तेजस्विनींच्या यशोगाथा

कर्तव्य दिवाळी विशेष 2025 लेखमाला

1975 हे “आंतरराष्ट्रीय महिला वर्ष” म्हणून घोषित झाले होते. हे वर्ष भारतासह जगभरात महिलांचे हक्क, स्त्री-पुरुष समानता, महिलांचे सक्षमीकरण आणि सबलीकरण यांच्याशी संबंधित सामाजिक चळवळींना चालना देणारे ठरले. त्या निमित्ताने मुंबईत ज्योती म्हापसेकर यांच्या पुढाकाराने स्त्रीमुक्तीसंघटना स्थापन झाली. हुंडाबळी, घरगुती जाच आणि हिंसा, आर्थिक स्वातंत्र्य या काही प्रमुख मुद्यांना धरून चळवळीला सुरुवात झाली. 'हा प्रश्नच चुकीचा आहे' आणि 'मुलगी झाली हो..!' यासारख्या सशक्त पथनाट्यांमधून स्त्रीमुक्तीचा गभ आणि आवाका समाजाला जाणवून देण्याचे मोठे काम पहिल्या काही वर्षांत केले गेले. 

1985 मध्ये पहिले कुटुंब समुपदेशन केंद्र सुरु झाले. 1987 मध्ये कामगार आणि मजूर स्त्रियांसाठी डे केअर केंद्रांची सुरुवात झाली. 1996 मध्ये किशोरवयीन मुलामुलींसाठी जिज्ञासा नावाचा उपक्रम सुरू झाला. त्यात वयात येणे, शरीरातील बदल, लैंगिक विषय, व्यसन, इतर सामाजिक प्रश्न यांचा समावेश होता. 1998 मध्ये चळवळीने महिलांच्या समस्यांसोबतच त्यांच्या क्षमतांकडे आणि सामर्थ्याकडेही अधिक लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. परिसर विकास नावाचा पर्यावरण-विषयक कार्यक्रम सुरू झाला, ज्यात महिलांचे स्वावलंबन आणि त्यासाठी कचरा व्यवस्थापन, रिसायक्लिंग, या दिशेने काम सुरू झाले. बायोगॅस प्लांट्स, रिसायक्लिंग मॉडेल्स यासारख्या लहानमोठ्या उपक्रमांतून पर्यावरणविषयक जागरूकता निर्माण करण्याचे उपक्रम चालवले. 1999 मध्येसंघटनेला संयुक्त राष्ट्रांच्या 'Economic and Social Council' चे सदस्यत्व मिळाले.

आज स्त्री-मुक्ती संघटना समाजवादी व समावेशक दृष्टिकोनातून ‘स्त्री-मुक्ती’, समानता, सामाजिक न्याय’ ही तत्त्वे पुढे नेत आहे. महिला-सशक्तीकरणाचा अर्थ आता केवळ व्यक्तीस्तरीय राहिलेला नाही, तर अधिक व्यापक झाला आहे. आर्थिक आणि सामाजिक स्वावलंबन, जीवन कौशल्य विकास, आरोग्य, पर्यावरणविषयक जागरूकता, पर्यावरणीय उद्योजकता, डिजिटल प्रशिक्षण, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रांतील महिला नेतृत्व यांसारख्या नवीन विषयांचे भान ठेवून त्यानुसार मोठ्या आवाक्याची धोरणे संघटनेने आता आखली आहेत. 

आजच्या सतत आणि वेगाने बदलत्या युगात नागरीकरण, सांस्कृतिक स्थित्यंतरे, स्त्रियांची बदलती जीवनशैली, नव्या पिढीच्या अपेक्षा, आणि जागतिकीकरणाच्या संदर्भातील स्त्री-संबंधित प्रश्न — यावर अधिक लक्ष केंद्रित करीत, धोरणात्मक बदल घडवत त्यांची वाटचाल अखंडपणे पन्नास वर्षे सुरू आहे. या वाटचालीचा मागोवा घेताना स्पष्टपणे जाणवते की हे केवळ एका संघटनेचे नव्हे, तर संघटित स्वरूपातल्या महिलांच्या व्यापक चळवळीचे अर्धशतक आहे.

महिलांचे वैचारिक, आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य हा या चळवळीच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे. एकेका महिलेच्या यातना,तिचा वैयक्तिक संघर्ष यांसोबतच स्त्रियांची सामूहिक प्रगती, आणि त्यांच्याबाबतचे समाजातील चुकीचे दृष्टीकोन बदलण्यासाठी प्रयत्न हे चळवळीचे स्वरूप आहे. ही चळवळ महिलांच्या प्रश्नांकडे केवळ त्यांचे प्रश्न म्हणून एकारलेपणाने पाहत नाही, कारण महिलांचे प्रश्न सर्व सामाजिक प्रश्नांशी गुंतागुंतीच्या नात्याने बांधले गेले आहेत. म्हणूनच जिथे कुठे असमानता आणि अन्यायाविरुद्ध लढा दिला जातो, त्या सर्व चळवळींशी स्त्री मुक्ती चळवळ जोडलेली आहे. 

