तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे वाचन

डॉ. सुनीलकुमार लवटे लिखित/संपादित 'तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी : एक सर्वंकष आकलन' या पुस्तकाचे प्रकाशन उद्या (26 जानेवारी) कोल्हापूर येथे होते आहे. 

डॉ. सुनीलकुमार लवटे लिखित/संपादित 'तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी : एक सर्वंकष आकलन' हे पुस्तक म्हणजे 27 जानेवारी 2022 ते 1 फेब्रुवारी 2022 या कालावधीत शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील यशवंतराव चव्हाण अध्यासनांतर्गत कार्यरत असणाऱ्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण विकास केंद्रामार्फत घेण्यात आलेल्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी व्याख्यानमालेतील विविध वक्त्यांच्या भाषणांच्या लिखित संहिता आणि वेळोवेळी, विविध प्रसंगांच्या निमित्ताने डॉ. लवटे यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह आहे. या पुस्तकाचे प्रकाशन 26 जानेवारी 2023 रोजी, सरोजा भाटे अध्यक्ष आणि प्रकाश पवार व शंतनू अभ्यंकर हे दोन प्रमुख पाहुणे असलेल्या, कोल्हापूर येथील 'अक्षरदालन'ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात होत आहे. त्यानिमित्ताने या पुस्तकातील एक प्रकरण..

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, मराठी विभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे, सहयोगी प्राध्यापक डॉ. नंदकुमार मोरे आणि उपस्थित विद्यार्थी बंधू-भगिनींनो,

वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठाने मला ‘तर्कतीथांचे वाचन’ विषयावर विचार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित केले, त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. तर्कतीर्थांचे वाचन समजून घेत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, त्यांची शैक्षणिक जडणघडण आपल्यासारखी शाळा, महाविद्यालय वा विद्यापीठीय औपचारिक शिक्षणातून झाली नाही. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर या जन्मगावी असलेल्या शाळेत ते बिगरी, पहिली, दुसरी व तिसरी इयत्ता शिकले. तेच काय ते त्यांचे औपचारिक शिक्षण. वयाच्या चौदाव्या वर्षी, सन 1914 मध्ये ते नारायणशास्त्री मराठे तथा केवलानंद सरस्वती संचालित प्राज्ञपाठशाळेत दाखल झाले. इथे गुरुकुल पद्धतीच्या शिक्षणातून त्यांचे वाचन आकारले नि विस्तारलेही. इथे ते संस्कृत पंडित होण्यासाठी म्हणून आले. इथे येण्यापूर्वी त्यांचे वडील बाळाजी जोशी यांनी त्यांना ‘अमरकोश’ पढविला होता. त्यांचे उच्चार नीट तपासले जात. वाईत येऊन तर्कतीर्थ ‘षडंग वेद’ शिकले. शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद व ज्योतिष ही सहा वेदांगे ते शिकले. यातून वैदिक साहित्याचा पाया मजबूत झाला. ‘ऋग्वेद’, ‘यजुर्वेद’, ‘अथर्ववेद’ आणि ‘सामवेद’ वाचन, अध्ययन, पठन, मीमांसेतून तर्कतीर्थ न्यायवेदान्ताकडे आकर्षित झाले. पुढे मुक्त संस्कृत वाचनात कविकुलगुरू कालिदासाच्या ‘रघुवंश’, ‘अभिज्ञान शाकुंतल'ने त्यांना संस्कृत वाचन शास्त्राकडून साहित्याकडे नेले. बाणभट्टाच्या ‘कादंबरी'ने काव्यात्मक नाटकाइतकेच कथात्मक संस्कृत साहित्य रोचक नि मनोहारी असते, याची प्रचिती दिली.

