एका दुर्लक्षित चित्रपटाची पंचविशी

कला समीक्षकांच्या नजरेतून सुटलेल्या 'अबोली' या चित्रपटाविषयी  

फोटो सौजन्य - राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय

आदिवासी जीवनाची पार्श्वभूमी असलेल्या आणि वास्तववादी जगात मात्र दुर्लक्षित राहिलेल्या ‘अबोली’ या मराठी चित्रपटाला नुकतीच 25 वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने या चित्रपटाचे वैशिष्ट्य आणि वेगळेपण अधोरेखित करणारा हा लेख. 

बऱ्याच वर्षांपूर्वी आशा भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी संगीतकार निशिकांत सदाफुले यांनी एक लेख लिहिला होता. त्या लेखामुळे ‘अबोली’ या मराठी चित्रपटाविषयी मला पहिल्यांदा कळले. या लेखातील चित्रपटाशी संबंधित एकेक किस्से वाचत असताना हा चित्रपट पाहण्याचे आणि खासकरून त्यातील संगीत ऐकण्याचे माझे कुतूहल चाळवले गेलेले होते. यूट्युबच्या माध्यमातून माझी ती इच्छा नुकतीच पूर्ण झाली आणि त्याच वेळी 11 वर्षांचे माझे कुतूहल व्यर्थ न गेल्याचे समाधानही लाभले. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक निशिकांत सदाफुले आणि कविवर्य ना.धों. महानोर यांच्याशी पुढे माझा संपर्क आला आणि या चित्रपटासंबंधी एकेक धागा उलगडत गेला.

‘मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार’ हा न्याय अनेकदा काही कलाकृतींच्यादेखील वाट्याला येतो. ‘रूदाली’सारखा राजस्थानी ग्रामीण कथेवर आधारित, लोकसंगीताचा बाज असलेल्या हिंदी चित्रपटास यश लाभते. मात्र तशाच धाटणीच्या ‘लेकिन’ चित्रपटाच्या वाट्याला हे यश येत नाही. मराठीचेच उदाहरण द्यायचे झाले तर ‘जैत रे जैत’सारखा चित्रपट लोकप्रिय होतो, मात्र तशाच स्वरूपाची एक कलाकृती कायम ‘अबोली’च होऊन जाते.

1995मध्ये प्रदर्शित झालेला ‘अबोली’ चित्रपट ही अशीच एक शापित कलाकृती. दिग्दर्शक अमोल शेटगे, संगीतकार निशिकांत सदाफुले, गीतकार ना.धों. महानोर, कलाकार सयाजी शिंदे, रेणुका शहाणे, वर्षा उसगावकर, विजय गोखले, दीपक शिर्के अशी मोजकीच टीम! पैशाचा फार चकचकाट नाही, भव्यदिव्य सेट्स नाहीत. मोठमोठाले संवाद तर नाहीतच! आणि त्यातही बहुतेक संवाद वारली भाषेतील! तरीही हा चित्रपट कलाप्रेमींच्या काळजाचा ठाव घेण्यात पूर्णपणे यशस्वी ठरतो.

या चित्रपटाचे चित्रीकरण डहाणूच्या कोसबाड परिसरातील एका आदिवासी पाड्यात झाले होते. कोसबाड येथील समाजसेविका आणि शिक्षणतज्ज्ञ असलेल्या अनुताई वाघ यांच्यावर फार पूर्वी एक डॉक्युमेंटरी करत असताना निशिकांत सदाफुले यांना आदिवासींच्या जीवनावर एखादा चित्रपट करावा अशी कल्पना सुचली होती. पुढे दिग्दर्शक अमोल शेटगे यांनी ती कल्पना उचलून धरली आणि चित्रपटासाठी कथा-पटकथा लिखाणाचे काम केले आणि ‘अबोली’चा जन्म झाला.

