‘कोरोना काळात आमचे शिक्षण’ या स्पर्धेविषयी प्रसिद्ध केलेल्या निवेदनाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांतून मिळून 78 शिक्षक/मुख्याध्यापक यांनी त्यांच्या स्वतःच्या वा त्यांच्या संस्थेच्या कामाविषयी टिपणे पाठवली. या स्पर्धेत परीक्षक होते सांगली इथे उपशिक्षण अधिकारी असलेले नामदेव माळी सर. त्यांनी या स्पर्धेतून निवडलेले सर्वोत्तम पाच लेख उद्यापासून सलग पाच दिवस प्रसिद्ध केले जाणार आहेत. यानिमित्ताने नामदेव माळी यांचे मनोगत प्रसिद्ध करत आहोत...
कोरोना माणसांना शिकवण्यासाठी आलाय. जेवणापूर्वी हात धुण्यास आम्ही टाळाटाळ करत होतो. हात धुण्याची सवय लागावी म्हणून मोहीम घेत होतो. ‘हात धुवा दिवस’ साजरा करत होतो. हात धुण्याच्या पायऱ्या शिकवत होतो... पण कितीही शिकवलं तरी आम्ही शिकायला तयार नव्हतो.
मग आला कोरोना. म्हणाला, ‘हात धुवा... नाहीतर तुम्हाला चांगलाच शिकवीन धडा.’ तो हात धुऊन जगाच्या मागे लागला. जणू त्यानं स्वच्छता मोहीम सुरू केली. मग आम्ही एकदा नाही... तर दर तासा-दोन तासाला हात धुवायला लागलो. त्यानं हात धुण्याचा धडा शिकवला.
कोरोनाकाळ पाठ्यपुस्तकातले धडे शिकण्याबरोबर जगणं शिकण्याचा काळ आहे. शिक्षण जगण्याशी जोडायला शिकण्याचा काळ आहे. खरंतर जगणंही शिकण्याशी जोडता आलं पाहिजे. निसर्गनियमानं जगा, निसर्गाबरोबर जगा. ‘शाळा आहे शिक्षण नाही’, ‘शाळा आहे आणि शिक्षणही आहे’ हे आपण ऐकत होतो. सध्या कोरोनामुळं शाळा बंद... पण शिक्षण आहे हे आपण वाचतो, ऐकतो आहोत. काही शिक्षक हे सिद्ध करण्याची धडपड करताहेत. हे जाणून घेण्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यासाठी ‘कोरोना काळातील आमचे शिक्षण’ या स्पर्धेचं आयोजन साप्ताहिक साधनाकडून झालं.
‘शाळा बंद... पण शिक्षण आहे...’ हे कसं सुरू आहे हे दाखवण्याची संधी महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमधल्या 78 शिक्षक-मुख्याध्यापकांनी घेतली. जग जवळपास ठप्प असताना या आणि यांच्यासारख्या शिक्षकांनी शिकणं, शिकवणं सुरू ठेवलं. ऑनलाईन शिक्षणाबरोबर कल्पकता दाखवून; उपलब्ध साधनांचा, समाजाचा, पालकांचा सहभाग घेऊन; हाताशी असलेल्या वेळेचे योग्य नियोजन करून नेहमीप्रमाणे... पण शाळेबाहेर मुलांचं शिकणं सुरू ठेवलं. माध्यमिक शाळा, आश्रमशाळा, गुरुकुल, जिल्हा परिषद शाळा, खासगी प्राथमिक शाळा यांच्या शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी या स्पर्धेसाठी टिपणं पाठवली होती.
नगरपालिकांच्या आणि महानगरपालिकांच्या शाळांमधल्या शिक्षकांनी यामध्ये सहभाग घेतलेला नाही. महाराष्ट्राचा सर्व विभागांतल्या... अगदी रत्नागिरीपासून गडचिरोलीपर्यंतच्या शिक्षकांनी कामाची नोंद पाठवली आहे... त्यामुळं या टिपणांमधून महाराष्ट्रात शाळा बंद असताना शिकणं कसं सुरू आहे याचं साधारण चित्र समोर येतं.
जवळपास सर्वच शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य दिलेलं आहे. त्यासाठी काहींनी स्वतः शिकून घेतलं आहे. मोबाइल नसणं, रेंज-नेटवर्क नसणं, आवाजाची स्पष्टता नसणं, शिकवताना मुलांशी संवाद साधता न येणं असं समस्यांचं स्वरूप आहे.
अभ्यास देण्यासाठी व्हाट्सॲपचा अधिक वापर झाला आहे. पालकांच्या बैठकीसाठी व्हाट्सॲपवरून सूचना दिलेल्या आहेत. बैठकांसाठी झूमचा वापर केला आहे. व्हाट्सॲपवरून पीडीएफ, प्रश्नपत्रिका, व्हिडिओ या स्वरूपात अभ्यासाच्या लिंक पाठवल्या आहेत. झूमचा आणि गुगल मीटचा वापर करून माहिती, सूचना आणि शिकवणं झालं आहे. पुढच्या टप्प्यामध्ये वर्गात शिकवल्याप्रमाणे शिकवलं आहे. ते मुलांनी पाहून, ऐकून, चर्चेत भाग घेऊन शिकण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षकांनी ऑनलाईन विविध स्पर्धा घेतल्या आहेत. मुलांनी केलेला अभ्यास, व्हिडिओ, चाचण्यांचे फोटो व्हाट्सॲपवर शिक्षकांना पाठवले आहेत.
