...आणि आमचा प्रवास सुरु झाला!

 सर्वोदय संवाद सायकल यात्रा - 1 

मी सृजन नीला हरिहर. सध्या लॉच्या पहिल्या वर्षाला आहे. बारावीची परीक्षा संपली तेव्हा कोरोनाचं नुकतंच आगमन झालं होतं त्यामुळे मुलांना मोठी सुट्टी मिळाली. त्या सुट्टीत काय करावं हे काही केल्या सुचत नव्हतं. अशाच अमाप न सुचण्यातून एक दिवस एक कल्पना सुचली... महाराष्ट्र सायकलनं फिरायची...! 

या कल्पनेनं अगदी भंडावून सोडलं. काय करायचं, कसं करायचं याचा बराच काथ्याकुट झाल्यानंतर 'सर्वोदय संवाद सायकल यात्रे’चा प्लॅन आखला. 27 ऑक्टोबर 2020 रोजी धुळ्यातून सुरू झालेली ही सायकल यात्रा 15 नोव्हेंबर 2020 रोजी सेवाग्रामला पोहोचून पूर्ण झाली. या पंधरा दिवसांच्या प्रवासात आम्ही 20-22 वर्षाची मुलं महाराष्ट्राच्या उत्तरेच्या सहा (धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा) जिल्ह्यांमधून कधी रस्त्यावरून तर कधी जंगलातून अगदी मनसोक्तपणे हिंडलो. या प्रवासात वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटली, कळली. ‘सर्वोदय’ विचाराची ताकदही कळली. या आमच्या छोट्याशा प्रवासाचा हा लहानसा वृत्तान्त.

आपला देश विविधतेनं नटलेला आहे असं आपण अभिमानानं म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर येते ती साहजिकच राज्याराज्यांमधली, भाषाभाषांमधली विविधता... आणि राज्यांमध्ये विविधता असली, वेगळेपणा असला तरी त्यांच्याअंतर्गत तरी सारखेपणा असेल अशी माझी समजूत होती. मात्र एका प्रवासानं माझ्यासमोर विविधतेचं अंतरंग उलगडत गेलं आणि त्यातल्या अनुभवांनी माझं क्षितिजही विस्तारत गेलं.  

करोनासोबत जगण्याची आता सवय होऊन गेली असली तरी सुरुवातीला मात्र सगळ्यांची मानसिक स्थिती वेगळीच होती. लोकांची अस्वस्थता, बेचैनी सगळं काही हाताबाहेर चाललं होतं. आमच्यासारखे तरुण तर कंटाळ्यालाही कंटाळून गेले होते. बारावीची परीक्षा संपली असल्यामुळे ऑनलाईन अभ्यासही सुरू नव्हता. त्यामुळे माझ्या मोकळिकीला काही सीमा नव्हती. पण चारपाच महिन्यांनी या मोकळिकीचा, काहीही न करण्याचा एवढा वीट आला की स्वस्थच बसवेना. मग या समुद्राएवढ्या अस्वस्थतेमधूनच एक दिवस एक भन्नाट कल्पना डोक्यात आली... महाराष्ट्रभर सायकलनं फिरण्याची. 

सायकल सफरीची ही कल्पना माझा पिच्छा सोडेना. लगेच मी मित्रांना फोनाफोनी केली. बऱ्याच जणांनी करोनामुळे उत्सुकता दाखवली नाही. पण विनोद पगार या दादांनी मात्र माझी कल्पना उचलून धरली आणि धुळे ते सेवाग्राम या सायकल यात्रेचं नियोजन करण्याचं अगदी मनावर घेतलं आणि आम्ही सगळे तयारीला लागलो. 


