वर्षा ढोके आणि आमीन सय्यद. दोघांचंही कवितेवर प्रेम आणि दोघांना सांधणारा दुवाही कविताच. दोघं पहिल्यांदा एकमेकांच्या संपर्कात आले, तेही कवितेमुळंच. पुढं त्यांच्या नियमित भेटी होत राहिल्या असणार हा आपला कयास चुकत नाही, पण या भेटी घडत राहिल्या पत्रातून! मिलेनियम वर्षांनंतर खरंतर मोबाईल, इंटरनेट यांसारख्या संवादमाध्यमांनी माणसांच्या आयुष्यात जागा करायला सुरुवात केली होती... तरीही ते दोघं त्यांच्यातलं 200 किलोमीटरचं अंतर पत्रातूनच कापत होते. अवघी पाचेक वर्षं संवाद आहे मात्र समोरासमोर भेट नाही असा सिलसिला चालत राहिला. एकमेकांमधल्या समंजस, सच्च्या माणसाची ओळख तर झाली होती मात्र जोडीदाराच्या आपापल्या कल्पनांना मूर्त रूप प्रत्यक्ष भेटीतूनच येणार होतं. शेवटी 2006मध्ये वर्षाच्या एका मैत्रिणीच्या लग्नात दोघांनी भेटायचं ठरवलं आणि त्या भेटीत त्यांच्या आयुष्याची गाठ बांधण्याचा योग जुळून आला.
नागपूर शहरापासून पस्तीस किलोमीटर अंतरावर असणारं धापेवाडा हे वर्षा यांचं मूळ गाव. आईवडील आणि एक लहान भाऊ असं त्यांचं कुटुंब आहे. वर्षा यांचे वडील शिक्षक होते. त्यांची आसपासच्या खेड्यापाड्यात बदली होत असे, त्यामुळं दरवेळेला नव्या जागी जाऊन रुळणं ठरलेलं होतं. या रुळण्याबरोबरच त्यांच्यावर खोल परिणाम करणारा अनुभव त्यांच्या वाट्याला आला. तो म्हणजे जन्मदात्या आईवडलांचं मोडलेलं कुटुंब आणि नव्या आईचा आयुष्यातला प्रवेश. त्या वेळी त्या केवळ सहा वर्षांच्या होत्या. या घटनेनं त्यांना अबोल केलं. पुढं त्यांना वाचानाची सोबत मिळाली आणि व्यक्त होण्यासाठी कविता सापडल्या. सातवीपासून त्यांच्या कवितालेखनाचा प्रवास सुरू झाला. वर्षा यांनी डी.एड्., बी. एड्., मराठीतून आणि इंग्लिशमधून एम.ए. केलंय. सेटची परीक्षा उत्तीर्ण आहेत. त्या नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. आमीन आणि वर्षा यांचा एकत्रित मिळून 'काफीरसुक्त' हा कवितासंग्रह प्रकाशित आहे. तर वर्षा यांचा 'अनागोंदीच्या नोंदी' हा कवितासंग्रह प्रकाशित आहे.
आमीन सय्यद हे यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडा या गावचे. आमीन यांच्या कुटुंबात आईवडील, दोन बहिणी, एक लहान भाऊ आहे. आमीन यांच्या वडलांनी काही काळ शाळेत, सूतगिरणी कारखान्यात आणि विद्युत महामंडळात अशा विविध ठिकाणी नोकरी केली. आमीन हे त्यांच्या कुटुंबातले पहिले पदव्युत्तर पदवीधर. त्यांनी मराठीतून एम.ए. केलं आहे. शिक्षण सुरू असतानाच त्यांनी एस.टी. महामंडळातल्या नोकरीसाठी अर्ज केला होता... मात्र नोकरीचा अर्ज 2007मध्ये मंजूर झाला आणि योगायोगानं त्यांना नागपूर येथील पोस्टिंग मिळालं. या पोस्टिंगमुळं पुढं वर्षा-आमीन यांना लग्नाचा निर्णय घ्यायला अधिक बळ मिळालं. दोघांनी 23 मे 2008मध्ये आधी विहारात आणि नंतर रजिस्टर पद्धतीनं विवाह केला. या विवाहामुळं वर्षा यांचं माहेर सुटलं तर आमीन यांनी आपल्या कुटुंबीयांपासून दोन वर्षं लग्नाची गोष्ट लपवली. पुढं त्यांच्या मुलाचा - कबीरचा - जन्म झाला. या काळात दोघं कबीरबरोबरच एकमेकांचेही आईवडील झाले. सहजीवनाच्या तपःपूर्तीत आलेल्या वेगवेगळ्या अनुभवांविषयी सांगताहेत वर्षा-आमीन.
प्रश्न - तुम्हा दोघांचं मूळ कुठलं? तुमच्या वाढीच्या काळाविषयी सांगाल?
आमीन - यवतमाळ जिल्ह्यात पांढरकवडा या गावी माझं बालपण गेलं. माझ्या वडलांचे वडील म्हणजे आमचे दादा आंध्रप्रदेशातल्या तेलंगणात राहत होते. खरंतर वडलांचंही मूळ गाव यवतमाळ जिल्ह्यातलं ‘कुर्ली’ हे गाव. मात्र कालांतरानं वडलांचे आईवडील तेलंगणाला गेले. वडील मात्र त्यांच्या काकांकडे कुर्लीलाच राहिले. तिथंच शिक्षण झालं. लग्नानंतर ते आमच्या आजोळी म्हणजे पांढरकवड्याला आले. त्यामुळं आम्ही नानांकडेच (आजोबांकडेच) राहिलो. माझे नाना हे गावातले प्रतिष्ठित आणि राजकीय व्यक्तिमत्त्व होते. गावातले लोक सल्लामसलतीसाठी नानांकडे यायचे. जनमानसावर त्यांचा सामाजिक प्रभाव होता. माझ्यावर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप होतीच. नानांच्या अंगणातच गणपतीची आणि शारदेची स्थापना व्हायची. नानांकडचं वातावरण असं सवधर्मसमभाव स्वरूपाचं होतं. दादांकडं सुट्ट्यांसाठी जायचो तेव्हा तिथंही तसंच वातावरण होतं. वृद्धपकाळानं दादांची दृष्टी गेलेली होती. तरीही ते आम्हाला ओळखायचे. दादांकडं उत्तम संभाषणकौशल्य होतं. ते आम्हाला रामायणातल्या गोष्टी रंगवून सांगायचे. वडलांच्या काकांकडं कुर्लीला जायचो. तेव्हा तिथलं वातावरणही असंच होतं. आमचे हे आजोबापण राजकीय व्यक्तिमत्त्व होते. ते पंचायत समितीचे सभापतीही होते. या सगळ्याचा गोळाबेरीज प्रभाव पडत होताच.
