महामार्गांचा विस्तार करण्याच्या प्रकल्पांतर्गत थिम्मक्कांनी लावलेली झाडं तोडावी लागणार होती. पण एखादी आई जशी आपल्या मुलांच्या रक्षणासाठी शर्थीनं लढते, तशाच थिम्मक्का पुढे आल्या. त्यांनी सरकारी अधिकार्यांना 70 वर्षं वाढलेल्या झाडांचं महत्व समजावून सांगितलं. ती कापली तर काय काय नुकसान होईल हे त्यांना पटवून दिलं आणि चार किलोमीटरच्या पट्ट्यातली झाडं वाचवण्यासाठी विस्तारीकरणाचा मार्ग बदलायला थिम्मक्कांनी सरकारला भाग पाडलं.
इंग्रजीमध्ये एक सुभाषित आहे - You make a life out of what you have, not what you are missing. हे सुभाषित प्रत्यक्षात आणणार्या कदाचित अनेक व्यक्ती असतील, पण सालूमरदा थिम्मक्कांचा प्रवास पाहिला की या सुभाषिताची निःशंक सत्यता पटते आपण थक्क होऊन जातो. अर्थात, हे सुभाषित त्यांनी खरं ठरवलं, असं म्हटलं तर ते अर्धसत्य ठरेल. कारण, कर्नाटकातल्या एका लहानशा गावात राहणार्या या बाईंनी केवळ स्वतःचं आयुष्य नव्हे, तर आपल्या भोवतीचं जग सुंदर व्हावं यासाठी आयुष्य खर्ची घातलं आहे. शिक्षण नाही, आर्थिक परिस्थिती अनुकूल नाही, नवरा सोडला तर बाकी कुटुंबाचा आधार नाही- अशा प्रतिकूल परिस्थितीमुळे पिचून जाणारी माणसं किती तरी असतात; पण थिम्मक्का यांच्यापेक्षा अगदी वेगळ्या- सामान्य, तरीही असामान्य आहेत! ‘तुमच्या इच्छा-आकांक्षांची पूर्तता करणारं आयुष्य तुमच्या वाट्याला आलं नसलं तरी तुम्ही स्वतःहून तुम्हाला हवी ती पूर्तता निर्माण करा,’ हा मंत्र घेऊन कार्यरत राहणार्या 114 वर्षांच्या थिम्मक्कांची गोष्ट खरंच विलक्षण म्हणावी अशी आहे.
थिम्मक्कांचा जन्म कर्नाटकातला. तुमकुर जिल्ह्यातल्या गुब्बी तालुक्यातल्या अगदी लहानशा खेड्यात त्या जन्मल्या. 30 जून 1911 ही त्यांची जन्मतारीख. आई-वडील अगदी गरीब. थिम्मक्का शाळेत जायला लागल्या पण शिक्षण अर्धवट सोडून द्यावं लागलं आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शेतातली कामं करणं, शेळ्या हाकणं अशी कामं त्यांना करावी लागली. पण या कामांचं त्यांना कधी ओझं वाटलं नाही. निसर्गात त्या मनापासून रमायच्या. काम करता करता, शेतांशी, जंगलांशी त्यांचं घट्ट नातं तयार झालं. रोपं कशी रुजतात, त्यांना किती पाणी लागतं, ती कधी, कशी वाढतात, कोणत्या झाडांवर कुठले पक्षी आणि कीटक वाढतात, मातीचा पोत झाडांमुळे कसा सुधारतो, हे सगळं ज्ञान त्यांना या निसर्गाच्या शाळेत मिळत गेलं.
त्या काळच्या प्रथेनुसार थिम्मक्कांचं लग्न लवकर झालं. चिक्कय्यांशी लग्न करून त्या हुलीकल गावात राहायला गेल्या. लग्न होऊन बराच काळ लोटला पण त्यांना मूलबाळ झालं नाही. आजही या गोष्टीचा बाऊ केला जातो; शंभर वर्षांपूर्वी तर कुटुंबाच्या, समाजाच्या दृष्टीनं अशा स्त्रीला जगण्याचाच अधिकार नव्हता. घरातल्या त्रासाला थिम्मक्का इतक्या कंटाळल्या, आणि निराश झाल्या की त्यांनी स्वतःचं आयुष्य संपवायचं ठरवलं. तेव्हा थिम्मक्का 40 वर्षांच्या होत्या. दुसरं लग्न करण्यासाठी त्यांच्या नवर्यावर घरच्या मंडळींचा खूप दबाव होता. पण थिम्मक्कांवर त्यांचं मनापासून प्रेम होतं. त्यांनी लग्नाचे सगळे प्रस्ताव नाकारले आणि थिम्मक्कांना दुःखातून बाहेर कसं काढता येईल, याचा विचार सुरू केला.
