सईदा शानेदिवान आणि सतीश चौगुले. प्रेमासाठी कुटुंबीयांची दीर्घकालीन नाराजी स्वीकारण्याचं, एकटेपणानं आयुष्य नव्यानं सुरू करण्याचं धाडस खूप कमी लोकांमध्ये असतं. सईदा-सतीश यांनी ते करून दाखवलं. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात दोघांची भेट झाली. मैत्रीतून प्रेमही झालं. मात्र त्याची प्रचिती यायला त्यांना बराच अवकाश लागला. अगदी सईदा यांचं लग्न ठरलं तेव्हा त्या दोघांना एकमेकांच्या प्रेमाची जाणीव झाली आणि अजूनही वेळ गेली नाही असा विचार करून त्यांनी लग्नासाठी पाऊल उचललं.
घरच्यांना अडचणीत टाकून लग्न करतोय तर कुटुंबीय आपल्यापासून तुटतील याची भीती असतानाही ते 6 मे 1996 रोजी विवाहबंधनात अडकले आणि कुटुंबीयांनी अपेक्षेप्रमाणे त्यांच्याशी नातं तोडलं. प्रेम मिळालं, कुटुंब सुटलं अशा पेचातही दोघांनी एकमेकांवर जीवापाड प्रेम केलं; एकमेकांना आधार दिला आणि धीरानं मार्गक्रमण करत कुटुंबीयांनाही पुन्हा आपलंसं केलं... तेही एकमेकांच्या साथीनं.
सईदा या मूळच्या कोल्हापूरच्या. आईवडील, एक बहीण व भाऊ यांच्यासोबत चार चुलत्यांच्या एकत्र मोठ्या कुटुंबात त्या वाढल्या. कुटुंब सुशिक्षित होतं त्यामुळं शिक्षणाची पूर्ण संधी मिळाली. त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून हिंदी विषयातून एमफिल केलं.
सतीश चौगुले हे मूळचे कोल्हापूरमधल्या पारगावचे. आईवडील, तीन बहिणी आणि आजी असं त्यांचं कुटुंब होतं. वडील प्राथमिक शिक्षक होते तर आई घर व थोडीफार जी शेती होती ते सांभाळायची. प्राथमिक शिक्षण आपल्या मूळ गावी केल्यानंतर ते महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी सातरा-कोल्हापुरात आले. शिवाजी विद्यापीठातून इतिहास विषयातून त्यांनी एमए केलं. इथं त्यांच्या ज्ञानाच्या, समजुतीच्या कक्षा रुंदावत गेल्या. वेगवेगळ्या चळवळींच्या ते संपर्कात आले. इस्लामपूरमधली जातपंचायत मोडून काढण्यात ते आघाडीवर राहिले. वाळव्यातील (जि. सांगली) कॉलेजवर ते इतिहास विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत आणि अंधश्रद्धा निमूर्लन समितीत त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
सईदा आणि सतीश यांच्या लग्नाला याच वर्षी पंचवीस वर्षं पूर्ण झाली. त्यांना समीर नावाचा एक मुलगा आहे. त्याचं नुकतंच इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण झालं असून तो स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे.
योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन सुरू झालेल्या सईदा-सतीश यांच्या सहजीवनाबाबत त्यांच्याशी केलेल्या या गप्पा...
प्रश्न - तुम्हा दोघांचं बालपण कुठं गेलं? जडणघडण कशी झाली?
सतीश - माझं गाव कोल्हापूर जिल्ह्यातलं पारगाव. मी मागासलेल्या जातीतून येतो. माझं शालेय शिक्षण पारगाव इथंच झालं. बीएच्या पहिल्या वर्षासाठी मी सातार्याला गेलो. द्वितीय-तृतीय वर्ष आणि एमए कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठातून केलं.
लहानपणी मी खूप वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो. त्या निमित्तानं वाचनही होतं. भरपूर वाचायला आवडायचं. उलट लहानपणी माझ्यावर हिंदुत्ववादी विचारांचा काहीसा प्रभाव होता. मागासलेल्या जातींवरही हिंदुत्ववादी विचारांचा प्रभाव असतोच. मी ज्युनिअर कॉलेजमध्ये असताना सगट नावाचे माझ्या वडलांचे प्राध्यापकमित्र होते. त्या दिवसांत मी कपाळावर भगव्या रंगाचा नाम ओढायचो. या सगट सरांचा माझ्या अशा वागण्यावर आक्षेप होता. ते कुणा ना कुणाकरवी मी नाम ओढू नये असा निरोप पोहोचवायचे. मला त्यांचा आक्षेप खटकायचा. त्याचदरम्यान सातार्यात राष्ट्रसेवा क्रांती दलाच्या संपर्कात आलो. त्यांच्या बैठकांना जायला लागलो. तिथला एक अनुभव माझ्या चांगलाच स्मरणात राहिला.
मी साताऱ्यात सदर बाजार भागात राहत होतो. तिथे लक्ष्मी टेकडी नावाची एक वस्ती नावाची एक टेकडी होती. त्या टेकडीवर वेगवेगळ्या जातिधर्मांची आणि वेगवेगळ्या भाषा बोलणारी काही कुटुंबं होती. त्या मुलांना शिक्षणाचा काही गंध नव्हता. राष्ट्र सेवक क्रांती दलाचे कार्यकर्ते त्यांच्या जन्माचा दाखला काढण्यापासून त्यांना शाळेत दाखल करण्यापर्यंत सगळी काम स्वखुशीनं करत होती. रोज संध्याकाळी त्यांचा खेळ घेणं, अभ्यास घेणं हे काम करत होती. मला ते खूप भावलं. मी त्यांच्यात समरसून गेलो आणि ठरवलं की, आपल्याला असंच काहीतरी काम करायचं आहे.
पुढं वर्षभरातच मी कोल्हापूरला गेलो. कॉलेजजीवनात मी वेगवेगळ्या चळवळींशी जोडला गेलो. प्रामुख्यानं राष्ट्र सेवक क्रांती दल या संघटनेत मी सामील झालो. छात्रभारती या विद्यार्थी संघटनेतही काम करायला लागलो. या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर आम्ही आंदोलनं, मोर्चे काढले.
छात्रभारतीचं काम चालू असतानाच मी विज्ञान प्रबोधिनी या संघटनेच्या संपर्कात आलो. निहाल शिपूरकर, उदय गायकवाड, विद्याधर सोनी या मित्रांबरोबर मी विज्ञान प्रबोधिनीचं काम करायला लागलो. कोल्हापुरात असताना राष्ट्रसेवा दलातल्या मोठमोठ्या मंडळींशी भेटी झाल्या आणि मोठ्या पदावर असणारी ही माणसं इतकी साधी आहेत हे पाहून आपल्या वागण्यातही बदल करायला हवा हे माझ्या लक्षात आलं. त्याआधीचं वागणं हे एक तर्हेचं थोतांड आहे हे लक्षात आलं.
