचार त्यांच्या मुलीचा मित्र याहून जास्त केला नसणारच. इकडं माझ्या घरी, बहिणीचं लग्न होताच  घरचे माझ्या लग्नासाठी मागे लागले. तोवर खरंतर समीनानं अजून ठाम होकार दिलेला नव्हता. तरीही मी घरी समीनावर प्रेम असल्याचं सांगून टाकलं. समीना मुस्लीम आहे म्हटल्यावर घरच्यांनी कानांवर हात ठेवले. घाबरून त्यांनी लगेचच माझ्यासाठी काही स्थळंच शोधायला सुरुवात केली. एक दोन स्थळं पाहण्यासाठी तर बळंच पाठवलं. मीही मुद्दाम अवतार करून जायचो. लोक म्हणायचे... अरे इंजिनिअर आहे म्हणतात. पण वाटत तर नाही. मला तेच हवं असायचं... पण त्या सुमारास घरून खूप जास्त प्रेशराईज केलं जात होतं. त्यांचा ठाम नकार होता. कामाची शिफ्टपण रात्रीची होती. या सगळ्यातून प्रचंड ताण वाढला आणि सगळं जीवावर बेतलं. उजव्या बाजूला पॅरालिसीसचा सौम्य झटका आला. दीडदोन महिने नीट खाता येत नव्हतं. बोलता येत नव्हतं. इतकं होऊनही घरच्यांनी आपला हेका सोडला नव्हता. मग मात्र मी ताण न घेता कायदेशीर मार्गानं गोष्टी करायच्या असं ठरवलं. स्पेशल मॅरेज अ‍ॅक्टअंतर्गत लग्न करायचं ठरवून टाकलं.

प्रश्न : स्पेशल मॅरेज अ‍ॅक्टविषयी आधीपासून माहिती होती? आणि या कायद्यानुसार लग्न करण्यामागचा विचार काय होता?

प्रशांत : माझे जळगावचे काही वकीलमित्र आहेत. आम्ही भिन्नधर्मीय आहोत तर रीतसर लग्नात नक्कीच काही प्रोब्लेम्स येणार याची जाणीव होती, विशेष करून, धर्मांतराच्या अनुषंगाने. त्यामुळं त्यांच्याशी चर्चा करून वेगवेगळे पर्यायांचा विचार सुरु केला. त्यात या विशेष विवाह कायद्याची माहिती झाली. नुसती माहितीच नाही तर अगदी अभ्यासच झाला. मला कुठल्याही प्रकारचं धर्मांतर नकोच होतं. ना माझं ना तिचं. धर्मांतर नाही झालं तर विरोधही होणार नाही. असलाच तरी त्याला धार नसणार. स्पेशल मॅरेज अ‍ॅक्टअंतर्गत लग्न केल्यास नाव किंवा धर्म बदलण्याची आवश्यकता नसते. त्यामुळं हा पर्याय निवडण्याचं ठरवलं.

शिवाय त्याच सुमारास मी दिल्लीच्या धनक संस्थेच्या संपर्कात होता. त्या संस्थेचे इमेल्स यायचे. आंतरधर्मीय विवाह झाल्याची सकारात्मक उदाहरणं त्यांत असायची. त्यांतून  पुरेसा विश्‍वास मिळाला. आपल्यासारखी अन्य ही माणसं आहेत म्हंटल्यावर कॉन्फिडन्स आला. पण पुढे एक अडचण होती. वधूच्या किंवा वराच्या राहत्या क्षेत्रातच लग्न होऊ शकत होतं. म्हणजे नाशीक किंवा पुणे. नाशीकला करू शकत नव्हतो कारण तिथं विवाहाची नोंदणी केली कि त्यांच्या कार्यालयाबाहेर कर्मचारी नोटीस लावणार. त्यात आमची नावं जाहीर होणार. ते कोणाच्या नजरेत पडलं तर गोंधळ झाला असता. अलीकडे सुप्रीम कोर्टाने विवाहनोंदणी केल्यावर नोटीस लावू नये हा निर्णय घेतला ते खूप महत्त्वाचं पाउल आहे.

