आज सर्वाधिक गरज आहे ती संवादाची!

सर्वोदय संवाद सायकल यात्रा - 5

सृजन नीला हरिहर या तरुणाच्या सायकल सफरीवरच्या अनुभवांवरचा दीर्घ लेख पाच भागांमध्ये कर्तव्य साधनावरून रोज क्रमशः प्रसिद्ध झाले. त्या मालिकेतील हा शेवटचा म्हणजे पाचवा लेख.

काल झोपायला उशीर झाल्यामुळे आज उशिरा उठूनही आमच्या डोळ्यांवरची झोप काही केल्या जात नव्हती. आवराआवरी करण्याआधी शेकोटीजवळ बसून आम्ही बराच वेळ टाईमपास केला. बाहेर मांडलेल्या चुलीवर आज सगळ्यांनी मिळून पोहे केले. सूर्याला चांगली जाग आल्यावर आम्ही गावात एक फेरफटाका मारला आणि पुढच्या यात्रेवर निघालो. मागच्या एक दोन दिवसांपासून आम्हाला सेवाग्राम या आमच्या यात्रेतल्या शेवटच्या ठिकाणी पोहोचायची एवढी घाई झाली होती ना की, काही विचारूच नका! सगळे सायकली काढून रस्त्याला लागले. 

आमच्या यात्रेतले आणखी दोनच मुक्काम बाकी होते. त्यामुळे सगळे उत्साहित मनानं सायकल दवडत होते. आज आमच्या मुक्कामाचं गाव असणार होतं मोझरी. मोझरी हे तुकडोजी महाराजांची कर्मभूमी आणि ते गाव अगदी 20-25 किलोमीटरवरच असल्यामुळे आम्ही अगदी निवांतपणे चाललो होतो. आजचा रस्ताही मुख्य महामार्गावरून जात असल्यामुळे जरा शिस्तीनं जाणं भाग होतं. मध्येच दुपारी जेवायला एका लहानशा हॉटेलात आम्ही थांबलो. बऱ्याच दिवसांनी एवढा कमी पल्ल्याचा रस्ता मिळाल्यामुळे सगळे सुस्तावलो होतो आणि सगळं काही आरामात करत होतो. तिथे जेवणातच आमचे दोन तास गेले. जेवण झाल्यानंतर अगदी काही मिनटांतच आम्ही मोझरी गावाची कमान ओलांडली.

या गावात आम्ही एका आश्रमात राहणार होतो. त्या आश्रमातली माणसं आमच्या स्वागतासाठी कमानीपर्यंत आली होती. त्यांच्यासोबत एका टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या आश्रमात आम्ही गेलो. आश्रमाचं वातावरण अगदी शांत होतं. आश्रम असूनही चांगलं पक्कं बांधकाम होतं त्यामुळे आमची त्या दिवशीची व्यवस्था खूपच चांगली झाली होती. गेल्या-गेल्या काही वेळामध्येच सगळे जण एकदम आडवे झाले. एकतर तिथे आम्ही संध्याकाळच्या चारच्या सुमारास पोहोचलो असल्यामुळे वेळच वेळ होता. आम्हाला दिलेल्या खोलीमध्ये सगळ्यांनी मस्त पाय ताणून लोळायला सुरुवात केली. आश्रमामधली सगळीच मंडळी अगदी प्रेमानं आमच्याशी बोलत होती. आम्हा सगळ्यांना त्यांनी काढा करून दिला. आमच्या प्रवासाबद्दल आपुलकीनं चौकशी केली. 

संध्याकाळी गावातल्या तुकडोजी महाराजांच्या आश्रमात / मंदिरात आम्ही गेलो. सोबत या आश्रमातलीपण मंडळी होतीच. एकूणच त्या मंदिराच्या परिसरात गेल्यावर तिथल्या शांततेनं मनातले गडबडगोंधळ शांत होतात. तुकडोजी महाराजांच्या प्रचंड साहित्यामधल्या काही महत्त्वाच्या ओळी परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी लिहून ठेवण्यात आल्या होत्या. अतिशय शांतता पाळली जात होती. त्या सगळ्या शांत वातावरणामुळे आम्हाला कुणालाच काही बोलयाची इच्छा होत नव्हती. संध्याकाळी सात वाजता मंदिरातल्या त्या प्रसन्न आवारामध्ये सुंदर तबलापेटीच्या संगतीनं प्रार्थना झाली. 20-25 मिनटांसाठी आम्ही कुठेतरी वेगळ्याच दुनियेमध्ये हरवून गेलो होतो. प्रार्थनेत नाही म्हटलं तरी तुम्हाला शांत आणि प्रसन्न करण्याची ताकद असते हे खरंच आहे. त्याचा अनुभव घेतल्याशिवाय हे पटणार नाही. रात्री परत येऊन आश्रमामध्ये रुचकर स्वयंपाक केला. स्वयंपाकाबरोबरच आमच्या गप्पापण मस्त रुचकर होत होत्या. 

