इतके दिवस प्रवासापासून दूर राहिलेल्या अडचणी समोर उभ्या ठाकल्या... 

सर्वोदय संवाद सायकल यात्रा - 4

दुसऱ्या दिवशी सकाळी अगदी लवकर उठून, थंड पाण्यानं (स्वतःच्या मर्जीनं) अंघोळ करून आम्ही खिरोद्यातील शाळेच्या वास्तूची माहिती घ्यायला निघालो. त्या शाळेत शिकलेले, त्या शाळेशी नाळ जुळलेले असे लोक होते ज्यांना आजपर्यंत आम्ही इतिहासाच्या पुस्तकामध्येच वाचत आलो होतो. एवढ्या लोकांच्या वास्तव्यानं, प्रेमानं त्या वास्तूच्या भिंती कशा दणकट झाल्या होत्या. मुळात राष्ट्रीय शाळा ही कल्पनाच मला आवडली होती. किती दूरदृष्टीचा विचार होता तो. त्यांची उद्दिष्टं, त्यांचं ध्येय, त्यांचा अभ्यासक्रम या गोष्टी पाहिल्या की मनात आदरभाव तयार होतो. 

तिथल्या शिक्षकांशी आम्ही संवाद साधला. यादीतली सगळीच माणसं या राष्ट्रीय शाळेचा वारसा जपण्यास परिपूर्ण होती. तिथं असलेला जुना रंगमंच पालापाचोळ्यात गुरफटला होता, ते बघून खूपच वाईट वाटलं. शेवटी सगळ्यांशी मनासारख्या गप्पा झाल्यानंतर आणि पुरेसे फोटो काढून झाल्यानंतर आम्ही पुढच्या वाटेला  लागलो. आज आम्ही रात्री उरळ या गावात मुक्कामाला जाणार होतो. आजचा प्रवासपण आम्ही फक्त स्वतःला वाट्टेल तसा केला. काही जण पुढे तर काही जण मागे. मस्त गप्पा मारत, गाणी म्हणत आम्ही जात होतो आणि असेच संध्याकाळी पाचसहाच्या दरम्यान आम्ही तिथे पोहोचलोसुद्धा. तिथला आमचा मुक्काम असणार होता नेमाणे यांच्या कुटुंबात. रस्त्याच्या बाजूला त्यांचा प्रयोगांचा छोटासा कारखाना तिथे होता. कापूस ते कापड अशी संकल्पना घेऊन संपूर्ण आयुष्यभर त्यावर प्रयोग आणि अभ्यास चालू होता आणि अजूनही चालू आहे. त्यांची मुलंपण या प्रयोगात त्यांच्या मागोमाग उतरली आहेत. शेतकऱ्यानं कष्टानं उगवलेला कापूस विकून त्याला कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त फायदा कसा मिळवून देता येईल या एका गोष्टीच्या शोधासाठी नेमाणे आजोबांनी त्यांची उभी जिंदगी खर्च केली आहे. त्यांना हवा तसा रिझल्ट अजूनही त्यांच्या हाती लागलेला नाही पण तरीही त्यांचे प्रयत्न अजून थांबलेले नाहीत. रात्री त्यांच्या गावातल्या घरी जाऊन त्यांच्या सगळ्या घरच्यांसोबत आम्ही जेवण केलं. आग्रह आणि पाहुणचार नक्की कसा असतो याची प्रचिती आम्हाला तिथे आली. अगदी पोट फुटेस्तोवर आम्ही जेवलो. रात्री जेवणानंतर थोड्या गप्पा केल्या आणि मस्त रमतगमत, त्या शांत वातावरणातून चालत-चालत, टवाळक्या करत आम्ही आमच्या झोपायच्या ठिकाणी पोहोचलो. आज आम्हाला थंडीचा पहिला तडाखा बसला. एकमेकांच्या अंगावरची पांघरुणं ओढून घेत-घेत कशीबशी त्या रात्रीची आमची झोप झाली.


