'कोरोना काळात आमचे शिक्षण’ या स्पर्धेविषयी प्रसिद्ध केलेल्या निवेदनाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांतून मिळून 78 शिक्षक/मुख्याध्यापक यांनी त्यांच्या स्वतःच्या वा त्यांच्या संस्थेच्या कामाविषयी टिपणे पाठवली. या स्पर्धेतून निवडलेले सर्वोत्तम पाच लेख कालपासून सलग पाच दिवस प्रसिद्ध केले जात आहेत. त्यांपैकी स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचे परितोषिक मिळवणारा हा लेख...
दिवस जात होते तशी बेचैनी वाढत होती. अभ्यासक्रम संपला होता तरी पुढील काळ खूप मोठा होता. मुले शिकण्यापासून दूर राहणार होती. मुलांना नियमित अभ्यासाशिवाय आनंददायी, सर्जनशीलतेला वाव देणारे, चिकित्सक विचार करायला लावणारे दररोज मिळाले पाहिजे म्हणून मा. अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. बीड आणि मा. प्रवीण काळम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय तंत्रस्नेही शिक्षकांची एक टीम गठीत झाली. टीममधील सर्व शिक्षकांना वर्ग आणि विषय यांचे वाटप करण्यात आले.
मार्चमध्ये सर्व वर्गांचे अभ्यासक्रम जवळजवळ शिकवून झाले होते. वरील निकषाप्रमाणे मुलांना मजा आणि आनंद वाटेल अशा कृतींवर आधारित अभ्यास देण्याचे ठरले. अभ्यासात 4C (Critical Thinking, Creative Thinking, Collaboration, Communicate) यांवर आधारित कृती असाव्यात असे ठरले. पहिली-दुसरी, तिसरी-चौथी, पाचवी-सहावी, सातवी-आठवी असे वर्गांचे गट पाडले. एका गटाने एका विषयाचा अभ्यास तयार करायचा आणि दररोज जिल्ह्याच्या व्हॉट्सॲप गटावर टाकायचा. नंतर तो गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या गटावर जायचा. त्यानंतर केंद्रप्रमुख गटावर. तिथून पुढे मुख्याध्यापक गटावर अभ्यास शेअर व्हायचा. मग शिक्षक पुढे पालक गटावर शेअर करायचे. मुले तो अभ्यास दिवसभरात पूर्ण करायची आणि पालक गटावर त्याचे फोटो शेअर करायचे.
या प्रक्रियेला खूप छान प्रतिसाद मिळायचा. अभ्यास लवकर आला नाही तर शिक्षकांना पालकांचे फोन यायचे. मुलांच्या सहभागाचा आढावा घेण्यासाठी गुगल फॉर्म्सवर साप्ताहिक चाचणी होऊ लागली. चाचणीच्या प्रतिसादावरून मुलांचा सहभाग वरिष्ठांना कळू लागला. याच कामासाठी नंतर ‘माझी शाळा’ नावाचे ॲप विकसित करून त्याद्वारे वरील उपक्रम जिल्ह्यासाठी राबवला जाऊ लागला.
बीड जिल्ह्यासाठी 15 मेपर्यंत 4Cवर आधारित वर्गाच्या गटानुसार आम्ही जिल्ह्यातील मुलांना अभ्यास देत होतो. नंतर 15 जूनपासून विषयातील घटकावर आधारित प्रत्येक वर्गाचा अभ्यास आजही देणे चालू आहे. माझ्याकडे इयत्ता तिसरीच्या वर्गाची मराठी विषयाची जबाबदारी आहे. आजही झालेल्या अभ्यासावर गुगल फॉर्मद्वारे पाक्षिक चाचणी घेतली जाते. चाचणी निर्मिती आम्ही विषय-शिक्षक करतो. जिल्ह्यातील सर्व मुलांसाठी काम करताना खूपच समाधान आणि आनंद मिळतो.
व्हॉट्सॲप ग्रुप ठरले मदतगार
15 जूनपूर्वी आम्ही मिस कॉल द्या आणि प्रवेश मिळवा अशी पहिलीच्या वर्गाची प्रवेशप्रक्रिया राबवली. अगदी 15 तारखेला सोशल डिस्टन्स पाळत सर्व मुलांना पुस्तकवाटप केले. शाळा बंद होती, पुढे कधी उघडेल याची कुणी शाश्वती देत नव्हते. माझी अस्वस्थता वाढू लागली. ती शांत बसू देत नव्हती. मुलांना कंटाळा येऊ लागला होता. मुले फोन करून विचारायची, ‘सरऽ शाळा कधी उघडणार आहेत?’ याचे उत्तर कुणाकडेच नसल्याने निराशा यायची.