आपण जेव्हा स्त्रियांच्या जीवनाबद्दल बोलतो, तेव्हा दीर्घकाळापासून आजपर्यंत आपोआपच 'संघर्ष, सोशिकता, त्याग' या त्रयीचा उल्लेख आपरिहार्यपणे होतो. स्त्रियांचा प्रवास खडतर राहिलेला आहेच पण प्रत्येक वेळी तोच मुद्दा पुढे आणणं म्हणजे त्या स्त्रीच्या सामर्थ्याचं एकांगी दर्शन होय. तिचा प्रवास केवळ वेदनेचा नसतो — तो कर्तृत्वाचा, कौशल्याचा, दृष्टीकोनाचा, निर्णयांचा, नेतृत्वाचा, आत्मविश्वासाचा, सामर्थ्याचा आणि यशस्वितेचाही असतो. जेव्हा आपण केवळ संघर्षकथांवर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा आपण नकळतपणे मान्य करतो की त्या स्त्रीने काहीतरी ‘असामान्य’ केलं, जणू काही यश मिळणं हे तिच्यासाठी नव्हतंच पण तरी तिने लढाई जिंकली. पण जेव्हा आपण यशोगाथा सांगतो, तेव्हा आपण तिच्या पात्रतेचा आणि सामर्थ्याचा गौरव करतो — “ती यशस्वी झाली कारण ती सक्षम आहे, केवळ ती दु:खातून गेली म्हणून नाही.” असे मान्य करतो.

जेव्हा एखादी स्त्री आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या यशस्वी होते, तेव्हा तिचं यश फक्त तिचं राहत नाही. ती आपल्या कुटुंबासाठी, समुदायासाठी, आणि पुढच्या पिढीसाठी प्रेरक ठरते. तिची यशकथा समाजमनात स्त्रियांविषयी सहानुभूतीचा नव्हे तर आदराचा दृष्टीकोन निर्माण करते. स्त्रियांच्या संघर्षाला विसरायचं नाही, पण संघर्ष ही त्यांची एकमेव ओळख बनवायचीही नाही, याचे भान समाजाला आले पाहिजे. त्यामुळे आज स्त्रीची कहाणी सांगायची असेल, तर ती “काय सहन केलं” याची नव्हे — तर “काय साध्य केलं” याची असावी, या हेतूने कर्तव्य दिवाळी विशेष - 2025 साठी आम्ही 'तेजस्विनींच्या यशोगाथा' हे आशयसूत्र घेतलं आहे. राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक कार्य, सार्वजनिक आरोग्य, स्वतंत्र व्यवसाय, / entrepreneurship, शेती, पर्यावरण अशांसारख्या क्षेत्रातल्या यशस्विनींच्या कर्तृत्वाला या लेखमालेतून सलाम!

हजारो वृक्षांची आई होऊन पर्यावरण रक्षण करणाऱ्या 114 वर्षांच्या थिम्मक्कांची गोष्ट वर्षा गजेंद्रगडकर यांनी सांगितली आहे. स्त्रीमुक्ती संघटनेच्या संस्थापक ज्योती म्हापसेकर यांनी कचरा व्यवस्थापनातून पर्यावरणविषयक कार्य करणाऱ्या महिलागटाचे कर्तृत्व सांगितले आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात सामाजिक कार्य करीत महत्त्वाचे राजकीय नेतृत्व म्हणून उदयास आलेल्या मीनल साठे यांचा प्रवास स्नेहलता जाधव यांनी उलगडून दाखवला आहे, लहान आडबाजूच्या गावांतल्या माणसांना गावातच राहून कलेतून व्यक्त होण्याची संधी देणारी, त्या त्या गावाच्या स्वभावाची आणि त्या त्या गावात उदयाला येऊन तिथेच वाढत जाणारी 'Growing Museums' घडवणाऱ्या कलाकार, पुरातत्वशास्त्रज्ञ अनघा कुसुम, आणि महत्त्वाच्या सामाजिक विषयांवर माहितीपटांची निर्मिती करणाऱ्या परिवर्तन चळवळीतल्या कार्यकर्त्या शिल्पा बल्लाळ या दोघी स्वतःच आपापल्या गोष्टी सांगणार आहेत. 

त्यांच्या यशाने आपल्याला प्रेरणा मिळावी आणि आपली दिवाळी उजळावी, ही शुभेच्छा!

- कर्तव्य साधना
kartavyasadhana@gmail.com 

Tags: साधन डिजिटल यशोगाथा महिलांच्या यशोगाथा Load More Tags

Add Comment