मीनलताई साठेआवर्जून सांगतात की राजकारण / समाजकारण ही 24 तासांची सेवा आहे. मुलींनी, त्यातल्या त्यात शिकलेल्या मुलींनी / बायकांनी ह्याकडे तुच्छतेने न पाहता सकारात्मक दृष्टीकोनातून पाहावे. म्हणजे सावित्रीबाईंनी सांगितले की मुलींनी शिकायला पाहिजे, मुली शिकल्याही, पण त्या शिक्षणाचा उपयोगच नाही जोपर्यंत महिला वर्गाच्या हातात 'पॉवर' येत नाही. ही पॉवर कशात आहे तर स्वतः कमावलेला पैसा, आणि मग सत्ता! राजकारण हा जग बदलण्याचा मार्ग असू शकतो तो असा!
माढ्यात साठे हे मोठे प्रस्थ आहे. शहरात मुख्य रस्त्याला दर्शनी भागात 'मित्रप्रेम' ही वास्तू लक्ष वेधून घेते आणि त्याहीपेक्षा डोळ्यात भरते ती म्हणजे दारावरची नावाची पाटी. अॅड. मीनल साठे. खरंतर मोठ्या शहरात घराच्या पाटीवर बाईचं नाव म्हणजे काही अप्रूप नाही, पण माढ्यासारख्या छोट्या शहरात ही विशेष बाब म्हणून डोळ्यांत भरली आणि मग लक्षात आले की माढ्यात जवळपास सर्वच घरांवर बाईच्या नावाच्या पाट्या आहेत. आणि ही साधी पण मोठी गोष्ट किती परिणामकारक असू शकते हे लक्षात येतं. माढ्याच्या उपनगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष असताना त्यांनी असे अनेक वैशिष्ट्यपूर्ण/ नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. त्यातील आणखी एक उदाहरण म्हणजे संध्याकाळी सात ते नऊ ह्या वेळेत माढा शहरात मोबाइल फोन वापरण्यास विराम देण्याचे आवाहन नगरपालिकेमार्फत करण्यात आले आणि तशी दवंडी पिटवणारी गाडी माढा शहरातून फिरत असे. ह्यालाही उत्तम प्रतिसाद सुरुवातीच्या दिवसात मिळाला. लोकांनी स्क्रीन addiction हे एक मोठं व्यसन आहे आणि त्यातून लोकांचा किती वेळ वाया जातोय हे लक्षात आणून देऊन त्यासाठी धोरणात्मक प्रयत्न करणे हे निश्चितच उल्लेखनीय आहे.
2024 च्या विधानसभेला मीनल साठे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवार होत्या. मीनलताई साठे पराभूत झाल्या असल्या तरी त्यांच्या कर्तृत्वाकडे डोळेझाक करता येत नाही. राजकीय स्त्रीपुरुष यांच्या भाऊगर्दीत त्यांच्याकडील विचारांची स्पष्टता आणि प्रामाणिकपणा त्यांना वेगळे ठरवतो. माढया सारख्या ग्रामीण भागात आणि त्यातही मराठवाड्याचे प्रवेशद्वार ज्याला म्हणतो त्या भागात राहून स्त्रियांचा आवाज बनणे निश्चितच स्वागतार्ह आहे.
