• gacor777
  • joker123
  • slot gacor
  • slot777
  • slot777
  • शुभ्र भविष्यासाठी उठावाचे पर्यावरण
    •  Home
    • राजकीय
    • सामाजिक
    • सांस्कृतिक
    • English
    • ऑडिओ
    • व्हिडिओ
    • संकीर्ण
    • आमच्याविषयी
    व्यक्तिवेध लेख

    शुभ्र भविष्यासाठी उठावाचे पर्यावरण

    संयुक्त राष्ट्रसंघाच्या शिखर परिषदेत संपूर्ण जगाचे प्रतिनिधित्व करणारी एकच व्यक्ती होती, तिच्याविषयीचा हा लेख आहे.

    • अतुल देऊळगावकर
    • 29 Sep 2019
    • 4 comments

    Rollingstone.com

    एका १६ वर्षांच्या शाळकरी मुलीला संयुक्त राष्ट्रसंघाच्या शिखर परिषदेत विचार मांडायला आमंत्रित करणे, असे आक्रित आजवर कधीही घडले नव्हते. २३ सप्टेंबर २०१९ रोजी न्यूयॉर्कमध्ये जगातील ६६ राष्ट्रप्रमुख एकत्र जमले होते. आजवर अनेक आश्वासने झाली, तरी कर्ब उत्सर्जन काही कमी होत नाही आणि हवामान बदलाचा अतिरेक संपूर्ण जगाला वेठीला धरत आहे. हे पाहून संयुक्त राष्ट्रसंघाने केवळ एक दिवसाची विशेष परिषद भरवली होती. तिचे उद्‌घाटन करताना संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँतोनियो गुट्रेस यांनी परखड शब्दांत सांगून टाकले, ‘‘वेळ निघून जात आहे. येथे २०५० पर्यंत कर्ब उत्सर्जन शून्यावर आणण्यासाठीचा कृती आराखडा असणाऱ्या नेत्यांनाच बोलण्याची संधी दिली जाणार आहे. हवामान बदल ही आपण हरत चाललेली स्पर्धा आहे; परंतु आपण ती जिंकूही शकतो.’’

    या परिषदेत संपूर्ण जगातील जनतेचे प्रतिनिधित्व करणारी केवळ एकच व्यक्ती होती. ती व्यक्ती म्हणजे ग्रेटा थुनबर्ग! ‘फुलपाखराने एका टोकाला पंख फडफडवले तर जगाच्या दुसऱ्या टोकाला चक्रीवादळ येऊ शकतं.’ असा सिध्दांत गणितज्ज्ञ व हवामानशास्त्रज्ञ एडवर्ड लॉरेन्झ यांनी १९६३ मध्ये मांडला होता. स्वीडनमधील एक चिमुकली ‘हवामानासाठी शाळा बंद’ असा फलक घेऊन स्वीडनच्या संसदेबाहेर धरणे देऊन बसली तो दिवस होता, २० ऑगस्ट २०१८! त्यानंतर केवळ १३ महिन्यांत म्हणजे २० सप्टेंबर २०१९ रोजी तिच्या साथीला जगातील सुमारे ५० लक्ष मुले रस्त्यावर येतात. ही परिकथा वा विज्ञान कादंबरी नसून वास्तव आहे. पालक, बहिण वा मैत्रिणींपैकी कोणीही तिच्या सोबतीला नव्हते. स्वीडनमध्ये शाळा चुकविणे हा गुन्हा असल्यामुळे तिला शिक्षा होऊ शकली असती. तरीही नवव्या इयत्तेत शिकणारी ग्रेटा थुनबर्गने स्वतःच्या देशाच्या संसदेबाहेर ठाण मांडून बसण्याचे धाडस करते. यानंतर मिळालेल्या पाठिंब्यामुळे ती मुले ‘हवामानासाठी शाळा बंद आंदोलन’ चालू करतात.