सायकलप्रवासाचा निर्णय घेतला होता तेव्हाच पक्कं ठरवलं होतं...  या वर्षी कॉलेजबिलेज काही करायचं नाही. कारण एकतर आमची सीईटी अजून झाली नव्हती आणि यापुढे लगेच ती होईल अशी शक्यताही वाटत नव्हती. पण अचानक बोर्डानं सीईटीची तारीख जाहीर केली... 11 ऑक्टोबर! काही निर्णय तुमच्या मनात एवढी द्विधा मनःस्थिती तयार करतात नाऽ की काही विचारू नका! पुढचं वर्ष गॅप घ्यायची असं ठरवलेलं असूनही सीईटी देण्याची इच्छा माझ्या मनातून जाईना. त्यामुळे लगेच काही दिवसांत मी या परीक्षेच्या अभ्यासाच्या तयारीला लागलो आणि सायकलप्रवासाचं हे खूळ मागे पडलं. 

11 तारखेला परीक्षा देऊन मी परत सावंतवाडीला घरी निघालो होतो. सावंतवाडीत गेल्यावर मित्रमंडळींमध्ये, आरामामध्ये हे सगळं सायकलपुराण एवढं मागे पडलं की, निघायची तारीख जवळ आली तरी माझं काही ठरेना. धुळ्यापासून सुरू होणाऱ्या या सायकल यात्रेत मी इथून - सावंतवाडीतून जायचं हे बऱ्याच जणांच्या मनाला पटेना. म्हणजे सातशे किलोमीटर अधिकचा प्रवास करत तंगड्या तोडायची गरजच काय हा प्रश्न होताच आणि तो बरोबरच होता म्हणा! बरं आणि एवढं सगळं करण्यामागे ‘मनाचं समाधान’ याव्यतिरिक्त इतर कोणतं कारण खरंच नव्हतं. 

...पण का कोण जाणे... अचानक असंच एका रात्री मी या सायकल यात्रेत जाण्याचं अगदी नक्की ठरवून टाकलं आणि अगदी पुढच्या काही दिवसांमध्ये म्हणजेच 25 ऑक्टोबरच्या सकाळी मी धुळ्याला पोहोचलो. आता मनात कितीही आणि कोणतेही विचार आले तरी इथून मागे फिरणं शक्य नव्हतं. कारण घरापासून मी मुळातच 400-500 किलोमीटर लांब आलो होतो... पुढे जाण्यावाचून काही पर्याय नव्हता. सकाळी धुळ्याला पोहोचताच विनोददादांची भेट झाली. धुळं तसं मोठं शहर आहे... अगदी पुण्यासारखंच... नदीच्या किनाऱ्याला वसलेलं. ऐतिहासिक असल्यामुळे वाडे, गल्ल्या, दुकानं कशी शिस्तीत आहेत. नदीची अवस्था मात्र बाकी सगळ्या नद्यांसारखी ‘घाणेरडी’च आहे!

धुळ्यात मी जास्त फिरलो नाही. गेल्यापासून दोन दिवस प्रवासासाठी लागणाऱ्या सामानाचीच खरेदी सुरू होती. पुढच्या प्रवासाला निघायला दोन मिनटं उरली तरी ती संपत आली नव्हती. खऱ्या सायकल यात्रेला 27ऑक्टोबरच्या सकाळी सुरुवात होणार होती. आणि त्याच्या आदल्या दिवशी आम्ही सगळी मंडळी धुळ्याच्या गोशाळेच्या परिसरात जमणार होतो. ठरल्याप्रमाणे आम्ही दहाबारा जण सव्वीस तारखेच्या संध्याकाळी एकत्र गोळा झालो आणि काही क्षणातच एकमेकांशी ओळखी करून घेण्यात दंग झालो.


