अखेर बंड शमले आणि प्रवास सुरु झाला...

 सर्वोदय संवाद सायकल यात्रा - 3

सृजन नीला हरिहर या तरुणाच्या सायकल सफरीवरच्या अनुभवांवरचा दीर्घ लेख पाच भागांमध्ये कर्तव्य साधनावरून रोज क्रमशः प्रसिद्ध होत आहे . या  मालिकेतील पहिला भाग  इथे, तर  दूसरा भाग इथे वाचता येईल. त्यातील हा तिसरा भाग.

कालच्या सगळ्या गडबडगोंधळानं त्या दिवशी आम्ही जरा शांत होतो. आम्हाला काय कारायचं ते माहीत होतं. त्यामुळे आम्ही सगळे अगदी मोकळेपणानं वागत होतो. अपेक्षेप्रमाणे विनोददादांनी माझ्याशी बोलणं जवळपास बंद केलं होतं. आम्ही आज निघून रात्री मुक्कामाला जाणार होतो मुक्ताईनगरला. तो आमचा अर्धा टप्पा होता त्यामुळे एवढं पुढं आल्याचं समाधान आम्हाला मिळणार होतं. त्या दिवशी आम्ही खिरोद्यातल्या काही संस्था पाहिल्या. तिथलं फाईन आर्ट्‌सचं कॉलेज बघून मी तरी भांबावून गेलो. एवढ्या छोट्या गावात एवढं जुनं आणि एवढं सुंदर कॉलेज असण्यावर कुणाचा विश्वासच बसला नसता. तिथले सगळे पुतळे, तिकडची चित्रं, आकर्षक इमारती हे सगळं कलेचं विश्व पाहून आम्ही अगदी खूश होऊन गेलो. एवढ्या मोठ्या आणि प्राचीन संस्थेची माहिती आपल्याला आधी का नव्हती असंच आम्हाला वाटायला लागलं. ते संपूर्ण कॉलेज तिथल्या प्राचार्यांनी आम्हाला स्वतःहून फिरून दाखवलं. त्यांचा तो साधेपणा, आपुलकीचं बोलणं सगळेच लक्षपूर्वक ऐकत होते. शेवटी अजून आजूबाजूच्या काही जुन्या संस्था बघून, तिथल्या काही महत्त्वाच्या व्यक्तींना भेटून आम्ही पुढे निघालो. 

आज सायकल चालवताना एक वेगळाच मोकळेपणा आमच्यात जाणवत होता. बंड कसं उघडउघड चालू होतं. मुद्दामून मागे राहणं, घोषणा देणं, गाणी म्हणणं, जे जे कारायला विनोददादांनी मनाई केली होती ते आम्ही करत होतो. आज मुक्ताईनगरमधून आमच्यात अजून तीन जण सामील होणार होते. त्यांच्याशी कसं वागायचं, त्यांना आपल्यात कसं सामावून घ्यायचं याचीपण चर्चा अधूनमधून चालू होती. खिरोद्यातल्या लोकांनी दुसऱ्या दिवशीपण आमच्या जेवणासाठी भाकरी आणि त्यासोबत काहीतरी गाठोड्यात बांधून दिलं होतं. ते दुपारी एका झाडाखाली, धरणाजवळ बसून आम्ही खाल्लं आणि संध्याकाळी पाचसहाच्या सुमारास आम्ही मुक्ताईनगरला पोहोचलो. मुक्ताईनगर हेही एक छोटंसं, साधं गाव होतं. तिथल्या एका भल्या मोठ्या मंदिरात आमची सोय करण्यात आली होती. त्या गावातल्या काही शिक्षक मंडळींनी आमची सोय केली होती. ती सगळी मंडळी तिथे हजर होती. गेल्या-गेल्या त्यांच्याशी बोलणं झालं. आमच्यासोबत जी तिघं जण येणार होती त्यांच्याशीपण बोलणं झालं. रात्री जेवताना आम्ही मुलांनी मिळून त्यांना आमच्यामध्ये चालू असलेल्या वादाविषयी सांगितलं. ते तिघंही आमच्यापेक्षा मोठे होते त्यामुळे आमच्या सांगण्यापेक्षा स्वतःच्या अनुभवावरूनच मतं तयार करण्याचं त्यांनी ठरवलं. उद्याचा दिवस कसा असेल याचाच विचार करत त्या दिवशी रात्री सगळे झोपले.