    पाहता पाहता हे आंदोलन जगभर पसरते. तेव्हा हवामानाचे संशोधक लॉरेन्झ यांचा ‘कोलाहल सिध्दांत’(केऑस थिअरी) हा नव्याने सिध्द झाला आहे, याची खात्री पटते. छोट्या मुलीच्या एका छोट्या कृतीमुळे लक्षावधी मुलांना व तरुणांना स्फूर्ती मिळाली आणि भवितव्याच्या धास्तीने हादरलेली शाळकरी मुले आणि तरुण हे लाखोंच्या संख्येने हवामान बदलाविरोधी लढ्यात उतरु लागले. त्यांना जगातील आघाडीचे शास्त्रज्ञ पाठिंबा देऊ लागले. ही मुले ‘‘आमचं नाही, विज्ञानाचं ऐका आणि कर्ब उत्सर्जन थांबवा, जगाला वाचवा’ असं त्यांच्या नेत्यांना सांगू लागली.

    संयुक्त राष्ट्रसंघाच्या शिखर परिषदेत, जगातील नेत्यांना पाहून रुद्रावतारात ग्रेटा गरजली, ‘‘मी इथे असणेच चुकीचे आहे. मी समुद्राच्या पलिकडे शाळेत असायला पाहिजे. तुम्ही आम्हा तरूणांना आशा दाखवता? तुम्हाला हिंमत होतेच कशी? तुम्ही माझं बालपण, माझी स्वप्नं हिरावून घेतली आहेत.’’ मग भावनोत्कटतेने तिचा आवाज कंप पावू लागला. पुढे ती म्हणाली, ‘‘मानवजातच लुप्त होण्याच्या मार्गावर असताना तुम्ही पैसा व सर्वकाळ होणाऱ्या आर्थिक विकासाच्या परीकथा सांगत बसता. तुमची हिंमत होतेच कशी? तुम्ही पोक्त व पक्व नाही आहात. तुम्ही आम्हाला फसवत आहात आणि आता  तुमची फसवणूक आम्ही सहन करणार नाही.’’ उद्वीग्न ग्रेटा बोलतच होती,‘‘ पुढील सर्व पिढ्यांच्या नजरा तुमच्यावर रोखलेल्या आहेत. त्यामुळे आता आणि इथेच सोक्षमोक्ष लागला पाहिजे.’’

    ग्रेटाच्या ४.५  मिनिटांतील ४९५ शब्दांत व्यक्त केलेल्या विधानांचा संपूर्ण जगावर विलक्षण परिणाम झाला आहे. तिच्या ह्या छोटेखानी व्याख्यानाची जगातील अग्रगण्य दैनिकांनी अग्रलेखातून पुढीलप्रमाणे दखल घेतली:
    ‘लॉसएंजिल्स टाइम्स’- ‘जगातील मुले नेतृत्वगुण दाखवत आहेत आणि नेते बालिश वर्तन करीत आहेत.’
    ‘न्यूयॉर्क टाइम्स’- ‘संयुक्त राष्ट्रसंघात ग्रेटाच्या मर्मभेदक हल्ल्यामुळे टीकेचे मोहोळ’
    ‘न्यूयॉर्क पोस्ट’- ‘बेजबाबदार मोठ्यांमुळे मुलांमध्ये हवामान भय’
    ‘वॉशिंग्टन पोस्ट’- ‘ पर्यावरणासाठी उठाव’
    ‘द इंडिपेंडंट’- ‘टीकाकारांनी हल्ले करुनही हवामान बदलासंबंधीचा डेटा व विज्ञान स्वयंस्पष्ट आहे.’
    ‘हिंदुस्थान टाइम्स’- ‘हवामानाच्या धोक्यावर कृती करण्याची निकड’
    ‘टाइम्स ऑफ इंडिया’- ‘नुसते बोलू नका, समस्या सोडवा.’
    ‘ब्लूमबर्ग’- ‘ग्रेटा सत्य तेच सांगतेय’

    ग्रेटा जगातील पर्यावरण चळवळीची राजदूत झाली, त्यावेळी तिच्यावर टीकेचे हिंस्त्र हल्लेदेखील सुरू झाले. ‘डाव्या-उदारमतवादी विचारांच्या प्रसारासाठी अब्जावधी डॉलर्स खर्चून जनसंपर्क माध्यमांच्या मदतीने उभी केलेली ग्रेटा ही एक कळसूत्री बाहुली आहे.’ ‘आत्ममग्न व विषण्णतेच्या विकाराने ग्रस्त असणारी ग्रेटा ही हेकेखोर आणि एकसूरी आहे. तिला गांभीर्याने घेणे हाच एक विनोद आहे.’ या टीकेला जगातील आघाडीच्या वृत्तपत्रांनी आपल्या अग्रलेखांतून उत्तर दिले आहे.

