सृजन नीला हरिहर या तरुणाच्या सायकल सफरीवरच्या अनुभवांवरचा दीर्घ लेख पाच भागांमध्ये कर्तव्य साधनावरून रोज क्रमशः प्रसिद्ध होत आहे . या मालिकेतील पहिला भाग इथे वाचता येईल. त्यातील हा दूसरा भाग.
आमची यात्रा जशीजशी पुढे जात होती, तशी आमची नातीपण बदलत जात होती. मी या सगळ्या प्रवासाला फक्त मज्जा करायला आणि साधा, सोपा, सरळ असा अनुभव घ्यायला आलो होतो. पण विनोददादांनी या यात्रेचं नियोजन करताना काही गोष्टी ठरवल्या होत्या. खरंतर हे मी आधीच सांगायला हवं होतं. विनोददादांनी या यात्रेला ‘सर्वोदय संवाद सायकल यात्रा’ असं नाव दिलं होतं आणि विनोबांचा विचारप्रसार करणं, साहित्याचा प्रसार करणं अशा काहीशा उद्देशानं ते या यात्रेला निघाले होते. त्यामुळे या यात्रेला काहीशी शिस्त अपेक्षित होती. पण मला मात्र मनसोक्त उंडारायचं होतं, अगदी बेलगामपणे. विनोददादांनी ठरवलेल्या साच्याविषयी, निवडलेल्या विषयाविषयी मला आस्था नव्हती असं नाही. पण मला आता त्या वैचारिक भावनेतून फिरण्याची अजिबात इच्छा होत नव्हती... त्यामुळं हळूहळू आमच्यातल्या शीतयुद्धाला सुरुवात झाली... ज्यात साहजिकच यात्रेतले सर्वच जण ओढले गेले.
आमचा कालचा मुक्काम होता एरंडोल या गावी आणि आज आम्ही निघालो होतो जळगाव शहरात. जळगावला मुक्काम असला तरी आम्ही दुपारचं जेवण ‘पद्मालय’ इथं करणार होतो. पद्मालय इथं गणपतीचं एक अगदी पुरातन मंदिर आहे. शिवाय अजून एक प्रसिद्ध जागाही तिथं आहे. असं मानलं जातं की, त्या जागेत बकासुराच्या पायाचा ठसा आहे. म्हणजे जेव्हा भीमाचं आणि बकासुराचं युद्धं झालं होतं तेव्हा बकासुराचा एक पाय त्या जागेत पडला होता आणि त्याच्या पायाच्या आकाराचं एक लहानसं तळंच तिथे तयार झालं होतं. अनेक दंतकथांसारख्या या कथेलाही काही अर्थ नव्हता. त्या जागी पायाच्या आकराचा साचा होता हे मात्र खरं! त्यात थंडगार पाणीही होतं. पूर्णपणे रमून जावं असंच स्थळ होतं ते. उन्हानं जर आम्हाला वेळेची जाणीव करून दिली नसती तर आम्ही तिथून हललोच नसतो. तिथून वर आलो, जेवण वगैरे केलं आणि जळगावच्या मार्गाला लागलो.
आज आम्हाला पहिल्यांदाच एक छोटासा घाट लागला होता. एवढ्या दिवसांनी एवढा मोठा उतार आल्यावर आम्ही सगळे अगदी चेकाळूनच गेलो. अध्येमध्ये, आजूबाजूला कोण येतंय हे काहीही न पाहता आम्ही सुसाट सायकली सोडल्या. अगदी मजा आली.. आज आणि उद्या असा दोन दिवस आमचा मुकाम जळगावच्या ‘जैन इरिगेशन’ला असणार होता. आमच्या संपूर्ण सायकल यात्रेमधलं सगळ्यांना सर्वात जास्त (राहण्याच्या दृष्टीनं) आवडलेलं ठिकाण कोणतं असेल तर ते हे होतं. अगदी टू-थ्री स्टार हॉटेलसारखी व्यवस्था तिथे होती. ते पाहून सगळे हुरळूनच गेले. तिथे पोहोचल्या-पोहोचल्या तिथल्या प्रसिद्ध गांधी तीर्थला आम्ही भेट दिली. तिथे आम्ही प्रार्थनाही केली.