त्या दिवशी सकाळी कुणाला उठवत नव्हतं एवढी थंडी पसरली होती. आम्ही अगदी शहारत होतो. काही वेळानं जेव्हा तिथे शेकोटी पेटवली तेव्हा आम्ही कुठे माणसात आलो. बाजूलाच चुलीवर पाणी तापवलं, पटापट अंघोळी वगैरे करून घेतल्या. कालच्याप्रमाणेच आजही त्यांच्या गावातल्या घरात जाऊन आम्ही नाश्ता केला. आज दिवसा जाता-जाता घोषणा देत, लोकांशी बोलत-बोलत आम्ही प्रभातफेरी काढली. सगळं आटोपून जेव्हा आम्ही निघालो तेव्हा कुटुंबातले एक दादा आमच्यासोबत काही अंतरापर्यंत स्वतः सायकलनं आले. कुटुंबातल्यापण बाकीच्या सगळ्यांनी प्रेमपूर्वक आम्हाला निरोप दिला. नेमाणे आजोबांना सामाजिक चळवळीचा स्पर्श असल्यामुळे त्यांचं कुटुंबच तशा विचारांनी भारलेलं होतं त्यामुळे त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्यांशी बोलताना, त्यांच्या कामाविषयी जाणून घेताना कमालीची आपुलकी वाटायला लागली. आम्ही सगळ्यांनी अगदी भावुक मनानं त्यांचा निरोप घेतला. 

तिथून निघून आज आम्ही मुक्काम करणार होतो अकोलामधल्या केळीवेळी या गावात. अकोला हा आमचा चौथा जिल्हा होता. धुळे, जळगाव आणि बुलडाणा हे तीन जिल्हे पार करून आम्ही आज अकोल्यामध्ये पोहोचलो होतो. त्या दिवशीचं दुपारचं जेवण एका छोट्या गावातल्या एका नावीन्यपूर्ण उद्योजकाच्या घरी झालं. स्वतःची बुद्धिमत्ता आणि नावीन्य यांचा उपयोग करून शेतकऱ्यांच्या कामी येणारी वेगवेगळ्या प्रकारची साधनं तयार करण्याचा त्यांचा व्यवसाय होता. व्यवसाय कमीच आणि छंदच जास्त होता. इतक्या दिवसांच्या मेहनतीनंतर त्यांच्या व्यवसायाला उद्योगाची सर आली होती. त्यांच्याकडे मस्त जेवण करून, छोटीशी झोप काढून आम्ही निघालो केळीवेळी गावाला. केळीवेळीला पोहोचायला आम्हाला भलताच उशीर झाला पण तरी तिथल्या गावकऱ्यांनी आमचं स्वागत केलं. आमची राहण्याची व्यवस्था तिथल्या एका शाळेत करण्यात आली होती. शाळेच्या समोरच्या पटांगणावर मुलांची मस्त कबड्डी, कुस्ती चालू होती. एवढ्या दिवसांचा प्रवास असूनपण ते खेळ पाहून आमच्यातल्या काहींना आवरलं नाही. ते पण त्यांच्यात सामील झाले. गावातल्या काही मंडळींनी मिळून तिथेच शाळेच्या बाजूला मस्त स्वयंपाक केला होता. तेव्हा एक गोष्ट माझ्या चटकन लक्षात आली की, अशा वेळेला पुरुष स्वयंपाक वगैरे करायला स्वतःहून तयार होतात. हे माझं फक्त प्रवासातलंच नाही तर एकूणच जनरल निरीक्षण होतं की, एरवी कधी स्वयंपाकघरात चुकूनही पाय न ठेवणारे पुरुष मात्र अशा वेळेला पुरणपोळीही करायला बसतील आणि अजून एक गोष्ट म्हणजे अशा ठिकाणी स्त्रिया अजिबातच नसतात. जणू काही त्यांना यायला कुणी बंदीच घातलेली असते. या सगळ्यामागचं कोडं मला काही उलगडलेलं नाही. 

एवढं छोटंसं गाव असूनही आमच्या यात्रेच्या उद्दिष्टाविषयी त्यांना असलेली जाणीव, आमच्याविषयी असलेली काळजी त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होती. शेवटी रात्री सगळ्यांनी मिळून जेवण केलं आणि त्या छोट्याशा शाळेतल्या एका छोट्याशा खोलीत शांत झोपलो. आमच्या प्रवासाचा शेवट आता हळूहळू जवळ येत होता आणि त्या शेवटापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्याचा आमचा उत्साह वाढत होता.