...आणि माझ्या अपेक्षेप्रमाणे दुसरा दिवस जरा जास्तच महत्त्वाचा ठरला.


आज आम्ही मुक्ताईनगरमधून निघून पुढच्या गावी जाणार होतो. पण आजच्या दिवसाची सुरुवातच नाट्यमय झाली. एकतर मला अंघोळीचं विशेष प्रेम नाही म्हणजे गरज नसताना उगाच दरदिवशी अंघोळ करावी म्हणून मी करत नाही म्हणजे हे त्या काळात होतं हा! त्यामुळे यात्रेतही असं व्हायचं. जर कुठे अगदीच सकाळी उठून थंड पाण्यानं अंघोळ करायची असेल तर मी करायचो नाही. आणि मला त्याचं अजिबात वाईट वाटलं नाही. त्या दिवशीही तसंच काहीतरी झालं. विनोददादांनी सगळ्यांना आंघोळ करायला सांगितली. सकाळचे सहा वगैरे वाजले असतील, तेवढ्या सकाळी खरंतर कुणालाच अंघोळ कारायची इच्छा नव्हती. त्यामुळे आम्ही सगळे टाळाटाळ करत होतो. त्या हौदाच्या ठिकाणी असंच टाइमपास करत असताना विनोददादा आले आणि आमच्यावर भडकले. आमच्यापैकी एकाच्या अंगावर त्यांनी भदाभद पाणी ओतलं आणि अंघोळ कारायला लावली. मला काही ते पटेना. मी करणारच नाही यावर अडून बसलो आणि त्या वेळेला त्यांच्या मनात होता नव्हता तेवढा राग शब्दांतून निघाला. त्याबद्दल मी इथे बोलणार नाही. पण त्यामुळे झालं असं की, माझा इगोपण माझ्या आड यायला लागला आणि बाकीच्यांनी साथ देवो किंवा न देवो... मी या यात्रेत पुढे जाणार नाही असं मनाशी पक्कं केलं. सगळ्यांसमोर आमचं हे बोलणं झालं. मी यापुढे येणार नाही एवढं सांगून मुक्ताईनगरच्या त्या मंदिरात मी माझं सामान आवरायला लागलो होतो. माझ्या सोबतच्या मित्रांना हे कळेना की, त्यांनी काय करावं? आदल्या दिवशी आलेल्या तिघांना हे सगळं बघूनपण तसाच प्रश्न पडलेला होता.  

शेवटी बऱ्याच वेळानंतर माझी काही फोनाफोनी झाली... आई, बाबा, सर्वोदयातल्या काही परिचित व्यक्ती. तेव्हा मला एकांनी सांगितलेला मुद्दा अगदी पटला आणि त्यामुळे मी माझा निर्णय बदलला. त्यांचं म्हणणं असं होतं की, ही यात्रा ‘सर्वोदय संवाद सायकल यात्रा’ म्हणून निघालेली होती. ही यात्रा कुणाची वैयक्तिक नव्हती, ती सर्वोदयाची होती. आम्ही जिथे कुठे जात असू तिथे आम्ही सर्वोदयी म्हणून जात होतो. त्यामुळे अशा प्रकारे एवढ्या झालेल्या प्रवासातून बाहेर पडणं योग्य ठरणारं नव्हतं. त्या एका मुद्द्यामुळे माझा तो यात्रा सोडून जाण्याचा निर्णय बदलला आणि आम्ही पुन्हा सगळे मिळून पुढच्या प्रवासाला लागलो. आज आम्ही तिथून निघून तालखेडा या अगदी लहानशा गावात मुक्कामाला जाणार होतो. त्या गावात आदल्या दिवशी आमच्यात सामील झालेल्या मित्राच्याच घरी आम्ही राहणार होतो. 