हे सगळं पाहून पहिल्यांदा कळलं की, आपल्या देशात आणि जगात गांधींच्या विचारांवर चालणारा एक श्रीमंतवर्गही अस्तित्वात आहे. त्या श्रीमंतीमुळे म्हणा किंवा तिथल्या उच्चभ्रूपणामुळे ही जागा माझ्यातरी मनाला विशेष भावली नाही. ते सगळं पाहताना, त्या वातानुकूलित भव्य इमारतीमध्ये बसून चरख्यावर सूत कातल्यामुळे गांधींच्या विचारांचं आचरण आणि प्रसार खरंच शक्य आहे का? असा प्रश्न चटकन मनात येऊन गेला...
पूर्ण यात्रेदरम्यान एकाच ठिकाणी दोन दिवस मुक्काम असणारी ही एकमेव जागा. आज आम्ही सगळे मिळून ‘जैन इरिगेशन’च्या परिसरात फिरणार होतो. जैन इरिगेशन हे औद्योगिक क्षेत्रामधलं मोठं नाव आहे. आपल्या घरात, दैनंदिन जीवनात ज्या-ज्या गोष्टी आपण वापरतो त्या आपल्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी त्यावर बरीच प्रक्रिया झालेली असते. मग ती आपल्या घरात येणारी साधी फळं असोत किंवा त्यांच्यापासून तयार होऊन येणारा जाम असो किंवा साधी शीतपेयं असोत... जैन इरिगेशनमध्ये यासंबंधित मोठं काम चालतं. कितीतरी एकर परिसरात पसरलेल्या या इंडस्ट्रीमध्ये अनेक प्रकारचे मोठमोठे कारखाने आहेत. यांपैकी काही कारखाने आम्हाला फिरून दाखवण्यात आले. त्यांतल्या यंत्रणा, काम करत असलेले कामगार, कारखान्यामधून बाहेर पडणारी उत्पादनं, त्यांचा होणारा साठा, पुढे होणारी वाहतूक या सगळ्याच गोष्टींची माहिती आम्ही घेतली.
या संपूर्ण परिसरात या कामासोबतच संशोधनाचं कामपण विशेषकरून चालतं. शेतीतल्या विविध पिकांसाठी नवनवीन पद्धती असोत किंवा शेतीच्या कामात लागणारी नवनवीन अवजारं तयार करणं असो... शेतीशी निगडित जवळपास सगळ्याच गोष्टींमध्ये नावीन्य आणण्याचे प्रयत्न इथे चालू असलेले दिसतात. एवढंच नव्हे तर शेतीला मातीवर किंवा फक्त जमिनीवर अवलंबून न ठेवता तिला अजून कोणत्या घटकांशी संलग्न करता येईल का याबद्दलचं आश्चर्यकारक संशोधन चालू असलेलं इथे दिसून येतं. मातीविना, पाण्याविना खरंच शेती शक्य आहे का याबद्दल इथे चाललेले प्रयोग पाहणं खरंच रोमांचकारी आहे.
या सगळ्या प्रयोगविश्वाची फेरी मारून झाल्यानंतर आम्ही पुन्हा गांधीतीर्थाला भेट दिली. गांधींच्या संपूर्ण आयुष्याचा लेखाजोगा इथे मांडण्यात आलेला आहे. वेगवेगळी शिल्पं, जुनेपुराणे संदर्भ असलेली वृत्तपत्रं अशा एक ना अनेक गोष्टींच्या माध्यमातून गांधींचा प्रवास उलगडत गेला. सोबतीला प्रत्येक शिल्पाची, घटनेची माहिती आपल्याला ऑडिओच्या माध्यमातून मिळण्याची खास व्यवस्था इथे केलेली आहे. एवढं सगळं बघून, आश्चर्य आणि समाधानाचे चेहरे घेऊन आम्ही बाहेर पडलो.