गुरुकुलातील प्राथमिक अभ्यासाच्या अवघ्या नऊ महिन्यांत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी आपली व्युत्पत्ती तयार केली. म्हणजे गुरुजींच्या मदतीशिवाय, स्वाध्यायाच्या आधारे टीकाग्रंथांचे वाचन आणि मीमांसा सुरू ठेवली. ‘न्यायमुक्तावली'च्या वाचनातून तर्कशास्त्र व न्यायवैशेषिक पूर्ण केले. त्याच्यावरची टीका शिकायची म्हणून ‘दिनकरी’, ‘जागदिशी’, ‘गदाधारी’, ‘पंचलक्षणी’, ‘चतुर्दशलक्षणी’ वाचत, पठण-पाठन करत ‘सिद्धांतलक्षण’ ग्रंथ पूर्ण केला. मग गुरूंना ‘शास्त्रसेवामवधारम’ संबोधन करीत व्याकरण, न्याय, वेदान्त यांचे पूर्वपक्ष केले. अलंकारशास्त्र, वाक्यमीमांसा करत शास्त्रान्तर संचार केला. म्हणजे विविध शास्त्रांच्या अंतरसंबंधाचे वाचन, पठन-पाठन, मीमांसा करत आकलन करून घेतले. पंक्ती लावणे शिकले. कीर्तनकार, प्रवचनकार, पुराणिक होता यावे म्हणून तर्कतीर्थांनी ‘तर्कदीपिका’ अभ्यासली. अर्थसंग्रह करून घेतला. ‘वेदान्तसार’ आणि त्यांची नैयायिक, वैय्याकरणी म्हणून घडण झाली.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी वाईच्या प्राज्ञपाठशाळेत शिक्षण घेत असताना आचार्य विनोबा भावे, तर्कतीर्थांचे सहपाठी होते. ते ‘शांकरभाष्य’ शिकण्यासाठी प्राज्ञपाठशाळेत आले होते. सुमारे वर्षभर ते वाईत होते. त्या काळात विनोबा तर्कतीर्थांना म्हणत असत, "हे जे प्राचीन अध्ययन आहे, घटपटाची खटपट आहे, त्याने देशाचा काही उद्धार व्हायचा नाही. तर आधुनिक शिक्षण घेतले पाहिजे आणि देशामध्ये यंत्रोद्योग आले पाहिजेत. त्यासाठी तुला अमेरिकेत जावे लागले तरी जा." पुढे विनोबा वाई सोडून सन 1917 ला बडोद्याला गेले. पाठोपाठ तर्कतीर्थ आणि त्यांचे दोन मित्र दामोदरशास्त्री कोनकर आणि धुंडिराज देव यांनी वाईतून पलायन केले. वेषांतर केले. जटाधारी लक्ष्मणशास्त्री बडोद्यात चक्क चमनगोटा करून भूमिगत विद्यार्थी म्हणून विनोबांकडे इंग्रजी शिकू लागले. विनोबांनी त्यांना तर्खडकर भाषांतर पाठमाला (भाग 1 ते 3) शिकविली आणि तर्कतीर्थ इंग्रजी वाचू, बोलू, लिहू लागले. स्पेलिंग कच्चे होते, पण भाषांतराच्या साहाय्याने त्यांनी टॉलस्टॉय वाचला. पुढे ‘टेल्स फ्रॉम शेक्सपीअर’ वाचले. चार्ल्स लॅब ते शिकले.

इतके सारे तर्कतीर्थांनी तीन महिन्यांत कमावले, हे सांगून कुणाला खरे वाटणार नाही. पण तर्कतीर्थांमध्ये उपजतच एक अशांत, अतृप्त ज्ञानलालसा होती, ती त्यांना नित्यनव्या वाचनाकडे आकर्षित करीत राहिली. इंग्रजी शिक्षण पूर्ण झाल्यावर विनोबा तर्कतीथांना महात्मा गांधीच्या साबरमती आश्रमात नेण्याच्या तयारीत होते. त्याची कुणकुण लागताच तर्कतीर्थांनी अर्ध्या रात्रीत बडोदा सोडून वाई गाठली. गुरुजी नारायण शास्त्री मराठेंची क्षमा मागून ते शिक्षक म्हणून रुजू झाले. पण पदवी मिळविण्याच्या इराद्याने नंतर त्यांनी काशी गाठली. सन 1918 ते 21 या तीन वर्षांत त्यांनी ‘तर्कतीर्थ’ पदवी पाठ्यक्रम (Essence of Logic) पूर्ण केला. सन 1922 ला परीक्षेसाठी कलकत्त्याला जाताना बारडोली स्टेशनवर दंगा झाल्याचे निमित्त होऊन आणि तिथे आश्रमात महात्मा गांधी आहेत, हे लक्षात आल्यावर परीक्षा नि गाडी सोडून ते महात्मा गांधींच्या आश्रमात दाखल झाले. ती त्यांची आणि महात्मा गांधींची पहिली भेट. पुढे वर्षभरानंतर ते ‘तर्कतीर्थ’ या पदवीस बसले व उत्तीर्ण झाले. काशी मुक्कामी त्यांनी राजेश्वर शास्त्री द्रविड, पर्वतीय शास्त्री, वामाचरण भट्टाचार्य इत्यादींकडून न्याय, राज्यशास्त्र इ. संस्कृतमधून ग्रहण केले.