दुपारी जेवणासाठी आम्ही एका अतिशय पुरातन मंदिराच्या परिसरात गेलो. तेराव्या शतकातलं ते मंदिर असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं. ती वास्तू, तिची रचना, तिच्यावरचं कोरीव काम, तिची बांधणी, सारंच फारच मोहक होतं. त्या काळी फक्त आणि फक्त हाताच्या ताकदीच्या आणि कल्पनेच्या जोरावर तयार केलेल्या या कलाकृतीकडे बघून डोळे विस्फारले जातात. त्या मंदिराच्याच बाजूला एक तळं होतं. तळ्याच्या काठाला काही माणसं बसून मासे पकडायचा प्रयत्न करत होती. पकडलेल्या माशांना तिथेच भाजून खाणं चालू होतं. त्या परिसरातून आम्हाला बाहेर पडावंसंच वाटत नव्हतं. पण निघालो नसतो तर मुक्कामाला पोहोचायला रात्र झाली असती. त्यामुळे इच्छा नसतानापण आम्ही तिथून निघालो. 

थोडं अंतर पुढे आल्यावर आम्हाला कसली नशा चढली काय माहीत... आम्ही चौघं जण उगाचच वेगात सुटलो. तिथून जे आम्ही निघालो ते थेट मुक्कामाच्या ठिकाणीच जाऊन थांबलो. त्या दिवशी सायकल चालवताना आमच्यातली खरी ऊर्जा बाहेर पडत होती. चौघंही जण अगदी तुफान चाललो होतो. आपण एका समूहाने निघालोय, सगळ्यांनी सोबत जायला हवं, मागून येणाऱ्या साथीदारांसाठी थांबायला हवं याचा काहीच विचार आमच्या मनात नव्हता, आम्ही फक्त सायकल चालवत होतो, बाकी काही नाही. रस्त्यात दिसेल त्याला गाव किती लांब आहे ते विचारत होतो. शेवटी सगळ्यांपेक्षा पंधरावीस मिनटं आधी आम्ही पोहोचलो. आज ज्यांच्या घरी आमचा मुक्काम होता ते आमच्या मित्राचंच कुटुंब होतं. त्याचे भाऊ, आईवडील यांच्यासोबतच गावातली काही जाणकार मंडळी या सगळ्यांनी आमचं अगदी थाटात स्वागत केलं. आम्हा सगळ्यांना गीताईची पुस्तकं दिली. त्यांची आपुलकी आणि त्यांचं प्रेम बघून सगळ्यांना आपापल्या घराची आठवण झालीच. हे गाव अगदी भारतातल्या खेड्यांचं प्रतीक होतं... सगळ्यांची आपापली स्वतंत्र घरं, घरासोबतच बाजूला असलेली शेती, शेतीसोबतच जोडधंदा म्हणून असलेला गोठा. अगदी साजेसं खेडं होतं ते. रात्री मित्राच्या मळ्यावर सगळ्यांनी भरपेट जेवण केलं. 'दाल गंडोरी'चा खास बेत केला होता. विदर्भात हा खास मेजवानीचा प्रकार म्हणूनच केला जातो. सकाळपासूनच्या गडबडीनं रिकामी झालेली पोटं अगदी कशी भरून गेली. 

अंधाराच्या कुशीमध्ये वेढून गेलेल्या त्या रात्री आकाशातले तारे लखलख चमकत होते. खरंच अशा वेळेला दिवसापेक्षा रात्रच खूप जवळची वाटते, प्रेमाची वाटते. ही अशी शांत रात्र, हे निर्मळ वातावरण आपल्या शहरी लोकांच्या वाट्याला तरी कधी येणार!