त्या उंच टेकडीखाली रात्रीच्या घट्ट मिठीमध्ये विसावलेल्या त्या परिसरात कुणाला शांत झोप लागली नसती? संत तुकडोजींच्या कर्मभूमीतला तो एक दिवससुद्धा मनात कायमचं घर करून राहिलेला आहे.


आश्रमात मिळालेल्या त्या शांत झोपेनं सगळे मस्त फ्रेशच होऊन गेलेले होते. आजचा पल्ला तसा लांबचा होता त्यामुळे लवकरच निघायचं आम्ही ठरवलं होतं. काल मोझरीच्या मुक्कामात सर्वोदयचे कार्यकर्ते आणि ज्यांनी या यात्रेच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका निभावली होती ते ठाकूरकाकापण आले होते. त्यांचा उत्साह हा आमच्याहीपेक्षा जास्त होता. आश्रमातल्या सगळ्याच लोकांसोबत कसं वेगळं नातं तयार होऊन गेललं होतं. त्यामुळे सहजासहजी काही पाय निघत नव्हता आणि दुसरं म्हणजे त्या जागेत कितीही फोटो काढले तरी मन भरत नव्हतं पण शेवटी आम्ही एकदाचे निघालो. दिवसाच्या प्रवासाची सुरुवात त्या टेकडीच्या मस्त उतारानं झाल्यामुळे आम्ही चेकाळून गेलो. सुसाट सायकल चालवायला लागलो. 

महामार्गाला लागल्यावर तरी सीमाच उरली नाही. शर्यत लागल्यासारखे आज आम्ही चाललो होतो. अशीच वेगात असताना मी अचानक सायकल थांबवली. रस्त्याच्या बरोबर मधोमध एक कुत्र्याचं पिल्लू गाडीच्या टकरीनं मरून पडलं होतं. आम्ही सगळेच थांबलो. रस्त्याच्या बाजूला पडलेल्या काठ्यांचा, पानांचा आधार घेऊन त्याला बाजूला केलं. आजपर्यंतच्या प्रवासात असं अनेकदा झालं होतं. महामार्गावर तरी हमखास व्हायचं. मोठ्या ट्रकच्या वगैरे धडकेनं पक्षी खाली मरून पडायचे पण असं काहीही दिसल्यावर त्याच्याकडे कानाडोळा करून आमच्यापैकी कुणीच कधी पुढे गेलं नाही. प्रत्येक वेळी थांबून त्या गेलेल्या जिवाला सगळ्यांनी आपणहून बाजूला केलं होतं. 

आजचा प्रवास आमचा चांगलाच रोमांचकारी ठरणार होता. चांगला प्रवास चालू असतानाच मध्येच माझ्या सायकलच्या चाकातून सारखी सारखी हवा जायला लागली. सगळ्यांनी काही ना काहीतरी करून पाहिलं पण काही उपयोग होईना. शेवटी नेहमीचा पर्याय म्हणजे मोठ्या गावातल्या सायकलीच्या दुकानपर्यंत जाऊन ती दुरुस्त करणं. मग काय... एका टेम्पोवाल्याला पकडून, त्यात सायकल टाकून मी एकटाच पुढे निघालो. बाकीचे सगळे पुढच्या एका चौकात येऊन थांबणार होते. तिथून आमचा रस्ता बदलणार होता. तिथून पुढे लहानशा जंगलातून आमचा प्रवास असणार होता त्यामुळे सगळ्यांनी लवकर पोहोचायला हवं होतं. 