‘शाळा बंद... पण शिक्षण आहे’ या मालिकेच्या लिंक दीक्षा ॲप, दूरदरर्शनवरच्या ‘टिली मिली गली गली सीम सीम’ ही मालिका अशा शासनस्तरावरून होणाऱ्या प्रयत्नाचाही अध्ययन-अध्यापनासाठी वापर केला आहे.
ज्या मुलांकडं मोबाईल नाहीत त्यांना गल्लीमित्र जोडून देण्यात आले. ऑनलाईन शिक्षणाचं सर्वसाधारण स्वरूप असं आहे. काही शिक्षकांनी अभ्यासाच्या, प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्स प्रती काढून मुलांना दिल्या. काहींनी मंदिरांत, ओट्यांवर, गल्ल्यांमध्ये मुलांना एकत्र करून अंतराचे नियम पाळून अध्यापन केले आहे. अवांतर वाचनाची पुस्तकं घरी दिली आहेत. माहितीचे आणि मनोरंजनाचे व्हिडिओ पाठवले आहेत. विज्ञानाचे प्रयोग करून पाहणं, विविध वस्तू (राख्या, मूर्ती) तयार करणं, दैनंदिनी, गोष्ट, कवितालेखन, नृत्य-नाट्य-गायन अशा विविध संधी दिल्या आहेत. हे सगळं शिक्षकांनी केलेलं नाही. यांपैकी काही गोष्टी केल्या आहेत. काही शिक्षकांनी स्वयंसेवक, पालक यांची मदत घेतली आहे.
कोरोनाकाळानं शिक्षकांना तंत्रज्ञानाचा वापर करायला लवकर शिकवलं. शिक्षकांना ज्या गोष्टीला आणखी काही वर्षं लागली असती त्या ऑनलाईन शिक्षणातल्या गोष्टी चारपाच महिन्यांत अवगत केल्या आहेत. हे गरजेतून झालं आहे. अर्थात हे प्रमाण किती आहे याचा स्वतंत्र अभ्यास करावा लागेल.
संगमनेरच्या नम्रता पवार यांनी तंत्रज्ञानाबरोबर, बालसाक्षरता लिपी, वाचू आनंदे, इंग्रजी लेखनसमृद्धी अशा वेबिनारमध्ये सहभागी झाल्याची नोंद केली आहे. शिकलेल्या गोष्टींची शिक्षकांबरोबर चर्चा केली आहे. याचा उपयोग शाळेत करण्याविषयी विचार केला आहे.
बऱ्याच शिक्षकांनी या काळात विविध स्पर्धा घेतल्या आहेत. हल्ली स्पर्धा घेणाऱ्या खूप संस्था आहेत. स्पर्धेत बक्षीस मिळालं की त्याचा गाजावाजाही केला जातो. समाजमाध्यमांतून प्रसिद्धी केली जाते. आभासी कौतुकाचा वर्षाव होतो. फुलं आणि हातांच्या बोटांची चिन्हं, स्मायली पाहून आनंदाच्या उकळ्या फुटतात. स्पर्धा घेणं, पुरस्कार देणं हा काही मंडळींचा उद्योग झाला आहे.
कोणत्याही सरकारी खात्याला एखादा कार्यक्रम राबवायचा असला की त्यांना शाळा दिसतात. ते मुलांच्या विविध प्रकारच्या स्पर्धा घेतात. मुलांच्या स्पर्धा घेतल्या की कार्यक्रम यशस्वी होतो असा समज असावा. चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व या स्पर्धा घेतल्यानं गुणवत्ता कशी काय वाढते? ठोकळेबाज भाषणं आणि निबंध तयार होतात. हे निबंध, भाषणं वर्षानुवर्षं बक्षीस मिळवून देतात. त्यासाठीची पुस्तकं बाजारात मिळतात. ऑनलाईन कॉपी-पेस्टही जोरात सुरू असतं.
एखाद्या विषयात प्रावीण्य मिळवण्यासाठी अभ्यास, कृती, सराव, साधना आवश्यक असते. त्यासाठी शाळेनं तशा संधी निर्माण केल्या पाहिजेत, दाखवल्या पाहिजेत. स्पर्धेनंतर अधिक यश मिळवण्यात आपण कुठे कमी पडलो याचा विचार झाला पाहिजे. स्पर्धेनंतर गुणवत्ता विकासाला सुरुवात झाली पाहिजे. स्पर्धा जिंकणाऱ्याला बक्षीस असतं, न जिंकणाऱ्याला त्याची गरज पाहून कौशल्य प्राप्त करण्यासाठी काहीतरी द्यायला हवं ना....
स्पर्धेत क्रमांक मिळवण्यासाठी शिकायचं नाही... तर शिकण्यातला आनंद घेण्यासाठी; आवड, छंद जोपासण्यासाठी शिकायला हवं. स्पर्धेत ठरावीक मुलांनाच बक्षिसं मिळतात, मग आपण कशाला सहभाग घ्या... असा विचार बळावतो.
ऑनलाईन शिक्षण आणि ऑनलाईन स्पर्धा असतील तर ज्यांच्याकडं अँड्रॉईड मोबाइल नाही अशा मुलांच्या स्पर्धेतल्या सहभागासाठी स्वतंत्र विचार करायला हवा.
कोरोनाचं संकट अचानक आल्यानं ऑनलाईन शिकण्याचा पर्याय समोर आला. त्यासाठी शिकण्या-शिकवण्याची पूर्वतयारी करता आलेली नाही. इझी टेस्टच्या माध्यमातून काही प्रमाणात काही शिक्षकांनी प्रशिक्षण घेतलं आहे. तथापि नियोजनपूर्वक सर्व शिक्षक प्रशिक्षण घेतील आणि सर्व जण त्याचा उपयोग शिकवण्यासाठी करतील यासाठी अवधी मिळालेला नाही.