सगळीकडून ऑनलाईन, ऑफलाईन, स्क्रीन टाईमच्या बातम्या यायच्या. मी मागील तीन वर्षांपासून पालकांचे व्हॉट्सॲप ग्रुप करत आलेलो आहे. जुने व्हॉट्सॲप ग्रुप असल्याने मला फारशी अडचण आली नाही. सर्व मुलांशी आणि पालकांशी मी जोडला गेलो आहे. पूर्वी केलेले व्हॉट्सॲप ग्रुप आज लाखमोलाचे ठरले. आज पालकांचा आणि माझ्या दुसऱ्या वर्गातील मुलांचा ‘उडान’ हा ग्रुप आहे. मुले त्यावर सूचना, प्रश्न, शंका विचारतात. कोरोनाकाळात ऐन वेळी असे ग्रुप करून काही साध्य झाले नसते.
दुसरीच्या वर्गाचा अभ्यास विषयनिहाय शिकवणे, व्हॉट्सॲपवर देणे चालू केले. व्हॉट्सॲपवर अभ्यासासोबत दीक्षा ॲपद्वारे मी केलेले व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकत होतो. मुले दिलेल्या अभ्यासाचे फोटो काढून उडान ग्रुपवर शेअर करत होती. मी मुलांना प्रतिसाद द्यायचो. एखाद्या दिवशी अभ्यास टाकण्यास उशीर झाला तर लगेच ग्रुपवर कमेंट्स यायच्या. अभ्यास पाहायला उशीर झाला, प्रतिक्रिया नाही दिली तरीही मुले विचारणा करायची.
संध्या, करण कुऱ्हाडे, माधुरी, प्रियंका, ऋतुजा कदम, करण सरडे, कार्तिक आणि दीपाली या मुलांचे पालक मुलांसाठी नियमितपणे उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांचा स्वतंत्र गट केला आहे. दर दोन दिवसाला भेटून मी त्यांना मदत करत होतो. त्यामध्ये रेडिमेड वर्कशीटचा वापर केला. मी ज्या दिवशी नसे, त्या दिवशी आर्या ही सहावीच्या वर्गातील माझी माजी विद्यार्थिनी या गटाला शिकण्यासाठी विषयमित्र, अभ्यासमित्र म्हणून मदत करत होती... पण मला समाधान मिळत नव्हतं.
झूम ॲप - माझ्या इयत्ता दुसरीच्या मुलांसाठी कमी यश देणारा प्रयत्न...
38पैकी 23 मुलांकडे अँड्रॉईड मोबाइल होते. मी त्यांच्या पालकांना विश्वासात घेऊन त्यांच्या सोयीप्रमाणे 23 पालकांचे दोन गट केले. सकाळी लवकर शेतात जाणाऱ्या पालकांच्या गटाचा अभ्यास सायंकाळी आणि दुसऱ्या गटाचा अभ्यास सकाळी घेण्याचे ठरले. ताळमेळ जमला. पालकांना झूम ॲप डाउनलोड करण्यास सांगून प्रशिक्षण दिले. मुलांनाही शेजारी बसवले. प्रशिक्षणासाठी दोन दिवस लागले. कामाला सुरुवात केली. पहिले दोनचार दिवस नव्याचे आकर्षण होते म्हणून संयम ठेवत सहन केले. पुढेपुढे अडचणींचे प्रमाण वाढू लागले. मुलांचा आवाज, घरातील इतर सदस्यांचा आवाज, हाताळणीमध्ये येणाऱ्या अडचणी, मुलांचे मन एकाग्र न होणे, नेटवर्क प्रॉब्लेम, पालकांचे गुंतून राहणे या सर्व गोष्टींमुळे पालक, बालक यांच्याबरोबरच मीही त्रस्त झालो.
कॉन्फरन्स कॉल शक्कल नामी - 100% मुलांपर्यंत पोहोचण्याची हमी
मला काय करावे ते सुचत नव्हते. माझा झूमचा प्रयोग फसत चालला होता... शिवाय सर्व मुलांपर्यंत मी पोहोचत नव्हतो. पाहिजे तसे यश मिळत नव्हते. मला सर्व मुलांच्या संपर्कात राहायचे होते. पुन्हा अस्वस्थ झालो.