पुढं आठवीनंतर बाबांनी वेगळं घर घेतलं. आमच्या कुटुंबात बाबा बीएपर्यंत शिकलेले होते. त्यांचंच तेवढं शिक्षण जास्त होतं. आई चौथ्या वर्गापर्यंत शिकली होती. बाबा काही काळ एका शाळेत क्लार्क म्हणून जात होते. कालांतरानं काही काळ ते पांढरकवडा इथल्या सूतगिरणी कारखान्यात होते आणि शेवटी-शेवटी विद्युत महामंडळात त्यांना नोकरी मिळाली. त्यांनी स्वतः अत्यंत हलाखीत दिवस काढले आहेत. आम्हा भावडांना मात्र त्यांनी शिकवलं. बहिणींनी बारावी केली. भाऊ एमकॉम झाला. आमच्या घरात बुरखा पद्धत नव्हती. उलट आम्ही आई, मावशी यांच्यासोबत टॉकीजमध्ये सिनेमा पाहायला जायचो. साधारण 92-93पर्यंत म्हणजे मी दहा-अकरा वर्षांचा होईपर्यंत असंच वातावरण होतं. माझ्या मित्राचे वडील विश्वनाथ मनवर हे आंबेडकरी विचारांचे होते. त्यांच्यामुळं आंबेडकरी विचारांमध्ये शिरलो. त्यानंतर माझा दृष्टीकोनच बदलला. आपला मार्ग काय असावा हे कळायला लागलं. कालांतरानं धर्म ही संकल्पनाच फोल वाटायला लागली. अशी एकूण जडणघडण झाली.
वर्षा - माझं कुटुंब नागपूर जिल्ह्यातले. माझ्या वडलांचे चार भाऊ, दोन बहिणी असं मोठं कुटुंब होतं. हलाखीची परिस्थिती. त्यात दलित. दलित आणि गरिबी अशा दोन प्रकारच्या शापांशी झगडत संघर्ष करून ते शिकले. उभे राहिले. बाकीचे भाऊही सेटल झाले मात्र पूर्वायुष्यात जे भोगलं होतं, त्यातून त्यांचा स्वभाव कणखर आणि काहीसा तापट झाला होता. त्याचे पडसाद आमच्या आयुष्यावर उमटत होते. वडील खापरखेडा इथल्या खाजगी शाळेवर शिक्षक होते. त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी बदली व्हायची. त्यानुसार आमचं कुटुंबही फिरत होतं. साधारण मी सहा वर्षांची असेन. त्या दरम्यान एकामागून एक वेगवेगळ्या घटना घडल्या. आधी वडलांच्या हृदयाचा आजार समोर आला. त्यांच्या हृदयाची झडप निकामी झाली होती.. शस्त्रक्रियेसाठी चाळीस हजार रुपयांची गरज होती. 1983-84चा काळ तो. वडलांचा पगार होता 180 रुपये मात्र त्यांचे नातेवाईक, मित्र, शाळेतले शिक्षक, विद्यार्थी यांनी मदत केली आणि शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर लगेचच आईबाबा वेगळे झाले. मोठी बहीण आईसोबत गेली तर लहान भावाकडं आणि मी वडलांकडं राहिलो. त्यानंतर काही काळात आयुष्यात नव्या आईचा प्रवेश झाला. गाव आणि नाती एकाचवेळी बदलली गेली. जन्मदात्या आईपासून वेगळं करणं, नव्या आईची वागणूक या सगळ्याचा मनावर खोल परिणाम झाला. मी खूप शांत झाले. अबोल झाले. या सार्या घटनांनी आयुष्यच पालटून गेलं मात्र वडलांनी इतर कुठल्याही बाबतीत हयगय केली नाही. शिक्षणाच्या बाबतीत खूप पाठिंबा दिला.
पुढं मग शालेय वयातच वाचनाचं खूप वेड लागलं. हाताला येईल ते पुस्तक वाचायचं. मी वडलांच्याच शाळेत शिकायला होते. सततचं पुस्तकांचं वेड पाहून वडलांनी ग्रंथपालांना ताकीद देऊन ठेवली की, हिला पुस्तकं देऊ नका. वाचन वाढलं होतं पण कवितांचा संबंध पाठ्यपुस्तकांपुरताच होता. सातवीच्या वर्गात असताना पहिली कविता लिहिली. माझ्या एकटेपणात एक दिवस अचानक कविता, माझा हात धरुन माझी सोबती झाली. सुरुवातीला बालकविताच होत्या. पाचसहा बालकवितांनंतर मात्र समाजातले काही नाजूक विषय कवितेत यायला लागले. सामाजिक आशयाला धरून प्रचंड भावनिक कविता लिहू लागले. त्यात माझं वैयक्तिक असणं नव्हतं. कवितेत सामाजिक गोष्टी कुठून येतायत ते कळत नव्हतं. कदाचित मी जे अंतर्मुख होत गेले, त्यातून जे विचार सतत डोक्यात येत होते आणि बरोबरीला निरीक्षणं... यांतूनच कविता सुचत राहिल्या. खरंतर कवितेत माझं दुखणं यायला हवं होतं पण तसं घडत नव्हतं. माझ्या बाबांना, शिक्षकांना शंका वाटायची की, मी कविता कशी करते? पण ते कदाचित उपजतच असावं.