मी सायकल गाडीत टाकली आणि निघालो पण थांबायचं कुठे, दुकान कुठे याची काहीच माहिती मला नव्हती. गाडीवाला त्याच्या घराच्या रस्त्यावर असल्यामुळे तो भरधाव वेगात चालला होता. त्याच्या वेगाला आवर घालणं काही मला शक्य नव्हतं आणि तोपण स्वतःहून मला कुठे थांबवेना. बराच वेळ आपला मी पुढे जातोय, जातोय पण काहीच होईना. शेवटी माझा पेशन्स संपला कारण जेवढं पुढे मी जाणार होतो सायकलनं मला तेवढंच मागे यावं लागणार होतं. शेवटी एका ठिकाणी एका दुकानापाशी मी त्याला सायकल उतरवायला सांगितली. ते काही सायकलंच दुकान नव्हतं पण गाडीचं होतं त्यामुळे काही ना काहीतरी साधनं त्याच्याकडे होती. त्याला लगेच काय ते काम करायला सांगितलं आणि मागच्या त्या ठरलेल्या गावाचं अंतर किती असेल म्हणून विचारलं…

त्यानं सांगितल्यानुसार मला जवळपास आठ किलोमीटर पुन्हा मागे जावं लागणार होतं. माझं डोकं जरा थंड पडलं. एकतर संध्याकाळचे साडेपाच वाजून गेले होते. त्यात मला पुन्हा मागे आठ किलोमीटर जायचं होतं आणि त्यानंतर आम्हा सगळ्यांना पुढे दहा किलोमीटर जायचं होतं... तेपण जंगलातल्या रस्त्यावरून. आम्हाला आधीच सूचना देण्यात आली होती की, त्या जंगलाच्या रस्त्यावरून काळोखाच्या आधी पास होणं गरजेचं होतं पण आता काही होणं शक्य नव्हतं.

तो सगळा विचार करून मी सायकल दामटायला सुरुवात केली. एकदोनदा दुचाकीवाल्यांना हात दाखवला पण कुणी थांबायला तयार नाही. दुसरा काहीच मार्ग माझ्या समोर नव्हता. दुसरा कसलाही विचार न करता मी सायकल चालवायला सुरुवात केली. रस्ता काही संपायला तयार नव्हता पण मगाशी येताना ओळखीच्या म्हणून करून ठेवलेल्या खुणा दिसत होत्या. हळूहळू मी त्या गावाच्या जवळजवळ जात होतो. प्रत्येक ठिकाणची माणसं वेगवेगळं अंतर सांगत होती त्यामुळे एकतर अजूनच टेंशन वाढत होतं. शेवटी सहा-सव्वासहाच्या सुमारास पाऊण-एक तासात मी माझ्या साथीदारांच्या जवळ पोहोचलो. सगळे वाट बघत बसून होते. तिथे पोहोचल्या-पोहोचल्या विनोददादांनी मला मिठी मारली. त्या मिठीत बऱ्याच गोष्टी सामावल्या होत्या... ज्यांचं वर्णन मला इथे शब्दांत करता येणं शक्य नाही. आमच्यातले मतभेद वगैरे दूर झालेत असा त्याचा अर्थ नव्हता किंवा दिखाऊपणाचं नाटकपण नव्हतं. ती फक्त प्रेमानं, आपुलकीनं मारलेली मिठी होती. त्या मिठीचं आवरण अजूनही माझ्याभोवती तेवढंच घट्ट आहे. आता जास्त वेळ घालवणं वेडेपणाचं होतं. 

त्या जंगलाच्या रस्त्यावरून आम्ही निघालो. ते जंगल म्हणजे जंगलच होतं. अगदी मिट्ट काळोख, मस्त घनदाट झाडी आणि त्याच्या सोबतीला थंड थंड वारा. हे सगळं अगदीच रोमांचक होतं. त्या मोकळ्या रस्त्यावरून मस्त गाणी म्हणत, घोषणा देत, जोरजोरात गप्पा मारत आम्ही चाललो होतो. त्या जंगलाच्या भीतीची साधी पुसटशी रेखापण ना कुणाच्या चेहऱ्यावर होती... ना बोलण्यात कारण सगळ्यांना एकमेकांची साथ होती. एवढ्या दिवसांत तयार झालेल्या नात्याचं ते फळ होतं. अहिराणीमधली वेगवेगळी गाणी मस्त जोरजोरात म्हणत-म्हणत आम्ही तो घाटाचा रस्ता पार केला. चढावाला सायकलवरून उतरून तर उताराला सुसाट सायकली सोडून देऊन त्या रात्रीचा प्रवास सगळेच त्यांच्या आठवणीत साठवून ठेवत होते. शेवटी बराच वेळ सायकल चालवून झाल्यानंतर अंधाराच्या आकाशात एक दिवा लांबून चमकताना दिसला. डोंगरावर, जंगलामध्ये, काळोखाच्या बाहूंमध्ये विसावलेलं ते गाव बघून आम्हाला शेवटच्या मुक्कामाला पोहोचल्याचा दिलासा मिळाला. 