पुस्तकांसोबतच भेटणार्या विविध माणसांमुळेही मी घडत गेलो. प्रत्यक्ष वागण्याबोलण्यातून अनेक चांगले संस्कार माझ्यात रुजत गेले. जीवनविषयक दृष्टी प्राप्त होत गेली. अंतर्बाह्य जडणघडण होत गेली.
लग्नानंतर कोल्हापूर सोडावं लागलं. सातार्यात काही काळ नगरपालिकेत ठेके पद्धतीनं कारकून म्हणून लागलो. पुढं सांगली जिल्ह्यातील वाळवा या गावी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या क्रांतिसिंह नाना पाटील कॉलेजवर इतिहासाचा प्राध्यापक म्हणून रुजू झालो. कॉलेज विनाअनुदानित होते. तीन वर्षं वाळव्याला राहिलो. त्या काळात स्वतःच्या संसाराची घडी बसवण्यात मी व्यग्र राहिलो त्यामुळं काही काळ सामाजिक कार्यापासून दूर राहिलो.
पुढं आम्ही इस्लामपूरला आलो. त्यानंतर तिथं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली. या काळात बुवाबाजीच्या भांडाफोडच्या मोहिमेत होतोच. पण जातपंचायतींवर मी स्वतंत्रपणानं काम केलं. जातपंचायतीविरुद्ध भूमिका घ्यायला बरेचदा कार्यकर्तेही डगमगायचे. मात्र मी कायमच या भूमिकेवर कायम राहिलो.
काही वेळा आमच्या शाखेत ना... मला विरोधही व्हायचा. पण मी नेटानं ते करत राहिलो. सुरुवातीला डोंबारी समाजाची जातपंचायत मोडून काढली. त्या वेळी त्याच समाजातल्या काही तरुण आमच्या बाजूनं उभे राहिले. यानंतर आणखीन चारपाच जातपंचायती मोडून काढल्या. जात आणि शेतकरी हा माझ्या कामाचा बिंदू कायम राहिला.
सईदा - माझा जन्म कोल्हापूरच्या लक्ष्मीपुरी इथं झाला. माझी आई मिरजेची. तिला चार बहिणी. वडलांनाही तीन भाऊ. मला एक मोठी बहीण आणि एक भाऊ. मी सगळ्यांत लहान. वडलांनी विविध शैक्षणिक पदव्या घेतल्या होत्या. घर एकदम सुशिक्षित होतं. त्या काळात आमच्या आत्यासुद्धा उच्चशिक्षित अशाच होत्या.
मुलगीमुलगा असा भेद आमच्या घरात अजिबात नव्हता. आमचे चुलते स्वतंत्र होते, पण आम्ही राहायला एकाच ठिकाणी होतो. आमचं आमच्या गल्लीत एकच मुस्लीम कुटुंब होतं. गल्लीत माळी, सिंधी, मारवाडी अशी विविध कुटुंबं होती. शेजारपाजरच्या मैत्रिणींसोबत आम्ही भोंडला खेळायचो, सणासमारंभांत सामील व्हायचो. मोहरमचं मातम माहिती होण्यापेक्षा गणपती आले, गौरी आल्या हे आम्हाला आधी कळायचं.
हवं तेवढं शिकण्याची पूर्ण मोकळीक होती. त्यामुळे मी हिंदी विषयातून एमफिलपर्यंत शिक्षण घेऊ शकले. लग्नाबाबतही कुठला हट्ट नव्हता. आमच्या वेळी मुली अठरावीस वर्षांच्या झाल्या की लग्न व्हायचं, पण घरात त्याबाबतही कुठली जबरदस्ती नव्हती. माझं लग्न झालं तेव्हा मी 25 वर्षांची होते. पण त्याआधी कुणी उगाच त्यावरून बळजबरी केली नाही. माझं आयुष्य सरळ होतं. चळवळी, सामाजिक कामं यांच्याशी माझी कुठलीही ओळख नव्हती. सतीशच्या संपर्कात आल्यानंतरच त्याची माहिती होत गेली.
प्रश्न - तुमच्या दोघांची भेट कुठं झाली?
सतीश - शिवाजी विद्यापीठात. मी इतिहास विषयातून एमए करत होतो तर ती हिंदी विषयातून... तरीही आमची भेट तिथं झाली. मी विद्यार्थी संघटनेचं काम करत होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी अनेक मुलंमुली विद्यापीठातल्या लायब्ररीच्या कट्ट्यावर भेटायची. हिंदीच्या मैत्रिणींचा सईदाचा मोठा गटही तिथं यायचा. आमच्या गटासोबत नुसतं असण्यानंही अनेक मुलांचे प्रॉब्लेम्स सुटायचे.
रॅगिंग हा शब्द अलीकडे आला, पण तेव्हाही होस्टेलमध्ये किंवा अन्यत्र मोठी मुलं त्रास द्यायची. पण एखादा आमच्या गटातला आहे, आमच्या सोबत असतो हे माहीत झाल्यानंतर कुणीही त्याच्या वाटेला जायचं नाही. त्याच कारणानं मुलीही कट्ट्यावरती यायच्या. त्या दिवसांत मुलींनाही मोठी मुलं त्रास द्यायची. पण आमच्यासोबत असल्यानं त्यांच्या वाट्याला कुणीही जायचं नाही. आम्ही काहीतरी चांगलं काम करतो अशी इमेज त्यांच्या मनात आमची होती.
त्यानंतर आमची ग्रुप म्हणून खूप चांगली मैत्री झाली. एकत्र जेवणं, एकत्र फिरणं यांतून आमचा सहवास वाढला. कॉलेजजीवनातही आपल्याला मित्रमैत्रिणींच्या आधाराची खूप गरज असते. सईदाचा त्याबाबत खूप आधार वाटायचा. तिला आत्ता आठवत नसणार, पण त्या काळात तिनं मला बर्याच गोष्टींमध्ये खूप साथ दिली. सर्वांना समजून घेण्याची, सगळ्यांची काळजी घेण्याची तिची वृत्ती मला खूप आवडली होती. कुठलीही गोष्ट करताना ती सर्वांचा विचार करायची. अगदी साधं चहा प्यायलाही मित्रमैत्रिणींपैकी कुणी नसेल तर ती आवर्जून त्यांचं नाव घ्यायची. सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा तिचा स्वभाव मला आवडला होता.
सईदा - आमची मैत्री झाल्यामुळं आम्ही एकमेकांच्या अधिक संपर्कात आलो. तो एक चांगला माणूस आहे याची वेळोवेळी खातरी होत होती. माझा चळवळीशी तोवर अजिबात संबंध नव्हता. पण सतीश करत असलेलं काम, इतरांसाठी धडपडणं, चांगुलपणा यांचा प्रभाव माझ्यावर पडत गेला. आम्ही जवळपास तीनेक वर्षं एकमेकांच्या संपर्कात होतो. एमए झाल्यानंतर त्यानं कोल्हापुरातच नोकरी धरलेली होती. पण आम्ही एकमेकांजवळ आमच्या मनातल्या भावना व्यक्त केलेल्या नव्हत्या.