    सत्तेच्या संघर्षातील महत्वाचा मुद्दा हवामान बदल हाच आहे, हे जगाला दाखवून देण्याची लक्षणीय कामगिरी ग्रेटाने आपल्या संबोधनातून केली आहे. तेथे जमलेल्या सत्ताधीशांना तिने थेट आव्हान दिले. सोप्या शब्दांत, हवामान बदलावर कृती करण्याची मागणी करणारे ‘आम्ही’ आणि त्यास नकार देणारे ‘तुम्ही’ अशी मांडणी तिने केली. प्रदूषणकर्ते आणि प्रदूषणग्रस्त, पर्यावरणमस्त व पर्यावरणत्रस्त अशी विभागणी करण्यात ती यशस्वी ठरली. कोट्यवधी लोकांच्या भावना सत्ताधीशांपर्यंत पोहचवून जनसामान्यांमध्ये तिने चेतना निर्माण केली. लंडनच्या ‘द गार्डियन’ने ‘आम्हाला धोक्याचा इशारा!’ असे आपल्या संपादकीयातून मान्यही केले.

    पर्यावरणीय संकटासंबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी वैज्ञानिक, तज्ज्ञ व तळमळीचे कार्यकर्ते अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत होते. तरीही लोकांना पर्यावरण व हवामान बदल समस्येचे गांभीर्य समजत नव्हते. त्यांची कारणे व उपाय लक्षात येत नव्हते. ती अतिशय दूरची वाटत होती. या समस्यांना काही तात्काळ उत्तरही नव्हते. अशा समस्यांना समाजशास्त्रज्ञ ‘दुष्ट समस्या’ असे संबोधतात. ग्रेटा म्हणाली, ‘‘हवामान बदलामुळे आमचे (मुलांचे) भविष्य धोक्यात आले आहे. भविष्यच नसेल तर शाळेत का जाऊ?’’ आणि तिने एकटीने शाळेवर एक दिवस बहिष्कार घातला, या कृतीने जगातील मुलांचे लक्ष वेधून घेतले.

    ग्रेटाने मांसाहार वर्ज्य करून शाकाहार स्वीकारला, मोटारीऐवजी बस निवडली. विमानाऐवजी जहाजाने खडतर प्रवास केला. जिथे कडाक्याच्या थंडीत उष्णतेसाठी शेगडी नाही वा गरम करून खाण्याची सोय नाही इतकंच काय शौचालयाऐवजी बादली वापरावी लागते, अशा ठिकाणी जाऊन हाल-अपेष्टा कोण व का सहन करेल? ती मानधन घेत नाही, स्वतःच्या पुस्तकाच्या स्वामित्वधनातून  देणग्या देते. हे साधेपणाचे प्रदर्शन की इतरांनी स्वतःला अपराधी समजावे यासाठी? हा सारा खटाटोप हा तिची विचारपूर्वक जीवनशैली व्यक्त करतो.

    संपूर्ण जगाच्या नजरा कायम तिच्याकडे असतात, याचे भान या चिमुरडीला आहे. मत तयार करणे, मत बदलणे हेच महत्त्वाचे आहे, याची तिला जाण आहे. कोणतीही व्यक्ती आणि कोणतीही कृती ही किरकोळ नसते. त्यातून एक तरंग उमटला, तर त्यातून अनेक तरंग पसरत जायला वेळ लागत नाही, हेच ती आपल्या कृतींमधून सांगत आहे. आज एक शाळकरी बालिका तिच्या कर्तृत्वाने संपूर्ण जगातील जनतेची प्रतिनिधी झाली आहे. जगाला वाटणारी हवामानाची भीती व पर्यावरणीय धास्ती ती व्यक्त करीत आहे. जगातील प्रसारमाध्यमे तिचे म्हणणे ऐकण्यासाठी आसुसलेले असतात. एखाद्या राष्ट्रप्रमुखाला सुध्दा मिळत नसेल एवढा मान तिच्या वक्तव्याला मिळत आहे.  