मग पुढं अकरावीला असल्यापासून वर्तमानपत्रात कविता,लेख छापून यायला लागले. त्यावर वाचकांची दूरदुरून पत्र यायची. पुढं डी.एड्.साठी मी दोन वर्षं नागपूरला हॉस्टेलवर राहिले. तिथं खूप खुलं अवकाश मिळालं. मनाची दारंखिडक्या उघड्या करून, जगाकडं पाहत होते त्यामुळं बर्याच समज-संकल्पना इथं आकारत गेल्या... शिवाय खूप चांगली माणसं मिळाली. घरी जे प्रेम मिसिंग होतं ते तिथं मिळत होतं. 2001मध्येच मला नोकरी मिळाली. मात्र त्याच सुमारास वडलांचं ब्रेन हॅमरेजनं निधन झालं आणि कुटुंबात एक विसकळीतपणा आला. आयुष्य असं वरखाली हेलकावे घेत पुढं चाललं होतं.
प्रश्न - तुम्ही दोघं दोन वेगळ्या ठिकाणी, आपापल्या विश्वात मश्गूल होता मग तुमची भेट कशी घडली?
आमीन - प्रत्यक्ष भेट व्हायला तर सहा वर्षं लागली.
प्रश्न - म्हणजे...
आमीन - 2001मध्ये लोकमतच्या अक्षररंग पुरवणीत वर्षाची कविता आली होती. ती कविता अमेरिकेत घडलेल्या 9/11च्या घटनेवर आधारित होती. ओसामा बिन लादेनच्या कृपेनं आम्ही भेटलो असं म्हणायला हरकत नाही. त्याचं झालं असं की, माझ्या नानांच्या घरी दिल्लीचं ‘कांती’ नावाचं साप्ताहिक यायचं. त्यात संपादकीय पानाच्या बाजूला ‘लिख रहा हूँ... जूनून में’ असं म्हणून एक कॉलम यायचा. मला तो कॉलम फार आवडायचा. वाचनाची आवड तिथूनच लागली. या साप्ताहिकात साहित्य, करंट अफेअर असं असायचं. सगळंच समाजायचं असं नाही पण मी वाचत राहिलो. मध्यपूर्व आशिया, जागतिक राजकारणावर भाष्य असायचं. इस्रायल, अफगाणिस्तान, पॅलेस्टाईन या देशांचं राजकारण कळायचं. इतिहासात मला रुची होतीच. त्यामुळं मी स्वतः पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, शीतयुद्ध यांबाबत जे-जे मिळायचं ते वाचायचो. 9/11च्या घटनेनंतर त्याबाबतही बरंच उलटसुलट वाचलेलं होतं आणि अशातच वर्षाची यावर कविता आली. ती मला प्रचंड आवडली. कवितेला दाद द्यावी म्हणून मी पत्र लिहिलं. कवितेच्या खाली वर्षाचा पत्ता होताच. मग तिचंही आभार मानणारं पत्र आलं.
प्रश्न - आणि वर्षाताईऽ तुला तोवर कवितांसाठी अशी पत्रं येत होती का?
वर्षा - होऽ कविता आवडली की ते कळवणारी पोस्टकार्डावरची पत्रं यायची. त्यांतल्या शक्य होतील तेवढ्या पत्रांना मी उत्तरं पाठवायची. आमीनचं पत्रही त्याच पद्धतीनं आलं होतं आणि मी त्यांचं कौतुक स्वीकारून आभार मानणारं पत्र लिहिलं. मग पुढं पुन्हा आमीनचं पत्र आलं आणि मग आम्ही एकमेकांना लिहीत राहिलो. आमची पत्रं कधीच वैयक्तिक स्वरूपाची नव्हती.
आमीन - आमच्या पत्रांचे विषय सामाजिक घडामोडींशी संबंधितच असायचे. त्यांत चालू घडामोडींवर चर्चा असायच्या. महिन्यातून दोनतीन पत्रं ठरलेली असायची. असं जवळपास 2006पर्यंत चाललं. दरम्यान फोनची सोय निर्माण झाली होती. मात्र तिच्या घरी फोनची व्यवस्था नव्हती. बारावीनंतरच मी आणि माझ्या भावानं एसटीडी बूथ टाकलेलं होतं. ते आम्ही तीनेक वर्षं चालवलं. पण मोबाईल वगैरेची सोय नव्हती. 2004 नंतर आम्ही फोनवर एखादवेळ बोलू लागलो. मात्र पत्रांतूनच जास्त बोलायचो. आमच्या दोघांच्याही गावांचा विचार करता 200 किलोमीटरचं अंतर होतं. त्यामुळं आम्ही खरंतर एकमेकांना पाहिलंही नव्हतं. मात्र न भेटताही कालांतरानं परकेपणा कमी होत गेला.
वर्षा - ती पत्रं कधीच प्रेमपत्रं नव्हती. पुढं आमीनच्या पत्रांतूनच लक्षात आलं की, तोही कविता करतो. त्यामुळंही आमचा संवाद राहिला. त्याच्या पत्रात त्याला आवडलेल्या कवींच्या कविता, तुकडे, शेर असायचे. पंधरावीस पानांची पत्रं असायची. आमीनचे मित्र, त्याचा सामाजिक गोष्टींतला सहभाग, त्याच्या कॉलेजच्या आठवणी अशा विविध गोष्टी त्याच्या पत्रात असायच्या. कधी अगदी त्यांच्या गावची आमराई तोडली गेली तर त्याचा तिथला वावर, झाड तोडल्यामुळं त्याला झालेलं दुःख यांवर पानपानभर तो लिहायचा. आमीनला मुस्लीम असल्यानं जे व्यक्त करता यायचं नाही, ज्या अवहेलना तो सहन करत होता, पण सांगता येत नव्हतं ते सारं त्याच्या पत्रात असायचं. काही प्रश्न असायचे ज्यांची उत्तरं मिळावीतच असं नाही पण ते कुणाला तरी सांगून त्याला हलकं व्हायचं असायचं. तरी त्यावर चार समजुतीच्या गोष्टी माझ्याकडून जायच्या. ती पत्रं म्हणजे एका संवेदनशील माणसानं एखाद्या समजूतदार मैत्रिणीला लिहिलेली पत्रं असावीत अशीच होती. प्रेमपत्रं नव्हती.