ज्यांचाकडे आमची व्यवस्था करण्यात आली होती त्यांचं मस्त गावाला शोभणारं घर होतं. बसक्या कौलांचं टुमदार घर, त्याच्यासमोर पुरेसं अंगण आणि बाजूलाच गुरांचा गोठा. गावाचा तो नजारा पाहून मला खूप मस्त वाटलं, शांत वाटलं. आजच्या प्रवासानं सगळे दमून गेले होते पण आमच्या झालेल्या स्वागतानं, त्या कुटुंबाच्या आपुलकीच्या संवादानं आम्ही जरा माणसात आलो. त्यांच्यासोबत बसून जेवण केलं आणि बाकी काहीही न करता दिलेल्या जागी सरळ झोपून गेलो. 

झोपायच्या आधी गावातल्या दोनतीन शेजाऱ्यांनी आमच्यासमोर भांडण करून एक प्रकारची अंगाईच म्हटली. आजचा आमचा यात्रेतला मुक्कामाचा शेवटचा दिवस होता. उद्या आम्ही सेवाग्राम आश्रमात पहुडणार होतो. प्रवास संपत आला या उत्साहाच्या भावनेला थोडीशी निराशेची किनारही आली होती. मागच्या पंधरा दिवसांचे सोबती होतो आम्ही पण त्या तेवढ्या पंधरा दिवसांच्या आठवणी आयुष्यभर आम्हाला एकमेकांच्या संगतीत ठेवणार होत्या.


आमच्या या एवढ्या दिवसांच्या प्रवासाचा शेवटचा दिवस होता. पण हा शेवटचा दिवस अगदी पटापट सायकल चालवून काढावा की अगदी सावकाश जाऊन आठवणीत कायमचा कोरावा हे आम्हाला कळत नव्हतं. पण एवढ्या दिवसांमध्ये झालेल्या जवळिकतेनं आमचा शेवटचा दिवस अगदी आनंदाचा करून टाकला. वाटेत जाता-जाता आम्हाला उसाची मस्त शेतं लागली. ते पाहून आमच्या उत्साहाला काही पारावर उरला नाही. आम्ही हळूच त्या शेतांमध्ये उतरून प्रत्येकाला एक असे ऊस काढले आणि सायकलवरून जाता-जाता खायला लागलो. मजा आली. 

आमच्या कालच्या मुक्कामाच्या गावापासून सेवाग्राम आश्रम काही जास्त लांब नव्हता त्यामुळे त्या दिवशीचा आमचा प्रवास अगदी चार वाजता संपूनही गेला. सेवाग्रामला जाण्याआधी वर्धा शहरातून फेरफटका मारला. फिरताना त्या गावचा एक वेगळेपणा काही लपून राहत नव्हता. गजबजलेलं तरीही शांत असणारं ते गाव बघून आम्हाला एवढ्या दिवसाचा प्रवास केल्याचं समाधान मिळालं. सेवाग्रामला पोहोचताच तिकडच्या कार्यकर्त्यांनी, ज्येष्ठांनी आमचं अगदी प्रेमानं स्वागत केलं. मागच्या पंधरा दिवसांच्या प्रवासानंतर, काहीशा हेव्यादाव्यांनंतर, खूप घट्ट असं प्रेमाचं नातं विणून आज आम्ही सेवाग्राममध्ये पोहोचलो होतो. या सगळ्याचा आनंद आमच्या सगळ्यांचा चेहऱ्यावर खूप स्पष्ट दिसत होता. खूप साऱ्या समाधानानं आम्ही सेवाग्राम आश्रमात पाय ठेवला, परिसर फिरून पाहिला आणि संध्याकाळी अगदी आनंदी मनानं सेवाग्रामच्या प्रार्थानेमध्ये सहभागी झालो. आश्रमामधल्या त्या प्रार्थनेत काहीतरी वेगळीच जादू होती. त्यातली भजनं, त्या प्रार्थना आम्हाला वेगळ्याच दुनियेत घेऊन गेल्या. त्या दिवशी रात्री आम्ही अगदी शांतपणे झोपून गेलो. पुढच्या एकदोन दिवसांत आश्रमाच्या आजूबाजूचा, वर्ध्याचा परिसर आम्ही फिरून पाहिला पण तेवढ्या वेळानं काही आमचं मन भरेना! दोन दिवस सलग त्या वास्तूत राहूनही तिथून आमचा पाय निघत नव्हता. 