एकीकडे आपण शेतीच्या क्षेत्रात एवढं काही नवीन काहीतरी करायच्या प्रयत्नात आहोत तर दुसरीकडे शेती करायलाच कुणाची तयारी नाहीये. आमच्यासोबत असणारी सगळीच मुलं ही शेतकरी कुटुंबांमधली होती. जमीन कसताना, पिकं फुलवताना येणाऱ्या संकटांची आणि प्रश्नांची जाणीव त्यांना होती पण त्यावर इथे दाखवण्यात आलेली उत्तरं खरंच सामान्यांच्या शेतीची समस्या कितपत संपवू शकतील याबद्दल सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह स्पष्ट दिसत होतं. कारण नुसत्या जमिनीच्या समस्यांवर तोडगा काही उपयोगाचा नाही, तोडग्याची गरज आहे ती जमीन कसणाऱ्या व्यक्तीच्या समस्यांवर...
आज सकाळी आम्ही ‘जैन इरिगेशन’मधून निघून रात्री मुक्कामाला भुसावळला जाणार होतो आणि दरम्यान जळगाव शहरातल्या काही मान्यवरांना भेटणार होतो. भुसावळ हे तिथून तेवढं लांब नव्हतं त्यामुळे आम्ही खूपच रमतगमत जात होतो. जळगाव शहरात शिरताच आमची भेट शंभू पाटील यांच्याशी झाली. जैन इरिगेशनमधली आमची राहण्याची व्यवस्था यांनीच केली होती. त्यांच्याशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी थोडी चर्चा करून मग आम्ही पुढे निघालो.
आमचा आजचा सगळा प्रवास हा महामार्गावरून असणार होता. त्यामुळे काहीशा शिस्तीनं, एका ओळीत आम्ही जात होतो. तेव्हा मला एक गोष्ट जाणवली की, अशी काही शिस्त, किंवा ‘हे असं असच करा‘ असं जेव्हा तरुणांना सांगितलं जातं ना, तेव्हा त्यांच्याकडून ते पूर्ण इच्छेनं होत नाही. माझ्या वयात आलेल्या कुणालाच आदेश ऐकणं, बंधन पाळणं आवडत नाही त्यामुळेच असेल बहुधा... आम्ही सगळे जरा विनोददादांच्या वर्तणुकीवर नाराज झालो. पुढे ती नाराजी खूपच वाढली. कुणी एखादी गोष्ट पुन:पुन्हा अधिकाराच्या सुरात जर सांगायला लागलं तर मग त्याच्या विरोधात बंड आपसूक उभं राहतं पण आज जेव्हा मी या सगळ्याचा वेगळ्या बाजूनं विचार करतो तेव्हा लक्षात येतं की, विनोददादांचं वागणं त्यांच्या दृष्टीनं काही चुकीचं नव्हतं. आमच्या सगळ्या मुलांची जबाबदारी त्यांच्यावर होती, सगळ्यांच्या घरच्यांनी त्यांच्या विश्वासावर सगळ्या मुलांना पाठवलं होतं. त्यामुळे त्यांना अपेक्षित असलेली शिस्त त्यांच्या दृष्टीनं योग्य आणि गरजेची होती. पण आम्हाला मात्र त्या शिस्तीचा कंटाळा यायला लागला आणि आम्ही त्याविरोधात बंड करायला लागलो.
