फ्लोरेन्सचं सौंदर्य आणि अनोखं व्हेनिस...

इटली प्रवासवर्णनाच्या तीन भागांच्या मालिकेतील तिसरा लेख

व्हेनिस शहरातील कनॅल आणि बोटी. फोटो सौजन्य: unsplash.com

जगाच्या इतिहासात सर्वांत जास्त काळ व सर्वाधिक प्रभावशाली साम्राज्य म्हणून जी काही नावे घेतली जातात त्यात रोमन साम्राज्य अग्रभागी असते. या साम्राज्याचा प्रभाव युरोपातील धर्म, भाषा, संस्कृती व  कला, क्रीडा या क्षेत्रांवर अधिक राहिला. रोम ही इटली देशाची राजधानी आहे. सध्या सहा कोटी लोकसंख्या व महाराष्ट्र राज्याएवढे क्षेत्रफळ असलेला हा देश कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या संकटात सापडला आहे. कोरोनामुळे सर्वाधिक रुग्ण व सर्वाधिक मृत्यू होत असलेल्या देशांमध्ये आज इटली अग्रभागी आहे. इटलीत मृत्यू पावलेल्या लोकांच्या शवपेटिकांच्या न संपणाऱ्या रांगा टीव्हीवर पाहायला मिळाल्या, तेव्हा मन पार उध्वस्त झालं... आणि  2009 ची आमची इटलीची सफर पुन्हा पुन्हा आठवत राहिली. या काळात अशा आठवणी अनमोल झाल्या आहेत... तीन भागांच्या मालिकेतील हा तिसरा लेख...

दुपारी आम्ही फ्लोरेन्स बघायला बाहेर पडलो. पहिले ठिकाण निवडलं ते होत उफ्फिजी संग्रहालय. या संग्रहालयात बोटिचेली, मायकलअँजेलो, लिओनार्दो दा विंची, राफाएल्लो, जिओतो अशा नावाजलेल्या कलाकारांच्या कलाकृती होत्या. संग्रहालयातील प्रवेशाची रांग इतकी हळूहळू पुढे सरकत होती की संग्रहालय पाहण्याचा नाद आम्ही सोडला आणि तिथून निघालो. काही किरकोळ जागा बघितल्या आणि थोडंस खाऊन पियाज्जले मायकलअँजेलोला जाऊन पोहोचलो. उंच पर्वतावरचं हे मायकलअँजेलोचं स्मारक आहे. मायकलअँजेलोच्या डेवीड या शिल्पाची प्रतिकृती इथे उभारलेली आहे. या ठिकाणावरून फ्लोरेन्स शहराचे विहंगम दर्शन होते. उंच मनोरे, चर्चचे विशाल गोल घुमट आणि आर्नो नदी. फ्लोरेन्सची जगातल्या सुंदर शहरात गणना का होते ते इथं कळतं. रोमसारखं फ्लोरेन्स शहर अंगावर येत नाही पण त्याचं महत्त्व आणि सौंदर्य समजायला अभ्यास मात्र करावा लागतो. 

जगाला मध्ययुगातून आधुनिक युगात आणण्यात फ्लोरेन्सचा मोठा वाटा होता. युरोपच्या भरभराटीमागे फ्लोरेन्सच्या भांडवलदारांचं अर्थकारण होतं. मेडीची, डान्टे, मायकलअँजेलो आणि लिओनार्दो दा विंची यांच्यासारखे दिग्गज फ्लोरेन्सचे रहिवाशी होते. मेडीची कुटूंबातली कॅथरीन पुढे फ्रान्सची राणी झाली. फ्रान्सच्या सांस्कृतिक जडणघडणीत तिचा मोठा वाटा होता. काट्या-चमच्यांनी कसं खायचं हे फ्रान्सला कॅथरीनने म्हणजे पर्यायाने इटलीने शिकवले. रोमच्या व्हॅटिकनमध्ये आणि फ्लोरेन्सच्या म्युझियममध्ये एक गोष्ट जाणवली, बहुतेक चित्र शिल्पांत माता आणि पुत्र, किंवा देव आणि पुत्र, किंवा एकटा पुरूष, किंवा अनेक पुरूष दिसतात. स्त्री आणि पुरूषांमधल्या प्रेम भावनेचं चित्रण इथे अभावानेच आढळलं. ते काम बहुदा अजंठा एलोराच्या शिल्पकारांवर सोपवले असावे.