सतीश - मी सईदाच्याच मैत्रिणीजवळ माझ्या मनातल्या भावना व्यक्त केल्या होत्या. मात्र ‘सईदाच्या मावशीच्याच मुलासोबत तिच्या लग्नाबाबतची चर्चा चालू आहे. त्यामुळं तू काही फार विचार करू नकोस. अगदीच वाटत असेल तर घरी जाऊन तिच्या वडलांकडं मागणी घाल.’ असा सल्ला तिनं दिला. अर्थात तोपर्यंत सईदाच्या मनात काय आहे याची कल्पना नव्हतीच त्यामुळं मी गप्प झालो आणि तिचं घर कितीही सुशिक्षित पुढारलेलं होतं तरीही एका हिंदू मुलाची मागणी थोडीच पचणारी होती.
प्रश्न - सईदा यांचं लग्न ठरलं होतं. एकमेकांजवळ प्रेमाची कबुली दिलेली नव्हती. एकमेकांच्या मनातलं माहीत नव्हतं तर मग पुढचा चमत्कार काय झाला तो जाणून घ्यायची फारच उत्सुकता आहे...
सतीश - आम्ही एकमेकांजवळ भावना बोलून दाखवल्या नसल्या तरी कदाचित एकमेकांविषयीची ओढ लक्षात येतच असणार. त्या वेळेस काही आम्हाला त्याचा उलगडा झालेला नव्हता शिवाय आम्हा मित्रमैत्रिणींचं एकमेकांच्या घरी जाणंयेणं होतंच. तिच्या घरचा सुशिक्षितपणा, श्रीमंती मला दिसत होती. मी आपला खेड्यातला. घरची परिस्थितीही ठीकठाकच होती.
मग एके दिवशी अचानक सईदा मला भेटायला आली. म्हणाली, 'माझं लग्न ठरलंय.' मग तिनं तिच्या लग्नाची पत्रिका दाखवली. चारपाच दिवसांवर तिचं लग्न आलेलं होतं आणि ती पत्रिका पाहून मला एकदम वाटलं की, आपल्या हातून काहीतरी निसटतंय. एकदम त्रास व्हायला लागला. मी तिला थेट म्हणालो, 'प्रेमबीम कशाला म्हणतात ते मला कळलं नाही. पण तू सोबत हवीस, तुझ्याशी लग्न करावं असं नेहमीच वाटलं. पण तुला जर असं काही वाटत असेल तर आपण लग्न करू यात.' ती म्हणाली, 'मला थोडा वेळ दे.' अगदी चारपाच तासांत तिनं होकार कळवला म्हणजे तिच्याही मनात ते होतंच.
सईदा - माझ्या घरी लग्नाची पाचसहा वर्षांपासूनच चर्चा सुरु होती... ऑफिशिअल साखरपुडा करून वगैरे लग्न ठरवलेलं नव्हतं. पुढं विद्यापीठात सतीशशी ओळख झाली आणि त्याचं व्यक्तिमत्त्व खूप आवडलं होतं... मात्र त्याला ते सांगण्याची हिंमत झाली नव्हती. मी थोडी घाबरटच होते. पण जेव्हा लग्न ठरून प्रत्यक्ष तारीखच जवळ आली तेव्हा आपण कोल्हापूर सोडून दुसरीकडे जायचं या कल्पनेनंच मी हादरले. सतीशशिवाय आपण राहू शकत नाही याची जाणीव झाली. काय करावं हे समजत नव्हते.
सतीश - तिच्या लग्नाच्या पत्रिका वाटून झालेल्या होत्या आणि लग्न अवघ्या दोन दिवसांवर होतं. आमच्या हातांत अगदी काही तास होते. मी माझ्या एका मित्राला, विद्याधर सोहनीला सांगितलं की, आम्हाला तातडीनं लग्न करायचं आहे. मित्रानं हमी भरली. आमच्या मित्रांची एक पद्धत होती. लग्न करायचं आहे म्हटल्यानंतर कुणीही कुणाला वैयक्तिक माहिती विचारण्याच्या भानगडीत पडत नव्हतं. मित्रानंच लग्नाची तयारी केली. आमची तातडीची गरज बघता आमचं वैदिक पद्धतीनं लग्न केलं. पुढं दोन महिन्यांनी आम्ही पुण्यात विशेष विवाह कायद्याखाली लग्न केलं.
प्रश्न - लग्न केल्यावरही तुम्ही कोल्हापुरातच थांबलात?
सतीश - नाही. ते शक्यही नव्हतं. तो सगळा बाबरी मशीद प्रकरण, 93चा मुंबई बॉम्बस्फोट या घटनांनी प्रभावित काळ होता. हिंदू-मुस्लीम प्रेमविवाह म्हटलं की महाराष्ट्रात कुठंही तणाव निर्माण होण्याची शक्यताच जास्त होती. आमच्या लग्नामुळं कोल्हापुरात काही घडायला नको या भावनेनं आम्ही तातडीनं कोल्हापूर सोडायचं ठरवलं. प्रशांत साळुंखे या आमच्या सातार्याच्या मित्राकडे जाण्यासाठी निघालो. त्याला आधी काहीही कळवलं नाही. तेवढा वेळच आमच्या हातांत नव्हता.
आम्ही सातार्याच्या बसस्टॅन्डला उतरल्यावर त्याच्या घरी फोन केला तेव्हा तो घरी नव्हता. त्याच्या बायकोनं, नयनानं फोन घेतला आणि ती पटकन म्हणाली की, तुम्ही वेळ न दवडता आधी घरी या. तिनं प्रशांतला बोलावून घेतलं. घरी आल्यावर त्यानं आमची त्याच्या भावाकडे (नितीनकडे) राहण्याची सोय केली. चारपाच दिवस तिथं राहिलो.
तिथं राहणंही सुरक्षित नव्हतं. मग पुण्याच्या जवळ गोविंद शिंदे हा रिक्षा ड्रायव्हर कार्यकर्ता आमच्या मदतीला आला. त्याच्या घरात बाथरूमची सोयही नव्हती. अतिशय साधी परिस्थिती होती. मात्र त्याचे कुटुंबीय अतिशय प्रेमळ होते. त्यांनी आम्हाला आसरा दिला. तिथं काही दिवस राहून थेट पुण्यात मीनाज सय्यद यांच्या घरी गेलो. पुढे मिलिंद आणि अनघा यांच्या घरी राहिलो. याकाळात मिनाज,अजय भिंताडे,मनीषा,सुनील पैलवान आणि अनघा –मिलिंद यांनी आमची खूप काळजी घेतली. अन्वर राजन यांची भेट झाली.