व्हिडिओ, पीपीटी, झूम, गुगल मीट यातलं कोणतं माध्यम माझ्यासाठी, माझ्या मुलांसाठी आणि शिकवण्याच्या घटकासाठी उपयुक्त आहे हे जाणून त्याचा वापर होण्यासाठी शिक्षक सक्षम व्हायला हवेत.
कोणत्या विषयातला कोणता भाग समजला, कुणाला समजला, कुणाला कोणता भाग समजला नाही, का समजला नाही याचा विचार करून सर्व ठरवावं लागेल. अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन यांसाठी विविध पर्याय स्वीकारावे लागतील. मूल्यमापन एकट्या शिक्षकांनी न करता पालक, स्वयंसेवक, मित्र आणि प्रत्येकानं स्वतः करावं लागेल. एखादा भाग शिकण्यासाठी समाजातल्या तज्ज्ञांचा सहभाग घेतला असेल तर ते मूल्यमापन करतील.
मूल्यमापन हे परीक्षा बघण्यासाठी, गुण देण्यासाठी, पासनापास ठरवण्यासाठी नसून शिकण्याची पातळी, दर्जा ठरवून वाढवण्यासाठी, न शिकलेला भाग शिकण्यासाठी आहे हा विचार दृढ करावा लागेल. भविष्यात शाळा सुरू झाल्या तरी ही गोष्ट (ऑनलाईन शिक्षण, मूल्यमापन) कायमस्वरूपी करायची आहे. बहुपर्यायी ऑनलाईन टेस्ट आणि झेरॉक्स प्रतींवरची चाचणी ही तात्पुरती सोय आहे हे लक्षात घ्यावे लागेल.
माहितीचा स्फोट झाला असल्यानं समाजमाध्यमांवर शिक्षणविषयक खूप व्हिडिओ, पीपीटी इत्यादी उपलब्ध आहेत. संख्या वाढली की गुणवत्तेचा प्रश्न आला. माहितीचे आणि शिकवतानाचे बरेच व्हिडिओ सुमार दर्जाचे, शिकणाऱ्याला गोंधळात टाकणारे आहेत. त्यासाठी चोखंदळ निवडीची आवश्यकता आहे.
काही व्हिडिओंमध्ये पुस्तकाची पानं जशीच्या तशी देऊन आवाज दिला आहे. चित्र/फोटो आणि आवाज, समानार्थी, विरुद्धार्थी शब्दांच्या याद्या असे व्हिडिओ आहेत... म्हणजे जे कागदावर आहे ते स्क्रीनवर दिसतं याला ऑनलाईन शिक्षण कसं म्हणायचं? ते विद्यार्थ्यांच्या वेळेच्या शोषणाशिवाय दुसरा परिणाम करत नाही. अशा साहित्याचा वापर करून मुलं शिकतात असं म्हणणं धाडसाचं होईल. त्यासाठी चोखंदळ निवड हा पर्याय आहे.
झाडं मुळांकडून पानांपर्यंत पाणी कसं शोषतात याचा प्रथम संस्थेचा छान व्हिडिओ दीक्षा ॲपवर आहे. विज्ञान, भूगोल विषयांतल्या अमूर्त कल्पना, भूकंप, ज्वालामुखी किंवा प्रत्यक्ष पाहणं शक्य नसलेल्या गोष्टी समजण्यासाठी-शिकण्यासाठी व्हिडिओ उपयुक्त ठरतात. त्यासाठी शिक्षकांनी अगोदर पाहणं, पडताळणी करणं, निवड करणं हे सारं कसं करायचं याचा विचार आणि नियोजन करणं असं घडायला हवं.
व्हिडिओ कसा हवा, कसा दाखवावा, पूर्वतयारी काय असावी, प्रत्यक्ष व्हिडिओ पाहताना प्रतिक्रिया कशा घ्याव्यात किंवा कृती कशी सांगावी, पाहून झाल्यानंतर काय करावं याचा सखोल विचार करायला हवा... नाहीतर फक्त व्हिडिओ दाखवणं इतकाच उद्देश असेल तर ते काम शाळेचा शिपाई किंवा भात शिजवणारी मावशीही करू शकेल.
मूल्यमापनासाठी विविध पर्याय वापरायला हवेत. सध्याच्या काळात ओपन बुक टेस्टचा पर्याय चांगला आहे. दादासाहेब पाटील यांनी त्यांच्या टिपणामध्ये याचा उल्लेख केला आहे. त्यासाठी शिक्षकांनी वस्तुनिष्ठ प्रश्नांबरोबर आकलन, विश्लेषण, उपयोजन होईल असे प्रश्न तयार करायला हवेत... शिवाय प्रश्नाचं उत्तर मजकुरामध्ये छापील स्वरूपात दिसणार नाही... परंतु आकलन झालं असेल तर उत्तर देता येईल असे प्रश्न द्यायला हवेत. असे प्रश्न विद्यार्थ्यांनाही तयार करता आले पाहिजेत. अशी प्रश्ननिर्मिती केल्यानं त्या मजकुराचं आकलन विद्यार्थ्यांना होईल. स्वयंशिक्षणाला मदत होईल.