सन 1921 ते 1930 या काळात ते प्राज्ञपाठशाळेत शिकवीत. त्या काळात संस्कृत, इंग्रजीनंतर त्यांनी आपल्या वाचनाची दिशा बदलली आणि ते मराठी वाचू लागले. गोविंद सखाराम सरदेसाई यांचे ‘मराठी रियासत’ (आठ खंड) त्यांनी वाचले. विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या ‘निबंधमाला'ने मराठी साहित्य समीक्षेची दृष्टी दिली. गोपाळ गणेश आगरकरांच्या निवडक ‘लेखसंग्रह’ वाचनाने तर्कतीर्थ अंधश्रद्धा आणि कर्मकांडातून मुक्त होत धर्मनिरपेक्ष व पुरोगामी बनले. शि. म. परांजपे यांच्या काळातील ‘निबंध’ने आणि ‘तर्कसंग्रह दीपिका’ने तत्त्वज्ञानाची गोडी निर्माण केली. काव्यात केशवसुत, चंद्रशेखर, गोविंदाग्रज, अनिल, बा. भ. बोरकर वाचत मराठी काव्यातील तरल परतत्त्वाने ते प्रभावित झाले. साप्ताहिकांचा तो काळ होता. केसरी, अग्रणी, चित्रा, प्रमोद, स्वराज्य वाचत ते सन 1923 पासून लिहिते झाले. ‘संग्राम’ दैनिकात आणि ‘प्रमोद’ मध्ये त्यांनी ‘कला’, ‘ठिणगी'सारखी सदरे (स्तंभ) सन 1939 ते 1945 च्या दरम्यान लिहिली. गांधीवादी असलेले तर्कतीर्थ रॉयवादी बनून गांधीवादावर टीका करू लागले. मानवेंद्रनाथ रॉय यांच्या प्रभावामुळे ते क्रांतिकारक बनले. स्वातंत्र्यपूर्व काळात ते वक्ते, लेखक, टीकाकार, संपादक, भाषांतरकार बनत पंडित, शास्त्रीचे साहित्यकार केव्हा बनले, हे त्यांचे त्यांना कळले नाही. स्वातंत्र्योत्तर काळात सन 1954 ला दिल्ली येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान झालेल्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना साहित्य अकादमी पुरस्काराच्या पहिल्याच वर्षी (1955) त्यांच्या ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ या भाषण संग्रहासाठी पुरस्कार मिळाला; आणि ते मराठी साहित्याच्या सर्वोच्चपदी विराजमान झाले.

सन 1930-32 च्या दरम्यानच्या कायदेभंगाच्या चळवळीत तर्कतीर्थ लक्षणशास्त्री जोशी यांना दोनदा तुरुंगवास भोगावा लागला. या काळात त्यांचा परिचय द्वा. भ. कर्णिक यांच्याशी झाला. या काळात मानवेंद्रनाथ रॉय यांची सशस्र क्रांती संदर्भातील पत्रके तुरुंगात येत असत. या नव्या विचारांनी तर्कतीर्थ प्रभावित झाले. “मूलतःच विरोधी असलेली विचारसरणी माझ्या विचारपंथात आल्याबरोबर क्षोभ उत्पन्न करून मला विचारास प्रवृत्त करते असा माझा फार जुना अनुभव आहे.” असा कबुलीजबाब तर्कतीर्थांनी स्वतःच ‘मी रॉयवादी का झालो’ (धनुर्धारी, दिवाळी, ऑक्टोबर, 1946, पृ. 132) असे शीर्षक असलेल्या लेखात देऊन ठेवला आहे. तुरुंगातून बाहेर आल्यावर तर्कतीर्थांनी ‘मॅनिफेस्टो ऑफ दि कम्युनिस्ट पार्टी’चे वाचन ‘न्यायमुक्तावली’ आणि ‘तर्कसंग्रहदीपिका’ प्रमाणे उपपत्ती समजून घेऊन केले. त्यांनी एंजल्स, प्लेकानोद वाचला. ‘अँटी ड्युअरिंग’, ‘डायलेक्टिक्स ऑफ नेचर’ वाचले. मार्क्सवादाच्या त्यांच्यावरील प्रभावाची साक्ष देणारे तर्कतीर्थांचे दोन ग्रंथ सांगता येतात- 1) हिंदुधर्माची समीक्षा (1941) व जडवाद अर्थात् अनीश्वरवाद (1941). ‘धर्माची समीक्षा ही सर्व समीक्षेची सुरुवात असते’ या मार्क्सच्या विचारांनी तर्कतीर्थांना समीक्षक बनवले. याच काळात, 1940च्या दरम्यान तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मानवेंद्रनाथ रॉय यांच्या ‘इंडिया इन ट्रांसिशन’, ‘दि व्हॉइस ऑफ इंडिया’, ‘इंडिया इट्स पास्ट, इट्स प्रेझेंट अँड इट्स फ्युचर’ सारखे ग्रंथ वाचले आणि ते पूर्णतः रॉयवादी झाले.