आमचं वैदिक पद्धतीनं लग्न झालं तरी त्याची नोंदणी होणं आवश्यक होतं. आम्हाला कुणाचंही धर्मांतर करायचं नव्हतं. त्या काळात विशेष विवाह कायद्याचे फार कडक नियम नव्हते. आम्ही सईदाचा पत्ता म्हणून अन्वर राजन यांच्या घराचा पत्ता दिला आणि माझा राहण्याचा पत्ता म्हणून माझा एक मित्र सुनील पैलवान याचा पत्ता दिला आणि पुण्यातच आम्ही विशेष विवाह कायद्यानुसार पुन्हा लग्न केलं.
हे भरकटणं थांबवून आता आम्हाला नोकरीपाण्याचं पाहण्याची नितांत गरज होती. मग आम्ही साताऱ्याला आलो. इथं सुरुवातीला नगरपालिकेत ठेकेपद्धतीनं कारकून म्हणून नोकरी लागली. साताऱ्यातील मुक्कामात प्रशांत,अजित,आणि नितीन हे साळुंखे बंधू, त्यांच्या कुटुबातील सर्वजण तसेच श्रीधर चैतन्य,जयंतराव उथळे,उथळे वहिनी, संजय साळुंखे यांचा खूप मोठा आधार होता. आणि काही दिवसांनी वाळवा कॉलेजवर प्राध्यापक म्हणून रुजू झालो. राजरतन जाधव हा कोल्हापूरचा मित्र त्याला नोकरी नसतानाही आम्हाला पैसे पाठवून देत होता. मनीऑर्डरचा खर्च नको म्हणून तो आम्हाला जे पत्र पाठवत होता त्या पत्राच्या लिफाप्यातून पैसे पाठवत होता.
प्रश्न - तुम्ही घरातून पळून गेलात. लग्न केलं. त्यावर घरातल्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती?
सतीश - आम्ही पळून आलो तेव्हा सईदाचं लग्न दोनच दिवसांवर आलेलं होतं. त्यामुळे आमचा शोध घेऊन तिला घरी परत घेऊन जाणं हा त्यांचा प्रयत्न होता. त्यांतल्या काही नातेवाइकांनी मला जीवे मारायचं नियोजनही केलं होतं. अर्थात हे आम्हाला नंतर त्याच लोकांनी सांगितलं... पण सईदाच्या वडलांनी खूप समंजसपणाची भूमिका घेतली. त्यांनी नातेवाइकांना सांगितलं, 'लग्नाचा निर्णय त्या दोघांनी घेतलेला आहे आणि आता त्यात आपल्याला काही करता येणार नाही. मारण्याबिरण्याचा वाईट विचार तर तुम्ही मुळीच करू नका.'
आम्ही कोल्हापुरातल्या रूपा शहांच्या घरी लग्न केलं होतं. रूपा शहा यांनी आमच्या घरी फोन करून सांगितलं की, 'सतीश आणि सईदा या दोघांनी लग्न केलं आहे आणि त्यात माझा पुढाकार होता.' आम्ही लग्न केल्याची बातमी घरच्यांना माहीत झाली मग सईदाच्या नातेवाइकांनी माझं घर, माझ्या बहिणींची घरं, मित्रांची घरं इथं शोधाशोध सुरू केली. माझे कॉलेजमधले मित्र वेगळे होते आणि चळवळीतले मित्र वेगळे होते. चळवळीतल्या मित्रांसमोर आम्ही लग्न केलं होतं. त्या मित्रांनी काही आमची बातमी फुटू दिली नाही.
'तूझे वडील दवाखान्यात अॅडमीट आहेत. तुम्ही दोघे परत या.' असे फोन मला आले. पण परत न जाण्याचा आमचा निर्णय ठाम होता. आम्ही सईदाला सोडावं यासाठी सईदाविषयी खोटीनाटी माहिती आमच्या घरच्यांना सांगणारेही लोक होते. पण तरीही आमचा निर्णय बदलला नाही.
चळवळीतले इतके लोक आमच्यासोबत होते की, सगळ्या वाईट प्रसंगांतून आम्ही सावरत गेलो आणि पुढं तर आम्ही इतरांच्या लग्नांत मदत करण्याइतपत सक्षम झालो. तो तीनचार वर्षांचा काळ खूप त्रासाचा होता. मानसिकदृष्ट्या त्रासाचा काळ अजूनही आहेच, तो त्रास सहन करतच पुढे जावं लागतं.
सईदा - अगदी आत्ता अलीकडं लोक म्हणतात तेव्हा आधी थोडी कल्पना द्यायची होतीस. आम्ही तुझं लग्न लावून दिलं असतं. घरातलंच स्थळ होतं. आपण त्यांना समजावलं असतं. पत्रिका वाटून झाल्यानंतर असं करायला नको होतं. पण त्या वेळेस तशी परिस्थिती नक्कीच नव्हती.
प्रश्न - संपूर्ण विपरीत परिस्थतीत तुमच्या सहजीवनाची सुरुवात झाली. सहजीवनाच्या सुरुवातीचा कालखंड कसा राहिला?
सतीश - सुरुवातीला खूप संघर्ष होता. आमची सुरुवात शून्यातून झाली. कुटुंबीयांची मदत न घेता आम्हाला स्वतंत्रपणे स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. वाळव्यात माझी विना अनुदानित कॉलेजवरची नोकरी होती. मला फक्त 1420 रुपये पगार होता. घराचं भाडंच 300 रुपये द्यावं लागायचं. महिना संपताना ओढाताण व्हायची. मात्र आमचं एकमेकांवर जीवापाड प्रेम असल्यानं हे त्रास आम्ही सहन करू शकलो.
त्या काळात माझ्या बहिणीलाही माझी काळजी वाटत होती. आमची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी आम्ही धंदा करावा असं तिनं सुचवलं. भारत पेट्रोलिअमची ऑईलची एजन्सी घेण्याचं ठरलं. त्यासाठी आर्थिक मदत तिची आणि ती मिळवण्यासाठीचे प्रयत्न, प्रक्रिया मी पूर्ण करायचं असं ठरलं. त्यात आणखी एक भागीदार होता. सहा महिन्यांतच त्यानं आमची फसवणूक केली. नोकरी सोडून कोल्हापुरात एक खोली करून मी धंद्याच्या भरवशावर आलो होतो. त्याच दिवसांत सईदा गरोदर राहिली. मात्र आम्हाला असं वाटत होतं की, आमच्याच खाण्यापिण्याचे वांदे आहेत तर अशा स्थितीत आपण मुलाला जन्म द्यावा का? या संदर्भात आम्ही इस्लामपूर येथील डॉ. आशा जोशींना भेटलो. आमची हकिगत सांगितली. त्या म्हणाले, 'पुढंमागं मूल हवंच ना तुम्हाला? हे दिवसही जातील. मी माझ्या तपासणीत सवलत देते.' त्यांनी तो शब्द पाळला.