इंदापूरजवळचं बावडा हे मीनलताईंचं माहेर. आई, वडील आणि पाच बहिणी असं माहेरचं कुटुंब. त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण बावड्यातच झालं. कॉलेज साठी मात्र त्या शारदानगर, बारामती इथे गेल्या. कारण तेव्हा जवळपास कुठेच विज्ञान शिक्षणाची सोय नव्हती. कॉलेज साठी गावाच्या बाहेर पडणाऱ्या आणि हॉस्टेलला राहणाऱ्या त्या आणि त्यांच्या बहिणी गावातील पहिल्याच मुली होत्या. ह्यासाठी अर्थातच त्यांच्या वडिलांची विचारसरणी कारणीभूत होती. 'हे माझे पाच पांडव आहेत' असे ते नेहमी म्हणत असत. आणि मुलींनी शिकून मोठे व्हावे असे त्यांना मनापासून वाटत असे. बारामतीत त्यांचं B.Sc. Microbiology पूर्ण झालं आणि त्याच वर्षी माढ्याच्या दादासाहेब साठे यांचं स्थळ चालून आलं. मीनलताईंचे वडील श्री. सुरेश गणपतराव घोगरे हे बरेच वर्षे गावचे सरपंच होते, तसेच त्यांचे आजोबाही राजकारण आणि समाजकारणात सक्रिय होते. ह्यामुळेच त्यांचे घराकडे वेळ देणे फारसे होत नसे. वडिलांचा पाहिजे तसा वेळ आपल्याला मिळत नाही ह्या कारणाने मीनलताईना राजकारणाबद्दल अढी होती. त्यामुळेच त्यांना राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घरात जाण्याची बिलकुल इच्छा नव्हती. B.sc. नंतर M. Sc. करायचं आणि पुढे मोठ्या रिसर्च सेंटर मध्ये काम करायचं असं त्यांनी ठरवलं होतं. पण लग्न जमलं आणि त्यांच्या विरोध लक्षात न घेता 2000 साली त्यांचं लग्न झालं.
बहुतेक भारतीय स्त्रियांप्रमाणे त्यांनीही हे लग्न स्वीकारलं आणि 2014 पर्यंत फक्त एक गृहिणी म्हणून संसार केला. दरम्यानच्या काळात सासरे, सासूबाई आणि पती यांनी जिल्हा परिषद आणि विधानसभेवर आणि विधानपरिषदेवर उमेदवारी केली, निवडणुका जिंकल्या, विविध पदांवर कामे केली. पण मीनलताई मात्र घर सांभाळणे, मुलांकडे लक्ष देणे, आल्या-गेलेल्यांची उठ-बस, चहा-पाणी, सण-वार, शेणाने सारवणे, सडा-रांगोळी ह्यातच बुडालेल्या होत्या. मीनलताईंची शिक्षण पुढे चालू ठेवण्याची खूप इच्छा होती. परंतु काही कारणाने लगेचच त्यांना पुढे शिकता आलं नाही. ह्या काळात त्यांनी तीन वेळा लॉ कॉलेजला प्रवेश घेतला आणि रद्द केला. आपली सून अजूनही शिकते ह्यामुळे लोक आपल्याला नावं ठेवतील अशी भीती त्यांच्या सासूबाईंना वाटत असे. मीनलताईंनी कधी त्याचे मन मोडून कोणताही हट्ट केला नाही. दहा बारा वर्षे फक्त संसार एके संसार केला. आपल्या वागण्याने सर्वांची मनं जिंकली. त्यामुळे शेवटी खुल्या मनाने त्यांच्या सासूबाईनी त्यांच्या पुढच्या शिक्षणाला परवानगी दिली. मीनलताईंनी 2017 मध्ये एलएलबी आणि 2021 मध्ये एलएलम पूर्ण केलं आणि सध्या सोलापूर विद्यापीठातून Ph. D. करत आहेत.
2013 मध्ये माढा ग्रामपंचायतीची निवडणूक होती, त्यासाठी त्या पहिल्यांदा सार्वजनिक कामासाठी घराच्या बाहेर पडल्या. प्रचाराची धुरा हळू हळू सांभाळू लागल्या. त्यांच्या सासूबाईंनी 1995 मध्ये स्थापन केलेल्या प्रियदर्शिनी महिला मंडळामार्फत जास्तीत जास्त कार्यक्रम आयोजित करायला त्यांनी सुरवात केली. आणि हळू हळू माढ्यात त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण होऊ लागली.