हेही वाचा : वाईचे शास्त्रीजी : रेषांच्या बाहेरचं व्यक्तिचित्र - सुनीलकुमार लवटे


तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या वाचनाची कक्षा रुंदावली ती त्यांच्या कोश संपादनकार्याने. प्रारंभीच्या काळात नारायणशास्त्री मराठे जेव्हा ‘धर्मकोश’ आणि ‘मीमांसा कोश’ तयार करत होते तेव्हा (1925 ते 1966) तर्कतीर्थांना कोश संपादनाचे अनौपचारिक प्रशिक्षण लाभले. यातून उपरोक्त कोशांशिवाय ‘डिस्क्रिप्टिव्ह कॅटलॉग ऑफ संस्कृत मॅन्युस्क्रिप्टस’ (भाग 1 व 2) ची निर्मिती तर्कतीर्थांनी केली. ‘मीमांसा कोश’ (7 खंड) आणि ‘धर्मकोश’ (15 खंड) यांच्या संपादन अनुभवावर ‘मराठी विश्वकोश’ (15 खंड) त्यांनी निर्मिले पण समग्र मराठी विश्वकोश (20 खंड) मध्ये त्यांचे लेखन दिसते. कोश संपादन कार्यातील त्यांच्या प्रस्तावना त्यांच्या वाचन व्यासंगाची प्रचीती देणाऱ्या आहेत. या कार्यात त्यांनी 20 हजार संस्कृत पोथ्या हाताळल्या. त्यांचा स्वतःचा ग्रंथसंग्रह 60 हजारांच्या घरात होता. मराठी विश्वकोशाचे ग्रंथालय त्यांच्या वाचन व्यासंगातून साकारले.

इतके करूनही ‘एन्सायक्लोपीडिया ऑफ इग्नोरन्स (1977)’चे वाचन त्यांना अस्वस्थ करते आणि स्वतःचे वाचन तोडके असल्याची जाणीव मन कुरतडत राहते! 1977मध्येच ‘एन्सायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका’चे 20 बृहत खंड, 10 लघु खंड आणि ‘प्रोपीडिया’चा एक खंड प्रकाशित झाले. या खंडांनी अनेक प्रकारे तर्कतीर्थांच्या पूर्ववाचनाला आव्हान दिले. ‘एकूण’ (Total) आणि ‘संपूर्ण’ (Whole) हे शब्द एक नाहीत. पहिला संख्यावाचक आहे तर दुसरा स्थितीदर्शक! ‘एन्सायक्लोपीडिया ऑफ इग्नोरन्स’ वाचून तर्कतीर्थांच्या लक्षात आले की, ‘का’ (Why) हा प्रश्न जोवर माणसाच्या मनात राहील तोवर ज्ञात प्रदेशापेक्षा अज्ञाताचा समुद्र कायमच विस्तीर्ण राहणार. स्वप्न, झोप, भूगर्भ, अवकाश, सापेक्षता या संकल्पना मानवाला अद्याप पूर्ण आकळलेल्या नाहीत. त्या पूर्णत्वाने कळेपावेतो त्यांना अपूर्णच म्हणावे असे मानणारे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आयुष्याच्या अंताच्या प्रवासापर्यंत अतृप्त, अस्वस्थ वाचक म्हणूनच जगले. मृत्यूच्या अंतिम क्षणी त्यांच्या छातीवर उपडे पडलेले उघडे पुस्तक हेच सांगत होते, ‘माणसाला अंत आहे, वाचनाला नाही!’

- सुनीलकुमार लवटे, कोल्हापूर
drsklawate@gmail.com
(लेखक, ज्येष्ठ साहित्यिक व कोल्हापूर येथील महावीर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आहेत.)


Tags: vai pradnyapathshala marathi literature philosophy marathi writer sunilkumar lawate Load More Tags

Comments:

Vishwas Sutar

तर्कतीर्थांचे समग्र वाचन अचंबित करते. 20000 पोथ्या हाताळणे आणि साठ हजार ग्रंथांचे स्वतःचे संग्रहालय निर्माण करणे, विश्वकोशाचे 22 खंड निर्माण होतील अशी मूलभूत व्यवस्था करणे असे त्यांचे महनीय कार्य आहे. लवटे सरांच्या या लेखामुळे मराठी वाचक तर्कतीर्थ समजून घेण्यास उत्सुक व्हावेत, हीच अपेक्षा !

Add Comment