फ्लोरेन्सचा दुसरा दिवस टसकनी प्रांताची झलक बघण्याचा होता. सकाळी आम्ही बस स्थानकावर पोहोचलो. एका शुभ्र हसऱ्या चेहेऱ्याचा बाईने आमच्याशी संवाद साधला. नंतर कळलं की आजच्या टूरची ती गाईड आहे. तिने सर्वांना आपली ओळख करून दिली. तिचं नाव होतं बेकी. बेकी मुळची ब्रिटिश. शाळा संपवून ती ब्राझील, नेपाळ, दिल्ली अशी वर्षभर परिक्रमा करत राहिली. मग ग्रॅज्युएट झाली. वर्षभर नोकरी केली आणि सहा महिन्यांसाठी फ्लोरेन्सला आली. तिथे एका इटालियन व्यक्तीच्या प्रेमात पडली आणि फ्लोरेन्सची रहिवासी झाली. आठवड्यातून दोन दिवस ती टूर गाईड म्हणून काम करते. बसमधल्या सगळ्या पर्यटकांनी दिवसभराकरता आनंदाने स्वत:ला बेकीच्या हवाली केलं.

आम्ही बसमध्ये बसलो. फ्लोरेन्स शहराचे सृष्टी सौंदर्य बसमधून निरखू लागलो. आमचा पहिला थांबा होता सियेना या ठिकाणी. सियेना टसकनी प्रांतातल्या डोंगरातील एक शहर आहे. आमची बस डोंगराच्या पायथ्याशी थांबली. शहरात पोहोचायला आम्हाला एस्केलेटरनी वर चढावं लागलं. जगातली सर्वांत जुनी बॅंक इथे असून ती अजूनही कार्यरत आहे
 
आपलं रोमन नातं दाखवण्यासाठी कुत्रीच्या आचळातून स्तनपान करणाऱ्या रोमलस आणि रेमसचे पुतळे शहरात आहेत. रोमचं नाव रोमलसवरून पडले. पण गावाची खरी शान आहे पियाझा डेल कॅम्पो नावाचा चौक. या चौकाचे नऊ भाग शहराच्या नऊ विभागाचं प्रतिनिधित्व करतात. हा चौक शहराच्या ऐक्याचं प्रतिक आहे. वर्षाच्या सुरवातीला शहराचा मेयर शहराच्या प्रत्येक विभागाला एक घोडा बहाल करतो. जुलै आणि ऑगस्टमध्ये या चौकात त्या घोड्यांची शर्यत होते. प्रत्येक विभाग मोठ्या चुरशीने ही शर्यत लढतो. खरं तर ही शर्यत जेमतेम साडेतीन मिनिटे चालते, पण त्याची तयारी आणि शर्यत संपल्यानंतरचा विजयी जल्लोष वर्षभर चालतो. हे ऐकल्यावर मला आपल्याकडची दहीहंडी आठवली. सियेनात दोन तास फिरल्यानंतर आम्ही परत बेकीच्या भोवती जमलो. दुसरा मुक्काम होता विनयार्डला आणि तिथेच जेवणसुद्धा होणार होते. बस सुरू झाली तसं आकाशात काळोख दाटू लागले आणि तितक्यात पाऊसही सुरू झाला.
 