पुढे 2013 ला दादासाहेब (मीनलताईंचे पती) जिल्हा परिषदेसाठी, तर 2014 ला विधानसभेसाठी उमेदवार होते. त्या काळात मीनलताईंनी संपूर्ण प्रचाराची जबाबदारी सांभाळली. आणि त्याच काळात त्यांना जाणवले की राजकारण / समाजकारण त्यांच्या रक्तातच आहे. ह्या निवडणुकांत पराभव झाला असला तरी गाठीला अनुभव पडत राहिला. त्याचा फायदा त्यांना 2017 च्या माढा नगरपंचायत निवडणुकीसाठी झाला. ह्या निवडणुकीला मात्र त्यांनी संपूर्ण महिला आघाडी सांभाळली, महिलांच्या सोबत प्रचार केला. ह्याला कारण त्या वर्षी नगराध्यक्ष पद महिलांना आरक्षित होतं. राजकारण हे पुरुषांनी बजबजलेलं क्षेत्रं आहे. सामान्य बायका चुकूनही राजकारणाची वाट धरत नाहीत. राखीव जागांमुळे ज्या काही बायका राजकारणात दिसतात त्यांचे नवरेच खरा कारभार पाहतात.
मीनलताईना नेमकं हेच नको होतं. 2017 ला पहिल्यांदाच माढ्यात हा बदल दिसला की, प्रचार फेऱ्यांमध्ये बायका जास्त दिसत होत्या. आणि ह्याचा परिणाम मतदानावर सुद्धा दिसला. त्यामुळे त्यांना नागरपंचायतीसाठी बहुमत मिळाले. शिवाय निवडून आलेल्या एकूण महिला प्रतिनिधींची संख्याही वाढली. त्या वर्षी SC महिला आरक्षणामुळे पहिली अडीच वर्षे त्या उपनगराध्यक्षा होत्या आणि 2018 पासून नंतरची अडीच वर्षे नगराध्यक्षा झाल्या. ह्या काळात त्या रोज पंचायत ऑफिस मध्ये जात असत. मग त्यांच्या लक्षात आले की बाकीच्या निवडून आलेल्या बायका रोज येत नाहीत. कारण काय तर तिथे सगळे पुरुष असतात. मग त्यांनी समजावून सांगितले की आपण आलो की आपण बायका जास्त दिसू. मग दुसरी कारणे असत, जसे की, घरी काम आहे, पाहुणे आलेत, घरी कुणी आजारी इत्यादी. ह्यावर त्यांनी सांगितले की, स्वयंपाक पाणी असली कामे आहेत तर पहाटे उठून करा; पण हेही आपले काम आहे तर आपण आलेच पाहिजे. मग हळू हळू चित्र पालटले. आता इथे नगरपंचायत कार्यालयात बायकाच जास्त दिसतात.
पण नुसते तिथे जाणे म्हणजे काम संपले असे नाही. तिथे गेल्यावर काम काय करायचे, आपली कामं कशी करून घ्यायची ह्याबद्दल कसलीही माहिती / प्रशिक्षण ह्या बायकांना नव्हतं. मीनलताईंना राजकीय पार्श्वभूमी असल्याने जुजबी माहिती होती पण तीही पुरेशी नव्हती. बाकीच्या बायका तर ह्या बाबतीत निव्वळ अडाणी होत्या. पुरुषांना एवढा प्रॉब्लेम येत नाही कारण ते रोज बाहेर असतात. त्यामुळे कामकाज कसं चालतं आणि करून घ्यायचं असतं हे त्यांना बऱ्यापैकी बायकांपेक्षा जास्त माहीत असतं. तर पहिली गोष्ट त्यांनी केली ती म्हणजे कामकाज मुळापासून समजावून घेतलं. आपल्याला दहावी पर्यंत फक्त 15 मार्कांचं नागरिकशास्त्र असतं. त्यांनंतर हा विषय जो आपला सुटतो तो सुटतोच. ह्या वेळेत किती कमी प्रॅक्टिकल माहिती मिळते सर्वांना! ह्या नगरपालिकेच्या सत्ता काळात त्यांनी कामकाजाचा अभ्यास केल्याने त्यांचा आत्मविश्वाससुद्धा वाढत गेला.