पण पुण्यात लग्न करण्यासाठी मला इथला रहिवासी पुरावा हवा होता. भाडेकरार करून बाकी सगळी कागदपत्रंही उभी केली. लग्नासाठी 15 ऑगस्ट 2010 ही तारीख आधी ठरवली... पण 15 ऑगस्ट सुट्टीचा दिवस... म्हणून तेरा ऑगस्ट ठरवली. नियोजन चोख झालं. फक्त समीनाला निर्धोक घराबाहेर पडण्याची संधी मिळायला हवी हा पेच अजून बाकीच होता.

समीना : त्याचंही झालं असं...तेरा तारखेला नागपंचमीमुळे शाळेला सुट्टी होती... पण मी 15 ऑगस्टसाठी मुलींची लेझीम, संचलन यांचा सराव घ्यायचे. माझ्या शाळा-कॉलेजमध्ये मी एनसीसीची कॅप्टन राहिले होते... त्यामुळं शिक्षक झाल्यावरही शाळेतल्या एनसीसी, ग्राउंड, विज्ञानमंडळ अशा उपक्रमांत मी सहभागी असायचे. घरी तेच कारण सांगितलं. शाळेला सुट्टी असली तरी मुलींची प्रॅक्टीस घ्यायची आहे असं सांगून सकाळी सात वाजता पुण्यासाठी बाहेर पडले. शाळेचा रस्ता वेगळा आणि एसटी स्टँडचा वेगळा होता. पण न डगमगता स्टँडवर जाऊन तिकीट काढले. पुण्याच्या बसमध्ये बसले. बस सुटल्यावर जरा निवांत झाले. मग बारा पर्यंत शिवाजीनगर कोर्ट गाठलं. नोंदणीपद्धतीच्या लग्नासाठी साक्षीदारांच्या सह्या हव्या होत्या. त्याकामी प्रशांतचे मित्र हजरच होते. सगळे सोपस्कर करून लग्न झालं. घरच्यांना कळवण्याची मोठी जबाबदारी होती.   

चारच्या सुमारास प्रशांतनं स्वतःच्या घरी कळवून टाकलं... पण माझी हिंमत होत नव्हती. तेव्हा आमच्याकडे लँडलाईन आला होता. घरी फोन केला आणि अशी बातमी ऐकून कुणी धसका घेतला तर... या विचारानं घाबरले. फोनवर आईचा आवाज ऐकून फोनच कट केला. मग भावाच्या मित्राला फोन केला. त्याला हकीकत सांगितली आणि घरी कळव म्हणून सांगितलं. तरी सुरुवातीला त्यांचा विश्‍वास बसला नाही. हरवली आहे अशी जाहिरात त्यांनी दुसर्‍या दिवशी दिली. आपली मुलगी पळून गेली, तिनं लग्न केलं असं लोकांना कळू नये असं त्यांना वाटत होतं.

प्रश्न : कुटुंबियांना कळवल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय होती?

प्रशांत : सर्वात आधी आम्ही आमचे फोन बंद करून टाकले. त्यामुळं प्रतिक्रिया दहा दिवसांनीच कळाल्या.  लग्न झाल्यानंतर आम्ही दहा दिवस पुण्याबाहेर ठिकठिकाणी भटकत राहिलो. मामला तापलेला असल्यानं आणि पुण्यात राहिल्यानं काहीही होऊ शकतं असं वकीलमित्रांचं म्हणणं होतं...त्यामुळं एका ठिकाणी एक दिवसच राहायचं असं करत कोल्हापूर, गणपती पुळे पर्यंत फिरत राहिलो. दहा दिवसांनी पुण्याला आलो. सुट्ट्याही तेवढ्याच होत्या आणि फेस ही करणं गरजेचं होतं. पुण्यात आल्यावर पोलीस चौकीत आमच्या लग्नाची कल्पना देणारं एक पत्र देऊन ठेवलं. जेणेकरून काहीही उलटसुटल झालं तर पोलिसांची मदत घेता येईल हा हेतू.