सकाळचा नाश्ताही गावाच्या मंडळींनी शाळेच्या परिसरातच तयार केला. आम्हाला भेटायला गावची काही महत्त्वाची मंडळी आली होती. त्यांनी दिलेली माहिती ऐकून या गावाबद्दलची आमची उत्सुकता अजूनच वाढली. केळीवेळी हे एक ग्रामदानी गाव होतं. ग्रामदान या संकल्पनेबरोबर बाकीच्या ज्या काही गोष्टी सांगण्यात आल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी या गावात होत्या. गेली कित्येक वर्षं गावातून एकही केस कोर्टात गेली नव्हती. गावातले सगळे तंटे, भांडणं, मग ती कोणतीही असोत ती गावाच्या पातळीवरच सोडवण्याचा प्रयत्न असायचा. गावातली सगळी मंडळी मिळून दर काही दिवसांनी एकत्र यायची, वेगवेगळे कार्यक्रम व्हायचे. गावातले रस्ते, एकूणच सगळा परिसर सगळ्यांनी मिळून स्वच्छ ठेवण्यावर भर असायचा. गावचं राजकारणसुद्धा काही तत्त्वं पाळून व्हायचं. हे असं गाव आमच्या दृष्टीनं पहिलंच होतं. आजच्या समाजात अशा काही गोष्टी असणं ही नाही म्हटलं तरी कौतुकाची गोष्ट होती. स्वातंत्र्यानंतर भारतातली सगळीच गावं अशी करण्याचा आपला संकल्प होता. त्या संकल्पात पूर्णपणे अपयशी झालो आहोत असं दिसत असताना असं काहीतरी गाव बघायला मिळणं दिलासादायक ठरतं. 

गावातल्या मंडळींसोबत चर्चा झाल्यावर गावात आम्ही फेरफटका मारला. आत्तापर्यंत सगळ्यांना घोषणा देण्यात मजा यायला लागली होती. सगळे आपले जोरजोरात ओरडत घोषणा देत होते. त्या गावाची अजून एक विशेष बाब होती. स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा इंग्रजांच्या जाचामुळे लहानसहान चळवळी करणंपण जेव्हा कठीण होऊन बसलं होतं तेव्हा या गावानं त्यासाठी नवीन मार्ग शोधून काढला होता. दर सहा महिन्यांनी किंवा वर्षानं या गावात कबड्डीच्या स्पर्धा भरवल्या जायच्या. वेगवेगळ्या गावांतून लोक यायचे आणि तेव्हा स्वातंत्र्यसैनिकपण गावात दाखल व्हायचे. त्या माहोलात त्यांचे पुढचे कार्यक्रम ठरायचे आणि त्यानुसार कार्य घडायचं. कबड्डीच्या नावाखाली एवढं काहीतरी मोठं आणि भल्याचं कार्य करता येईल ही कल्पनाच केवढी भारी होती!  शेवटी दहाच्या सुमारास आम्ही त्या गावातून निघालो आणि पुढच्या वाटेला लागलो. 

आम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार होतो. त्या दिवशीची दुपार माझ्यासाठी खास आनंदाची होती. आम्ही दुपारचं जेवण केलं. पिंपळोद या गावी ज्यांच्याकडे आम्ही जेवण केलं ते माझ्या जुन्या ओळखीचे दादा होते. एवढ्या लांबच्या प्रवासात असा अचानक ओळखीचा माणूस बघितल्यावर मी फारच आंनंदून गेलो. दुपारी त्यांच्या जुन्या घरी मस्त जेवण केलं. मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि झोप काढली. हे गाव अतिशय लहान आहे पण या गावातल्या बऱ्याचशा लोकांनी शेतीच्या जोरावर विशेष प्रगती केली आहे. इथल्या गावातल्या लोकांचं दरडोई उत्पन्न हे बाकीच्या गावांपेक्षा बरंच जास्त आहे. सगळ्यांची थोडीशी झोप झाल्यावर आम्ही पुन्हा प्रावासला लागलो.

दर्यापूरला पोहोचायला आम्हाला बरीच रात्र झाली होती पण अशी रात्र वगैरे झाली ना की आम्हाला भलतीच ऊर्जा यायची आमच्या अंगात आणि आम्ही चेकाळलो की जोरजोरात सायकल चालवायला लागायचो आणि सोबत घोषणापण द्यायला लागयाचो. आजपण रात्री आठ वाजता तसंच झालं. दर्यापूर या छोट्याशा शहरात आम्ही दहा जण रात्री आठ वाजता मजा करत-करत रस्त्यावरून चाललो होतो. आजची आमची राहण्याची व्यवस्था गावातल्या एका मंदिरात करण्यात आली होती. मंदिरात असं झोपण्याचा हा माझा तरी पहिलाच अनुभव होता. आम्ही पोहोचलो तेव्हा तिथे हरिपाठ म्हणणं चालू होतं. ते बघून आम्ही सगळेच तो हरिपाठ टाळ्या वाजवत म्हणायला लागलो. आम्ही सुरुवात केलेली बघून तिकडच्या आजोबांनी आम्हाला चक्क पुस्तकं आणि टाळ आणून दिले. मग तर काय बघायलाच नको. मस्त मोठ्या आवाजात टाळांच्या गजरासोबत हरिपाठ म्हणायचा तो कार्यक्रम आम्ही उरकला. रात्री मंदिराच्या आवारात बसून सगळ्यांनी जेवण केलं. ज्यांनी आमची व्यवस्था केली होती त्यांनी स्वतःहून मस्तपैकी पुलाव तयार करून आणला होता.