एक घटना सांगतो. आजही ती आठवली तर अंगावर काटा येतो. बहिणीनं फोन करून एजन्सीसंदर्भात पत्र आलंय तर तातडीनं दुसर्या दिवशी कोल्हापुरात ये म्हणून सांगितलं. माझ्या खिशात एकही दमडी नव्हती. घरात पैसे नाहीत हे ठाऊक असूनही कुठं काय राखून ठेवलंय का म्हणून सईदा वेगवेगळ्या ठिकाणी शोधायला लागली. खूप शोधल्यावर तिच्या पर्समध्ये शंभरची एक नोट सापडली. ती नोट बघून आम्ही दोघं नवराबायको आनंदानं एकमेकांच्या गळ्यात पडून रडायला लागलो. त्या दिवशी जर ते शंभर रुपये आम्हाला मिळाले नसते तर बहिणीला काय तोंड दाखवणार होतो, दुसर्या दिवशी कसं जाणार होतो, कुणापुढं हात पसरणार होतो याची कल्पनाच करवत नाही. सुरुवातीला तीनचार वर्षं आमचा असा संघर्ष होत राहिला.
प्रश्न - लग्न-संसार सुरू झाल्यावर तरी तुम्हा दोघांच्या कुटुंबीयांनी तुमचा स्वीकार केला का? तुमचे संबंध पुन्हा पहिल्यासारखे झाले का?
सतीश - तसं पाहिलं तर माझ्या घरातून अगदी पहिल्या दिवसापासून आम्हाला कुणीच नाकारलं नाही. पण काहींच्या मनात अढी कायम राहिली. वडील तर महिन्या- दोन महिन्यांनी भेटायला आले. भाऊजीसुद्धा गावी चला म्हणून सांगायला लागले. मात्र आम्ही स्वतंत्रच राहायचं ठरवलं होतं. कुणाच्या अध्यातमध्यात वा प्रभावात आम्हाला राहायचं नव्हतं.
बहिणींचे नवरे, कुटुंबीयपण सुशिक्षित असल्यामुळे त्यांच्याकडून कधीच कुठला विरोध झाला नाही. उलट मी कोल्हापुरात शिक्षणानिमित्त दोघी बहिणींकडेच राहायला होतो. बहिणींकडे माझ्या मैत्रिणी यायच्या. मुलामुलींनी मैत्री करू नये असे टिपिकल विचार त्यांचेही नव्हते आणि माझा एकूण सामाजिक कामांमधला, चळवळीमधला वावर पाहता मी स्वतःच्याच पसंतीच्या मुलीशी लग्न करणार याची कल्पना त्यांनी आधीच करून ठेवली होती. मात्र सईदाला बराच त्रास सहन करावा लागला.
ती गरोदर असताना आम्ही आमच्या गावी होतो. सईदा शहरातली, श्रीमंत घरातली होती. माझं शेतकरी कुटुंब. परिसरही मागास. घरात म्हशी होत्या. चुलीवरचा स्वयंपाक होता, पण तिनं एकदाही तक्रार केली नाही. आईला वाटायचं की, तिनं साडी नेसावी, टिकली लावावी, नाव बदलावं. पण आमची त्याबाबत स्पष्टता होती. ती अशी कुठलीही गोष्ट करणार नाही जी तिच्या मनाविरुद्ध आहे, असं आमचं ठरलेलं होतं.
ती मुस्लीम होती, आहे आणि राहणार याबाबत आमचं दुमत नव्हतं. मी धर्म पाळत नाही, पण तिला पाळायचा असेल तर तो तिचा निर्णय असणार हे आमचं चर्चा न करताही ठरलं किंवा मला मुस्लीम होण्यासाठी कुणी दबाव आणला नाही.
आमचं लग्न सर्वात आधी आमच्या आजीनं स्वीकारलं. तिनं सईदाचे खूप लाड केले आणि सईदानंसुद्धा तिच्या वृद्धापकाळात तिची सेवा केली. माझ्या वडलांचा लग्नाला विरोध नव्हता, मात्र त्यांना वाटत होतं की, पारंपरिक पद्धतीनं माझं लग्न व्हायला हवं होतं. ते माझ्यावर नाराज राहिले तरी ते सईदाशी कधीही फटकून वागले नाहीत, मात्र पुढे माझाच त्यांच्याशी संवाद कमी झाला. आमच्यामुळे त्यांना कुठलाही त्रास होऊ नये हीच आमची भावना होती.
ती कुंकू-टिकली लावत नाही याचा लोकांनाच जास्त त्रास व्हायचा. आम्ही बाजारात गेलो तर लोक तिच्यावर टीकाटिप्पणी करायचे. पण आम्ही त्याकडे कधी लक्ष दिलं नाही. तसं पाहता मी चळवळीच्या निमित्तानं कायम घराबाहेरच असायचो. सईदाला मात्र सगळ्यांच्यात मिसळून राहायला लागायचं... त्यामुळे या टीकाटिप्पण्यांचा जास्त त्रास तिला झाला. मात्र सईदाचं माहेर तुटलंच. जवळपास पंधरा वर्षं तरी आमचा काहीच संवाद-संपर्क नव्हता.
सईदा - आमच्याकडे अगदी अलीकडेपर्यंत कुणी नातेवाईक येत नव्हते. खरंतर माझ्या घरच्यांपेक्षा नातेवाईकांना आम्ही घरी येऊ नये असं वाटत होतं. त्यासाठी माझ्या आईवडलांवर त्यांचा दबाव होता आणि त्यांना त्रास होत असेल तर आपणही घरी जायचं नाही असं आम्ही ठरवलेलं होतं. आपण आनंदाच्या गोष्टी सांगायला घरी जाऊ, दुःख सांगायला जायचं नाही असंच आम्हाला वाटत होतं.
प्रश्न - दरम्यान फोनवरून संपर्क तरी होता का?
सतीश - नाही. संपर्क पूर्ण तुटलेला होता. आम्ही कुठे राहतो हे 15 वर्षं सईदाच्या घरच्यांना माहीतही नव्हतं. आम्ही काही लोकांकरवी संपर्क करायचा प्रयत्न करायचो. पण ते फारसं प्रभावी ठरत नव्हतं. 07 सप्टेंबर 2007ला मी, सईदा आणि आमचा मुलगा असे तिघं पहिल्यांदा त्यांच्याकडे गेलो. आम्ही नवीन घर बांधलं होतं. त्याच्या वास्तुप्रवेशाचं निमंत्रण द्यायला आम्ही गेलो. सुरुवातीला ते आमच्यावर चिडले, पण आम्हाला त्रास होईल असं काही त्यांनी केलं नाही. अर्थात त्यानंतरही ते लगेच घरी आले नाहीत किंवा त्यांनी फोनही केला नाही. पण निदान संपर्काला सुरुवात झाली.
