‘कोरोनाकाळात आमचे शिक्षण’ या स्पर्धेविषयी प्रसिद्ध केलेल्या निवेदनाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांतून मिळून 78 शिक्षक/मुख्याध्यापक यांनी त्यांच्या स्वतःच्या किंवा त्यांच्या संस्थेच्या कामाविषयीची टिपणे पाठवली. या स्पर्धेतून निवडलेले सर्वोत्तम पाच लेख गेले सलग पाच दिवस प्रसिद्ध केले जात आहेत. त्यांपैकी स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचे परितोषिक मिळवलेला हा लेख...
लॉकडाऊन काळात शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय शिक्षकांसमोर खुला झाला. ऑनलाईन शिक्षण फक्त पाठ्यपुस्तक शिकवण्यापुरतेच मर्यादित न ठेवता त्यांतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे उद्दिष्ट साध्य होणे गरजेचे आहे. ऑनलाईन शिक्षणाला सहशालेय उपक्रमांची जोड देत विद्यार्थी कृतियुक्त शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.
शाळेला सुट्टी लागल्यानंतर इयत्ता तिसरीच्या वर्गाला ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील राहिले. पूर्वी शिक्षक-पालक सुसंवादासाठी सुरू केलेला वर्गाचा व्हॉट्सॲप ग्रुप फक्त सूचनांसाठी आणि शैक्षणिक कामासाठी वापरला जात होता. त्याचा उपयोग आता ऑनलाईन शिक्षणासाठी करायचा असे पालकांच्या संमतीने ठरले.
खेड्यांतील शाळांना आणि पालकांना ऑनलाईन शिक्षणाच्या विविध पर्यायांपैकी व्हॉट्सॲप हेच साधन परिचित होते आणि सहज वापरता येत होते. मुख्य अडचण आली... ती ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाहीत अशा पालकांची. वर्गातील एकूण 27 विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थ्यांच्या घरी व्हॉट्सॲपची सुविधा नव्हती. त्यांना प्रत्यक्ष फोन करून अभ्यास दिला आणि ज्या पालकांकडे जुना स्मार्टफोन होता त्यांना तो गरीब विद्यार्थ्यांच्या पालकांना देण्याची विनंती केली.
व्हॉट्सॲपद्वारे ऑनलाईन अभ्यासाचा प्रवास सुरू झाला. पाठ्यपुस्तकातील अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी व्हॉट्सॲप हे साधनही काळानुरूप अपुरे वाटू लागले... त्यामुळे सर्व पालकांना गुगल मीट ॲप डाउनलोड करून घ्यायला सांगितले आणि त्याच्या वापरासंबंधी ऑनलाईन प्रशिक्षण दिले.
सुरुवातीला गुगल मीटद्वारे पालकांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांशी हितगूज केले... तेव्हापासून शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यात प्रत्यक्षात संवाद सुरू झाला. दररोज व्हॉट्सॲपवर अभ्यास पाठवणाऱ्या मॅडम जेव्हा प्रत्यक्ष फोनच्या स्क्रीनवर शिकवत असलेल्या दिसू लागल्या तेव्हा विद्यार्थ्यांना आपण वर्गातच असल्याची अनुभूती आली.
ऑनलाईन शिक्षणासाठी 27 विद्यार्थ्यांचे चार गट करून प्रत्येक गटाला एक गटप्रमुख नेमून दिलेला आहे. ठरवून दिल्यानुसार त्या-त्या गटातील विद्यार्थी दिलेल्या घटकावर ऑनलाईन गटचर्चा करून स्वतः प्रश्ननिर्मिती करतात. शेवटी इतर गटांतील विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात. गटात पाढे म्हणतात. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्या मनात सामाजिक जाणिवेचे भान निर्माण करणे हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून लॉकडाऊनच्या काळात विविध शालेय उपक्रम राबवले गेले.
कोरोना जनजागृती उपक्रम - मार्च, एप्रिल महिन्यांत कोरोना व्हायरसबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी कोरोना जनजागृती मोहिमेत सहभाग घेतला.
‘शासनाचे नियम पाळून घरी राहा, स्वस्थ राहा आणि कोरोनाला हरवा...’ असा संदेश विद्यार्थ्यांना दिला.