माझ्या पत्रांत माझी शाळा, शाळेतली मुलं, मित्रमैत्रिणी असायचे. गंमत सांगते, शाळेतल्या मुलांचा उल्लेख करताना मी माझी मुलं म्हणायचे त्यामुळं काही काळ तर आमीनला वाटलं की, मी कुणी पस्तीसएक वर्षांची लेकुरवाळी बाई आहे. चारेक वर्षांपर्यंत तर त्याला पत्ताच लागला नाही की, मी शाळेतल्या मुलांविषयी बोलतेय. सुरुवातीला आमीन मला वर्षाजी असं म्हणून पत्र लिहीत असे आणि मीही आमीनजी...
प्रश्न - कमालच! इतकी पाचसहा वर्षं पत्र लिहिली गेली... त्याचा सिलसिला खरा कुणामुळं टिकला?
वर्षा - आमीनमुळं टिकला असंच म्हणावं लागेल. त्याची पत्रंच अशी आणि इतक्या संवेदनशीलपणे लिहिलेली असायची की, मला त्याला प्रतिसाद द्यावाच वाटायचा.
प्रश्न - पत्रव्यवहार सुरू झाला. तो टिकला. त्यातून एकमेकांची ओळख पटत गेली पण दीर्घ काळ न भेटण्याचं कारण काय? दरम्यानच्या काळात भेटावंसं वाटलं नाही?
आमीन - नाही. पत्रांतून इतकं छान व्यक्त होणं चालू होतं की, प्रत्यक्षातल्या भेटीची निकड अशी निर्माण नव्हती झाली. ठरवून आम्ही भेटलो नाही असं नाही पण ते जमूनही आलं नाही. खरंतर पत्रांतून भेटणारी वर्षा मला आवडायला लागली होती आणि 2005मध्ये मी मनातल्या भावना व्यक्तही केल्या मात्र तोवर आमची भेट झालेली नव्हती. एकमेकांना पाहिलं नव्हतं. व्यवस्थित ओळखत नव्हतो. पत्रापुरतेच संबंध होते. सामाजिक चर्चा होती मात्र तरीही मानस काहीच नीट ठाऊक नव्हता शिवाय माझ्या नोकरीचा प्रश्न होता. ही सगळी वास्तविकता वर्षानं लक्षात आणून दिली आणि आम्ही हा विषय जास्त वाढवला नाही. मीही तिचं मत स्वीकारलं आणि तरीही आम्ही संपर्कात राहिलो.
प्रश्न - भैय्याऽ पत्राच्या आधारे तुम्ही प्रेमात कसे काय पडलात?
आमीन - नेमकं असं कसं सांगणार? आणि तसं सांगता येतं की नाही ठाऊक नाही पण तिच्या कविता मला खूप आवडायच्या. तिच्या कवितांमुळे तिच्याकडे ओढलो गेलो. तिचं पत्रांतून व्यक्त होणंही खूप मुद्देसूद, नेटकं असायचं. तिचा समजूतदार स्वभाव आणि नीट सॉर्टेड विचार करणं हे आवडलं होतं शिवाय मला टिपिकल मुलीशी पारंपरिक पद्धतीचं लग्न करायचं नव्हतं. आयुष्यभराची सोबतीण म्हणून विचार करणारी स्त्री हवी होती. वर्षा तशीच वाटत होती. धर्म अडचण वाटत नव्हती कारण मी स्वतः निधर्मी होतो. जाणत्या वयापासूनच धार्मिक गोष्टींतला सहभाग सोडून दिला होता आणि इतर कुणी मानत असेल त्यांच्याबाबत राग नव्हता.
प्रश्न - वर्षाताईऽ तू नकार देण्याचं काय कारण होतं?
वर्षा - मी आमीनला नकार असा दिला नव्हता. त्याच्याकडे तेव्हा नोकरी नव्हती हाही मुद्दा नव्हता. नोकरी नसली तरी तो कमवत होताच. शिवाय माझ्या नोकरीत भागू शकत होतं. पण माझी त्या वेळची मानसिक स्थिती अशी होती की, मला लग्न करायचं नव्हतं. वडलांच्या निधनानंतर कुटुंबात विसकळीतपणा आला होता. आई सावत्र. भाऊ लहान. त्याचं शिक्षण बाकी होतं. आर्थिक प्रश्न नव्हता मात्र वडील गेल्यामुळं मानसिक आधार संपल्यासारखं झालं होतं. एक प्रकारची अनिश्चितता होती. मनानं फार एकटी पडले होते तेव्हा. वाटायचं, लग्न हा आयुष्य बदलवून टाकणारा, नवी नाती देणारा निर्णय आहे. तो चुकला तर! मुद्दा इतकाच होता की, लग्नासाराखा मोठा निर्णय घेण्याची मानसिक तयारी नव्हती. तेवढ्याच कारणानं मी आमीनचा प्रस्ताव फार मनावर घेतला नाही.
प्रश्न - पण आज तुम्ही एकत्र आहात... मग पुढं केव्हा तुम्ही लग्नाचा विचार केला?
आमीन - आमच्या आयुष्यात योगायोग खूप चांगले घडून आलेत. एक घटना दुसर्या घटनेची नीजमाती असते म्हणतात... अगदी तसं. हायस्कुलमध्ये असताना वडील म्हणायचे, ‘शिकला नाहीस तर कपबशा धुवाव्या लागतील. दहावीपर्यंत त्यांचं एवढंच म्हणणं होतं. दहावीनंतर मात्र त्यांचं मत बदललं. ते म्हणायला लागले की, आपल्याला नोकरी लागणार नाही. आपल्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही. ‘व्यावसायिक शिक्षण घे आणि कमवता हो.’ असं म्हणायला लागले. त्यांना काही नकारात्मक अनुभव आले असतील किंवा आत्मविश्वासाचा अभाव राहिला असेल पण त्यातूनच त्यांनी आम्हाला बारावीला एमसीव्हीसी असं व्यावसायिक शिक्षण घ्यायला लावलं. हाऊस वायरिंगमधून मी आयटीआयही केलं. बारावीनंतरच एसटीडी बूथही चालवायला लागलो होतो. नगरपरिषदेची आणि ज्या कॉलेजात शिकलो तिथली वायरिंगची काम करत होतो. पण म्हणावं तसं स्थैर्य नव्हतं. घरच्यांची अपेक्षा होतीच की, कमवून घराला हातभार लावावा. तशी संधीही चालून आली. 2003मध्ये मी एसटी महामंडळात नोकरीसाठी अर्ज केला होता. त्यातून नोकरीसाठीचं बोलवणं आलं डिसेंबर 2007मध्ये. चंद्रपूर आणि नागपूर अशा दोन ठिकाणांतून मला नागपूरची पोस्टिंग मिळाली. नागपूरचं मिळणं यात योग असणार. नोकरीसाठी नागपूरला जाता येणं ही माझ्यासाठी गावातून बाहेर पडण्याची मोठी संधी होती. आमच्या लग्नाच्या दृष्टीनं हे एक प्रबळ कारण घडून आलं होतं. अर्थात 2006नंतर वर्षाचं मनपरिवर्तन व्हायला लागलं होतं ते महत्त्वाचं निमित्त...