आम्ही इतकी वर्षं सुरक्षित आहोत, कुठल्या गोष्टीसाठी मदत मागायला घरी आलो नाही याचा अर्थ आम्ही आता सक्षम आहोत असं त्यांचं मत झालं आणि पुढे तेही लोकांना सांगायला लागले की, कुठेही असू देत. त्यांचं ते करून खाताहेत ना मग झालं.
सईदा - आम्ही घरी गेलो तेव्हा सतीश अगदी असंही म्हणाला की, मी आता अगदी मुस्लीम झालो तरी तुमचे नातेवाईक मला स्वीकारणार आहेत का? वडील म्हणाले, 'नातेवाईक आणि इतर लोक हे काड्या घालण्यासाठीच असतात. तुम्ही मुस्लीम व्हावं अशी आमची इच्छा नाही. तुम्ही तुमच्या आईवडलांचे एकुलते एक मुलगे आहात. आम्हाला त्यांच्यापासून तुम्हाला हिरावून घ्यायचं नाहीय. तुम्ही व्यवस्थित राहा.'
काही वेळा आम्ही आमच्या नातेवाईकांना भेटायला जायचो. पण काही लोक त्यांना म्हणायचे, 'बाकीच्या मुलींची लग्नं व्हायची आहेत. हिला कशाला भेटता? दोन दणके तिथेच द्यायचे हिला. तिथेच मारायचं.' अशा गोष्टी कानांवर येत होत्या म्हणून मग आम्ही कुणालाच भेटायचं नाही असं ठरवलं. माझ्या वडलांचं 2015मध्ये निधन झालं. तेव्हा आमच्या आत्यानंच आम्हाला कळवलं. काही लोक म्हणत होते की, हिला कशाला बोलावलं? पण काही जणांनी आमची बाजू घेतली. वडलांच्या क्रियाकर्माच्या कार्यक्रमात मुलालाही सामावून घेतलं.
आता येणंजाणं सुरू झालंय. अलीकडे काही नातेवाईक आमच्याकडे येतात. मध्यांतरी चुलतभावानं त्याच्या लग्नाचं निमंत्रण दिलं. त्या लग्नात माझी आई माझ्या जवळच येऊन बसली. काहींना ते आवडलं नव्हतं. तीही चिडून म्हणाली, 'आता आम्ही किती दिवस राहणार? किती दिवस घाबरून राहायचं?' असं म्हणून ती हट्टानं बसून राहिली. मलाच आधार देत राहिली. इतक्या वर्षांनी का होईना सपोर्ट करायला लागली. माझ्या बहिणीच्या सासूचा पूर्वी खूप विरोध होता. काही लोकांमध्ये परिवर्तन होत गेलं. पण काही खूपच कट्टर राहिले.
आत्या-आई यांचं हळूहळू बोलणं सुरू झालंय. मला धाडस देतात. पूर्वी मी खूप घाबरायचे. मला मैत्रिणीसुद्धा म्हणतात, 'तू इतकी घाबरट आहेस तर मग लग्नाचा एवढा मोठा निर्णय कसा घेतलास?' पण ते झालं माझ्या हातून. त्यानंतरही बराच काळ मी खूप भीतच राहिले. एकटेपणाचा खूप मोठा आघात माझ्या मनावर झाला. माझ्या बाळंतपणातही मला फोबियासारखं झालं. बाळंतपण दुपारी दोन वाजता झालं. त्यानंतरही मी एकटीच होते. त्या दवाखान्याची, तिथल्या वासांची, शारीरिक त्रासाची एकदम भीती बसली. सतीशची आई थेट रात्री नऊ वाजता आल्या. माहेरचं कुणी नाही. सासरचंही कुणी नाही. याचा खूप त्रास झाला. आता अलीकडं माहेरचे लोक लहानमोठ्या कार्यक्रमांना बोलवायला लागलेत.
प्रश्न - गरोदरपणी सासरी होतात. दीर्घ काळ तिथं राहिलात, तेव्हा सासरच्यांनी तुम्हाला कसं स्वीकारलं?
सईदा - आमची त्या वेळेसची परिस्थिती खूपच हलाखीची होती. वाळव्यातली नोकरी सोडून आम्ही कोल्हापुरात आलो होतो. ऑईल एजन्सीत फसलो होतो. अशा वेळी नणंदच सतीशच्या मागे लागली की, हिला घेऊन गावी जा म्हणून आम्ही सासरी आलो. तेव्हा मला सातवा महिना होता. त्याच वेळेस सतीशनं खटाटोप करून, नोकरीची गरज आहे हे व्यवस्थापनाला पटवून वाळव्याच्या कॉलेजमध्ये पुन्हा नोकरी मिळवली होती.
सतीश सकाळी-सकाळी घराबाहेर पडायचा आणि थेट संध्याकाळीच यायचा. सासरे शाळेत जायचे. घरात मी आणि सासूच असायचो. मात्र त्या माझ्याशी फार बोलायच्या नाहीत. त्यांच्या शेजारपाजारच्या मैत्रिणी यायच्या. मुस्लीम आहे म्हणून बायका बघायला यायच्या. सुरुवातीला त्याही माझ्याशी बोलायच्या नाहीत. मी शहरातली, शिकलेली, मुस्लीम या गोष्टीचं दडपण यायचं... पण नंतर मी कुठलीच तक्रार न करता घरकाम करते, हापशावर धुणं धुते, शेणानं सारवते, पाणी भरते हे पाहून सासूच्या मैत्रिणीच आधी बोलायला लागल्या. चौकशी करायला लागल्या. हळूहळू सासूनंही स्वीकारलं.
सासरे कायम माझ्यावर खूश होते. त्यांनी कधीच काहीच तक्रार केली नाही. बाळंतपणानंतर आम्ही वाळव्याला परत गेलो. तिथं चार वर्षं राहिलो. मुलाला शाळेला टाकण्याची वेळ आली तेव्हा आम्ही इस्लामपूरला राहण्याचा निर्णय घेतला. पुढे रुटीन लागलं. पगारही थोडा वाढला. हळूहळू सेट होत गेलो.
प्रश्न - तुमच्या दोघांच्या राहण्याखाण्याच्या सांस्कृतिक फरकाचा तुमच्या नात्यावर काही परिणाम झाला का?
सतीश - अजिबातच नाही. मनानंच एकदा स्वीकारल्यानंतर आमच्यासाठी बाकीचे सगळे मुद्दे खूप गौण ठरले. आम्ही एकमेकांवर काम लादलं नाही. सईदाच घराची होममेकर असल्यामुळे घरात खानपानाच्या बाबतीत तरी तिचा निर्णय सर आंखों पे राहिला. इतर प्रथापरंपरांच्या बाबतीत आम्ही काहीच मानत नसल्यामुळे त्याचाही काही त्रास झाला नाही. उलट मीच कधीतरी काही तक्रार केली असेल. पण मला स्वतःला चहापलीकडे काहीही करता येत नाही. तेव्हा गप्प बसून तिचा निर्णय मान्य करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नसतो. आम्ही वेगवेगळ्या धर्माचे आहोत असं आम्हाला कधीच वाटलं नाही.