एखादी कृती ऑनलाईन केली म्हणजे मुलं शिकली असं म्हणणं धाडसाचं होईल. काही शिक्षकांशी, अधिकाऱ्यांशी चर्चा केली; त्यांच्या मते हे माध्यम इयत्ता पहिली ते पाचवीसाठी अगदी कमी प्रमाणात (कविता ऐकणं, गोष्ट ऐकणं, प्रत्यक्ष घडणाऱ्या गोष्टींचे व्हिडिओ पाहणं या गोष्टींसाठी) उपयुक्त आहे.
सहावी ते आठवीच्या मुलांनी शिक्षकांची, मोठ्यांची मदत घेतली तर चांगला उपयोग होतोय. नववीच्या पुढचे विद्यार्थी या माध्यमांचा उपयोग स्वयंअध्ययन करण्यासाठीही करतात. अर्थात हे वर्गीकरण कायमस्वरूपी नाही. सराव आणि साधनाची उपलब्धता असेल तर हे प्रमाण वाढू शकतं.
ऑनलाईन अध्यापन करताना विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घ्यायला हव्यात. मुलांचं मन शिकण्यात नसेल तर शरीरानं वर्गात असलेली मुलं प्रत्यक्षात शिकत नसतात. त्याप्रमाणे सुमार दर्जाचे व्हिडिओ किंवा इतर साहित्य तसंच अध्यापन विद्यार्थ्यांना शिकण्यापासून दूर लोटतं.
आपण समोर असल्यानं वर्गातलं मूल आपल्याकडं पाहण्याचा अभिनय करतं... कारण त्याला बाहेर पडता येत नाही... पण ऑनलाईन तासाला विद्यार्थी हे स्वातंत्र्य घेतात. आपला व्हिडिओ आणि आवाज बंद करतात. मोबाइल बाजूला ठेवतात म्हणजे शिकवणाराचं तोंड दिसण्याचा प्रश्न नाही. शिकणं तर खूप दूरची गोष्ट झाली. ‘तास छान झाला’ अशी प्रतिक्रिया ते देऊ शकतात. तेवढं शहाणपण त्यांच्याकडं आहे. विद्यार्थी-पालकांशी मोकळ्या गप्पा मारून जिज्ञासूंनी खातरजमा करावी.
जी मुलं ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत त्यांच्या शिकण्याचा विचार डोळसपणे करावा लागेल. अन्यथा ज्यांच्याकडं आहे त्यांना अधिक मिळण्याची आणि उपाशी आहे तो उपाशीच राहण्याची शक्यता अधिक आहे. अशी मुलं नेहमी वंचित राहतात. अशा काळात ही मुलं शाळेपासून, शिक्षणापासून दूर असतील तर त्यांचा शोध घ्यावा लागेल. ही मुलं पालकांबरोबर मजुरीला जात आहेत काय? रिकामी भटकत आहेत काय? आतली ऊर्जा नको त्या कृतीत खर्च करत नाहीत ना... त्यांचं हे शिकण्यापासूनचं ‘तुटलेपण’ त्यांना प्रवाहातून बाहेर ढकलणार नाही याची काळजी घेण्याचा हा काळ आहे.
अशा मुलांसाठी ऑनलाईन शिक्षणाचा आग्रह न धरता ऑफलाईन काय करता येईल याचा विचार करावा. अहमदनगर जिल्हा परिषदेनं सर्व मुलांना स्वाध्यायपुस्तिका पुरवल्या आहेत. अशा गोष्टींना आणखी कशाची जोड देता येईल याचा विचार करावा लागेल.
शिक्षक झूमचा, गुगल मीटचा वापर करून अध्यापन करत आहेत. त्यांचं शिकवणं विद्यार्थ्यांबरोबर पालकही बघत आहेत. असा आपल्या शिकविण्याविषयी आत्मविश्वास असणारे शिक्षक कौतुकास पात्र आहेत.
ऑनलाईन शिक्षण म्हणजे शिकवण्याचं एकमेव साधन नव्हे. हा एक पर्याय आहे. काही तंत्रस्नेही शिक्षक महाराष्ट्राचं, देशाचं बोलतात. किती लाख लोकांनी व्हिडिओ बघितला, किती लाख लाइक्स आले, किती लाख... अशा त्यांच्या सगळ्या लाखांच्या गोष्टी असतात. असे तंत्रस्नेही हे विद्यार्थिस्नेही आहेत काय? त्यांच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयी त्यांनी गोष्टी करायला हव्यात. दिव्याखाली अंधार नाही ना... हे तपासावं लागेल.
घरी रेंज नाही, जंगलात रेंज येते म्हणून अशा ठिकाणी झोपडी बांधून काही मुलांनी शिकणं सुरू केलं. दुसरा पर्याय नसल्यानं मुलं बेजार तर झाली नाहीत ना... महाराष्ट्रातल्या दोन मुलांनी अँड्रॉईड मोबाईल मिळत नाही म्हणून आत्महत्या केली आहे. इतर राज्यांतही अशा घटना घडत आहेत. आत्महत्या करायला भाग पाडणारी ही कसली आली शिक्षणाची पद्धत? शिक्षणानं जगायला शिकलं पाहिजे, मरायला नाही. जगायला शिकवतं ते शिक्षण.
ऑनलाईन शिक्षण ही काळाची गरज आहे. यापुढच्या काळात आपल्याला तंत्रज्ञानाचा हात सोडून चालणार नाही. शिकण्या-शिकवण्याच्या पद्धती बदलाव्या लागतील हे खरं असलं तरी ते थोडं सबुरीनं भारताचा आणि इंडियाचा विचार करून घ्यायला हवं.