वर्षा - सुरुवातीला माझी मानसिक स्थिती नव्हती. पुढं भावाचं लग्न झालं. सर्व सेटल झाल्यानंतर नातेवाईक आणि समाजाचा लग्नासाठी रेटा वाढला. अर्थात मला माझ्या पुर्वायुष्याची पुनरावृत्ती लग्नानंतरच्या आयुष्यात नको होती. कुटुंबाचं तुटलेपण, विसकटलेलं कुटुंब नको होतं. त्यामुळं निर्णय घ्यायचीच भीती वाटायची. शिवाय मुलगी बघण्याचा कार्यक्रमाची चीड होती. दहा मिनटांत मी कुणाला काय ओळखणार आणि कुणी मला? कदाचित दहा मिनटांपुरतं कुणी तोंडदेखलंच चांगलं वागलं आणि फसवलं तर... दाखवण्याच्या कार्यक्रमात तर अक्षरशः भांडणंच झाली. पाहायला आलेल्या मोठ्या माणसांच्या पाया पडल्या की ते पैसे द्यायचे, हा प्रकार काही केल्या मला कळायचाच नाही. त्यांनी पैसे कशासाठी द्यायचे, पाय का दाखवायचे, चालून का दाखवायचं, हे मला कळत नव्हतं. मग मी तिथंच प्रश्न केले. दोनतीन घटनांत असंच घडलं. संस्कार म्हणून कुटूंबातील, समाजातील बहुतांश स्त्रीया प्रश्न न करता ज्या परंपरा पाळत आल्या होत्या त्या जशाच्या तश्या मीही पाळाव्यात असं त्यांना वाटत होतं. घरचे, नातेवाईक मला त्या चौकटीत बांधू पाहत होते. त्यांचा दोष नाही. पण मी त्यात अडकू शकत नव्हते.
मला फक्त संवेदनशील माणूस हवा होता... ज्याच्यासोबत मला शांत आयुष्य जगता येईल. आमीन तसा आहे असं त्याच्या पत्रांतून वाटायचं. शिवाय आर्थिक बाजू काय कमावू शकतो, पण माणूसच पाहिजे तसा नसेल तर नव्यानं नाही ना त्याला घडवता येणार. त्या सुमारास एका मैत्रिणीनं समजावलं, ‘तू अरेंज मॅरेजसाठी स्थळ पाहतच आहेस तर तसेच एकदा आमीनला भेटून बघ.’ मैत्रिणीनं सुचवलं म्हणून लग्नाचा विचार घेऊनच आमीनला भेटले आणि परंपरागत लग्नासाठी ज्या बाबी बघितल्या जातात त्याचा विचार न करता त्या पहिल्याच भेटीत मी माझ्या लग्नाचा निर्णय पक्का केला.
प्रश्न - पहिल्या भेटीतच असं काय कमाल घडलं?
वर्षा - बर्याचदा माणसं लिहिताना वेगळं, आदर्श लिहितात. लिहितात. प्रत्यक्षात मात्र वेगळीच असतात. लिहिण्यातला माणूस वेगळा असतो आणि वास्तविकतेतला माणूस वेगळा असतो. मला पहिल्या भेटीत तेच चेक करायचं होतं. पहिला भेटीत तो तसाच दिसला जसा त्याच्या पत्रात तो असायचा. नोकरीनिमित्तानं तो नागपूरलाही आला. सगळंच जुळून येत गेलं. 23 मे 2008ला आम्ही मग विहारात जाऊन आधी लग्न केलं. पारंपरिक लग्न करतानाही धर्म आड येत होते. परंतु एक पारंपारिक सोपस्कार म्हणून लग्न विधी करणं आवश्यक होतं. त्यामुळं यवतमाळमधील मनवर कुटूंब, अर्चना कयापाक, प्रविण मकेसर, मोहसिन शेख, या परिवर्तनवादी सहकार्यांच्या उपस्थितीत विहारात लग्न केलं. त्यानंतर रजिस्टर पद्धतीनं विवाह केला.
प्रश्न - कुटुंबीयांना केव्हा सांगितलं मग?
वर्षा - लग्नाआधी सांगण्याची हिंमत नव्हती. आमीनच्या धर्मावरून विरोध होईल अशी भीती होती पण लग्न झाल्याबरोबर घरी वडीलधारी असलेल्या काकांना मी भेटून सर्व सांगितलं. पुढे पंधरा दिवसात काका-काकूंच्या समक्ष कुटुंबियांना सांगितलं. मात्र नेहमी लग्न कर म्हणून तगादा लावणाऱ्या आई व भावाला मुस्लिम मुलाशी मी त्यांना न सांगता केलेलं लग्न पटलंच नाही. समाजसेवेचा वारसा असलेल्या, सुशिक्षित घरातून मला प्रचंड विरोध झाला. माहेर सुटलं ते आजतागयत. लग्नाची गोष्ट सांगताच फिल्मी स्टाईलने ब्लॅकमेल करणं, धमक्या देणं हे सगळं झालं. मला माहीत होतं की, विरोध होईल पण इतके टोकाचे परिणाम होतील असा विचार केला नव्हता.