चिक्कय्यांनी तिचं लक्ष निसर्गाकडे वळवलं. हा प्रयत्न यशस्वी झाला. झाडांची काळजी घेताना थिम्मक्का आपलं दुःख विसरल्या. एकदा गावाला लागून असलेल्या हमरस्त्यावरुन चालता चालता रखरखत्या उन्हात त्या दोघांनाही तिथला उजाडपणा जाणवला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडं वाढवायचा निर्णय त्यांनी घेतला. हमरस्त्याच्या 4 किलोमीटरच्या पट्ट्यात त्यांनी वडाची रोपं लावली. सुरुवात 10 रोपांपासून झाली. तो भाग तसा कमी पाण्याचा होता; जमीन कोरडी. अशा ठिकाणी वडाची झाडं वाढवणं हे आव्हान होतं. चिक्कय्या खड्डे खोदण्याचं काम करायचे आणि थिम्मक्का रोपांना लागणारं पाणी वाहून आणायच्या. रोपांना पुरेसं पाणी मिळावं म्हणून त्यांनी पावसाळ्याच्या सुरुवातीला रोपांची लागवड करायला सुरुवात केली. रोपं लावून ते दोघे थांबले नाहीत. काटक्या उभ्या करून त्यांनी या रोपांना नैसर्गिक कुंपण केलं, नियमित पाणी घातलं आणि अक्षरशः स्वतःच्या मुलांसारखं प्रेमानं आणि काळजीनं वाढवलं. आज त्या म्हणतात, “मला पुष्कळ मुलं आहेत आणि त्यांच्यामुळे माझं नाव पुढची अनेक शतकं घेतलं जाईल.”
रोपांना पाणी देण्यासाठी घरून येताना थिम्मक्का दोन बादल्या, दोन कळशा घेऊन निघायच्या. आणि रस्त्यातल्या विहिरी किंवा तळ्यांतून पाणी भरून ते रोपांना घालायच्या. दिवसभरात 50-60 बादल्या आणि कळशा वाहून आणायच्या हे काम काही सोपं नव्हतं. पण झाडांविषयीच्या निरपेक्ष जिव्हाळ्यामुळे थिम्मक्का ते करत राहिल्या. शिवाय एकदाच रोपं लावून त्या थांबल्या नाहीत. दर वर्षी 15 ते 20 नवी रोपं त्या लावत राहिल्या. अशी 80 वर्षांत त्यांनी 8000 झाडं लावली; लावली आणि जगवलीही! यातली 400 झाडं वडाची आहेत, बाकी झाडांमध्ये चिंच आहे आणि इतर काही देशी झाडं आहेत.
शाळा किंवा कॉलेजमध्ये जाऊन थिम्मक्कांनी औपचारिक शिक्षण घेतलेलं नसलं तरी त्या लहानपणापासून आपल्या परिसराशी, भोवतीच्या निसर्गाशी इतक्या एकरूप झालेल्या होत्या की रोपांची लागवड, सिंचन, झाडांची निवड याचं ज्ञान त्यांना निरीक्षणातून मिळत गेलं होतं. त्यामुळेच रस्त्याच्या कडेला रोपांची लागवड करताना जैवविविधतेनं समृद्ध अशा प्रजातींची त्यांनी निवड केली. वड तर आपल्या अंगाखांद्यावर पशू-पक्षी, कीटकांच्या शेकडो प्रजाती खेळवणारा वृक्ष आहे. या झाडांमुळे हुलीकल ते कुडूर या रस्त्यालगत सुंदर रानवा निर्माण झाला; स्थानिक पर्यावरण सुधारलं, हवा शुद्ध झाली, मातीची धूप रोखली गेली आणि लहान, मोठ्या वेगवेगळ्या वन्यजीवांना निवारा मिळाला. 8000 झाडं लावून जगवण्याचं हे काम एखाद्या एखाद्या संस्थेच्या किंवा सरकारी विभागाच्या आवाक्यापेक्षाही मोठं आहे, हे लक्षात घेतलं तर थिम्मक्कांचा विलक्षण म्हणावा असा ध्यास लक्षात येऊ शकेल.
अर्थात या लावलेल्या झाडांवर संकटं आलीच नाहीत, असं नव्हे. 2019 मध्ये विकासाचा झोत कर्नाटकाच्या या भागातही येऊन पोचला. महामार्गांचा विस्तार करण्याच्या प्रकल्पांतर्गत थिम्मक्कांनी लावलेली झाडं तोडावी लागणार होती. पण एखादी आई जशी आपल्या मुलांच्या रक्षणासाठी शर्थीनं लढते, तशाच थिम्मक्का पुढे आल्या. त्यांनी सरकारी अधिकार्यांना 70 वर्षं वाढलेल्या झाडांचं महत्व समजावून सांगितलं. ती कापली तर काय काय नुकसान होईल हे त्यांना पटवून दिलं आणि चार किलोमीटरच्या पट्ट्यातली झाडं वाचवण्यासाठी विस्तारीकरणाचा मार्ग बदलायला थिम्मक्कांनी सरकारला भाग पाडलं.