मूल शिकावं म्हणून पालकांनी जिवाचं रान करणं ठीक... पण अँड्रॉईड मोबाईलसाठी जिवाचं रान करावं, घरातलं गरजेचं किडूकमिडूक विकावं हा ऑनलाईनच्या लाटेचा परिणाम नाही ना... बऱ्याच वेळा आमचं शिक्षण लाटेवर स्वार होतं. कधी पहिलीपासून इंग्रजी तर कधी रचनावाद. लाट ओसरली की मग पुढची लाट यायची वाट बघत बसायचं.
मोबाईलला रेंज नसेल तर डोंगरात, जंगलात शिकार शोधल्यासारखं रेंज शोधत फिरण्याची गरज नाही. जंगलात रेंज शोधण्यापेक्षा जंगलवाचन करावं. ते पुस्तक उघडं आहे. त्यासाठी ग्रंथालयातही जाण्याची गरज नाही. जुनीजाणती माणसं ग्रंथपालाचं काम करतील. सापडलेली रेंज कधीही गायब होते... कारण ती आपल्याकडं चुकून आलेली असते. या रेंजचा शोध म्हणजे गाडीतून प्रवास करताना एखाद्याला सांगावं की, बाहेरचा निसर्ग बघ तर त्यानं म्हणावं की, तोच प्रयत्न करतोय... पण डोंगर आणि झाडं आडवी येताहेत. ‘तुझे आहे तुजपाशी परि तू जागा चुकलाशी’ असं तर होत नाही ना...
चार भिंतींच्या आतलं शिक्षण बिनभिंतीच्या शाळेत देण्याची ही उत्तम संधी आहे. पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचं पुस्तक वाचण्याची संधी आहे. पाठ्यपुस्तकापलीकडं जाऊन अभ्यासक्रम पूर्ण करता येईल याचा विचार आणि त्याबरहुकूम कृती करण्याचे हे दिवस आहेत.
कोरोनासोबत जगणं शिकण्याचा हा काळ आहे. या काळात व्यायाम, झोप, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आहार, आरोग्यविषयक चांगल्या सवयी यांचं महत्त्व समजून घेण्याचा, शिकण्याचा, अमलात आणण्याचा हा काळ आहे.
किशोर वयातील मुलांना त्यांची ऊर्जा गप्प बसू देत नाही. दिवसभर शाळेत असणाऱ्या मुलांना घरातल्या बंधनात राहावं लागतंय... त्यामुळं त्यांच्यामध्ये निराशा आणि चिडचिड निर्माण होत आहे. इतका काळ मुलं घरात ठेवणं, बंधनात ठेवणं पालकांना त्रासदायक झालं आहे.
मुलांच्या मेंदूला आणि हातांना काम दिलं तर मुलं आनंदी राहतील आणि शिकतील. जी मुलं मुळातच शिकण्यात पाठीमागे आहेत त्यांना शिकण्याच्या कृतीमध्ये गुंतवलं पाहिजे... नाहीतर शिकण्यातला आनंद न मिळाल्यामुळं अगोदरच शिकण्याविषयीची त्यांची नावड अधिक प्रभावी होईल... त्यामुळं अशा मुलांचं शिकणं शिकण्याशी जोडून राहण्याची सोय करावी लागेल. अन्यथा त्यांच्या रिकामपणातल्या कृती त्रासदायक ठरतील... म्हणून पालकांनी मुलांना हव्या त्या कामांत गुंतवायला हवं.
मुलांना सहजगत्या करता येण्यासारख्या कोणत्या कृती आहेत याचा विचार करून कृती, उपक्रम, प्रकल्प देता येतील. गरज, वय, अंमलबजावणीतली सहजता लक्षात घेऊन हे करावं लागेल. संग्रहाचं, सर्वेक्षणाचं, संशोधनाचं, मॉडेल तयार करण्याचं तसंच मुक्त प्रकल्पांचं नियोजन करता येईल. उदाहरणार्थ, कोरोनाच्या बातम्यांचा संग्रह करा, त्यावर आधारित अहवाल लिहा. पशुपालन, दूधविक्री केंद्र, शेती यांमधले घटक देऊन अभ्यास करता येईल. शहरामध्ये फळमार्केट, भाजीपाला बाजार, विविध दुकानं, हातगाडे, वाहतूक सुविधा, बांधकाम आणि त्याच्याशी संबंधित नळजोडणी, सेन्टरिंग अशा व्यवसायांची माहिती घेऊन अभ्यास करता येईल.
याचं नियोजन करणं, देखरेख करणं, आढावा घेणं या गोष्टी शिक्षक-पालक यांना नवीन असल्यानं अवघड वाटण्याची शक्यता आहे. ‘असं कधी होतंय काय?’ ‘हे बोलायला ठीक आहे, आदर्शवादी आहे’ अशा नेहमीच्या प्रतिक्रिया येणं साहजिक आहे.
शहरामध्ये आपला मुलगा शेजाऱ्याच्या मुलांपेक्षा मागे राहता कामा नये म्हणून मुलांचे प्रकल्प पालक रात्रंदिवस झटून करतात. जे मुलांनी करायचं, शिकायचं ते पालक करतात. बाजारातले प्रकल्प विकत आणतात. शिक्षक स्वीकारतात. गुण/श्रेणी देतात.
