जगाच्या इतिहासात सर्वांत जास्त काळ व सर्वाधिक प्रभावशाली साम्राज्य म्हणून जी काही नावे घेतली जातात त्यात रोमन साम्राज्य अग्रभागी असते. या साम्राज्याचा प्रभाव युरोपातील धर्म, भाषा, संस्कृती व कला, क्रीडा या क्षेत्रांवर अधिक राहिला. रोम ही इटली देशाची राजधानी आहे. सध्या सहा कोटी लोकसंख्या व महाराष्ट्र राज्याएवढे क्षेत्रफळ असलेला हा देश कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या संकटात सापडला आहे. कोरोनामुळे सर्वाधिक रुग्ण व सर्वाधिक मृत्यू होत असलेल्या देशांमध्ये आज इटली अग्रभागी आहे. इटलीत मृत्यू पावलेल्या लोकांच्या शवपेटिकांच्या न संपणाऱ्या रांगा टीव्हीवर पाहायला मिळाल्या, तेव्हा मन पार उध्वस्त झालं... आणि 2009 ची आमची इटलीची सफर पुन्हा पुन्हा आठवत राहिली. या काळात अशा आठवणी अनमोल झाल्या आहेत...
दिल ढुंडता हैं फ़िर वही फुरसतके रात दिन... असं दिल कधीपासून गुणगुणत होतं, भुणभुणतही होतं. शेवटी दिलाला फुरसत देण्यासाठी आरतीसोबत सात दिवसांची इटलीची सफर करायचं ठरवलं. उडत उडत वाचलेला इतिहास, फेलिनीचा ‘अमरकॉर्ड’ आणि कोपोलाचे ‘गॉडफादर’सारखे चित्रपट, ‘एव्हरीबडी लव्स रेमंड’ ही विनोदी मालिका, इटालियन जेवण आणि काही इटालियन व्यक्तिंशी आलेले प्रत्यक्ष संबंध यांमुळे इटलीबद्दल विलक्षण कुतुहल वाटत आलेलं होतं. इंटरनेटवर थोड्या क्लिक्स झाल्या, एक-दोन फोन झाले आणि रोम, फ़्लोरेन्स व वेनिस बघण्याचा बेत पक्का झाला.
भारताची जशी एयर इंडिया तशी इटलीची ऍलिटालीया. पण या हवाईसेवेचं आदरातिथ्य म्हणजे एकंदरीत आनंदच होता. इटालियन भाषा ऐकायला तशी खडखडीतच. त्यातून हवाई सेवकांच्या चेहऱ्यावर कायम उद्धट आणि त्रासिक भाव. हसू सहज काही उमटायला तयार नाही. पर्याय सुचवण्याऐवजी ठामपणे नाही सांगण्याकडेच कल अधिक. ‘गिळा मेल्यांनो’ म्हणत त्यांनी पहिलं जेवण समोर आदळलं. ते जेवण इतकं भिकार की इटालीयन जेवणाचं लोक एवढं कौतूक का करतात असा प्रश्न पडावा.
जेवण झाल्यानंतर मात्र हवाईसेवकांचा उत्साह वाढलेला दिसला. काही जण कोपऱ्यात एकत्र आले आणि खिडकी जवळच्या राखीव खुर्च्यांच्या भोवती पडदे लावायला लागले. आमच्यासकट इतर प्रवासी हा प्रकार कुतूहलाने बघत होते. कुणाला शंका आली की कदाचित कुणी बाई विमानात प्रसूत होणार असेल. पण असं काही अचाट बघायला मिळालं नाही. हवाई सेवाकांचा हा सारा खटाटोप स्वत:च्या झोपण्याच्या तयारीसाठी होता. जेवण झाल्यानंतर इटालियन प्रथेप्रमाणे ते वामकुक्षी घेत होते. स्वत:चीच सेवा करणारा हवाईसेवकांचं पथक मी पहिल्यांदाच पाहत होतो.