दुसऱ्या दिवशीची सकाळ माझ्या खास लक्षात राहिली, कारण कळत्या वयात आल्यापासून मी पहिल्यांदाच त्या दिवशी उघड्यावर शौचाला गेलो. आता ही गोष्ट काही सांगण्यासारखी नाही पण मला तेव्हा त्या गोष्टीचं आश्चर्यच वाटलं होतं. 2020 मध्येही लोकांना उघड्यावर शौचाला जावं लागतंच कसं? आणि यापुढे अजून काही ठिकाणी आम्हाला हा अनुभव घ्यावा लागला. ग्रामीण जीवनाबद्दल कितीही कौतुक असलं तरी ही गोष्ट काहीशी लाजीरवाणीच वाटत होती. एवढी समज आलेला माणूस, अजूनही एवढा मागे का राहतोय याचं उत्तर आपणाला कधी मिळणार आहे? मला तरी वाटायचं की, या गोष्टी आता फारच कमी प्रमाणात उरल्या आहेत. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात तरी उघड्यावर शौचाला जाणं, उघड्यावर अंघोळ करणं या गोष्टी संपुष्टात आल्या असतील अशी अनेकांप्रमाणे माझीपण कल्पना होती पण वस्तुस्थिती वेगळी होती. या यात्रेतून मला जर हा अनुभव आला नसता तर अजूनही कित्येक दिवस त्याच कल्पनेच्या विश्वात मी राहिलो असतो. खरंतर या एवढ्या प्राथमिक समस्यांसोबत ही लढायची वेळ नाहीच, ती फार पूर्वीच येऊन गेली पण अजूनही ती लढाई आपण जिंकू शकलेलो नाही. 

सकाळची न्याहारी वगैरे आटोपून आम्ही मित्राच्या शेतातून मस्त फेरी काढली. हे एकूणच प्रयोगशील कुटुंब होतं. त्यांच्या जागेत त्यांच्या शेतीबद्दल, पिकांबद्दल, खतांबद्दल वेगवेगळे प्रयोग चालले होते. त्यांची माहिती घेतली. सगळं आटोपून आम्ही निघणार एवढ्यात छोट्याशा चर्चेला सुरुवात झाली. आमच्या सगळ्या यात्रेकरूंमध्ये तयार झालेल्या मतभेदांविषयी चर्चा झाली. एकूणच यात्रेच्या भवितव्यासाठी हे कसं चुकीचं आहे याची समजूत मंगेशदादांनी आम्हाला पटवून दिली. त्या वेळेला मला ते पटत होतं पण सर्वांसमोर ते मान्य करून त्यानुसार वागणं काही मला जमणारं नव्हतं. माझ्या तारुण्याच्या इगोला ते पटणारं नव्हतं. त्यामुळे तेव्हा मी फक्त ऐकून घेतलं. पण तिथे त्यांनी घडवून आणलेल्या संवादामुळे वातावरण पुन्हा कसं फ्रेश झालं. मित्राच्या त्या सगळ्याच कुटुंबानं अगदी लहानसहान गोष्टींमधून दाखवलेल्या त्या मायेमुळे त्यांच्याशी एक वेगळंच नातं तयार झालं. 

आज दुपारी आम्ही जळगाव जामोद या गावात नाश्ता करून रात्री मुक्कामाला एका आगळ्यावेगळ्या ठिकाणी जाणार होतो. आजचा प्रवास आम्हाला फारच लक्षात राहणारा होता. आज दिवसभर आम्ही नुसते डोंगरांतून फिरत होतो आणि अक्षरशः खऱ्याखुऱ्या डोंगरांमधून. आजचं आमचं हे दुपारचं जेवण महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन्ही राज्यांच्या सीमेजवळ असणाऱ्या गावामध्ये होणार होतं. म्हणजे बऱ्हाणपूर तिथून पन्नास किलोमीटर लांब होतं. त्यामुळे आम्ही मध्य प्रदेशच्या किती जवळ होतो याचा अंदाज तुम्हीच लावा. चांगलं तास-दोन तास अगदी कडक उन्हातून, तेही अतिशय चढावाच्या रस्त्यावरून चाललो होतो. सगळे येऊन-जाऊन त्या रस्त्याला शिव्या घालत होतो. त्यानं तसा काही फरक पडत नव्हता पण एनर्जी मात्र बरीच मिळत असे. डोंगराच्या वर आम्ही चढून आलो आणि सुसाट त्या डोंगराच्या दुसऱ्या बाजूला उतरायला लागलो. अगदी ॲडव्हेन्चर ड्राइव्ह चालू होती आमची. अतिशय लहान वाटा, त्यात चिखल, आडवीतिडवी झाडं. इतक्या दिवसांच्या नुसत्या सपाट रस्त्याच्या प्रवासात हा असा रस्ता म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच होती. डोंगराच्या पायथ्याशी मग आम्ही एका ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या घरी जेवण केलं. त्यांच्या त्या लहानशा घरासमोरच मस्त भाज्यांचा मळा होता. जेवणानंतर थोडासा आराम केला आणि पुन्हा प्रवासाला निघालो. पुन्हा काही वेळ डोंगरातून, वेलींना आपटत-आपटत प्रवास केला आणि शेवटी पुन्हा एकदा सपाट रस्त्याला लागलो आणि निघालो ‘सालईबन’ला. 