बऱ्याच चित्रपटांमध्ये मनुष्याच्या विवेकबुद्धीला टोचणी देणारी एखादी वस्तू दाखवून त्यातून पुढील कथा सजवली जाते. जसे हिंदीतील ‘आदमी’ चित्रपटात दिलीप कुमारला त्याच्या पूर्वायुष्यातील एका पापाची सतत जाणीव करून देणारी एक ‘बाहुली’ स्वतःच्या आत लपून बसलेल्या एका बेलगाम पशूचे स्मरण त्याला करून देते आणि त्या मार्गावर पुन्हा कधीही न जाण्याचा त्याचा संघर्ष त्या कथेत गुंफला जातो.

त्याचप्रमाणे याही चित्रपटाची नायिका असलेल्या मोनाला (वर्षा उसगावकरला) तिच्या मृत मैत्रिणीची एक बाहुली अबोल राहून विवेकबुद्धीची टोचणी सतत देत असते. परंतु इथे त्या टोचणीमुळे वाममार्गावर चालण्यास परावृत्त होण्याऐवजी भळभळणाऱ्या त्या जखमेतून अहंकाराचे एक अशिष्ट पिशाच तिच्या मनाचा ताबा घेते आणि हवी ती कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी ती हट्टी होत जाते. पुढे त्याच हट्टापायी तिचा दुर्दैवी अंत होतो.

दुसरीकडे त्या अबोल बाहुलीहून जास्त हवीहवीशी वाटणारी अबोली नायिका (रेणुका शहाणे) आपल्या अभिनय कौशल्याने असे काही गारूड करून टाकते की, ज्या वेळी चित्रपटाच्या सारालंकारात (क्लायमॅक्समध्ये) ती अस्पष्टपणे नायकाला ‘सया’ अशी साद देते तेव्हा कुठे प्रेक्षकांना कळून येते की, तोपर्यंतच्या चित्रपटात तिच्या तोंडी एकही संवाद नव्हता.

चित्रपटातील नायक सया (सयाजी शिंदे) एका आदिवासी उभरत्या चित्रकाराची भूमिका मोठ्या निस्सीमतेने निभावतो. एक चित्रकार म्हणून भावनांना वाट देण्यासाठी चित्रकला हेच त्याचे साधन! तो अनाथ असल्याने एका आदिवासी व्यक्तीच्या घरी वाढतो. त्याचे संगोपन करणाऱ्याच्याच मुलीवर त्याचे प्रेम बसते... परंतु ज्या बाबाचे आपल्यावर इतके उपकार आहेत त्याच्याकडे तिचा हात मागण्यास तो धजावत नाही. चित्रपटातील एका प्रसंगात स्वतःच रंगवलेल्या आपल्या प्रेयसीच्या चित्रासमोर उभे राहून जेव्हा या चित्रकारातील एक विवश प्रियकर जागा होतो, तेव्हा तो त्या चित्राशी शब्दांनी संवाद साधू लागतो आणि तो संवाद ऐकताना केवळ खलनायिका मोनाच नव्हे तर चोखंदळ प्रेक्षकही त्या निरागस चित्रकाराच्या प्रेमात पडतात. सदर प्रसंगाला निशिकांत सदाफुले यांचे भावोत्कट पार्श्वसंगीत जिंवत करते.

चित्रपटाच्या संगीताबद्दल बोलायचे तर यातील एक गीत ‘तुझ्या वाटेला ओले डोळे’ वरळीच्या रेडिओ जेम्स स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करत असताना आशा भोसले यांना अश्रू आवरता आले नव्हते. पार्श्वगायन करताना त्या पहिल्यांदाच अशा भावुक झाल्या होत्या. आशाताईंना त्या गाण्याने इतके समाधान मिळाले होते की, त्यांनी गाण्यासाठी ठरलेले मानधनही प्रांजळपणे परत केले होते.

या गीताबाबतही खूप रोचक माहिती कविवर्य ना.धों. महानोर यांच्याशी चर्चा करत असताना मला मिळाली. या गीताच्या रेकॉर्डिंगनंतर आशा ताईंनीदेखील या गीताच्या रचनेबद्दल महानोरांकडे विचारणा केलेली होती आणि काव्यातील असा लहजा प्रथमच ऐकल्याचे म्हटले होते. या गीताचे मूळ संगीत आणि वृत्त अजिंठा परिसरातील ‘लाडा ऐकला माती जायजो’ या लोकगीतावरून घेतलेले होते.