समीना : परतल्यावर दोघांनाही आपापल्या कुटुंबीयांची खबरबात माहीत करून घ्यायची होतीच. त्यांची आठवणही येऊ लागली होती.. त्यांनी धसका घेतलेला नसावा एवढंच वाटत होतं. दोन्ही कुटुंबीयांनी आमच्याशी बोलणं सोडून दिलं होतं. वडलांच्या तब्येतीचं निमित्त करून माझे घरचे बोलवू लागले. ते आजारी होतेच त्यामुळं मला ही भेटायची इच्छा होत होती. मला वाटत होतं... दोघांनी जावं पण प्रशांतचा मुद्दाही बरोबर होता... त्याला वाटत होतं की, दोघं गेलो आणि काही कमी जास्त झालं तर आपल्याला कोण वाचवणार? पण एक जण बाहेर राहिला तर तो दुसर्‍याला सोडवण्याचा प्रयत्न करू शकतो.

प्रशांत खूप प्रॅक्टीकल विचार करणारा आहे. त्यावेळीही त्यानं एक एक आयडिया केली. त्यानं त्याच्या मोबाईलमध्ये माझा एक व्हिडिओ केला. त्यात ‘आपण स्वेच्छेनं लग्न केलं असून खूश आहोत. आत्ता घरच्यांना भेटायला जात आहे. 24 तासांत त्यांनी पुन्हा पुण्याला पाठवावं. त्याची जबाबदारी कुटुंबीयांची...’ असं मी म्हटलं होतं. काही झालंच तर हा व्हिडीओ दाखवायचा हे ठरवून गेले. तर काय पाहते. माझ्या आधी शंभर जण घरात होते. कोण, कुठले नातेवाईक मला ठाऊकही नव्हते. त्यांनी घेरावात घेतलं.

आधी म्हणायला लागले, आता जाऊ नकोस परत. मग म्हणायला लागले आपण पोलीस तक्रार करू. तू लिहून दे, जबरदस्ती नेलं, पळवून नेलं, बलात्कार केला वगैरे. मी म्हटलं की, असं काहीही करणार नाही. जातानाच मी सोबत लग्नाची कागदपत्रं नेली होती. माझा मामा पोलीस खात्यात आहे. त्यानं कागदपत्रं पाहिली आणि म्हणाला की, हे सगळं लिगली झालंय, आता काहीच करता येणार नाही.

पण नातेवाईकांचा मुद्दा होता की, तो कितीही चांगला असला तरी आपल्या धर्माचा नाही. मग त्याचं धर्मांतर करू. निकाह लावू. मी हेही अमान्य केलं. शेवटी पाच वाजता मी माझ्याकडचा व्हिडीओ दाखवला. मला जर सोडलं नाही तर पोलीस तुम्हाला अडकवतील, हा व्हिडिओ पोलिसांसमोर रेकॉर्ड केलाय असं सांगितल्यावर तर नातेवाईक बरेच घाबरले. त्यांनी स्वतः पुण्याच्या गाडीत बसवून दिलं... त्यांनी तरीही सोडलं नसतं तर पोलिसांची मदत कशी घ्यायची हेही आधीच ठरवून ठेवलं होतं पण त्याची गरज पडली नाही.

मी तिथून सुटले तरी पुढे वर्षभर याच नातेवाइकांनी माझ्या आईवडलांना खूप त्रास दिला. सतत येऊन भुणभुण करत राहिले. शिक्षणाला दोष द्यायचे. कुटुंबाला वाळीत टाकलं. नातलगांनी तोंड फिरवलं. त्यांना मानसिक स्तरावर खूप त्रास दिला.