गट्टी नकाशाशी उपक्रम - मार्चमध्ये अचानक शाळा बंद झाल्याने नकाशाच्या प्रतिकृती तयार करणे हा उपक्रम अपूर्णावस्थेत होता. विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करून इयत्ता तिसरीच्या परिसर अभ्यास पाठ्यपुस्तकातील अहमदनगर, महाराष्ट्र आणि भारत या नकाशांच्या प्रतिकृती पुठ्ठ्याचा वापर करून तयार करून घेतल्या. त्यावर कोरोना जनजागृतिपर घोषवाक्य लिहीत ‘गट्टी नकाशाशी’ हा उपक्रम पूर्ण केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नकाशाची गोडी लागली. नकाशावाचनामुळे त्यांच्या भौगोलिक ज्ञानातही वाढ झाली.
ऑनलाईन चित्रकला स्पर्धा - मुले आपल्या कल्पना जेव्हा चित्रात उतरवतात तेव्हा त्यांना मिळणारा आनंद हा शब्दांपलीकडचा असतो... त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले. नागपंचमी, रक्षाबंधन, स्वातंत्र्यदिन, बैलपोळा, गणेशचतुर्थी अशा विविध सणांचे आणि उत्सवांचे प्रसंग मुलांनी आपल्या चित्रांत रेखाटले. त्या चित्रांना आकर्षक रंग दिले. या उपक्रमामुळे मुलांना ऑनलाईन शिक्षणाची गोडी लागली.
ऑनलाईन रांगोळी सुशोभन - विद्यार्थ्यांनी रांगोळी सुशोभनाचे ऑनलाईन धडे दिले. विविध सण, उत्सव आणि दिनविशेष आपल्या रांगोळीतून रेखाटत कोरोना जनजागृतिपर संदेश दिले. निसर्गातील पाने, फुले, बिया, माती आणि छोटे खडे यांचा उपयोग करून सुंदर रांगोळ्या काढल्या.
कृतज्ञता भेटकार्ड तयार करणे - कागदकाम घटकांतर्गत विद्यार्थी नेहमी शुभेच्छा भेटकार्ड तयार करतात. कृतज्ञता भेटकार्ड तयार करणे हा उपक्रम त्यांना नावीन्यपूर्ण वाटला. रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी या कोरोना योद्ध्यांसाठी भेटकार्ड तयार केले. कोरोनाकाळात केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा मजकूर कार्डवर लिहिला. कधी गर्दीत कायदा राखताना... कधी गरिबांना जेवण पुरवताना... कर्तव्यासाठी जिवाची बाजी लावताना... स्वतःच्या कुटुंबाचा त्याग करताना... अशा आशयाच्या कविता भेटकार्डवर लिहून विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यातून त्यांच्यामधील सामाजिक जाणीव दिसून आली.
पाठांचे नाट्यीकरण - इयत्ता चौथीच्या बालभारती मराठी या पुस्तकातील बोलणारी नदी, आम्हालाही हवाय मोबाईल, मला शिकायचंय या पाठांचे नाट्यीकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी दिलेल्या संवादांचा सराव करून ऑनलाईन सादरीकरण केले... त्यामुळे विद्यार्थ्यांचे संवादकौशल्य विकसित होण्यास मदत झाली.
विविध सण-उत्सव आणि दिनविशेष ऑनलाईन साजरे करणे - लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना विविध सण-उत्सव आणि दिनविशेष साजरे करण्यास प्रोत्साहन दिले. 22 एप्रिल - जागतिक वसुंधरादिन, 5 जून - जागतिक पर्यावरणदिन अशा दिनांनिमित्त ऑनलाईन चित्रकला स्पर्धा घेतल्या. नागपंचमी, रक्षाबंधन, बैलपोळा, गणेशचतुर्थी आणि स्वातंत्र्यदिन हे सण विविध ऑनलाईन स्पर्धा घेत साजरे केले. पर्यावरण संरक्षण, श्रमप्रतिष्ठा, संवेदनशीलता आणि राष्ट्रभक्ती या मूल्यांची रुजवणूक होण्यास त्यामुळे मदत झाली.
विद्यार्थ्यांनी घरी उपलब्ध साहित्यापासून राख्या तयार केल्या. नागपंचमी सणाच्या प्रसंगाची सुंदर चित्रे काढली. सणाचे महत्त्व छोट्या-छोट्या व्हिडिओंतून सांगितले. मातीपासून सुंदर बैल तयार केले, त्यांना रंग दिले. गणेशचतुर्थीला मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार केली, तिची प्रतिष्ठापना केली. तयार केलेल्या मातीच्या मूर्तीचे घरी विसर्जन केले. त्या मातीत झाड लावण्याचे ठरवले. वर्षभर त्याची काळजी घेण्याचा संकल्प केला.