जेवणानंतर अंधार करण्यात आला. मधल्या जुनाट स्क्रीनवर एक भिकार इंग्रजी आणि एक इटालियन चित्रपट दाखवण्यात आला. भारताच्या चित्रपटाच्या तुलनेत इटालियन चित्रपट सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत आहे असं जाणवलं. नऊ तासांचा प्रवास शेवटी एकदाचा आटोपला आणि रोमच्या लियोनार्डो विंची - फ्युमिनिको एयरपोर्टवर विमान उतरलं. रोमचं विमानतळ अतिविशाल आहे. विमानातुन उतरून सामानाच्या जागेपर्यंत पोहोचायला छोटा प्रवासच करावा लागला. पासपोर्ट चेकसाठी एका विस्कळीत रांगेत उभे राहिलो. आम्ही खिडकीवर पोहचेपर्यंत खिडकीच्या पलीकडच्या व्यक्तीचं काहीतरी बिनसलं आणि त्यानं आपली जागा सोडून फेरफटका मारण्याचा निर्णय घेतला.
धड ना प्रवासात धड ना ‘रोम’मध्ये अशा त्रिशंकू स्थितीत आम्ही काही क्षण घालवले. शेवटी शेजारच्या अधिकाऱ्याने चरफडत का होईना आमचे पासपोर्ट हातात घेतले आणि रुक्षपणे ‘प्रेगो’ म्हणून आमची तपासणी पुर्ण केली. ‘प्रेगो’ हा इटालीयन शब्द गोंधळात टाकणारा आहे. कारण संदर्भानुसार त्याचे अनेक अर्थ आहेत – पुढे व्हा, आपल्या नंतर, कृपया, अच्छा, स्वागत आहे. सद्यस्थितीत आम्ही प्रेगोचा अर्थ स्वागत आहे असा घेतला आणि ‘रोम’मध्ये प्रवेश केला.
सामान घेऊन बाहेर पडलो. एक प्रसन्न चेहऱ्याची व्यक्ती आमच्या नावाचा फलक घेऊन उभी होती. स्वत:ची ओळख त्याने ‘ऍलेक्सांड्रियो’ सांगितली. तो आम्हाला हॉटेलपर्यंत पोहोचवणारा ड्रायवर होता. त्याने सामान गाडीत चढवलं आणि गाडी हॉटेलच्या दिशेला वळवली. बाहेर रिमझिम पावसात रोमचं पहिलं दर्शन घडत होतं. मधेच ऐतिहासिक स्मारकं दिसली.
वस्तीत पोचलो. तिथं तळमजल्यावर दुकान आणि वरच्या इमारतीत लोकांचे निवास होते. घरांना बाल्कनी होत्या. बाल्कनीत फ़ुलांच्या कूंड्या होत्या. काही भाग तर भारतातलेच वाटत होते. गाडीतल्या काचेतून दिसणाऱ्या या दृष्यापेक्षा वर्तमान इटलीचे मार्मिक दर्शन घडवले ते ऍलेक्सांड्रियोने. त्याचं इंग्रजी बेताचं असलं तरी त्याची संवाद साधायची इच्छा होती. माझं बोलणं कळलं की तो ‘अटेन्शीय़ोन’ असं म्हणून कळलं कळलं असं सांगायचा.
“इटलीचे राजकारण डावे आणि उजवे मिळून चालवतात. बरीच वर्षं शिक्षण आणि कायदा डाव्यांनी चालवल्यामुळे नवीन पिढीवर डाव्या विचारसरणीचा परिणाम अधिक आहे. इटलीयन लोकांच्या शिक्षणाची आणि तब्येतीची काळजी सरकार घेते. पण मध्यमवर्गी लोकांना सतत महागाईला तोंड द्यावं लागतं. पेट्रोल परवडत नाही. बॅंकांचे व्याजदर ज्यादा आहेत. इटलीचे चलन ‘लिरा’ असताना ज्या गोष्टी हजार लिरात यायच्या त्या आता पन्नास युरोतही येत नाहीत. इटलीत लहान धंदे जोरात चालू आहेत पण जर्मनीसारखे मोठे उद्योग धंदे इटलीत नाही. इटलीत पोर्क सर्वोत्कृष्ट आहे पण अमेरिकेची बाजारपेठ त्यासाठी खुली नाही. न्यूयॉर्क एक आधुनिक अग्रणी शहर आहे पण रोमसारखं ऐतिहासिक शहर मात्र दुसरं कुठलं नाही. पॅरीसच्या ‘लुव्र’ या प्रख्यात म्युझियममध्ये अर्ध्याहुन अधिक कलाकृती इटालियन कलावंतांच्या आहेत”- इती ऍलेक्सांड्रियो उवाच.