मार्च ते ऑक्टोबर या काळात नेहमीच्या पद्धतीनं काम करणारा मेंदू तसा निवांत आहे. कामाच्या दुसऱ्या पद्धतीचा स्वीकार करायला मेंदू सहजासहजी तयार होत नाही. त्यातच शिक्षकांना इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे कोरोना संदर्भातलं सर्वेक्षण, समुपदेशन या जबाबदाऱ्या दिल्या आहेत... शिवाय शाळेतली नेहमीची कामं आहेतच. या सर्वांचा ताळमेळ घालण्याची कसरत करावी लागणार आहे.
कृती, उपक्रम, प्रकल्प यांच्या माध्यमातून स्वयंशिक्षणाच्या, करून पाहण्याच्या, स्वतःच्या-सहकाऱ्याच्या चुका स्वीकारण्याच्या, चुका दुरुस्त करण्याच्या, नकार तसंच अपयश पचवण्याच्या, जगरहाटी समजण्याच्या, सोबत काम करण्याच्या सवयी लागतील. विचार, तुलना, विश्लेषण, अंदाज, निष्कर्ष, निर्णय आणि कृती करण्याची सवय लागेल. स्वतः करण्याच्या सवयीनं सर्जनशीलतेला संधी मिळेल. शाळेत शिकवले जाणारे विषय, पाठ्यपुस्तक यांच्याशी या गोष्टी जोडता येतील.
भाषा विषयामध्ये धडा शिकवण्यावर भर असतो, भाषा नगण्य शिकवली जाते. धड्याखालच्या किंवा कवितेखालच्या प्रश्नांची उत्तरं लिहिली की भाषा शिकून-शिकवून झाली हा मर्यादित विचार सोडून द्यायला हवा. उपयोजित लेखन हा भाषा शिकण्यातला महत्त्वाचा भाग... पण याकडं दुर्लक्ष होतं. प्रसंगाचं, ऐकलेल्या-वाचलेल्या गोष्टीचं तोंडी-लेखी वर्णन करणं, चित्रवर्णन, गोष्ट, बातमी तसंच पत्रलेखन या गोष्टी मोठी भावंडं, मित्र, पालक, आजी-आजोबा यांच्यासोबत शिकता येतील. गोष्ट, बालपणातल्या आठवणी, प्रसंग ऐका, सांगा; प्रसंगावरून बातमीलेखन (त्याअगोदर वाचन) करणं, लोकगीतं, भजन, ओव्या, हुमान हे सारं ऐकणं, लिहिणं, संग्रह करणं... त्याविषयी विचार, चर्चा करणं अशा कितीतरी गोष्टी अनौपचारिकरीत्या घरातून आणि परिसरातून शिकता येतील.
प्रत्येक गावात एकतरी आजी, मावशी अशी असते की, तिला जात्यावरच्या ओव्या, लग्नातली हळदीची गाणी येतात. नागपंचमीच्या, हदग्याच्या वेळी गायली जाणारी गाणी, दिवाळीला गायीम्हशी ओवाळताना म्हटली जाणारी गाणी, लोककथा ऐकता येतील, सांगता येतील, संग्रहित करता येतील. रूढी, परंपरा, लोकसंस्कृती समजून घेता येईल.
भविष्यात या विषयांचे अभ्यासक व्हायचे असेल तर शालेय वयात अशी आवड, छंद जोपासायला हवा. अनेक गोष्टींच्या अनुभवातून आवड, छंद तयार होतील. त्यांची जोपासना झाली तर मोठेपणी त्यावर प्रभुत्व मिळेल.
शिकणं सण-उत्सवांशी जोडताना मातीचे गणपती, नागोबा करणं, दिवाळीला किल्ले तयार करणं या संधी द्यायला हव्यात. यांतून सर्जनशीलतेला वाव मिळेल. प्राप्त टिपणामध्ये काही शिक्षकांनी मुलांकडून विविध वस्तू, मातीच्या मूर्ती, वाचन-लेखनासाठी मुलांना प्रोत्साहन दिल्याच्या नोंदी आहेत.
झाडं, प्राणी, पक्षी, सूर्योदय, सूर्यास्त, रात्रीचं आकाश, परिसर यांचं निरीक्षण; तसंच घर, घराचा परिसर, स्वयंपाकघर यांच्या निरीक्षणातून आणि नोंदींतून विज्ञान-भूगोलातल्या कितीतरी गोष्टी अनुभव घेऊन, प्रत्यक्ष पाहून शिकता येतील. याला पाठ्यपुस्तकाच्या आणि इयत्तेच्या बंधनातून बाहेर काढता येईल.
या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या विनीत पद्मवार यांनी अशा काही गोष्टी केल्याच्या नोंदी त्यांच्या टिपणामध्ये केल्या आहेत. उदाहरणार्थ, झाडांची नावं, उपयोग, पानांपासून पत्रावळ्या तयार करणं; नैसर्गिक रंगांचा वापर करून घरांच्या, शाळेच्या भिंतींवर चित्रं काढणं अशा प्रकारे मुलांना संधी मिळाली तर पुस्तकात असलेल्या झाडांच्या माहितीपेक्षा कितीतरी वेगळी आणि अधिक माहिती मुलं मिळवतात.
गावातल्या शेतीव्यवसायाचा अभ्यास करता येईल. घेतली जाणारी पिकं, पिकांसाठी लागणारे पावसाचं आणि पाण्याचं प्रमाण, जमिनीचा पोत, वापरली जाणारी खतं, औषधं, मुख्य पीक, त्याची बाजारपेठ, शेतीमध्ये येणाऱ्या अडचणी हे मुलाच्या आसपास दिसणारं रोजच्या अनुभवातलं आहे. याकडं अभ्यास म्हणून, शिक्षण म्हणून बघण्याची दृष्टी, विचार देणं; अभ्यासासाठीचं नियोजन करणं एवढं शिक्षकांना करावं लागणार आहे. ही मुलं पुढे शेती भूगोलाची, आर्थिक भूगोलाची, नागरी भूगोलाची अभ्यासक होतील. शहरातल्या मुलांना त्यांच्या परिसराचा अभ्यास करून विषय देता येतील.
