व्हॅटिकनमधली चित्रं आणि रोमची वास्तुशिल्पं...

इटली प्रवासवर्णनाच्या तीन भागांच्या मालिकेतील दुसरा लेख

सिस्टीन चॅपेल- व्हॅटिकन. फोटो सौजन्य: Governatorato SCV

जगाच्या इतिहासात सर्वांत जास्त काळ व सर्वाधिक प्रभावशाली साम्राज्य म्हणून जी काही नावे घेतली जातात त्यात रोमन साम्राज्य अग्रभागी असते. या साम्राज्याचा प्रभाव युरोपातील धर्म, भाषा, संस्कृती व  कला, क्रीडा या क्षेत्रांवर अधिक राहिला. रोम ही इटली देशाची राजधानी आहे. सध्या सहा कोटी लोकसंख्या व महाराष्ट्र राज्याएवढे क्षेत्रफळ असलेला हा देश कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या संकटात सापडला आहे. कोरोनामुळे सर्वाधिक रुग्ण व सर्वाधिक मृत्यू होत असलेल्या देशांमध्ये आज इटली अग्रभागी आहे. इटलीत मृत्यू पावलेल्या लोकांच्या शवपेटिकांच्या न संपणाऱ्या रांगा टीव्हीवर पाहायला मिळाल्या, तेव्हा मन पार उध्वस्त झालं... आणि  2009 ची आमची इटलीची सफर पुन्हा पुन्हा आठवत राहिली. या काळात अशा आठवणी अनमोल झाल्या आहेत... तीन भागांच्या मालिकेतील हा दुसरा लेख...

सकाळी बसमध्ये बसल्यावर सगळ्यांच्या डोक्यात पहिला प्रश्न होता – 'न्याहारीसाठी कधी थांबायचं?' कारण सकाळी सातलाच निघाल्यामुळे हॉटेलमधली न्याहारी हुकली होती. टूर गाईड वयस्कर होता आणि त्याच्या आवाजही थकलेला होता. 

बस सुरु झाली तशी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून सगळ्यांनी एक डूलकी काढली. आकाशातले ढग काही हटायला तयार नव्हते. मधेच कुठंतरी एक टेकडी लागली. त्यावर एक अलिशान राजवाडा होता. एकेकाळी हा राजवाडा जगात सगळ्यात मोठा होता असं टुर गाईडनं सांगितलं. मग काहीजणांनी काढायचे म्हणून त्याचे फोटो काढले. खिडकीतून दुतर्फा छत्रीसारखी दिसणारी झाडं दिसत होती. पाईनची ही झाडं रोमचं वैशिष्ट्य आहे. न्याहारीचा थांबा आला. सगळे उतरले. कॉफीचा घोट घशात गेल्यावर बरं वाटलं. 

इटलीमध्ये कॉफीचं बरंच प्रस्थ आहे. कॉफीचे प्रकार तरी किती – छोट्या कपातली अत्यंत कडक कॉफी - एस्प्रेसो, दुध घातलेले एस्प्रेसो - कपुचिनो,  दुध घातलेली मवाळ कॉफी - कॅफे लाते आणि असे अनेक प्रकार. बरं प्रत्येक प्रकारची कॉफी कधी आणि कशी प्यायची ह्याच्या बद्दलही कडक शास्त्र आहे. कपुचिनो ही फक्त सकाळीच प्यायची. जेवण झाल्यानंतर कधीही नाही. उभं राहून प्यायलेली कॉफी बसून प्यायलेल्या कॉफीपेक्षा बरीच स्वस्त असते. मला कॅफे लाते ही त्यातल्या त्यात आपल्या कॉफीच्या जवळची वाटली. पण कॉफीच्या दुधाला फेस आणल्याशिवाय इटालियन लोकांना चैन पडत नाही.