आपल्या देशाचा भव्य असा इतिहास घडवणाऱ्या अनेक लोकांचा अविरत सहवास त्या वास्तूला लाभला होता. इतक्या वर्षांच्या पावनतेचा इतिहास लाभलेल्या त्या परिसरात काहीतरी वेगळीच भव्यता सामावून राहिली होती. दोन दिवस त्या परिसरात राहून तिसऱ्या दिवशी आम्ही गाडीनं पुन्हा धुळ्याला परतलो. गाडीतल्या त्या एका रात्रीच्या प्रवासात सगळ्यांनी मस्त धमाल केली. शेवटी नोव्हेंबरच्या सोळा तारखेला आमची पंधरा दिवस चाललेली 'सर्वोदय संवाद सायकल यात्रा' संपली. 


हा माझ्या प्रवासवर्णनाचा अगदी शेवटचा भाग आहे. नाही म्हणता-म्हणता हे सगळं वर्णन पाच भागांचं झालं! इतके दिवस प्रत्येक दिवसाचं वर्णन मी करत होतो पण या शेवटच्या भागात मी या अख्ख्या प्रवासाचं माझं आकलन मांडणार आहे. 

धुळ्यापासून सुरू केलेला हा प्रवास आम्ही वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमात येऊन थांबवला. तसं पाहायला गेलं तर हे अंतर काही फार नाही, चारशे ते पाचशे किलोमीटर एवढंच आहे... पण आमचा प्रवास मात्र याहून बराच अधिक झाला कारण मुख्य रस्ता सोडून आम्ही आडवळणानं फिरत आलो होतो त्यामुळे हा पंधरा दिवसांचा प्रवास सहाशे-सातशे किलोमीटरचा झाला होता. खरं सांगायचं तर खरा महाराष्ट्र हा या वाढीव दोनशे किलोमीटरमध्येच आम्हाला बघायला मिळाला. दोनशे किलोमीटरचा प्रवास टाळून जर आम्ही मुख्य रस्ता धरला असता तर आम्हाला माणसं फक्त दिसली असती, ती कळली नसती. 

हे सगळं पाहून माझ्या लक्षात आलं की, खरा महाराष्ट्र किंवा खरा माणूस जर आपल्याला बघायचा असेल नाs तर तो महाराष्ट्रातल्या किंवा या देशातल्या खेड्यामध्येच दिसेल. हा माणूस अगदी साधा आहे, शरीरानं काटक आहे, रंगानं सावळा आहे. या माणसाची जमिनीवर श्रद्धा आहे पण याचं शेतीवरचं प्रेम कमी होत चाललंय. याला पैसा तर कमवायचा आहे पण त्यासाठी काही नवीन सुचत नाहीये. अनेक चांगल्या गुणांनी हा माणूस भरलेला आहे पण त्याचा योग्य उपयोग करणं त्याला काही केल्या जमत नाहीये. हे सगळं बघून आपल्याला अजून कायकाय गाठायचं आहे याची भरभक्कम जाणीव मला झाली. 

ही सगळी यात्रा आम्ही कोरोनाच्या काळात केली होती. सगळीकडे हाहाकार माजला असूनपण आमच्या संपूर्ण यात्रेत आम्हाला एक किंवा दोन ठिकाणीच मास्क घातलेली माण्सं दिसली असतील. ती एकदोन ठिकाणं जिल्ह्याची ठिकाणं होती म्हणून तिथे थोडी भीती, काळजी दिसत होती पण बाकीकडे मात्र काहीच नाही. आपल्या समाजातला एक वर्ग ज्या गोष्टीला घाबरून घरातून बाहेर पडत नव्हता त्याच समाजातला एक वर्ग या गोष्टीला साधी भीकही घालत नव्हता. हे त्यांचं अज्ञान होतं की समाजाचं अपयश होतं?