आम्ही निघालो होतो तिथून भुसावळ फक्त चाळीस किलोमीटरवर होतं. त्यामुळे संध्याकाळी चार-पाचच्या दरम्यान आम्ही तिथं पोहोचलोही. भुसावळमध्ये आमच्या स्वागताला अनेक कार्यकर्ती मंडळी आली होती. माझी कौटुंबिक पार्श्वभूमीही अशीच असल्यामुळे त्या सगळ्यांना भेटून एक वेगळाच आनंद झाला... समाधान वाटलं. गावातून घोषणा देत देत आम्ही शैलाताईंच्या घरी पोहोचलो. शैलाताई चळवळीमधल्या जुन्या कार्यकर्त्या असल्यामुळे त्यांच्या घरचं वातावरण साहजिकच आम्हाला आवडून गेलं. त्यांच्यासोबतच तिथे भुसावळमधली अनेक कार्यकर्ते मंडळी जमली होती. त्यांच्या सोबतीनं आम्ही सगळ्यांनी चळवळीची मस्त गाणी म्हटली. चळवळीच्या गाण्यांचा सूर एकदा पकडला की तो सोडावासाच वाटत नाही.
आज खऱ्या अर्थानं आम्हा सगळ्या मुलांना विदर्भाचा दणका बसला. रात्रीचं जेवण आम्हा मुलांना एवढं तिखट लागलं ना की, काही विचारू नका! आणि तिखट असलं तरी ते एवढं चविष्ट होतं की, ते तसंच टाकून कुणालाच उठवेना पण तिखटानं सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी आणलं. आमच्या सोबतची मोठी माणसं मात्र अगदी हसत-हसत खात होती. ते सगळं पाहून मला गंमतच वाटली. एवढी अठरावीस वर्षांची पोरं आम्ही, त्यांना या तिखटानं एवढं हैराण करावं!
अन्नाच्या बाबतीतला अगदी ठळक असा जाणवलेला फरक. अगदी धुळे आणि जळगाव या आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्येही हा फरक जाणवतो. फरक स्वयंपाकाच्या आणि खायच्या पद्धतीमध्ये आहे. शेजारी असलेल्या दोन जिल्ह्यांमध्ये जर एवढा फरक असेल तर सिंधुदुर्ग आणि नागपूर यांच्यामधला फरक केवढा असेल... असा विचार माझ्या मनातून काही केल्या जाईना.
भुसावळमधल्या सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद करून आम्ही पुढे निघालो होतो. आज आम्ही फैजपूर आणि खिरोदा अशा दोन महत्त्वाच्या गावी जाणार होतो. ही दोन्ही गावं तशी अगदीच लहान होती पण दोन्ही गावं ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची होती. फैजपूरला काँग्रेसचं एक महत्त्वाचं राष्ट्रीय अधिवेशन झालं होतं तर खिरोदा या गावात त्या काळी सर्वोदयचं आणि एकूणच ग्रामोद्योगाचं मोठं काम उभारलं गेलं होतं. तिथल्या धनाजी चौधरी यांचं नाव फार मोठं आहे. त्यामुळे दोन्ही गावांना भेटी द्यायला आम्ही उत्सुक होतो. भुसावळमधून आम्ही सकाळी जे निघालो ते थेट फैजपूरला येऊन थांबलो. फैजपूरच्या ज्या शाळेत ते ऐतिहासिक अधिवेशन भरलं होतं, तिकडे आम्ही आमच्या सायकली वळवल्या. करोनामुळे तर ते सगळंच बंद होतं पण आम्हाला आवारात प्रवेश मिळाला. त्या अधिवेशनाची आठवण म्हणून बांधण्यात आलेली मशाल अजूनही तिथे दिमाखात उभी आहे. त्या मशालीच्या चारही बाजूंना वेगवेगळ्या मान्यवरांच्या कविता कोरलेल्या आहेत. त्या कवींची स्वातंत्र्यानंतरच्या देशाबद्दलची असलेली स्वप्नं, अपेक्षा हे सगळं वाचून कसंसंच व्हायला होतं. त्यांची स्वप्नं अजूनही अपुरीच असल्याची जाणीव कोणत्याही संवेदनशील मनाला दुखवून जाते. त्याच परिसरात आम्ही जेवलो आणि पुढे निघालो.