न्याहारी झाल्यानंतर बसमधले पॅसेंजर उत्साहीत झाले. गप्पांची कुजबूज वाढू लागली. ऑस्ट्रेलियन प्रवासी बरेच होते. काही तासांनी नेपल्स आलं. नेपल्स शहरामागे मोठा इतिहास आहे. मुळात हे शहर उभं केलं ग्रीक लोकांनी. शहाराला मनोहर समुद्र तट आहे. दुसऱ्या महायुद्धात या शहरावर सर्वाधिक बॉम्ब पडले होते. ‘मारगारीटा पिझ्झा’ हा मुळात नेपल्सचा हे कळल्यावर या शहराचं महत्व मला एकदम पटलं. पाऊस असल्यामूळे शहरात पायी फ़िरायला मिळाले नाही. शहराच्या मध्य भागात एक शानदार किल्ला आहे. शहर सोडता सोडता एका मोठ्या जाहिरातीवर ऐश्वर्या रायचा सुंदर चेहरा दिसला. त्यामूळे ती खरंच विश्वसुंदरी असल्याची खात्री पटली. मनात म्हटलं क्या बात है.

नेपल्सनंतर आला ‘माऊंट वेसुवियस’. ढगाळलेल्या हवेत हा डोंगर अत्यंत साधारण वाटत होता. पण पाॅम्पे शहर अनेक वेळा बेचिराख करणारा ज्वालामुखी या पर्वतात धगधगला होता हे कुणालाही खरं वाटणार नाही. शेवटी आम्ही ‘पाॅम्पे’ला येऊन पोहोचलो.

पाॅम्पेला पोहचेपर्यंत जेवायची वेळ झाली होती. जेवण टूरवाल्यांकडूनच होतं, त्यामूळे फारशा अपेक्षा नव्हत्या. जेवायला आमच्याबरोबर विक्टर नावाचा अमेरीकन आणि नॅगो नावाचा एक वयस्कर ऑस्ट्रेलियन होता. विक्टर सुपर मार्केटचा मॅनेजर होता आणि नॅगो निवृत्त होता. दोघेही बोलके निघाले. विक्टरला एकट्याने प्रवास करायची हौस होती. मग अमेरिकन राजकारण, अमेरिकेतली आरोग्य व्यवस्था या विषयांवर चर्चा रंगली. नॅगोच्या म्हणण्याप्रमाणे अमेरिकेत माणूस सहज बंदूक विकत घेऊन गोळीबार करू शकतो, पण इन्शुरन्स नसला तर स्वत:चा जीव वाचवू शकत नाही. गप्पांच्या नादात आणि भुकेमुळे जेवणाचा बेचवपणा जाणवला नाही. जेवणानंतर पाॅम्पेचे अवशेष पहायचे होते.

तीन हजार वर्षांपूर्वी पाॅम्पेचे शहर ‘वेसुवियस’च्या ज्वालामुखीच्या स्फोटामुळे बेचिराख होऊन राखेखाली गाडलं गेलं होतं. पाचशे वर्षांपूर्वी उत्खननात या शहराचा शोध लागला. तेव्हापासून पाॅम्पेचे अवशेष पर्यटकांचे आकर्षण ठरले आहेत. उत्खननाचा परिसर योग्य ठिकाणी कुंपण घालून काळजीपुर्वक जोपासला आहे. थोड्या चढावानंतर आपल्याला फोरमचे अवशेष दिसतात. फोरम म्हणजे गावाचं सामाजिक केंद्र. जिथे बाजार पेठ भरते, जिथे मंदिरं असतात, जिथे राजकारणाच्या चर्चा होतात, वाद होतात. ती भेटण्याची आणि गावासंदर्भात महत्वाचे निर्णय घेण्याची जागा असते. असे फोरम रोममधे ठिकठिकाणी आहेत. रोमन संस्कृतीच्या विकासात फोरमचं बरंच योगदान आहे. 

फोरम सरला की दिसतात अरूंद दगडी रस्ते आणि त्यांच्या आजुबाजूला असलेली दालनं. अशाच एका दालनाच्या गजाआड मातीची गाडगी-मडगी दिसतात आणि दुसऱ्या दालनात एक विलक्षण दृष्य पाहिला मिळतं. एका पुरूष आणि लहान मुलीचे कलेवर प्लास्टरचा कास्ट करून संवर्धन केलेलं होतं. पुरूष त्या मूलीला आगीतून वाचवण्याच्या प्रयत्नात होता. ते दृष्य बघून पोटात गलबलायला झालं. दगड मातीच्या ह्या ढिगाऱ्यात एकेकाळी मूलांचे हसण्या-खेळण्याचे आवाज असतील. एकाएकी त्या अवशेषांकडे बघायची माझी दृष्टी बदलली. 
 
