प्रास्ताविक
या वर्षी डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त (20 ऑगस्ट) साधना साप्ताहिकाने ‘विज्ञानाने मला काय दिले?’ या विषयावर विशेषांक काढला होता. तो विशेषांक विद्यार्थी व शिक्षक यांना अधिक उपयुक्त ठरणार होता... त्यामुळे एखादी स्पर्धा घोषित करावी असा विचार आमच्या मनात घोळत होता.
त्यादरम्यान डॉ.पंडित विद्यासागर यांनी असे सुचवले की, ‘कोरोना काळात आमचे शिक्षण’ हा विषय योग्य ठरेल. भौतिकशास्त्राचे प्राध्यापक व स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू राहिलेले आणि पूर्वी लोकविज्ञान चळवळीत सहभागी असलेले डॉ. विद्यासागर यांची ती सूचना आम्ही उचलून धरली. तसे निवेदन प्रसिद्ध केले. या निवेदनाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांतून मिळून 78 शिक्षक/मुख्याध्यापक यांनी त्यांच्या स्वतःच्या वा त्यांच्या संस्थेच्या कामाविषयी टिपणे पाठवली.
ही सर्व टिपणे आम्ही नामदेव माळी यांच्याकडे दिली आणि या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहण्याची विनंती त्यांना केली. सांगली इथे उपशिक्षण अधिकारी असलेल्या माळीसरांनी स्वतः शिक्षणविषयक लेखन केलेले आहे, शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी अनेक उपक्रम राबवलेले आहेत आणि थोडेच पण चांगले कादंबरी-लेखनही केलेले आहे. त्यामुळे या स्पर्धेतून निवडलेल्या टिपणांच्या पुस्तिकेचे संपादन त्यांनीच करावे असा आग्रह आम्ही धरला, त्यांनी तो मान्य केला...
शिवाय ऑनलाईन शिक्षणाविषयीचे प्रयोग आणि अनुभव ऑनलाईन माध्यमातून प्रसिद्ध करणे औचित्यपूर्ण ठरणार असल्याने यातील काही भाग ‘कर्तव्य साधना’ या डिजिटल पोर्टलवरही (1 ते 5 नोव्हेंबर या काळात) प्रसिद्ध करत आहोत.
या स्पर्धेतून निवडलेल्या पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे पाच हजार, तीन हजार, दोन हजार रुपये तर नंतरच्या दोन क्रमांकांना प्रत्येकी एक हजार रुपये पारितोषिक (एका हितचिंतकाने दिलेल्या देणगीतून) आम्ही जाहीर केले होते. ही पारितोषिके नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बँक ट्रान्स्फर केली जातील. शिवाय या स्पर्धेत सहभागी सर्व 78 जणांना प्रमाणपत्र, पुस्तिका आणि तीन पुस्तके भेट म्हणून पाठवणार आहोत. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची प्रश्न तुमचा उत्तर दाभोलकरांचे, विवेकाचा आवाज ही दोन पुस्तके आणि डॉ. विद्यासागर यांचे ‘ओवी गाऊ विज्ञानाची’ हे पुस्तक.
डॉ. विद्यासागर व नामदेव माळी या दोघांचेही साधना साप्ताहिकाशी व डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्याशी स्नेहबंध होते आणि आहेत. त्यामुळे त्यांचा हा सहभाग साहजिक होता तरीही त्या दोघांचे विशेष आभार मानले पाहिजेत. त्या दोघांनी लिहिलेली मनोगते या पुस्तिकेत प्रारंभीच घेतली आहेत. त्यात त्यांनी केलेला ऊहापोह पाहता... या स्पर्धेबद्दल या प्रास्ताविकात आणखी काही लिहिण्याची आवश्यकता आम्हाला वाटत नाही. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांना आणि त्यांच्या पुढील शिक्षणकार्याला शुभेच्छा!