विनयार्ड म्हणजे द्राक्षांचा मळा. इथे द्राक्षांच्या बागा फुलवणे आणि द्राक्षांची वाईन करणे, असे दोन्ही उद्योग चालतात. पावसामुळे आम्हाला द्राक्षाच्या मळ्यात फिरता आलं नाही. पण आम्हाला वाईन कशी बनवतात याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. एका हॉलमध्ये आमच्या जेवणाची व्यवस्था केली होती. जेवायच्या आधी वाईनचा आस्वाद कसा घ्यावा हे सांगण्यात आलं. 

आमच्या बाजूला एक ऑस्ट्रेलियन कुटूंब होतं आणि एक कॅनडामधून आलेले जोडपे होते. गप्पा मारता मारता खाण्यापिण्यात वेळ झकास गेला. एक लक्षात आलं, की जेवणाची व्यवस्था अशा तऱ्हेने केलेली होती की वाईनचा आस्वाद अधिक चांगला घेता यावा. पाऊस नसता तर अधिक मजा आली असती असा विचार प्रत्येकाच्याच मनात रेंगाळत राहिला. बस सॅन जिमिनॅनोला लागेपर्यंत सगळ्यांनी एक डुलकी काढली. सॅन जिमिनॅनोला पोहोचलो तोपर्यंत पाऊस थांबला होता.
 
सॅन जिमिनॅनो हे तट असलेल्या डोंगरात वसलेले जुने गाव आहे. इथले सरदार आपलं वर्चस्व ठसवायला उंच मनोरे बांधायचे. त्यामुळे गावत बरेच मनोरे आहेत. दुरून पाहिल्यास गाव न्यूयॉर्क सारखे दिसते. गावाचं रुपांतर मात्र आता बाजारपेठेत झालं आहे. त्यामुळे इथे पर्यटक बरीच शॉपिंग करतात. याच परिसरात आम्ही इथल्या प्रसिद्ध जिलाटोचा आस्वाद घेतला. जिलाटो म्हणजे इटालियन आईस्क्रिम. गाव डोंगरावर असल्यामुळे आजूबाजूच्या टसकनी सृष्टीसौंदर्याचा अस्वाद घेता येतो.

दिवसातील शेवटच ठिकाण होतं पिसाचा मनोरा. इटलीला जाऊन पिसाचा मनोरा नाही पाहिला तर इटलीला जाणं व्यर्थ आहे असा एक समज आहे. बांधकामाचं चुकीच तंत्र, लढाया आणि इतर अनेक कारणांमुळे पिसाचा मनोरा झुकला आणि जगप्रसिद्ध झाला. खरं सांगायचं तर पिसाचा परिसर अपेक्षाभंग करणारा ठरला. प्रवेशाच्या ठिकाणी विक्रेत्यांची झुंबड उडाली होती. आम्ही पिसाच्या 294 पायऱ्या चढलो. वर गेल्यावर फार काही मोहक दृष्य पाहायला मिळालं नाही. पिसाचा मनोरा पाहिला असं आता लोकांना सांगता येईल एवढच समाधान होतं. टसकनी प्रांत सर्वच दृष्टीने सुजलाम सुफलाम आहे. नैसर्गिक सोंदर्य, द्राक्षाचे मळे, चविष्ट जेवण सगळंच अप्रतिम. असे म्हणतात की इथल्या डोंगरांमधले संगमरवर मायकलअँजेलो आपल्या शिल्पांसाठी वापरायचा.

दिवसाअखेर बस फ्लोरन्सला पोहोचली. बेकीने रात्रीच्या जेवणाचं ठिकाण सुचवलं तिथं जेवायला गेलो. रेस्तरॉंच्या मालक लुचियानोला बेकीचं नाव सांगितल्यावर त्यांनी आमच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली. जेवणात प्रथमच काळा भात खाल्ला. टसकनी खाण्याचा अस्वाद घेत फ्लोरेन्समधला शेवटचा दिवस संपवला. सुटीचे उरलेले दोन दिवस व्हेनिसमध्ये जाणार होते...