    ग्रेटामुळे ही समस्या सर्वांना आपली वाटू लागली. ती अतिशय मोजक्या व नेमक्या शब्दांत मांडणी करते. हवामान बदलामुळे काय झालं? काय होणार आहे? काय केलं पाहिजे? हे मार्मिकपणे ती सांगते. मोठ्यांनी कधीही न विचारलेले प्रश्न जाहीरपणे विचारण्याचे धैर्य तिच्याकडे आहे. ती सातत्याने विज्ञानाचे ऐकण्याचा आग्रह धरते. तिच्या भाषणांत तर्क आणि भावना, नीती आणि मूल्ये यांचा उत्तम समतोल असतो. तिला संपूर्ण मानवजातीची काळजी वाटते. गरीब लोक आणि गरीब देशांची बाजू घेऊन ती श्रीमंत देशांना फटकारते. उधळ्या जीवनशैलीला फोडून काढते.

    जगातील प्रभावशाली तत्त्वज्ञ अशी ख्याती असलेले प्रो. पीटर सिंगर (प्रीन्सटन विद्यापीठ) म्हणतात, ‘‘एकविसाव्या शतकासमोरील सर्वात मोठे नैतिक आव्हान हवामान बदलाचेच आहे, हे ध्यानात आणून देणे हेच ग्रेटाचे विलक्षण कार्य आहे.’’ ती दरवेळी नवी प्रतिके वापरते. तिच्या मांडणीत कल्पकता व नाविन्य असते. ‘आपले घर जळत आहे’ असे ती म्हणते तेव्हा पर्यावरण समस्या ती आपल्यापर्यंत आणून भिडवते. जनतेच्या (भीती, दुःख, संताप या) भावनांना ती वाचा फोडते. मग ती विचारते ‘तेव्हा तुम्ही शांत कसे बसाल? बोलत बसाल? की आग विझवाल?’ अखेरीस आवाहन करते, ‘चला, वाचवायचा प्रयत्न करू’ आणि त्याचा परिणाम थेट होतो. एकाचवेळी लहान विद्यार्थ्यांपासून ते शास्त्रज्ञांपर्यंत, राजकीय नेत्यांपासून ते सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत, लेखकांपासून अभिनेत्यांपर्यंत जगातील कोट्यवधी लोकांसाठी ग्रेटा ही प्रेरक ठरत आहे.

    २०१८ च्या ऑगस्टपासून जगातील मुले पर्यावरणाबाबत संवेदनशीलता प्रकट करू लागले आणि तेव्हापासून त्यांना निसर्ग व पर्यावरणावरील पुस्तके वाचण्याचा छंदही जडला. जगातील ग्रंथविक्रीचे मापन व विश्लेषण करणाऱ्या ‘निएल्सन बुक रीसर्च’ या संस्थेने ‘‘मागील १२ महिन्यात बालकांच्या पुस्तक मागणीत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली.’’ असे सांगितले. निसर्गविनाश, प्रदूषण, निसर्गदूत अशा विषयांवरील पुस्तकांना बालकांची पसंती आहे. ‘ए वाइल्ड चाइल्डस गाईड टू एनडेन्जर्ड ॲनिमल्स’, ‘व्हेअर द रिव्हर रन्स गोल्ड’, ‘किड फाइट प्लास्टिक’ आणि ‘अर्थ हिरोज’ या पुस्तकांवर मुलांच्या उड्या पडत आहेत. ‘अर्थ हिरोज’मध्ये पृथ्वी वाचविण्याचा वसा घेतलेल्या २० व्यक्तींच्या कार्याची महती सांगितली आहे. त्यामध्ये विख्यात वृत्तपटकार सर डेव्हिड ॲटनबरो, चीनमधील मंगोलियाच्या वाळवंटात सहा लक्ष वृक्षांची लागवड करणाऱ्या यिन युझेन, पर्यावरणस्नेही वस्तूंचे कल्पक डिझाइन करुन त्यांना लोकप्रिय करणाऱ्या स्टेला मॅकार्टनी यांचे कार्य व त्याचे महत्त्व सांगतिले आहे. आणि या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आहे ग्रेटा!  ‘निएल्सन बुक रीसर्च’च्या विश्लेषक राशेल केलर म्हणतात, “हा ‘ग्रेटा थुनबर्ग परिणाम’ आहे.” तिच्यामुळे मुलांमध्ये बदल घडत आहेत. मुले अंतर्मुख होऊन या पुस्तकांतून प्रेरणा घेत आहेत.