घर, परिसर, शाळा, गाव, गावाचा परिसर, तालुका अशा क्रमानं मुलांनी आराखडे आणि नकाशे तयार करणं, अभ्यास करणं शिकवता येईल. शेतीच्या अभ्यासात पाहिलेली पिकं नकाशामध्ये दाखवता येतील. यासाठी ऑनलाईन माहिती, फोटो, व्हिडिओ यांची मदत घेता येईल. असं शिकणं झालं तर ही मुलं उत्तर दिशा कुठं आहे... विचारल्यानंतर ‘वर’ म्हणून सांगणार नाहीत. नकाशातली ठिकाणं आणि जमिनीवरची ठिकाणं कल्पनेनं पाहू शकतील. त्यांना जमिनीवरची ठिकाणं नकाशात दिसतील.
शेतीचा हा अभ्यास इतिहास विषयाशी जोडता येईल. अधिक विचार केला तर विज्ञानाशी आणि गणिताशीही जोडता येईल. वेगवेगळ्या काळांत शेती करण्याच्या पद्धती, मशागतीची साधनं, औषधं, खतं, बियाणं, उत्पन्न, उत्पादनाचा विनियोग कसा बदलता गेला याचा अभ्यास करता येईल. गावच्या शेतीचा इतिहास कळेल. माझा इतिहास, माझ्या घराचा इतिहास, गावाचा इतिहास; गावाच्या इतिहासामध्ये व्यवसाय, पाणीव्यवस्था, रस्ते, आहार, समाजरचना, लोकव्यवहार, घरांची रचना आणि बांधकामासाठी वापरलं जाणारं साहित्य यांचा अभ्यास करता येईल. याचं लेखन करता येईल. गोष्टीरूप इतिहास लिहून हा अभ्यास भाषाविषयाशी जोडता येईल.
मोठी माणसं, आजीआजोबा गावात असतील तर त्या-त्या विषयांतल्या तज्ज्ञांशी गप्पा मारून, मुलाखत घेऊन अभ्यास करता येईल. काही कागदपत्रं, फोटो, ऑनलाईन माहितीचा इतिहासाची साधनं म्हणून वापर करता येईल. शाळेतली कागदपत्रं, फोटो, अहवाल, मोठ्यांकडून मिळालेली माहिती यांच्या आधारे शाळेचा इतिहास लिहिता येईल. ‘मी शाळा बोलतेय’ या शीर्षकानुसार एकपात्री, नाट्यीकरण, गोष्ट असंही करता येईल.
इतिहासाची साधनं म्हणजे काय हे समजायला मदत होईल. इतिहास म्हणजे केवळ राजे आणि लढाया नसून प्रत्येक गोष्टीला इतिहास असतो (अगदी कोरोनालाही); हे पुस्तकातून वाचण्यापेक्षा स्व-अभ्यासातून शिकता येईल. अशा प्रकारे गावचा इतिहास, गावचा भूगोल शिकता येईल.
नांदेड जिल्ह्यात आश्रमशाळेत शिक्षक असलेल्या शिवाजी आंबुलगेकर यांनी असा प्रकल्प केला आहे. या शाळेत विविध जिल्ह्यांमधली मुलं शिकतात. सन 2014 ते 2017 या काळात दोनशे गावांच्या मुलांनी आपल्या गावचा भूगोल लिहिला आहे.
मुलांचा वयोगट, इयत्ता, साधनांची उपलब्धता यांचा विचार करून अभ्यासाचं स्वरूप आणि व्याप्ती ठरवता येईल. या पद्धतीनं विविध विषयांचा एकत्रित अभ्यास करता येईल. जगणं आणि शिकणं एकमेकांशी थोड्याफार प्रमाणात जोडता येईल.
काय शिकायचं, का शिकायचंय, कसं शिकायचंय, मूल्यमापन कसं करायचंय हे अगोदर पक्कं करावं लागेल... नाहीतर शिक्षण फक्त ‘गुणांच्या टक्केवारीसाठी’ केलं जातंय असा अर्थ होईल. यासाठीची तयारी शिक्षकांना करावी लागणार आहे... तशी सवय लावून घ्यावी लागणार आहे.
अगदी घरात झाडलोट करणं, कपडे धुणं, इस्त्री करणं, घर नीटनेटकं ठेवणं, बागकाम करणं, विजेचं बिल भरणं, बँकेत पैसे भरणं, काढणं, धनादेश लिहिणं, खरेदी करणं, घरातल्या नादुरुस्त वस्तू दुरुस्त करणं किंवा करून आणणं अशा कितीतरी गोष्टींत मुलं पालकांना मदत करू शकतात.
ओल्या कचऱ्यापासून खत तयार करणं, घरातल्या खराब आणि टाकावू वस्तूंपासून वापरण्यास योग्य वस्तू तयार करणं, वस्तूंचा पुनर्वापर करणं अशा कितीतरी गोष्टी रोजच्या जगण्यात करता येतील. हा जगण्याचा भाग शिकण्याशी जोडता येईल. अरविंद गुप्ता यांच्या वेबसाईटच्या मदतीनं नित्य वापराच्या वस्तू तयार करता येतील. उपयोजित विज्ञान म्हणजे काय याचा अनुभव मुलं घेतील.