संध्याकाळी चारला आम्ही सगळे जमा झालो. पण तिथे पोहोचल्यावर माझ्या मनात जरा धास्तीच भरली. झालं असं होतं की, आमच्या दहा जणांपैकी मी एकटा सोडलो तर बाकीची सगळी मुलं धुळ्यामधलीच होती. त्यामुळे त्यांच्यामध्ये मी एवढा वेगळा दिसत होतो की, काही विचारू नका! एकतर लहानपणापासून शहरात वाढल्यामुळे रागरंगावरून मी गावचा वाटत नाही आणि दुसरं म्हणजे माझ्या भाषेमुळे मी तिथला, त्यांच्यासोबतचा नाही हे कुणीही चटकन ओळखलं असतं. आता ही गोष्ट एवढी महत्त्वाची का असं तुम्हाला वाटत असेल... पण माझ्यासाठी ही गोष्ट फार महत्त्वाची होती कारण पुढचे पंधरा दिवस मी पूर्णपणे या दोस्तांसोबत असणार होतो आणि या काळात त्यांच्याशी माझं सूत अगदी चांगलं जमायला हवं होतं. आता पुढच्या पंधरा दिवसांत माझ्या भाषेमुळे, वागण्यामुळे मला जर त्यांनी वेगळं पाडलं असतं तर माझी पंचाईत झाली असती आणि मला ते नको होतं.

...पण मैत्रीची हीच खरी गंमत आहे. तुमची इच्छा असली ना की, वाट्टेल त्या मार्गानं ती होऊ शकते. तसंच आमचं झालं. सुरुवातीचे काही दिवस ते अहिराणीमध्ये बोलले... पण नंतर मात्र सगळ्यांनी मराठीमधूनच बोलायला सुरुवात केली. आम्ही समवयस्कच होतो. त्यामुळे ओळख करून घ्यायला जास्त वेळ लागला नाही. सुरुवातीला मला वाटलं होतं की, आम्ही सगळे एकाच राज्यात राहतो, एकाच प्रकारचं शिक्षण घेतो, सारखी नसली तरी एकाच प्रकारची भाषा बोलतो, मग आमच्यात एवढा वेगळेपणा काय असणार? पण जेव्हा आम्ही एकमेकांशी बोललो, एकमेकांच्या आवडीनिवडींबद्दल बोललो तेव्हा लक्षात आलं की, एकसारखं म्हणावं असं काहीच नाहीये की! आमची पाठ्यपुस्तकं आणि इयत्ता सोडली तर काहीच सारखं नाही. आमची भाषा एकसारखी नाही, आमचे विचार एकसारखे नाहीत, शिक्षणातून मिळणारा फायदा आमच्यासाठी एकसारखा नाही, आम्ही वाचत असलेली पुस्तकं एकसारखी नाहीत, आम्ही पाहत असलेले सिनेमेसुद्धा एकसारखे नाहीत, आमच्या भावना एकसारख्या नाहीत, आमचं खाणं एकसारखं नाही, मग आमच्यात समान, एकसारखं म्हणावं असं आहे तरी काय? विविधतेतल्या एकतेचा अनुभव मला पहिल्यांदा इथे आला आणि हा पहिला अनुभव फार गोड होता. 

अशाच अनेक गोष्टी शोधण्यासाठी आमचा प्रवास सुरू होणार होता ज्यासाठी आम्ही सगळेच अगदी आतुर झालो होतो.


...तर 27ऑक्टोबरला आमच्या सायकल यात्रेला खरी सुरुवात होणार होती. सकाळी सहाला म्हणजे सूर्योदय व्हायच्या आधी निघायचं असं आम्ही आदल्या दिवशी ठरवलं होतं. पण त्या दिवशी आम्हाला निघायला चांगले अकरा वाजले. निघण्यापूर्वी धुळ्यातली काही मंडळी आम्हाला निरोप द्यायला आली होती. त्यांत अकरा कधी वाजले ते कळलंच नाही... शेवटी आम्ही निघालो.