हेही वाचा - जगाच्या बचावासाठी स्थानिक कृतीचं महत्त्व (रामचंद्र गुहा)
1991 मध्ये चिक्कय्या गेले; पण त्यानंतरही थिम्मक्कांची रोपलागवडीची मोहीम थांबली नाही. थिम्मक्का आज 114 वर्षांच्या आहेत. आजही त्या रोपं लावतात, इतरांना त्यांच्या गावात, शाळेत, परिसरात लावण्यासाठी रोपं तयार करून मोफत देतात. त्यांनी लावलेली झाडं करोडो रुपये किमतीची असली आणि माणसांना श्वास घेण्यासाठी ती प्राणवायू पुरवत असली तरी थिम्मक्कांना श्रीमंतीचा हव्यास कधीच नव्हता. किंवा केलेल्या कामाचा मोठेपणा त्यांना मिरवायचाही नव्हता. आजही त्या त्यांच्या गावातल्या लहानशा, मातीच्या भिंती असलेल्या घरातच राहातात. “प्रत्येकानं एक झाड लावलं आणि वाढवलं तरी आपल्या मुलांसाठी हे जग सुंदर होईल,” असं त्या म्हणतात.
त्यांनी केलेल्या कामासाठी त्यांना किती तरी मोठे सन्मान मिळाले; पर्यावरणाच्या क्षेत्रातल्या अद्वितीय कामासाठी त्यांना भारत सरकारचं नॅशनल सिटीझन अॅवॉर्ड मिळालं, 2019 मध्ये पद्मश्री सन्मान मिळाला. बीबीसीच्या शतकातल्या 100 लक्षणीय महिलांमध्येही थिम्मकांची निवड झाली आहे. त्यांच्या विलक्षण ध्यासाचं आणि त्यातून उभ्या राहिलेल्या हिरव्या कामाचं महत्व जाणवल्यामुळे अमेरिकेततही त्यांच्या नावानं पर्यावरण शिक्षण देणारी संस्था उभी राहिली आहे.
पण याहूनही मोठा सन्मान म्हणजे त्या ‘वृक्षमाता’म्हणून सगळीकडे ओळखल्या जातात. त्यांचं मूळ नाव आहे आलदा मरदा थिम्मक्का; पण त्यांनी लावलेल्या हजारो झाडांमुळे त्यांना सालूमरदा थिम्मक्का ही ओळख मिळाली. कन्नड भाषेत सालूमरदा म्हणजे वृक्षांची ओळ. पर्यावरणवादी म्हणण्यापेक्षा त्यांना हे नाव आणि वृक्षमाता हे बिरुद अधिक प्रिय आहे. स्थानिक स्तरापासून जागतिक पातळीपर्यन्त नावाजल्या गेलेल्या थिम्मक्कांचं वेगळेपण हे की इतकी प्रसिद्धी मिळूनही त्या साध्याच राहिल्या आहेत. झाडं लावण्याच्या बरोबरीनं, आपल्या गावात रुग्णालय बांधण्याचीही थिम्मक्कांची इच्छा आहे. आयुष्याचं शतक ओलांडल्यानंतरही अशा विधायक गोष्टी करण्याची स्वप्नं पाहणार्या व्यक्ति फार दुर्मिळ असतात.
सामान्य माणसामध्ये, विशेषतः स्त्रियांमध्ये असलेल्या जिद्द, निष्ठा आणि चिकाटीचं प्रतीक म्हणून थिम्मक्कांकडे पाहायला हवं. अशा स्त्रिया संथ तेवणार्या पणतीसारख्या, कुठलाही गाजावाजा न करता, अगदी मूक राहून, इतरांच्या आयुष्यात तेज पसरवत राहातात. समाजाचं नेतृत्व राजकारणी किंवा प्रतिष्ठित समाजकारणी करत नाहीत; समाज तरतो, पुढे जातो, ते अशा सामान्य पण असामान्य माणसांमुळे.
- वर्षा गजेंद्रगडकर
varshapune19@gmail.com
(लेखिका डॉ. रा.चिं. ढेरे संस्कृति-संशोधन केंद्र या संस्थेच्या सचिव म्हणून कार्यरत असून बालसाहित्य, अनुवाद, ललित आणि पर्यावरण विषयक सातत्यपूर्ण लेखन करतात.)
Tags: सालूमरदा थिम्मक्का सालूमरदा थिम्मक्का कर्नाटक पद्मश्री कर्तव्य दिवाळी विशेष 2025 महिलांच्या यशोगाथा पर्यावरण वृक्ष Load More Tags
Add Comment