आतापर्यंत अनुभवलेल्या इटालियन शुष्क वागणुकीचं बोलघेवडा ऍलेक्सांड्रियो परिमार्जन करत होता. अर्धा तास कसा गेला कळलं देखील नाही. ऍलेक्सांड्रियोनी खऱ्या अर्थानं इटलीत आमचं ‘प्रेगो’ केलं. त्याचे धन्यवाद मानून आम्ही आमच्या ‘डेले नॅझीयोनी’ या हॉटेलमध्ये प्रवेश केला. रोम न्यूयॉर्कपेक्षा सहा तासांनी पुढे आहे. जेटलॅग आणि प्रवासाच्या दगदग. त्यामुळं हॉटेलमध्ये पोहोचल्या पोहोचल्या तीन तास ताणून दिलं. पण डोक्यात सतत ही जाणिव होती की वेळ कमी आणि बघायची ठिकाणं खूप आहेत. संध्याकाळी आम्ही दोघांनी स्वत: ला हॉटेलच्या बाहेर ढकललं.
आमचं हॉटेल रोमच्या अगदी मध्यवर्ती भागात होतं. हॉटेलच्या रिसेप्शन डेस्कला आजुबाजुची माहिती विचारली. त्यांनी नकाशे दिले. मी खिश्यातला फोन व पाकीट चाचपडून बघितलं आणि आम्ही रोमच्या पहिल्या फेरफट्क्यासाठी सज्ज झालो. हॉटेलपासून चार पावलावर एका वळणावर नाट्यपुर्ण पद्धतीने ‘त्रेवीच’ विशाल कारंजं दृष्टिपथात आलं. ‘त्रेवी’ म्हणजे तीन मार्ग जोडणारी त्रीवेणी. पुरातन रोममध्ये एका कुमारिकेच्या मदतीने 14 मैल लांब शुद्ध पाण्याचा उगम सापडला होता. हे पाणी शहराला पुरवण्यासाठी ओढे बांधले गेले. त्रेवीच कारंजं त्या ओढ्यांचं गोमूख आहे. कारंजाच्या मागे पाण्याच्या शोधाचे वर्णन आहे. कारंजात पैसे टाकल्यास इच्छापुर्ती होते अशी वदंता आहे. खरं-खोटं देव जाणे. पण त्रेवीच कारंजं आहे देखणं. दिवसाच्या कुठच्याही प्रहरी जा, पाऊस असो वा उन, नेहमी गर्दीने बहरलेलं असतं.
रोम शहर ‘वि’ आणि ‘पियाज्जा’ यांनी गुंफलेलं आहे. ‘वि’ म्हणजे मार्ग आणि ‘पियाज्जा’ म्हणजे चौक. रोमचे सगळे पत्ते वि आणि पियाजाच्या संदर्भात दिले जातात. एवढ्या ज्ञानप्राप्तीनंतर आम्ही अधिक भटकायचं ठरवलं. थोडं पुढं गेल्यानंतर पुरातन कोरीव खांबांची ओळ दिसली. त्यावर जुनाट रोमन आकडे कोरलेले होते. हे काहीतरी महत्वाचं असणार असं वाटत होतं. आमच्या हॉटेलजवळ पॅंथियन नावाची प्रसिद्ध जागा आहे असं वाचलं होतं. मग हेच ते पॅंथियन आहे असा कयास बांधून त्या जागेचा फोटोही काढला. आणखीन काही वि आणि पियाजा पार केल्यानंतर आम्ही स्पॅनिश स्टेप्सला जाऊन पोहोचलो.
कोण्या एके काळी ग्रेगरी पेक आणि ऑड्री हेपबर्न यांचा रोमन हॉलीडे पाहिला होता. त्यातला स्पॅनिश स्टेप्सचा देखावा डोक्यात होता. पण प्रत्यक्षापेक्षा हे स्थळ सिनेमातच अधिक रोमॅंटिक वाटत. या पायऱ्यांच्या जवळच एका गल्लीच्या कोपऱ्यावर आम्ही फेरीवाल्याकडून भाजलेले चेस्टनट घेतले. आपल्याकडे मिळणाऱ्या शिंगाड्याच्या चवीचे होते. पण ओल्या हवेत खायला छान वाटले. पुढे गल्लीत गुची, लुई वुटॉन, जिओर्जिओ अरमानी, वरसाची अशा नामवंत इटालियन डिजायनर्सची दुकानं होती. या दुकानांतल्या मालाची किंमत बघितली तर डोळे पांढरे होतात.