भल्या दुपारी धुळे शहरातून आम्ही प्रभातफेरी काढली आणि बाराच्या सुमारास हायवेला लागलो. आज आमचा मुक्काम असणार होता अंमळनेर गावात. धुळे ते अंमळनेर हे अंतर चांगलं 50 किलोमीटरचं होतं. पण आमचा पहिलाच दिवस असल्यानं आमचं कुणाचंच किलोमीटरकडे वगैरे लक्ष नव्हतं. एकमेकांशी गप्पा मारत, बोलत, एकदम वेगात आम्ही चाललो होतो. आता एवढ्या मोठ्या यात्रेचा सगळ्यांचाच पहिला अनुभव होता त्यामुळे सावकाशीने जावं, समूहानं चालावं, रस्त्याच्या एका बाजूनं जावं असे कोणतेही नियम न पाळता आमच्या सायकली धावत होत्या. आम्हा दहा जणांपैकी पैकी नऊ जण एकाच वयाचे होते. आमचे विनोददादा मात्र चांगले 40-45चे होते आणि कधीकधी वयापुढे उत्साहाचं काही चालत नाही. त्यामुळे दुपारच्या जेवणानंतर त्यांचा वेग मंदावला. दादा हळूहळू सायकल चालवताहेत म्हणून आम्हीही वेग कमी केला. खरंतर दमले सगळेच होते पण कारण मात्र दादांचं होतं.

शेवटी दमूनभागून संध्याकाळच्या पाचसहा वाजता आम्ही एकदाचे अंमळनेरला पोहोचलो. अंमळनेर तसं काही मोठं नाहीये पण छान आहे. हळूहळू शहर होण्याकडे अंमळनेरची होत असलेली वाटचाल सहज दिसून येते. तिथे पोहोचताच स्थानिकांनी आमचं स्वागत केलं. काही वेळ असाच इकडेतिकडे घालवल्यावर आम्ही साने गुरुजींचं स्मारक बघायला निघालो. ते गावापासून चांगलंच बाहेर होतं चारपाच किलोमीटरवर. एकतर आधीच एवढे सगळे दमलेले, त्यात स्मारकात जाऊन काय बघायचंय असा प्रश्न आम्हा मुलांना पडला होता. त्यामुळे आम्ही आळस करत होतो. पण शेवटी निघालो. स्मारकात पोहोचताच आमची कंटाळलेली मनं अगदी रिफ्रेश झाली. 

स्मारक गावाबाहेर असल्यामुळे तिथे खूप शांतता होती. त्या शांततेच्या सोबतीला संध्याकाळचा आल्हाददायक वारा. सगळे कसे अगदी हलके होऊन गेले. तिथंच बसून मग आम्ही साने गुरुजींची काही गाणी म्हटली आणि काही वेळ अगदी शांत बसलो. सगळ्या दिवसांचा शेवट असाच झाला तर किती मजा येईल ना...! अशी संध्याकाळ यापूर्वी अनुभवली नव्हती म्हणूनच तर ही संध्याकाळ कायमची लक्षात राहिलीये. काही वेळानं आम्ही परत निघालो. पहिला दिवस अगदी मजेत गेला होता....

- सृजन नीला हरिहर
srujanhw@gmail.com


सृजन नीला हरिहर या तरुणाच्या सायकल सफरीवरच्या अनुभवांवरचा दीर्घ लेख पाच भागांमध्ये कर्तव्य साधनावरून रोज क्रमशः प्रसिद्ध होईल. – संपादक

Tags: सर्वोदय संवाद सायकल यात्रा सृजन नीला हरिहर सायकल यात्रा लेखमाला Sarvodaya Samvad Cycle Yatra Srujan Neela Harihar Cycle Yatra Series Load More Tags

Comments:

Vijay Jadhav

फारच छान. असेच आनंदी राहा आणि लिहीत राहा . तरुणाईला साद घालणारा हा लेख आहे

पांडूरंग आत्माराम थोरात

असे धाडस तरुणाईच करु जाणे. दिवस कोरोनाचे होते. उगवणारा प्रत्येक दिवस काळजीचा तेंव्हा आठ महिने झाले असले तरी सुरक्षित नव्हतेच. तेंव्हा ही सर्वोदय यात्रा निश्चितच धाडसाचीच होती. धुळे ते पवनार असेही शिर्षक उचित राहीले असते. कारण धुळे, पवनार आणि सर्वोदय म्हटले की आचार्य विनोबा भावे नजरेसमोर येतात. सृजन आणि टीमचे अभिनंदन आणि कौतुकही.

Add Comment