- संपादक, साधना
'कोरोना काळातील आमचे शिक्षण' या स्पर्धेत सहभागी झालेल्यांमधून पाच क्रमांक पारितोषिक देण्यासाठी निवडले आहेत. ते पुढीलप्रमाणे :
1. कृष्णात पाटोळे (जिल्हा - सांगली)
2. अशोक निकाळजे (जिल्हा - बीड)
3. शीतल झरेकर (जिल्हा - अहमदनगर)
4. सुरेश आंबरे (जिल्हा - अहमदनगर)
5. वैशाली आडमुठे (जिल्हा - सांगली)
त्याशिवाय आणखी 20 व्यक्तींना परीक्षकांनी विशेष उल्लेखनीय असे संबोधले आहे. ती यादी पुढीलप्रमाणे :
उर्मिला कीर्तनकार (हिंगोली), रंजना सानप (सातारा), नम्रता पवार (अहमदनगर), मनीषा लबडे (अहमदनगर), वृषाली घोडके (अहमदनगर), स्मिता धनवटे (अहमदनगर), प्रकाश चव्हाण (नाशिक), श्रीकांत पाटील (रत्नागिरी), चंद्रकांत ठेंगे (यवतमाळ), नयना पाटील (कोल्हापूर), धनंजय कुलकर्णी (सातारा), विनीत पद्मवार (गडचिरोली), सुनील जाधव (बीड), तारीश आतार (सांगली), सारिका डांगे (सातारा), दादासो पाटील (सांगली), नकुशी देवकर (कोल्हापूर), हेमंत जाधव (सातारा), रुपाली सुतार (कोल्हापूर), राहुल आठरे (अहमदनगर)
वरील 25 व्यक्तींचे संपादित स्वरूपातील लेखन असलेली 78 पानांची पुस्तिका साधना प्रकाशनाकडून प्रकाशित केली जाणार आहे. त्यात सर्व सहभागी 78 व्यक्तींची नावे व त्यांच्या शाळेचे / संस्थेचे पत्ते अशी यादीही असेल.
मनोगत
असाधारण परिस्थितीत शिक्षणात खंड पडल्याची अनेक उदाहरणे मानवी इतिहासात आहेत. गेल्या शतकात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात शिक्षणसंस्था बंद होत्या. असे असूनही अनेक शिक्षकांनी शिकवणे सुरूच ठेवले. त्याला विद्यार्थ्यांनीही चांगला प्रतिसाद दिला. हिटरलने उभारलेल्या छळछावण्यामध्ये शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे शिकवल्याची अनेक उदाहरणे आहेत. भारतातही काही प्रमाणात अशा घटना घडल्या आहेत. असाच किंबहुना त्याहूनही अधिक परिणाम कोविड-19 या साथीच्या रोगामुळे झाला आहे.
अतिशय संसर्गजन्य आणि धोकादायक अशा कोरोना या विषाणूचा प्रभाव गेल्या आठ महिन्यांपासून कायम आहे. अचानक आलेल्या या संकटामुळे शिक्षणात खंड पडण्याचा मोठा धोका निर्माण झाला. शिक्षणात खंड पडण्याचे परिणाम दूरगामी स्वरूपाचे असतात. परिश्रमपूर्वक शिक्षणाकडे वळलेली मुले त्यातून बाहेर पडण्याचा धोका असतो.
या संकटाची पूर्वसूचना नसल्यामुळे कमालीची बिकट परिस्थिती ओढावली. अशा वेळी शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांनी एकत्र येऊन जे उपक्रम राबवले त्यासाठी ते अभिनंदनास पात्र आहेत.
शिक्षणक्षेत्रातील बदल हे संथ गतीने होतात. धोरण ठरवण्यात असलेली शिथिलता या कारणाबरोबरच शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना वाटणारी बदलाची भीतीही त्याला कारणीभूत असते. त्याचप्रमाणे शालेय शिक्षकांवर असणारा शिक्षणबाह्य कामाचा बोजा त्यांना बदलांना सामोरे जाण्यासाठी लागणारी उसंत देत नाही. या पार्श्वभूमीवर कोविड-19मुळे शाळा बंद असण्याच्या काळात शिक्षकांनी दिलेले योगदान शिक्षणाला नवी दिशा देणारे आहे.
या काळात राबवलेल्या उपक्रमांत वैविध्य, उत्स्फूर्तता, सहभाग, नावीन्य, नवनिर्मिती, विद्यार्थ्यांना दिलेली संधी आणि पालकांचा सहभाग या घटकांचा समावेश होता. या उपक्रमांत राबवलेल्या कार्यक्रमांवर नजर टाकली तरी हे लक्षात येते.
शिक्षकांनी उल्लेख केलेल्या घटकांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर हा मध्यवर्ती घटक असला तरी त्याचा उपयोग करून साध्य केलेल्या उद्देशांची दखल घेणे क्रमप्राप्त आहे. विद्यार्थ्यांचा विशेषतः विद्यार्थिनींचा सहभाग ही उल्लेखनीय बाब आहे.