आम्ही याही गोष्टीनी बधत नाहीत म्हटल्यावर अंधश्रद्धांचाही आधार घेण्यात आला. अंगारा-धूप-ताबीज यांसारखे प्रकार करण्यात आले... आम्ही हे काही मानतच नाही... तर घाबरायचं काय? आम्ही अंधश्रद्धांना भीक घालत नव्हतो. कुठल्याशा अंगाऱ्यानं माझं काहीही वाईट होणार नाही याची मला खातरी होती. दोघंही विज्ञाननिष्ठा मानतो... त्यामुळं आम्हाला त्रास झाला नाही... मात्र माझ्या आईवडलांना टॉर्चर झालं. खरंतर त्यांना प्रशांत चांगली व्यक्ती असल्याची खातरी होती... त्यामुळं ते रिलॅक्स होते... पण नातेवाइकांमुळे हैराण झाले होते.

प्रश्न : आणि प्रशांतच्या घरून ?

प्रशांत : सुमारे दीड ते दोन वर्षं त्यांनी बोलण सोडून दिलं होतं. परिस्थितीच्या स्वीकाराशिवाय गत्यंतर नाही हे माहीत असतं... पण फेस करायची तयारी नसते. जितकं ताणू तितकं पुढं ऑकवर्ड होत जाणार असतं. आम्ही तर त्यांना फोन करत राहिलो... पण त्यांच्याकडून रिस्पॉन्स येत नव्हता. आपल्यातला ऑकवर्डनेस आपणच दूर करावा लागतो... पण त्या काळात दोन्ही कुटुंबं आमच्यासोबत नव्हती. त्यानंतर आम्हाला ईशान झाला. तो दहा महिन्यांचा असताना पहिल्यांदाच समीनाचं कुटुंब भेटायला आलं. तो वर्षाचा झाल्यानंतर आम्हीच त्याला घेऊन माझ्या घरी गेलो. हळूहळू त्यांच्यातल्या भिंती गळून पडल्या. मग इराचा जन्म झाला. आता दोन्ही घरी आमचं जाणं-येणं आहे.

प्रश्न : पण मुलांना प्रश्न पडत असतील. आजूबाजूचा भवताल..तुमच्या दोघांच्या घरातील वेगळी भाषा, राहणीमान...त्यासंदर्भात मुलांना काय उत्तरं देता?

समीना : आमच्या दोघांच्या घरांतील बोलभाषा, आहार, पोशाख, सण-उत्सव, रुढी-परंपरा अगदी भिन्न आहेत, मान्य. पण मुळात आम्ही दोघंही धार्मिक गोष्टी पाळत नसल्यानं घरात फक्त मनाला आनंद देणार्‍या गोष्टी करायच्या हे ठरून गेलंय. आसपासच्या मुलांचं पाहून ईशान देव, पूजा यांविषयी विचारतो. इरा आत्ता तीन वर्षांची आहे पण दहा वर्षांच्या ईशाला समजेल असं मी त्याला सांगते की, आपण हे काहीच मानत नाही. मी कधी देवाला डोळ्यांनी बघितलं नाही. त्यामुळं जे डोळ्यांना दिसतं त्यावर विश्‍वास ठेवावा. निसर्गानं माणसाला माणूस म्हणून जे रंगरूप दिलंय त्याचा आदर करावा. त्यातही भेद करू नको. धर्म-समाजाच्या चौकटीतून बाहेर पडायला आम्हाला खूप संघर्ष करावा लागलाय. त्यामुळं तू त्यात अडकू नको. ती चौकट मोडून तुला बिनचौकटीचं वातावरण देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, तू यापेक्षा आनंद वाटेल अशा गोष्टी कर.

प्रश्न : बिनचौकटीचं वातावरण! किती सुंदर विचार पण शाळेत प्रवेश घेताना... काही अडचण आली?