मी हा निर्णय घेतला तेव्हा माझं वय अठ्ठावीस वर्ष झालेलं होतं. मला काय हवं याचा नीट विचार करून ते शोधून निर्णय घेतला होता. मी कुठलाही निर्णय भावनेच्या भरात घेणार नाही. मी स्वतःच आर्थिकदृष्ट्या स्टेबल असताना सर्व बाजूंनी विचार करून निर्णय घेणार, याची जाणीव नातेवाइकांना होती. इतरांच्या रिअॅक्शन काय असतील, त्यावर मी काय प्रतिसाद देणार हे काही मी आधी ठरवलेलं नव्हतं. पण वाईट अनुभव वाट्याला आले. परिसरातील लोकं, माझ्या शिक्षण क्षेत्रातील मंडळी, नातेवाईक, इव्हन माझे काही मित्रमैत्रीणी या सर्वांनी मुस्लिम माणसाशी लग्न केलं, यावरुन कित्येक वर्ष त्रास दिला. स्त्रियांनी खालमानेनं चालावं, चारित्र्य सांभाळून वागावं, मुलींनी मुलांशी साधं बोलणंदेखील पाप समजावं अशा मानसिकतेत असणाऱ्या व त्यावरुन गॉसिप करणाऱ्या परिसरात मी राहत होते. तिथ मी हा निर्णय घ्यावा ही त्यांच्या दृष्टीनं मोठीच समाजविरोधी घटना होती. तसं पाहता, आमीनच्या घरून विरोध होईल असं वाटलं होतं पण उलट माझ्या घरून झाला.. कल्पना नव्हती किंवा अपेक्षा नव्हती इतका विरोध राहिला. मला त्याचं वाईट वाटलं नाही. त्यांची वैचारिक बैठक जशी होती तसं ते वागत होते.
आमीन - माझ्या घरूनही विरोध होणारच असं वाटत होतं शिवाय मोठ्या बहिणीचं लग्न बाकी होतं त्यामुळं लग्नानंतर कबीरचा जन्म होईपर्यंत आम्ही हे लग्न लपवून ठेवलं. अर्थात, माझ्या लहान भावाला, चुलतमावस भाऊ कमी मित्र असणाऱ्यांना, गावातल्या इतरही काही मित्रांना मात्र माहीत होतं. ते आमच्या घरी येऊन भेटूनही गेले होते. आईबाबांना धक्का बसेल अशी मला भीती वाटत होती. त्यांना सांगण्यासाठी योग्य वेळेच्या प्रतीक्षेत होतो पण ते जमून येत नव्हतं. 2009मध्येच मोठ्या बहिणीचं लग्न झालं. मी आंतरधर्मीय लग्न केलं म्हणून ती माझ्याशी तेरा वर्षं बोलत नव्हती. बाकी सार्या लोकांचे संबंध चांगले राहिले, पण जेव्हा सुरुवातीला सांगितलं तेव्हा खूप रडारड झाली. दोन वर्षांनी जेव्हा कळलं तेव्हा खूप रागावले. रडणं, इमोशनल ब्लॅकमेलिंग झालं. लग्न-नोकरी सोडून तू इकडं परत ये असंही म्हणाले. मी म्हटलं की, आता येऊ शकत नाही. तेही अर्थात हे सारं भावनेच्या भरात बोलत होते. उलट काही महिन्यांनीच आईबाबा आमच्या घरी आले. तेव्हापासून येणंजाणं सुरू झालं.
प्रश्न - दोन वर्षांनी लग्नाबाबत सांगूनही कुटुंबीयांनी जास्त खेचलं नाही तर...
आमीन - होऽ अपेक्षेपेक्षा खूप कमी काळात त्यांनी स्वीकारलं. सुरुवातीला आईला वर्षाच्या काही गोष्टी पटत नव्हत्या पण नंतर त्यांकडं तीही दुर्लक्ष करायला लागली. जसं की, सुरुवातीला घरात देवघर होतं. तेव्हा आई मला म्हणायची की, ती पूजा करते. टिकली लावते. मी म्हणायचो, तू दुर्लक्ष कर, ती कुठं तुला कर म्हणतेय? पण आता तर आईही तसं काही म्हणत नाही. आम्ही माझ्या सर्व नातेवाईकांकडे जातो. वर्षाचेही नातेवाईक येतात. आग्रहानं बोलावतात. दोघांनाही कुटुंबीय नीट वागवतात. कबीरला आणि वर्षाला सलाम म्हणायचं ठाऊक आहे. घरात शिरताना तेवढं म्हटलं तरी ते फार प्रश्न करत नाहीत. कबीर समंजस आहे. तो आमच्या गावी सलाम करतो तर वर्षाच्या नातेवाइकांकडं जयभीम. आमची तेलंगणाकडची भावंडं आणि त्यांची मुलं कट्टरपणा करतात. कधीतरी म्हणतात, ‘निकाह कर लेना था ।’ पण ते सांगण्यातही पुरेसा जोर नसतो. सगळं फक्त औपचारिकता म्हणून असलं तरी ते तसं बोलून दाखवतातच.
वर्षा - उलट आमीनच्या घरच्यांनी खूप लवकर स्वीकारलं. आता टिकली किंवा आणखी कुठला मुद्दा आता जुना झाला आहे, मी आणि त्याचे कुटुंब यांच्यात आमीन चांगला दुवा राहिला. सासरकडून बदलांची काही सूचना आली असेल तरी आमीननं माझ्यापर्यंत ते आणलं नाही. आमीनची इच्छा असती तर काही बदल, गोष्टी केल्याही असत्या. अर्थात आमीनसाठी केलं असतं. इतर कुणासाठी नसतं केलं... पण त्यानं कधीच कसलीही जबरदस्ती केली नाही. कारण अगदी पहिल्या पत्रापासून जात, धर्म, लिंग या बाबी सोडून आम्ही एकमेकांशी वागत राहिलो आणि जाती धर्माचे चटके भोगत जगलेल्या आम्हाला एकत्र येण्यात आमचं निधर्मी असणं हाच सर्वात महत्वाचा बेस होता.