आदिवासींच्या अनेक लोकगीतांनी प्रभावित होऊन महानोरांनी अशा कित्येक प्रयोगशील गीतरचना केलेल्या आहेत. असे असले तरीही निशिकांत सदाफुले यांनी त्यात आपल्या प्रतिभेचा अवघा आत्मा एकरूप केल्याचा प्रत्यय गाणे ऐकताना येत राहतो. खासकरून सनईने केलेला शेवट हृदयात खोलवर रुतत जातो. त्यात महानोरांचे काव्य गीताची व्याकुळता अगदी सहजपणे प्रकट करते...

‘नदीच्या काठी सजनासाठी गाते पक्षिणी गीत निळे,   
सुकून गेले पानमळे’

इथे गीतासाठी निळे हे विशेषण लावण्याचे कारण विचारले असता कविवर्य महानोर मला म्हणाले की, त्यांना गाण्याचे लोकेशन नदीकाठचे सांगण्यात आल्याने नदी आणि आकाश यांच्या रंगसंगतीचा परिणाम त्या गीताच्या अमूर्त भावाला लागू करत त्यांनी तसे विशेषण वापरले होते. आशाताईंची अनावर झालेली भावना याहून सुंदर दाद या संगीताला अन् काव्याला अजून कुठली असू शकते...!

मानवी नातेसंबंधांतील उत्कटता पडद्यावर साकारण्यासाठी अतिरंजक अभिनयाचा आधार बऱ्याचदा घेतला जातो... परंतु या चित्रपटात दाखवले आहे आदिवासींचे जग! आदिवासी लोकांच्या भावनाच मुळात दबलेल्या! त्या भावनांच्या साधेपणाची झलक या चित्रपटात पाहायला मिळते कुठल्याही अंतिरंजक चित्रणाशिवाय! हिंदी चित्रजगतातील प्रसिद्ध कॅमेरामॅन ईश्वर बिद्री यांचा हा मराठीतील पहिलाच चित्रपट. त्यामुळे अपेक्षितपणे चित्रीकरणाला एक दर्जा मिळतोच. 

आज मराठीमध्ये कलात्मक विविधतेने चित्रपट केले जातात. परंतु नव्वदच्या दशकात वेगळ्या धाटणीच्या सिनेमाचा असा संकल्प आखणे व्यावहारिकदृष्ट्या एक धाडसच होते. त्यात चित्रपटनिर्मितीत फक्त कला साकार करण्यावर विचार जास्त झाल्याने आर्थिक गणित कुठेतरी मागे पडले. त्यामुळे टीमला वितरणही मर्यादित स्वरूपातच करावे लागले आणि सक्षम असूनही हा चित्रपट मोठे यश पाहू शकला नाही.

काळाहून पुढे असणारा हा चित्रपट किती रसिकांपर्यंत पोहोचला असेल आणि सर्वसामान्य रसिकांना तो कितपत उमगला असेल ही शंका आहेच... परंतु बहुतांश कला समीक्षकांच्या नजरेतूनही तो का सुटला असावा हे कोडे काही उलगडत नाही. शेवटी ‘अबोली’ ही एक अजरामर काव्यकृती असूनही ती अबोलच राहिली...!

- मॅक्सवेल लोपीस
maxwellopes12@gmail.com

(नरसी मोनजी महाविद्यालयात वाणिज्य अध्यापक असून लेखक गांधी विचार आणि भारतीय संगीत यांचे अभ्यासक आहेत.)

'अबोली' हा चित्रपट इथे पाहता येईल

 

Tags: अबोली निशिकांत सदाफुले ना.धों. महानोर अमोल शेटगे मॅक्सवेल लोपीस  सिनेमा cinema aboli nishikant sadafule N. D. Mahanor maxwel lopes Load More Tags

Comments:

Anjani Kher

Thanks to Mr. Lopis for introducing Aboli and also to Kartavyasadhansa for providing here the video of Aboli.

विष्णू दाते

अतिशय सुंदर परिक्षण, जे चित्रपट बघायला उद्युक्त करेल, असे अनेक छान चित्रपट कधी येतात आणि जातात ते कळत नाही!

Add Comment