समीना : आमच्या आजूबाजूचं वातावरण वेगळं आहे आणि आम्हाला आमच्या मुलांना वेगळी मूल्य शिकवायची आहेत. त्यात मुलांचा गोंधळ उडू नये, हा विचार होता. त्यामुळं ईशानसाठी शाळा निवडताना तोच विचार केला. आम्ही देऊ पाहत असलेले संस्कार, आमची जडणघडणच चुकीची ठरवणारी शाळा आम्हाला नको होती. चौकटी नको होत्या... त्यामुळं आम्ही अनौपचारिक शिक्षणाचा विचार केला. कर्वेनगर इथं असणार्‍या आनंदक्षण या शाळेची निवड केली. ज्ञानरचनावादी पद्धतीनं ही शाळा चालते. खडू-फळा, युनिफार्म काहीही नसतं. मुलांनी आनंद घेत शिकायचं. आता ईशान तबला वाजवतो. चित्रं काढतो. इतर मुले त्याला या शाळेवरून चिडवतात किंवा कधी कधी तो ही त्या मुलांच्या शाळेत जाण्याविषयी बोलतो. तेव्हा आम्ही त्याला दोन्ही शाळांमधील भेद सांगतो. मुल खूप पटकन गोष्टी स्वीकारतात.

प्रश्न : शेवटचा प्रश्न,अशा तर्‍हेच्या लग्नांच्या यशस्वीतेवर लोक कायम प्रश्‍न करतात. ते टिकणार नाही किंवा ते टिकू नये अशीच एक धारणा बाळगलेली असते...तुमचा काय अनुभव?

समीना : आमचं सहजीवन उत्तम सुरू आहे. दोघंही धर्मनिरपेक्ष असल्यामुळे आमच्यामध्ये धार्मिक बाबतींत कलहाचा प्रश्‍न येत नाही. आमच्या दोघांचा वैज्ञानिक दृष्टीकोन, धर्मनिरपेक्षता, व्यापक दृष्टीकोन, एकमेकांविषयी आदर आणि एकमेकांवरचं प्रेम हेच आमच्या यशस्वी सहजीवनाचं गमक आहे. मगाशी म्हणाले तसं तुम्ही प्रेमासाठी हिंमत केली पण तुमच्या मनात कुठलीही सुप्त भीती असली की कुणीही लगेच तुम्हाला वेगळं करणं सहज शक्य आहे. अंधश्रद्धा, भीती बाळगत असाल तर तुम्ही कमकुवत होता. आपणच सर्व परिस्थितीत खंबीर राहणं गरजेचं आहे. आमचा संसार शून्यातून सुरू झाला. अगदी वस्तू लागतील तशा घरात आल्या. आता सहजीवनाची दहा वर्षं आणि त्याआधीची सहा वर्षं दोघंही मनानं एकत्र आहोत. मला शिक्षणाची आवड आहे म्हणून लग्नानंतर मी एमएड्‌ करावं असा प्रशांतनेच आग्रह धरला. पुढं एमफिलही केलं, त्याचा प्रचंड आधार राहिला.

प्रशांत : अर्थात सामिनाचा ही मला सपोर्ट आहेच. आणि हो आर्थिक स्वातंत्र्य ही हवं. पैशाच्या बाबतीत कोणावर अवलंबून असला की गफलती वाढतात. माझा विश्‍वास आहे की, दोन व्यक्तींनी एकत्र येताना एकमेकांसाठी पूरक व्हायला पाहिजे. माझ्यात जे नाही ते समोरच्या व्यक्तीनं पूर्ण केलं की पुरे. सगळं परफेक्ट असण्याची जरूर नाही. मी पूर्वी एकटा राहिल्याने मला स्वयंपाक चांगला जमायचा फक्त चपात्या येत नव्हत्या. समीनाने घरात मोठ्या बहिणीमुळे कधीच पूर्ण स्वयंपाक केलेला नव्हता. तिला विचारलं चपात्या येतात का? ती म्हणाली तेवढंच येतं. म्हटलं, झकास. मला भाजी करता येते. तू चपात्या करत जा. असं टीमवर्क जमल्यावर बिनसणार ते काय?