‘लुई वुटॉन’च्या दुकानात एक छोटी पर्स बघितली. भारतात सखी कलेक्शन्स किंवा तत्सम दुकानात तशी पर्स दोनशे रुपयाला विकताना सुद्धा कुठच्याही दुकानदाराला नाकीनऊ आले असते. पण तशाच पर्स वर एल आणि व्ही ही इंग्रजी अद्याक्षरांची बाळबोध नक्शी काम करून हा लुइ वुतोन नामक दुकानदार ही पर्स दिवसा ढवळ्या 11800 रुपयाला बेदरकारपणे विकत होता. आणि त्याहून कमाल म्हणजे लोक विकत घेत होते. 11800 ही किंमत पर्समधे वापरलेल्या मालाची आणि कारीगिरीची नसून जगातल्या सगळ्या मोठ्या विमानतळांवर आणि चकचकित मासिकांमधे सुपर मॉडेल्सना घेऊन केलेल्या लुइ वुतोनच्या नावाच्या जाहिरातीची होती. आरतीला मी माझ्या मनातले हे विचार सांगितले नाहीत. ती या गल्लीत येऊन सद्गदित झाली होती. या चोरबाजारातून बाहेर पडल्यावर आम्हाला प्रचंड भूक लागली. वाटेत घेतलेल्या काही गोष्टी ठेवायला हॉटेलमधे परत गेलो.
रिसेप्शनला जवळपासच्या चांगल्या खाण्याच्या जागा विचारल्या. त्यानी पॅंथियन जवळच्या एका रेस्टरॉंचा पत्ता सांगितला. नुकतच पॅंथियन पाहिलेलं होतं. त्यामुळं आत्मविश्वासानं निघालो पण वि आणि पियाज्जा यांच्या जाळ्यात असे काही अडकलो की पाऊण तास आम्ही त्याच परिसरात गरगर फिरत राहिलो. पोटातले कावळे ओरडून रडकुंडीला आले होते. शेवटी कळलं की ज्याला मी पॅंथियन समजत होतो ते पॅंथियन नव्हतंच. एकदा ही चूक कळल्यावर रेस्टरॉं मिळायला वेळ लागला नाही.
जेवणाचा मेनू इटालियन भाषेत होता. त्यात इटालियन जेवणातल्या पाच कोर्सची मांडणी होती. पाचही भागातलं मागवून खावं लगणार का हा पहिला प्रश्न होता. कारण तेवढं खाणं पोटाला आणि पाकिटाला झेपणारं नव्हतं. त्यात ओळखीचं काही दिसतंय का हे पहायचा प्रयत्न केला. आरती शाकाहारी आहे. त्यामुळं जे मागवू त्यात मांस-मच्छी नाही याची हमी हवी होती. शेवटी वेटरशी तोडक्यामोडक्या इंग्रजीत संवाद साधला. सगळ्या शंकांचं निरसन झालं आणि रोममधल्या पहिल्या इटालियन जेवणाची ऑर्डर आम्ही दिली.
आरतीने पालक आणि चीजची भरली रॅविओली मागवली आणि मी मेडीटेरीयन समुद्रात सापडणारा टर्बो मासा मागवला. जेवणासोबत पांढरी वाईन मागवली. इथे वाईन ग्लासाच्या नव्हे तर बाटलीच्या हिशोबाने मिळते. आतापर्यंत अमेरिकेत खाल्लेल्या इटालीयन खाण्यापेक्षा हे जेवण कितीतरी चविष्ट होतं. खायचा-प्यायचा मनमुराद आनंद घेऊन आम्ही हॉटेलवर पोहोचलो. रोममधला पहिला दिवस संपला. उद्या पाॅम्पे शहर बघण्यासाठी लवकर उठायचं होतं.
(या लेखाचा दुसरा आणि तिसरा भाग अनुक्रमे उद्या आणि परवा प्रसिद्ध करण्यात येईल.)
- राजीव भालेराव
rajivpost@gmail.com
(लेखक, मागील दोन दशके अमेरिकेत स्थायिक असून, सध्या महाराष्ट्र फाऊंडेशन ( अमेरिका ) या संस्थेचे अध्यक्ष आहेत.)
Tags: इटली रोम प्रवासवर्णन rajiv bhalerao Italy Rome Load More Tags
Add Comment