देशभक्तिपर गीत गायन स्पर्धा - या वर्षी मात्र घरीच राहून देशभक्तिपर गीते म्हणून विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिन साजरा केला. त्यासाठी विद्यार्थ्यांची ऑनलाईन देशभक्तिपर गीत गायन स्पर्धा घेतली. विद्यार्थ्यांनी ‘आओ बच्चों...’, ‘नन्हा मुन्ना राही हूँ...’ अशा गीतांचे तालासुरात गायन केले.
गुगल मीटद्वारे ऑनलाईन क्लास - इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचे गुगल मीटद्वारे ऑनलाईन वर्ग घेतले जातात. विविध उपक्रमांच्या ऑनलाईन कार्यशाळा घेतल्या जातात. 5 सप्टेंबर ही डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आणि राष्ट्रीय शिक्षकदिन म्हणून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन बालसभा घेऊन साजरा केला. विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांचे ऑनलाईन सादरीकरण केले.
शिक्षक आपल्या दारी - विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिकवलेल्या अभ्यासावर आधारित हार्ड कॉपी दिल्या. त्या पूर्ण करण्याबाबत मार्गदर्शन केले. वरील उपक्रमांसोबतच स्व-निर्मित कविता, भारूड आणि पोवाडा यांचे गायन; पाठ्यपुस्तकातील कवितांचे साभिनय सादरीकरण; एकपात्री नाटिका; कोरोना पाळणा; विटांचा वापर करून कोरोना फैलावाची साखळी कशी तोडली जाते याचे व्हिडिओ प्रात्यक्षिक; घरकामात मदत; दिनांक व पाढा; माझा शब्दकोश असे उपक्रम घेतले.
गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीत इंग्रजी भाषेचा वापर अध्ययन-अध्यापनात सुलभतेने करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या लीप फॉर वर्ड या संस्थेमार्फत येणारी ऑनलाईन इंग्रजी प्रश्नावली विद्यार्थ्यांनी सोडवली. तसेच ‘शाळा बंद... पण शिक्षण सुरू...’ या उपक्रमांतर्गत येणारे शैक्षणिक उपक्रमांचे व्हिडिओ त्यांनी पाहिले.
जिल्हा परिषद अहमदनगर आणि ग्लोबल नगरी फाउंडेशन अमेरिका यांच्या वतीने विद्यार्थी इंग्लिश इम्प्रुव्हमेंट पायलट प्रोजेक्टमध्ये सहभागी झाले. त्यातील भाषिक कौशल्य आत्मसात होण्यास विद्यार्थ्यांना मदत झाली. परिस्थिती कितीही भयावह असो किंवा कोरोनाचे संकट कितीही उग्र रूप धारण करो... यातून ‘वर्क फ्रॉम होम’ करत ज्ञानार्जन करून सहशालेय उपक्रमांत सहभागी होणारे प्रवरासंगम शाळेचे विद्यार्थी ऑनलाईन आणि ऑफलाईन या प्रणालींद्वारे दररोज काहीतरी नवीन शिकण्याचा आणि नवनिर्मितीचा आनंद घेत आहेत.
- शितल झरेकर
shitalzarekar2211@gmail.com
जि. प. शाळा, प्रवरासंगम
ता. नेवासा, जि. अहमदनगर
'कोरोना काळात आमचे शिक्षण’ या स्पर्धेसंबंधी इतर लेखही वाचा
या स्पर्धेविषयी मनोगत - शिक्षणाचा अनुबंध कायम राहावा यासाठी...
या स्पर्धेच्या परीक्षकांचे मनोगत - कोरोनाकाळ - शिकणं जगण्याशी जोडण्याचा काळ
या स्पर्धेत पहिले परितोषिक मिळवणारा लेख - स्वयंशिक्षणाला पालकांची साथ
या स्पर्धेत दुसरे परितोषिक मिळवणारा लेख - विद्यार्थी, पालक यांच्या सतत संपर्कातून शिक्षण
Tags: कोरोना काळातील आमचे शिक्षण शिक्षक तृतीय पारितोषिक शीतल झरेकर Series Our education in the time of corona Teacher Third Prize Shital Zarekar Load More Tags
Add Comment