शालेय शिक्षणात सहसा न आढळणाऱ्या घटकांचा यात समावेश केला गेला. त्यात गाण्यांचे व्हिडिओ, टीव्हीवरील कार्यक्रम, देशभक्तिपर गाण्यांच्या स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, जनजागृती, गट्टी नकाशाशी, झूम आणि गुगल सभा, लेखक आपल्या भेटीला, इबुक निर्मिती, हस्तलिखित आदींचा समावेश होता. यामध्ये विद्यार्थ्यांच्या सहभागाबरोबर त्यांच्या अभिव्यक्तीलाही वाव देण्यात आला हे विशेष.
उपलब्ध मूलभूत सुविधांचा आहे त्या स्थितीत उपयोग करण्याकडे यात कल दिसून आला. अन्यथा मूलभूत सुविधांच्या उपलब्धतेविषयी नेहमीच तक्रारी असतात. शिक्षकांनी स्वयंस्फूर्तीने प्रशिक्षण घेऊन त्यांचे केलेले उपयोजन, हा एक आदर्श वस्तुपाठच ठरावा. एकमेकांना मदत करण्याचे मूल्यशिक्षणही यातून विद्यार्थ्यांना मिळाले. अशा प्रकारे आपत्तीचे रूपांतर संधीमध्ये करण्याचा अभिनव प्रयोग साकार झाला असे म्हणता येईल.
साधना साप्ताहिकाने राबवलेल्या या उपक्रमाची दोन वैशिष्ट्ये सांगता येतील. पहिले वैशिष्ट्य हे आहे की, कोरोनाकाळात शिक्षकांनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम आहे. अशा शैक्षणिक उपक्रमांची नोंद इतर शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना मार्गदर्शक ठरणारी आहे.
नव्या शैक्षणिक धोरणात पूर्वप्राथमिक ते माध्यमिक स्तरापर्यंत अध्ययन आणि अध्यापन पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल सुचवला आहे. मी शिकवले तसे आणि तेवढेच विद्यार्थ्यांनी शिकावे ही पूर्वापर चालत आलेली मानसिकता बदलावी ही अपेक्षा त्यात आहे. विद्यार्थ्यांचा शिकण्यामधील सहभाग वाढणे अपेक्षित आहे... तसेच शिकवण्याच्या विविध पद्धतींचा अवलंब करावा असेही सूचित करण्यात आले आहे.
मुलांनी शिकण्याचा आनंद घ्यावा, प्रश्न विचारावेत आणि कृतिशील राहावे ही त्रिसूत्री परिणामकारक शिक्षणासाठी आवश्यक असते. शिक्षणामध्ये तंत्रविज्ञानाचा उपयोग हा नव्या शैक्षणिक धोरणाचे वैशिष्ट्य असणार आहे. वर्गशिक्षणाबरोबर ऑनलाईन शिक्षणाचा समावेश हा त्याचा उद्देश आहे. कोरोनाकाळातील शैक्षणिक उपक्रमात त्याची गरज अधोरेखित झाली. त्यातून या पद्धतीचे फायदे आणि तोटेही समजले. या अनुभवांचे एकत्रीकरण हीसुद्धा ‘साधना’ने राबवलेल्या उपक्रमाची मोठी उपलब्धी आहे.
कोरोनाकाळात निर्माण होऊ पाहत असलेला शिक्षणात खंड पडण्याचा मोठा धोका वाढू नये आणि शिक्षणाचा अनुबंध कायम राहावा यासाठी शिक्षक-विद्यार्थी आणि पालक यांनी अडचणींवर मात करून शैक्षणिक उपक्रम राबवले.
समोर आलेली माहिती ही प्रातिनिधिक स्वरूपाची असली तरी संकटाला घाबरून न जाता त्यातून नवे मार्ग शोधण्याची ऊर्मी दिसून येते. महाराष्ट्रात असेच उपक्रम अनेक स्तरांवर राबवले गेले, त्यांचीही दखल घ्यायला हवी. नवे शैक्षणिक धोरण राबवण्याच्या दृष्टीकोनातून निर्माण झालेले चित्र निश्चितच आशादायी आहे.
- डॉ. पंडित विद्यासागर
माजी कुलगुरू,
रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
Tags: लेखमाला कोरोना काळातील आमचे शिक्षण प्रास्ताविक मनोगत विनोद शिरसाठ डॉ. पंडित विद्यासागर Series Our education in the time of corona Preface Vinod Shirsath Dr Pandit Vidyasagar Load More Tags
Add Comment