घरातून त्यांना पूर्ण पाठिंबा आणि मार्गदर्शन आधीपासूनच होते. त्यांच्या कामात पती किंवा सासरे यांनी कसलीही ढवळाढवळ केली नाही. काम करण्याचे, निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळाले. शिवाय काही अडचण आलीच तर घरातून सल्ला मिळायचा की तुझं तू बघ, तू ठरव, हे तुझं काम आहे तू करू शकतेस. त्यामुळे अभ्यासासोबत आत्मविश्वास आणखी वाढला. आणि त्यांच्या मते त्या ह्याहीपेक्षा जास्त मोठया पदांसाठी तयार झाल्या. त्यांच्या मते मोठी पदे घेण्यासाठी त्या जास्त लायक सुद्धा आहेत, कारण त्यांनी सुरवात खूप खालच्या स्तरातून केली आहे. शिवाय हे करताना त्यांनी एकट्याने केले नाही तर सोबतच्या बायकांना हे करायला भाग पाडले. त्यामुळे त्या महिलांचा ही आत्मविश्वास वाढला. सोबतच मीनलताईंना महिला वर्गाचा पाठिंबा वाढत गेला. 2017 साली त्यांची सोलापूर जिल्हा नियोजन समिती वर नेमणूक झाली त्यासाठी त्यांना मीटिंग ना उपस्थित राहावे लागे.. तिथे आमदार, खासदार, मंत्री, जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा करण्याची संधी मिळाली. ह्यातूनही खूप अनुभव वाढला आणि शिकायला मिळाले तसेच ओळखी वाढल्या असे त्या आवर्जून सांगतात.
ह्या काळात त्यांनी माढयामध्ये बरीच विकासकामे केली. माढेश्वरी मंदीर सुशोभीकरण, ठिकठिकाणी pavement ब्लॉक ह्या मुळे माढा शहराचा चेहरामोहरा बदलू लागला. 2021 पर्यंत त्यांनी विविध योजनांतून 1000 घरकुले विशेष प्रयत्नपूर्वक मंजूर करून घेतली, ज्यांची संख्या पूर्वी 100-200 च्या घरात होती. घरकुलासाठी फाईल आली की त्याचा स्वतः पूर्ण अभ्यास करून त्या मार्गदर्शन करीत आणि पाहिजे ती कागदपत्रे मिळवायला मदत करत. शिवाय अधिकार्यांना जास्तीत जास्त घरकुले मंजूर करण्यासाठी सूचना देण्यामुळे सरकारी योजनांचा फायदा जास्त लोकांपर्यंत पोहोचला. माढ्यातला पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न त्यांनी सोडवला. स्वच्छता, गटारे, इत्यादी कामे केली. ह्यासाठी त्यांचा खूप जास्त वेळ खर्ची पडू लागला. लोक रात्री अपरात्रीसुद्धा थेट त्यांना फोन करत की ताई pipeline फुटलीय किंवा घंटा गाडी आली नाही इत्यादी. लोकांची अशी कामे त्यांनी फक्त कागदोपत्री किंवा ऑफिस मधून नाही तर प्रत्यक्ष फील्डवर जाऊन केली / करून घेतली. त्यामुळेही त्यांचे ज्ञान वाढले, लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास वाढला. फोनवर त्या अजूनही सर्वाना उपलब्ध असतात.
ह्या निमित्ताने त्या आवर्जून सांगतात की राजकारण / समाजकारण ही 24 तासांची सेवा आहे. मुलींनी, त्यातल्या त्यात शिकलेल्या मुलींनी / बायकांनी ह्याकडे तुच्छतेने न पाहता सकारात्मक दृष्टीकोनातून पाहावे. म्हणजे सावित्रीबाईंनी सांगितले की मुलींनी शिकायला पाहिजे, मुली शिकल्याही, पण त्या शिक्षणाचा उपयोगच नाही जोपर्यंत महिला वर्गाच्या हातात 'पॉवर' येत नाही. ही पॉवर कशात आहे तर स्वतः कमावलेला पैसा, आणि मग सत्ता! राजकारण हा जग बदलण्याचा मार्ग असू शकतो तो असा!
हेही वाचा - निवडून दिल्यास महिला आरक्षण दिले जाईल!