    २० सप्टेंबर २०१९ रोजी सात खंडांतील, १६३ देशांत, ५००० ठिकाणी सुमारे ५० लाखांहून अधिक मुलांनी जागतिक बंद यशस्वी करून दाखवला आहे. अजूनही त्यांची नेमकी संख्या लक्षात येणे कठीण असले तरी, अतिशय शांततेत पार पडलेली ही जागतिक निदर्शने संपूर्ण जगाला थक्क करून गेली आहेत. विलक्षण, अद्भुत, अभूतपूर्व अशा कुठल्याही विशेषणात न सामावणारी ही घटना आहे.

    ‘पैशासाठीच आयुष्य’ हेच ध्येय असणाऱ्या आजच्या या काळात पैसा सोडून निसर्ग वाचविण्यासाठी व्यक्ती व संस्था या दोन्हींच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. मागील एका वर्षात स्वतःची जीवनशैली आणि सभोवताल या दोन्हींत बदल करण्यासाठी सज्ज होणाऱ्यांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. वैयक्तिक पातळीवर कर्ब पदचिन्ह कमी करणे व सभोवतालच्या संस्थांना त्यासाठी भाग पाडणे ही महत्वाची कृती सर्वत्र होताना दिसत आहे. या आठवड्यात युरोप, अमेरिका व ब्रिटनमध्ये घेतलेल्या सर्वेक्षणात ‘हवामान बदल’ व ‘पर्यावरण रक्षण’ ह्या विषयांना प्राधान्य देणाऱ्या मतदारांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे आढळले आहे. ‘आशा हीच शक्ती आहे’ असं म्हणणाऱ्या मुलांमुळेच जगात पर्यावरण कृतीवादाचे (ॲक्टिव्हिझम) नवे युग अवतरले आहे. हीच परिवर्तनाची नांदी आहे.

    - अतुल देऊळगावकर

    atul.deulgaonkar@gmail.com

    (पर्यावरण व विकास या क्षेत्रांतील पत्रकारिता करणाऱ्या अतुल देऊळगावकर यांची पुढील पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत - बखर पर्यावरणाची, स्वामीनाथन - भूकमुक्तीचा ध्यास, विश्वाचे आर्त, विवेकीयांची संगती, लॉरी बेकर.)

     

    Tags: Climate Change Environment Atul Deulgaonkar व्यक्तिवेध ग्रेटा थुनबर्ग अतुल देऊळगावकर हवामान बदल पर्यावरण UNO हवामान बदल परिषद climate action summit Load More Tags

    Comments:

    Vinod Wagh

    ग्रेटाच्या हिमतीला आणि समंजसपणाला दाद द्यायला हवी.

    Oct 02, 2019

    DR SHRIDHAR G. SHINDE

    सद्यस्थितीतील खूप खूप महत्त्वाचा विषय पण दुर्लक्षित। अतुलजी नि नेमक्या शब्दात प्रभावीपणे मांडलेला आहे अभिनंदन। Greta ग्रेट आहे.

    Sep 28, 2019

    Chandrakant shrihari Bhojane

    Great Articles and great work by Greta

    Sep 27, 2019

    Dr.sanjay laddha

    अतिशय छान ,महत्वाचे विषय व ग्रेटा विषयी माहिती वाचून भारावून गेलो, आपण पण काहीतरी केले पाहिजे असे वाटत आहे