समीना : (त्याला दुजोरा देत) व्यक्तीपेक्षा जातपात-धर्म याला महत्त्व दिलं असतं तर आज आपल्या आवडत्या माणसासोबत असण्यातला जो आनंद आहे, जे सुख आहे ते कधीच मिळू शकलं नसतं. भौतिक गोष्टींपेक्षा विवेकी जोडीदाराची निवड करणं म्हणजेच सुंदर सहजीवनाकडं वाटचाल करणं आहे.

(मुलाखत व शब्दांकन - हिनाकौसर खान)
greenheena@gmail.com


'धर्मरेषा ओलांडताना' या सदरातील इतर मुलाखतीही वाचा

आंतरधर्मीय विवाहित जोडप्यांच्या लेखमालिकेचे प्रास्ताविक : धर्मभिंतींच्या चिरेतून उगवलेल्या प्रेमकहाण्या

आंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव्याच्या जागा...

Tags: प्रेम आंतरधर्मीय विवाह प्रशांत जाधव समीना पठाण स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट हिनाकौसर खान पिंजार prashant jadhav samina pathan love interfaith marriage valentine's day special marriage act मुलाखत Interview Load More Tags

Comments: Show All Comments

आझाद खान

प्रत्येक व्यक्तींच्या छान अनुभव संकलित केल्या गेली आहेत आज समाजाला गरज आहे अस्या विचारांची...

shirish patil

ंत आणि समीनाला हार्दिक शुभेच्छा!!

Bajirao Aher

Very good.hope many more should happen in future.very good for national integrity.wish both of you a happy marriage life.

Aruna Burte

हीना यांनी घेतलेली प्रशांत आणि समीना यांची मुलाखत खूप काही सांगून जाते. यातील विशेष विवाह कायदा याबद्दलची समाज खूप गाभ्याची आहे. त्यामध्ये दोघांची आणि त्यांना सल्ला देणाऱ्यांची प्रगल्भता दिसते. कर्वे नगर, पुणे या शाळेबद्दल जास्त माहिती करून घ्यायला आवडेल. सर्वांचे मनापासून कौतुक आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा!

Bapu Bhupatkar

मानववादी भूमिकेचा किती सुंदर आविष्कार! हिनाचेही अभिनंदन!

Pramod Mujumdar

धाडसी आणि समंजस सहजीवन. मनःपूर्वक हार्दीक शुभेच्छा!

जीवन सर्वोदयी

प्रशांत समीना अति उत्तम निर्णय . खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे . खुपखुप शुभेच्छा . : जीवन सर्वोदयी

Pro. Bhagwat Shinde

खूप सुंदर व अर्थपूर्ण सहजीवन! प्रशांत - समीना तुम्हा दोघांच्या भावी सहजीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! तुम्ही दोघांनी विचारपूर्वक, विवेकनिष्ठ पद्धतीने योग्य तो निर्णय घेतला व त्या आधारावर आपलं सहजीवन यशस्वी बनवलतं. त्याबद्दल तुम्हा दोघांचे विशेष कौतुक... मुलाखत व सुंदर शब्दांकनाबद्दल हिना कौसर यांचे ही मनःपूर्वक अभिनंदन!

Amol

अतीशय प्रेरनादाई प्रवास .. अडचणी कितीही आल्या तरी सोबतचा सहप्रवासी खंबीर आणि साथ देनारा असला कि जगातलं कुठलंही mount everest सहज पार करता येऊ शकत.... तुमच्या पुढील सह-प्रवासा साठी खूप खूप सदिच्छा !!!

Add Comment