पुढे जाताना आमचा काहीतरी गोंधळ झाला. आमच्यातले काही जण पुढे गेले तर काही जण मागे राहिले. आपण गंडलोय हे लक्षात यायला काही फारसा वेळ लागला नाही. शेवटी आमच्यातल्या एकाला आम्ही जोरात सायकल घेऊन पुढे पाठवलं आणि बाकीची मंडळी दिसतायत का बघायला सांगितलं. तर दुसऱ्या एकाला उलट दिशेला पाठवलं. एका बाजूनं आमचा मित्र परत येताना दिसला, त्याचा अर्थ तिकडे कुणी नव्हतं. त्यामुळे आम्ही क्षणातच दुसऱ्या दिशेला निघालो. सगळ्यांनी जोरजोरात सायकली पळवल्या. कारण या अनोळखी परिसरात संध्याकाळच्या वेळी हरवून जाणं कुणालाही परवडणारं नव्हतं. शेवटी काही मिनटांनी आमचे बाकीचे साथीदार आमची वाट बघत थांबलेले आम्हाला दिसले. त्या वेळेला विनोददादांना बघून मला रागच आला. ते असं कसं करू शकतात ते मला कळेना...! पण मी तेव्हा काही बोललो नाही, आमच्यापैकी कुणीच काही बोललं नाही. शेवटी शॉर्टकट म्हणून सांगण्यात आलेल्या आणि अतिशय खडबडीत अशा रस्त्यावरून आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. तो रस्ता एवढा सपाट होता की, पाच किलोमीटरच्या त्या प्रवासाला आम्हाला जवळजवळ पाउणतास लागला. एरवी हे अंतर आम्ही पंधरा ते वीस मिनटांत कापत होतो. आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की, हा तोच मार्ग आहे जो गांधींनी फैजपूर अधिवेशनाच्या वेळी वापरला होता. तेव्हा ते त्यांच्या अनुयायांसोबत त्या मार्गावरून चालत गेले होते. हे ऐकून त्या रस्त्याला वाहिलेली शिव्यांची लाखोली आम्ही नम्रपणे मागे घेतली.
खिरोद्याच्या मुक्कामाची कथा जरा रंजक आहे. मागच्या लेखात ज्या रस्त्याचा मी उल्लेख केला होता त्या रस्त्यानं आम्हाला जरा जास्तच त्रास दिला. त्यावरच्या दगदगीमुळे आमच्या एका साथीदाराला जास्तच त्रास झाला. मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यावर तो अगदी आडवाच झाला. त्याच्या अंगातली सगळी ताकद गेल्यासारखी दिसत होती. त्या प्रसंगानं आम्ही सगळे जरा धास्तावलो पण एकमेकांच्या जास्त जवळही आलो. एक दोघांनी तासभर त्याच्या डोक्याला, पायाला मालीश केली, एकदोघांनी लगेच डॉक्टरकडे जाऊन गोळ्यांची वगैरे व्यवस्था केली, काही जणांनी गावातल्या लोकांशी बोलून गरम पाण्याची व्यवस्था केली. या सगळ्या गोष्टी न सांगता केल्या गेल्या. आमच्या सगळ्यांमध्ये आपसूकच तयार झालेल्या नात्याचा तो परिणाम होता. शेवटी काही वेळानंतर आमचा मित्र पुन्हा रुळावर आला आणि आम्ही सगळे निर्धास्त झालो. त्या रात्री तिथल्या लोकांनी जळगावचं खास प्रसिद्ध वांग्याचं भरीत आमच्यासाठी केलं होतं. अगदी साग्रसंगीत स्वयंपाकाची व्यवस्था होती. यातल्या कुणाचीच ना ओळख ना पाळख पण तरी आमच्यासाठी प्रत्येक ठिकाणी होत असलेली व्यवस्था पाहून आम्हाला भारी वाटत होतं. करोनाच्या काळात माणूस हळूहळू दूर जात आहे हे एकीकडे ऐकत होतो तर दुसरीकडे या दूरवरच्या माणसांच्या आपुलकीचा आम्ही अनुभव घेत होतो.