    Sep 27, 2019

    Add Comment

    संबंधित लेख

    मुलाखत

    संवाद सुरु झाला, आणि अडचणी दूर झाल्या! - डॉ. मंदा आमटे

    डॉ. मंदा आमटे 13 Feb 2020
    लेख

    Savitribai Phule: The First Indian Feminist

    Sankalp Gurjar 02 Jan 2020
    मुलाखत

    संधी चालत आली, आणि मी घेतली! - डॉ. भारती आमटे

    डॉ. भारती आमटे 11 Feb 2020
    लेख

    निळू फुले: अभिजात कलावंत, लोभस व्यक्तिमत्व

    डॉ. श्रीराम लागू 18 Dec 2019
    लेख

    ‘दत्ता गांधी’ : आमच्या आयुष्याला सुवर्णमुद्रा लावणारी चार अक्षरे

    ईशान संगमनेरकर 12 Jun 2022

    लेखकाचे इतर लेख

    प्रस्तावना

    'रुग्णांच्या चष्म्यातून' या पुस्तकाची प्रस्तावना

    अतुल देऊळगावकर
    20 Dec 2022
    लेख

    विद्येविना विकासाचा ‘अर्थ’बोध

    अतुल देऊळगावकर
    15 Apr 2022
    व्हिडिओ

    ग्रेटाची हाक तुम्हाला ऐकू येतेय ना?

    अतुल देऊळगावकर
    02 Jan 2020
    लेख

    शुभ्र भविष्यासाठी उठावाचे पर्यावरण

    अतुल देऊळगावकर
    29 Sep 2019

    या आठवड्यातील लेख

    परिचय

    मुस्लीम मराठी साहित्याच्या दालनातील नव्या अभिव्यक्तीची कविता

    हरिश नवले
    22 Mar 2023
    ऑडिओ

    रभाजी कडलग

    संतोष पद्माकर पवार
    21 Mar 2023
    ऑडिओ

    'तात्पर्य'मधील पहिली कथा : आदर्श

    अवधूत डोंगरे
    20 Mar 2023
    लेख

    दलवाईंचा वैचारिक वारसा हेच मंडळाचे बलस्थान

    शमसुद्दीन तांबोळी
    19 Mar 2023
    Article

    It’s a Digital Dilemma Too

    Yogesh Borate
    17 Mar 2023
    व्हिडिओ

    'विज्ञानाने मला काय दिले?' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभातील भाषण

    विवेक सावंत
    10 Mar 2023
    व्हिडिओ

    डॉ. नरेंद्र दाभोलकर चित्र,शिल्प,कला प्रदर्शनात लक्ष्मीकांत देशमुख यांनी केलेले भाषण 

    लक्ष्मीकांत देशमुख
    09 Mar 2023

    लोकप्रिय लेख इतर सर्व

    व्यक्तिवेध

    गुड बाय सानिया!

    आ. श्री. केतकर
    03 Mar 2023
    व्हिडिओ

    वैज्ञानिक सत्य

    विनोद शिरसाठ
    01 Mar 2023
    व्हिडिओ

    'धर्मरेषा ओलांडताना'च्या निमित्ताने हिनाकौसर खान यांच्याशी संवाद

    हिनाकौसर खान
    27 Feb 2023
    लेख

    भारतातील ट्रॅमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव

    आ. श्री. केतकर
    24 Feb 2023
    लेख

    ‘बीबीसी’ आणि ‘फॉरेन हँड’!

    दिलीप लाठी
    23 Feb 2023

    साधना साप्ताहिकाचा ताजा अंक

    18 मार्च 2023 चा अंक वाचण्यासाठी येथे क्लिक करा..


    साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा

    साधना साप्ताहिकाचे डिटेल्स पाहण्यासाठी क्लिक करा...

    जाहिरात

    'केशवरावांच्या मुलाखती' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    'देव तेथेचि जाणावा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    'आम्हा घरी धन' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    'असिधारा' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    'तीन संपादकांच्या मुलाखती' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    'धर्मरेषा ओलांडताना' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

    'सावध ऐका पुढल्या हाका' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

    Tags

    • मुलाखत
    • दीर्घलेख
    • रिपोर्ताज
    • इंग्लिश
    • शेती
    • आरोग्य
    • शिक्षण
    • लेख
    • ऑडिओ
    • व्हिडिओ
    • विज्ञान
    • लेखमाला

    साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...

    वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1100, 2100, 3000 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
    020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.

    weeklysadhana@gmail.com
    • वर्गणी
    • जाहिरात
    • देणगी
    • प्रतिसाद
    • चौकशी
    • पॉलिसी
    • नियम आणि अटी

    © 2019, Evonix Technologies Pvt. Ltd All rights reserved

    कृपया आम्हाला अभिप्राय द्या

    Welcome :

    Search Here....