प्रश्न - तुम्हाला तुमच्या शेजाऱ्यापाजाऱ्यांकडून किंवा मित्रपरिवाराकडून तुमच्या आंतरधर्मीय विवाहाबाबतीत तुम्हाला कशा प्रतिक्रिया मिळाल्या? तो काय अनुभव राहिला?
सतीश - मला माणसांच्या दोन प्रोफाईल दिसल्या. काही आमच्यावर हसणारे, त्रास देणारे होते. प्राध्यापक असूनसुद्धा काही जण आमची ओळख करून देताना जातीवरून करून द्यायचे. पण दुसरीकडे आम्ही जिथे राहत होतो तिथे जैन कुटुंबाचं घर होतं. पण त्यांना कधीही आमच्या जातींची अडचण झाली नाही. आम्ही काय खावं काय खाऊ नये अशी कुठलीच बंधनं त्यांनी कधीच आमच्यावर आणली नाहीत. उलट आम्हीच स्वतःहून त्यांच्यासाठी आमच्यात बदल करत असू. घरात आमचं बाळ रात्रीबेरात्री रडायला लागलं तर ते लोक काळजीपोटी येऊन विचारपूस करायचे. बाळाला शांत निजवूनच आमच्याकडे द्यायचे. आम्ही ते घर सोडून इस्लामपूरला राहायला आलो तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं होतं. आजही आम्ही त्यांना प्रेमानं भेटतो. पण दुसरीकडे शिकले-सवरलेले लोक - ज्यांना जातव्यवस्था म्हणजे काय आहे हे पक्कं ठाऊक आहे - ते कायम जातीच्या चश्म्यातूनच आमच्याकडे बघत होते.
लग्नानंतर काही महिन्यांनी माझ्या एका जवळच्या मित्राने त्याच्या घरी जेवायला बोलवले. जेवण करून निघताना तो मला म्हणाला की, तू काही आता माझ्या घरी येऊ नकोस.
हा खरंच आपला मित्र होता का असा प्रश्न मला पडला. उलट ज्यांच्याशी माझा चारपाच वर्षं संपर्क राहिलेला नव्हता अशा मित्रांनी मला खूप आधार दिला. पुरोगामी कार्यकर्त्यांमध्येसुद्धा आमच्या लग्नावरून मतभेद होते. लग्न ठरलेल्या मुलीसोबत मी लग्न करायला नको होतं असं काहींचं म्हणणं होतं. काहींना असं वाटत होतं की, लग्नाआधी त्यानं निर्णय घेतला आहे. मग तो योग्यच आहे.
सईदा - काहीकाही लोक अजूनही नावं ठेवतात. कुठल्या जातीतली कुठल्या जातीत येऊन पडली असंही म्हणतात. पण काही लोकांनी खूप चांगला सपोर्टही केला. काही लोक अडाणी, गरीब होते. मात्र त्यांनी खूप जीव लावला. अजूनही वाळव्याचं जैन कुटुंब आमच्या मुलाला- समीरला- जीव लावतं. कधीतरी त्याच्यासाठी लाडू पाठव, कधी शेंगदाण्याचं पोतं पाठव अशा गोष्टी करतात.
प्रश्न - मुलाला कसं वाढवायचं याविषयी तुम्ही काही ठरवलं होतं का? काही गोष्टी कदाचित ओघानं झाल्या असतील आणि काही तुम्ही जाणीवपूर्वक केल्या असतील.
सतीश - ठरवून केलेल्या गोष्टींपैकी महत्त्वाची गोष्ट म्हणजे समीर सहासात वर्षांचा असल्यापासून आम्ही ज्या विषयांवर बोलायचो तेच त्याच्यासोबतही बोलायला लागलो. तोही दहाव्या-अकराव्या वर्षापासूनच समंजस होऊन वागायला लागला. जातधर्माच्या पलीकडे जाऊन त्यानं जगावं असं आम्हाला वाटायचं आणि ते घडायला लागलं.
आमच्या सहवासातून चळवळीतल्या लोकांकडे पाहण्याची दृष्टी आपोआप त्याला मिळाली. त्यामुळे तो दोन्हींपैकी कुठल्याच धर्माकडे झुकला नाही. सुरुवातीला सईदाला वाटत होतं की, आपण सगळ्याच बाजूंनी तुटत गेलोय तर निदान धर्म नावाची गोष्ट तरी आपल्याला जोडून घेईल का? आणि त्यासाठी मी मुस्लीम धर्म स्वीकारावा का? पण माझा धर्म न बदलण्याचा निर्णय ठाम होता. तेव्हा तिचं म्हणणं होतं की, आपण मुलाला मुस्लीम होऊ द्यायचं का? पण माझं म्हणणं होतं की, त्याबाबत तो स्वतः निर्णय घेईल. अर्थात त्याला धार्मिक करणं असा तिचाही भाव नव्हता. इतक्या वर्षांची जी पोकळी ती स्वतः अनुभवत होती ती भरून काढण्यासाठीचा, लोकांना जोडून घेण्यासाठीचा तिचा तो भाबडा प्रयत्न होता... पण पुढे या सगळ्यातली व्यर्थता तिच्याच लक्षात आली.
प्रश्न - तुमच्या दोघांचा आंतरधर्मीय विवाह आहे यावरून त्याला कधी काही प्रश्न पडले का? आपल्या घरात सर्वसाधारण घरांपेक्षा वेगळं काही आहे असं कधी त्याला वाटलं का?
सतीश - हिंदू किंवा मुस्लीम धर्माचा जसा काहीएक संस्कार असतो तसंच मला वाटतं की, समन्वयाचाही संस्कार असतो. कुणी आम्हाला सलाम वालेकुम म्हटलं किंवा जय भीम म्हटलं तर त्यांना उत्तर देण्यात आम्हाला काही अडचण येत नाही. कुठलं देऊळ पाहायला जाण्यात आम्हाला काही गैर वाटत नाही किंवा कुठल्या दर्ग्यात जायलाही. तेच संस्कार त्याच्यात रुजले. त्याला जर कधी काही त्रास झाला असेल तर त्यानं आम्हाला सांगितलं नाही. उलट समोरच्या व्यक्तीच्या कलानं घेण्याची सवय त्यानं अंगवळणी पाडून घेतली आहे.
दखनी हिंदी तो अफलातून बोलतो. मराठी उत्तम बोलतो. सईदाचं आणि त्याचं ट्युनिंग अतिशय चांगलं आहे. त्याच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट तो तिला नक्की सांगतो. आता अगदी अशी मुलाखत देण्याबाबत मी सईदाला विचारत होतो तेव्हा प्रथम ती म्हणाली, 'आता कुठं ते सगळं आठवून सांगायचं?' पण समीर लगेच तिला म्हणाला, 'नाही. तुम्ही या विषयावर बोलायला हवं, तुमचे अनुभव सांगायला हवेत.'