माझ्या कुटुंबीयांच्या विरोधाचा मी जसा विचार केला नाही तसा सासरच्या लोकांबाबतही विचार केला नाही की, मला प्रयत्नपूर्वक त्यांच्या कुटुंबात शिरायचं आहे. ते सहज नैसर्गिकरित्या घडावं असच वाटत राहीलं. शिवाय पहिल्या प्रथम मी हा विचार केला की, ते जसे घडलेत त्यानुसार त्यांचं वागणं आहे त्यामुळं त्यांना चूकबरोबर ठरवणं योग्य नाही. त्यांना जेव्हा वाटेल की, मी त्यांच्या कुटुंबाचा हिस्सा आहे ते स्वीकारतील. आमीननं लग्नानंतर खूप चांगलं हॅण्डल केलं.
प्रश्न - कबीरचा जन्म झाला तेव्हा ते बाळंतपण कसं-कुठं केलं?
वर्षा - काही मित्रमैत्रिणी सोबत होते त्यांची मदत झाली. त्या वेळी आमीनच माझी 'आई' झाला. भलेही दोघांना अनुभव नव्हता पण दोघांचा म्हणून थोडा थोडा अनुभव होता. त्यातून कबीरला सांभाळलं. कुटुंबाचं म्हणून जे करणं अपेक्षित होतं ते आमीननंच केलं. ज्या वेळीस आम्ही अडचणीत होतो तेव्हा आमीनच होता. ते तेव्हा सोबत नव्हते त्यामुळं आता त्याचं काहीच वाटत नाही.
प्रश्न - तुमची दोघांची नोकरी आणि कबीर हे कसं मॅनेज केलंत?
आमीन - गावातल्याच दोनतीन शेजारी कुटुंबांकडं तो असायचा. वर्षा शाळा संपवून आली की कबीरला त्यांच्याकडून घ्यायची.
वर्षा - दोघंही नोकरीवर असल्यानं आणि घरी कुणी दुसरं नसल्यानं कबीरचा सांभाळकरणं ही खूप जास्त तारेवरची कसरत होती. त्याच्या छोट्याछोट्या आजारपणात प्रचंड घाबरुन जायचो आम्ही. तो केवळ चार महिन्यांचा असल्यापासून त्याला माझ्या शाळेत घेवून जायचे. पण आम्ही ज्या मोहपा गावी रहायचो तिथं आम्हाला खूप चांगली माणसे भेटली. जाती धर्म किंवा रक्ताचे नातेवाईक नसलेल्या तिथल्या रंजना चिमोटे आणि मंजुषा कोठेकर या कुटुंबीयांनी कबीरचा अगदी जिव्हाळ्याने सांभाळ केला. त्याला भरभरुन प्रेम दिलं. शाळेतले पोतले सर, महाजन कुटुंब हे कायम आमच्या सुखदुखात सोबत राहिले. आजही ते कबीरवर तेवढच प्रेम करतात. आता तर कबीर स्वतंत्रपणे एकटा राहू शकतो. शिवाय बाहेर कुठल्या कविसंमेलनाला, साहित्यविषयक कार्यक्रमांना, सामाजिक कार्याच्या कार्यक्रमांना, जायचं असेल तर कबीरला सोबत घेवूनच आम्ही तिघे जातो.
लहानपणापासून तो आमच्या आणि इतर कवींच्या कविता ऐकत आलाय. यादरम्यान आमीनच्या जॉबचे टायमिंग जास्त असलं तरी त्यानं वेळोवेळी पूर्ण साथ दिली मला. लग्नापर्यंत ग्रॅज्युएशन झालं होतं. लग्नानंतर एम. ए. मराठी, इंग्लिश, बी.एड, केलं. नेट परीक्षा पास केली. शिक्षणात, घरकामात, कबीरला सांभाळण्यात त्यानं खूप मदत केली आहे., लहान मुलं सांभाळण्याचा दोघांनाही अनुभव नाही पण दोघांकडचा थोडा थोडा अनुभव घेऊन आम्ही कबीरला वाढवलं. आमीनचं पहिल्यापासूनच घरकामात मदत आहे. अमुक काम बाईचं -पुरुषाचं असं म्हणून नाही तर एखादं काम पडलंय, आपल्याकडं वेळ आहे तर पटकन ते करून घ्यावं असा छान स्वभाव आहे.
प्रश्न - कबीरच्या संदर्भातून त्याच्या जडणघडणीचा काही विचार ठरलाय?
आमीन - तो सहा ते आठ तास इतरच कुटुंबीयांकडं असायचा त्यामुळं त्यांच्या घरगुती वातावरणानुसार पूजाअर्जा, कपाळाला गंध लावणं हे तो आनंदानं करतो. काही मुस्लीम लोक म्हणतात, ‘तुमचा मुलगा हिंदूंप्रमाणे वागतो. तो मंदिरात जातो. टिका लावतो.’ म्हटलं, त्याला चांगलं वाटतंय तर करू द्या. मी म्हणतो, ‘उसको अच्छा लगता है तो करने दो।’ ठरवून कुठल्याही धर्माचे संस्कार करू नयेत असं आम्हाला वाटतं. या अनुषंगानं आम्ही नाहीच काही समजवायला जात.
प्रश्न - घरात कोणती भाषा बोलता तुम्ही?
आमीन - आम्ही आमच्या घरी मराठी बोलतो. माझ्या घरी गेलो की हिंदीत बोलतो. अर्थात तिथंही मी आणि वर्षा मराठीच बोलतो. वर्षा आणि कबीर आईबाबांशी हिंदीत बोलतात.
प्रश्न - गावातल्या लोकांकडून आंतरधर्मीय लग्नाबाबत काय प्रतिक्रिया उमटल्या?
आमीन - सुरुवातीला लोक म्हणायचे की, अशी लग्नं टिकत नाहीत. दोनतीन वर्षं टिकतात मग तुटतात. दोनतीन वर्षांत घटस्फोट होतो. काही वैचारिक लोक होते. काही लोकांना चांगलं वाटायचं. त्यांनी भरपूर मदत केली. सहकार्य केलं.
प्रश्न - घरकामातल्या मदतीविषयी सांगितलंच पण आर्थिक जबाबदार्यांचं काय?