बाकी वर्गांचे काम छान चालू होते. बऱ्यापैकी समज आल्याने त्यांचा प्रतिसाद चांगला होता. अस्वस्थताच मार्गही दाखवते... मला कॉन्फरन्स कॉलची कल्पना सुचली. मोबाईलची उपलब्धता, मुलांचा बौद्धिक स्तर, पालकांच्या वेळा, नेटवर्क, गल्ल्या या मुद्द्यांच्या आधारे मुलांचे गट केले. प्रत्येक गटामध्ये पाच मुले असे सहा गट झाले. उरलेल्या दहा मुलांना पालकांच्या अडचणीमुळे मोबाईल उपलब्ध होत नाहीत तर इतरांची वेगवेगळी कारणे आहेत.
ही मुले शेजारच्या मुलांच्या घरी बसतात. यामध्ये 23 मुलांकडे अँड्रॉईड मोबाइल आहेत. बाकी साधे मोबाईल आहेत... त्यामुळे मुलांच्या पालकांशी चर्चा करून, वेळा ठरवून दिल्या. शाळेच्या घंटीच्या वेळेनुसार मोबाईलमध्ये अलार्म लावून दिला. घंटी वाजली की मुले मोबाईल आणि दप्तर घेऊन बसतात. तीन गटांचे काम सकाळी चालते आणि उर्वरित तीन गटांचे काम सांयकाळी चालते. याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
प्रत्येकाला हेडफोन विकत घेण्यास सांगितले आहे. मुले हेडफोन लावून ऐकतात, प्रतिसाद देतात. प्रश्न विचारतात, शंका विचारतात, न कळल्यास पुन्हा सांगा असा आग्रह करतात, चर्चा करतात, एकमेकांचे आदराने ऐकतात, एकाच वेळी अनेक कामे चालू असतात. लेखन, श्रवण, इतर मुलांचे ऐकणे, त्यांना प्रतिसाद देणे असे मजेशीर काम सुरू आहे.
मुलांची एकाग्रता आणि आंतरक्रिया छान होत आहे. शिकवून झाल्यावर मुलांना दिलेला अभ्यास करायला भरपूर वेळ मिळतो. खेळायलाही भरपूर वेळ मिळतो... त्यामुळे मुले आनंदाने घंटी वाजण्याची वाट पाहतात. वेळ होताच मी कॉन्फरन्सवर मुलांना घेतो. मुलांना होल्ड, मर्ज, म्यूट या गोष्टी कळू लागल्या आहेत. श्रुतलेखनासारख्या कठीण प्रकाराला कॉन्फरन्स कॉल उपयुक्त ठरत आहे.
28 मुलांचे अँड्रॉईड आणि साधे मोबाईल उपलब्ध असल्याने उर्वरित 10 मुले गल्लीमित्राच्या घरी बसून मोबाईलवर स्पीकर ऑन करून शिकतात.
सर्व मुलांशी माझा दररोज संपर्क होतो. नियोजनाप्रमाणे शिकवणे होत आहे. अभ्यासात मागे असणाऱ्या मुलांना स्वतंत्र वेळ आणि स्वतंत्र अभ्यास दिल्याने मुलांची प्रगती होत आहे. वास्तविक अशा मुलांना वर्गात काम देताना वेगळे वाटू नये म्हणून वेगळ्या ठिकाणी बसवता येत नाही. फोनवर अशा मुलांचा वेगळा गट आहे, आपल्यासाठी काही वेगळे आहे असे त्यांच्या लक्षात येत नाही. ही मुले मजेत शिकत आहेत.
समूहात, गटात, वैयक्तिक काम करण्याच्या पद्धतीची मुलांना सवय आहे. कॉन्फरन्स कॉलद्वारे शिकवताना सोपे झाले आहे. मुलांचे गट अभ्यासाच्या गतीनुसार केल्याने त्यांच्या गरजेनुसार आव्हाने देता येतात. मुलांना भरपूर वेळ देता येतो. गप्पांचा स्वतंत्र तास असतो. या तासाला मुले खूप छान व्यक्त होतात.
दररोज घरातच असतो. शाळेची बेल वाजते. शाळा घरात भरते. मुलांचे शिकणे चालू आहे. कोणताही खर्च नाही, रेंज प्रॉब्लेम नाही की तांत्रिक अडचण नाही. एखादे मूल वंचित राहिले तर त्यासाठी स्वतंत्र वेळ देऊन काम केले जाते... म्हणून पालकही समाधानी आहेत. तशा त्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. विश्वास आणि आपुलकी वाढत आहे. एरवी पालकांशी जास्त बोलणे होत नाही, सध्या सर्व पालकांशी खूप छान संवाद चालू आहे.
मंदिरांतून शाळेचे धडे झाले सुरू...