मीनलताईंचा राजकीय प्रवास इतका कठीण नव्हता, कारण सासर माहेर दोन्ही ठिकाणी त्यांना बाळकडू मिळालं आहे. हे एक priviledge! सामान्य बायकांच्या बाबतीत ही परिस्थिती नाही. साधं बोलायचं कसं हे ही बायकांना कळत नसतं.या सभेत बोलताना हात पाय थर थर कापतात, घशातून आवाज येत नाही. त्यासाठी प्रशिक्षण शासन देऊ करतं पण तिथे कुणी जात नाही कारण मग इतके दिवस बाहेर गेल्यावर घरचा स्वयंपाक कोण करणार?? मीनलताईंना अशा सरपंच आणि लोकप्रतिनिधी महिलांसोबत काम करण्याची त्यांना योग्य रित्या प्रशिक्षित करण्याची मनापासून इच्छा आहे.
मीनलताईंच्या प्रियदर्शिनी महिला मंडळामार्फत खूप सारे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व आरोग्याविषयी उपक्रम माढा शहर आणि पंचक्रोशीत राबवले जातात.. ह्याच निमित्ताने हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात कचरा व्यवस्थापनाबद्दल किंवा आरोग्याबद्दल जागृती करणे असे उद्योग त्या करत असतात. आणि त्याला प्रतिसादही चांगला मिळतो. त्यांचे एक निरीक्षण आहे की, बायकांना विश्वासात घेऊन कामे केली तर चांगला परिणाम आणि बदल नक्की घडतो. बायका पुरुषांपेक्षा जास्त sincere, प्रामाणिक, थोड्या भाबड्या अशा असतात. त्यामुळे राजकारणातला महिलांचा टक्का वाढला तर खूप सकारात्मक परिणाम समाजावर होईल असे त्यांना वाटते.
कायद्याच्या शिक्षणाचा उपयोग त्यांना वेगवेगळ्या कौटुंबिक केसेसमध्ये समुपदेशनासाठी झाला. त्यांनी अनेक संसार मार्गी लावले. ह्याचं एक मनोमन समाधान त्यांना स्वतःला वाटतं. पती-पत्नीच्या भांडणात जर दोघांच्याही घरचे लोक ढवळाढवळ करीत असतील तर अशी भांडणे विकोपाला जातात. ते न होता सामोपचाराने, समजूतदारपणे संसार पुढे न्यावा लागतो. पत्नीच्या हातात स्वतः कमावलेले पैसे आल्यामुळे जी सामाजिक परिस्थिती बदलली आहे ती स्वीकारण्याची प्रगल्भता पत्नी व पती ह्या दोघांच्यात व समाजातही अजून आलेली नाही असं त्यांना वाटतं. अशा केसेसमध्ये त्या समुपदेशन करतात, एकमेकांशी जुळवून घेणे, समजून घेणे, तडजोडी करणे याबाबत सल्ले देतात.
ह्या सर्व कामाची परिणती म्हणजे 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीला त्यांच्या सासऱ्यांनी दादासाहेबांच्या ऐवजी मीनलताईंना संधी देण्याचे ठरवले. 2024 ची निवडणूक त्यांनी लढवली खरी पण त्यात त्यांचा पराभव झाला. ह्या पराभवाची अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक आणि ठळक कारण म्हणजे माढ्यासारख्या मतदारसंघात बाईची उमेदवारी लोकांना सहन झाली नाही. मीनलताईंनी ज्या प्रकारे महिला आणि बायकांच्या सहभागाचा अजेंडा राबवला होता तो राजकारणातल्या पुरुषी अहंकाराला सहन झाला नाही. अगदी साधी गोष्ट म्हणजे कुठे सभेला गेल्यावर एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष, एक अधिकारी आणि एखादया सभापती अशा चार महिलांना जर चार खुर्च्या दिल्या तर स्टेजवर उरलेल्या एखाद्या खुर्चीवर एखादाच पुरुष दिसू लागला! हे वारंवार दिसणारे 'विपरीत(!)' चित्र पुरुषी अहंकाराने ग्रासलेल्या मातब्बर राजकारणी मंडळींच्या डोळ्यांत खुपले. आणि याचा परिणाम मतदानावर निश्चितपणे झाला.