प्रश्न - एकाच अपत्याचा तुम्ही जाणीवपूर्वक निर्णय घेतला का?
सतीश - हो नक्कीच. आम्ही ज्या परिस्थितीत त्याला जन्म दिला होता तेव्हा आम्हाला वाटत होतं की, आपण एकाच अपत्याला चांगला न्याय देऊ शकतो. मुद्दा नुसताच आर्थिक परिस्थितीचा नव्हता. सामाजिक, सांस्कृतिक मूल्यांचासुद्धा होता. ते आपल्याला मुलाला नीट देता यावं या उद्देशानं आम्ही दोघांनी मिळून हा निर्णय घेतला.
प्रश्न - तुम्ही घरात कुठले सण साजरे करता?
सतीश - प्रामुख्यानं आम्ही ईदच साजरी करतो. पूर्वी दिवाळीला गावी जायचो तेव्हा दिवाळीचे पदार्थ करायचो. आत्ताही आम्ही खाद्य संस्कृती म्हणून दिवाळी, ईद साजरी करतो. ईदच्या दिवशी बिर्याणी खाण्यासाठी आमचे मित्र घरी येतात. नारळी पौर्णिमेला ही आवर्जून नारळी भात करते. तिला आवडतात ते पदार्थ सणांना ती असे करते. सणांमागे धार्मिक असा कोणताही उद्देश नसतो. पण वेगवेगळे खाद्यपदार्थ करण्याचं ते निमित्त ठरतात म्हणून आम्ही ते साजरे करतो. अर्थात आम्ही ते पारंपरिक पद्धतीनं साजरे करत नाही.
प्रश्न - तुमचं शिक्षण पाहता मुलगा मोठा झाल्यानंतर तुम्हाला कधी नोकरी करावीशी वाटली नाही का?
सईदा - एवढं शिक्षण झालं म्हटल्यावर नोकरी करावी असं वाटत होतंच पण पुढं ते जमून आलं नाही. काही ठिकाणी काम होतं पण पगार नव्हता. तेव्हा पगाराचीच तर गरज होती. काही चांगल्या नोकरीच्या ऑफर्ससुद्धा आल्या, मात्र लांबच्या ठिकाणच्या... शिवाय आत्मविश्वास कमी झाला होता. भीती वाढलेली होती. त्यामुळे पुन्हा अभ्यास करणं, नोकरी स्वीकारणं याविषयीचा आत्मविश्वास येत नव्हता. आता मात्र त्याची खंत वाटते आणि अलीकडं तर मुलगाही मोठा, स्वतंत्र झाल्यामुळे तर ते रिकामपण जास्त जाणवतं... पण मी हे लग्न केलं म्हणून करिअर होऊ शकलं नाही असं नाही वाटत. आवडत्या माणसांसोबत असण्याइतकं सुख दुसरं कशात आहे?
सतीश - सईदा माझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे. मात्र आमच्या मुलासाठी तिला नोकरी करता आली नाही. बाळाला सांभाळण्यासाठी आमच्याकडे कुणाचा आधार नव्हता. सुरुवातीला तिला जॉब ऑफर्स आल्या होत्या, पण आम्ही त्यांचा विचार करू शकलो नाही. आमचं घर उभारण्यात सईदाचा म्हणूनच खूप मोठा वाटा राहिला आहे. त्या वेळेस ती म्हणाली, 'घर सांभाळण्यासाठी एकानंच नोकरी केली तरी चालणार आहे. ती तू कर. मी घर आणि बाळ बघते.' मात्र उच्चशिक्षित असूनही तिला करिअर करता आलं नाही याची मला टोचणी लागून आहे.
प्रश्न - तुमच्या सहजीवनाची भिस्त तुम्हाला कशावर दिसते?
सईदा - आमच्या लग्नाला याच वर्षी 25 वर्षं पूर्ण झाली. आम्ही घर सोडलं हीच तारीख आमच्या लग्नाची धरतो. दोन महिन्यांनी आमचं रजिस्टर लग्न झालं. मात्र ती धरत नाही. सुरुवातीला खूप संघर्ष राहिला, पण चांगले दिवस येणार याची खात्री होती आणि ते आलेपण. हे सगळं आमच्या एकत्र असण्यानं, सोबत राहण्यानंच शक्य झालं. आमच्या दोघांचा स्वभावसुद्धा एकमेकांना खूप पूरक आहे. एकमेकांच्या अध्यातमध्यात येत नाही. आमचा एकमेकांवर खूप विश्वास आहे. आपण चांगलं काम करत राहायचं. आपलंही चांगलंच होईल हा ठाम विश्वास होता. हीच आमच्या सहजीवनाची भिस्त असणार.
सतीश - आमच्या इतक्या वर्षांच्या सहवासात सईदा मुस्लीम आहे आणि मी हिंदू आहे हे कधीही आमच्या लक्षात येत नाही. एरवी तिचे नातेवाईक आमच्याकडे येतात-जातात तेव्हाही ते वेगळ्या धर्माचे आहेत याची जाणीव मलातरी कधी होत नाही. तसंच सईदालासुद्धा जाणवत नाही. धर्म हा आमच्या लग्नातला अडसर कधीच ठरलेला नाही.
आमच्या दोघांचा आम्ही घेतलेल्या लग्नाच्या निर्णयाविषयीचा निर्धार पक्का होता. आमच्यात वादविवाद होत नाहीत असं नाही... पण आमच्यात प्रेमही तितकंच आहे आणि आमचा मुलगा हा आमचा मुख्य आधार राहिला. लोकांनी आम्हाला आमच्या आंतरधर्मीय विवाहावरून नावं ठेवली, वाळीत टाकलं. पण मुलाच्या लहानमोठ्या कर्तबगारीनं त्याच लोकांना आम्हाला नावाजावं लागलं. नावं ठेवणारी माणसंच आमच्या बाजूनी उभी राहायला लागली. आमचं सहजीवन फुलवण्यात, आनंदी करण्यात मुलाचा खूप मोठा वाटा राहिला.
(मुलाखत व शब्दांकन - हिनाकौसर खान)
greenheena@gmail.com
'धर्मरेषा ओलांडताना' या सदरातील इतर मुलाखतीही वाचा:
दिलशाद मुजावर - संजय मुंगळे
डॉ. आरजू तांबोळी आणि विशाल विमल
वैशाली महाडिक आणि निसार अली सय्यद
Tags: मराठी प्रेम आंतरधर्मीय विवाह सईदा शानेदिवान सतीश चौगुले हिनाकौसर खान पिंजार हिंदू मुस्लीम धर्मरेषा ओलांडताना Love Interfaith Marriage Hindu Muslim Bohra Couple Interview Heenakausar Khan Saeeda Shanedivan Satish Chougule Load More Tags
Add Comment