वर्षा - त्याबाबत आमचे संयुक्त निर्णय असतात.
आमीन - निर्णय वर्षा घेते आणि ते एक्झ्क्यिुट करण्याचं काम माझ्याकडं असतं.
प्रश्न - आमीनभैय्याऽ अगदी सुरुवातीलाच तुम्ही म्हणालात, ‘धर्म, सर्वधर्मसमभाव संकल्पना फोल वाटते... थोडं उलगडून सांगाल?’
आमीन - एकच कारण नाहीये. अजाणत्या वयापासून घटनांची शृंखलाच आहे असं म्हणावं लागेल. सवधर्मसमभावाचे संस्कार अजाणत्या वयापासूनच सुरू होतात. एके काळात लोकांच्या घराला कडीकोयंडेही नसायचे. जातधर्मही कुणी कुणाला विचारायचे नाहीत. जातिनिहाय वस्त्या होत्या पण त्या वस्त्यांमध्ये भिंती नव्हत्या. त्या मला कधीही लहानपणी दिसल्या नाहीत. आमच्या नानांचं तर एकच मुस्लीम घर होतं. तरीही कधी परकेपणा, उपरेपणा नव्हता. लोकव्यवहारात हिंदी बोलणारे मुस्लीम, नंतर धारणा माहीत होत्या. मुस्लिमांमध्येही जाती असतात हे वयाच्या पंचविशीनंतर माहीत होत गेल्या. अभ्यास करत गेलो, जाणवलं की, 92च्या घटनेनंतर बुरखा, रथयात्रा, आंतरराष्ट्रीय राजकारण, भांडवलशाही मुक्त बाजारपेठ यांतूनच घडत आहे. एकीकडं आपण मानतो की, ‘मजहब नहीं सिखाता, आपसे में बैर रखना ।’ पण दुसरीकडं असं दिसत होतं की, धर्मच एकमेकांमध्ये फरक करायला, श्रेष्ठ-कनिष्ठ करायला शिकवतो. हे सगळं विचित्र वाटत होतं.
आपल्या देशात धर्म-द्वेष आणि जातिद्वेष हा सुप्तपणे भिनलेला आहे. आपल्या चारचाकीवर मराठा, राजपूत लिहीतात. पण महाराने महार लिहीलं किंवा मुस्लिमाने मुस्लिम लिहिलं तर काय प्रतिक्रिया राहिल याची कल्पना करु शकतो... जातिव्यवस्थेनुसार-धर्मव्यवस्थेनुसार खासगी आणि सार्वजनिक जगणं आहे. जातीय-धार्मिकच मानसिकता आहे. राजकीय वातावरण आहे. एका दिवसातलं परिवर्तन नाही. वर्षानुवर्षं खतपाणी घालून वाढवलं आहे. ते बदलण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. देश आणि समाज आजही धर्मसापेक्ष असाच आहे.
प्रश्न - तुमच्या सहजीवनाची भिस्त आणि आंतरधर्मीय विवाहाचं काय महत्त्व वाटतं?
वर्षा - लग्न हा माझा वैयक्तिक निर्णय होता त्यामुळं आपण काहीतरी परिवर्तनासाठी लग्न केलंय आणि ते आता टिकवून दाखवायचं आहे असं कुठलंच बॉदरेशन मला नाही पण आपला समाज पाहता, अशा तर्हेनं जाणीवपूर्वक लग्न कणार्याला घडवून आणावं लागेल. त्यानंतर काही काळानं असं होईल की, ते सोपंसहज होईल. कितीतरी लोकांची लग्न जातिधर्मामुळं झाली नाही. आजही होत नाहीत. अशा लग्नाचं निर्णय घ्यायचं म्हणजे मोठी किंमत चुकवावी लागते. ताणताणाव, समाजातून होणारी अवहेलना सोसावी लागते. परिवर्तनाच्या गप्पा मारायला सोप्या असतात. मात्र सगळ्यांना ते नाही जमत, घाबरतात. समाजाचा, कुटुंबाचा विरोधाचा सामना करण्याची सगळ्यांमध्ये हिंमत नसते. पण काळ असा यायला हवा की हे सगळं नॅचरली व्हायला हवं. मी जे दलित समाजातून आलेय कि आमीन मुस्लीम. तर तिथल्या अवहेलना थांबायला हव्यात. स्वातंत्र्यानंतर जी धर्मव्यवस्था बदलली आहे,जातीव्यवस्था बदलली आहे असं म्हंटलं जातं ते चित्र खरंच पालटलं आहे का. आम्ही लग्न केलं ते समाजपरिवर्तन करायचं म्हणून नव्हतं पण या गोष्टी व्हायला हव्यात.
देशाच्या कुठल्याही दंगल झाली, बॉम्बस्फोट झाला की आजही अम्मी आमीनला 'तू घराबाहेर पडू नकोस' म्हणून भितीमुळे बजावते. मी ज्या शिक्षणक्षेत्रात काम करते तिथंसुद्धा माझ्या दलित असण्यावरून, स्त्री असण्यावरुन मला अप्रत्यक्षपणे दुय्यमपणाचा सामना करावा लागतो. संविधानामुळे कायद्याच्या धाकाखाली आजही माणसे हे सर्व भेद मनात घेवून, संधी मिळेल तेव्हा त्याला जागा देत वागत राहतात. किती पिढ्या हे चालणार माहित नाही. पण हे भेद निदान आमच्या घरी, आमच्या मुलात येणार नाही याची आम्हाला खात्री आहे.
(मुलाखत व शब्दांकन - हिनाकौसर खान)
greenheena@gmail.com
'धर्मरेषा ओलांडताना' या सदरातील इतर मुलाखतीही वाचा:
दिलशाद मुजावर - संजय मुंगळे
Tags: प्रेम आंतरधर्मीय विवाह वर्षा ढोके आमीन सय्यद हिनाकौसर खान-पिंजार हिंदू दलित मुस्लीम धर्मरेषा ओलांडताना love interfaith marriage varsha dhoke amin sayyed heenakausar khan dalit muslim मुलाखत interview Load More Tags
Add Comment