प्रचार सभेच्या दरम्यान मीनलताईंचा उल्लेख 'हिटलर बाई' असा झालेला असे एक उदाहरण त्यांनी सांगितले. वास्तविक मीनलताई साठे अतिशय मृदू स्वभावाच्या आहेत. फक्त त्या आग्रही आहेत की बायकांचं प्रतिनिधित्व करायला बायकाच हव्यात, त्यांच्या नवऱ्याची ढवळाढवळ नको. कारण त्याने महिला आरक्षणाच्या मूळ उद्देशालाच फाटा बासतोय. पण हेच आग्रही मत पुरुषी वर्चस्वाला सहन होत नाही. आणि मग मोठा पराभव होतो. कुटुंबातून अर्थातच त्याना पूर्ण पाठिंबा आहे. कित्येक कार्यक्रमात मीनलताई अध्यक्ष असल्या तरी दादासाहेब स्टेज वर बसण्याचा अट्टाहास न करता समोर प्रेक्षकांत बसतात. पण हे सर्वांना सहन होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्यापैकी चांगली राजकीय पार्श्वभूमी असली तरी राजकारणाची बिकट वाट बाईसाठी सुकर नाहीच मग ज्यांना राजकारण काहीच माहिती नाही त्या बायकांचा कसा निभाव लागावा??
पण मीनलताईंनी यामुळे खचून न जाता अधिक उमेदीने काम सुरूच ठेवले आहे माढयामध्ये महिला बचतगटांच्या माध्यमातून त्यांनी अतिशय चांगले काम उभं केलं आहे. उन्हाळी काम, पापड लोणचे, तिखट, मसाले अशी अनेक उत्पादने तयार करणे आणि त्यासाठी लागणारे भांडवल आणि मशीन उपलब्ध करून देणे आणि तयार मालाला मार्केट मिळवून देणे अशी कामे त्या त्यांच्या समूहामार्फत करीत असतात. अनेक बायकांच्या हाताला काम आणि कामाचा चागला मोबदला मिळाला आहे, मिळत आहे. इथल्या सेंद्रिय उत्पादनांसाठी युरोप अमेरिकेचे मार्केट मिळावे, निर्यात व्हावी यासाठी त्या यशस्वीरीत्या प्रयत्न करीत असतात. ह्यासाठी महाराष्ट्र राज्य उमेद अभियानासोबत समन्वय करून अतिशय उत्तम काम चालू आहे आणि पुढेही यात आणखी चांगले काम करण्याची खात्री त्या बाळगून आहेत. ह्यामुळे ग्रामीण महिलांच्या आयुष्यात फार आश्वासक बदल घडत आहेत. इथून पुढे त्यांच्या शिक्षण, आरोग्य क्षेत्रांसाठी आणि महिला लोकप्रतिनिधींना ठोस काम करण्यासाठी प्रशिक्षण व प्रोत्साहन देण्याच्या अनेक योजना आहेत.
आताच येऊन गेलेल्या पुरानंतर पूरग्रस्ताना लागेल त्या प्रकारची सर्व मदत मिळवून देण्याची त्यांची तळमळ सर्वांनीच पाहिली आहे. परिस्थितीची पाहणी, सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी सोय करून देणे, कपडे, अन्नपदार्थ मिळतील असे पाहणे, आर्थिक मदत करणे, लोकांना धीर देणे, यासाठी त्या राबत आहेत. एका संवेदनशील आणि कार्यक्षम अशा समाजकारण केंद्रस्थानी ठेवणाऱ्या राजकीय नेतृत्वाची ही झलक आहे.
- स्नेहलता जाधव
snehalatajj@gmail.com
(लेखिका, के.एन. भिसे कला व वाणिज्य महाविद्यालय, कुर्डूवाडी येथे प्राध्यापक आहेत.)
Tags: माढा सोलापूर दादासाहेब साठे मीनल साठे कॉंग्रेस विधानसभा महिला राजकीय नेतृत्व राजकारणातील महिला Load More Tags
Add Comment