सालईबनला पोहोचताना आमचा पूर्ण दम निघून गेला होता. सातपुडा पर्वतात असलेल्या या जागेनं तिथे पोहोचेपर्यंत नाकी नऊ आणले होते. एवढ्या डोंगराळ परिसरातला हा पहिलाच प्रवास होता. काळोख पडायच्या अगदी काहीच मिनटं आधी आम्ही तिथे पोहोचलो आणि एकदाचा शांतीनं श्वास घेतला.  

माणसानं कितीही प्रयत्न केला तरी निसर्ग त्याचा खमकेपणा सोडत नाहीच पण तरी त्या निसर्गाच्या खमकेपणाच्या सोबतीनं राहणारी, वाढणारी काही माणसं आपल्या समाजात असतात, ही माणसं आपल्या नजरेतून सुटलेली असतात पण जेव्हा ती नजरेत येतात त्यानंतर ती काही मनातून जाऊ शकत नाहीत. सलाईबन ही अशाच माणसांची जागा होती.


सालईबन ही एक संस्था आहे. काही वर्षांपूर्वी मैलोन्‌मैल उजाड असलेली ही सातपुड्यातली जमीन ‘सालईबन’च्या कार्यकर्त्यांनी, स्वयंसेवकांनी आज हिरवीगार करून टाकली आहे. कित्तीतरी झाडं लावली आणि पुढे जाऊन ती जगवली. तिथे वास्तव्याला असणारे मंजित सिंग यांनी आयुष्याचा ध्यास असल्याप्रमाणे या कार्यासाठी कष्ट घेतले आहेत. या कामातून त्यांची ओळख झाली ती तिथल्या आदिवासींशी.

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला एकत्र घेऊन सालईबनचा काही महत्त्वाचा भाग फिरवून आणला. तिथल्या विशेष झाडांची माहिती दिली. ‘सालई’चं बन ते ‘सालई बन’. सलाई नावाचं एक औषधी झाड तिथे मोठ्या प्रमाणावर होतं पण काही काळानं नष्ट झालं किंवा नष्ट करण्यात आलं... पण सालईबनच्या कार्यकर्त्यांनी त्या झाडांना पुन्हा तिथे लावून त्यांना वाढवलं आहे. अगदी काहीच वर्षांपूर्वी उजाड असलेला सातपुड्याचा तो भाग आज हिरवाईनं फुलून गेला आहे. त्यांच्या प्रकल्पांची थोडी माहिती घेतल्यानंतर तिथल्या जवळच्याच एका आदिवासी पाड्याला आम्ही भेट दिली. लहान घरं, शेणानं सारवलेली जमीन, कोंबड्या, गायी, शेळ्या अशा सगळ्या गोष्टींसहित एका लहानशा ओढ्याला लागून असलेली ती वस्ती पाहिली की मनात वेगवेगळे विचार येतात. त्यांचं राहणीमान, त्यांची बोली या कशाची काडीमात्र माहिती नसतानाही त्यांच्याविषयी, त्यांच्या राहण्याविषयी कौतुक वाटून जातं. त्यातल्या लहान मुलाशी काही वेळ खेळलो, नेहमीप्रमाणे फोटो काढले आणि नाश्ता वगैरे करून तिथून निघालो. त्या दिवशीचा तो मुक्काम सगळ्यांच्या मनात अगदी घट्ट बसला. आज तिथून निघून रात्रीचा मुक्काम खामगावच्या राष्ट्रीय शाळेत करणार होतो. कालच्यासारखंच आजपण काही वेळ त्या डोंगरामधून सायकल फिरवायला मजा आली. पण मागच्या वेळेसारखेच आजपण आम्ही पाच जण कुठेतरी मागे राहिलो. लोकांना विचारपूस करत-करत एका मुख्य रस्त्याला लागलो आणि पुन्हा सुटलो.  