संपूर्ण प्रवासात ही गावं आणि शहरं यांच्यामध्ये असलेली ही सीमा अगदी स्पष्टपणे जाणवत होती. मग ती राहणीमानामध्ये असो, बोलण्याचालण्यात असो किंवा विचारात असो... ही गाव आणि शहर यांमधली सीमा जशी स्पष्ट जाणवत होती तशीच सीमा स्त्री आणि पुरुष यांच्यामध्येपण दिसत होती. एवढ्या दिवसांत, एवढ्या गावांमध्ये अशा काहीच स्त्रिया असतील ज्यांनी बाहेर येऊन, पुरुषांसोबत राहून मोकळेपणानं आमच्याशी संवाद साधला. इतक्या वर्षांत कोणत्या भेदांपलीकडचा समाज घडवला आपण? आपल्याला दिसत असलेली समानता, मग ती जातीतली असो किंवा लिंगातलीही, खूप कमी आहे. बराचसा समाज हा समतेच्या संघर्षापासून बराच लांब आहे. यातल्या लोकांना जोपर्यंत आपण या समतेच्या जाणिवेत ओढत नाही तोपर्यंत आपल्या हातांत काहीच येणार नाही. 

अजून एक फार गमतीदार गोष्ट या प्रवासात निरीक्षणात आली. ज्या-ज्या गावांत आम्ही गेलो प्रत्येक गावात दोन व्यक्तींचे पुतळे असायचेच. एक असायचा शिवाजी महाराजांचा तर दुसरा असायचा महात्मा गांधींचा. महाराजांचा पुतळा नेहमी स्वच्छ, टापटीप असायचा आणि गांधींचा पुतळा नुसता 'असायचा' म्हणून असायचा. हे फक्त निरीक्षण इथे मांडतोय, त्याचा अर्थ प्रत्येकानं आपल्या परीनं लावावा. 

या यात्रेच्या पंधरा दिवसांत आम्ही अनेक लोकांकडे, अनेक संस्थांकडे मुक्काम केला... अनेक लोकांनी आम्हाला सहकार्य केलं. याचं कारण एकच होतं. ते म्हणजे त्यांची आपल्या समाजाबद्दलची आपुलकी, सर्वोदय या विनोबांच्या विचारांबद्दलचा आदर. या माणसांना, या सस्थांना बरंच काही चांगलं, मोठं करायची इच्छा आहे. 

'सर्वोदय संवाद सायकल यात्रे'मधून सगळ्यात प्रकर्षानं कोणती गोष्ट जाणवली असेल तर ती ही की, आपल्याला सगळ्यात जास्त गरज कशाची असेल तर ती संवादाची आहे. आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक घटकात प्रत्येक गोष्टीबद्दल संवाद होणं गरजेचं आहे... सगळ्यांचा... सगळ्यांशी....

- सृजन नीला हरिहर
srujanhw@gmail.com


वाचा 'सर्वोदय संवाद सायकल यात्रा' मालिकेतील इतर भाग - 

...आणि आमचा प्रवास सुरु झाला!

आम्हा तरुणांचा बंडाचा झेंडा...

अखेर बंड शमले आणि प्रवास सुरु झाला...

इतके दिवस प्रवासापासून दूर राहिलेल्या अडचणी समोर उभ्या ठाकल्या...

Tags: सर्वोदय संवाद सायकल यात्रा सृजन नीला हरिहर सायकल यात्रा लेखमाला भाग 5 Sarvodaya Samvad Cycle Yatra Srujan Neela Harihar Cycle Yatra Series Part 5 Load More Tags

Comments:

डॉ सी डी महाजन

कोकणातल्या एका वीस वर्षे वयाच्या विद्यार्थ्याची स्वयंप्रेरणेने केलेली ही सायकल यात्रा आहे. वेळ काढून क्रमाने ती वाचली. कालसुसंगत वाचन, तेही वर्तमानातलं, व्हायला हवं, अशा इच्छेने ते जाणीवपूर्वक वाचलं. कसोटीच्या क्षणी शारीरिक कणखरपणा बरोबरच सामाजिक आणि मानसिक ताणाबाणा ही कसा बरोबरच विकसित होत जातो, हे त्या प्रामाणिक कथनातून उलगडत जाते, असे मला वाटते. आत्ताचा युवक कसा विचार करतो. त्याच्या उत्साहाला आणि वीरश्रीला नेमकी कशी दिशा मिळत जाते. अनुभवातलं शहाणपण कसं मुरतं वगैरे बाबी विचार करण्यासारखा आहेत.

Rahul Ramesh Gudadhe

प्रवास आनंददायी असतो माहिती होत. पण तो निरिक्षणातून एवढं काही देतो पण हे हा लेख वाचून प्रचिती आली. अप्रतिम

Add Comment