या मुक्कामात अजून एक महत्त्वाची आणि रंजक अशी घटना घडली. आम्ही मागचा एक आठवडा तरी एकत्र होतो. आमच्यापैकी कुणीच आधी एकमेकांना भेटलेलं नव्हतं. ना कुणी कुणाला ओळखत होतं. त्यामुळे आमच्यात तयार झालेले संबंध, आपुलकी ही मागच्या आठवड्याभराची होती. जसं मी मागच्या वेळी म्हटलं की, काही कारणांमुळे आमचे विनोददादांशी मतभेद होऊ लागले. आजच्या म्हणजे खिरोद्याच्या मुक्कामापर्यंत ते अगदी हाताबाहेर गेले. त्या दिवशी माझा आणि विनोददादांचा उघडपणे वादझाला. कधीकधी घाईगडबडीतल्या परिस्थितीमध्ये मी एखादा निर्णय चटकन घेऊन टाकत असे. विनोददादांना ते मान्य नव्हतं. तसंच केस कापलेलेअसावेत, रोज आंघोळ करावीच, रस्त्यानं जाताना शांततेनं जावं, एका ओळीमध्येच चालावं, पुस्तकविक्रीवर भर द्यावा या त्यांनी ठरवलेल्या गोष्टी मला मान्य नव्हत्या त्यामुळे त्या दिवशी माझा बांध फुटला. माझ्यासोबतच्या साथीदारांनापण काही गोष्टी अजिबात पटत नव्हत्या त्यामुळे त्यांचापण काही प्रमाणात विरोध झाला. तासभर आमचा तो चाललेला वादविवाद शेवटी संपवला गेला आणि विनोददादांनी आम्हाला सगळ्यांना झोपायला सांगितलं.
...पण आम्ही कसले ऐकतोय? आम्ही काहीसं कारण काढून बाहेर निघालो आणि रात्रीच्या बारा वाजता रस्त्यावरून फिरायला लागलो. सगळ्यांच्या मनातल्या बंडामधून एक वेगळीच कल्पना तयार होत होती. आम्ही सगळे एवढे संतापलो होतो की, आम्ही सगळे चक्क यात्रेमधून बाहेर पडायचा विचार करत होतो आणि फक्त बाहेरच नाही पडायचं तर स्वतःच्या हिमतीनं अगदी वर्ध्यापर्यंत जायचं इथपर्यंत आमची तयारी झाली होती. माझ्या ओळखी होत्याच त्यामुळे मी काही फोन फिरवायला लागलो. काही जणांनी आपल्या घरी पण फोन करून कल्पना देऊन पाहिली. सगळ्यांचा एकमेकांवर विश्वास होता त्यामुळे कुणी या प्लॅनला नाही म्हणेना! आम्ही सगळे एवढे चेकाळलो की, अगदी उद्याच विनोददादांना सांगून बाहेर पडायचं असं म्हणायला लागलो पण समुद्र कसा एकदा भरती येऊन गेली की पुन्हा लगेच शांत होतो तसंच आमचं झालं. अजून एकदोन दिवस काय होतंय ते पाहू आणि अगदीच नाही ऐकलं तर मग फुटू असा निर्णय झाला. त्या दिवशीची ती रोमांचक रात्र अजूनही आमच्या सगळ्यांच्या मनात घर करून आहे.
तरुणांना त्यांच्या मनाविरुद्ध वागवलं तर एके दिवशी ते कसे फुटतात आणि फुटले की कसे स्वतंत्र होतात त्याचा अनुभव मला येत होता.
- सृजन नीला हरिहर
srujanhw@gmail.com
वाचा 'सर्वोदय संवाद सायकल यात्रा' मालिकेतील पहिला भाग - ...आणि आमचा प्रवास सुरु झाला!
Tags: सर्वोदय संवाद सायकल यात्रा सृजन नीला हरिहर सायकल यात्रा लेखमाला भाग 2 Sarvodaya Samvad Cycle Yatra Srujan Neela Harihar Cycle Yatra Series Part 2 Load More Tags
Add Comment