आज विनोददादांच्या मनात काय आलेलं काय माहिती, त्यांनी आज आमच्यामध्ये दोन गट केले आणि एकानं पुढे जायचं आणि दुसऱ्यानं मागून यायचं अशी उगाचच रचना केली. असं काही झालं ना की, माझा जाम हिरमोड होतो त्यामुळे उगाचच गरज नसताना आमच्यात गट पडले. शेवटी त्या रागानं मी आणि माझा मित्र दोघंच जोरजोरात सायकल चालवत निघालो. संपूर्ण यात्रेतला माझ्यासाठीचा हा सगळ्यात वाईट दिवस होता. कुणीच कुणाच्या साथीनं जात नव्हतं. दोघं दोघं मिळून सगळे चालले होते. कुणी कुणाचं ना ऐकत होतं ना कुणाशी बोलत होतं. असा एकट्या-एकट्यानं दिवसभराचा प्रवास करून शेवटी आम्ही खामगावच्या शाळेत पोहोचलो. शाळेपाशी पोहोचेपर्यंत या सगळ्या बेशिस्तीमुळे सगळ्यांचाच राग अगदी प्रमाणाबाहेर गेला होता. पाच वाजता पोहोचायचं ठरलेलं. ते आम्ही साडेसात आठ वाजता पोहोचलो पण त्या खामगावच्या शाळेच्या आवारात प्रवेश केल्यावर मात्र सगळ्यांची मनं शांत झाली. तिथल्या सगळ्या सदस्यांनी प्रेमानं आमचं स्वागत केलं. स्वतःहून मस्त जोरजोरात घोषणा दिल्या, त्यामुळे हिरमुसलेली मनं कशी पुन्हा फ्रेश होऊन गेली. तिथल्या लोकांशी बोलून आम्ही सगळे पुन्हा एकदम टवटवीत झालो. रात्री त्यांच्या आवारात सगळ्यांनी मिळून जेवण केलं पण आज झोपायच्या आधी सगळ्यांनी ठरवून टाकलं की, उद्यापासून यांनी काहीही सांगितलं तरी हे असलं ग्रुप वगैरे अजिबात करायचे नाहीत. आपण आपलं सगळ्यांनी मिळून जायचं.

खामगावच्या त्या ऐतिहासिक राष्ट्रीय शाळेत एक रात्र राहणं ही काही साधी गोष्ट नव्हती. त्या शाळेच्या कितीतरी विद्यार्थ्यांनी घडवलेल्या इतिहासामुळे या वर्तमानामध्ये आपल्याला जगायला मिळतं आहे ही भावना सतत मनात येत होती. देशाच्या भल्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावणारी माणसं ज्या शाळेनं दिली त्या शाळेच्या वास्तूमध्ये आम्ही निवास करणार होतो. याहून वेगळं अजून काय हवं होतं?

- सृजन नीला हरिहर
srujanhw@gmail.com


वाचा 'सर्वोदय संवाद सायकल यात्रा' मालिकेतील इतर भाग - 

...आणि आमचा प्रवास सुरु झाला!

आम्हा तरुणांचा बंडाचा झेंडा...

Tags: सर्वोदय संवाद सायकल यात्रा सृजन नीला हरिहर सायकल यात्रा लेखमाला भाग 3 Sarvodaya Samvad Cycle Yatra Srujan Neela Harihar Cycle Yatra Series Part 3 Load More Tags

Add Comment