व्हेनिसला आम्ही दुपारी पोहोचलो. स्टेशनवरून बाहेर पडून बोट पकडली. समुद्राच्या पाण्यावर वसलेल्या व्हेनिसमध्ये बोटी शिवाय प्रवास करताच येत नाही. बोटीला इथं वेपरातो म्हणतात. बोटीचा वापर इथं बस किंवा टॅक्सी सारखा केला जातो. वेनिस शहर 117 बेटांच संकुल आहे. या बेटांमधून ग्रॅंड कनॅल वाहतो ज्यावरून बोटीची मुख्य वाहतूक चालते. या ग्रॅंड कनॅलशी जोडलेले छोटे कनॅल बेटांच्या मधून जातात. चित्रपटात जो रोमॅंटीक गंडोला दाखवतात तो या छोट्या कनॅल मधून जातो. आम्ही राहिलो लिडो नामक बेटावर आणि फिरलो सॅन मार्को, मुरानो आणि बुरानो या बेटांवर. व्हेनिस सुंदर म्हणण्यापेक्षा अनोखं आहे.

पहिल्या दिवशीच्या संध्याकाळी आम्ही सॅन मार्कोमध्ये फिरायला गेलो. त्यावेळी जेवायची वेळ झालेली असल्यामुळे कदाचित रस्त्यांपेक्षा गल्ल्यांमधली वर्दळ अगदी कमी होती. बोटीतून उतरून आम्ही एका गल्लीत शिरलो, मग एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत मग एका चौकात मग पुन्हा गल्लीत मग कनॅल मग पुन्हा गल्ली. थोडावेळ गल्ली, कनॅल चौकांचं कौतुक केलं पण हळूहळू आपण हरवत असल्याची जाणिव व्हायला लागली. नकाशाही घेतला नव्हता. शेवटी एकाने बोटस्टेशनची दिशा दाखवली. ही बोट वेगळ्याच लाईनीची होती. म्हणजे सेंट्रल रेल्वेला उतरून आम्ही हार्बर लाईनला पोहचावं तशातला प्रकार होता. शेवटी दोन बोटींचा प्रवास करून परत हॉटेलवर पोहोचलो.

दुसऱ्या दिवशी मुरानो बेटावर गेलो. मुरानो बेट हे काच सामानाच्या कारीगिरीकरता प्रसिद्ध आहे. तिथल्या एका दुकानाने आमच्या विहारासाठी टॅक्सी नियोजित केली होती. आम्हाला नेण्यासाठी ती टॅक्सी हॉटेलसमोरच आली. आमच्या सोबत एक ऑस्ट्रेलियन जोडपे होते. त्यांच्याशी गप्पा मारत, एकमेकांचे फोटो काढत आम्ही मुरानोला पोहचलो. तिथं तापलेल्या काचेतून झुंबराचे भाग कसे तयार केले जातात याचे प्रात्यक्षिक आम्हाला दाखवण्यात आले. मग दुकानांतून फिरायला नेले. काचेपासून बनवलेल्या दुकानातल्या वस्तू अप्रतिम होत्या. काचेचे पक्षी, काचेचे झुंबर, काचेचे गुलदस्ते असे अनेक प्रकार. काही काचेच्या कलाकृतीत प्रकाश आणि रंगाचा सुंदर परिणाम साधण्यासाठी सोन्याचांदीची भुकटी टाकलेली होती. आम्ही काही तरी विकत घ्यावे म्हणून ते आमचे आतिथ्यशील स्वागत करत होते. 

एक सेल्समन आमच्यावर नजर ठेवून होता. कुठच्याही काचेच्या कलाकृतीत आम्ही जरा जरी उत्सुकता दाखवली की तो लगेच पुढे यायचा आणि ती कलाकृती कोणी केली, त्या मागील प्रेरणा काय होती, ती वेगवेगळ्या ठिकाणी ठेवली की कशी वेगवेगळी दिसते वगैरे  माहिती द्यायचा. बिचाऱ्याला आम्ही काहीतरी महागडं नक्की घेऊ अशी आशा होती. पण तो जेवढ्या हिरीरीने आम्हाला विकायचा प्रयत्न करू लागला तेवढाच आमचा त्या दुकानातून काहीही न घेण्याचा विचार दृढ होत गेला. शेवटी त्याचा डोळा चुकवून आम्ही दुकानातून सटकलो. 