गल्लीमित्र, अभ्यासमित्र, शिक्षकमित्र, स्वयंसेवक, पालक, समाजातले तज्ज्ञ, कारागीर, कलाकार, शाळा व्यवस्थापन समिती यांच्या मदतीनं मुलं शिकतील. स्पर्धेत उरस्फोड करण्यापेक्षा शिकण्याचा, नवनिर्मितीचा आनंद घेतील.
शिक्षणेतर कामांमुळं वेळ नाही अशी सार्वत्रिक तक्रार शिक्षकांकडून होत असते आणि हे खरे आहे. आज तसा हातात वेळ आहे. काही शाळांमध्ये बाहेरगावांहून आलेल्यांना क्वारन्टाईन केलं होतं. रंजना सानप (सूर्याची वाडी ता.खटाव. जि.सातारा) यांनी त्यांच्या टिपणामध्ये क्वारन्टाईन केलेल्या जाधव दाम्पत्यानं शाळेतल्या जुन्या झाडांना आळी केल्याची, नवीन झाडं लावल्याची, फुलबाग केल्याची नोंद केली आहे.
सध्या मुलं आणि शिक्षक शाळेपासून दूर असल्यानं काही शाळा निस्तेज झाल्या आहेत. त्यांच्यावरही कोरोनाकाळाचा परिणाम झाला आहे. शाळांना तेज प्राप्त करून देण्यासाठी, शैक्षणिक वातावरण करण्यासाठी या काळाकडं संधी म्हणून पाहता येईल. किचन गार्डन, औषधी वनस्पती, वृक्षारोपण (कोरोनाकाळात पाऊसकाळ चांगला आहे), वाचनकट्टे, अभ्यासकट्टे, वाचन कोपरे, वाचनकुटी, विविध कक्ष, प्रयोगशाळा, शैक्षणिक साधनं, शालेय दप्तराचं वर्गीकरण आणि मांडणी, दप्तर सुरक्षेचे उपाय, अपूर्ण दप्तर पूर्ण करणं अशा कितीतरी गोष्टी करता येतील.
या लेखात सुचवलेल्या गोष्टी फक्त कोरोनाकाळात नाहीत... तर नेहमीच्या अध्ययन-अध्यापनाचा भाग म्हणूनही करता येतील. कोरोनाकाळानं शिक्षणाकडं बघण्यासाठी थोडीशी फुरसत दिली आहे. ही संधी आहे. संधीचा किती फायदा घ्यायचा हे ज्यानं त्यानं स्वतःच्या वकुबानुसार ठरवावं.
शिक्षण जगण्याशी जोडण्याची ही संधी आहे. शिक्षण जगण्याशी जोडलं जात नसेल, शिक्षणाचा जगण्यात उपयोग होणार नसेल तर शिक्षणकाळातल्या मुलांचं आयुष्य चोरल्यासारखं आहे.
मला रस्त्यावर दुकान मांडून बसलेला फळविक्रेता तरुण भेटला. त्याच्याशी त्याचं गाव, व्यवसाय यांविषयी संवाद सुरू झाला. त्यानं त्याला व्यवसायात चांगली कमाई होत असल्याचं सांगितलं. तो म्हणाला, ‘माझं शिक्षण बी.एस्सी.पर्यंत झालंय... पण त्याचा इथं काही उपयोग नाही. हा धंदा जिभेवर चालतोय.’ दुष्काळी भागातला हा तरुण गाव सोडून शहरात आला होता. व्यवसाय करण्यासाठी संवादकौशल्याची गरज आहे हे त्यानं नकळत मला सांगितलं.
शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीय कौशल्यांपैकी हे एक कौशल्य आहे. आजच्या काळाची ती गरज आहे. हे कौशल्य शाळेत चांगल्या रितीनं शिकवलं असतं; त्या कौशल्याचा उपयोग, गरज जगात कुठं आहे याचा मार्ग गवसला असता तर कदाचित हा तरुण एखाद्या कंपनीचा सेल्स मॅनेजर झाला असता. चांगलं जगण्यासाठी आणि योग्य ठिकाणी योग्य माणसं मिळण्यासाठी शिक्षण जगण्याशी जोडायला हवं.
या लेखात सुचवलेले काही आणि यापेक्षा वेगळे उपक्रम काही शिक्षक शाळेत करत आहेत. सृजन आनंद विद्यालय कोल्हापूर, आनंदनिकेतन नाशीक, कमला निंबकर बालभवन फलटण अशा काही शाळांमध्येही शिक्षण जगण्याशी जोडण्याचा प्रयत्न होताना दिसतो. कदाचित सर्वांना सर्व उपक्रम करता येणार नाहीत... पण सभोवतालच्या परिस्थितीचा विचार करून एकतरी उपक्रम सुरू करता येईल. पहिलं पाऊल टाकता येईल.
- नामदेव माळी
(सांगली इथे उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक शिक्षण) म्हणून लेखक कार्यरत असून त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. 'शाळाभेट' आणि 'आठ प्राथमिक शिक्षकांची आत्मवृत्तं' ही त्यांची दोन पुस्तकं साधना प्रकाशनाकडून प्रकाशित करण्यात आली आहेत.)
Tags: लेखमाला कोरोना काळातील आमचे शिक्षण मनोगत नामदेव माळी Series Our education in the time of corona Preface Namdev Mali Load More Tags
Add Comment