उर्वरित वेळेत मुलांच्या कानांवर काहीतरी शैक्षणिक पडत राहावं म्हणून आम्ही मंदिरे गाठली. शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने गावकऱ्यांना विश्वासात घेऊन मंदिरांवरील स्पीकर्सचा वापर सुरू केला. स्पीकरवरून भजनांचा आवाज घुमत असे. आता पाढे, कविता, ऱ्हाइम्स, उतारेवाचन, गीत, प्रार्थना, उपलब्ध घटक यूट्यूबद्वारे मुलांना ऐकवले जातात. यासाठी दुपारी एक ते दोन अशी वेळ ठेवली आहे. स्पीकर सुरू होण्याची घंटा स्पीकरवरून वाजवली जाते. मुले दप्तर घेतात. पुढील सूचनेप्रमाणे अभ्यास करतात. झालेला अभ्यास व्हॉट्सॲप गटात आपापल्या वर्गशिक्षकांना पाठवतात.
टिली मिली... मजेशीर शिक्षण...
शासनाने सह्याद्री वाहिनीवर टिली मिली हा एक छान कार्यक्रम सुरू केला. त्याचा फायदा माझ्या मुलांना होत आहे. गटाचे जे वेळापत्रक आहे त्यामध्ये हा कार्यक्रम पाहण्यासाठी वेळ दिलेला आहे. पहिल्या दिवशी पाहिलेल्या कार्यक्रमावर दुसऱ्या दिवशी आम्ही कॉन्फरन्स कॉलवर चर्चा करतो. व्हॉटस्ॲपवर चर्चा करतो. प्रश्न विचारतो. गप्पा मारतो... त्यामुळे मुले तो कार्यक्रम आवर्जून पाहतात.
इतर वर्गांचे शिकण्याचे नियोजन...
शाळेतील तिसरी, चौथी या वर्गांतील मुलांना शिक्षक झूम मिटिंगद्वारे दररोज अध्यापन करतात. प्रत्येक वर्गाचे व्हॉटस्ॲप ग्रुप आहेत. त्यांद्वारे आढावा घेतला जातो. ‘माझी शाळा’ या ॲपद्वारे गुगल फॉर्मवर झालेल्या अभ्यासाची चाचणी घेतली जाते. सोबत एका गटात 7 ते 10 मुले असे गल्लीनिहाय गट केले आहेत. दररोज सकाळी गल्लीतील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, विषयमित्र आणि गावातील उच्चशिक्षित व्यक्ती मुलांना सकाळी नऊ ते साडेदहा या वेळेत शिकवतात. सॅनिटायझर, साबण, मास्क गावातील लोक देतात. आम्ही शिक्षक दररोज प्रत्येक गटाला भेटी देतो. त्यांचे नियोजन केलेले आहे. मुलांचा अभ्यास अंतराचे नियम पाळून तपासून देत आहोत.
ZP Live Edd औरंगाबादद्वारे महाराष्ट्रातील मुलांना शिकवण्याची संधी मिळाली...
औरंगाबाद येथील काही उपक्रमशील शिक्षकांनी लॉकडाउनच्या काळात घरात मुलांना शिकता यावे म्हणून ZP Live Edd हा फेसबुक लाइव्हसाठीचा ग्रुप केला. महाराष्ट्रातील शिक्षकांना एकत्र करून दररोज चार तास फेसबुक लाइव्हद्वारे या पाठांचे सादरीकरण केले जाते. आजही सुरू आहे. महाराष्ट्रातील मुले आणि शिक्षक हे पाठ पाहतात आणि शिकतात, मलाही महाराष्ट्रातील इयत्ता पहिलीच्या मुलांसाठी दोन पाठ घेण्याची संधी मिळाली. ‘गणन पूर्वतयारी’ आणि ‘अंकज्ञान’ (1 ते 100) सोप्या पद्धतीने शिकवण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे.
- अशोक निकाळजे
जि. प. शाळा, राक्षसभुवन,
ता. गेवराई, जि. बीड
'कोरोना काळात आमचे शिक्षण’ या स्पर्धेसंबंधी इतर लेखही वाचा
या स्पर्धेविषयी मनोगत - शिक्षणाचा अनुबंध कायम राहावा यासाठी...
या स्पर्धेच्या परीक्षकांचे मनोगत - कोरोनाकाळ - शिकणं जगण्याशी जोडण्याचा काळ
या स्पर्धेत पहिले परितोषिक मिळवणारा लेख - स्वयंशिक्षणाला पालकांची साथ
Tags: लेखमाला कोरोना काळातील आमचे शिक्षण शिक्षक द्वितीय पारितोषिक अशोक निकाळजे Series Our education in the time of corona Teacher second Prize Ashok Nikalje Load More Tags
Add Comment