आज दुपारी आम्ही ज्यांच्याकडे जेवण केलं होतं ते प्रशांतदादापण रात्री आले. बाकीचे सगळे झोपून गेले पण आम्हा तीनचार जणांची चांगली मैफल जमली. प्रशांतदादांना मी खूपच दिवसांनी भेटत होतो त्यामुळे आमचे बोलायचे विषय काही संपत नव्हते पण तरी कसेबसे थांबून आम्ही रात्री बाराएक वाजता झोपून गेलो. 

मंदिरात त्या मूर्तीच्या समोर झोपताना, मंदिराचा खरा हेतू लक्षात येत होता. प्रवाशाला किंवा दुर्लक्षितांना आसरा देणं या एकाच कामासाठी कितीतरी मंदिरं आजवर जगाच्या कानाकोपऱ्यात बांधली गेली आहेत. मंदिराचा तो हेतू आपण जर जपला असता तर आपल्या आजच्या समस्या खूपच वेगळ्या असल्या असत्या हे शभर टक्के खरं....


मंदिर असल्यामुळे आज सगळ्यांना आपणहूनच जाग आली. आमच्या अंघोळीबिंघोळीची व्यवस्था जवळच्याच एका घरात करण्यात आली होती. तिथे जाऊन आम्ही पटापट आवरून घेतलं. गावात एका लहानशा हॉटेलमध्ये नाश्ता केला आणि सरळ लवकरच पुढच्या प्रवासाला लागलो. आज आम्ही अमरावती या मुख्य शहरातून जाणार होतो आणि रात्रीचा मुक्काम अमरावतीजवळच्या एका लहानशा गावात होणार होता. 

इतके दिवस आमच्या प्रवासापासून दूर राहिलेल्या अडचणी आजच्या दिवसात आल्या. विनोददादांच्या सायकलची अवस्था त्या दिवशी अगदीच खराब झाली. सारखीसारखी चेन पडायची. चेनची नाटकं झाल्यावर ती चक्क तुटूनच पडली. अशा वेळी ना आपली समूह म्हणून असणारी एकी दिसून येते ना आपली  समयसूचकता कामी येते. आधी लगेच विनोददादांना वेगळी सायकल देऊन आम्ही त्यांना पुढे पाठवलं आणि त्या सायकलसोबत आम्ही चार जण मागे राहिलो. एकतर डोक्यावरचं ऊन आणि त्यात हा गोंधळ त्यामुळे डोकं फिरत होतं. ते शांत करण्यासाठी आम्ही एका लहानशा टपरीवर चहा प्यायलो. 

आता गरम चहानं डोकं शातं होतं ही गोष्ट खरी आहे पण एवढ्या त्या गरम चहानं डोकं शांत होण्यामागचं विज्ञान काही मला अजून समजलेलं नाहीये पण तरी चहाबिस्कीट खाऊन आमची टाळकी ठिकाणावर आली. परत सायकलपाशी आलो. सायकल पुढच्या मोठ्या गावापर्यंत नेण्याचे एकदोन मार्ग आम्हाला दिसत होते. एक की एखाद्या छोट्या टेम्पोमध्ये वगैरे टाकून सायकल न्यायची किंवा मग चालत-चालत न्यायची. दुसरा मार्ग वेडेपणाचा होता कारण गाव पुढे सातआठ किलोमीटरवर होतं त्यामुळे तिथे आम्ही टेम्पो वगैरे येण्याची वाट बघत बसलो. पण बराच वेळ झाला कोणताही टेम्पो काही येईना. ऊनपण वाढत होतं त्यामुळे सगळं काही सोडून देऊन आम्ही हातातून चालवत सायकल न्यायला लागलो. त्या सायकलवरची बॅग काढून ती दुसऱ्याच्या कॅरिअरला लावली आणि आम्ही निघालो. काही पावलं पुढे जातोय तेवढ्यात दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना आम्ही थांबवलं. मागे बसलेल्याच्या हातात कसलंतरी मशीन होतं. त्यांना आमचा प्रॉब्लेम सांगितला आणि त्यांनी एक कल्पना सुचवली. आमच्यापैकी एक त्या तुटलेल्या सायकलवर बसेल आणि त्या दुचाकीवरच्या मागच्या माणसाचा हात पकडेल आणि त्यांनी मग त्याला पुढच्या गावापर्यंत टो करत न्यावं असं आम्ही करणार होतो. 