मुरानो बेटावर फक्त काचसामनाचीचं दुकानं आहेत. एका दुकानावर एक विशेष पुणेरी पाटी पाहिली – 'येथे चाईनीज काच वापरलेले सामान मिळत नाही. जो कोणी चायनीज काचसामन या बेटावर विकतो तो मुरानोशी प्रतारणा करतो.' आमच्या मागे येणाऱ्या चायनीज पर्यटकांना ही पाटी वाचून काय वाटत असेल, असा डोक्यात विचार आला.

शेवटी लहानमोठी खरेदी करून आम्ही मुरानो बेट सोडून बुरानो या बेटावर पोहचलो. बुरानो बेट कशिदाकामासाठी प्रसिद्ध आहे. आम्ही त्या कशिदाकामाकडे जास्त लक्ष दिलं नाही. हे बेट वैशिष्ट्यपूर्ण आहे. इथल्या घरांबाहेरच्या भिंती लाल पिवळ्या निळ्या रंगांनी रंगवल्या होत्या. त्यामुळे सगळा परिसर रंगीत भासत होता. आणि हो, घराबाहेर कपडे वाळत घालण्याची इथे एक खासियत आहे. पटो ना पटो पण या गावात ते वाळत घातलेले कपडे परिसराचे सौंदर्य वाढवत होते.

लिडो इथं दुपारी जरा उशिरा पोहचलो. रेस्टरॉंच्या जेवणाच्या वेळा संपत आल्या होत्या. आम्ही शेवटची पंगत साधली. वेटरच्या चेहऱ्यावर नाखूशी होती. पण भुकेमुळे आम्ही कानाडोळा केला. जेवण तब्येतीत झालं. इटलीत माझा इतका मत्स्याहार झाला की माझ्याच पोटाचं मत्स्यालय होणार याची आरतीला खात्री वाटू लागली. संध्याकाळी लिडो बेटावर फिरलो. या बेटाच्या एका किनाऱ्याला ग्रॅंड कनॅल आहे आणि दुसऱ्या किनाऱ्याला एड्रियाटिक महासागर आहे. व्हेनिसचा चित्रपट महोत्सव याच बेटावर भरतो. वाटेत काही व्हेनिसवासी आपल्यासारखेच हौसिंग सोसायटीत रहातात हे पाहून बर वाटलं. फिरता फिरता सुर्यास्त झाला.

पहाटे टॅक्सीने पाण्यावरच्या सुसाट वेगाने आम्हाला वेनिसच्या मार्को पोलो विमानतळावर पोहचवले. मनाला प्रसन्नता आणि उभारी दिल्याबद्दल व्हेनिस आणि इटलीचे मनातल्या मनात आभार मानले आणि आम्ही घरी परतायची वाट धरली.

- राजीव भालेराव
rajivpost@gmail.com
(लेखक, मागील दोन दशके अमेरिकेत स्थायिक असून, सध्या महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका ) या संस्थेचे अध्यक्ष आहेत.)

वाचा इटली प्रवासवर्णनाच्या तीन भागांच्या मालिकेतील पहिले दोन लेख
1. प्रथम इटली पाहता...
2. वॅटीकनमधली चित्रं आणि रोमची वास्तुशिल्पं...

Tags: व्हेनिस लिओनार्डो विन्ची पियाझा डेल कॅम्पो जिलाटो सॅन जिमिनॅनो टसकनी मुरानो बुरानो Leonardo da Vinci Piazza del Campo Gelato Tuscany San Gimignano Murano Burano लिओनार्दो दा विंची Load More Tags

Add Comment