एवढं सात किलोमीटर अशा प्रकारे जाणं म्हणजे मूर्खपणाचा कळस होता. त्यापेक्षा काही वेळ टेम्पो वगैरे चारचाकीची वाट बघणं शहाणपणाचं होतं पण अठरा वर्षांची पोरं आम्ही, ते टेम्पो वगैरेपेक्षा सायकल टो करत नेणंच आम्हाला जास्त रोमांचक वाटलं. आमचा एक मित्र सायकलवर बसला. सायकलचं जेवढं वजन कमी करता येईल तेवढं आम्ही कमी केलं आणि त्यांना पुढे पाठवलं. आम्ही मागे तिघंपण वेगात त्यांच्यासोबत निघालो. आम्ही सगळेच त्या गाडीसोबत निघालेल्या मित्राच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करत होतो पण गाडीच्या वेगाशी आमचं कुठे जमतंय त्यामुळे आम्ही मागे पडलो. शेवटी जमेल तसं वेगात जात-जात आम्ही सगळेच त्या दुकान असणाऱ्या गावात पोहोचलो. आमच्यातली अर्धी मंडळी आधीच तिथे पोहोचली होती. 

हे सगळे प्रकार करेपर्यंत दुपारचे तीन वाजले होते. आमची दुपारची जेवणाची जागा अजून चारपाच किलोमीटर लांब होती. त्या जागेवर जाईपर्यंत आमच्या सगळ्यांची वाट लागली होती. तिथे दुपारचं जेवण करून सगळे आडवे झाले पण वेळ घालवणं शहाणपणाचं नव्हतं. लगेच काही वेळातच आम्ही पुन्हा सायकलींवर स्वार झालो आणि निघालो अमरावतीला. 

अमरावती शहरातूनसुद्धा आम्ही मस्त फेरी काढली. यात्रेला निघाल्यानंतर अमरावती हे एकच ठिकाण होतं जिथे आम्हाला कोरोनाच्या अस्तित्वाची जाणीव झाली. शहरातली सगळी माणसं मास्क घालून कुतूहलानं आमच्याकडे बघत होती. त्यांच्यात असं मिरवत जायला मजा येत होती. आमचा मुक्काम अमरावती शहरापासून पाच किलोमीटरवरच्या गावात असणार होता. तिथे जायचा रस्ता मस्त हायवेचा आणि उताराचा होता. एकतर रात्र झालेली आणि दुसरं म्हणजे मस्त मोठा उतार मिळाला होता. ते बघून सगळे असे काही सुटले ना की, काही सीमाच नाही. त्या धुंदीमध्येच आमच्यात छोटासा अपघात झाला. दोनतीन सायकली एकमेकांवर आपटल्या. एक दोघं जण पडले पण जास्त काही झालं नाही. शेवटी रात्रीच्या आठनऊच्या सुमारास आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन एकदाचे पोहोचलो. तिथं आमच्या स्वागताला खूप सारी मंडळी आली होती. मुक्कामाच्या ठिकाणी एवढे लोक भेटायला येणं पहिल्यांदाच घडत होतं. आम्हाला बरं वाटलं. आमच्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा चालू होत्या पण मी तरी तेव्हा डुलक्या काढत होतो. रात्री चुलीवरच्या जेवणाचा आस्वाद सगळ्यांनी घेतला आणि अंथरूण घालून सगळे झोपी गेले.

- सृजन नीला हरिहर
srujanhw@gmail.com


वाचा 'सर्वोदय संवाद सायकल यात्रा' मालिकेतील इतर भाग - 

...आणि आमचा प्रवास सुरु झाला!

आम्हा तरुणांचा बंडाचा झेंडा...

अखेर बंड शमले आणि प्रवास सुरु झाला...

Tags: सर्वोदय संवाद सायकल यात्रा सृजन नीला हरिहर सायकल यात्रा लेखमाला भाग 4 Sarvodaya Samvad Cycle Yatra Srujan Neela Harihar Cycle Yatra Series Part 4 Load More Tags

Add Comment