आम्हाला मध्यमवर्गी आणि श्रीमंतांची घरं दाखवली. घरासमोर ‘आपलं स्वागत आहे’ असं कोरलेलं  होतं. घराला उजेडासाठी स्कायलाईट्स होते. भिंतींवर फ्रेस्को प्रकारची चित्रं होती. आंघोळीची उत्तम व्यवस्था होती. गावात खाद्यपदार्थ विकण्याची ठिकाणं होती, बेकरी होती. श्रीमंतांच्या घरात बाग बगीचे होते. घोड्यांना ठेवायची जागा होती. छंदीफंदीपणा करायला माडी देखील होती. एके काळी हे गाव जिवंत होतं याच्या खूणा जागोजागी होत्या. दोन तासांची परिक्रमा संपली तरी पाॅम्पे बराच काळ मनात रेंगाळत राहीलं. 

परतताना माऊंट वेसुवियस परत पाहिला. आताही तो शांत दिसत होता पण त्याच्या पोटातल्या निद्रिस्त ज्वालामूखी जागृत झाला तर या परिसराचं काय होईल याची कल्पना आली होती. दिवसभराचा प्रवास आणि पायपिटीमूळे थकवा आला होता. भूकही लागली होती. रात्री हॉटेलच्या अगदी जवळ असणाऱ्या रेस्टरॉंमध्ये खायला गेलो. एकतर जागा गिचमिडी होती. आम्हाला दोन टेबलांच्या मधे कोंबलं होतं. वेटरेसच्या चेहऱ्यावर आमच्यापेक्षा अधिक थकलेला भाव होता. कसंबसं खाणं पिणं संपवून आम्ही दिवस संपवला. उद्या रोम मधला शेवटचा दिवस होता. वॅटिकन आणि बरंच काही पहायचं होतं.

सकाळी उठून प्रथम ‘हॉप-इन हॉप-आऊट’ बसची तिकिटं काढली. पहिली भेट दिली ती व्हॅटिकनला. व्हॅटिकन म्हणजे पोपचं राज्य. रोममधला साधारण 110 एकरांचा हा भाग एक स्वतंत्र देशच आहे. पोपचा इटालीयन्सवर विश्वास नसल्यामूळे व्हॅटिकनचा सारा कारभार स्विस लोकं पाहतात. कदाचित मनात भक्तिभाव नसल्यामुळे असेल अथवा आपल्याकडे तीर्थस्थळांवर जी एक प्रकारची अवकळा असते त्यामुळे असेल, रोमन क्रिस्तांचं तीर्थस्थान असलेलं व्हॅटिकन आम्ही पाहिलं ते देवस्थळ म्हणून नव्हे तर एक म्युझियम म्हणून. व्हॅटिकनमधली चित्रं आणि शिल्पं यांच्यासमोर मात्र नतमस्तक व्हावसं वाटतं.
 
मायकलअँजेलोची सिस्टीन चॅपेलमधली चित्रं आणि त्या मागची संकल्पना मानवी संस्कृतीचा एक मानबिंदूच मानावा लागेल. मायकलअँजेलोच्या चित्रांचे फोटो काढायला सक्त मनाई आहे. त्याचं कारण हे फोटो आणि फिल्मिंगचे सगळे हक्क एका जपानी कंपनीच्या स्वाधीन आहेत. सिस्टीन चॅपेलचे पुनरुज्जीवन करण्यामध्ये या जपानी कंपनीचे मोठे योगदान होते. त्या मोबदल्यात या कंपनीला फोटोग्राफीचे विशेष हक्क मिळाले. पोपसाहेब चुकून खिडकीतून डोकावताना दिसतात का म्हणून बघत होतो पण ते जगाची चिंता करण्यात व्यस्त आसावेत.
 
विशिष्ट दिवशी पोपचं दर्शन घेण्याची सोय आहे, पण दिवसाचं आणि वेळेचं गणित न जुळल्यामुळे आमची आणि पोप साहेबांची भेट काही होऊ शकली नाही. त्याबद्द्ल मला फारसं वाईटही वाटलं नाही. कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण झाल्यामुळे मला पांढरे झगे घातलेल्या पाद्र्यांचा धसका आहे. कधी पट्टी काढून मारतील याचा नेम नाही. येशूच्या करूणेपेक्षा व्हॅटिकनमधे जाणवली ती आजी माजी पोपची अफाट श्रीमंती. अर्थात त्या श्रीमंतीच्या आधारामूळेच प्रतिभावंत कलाकार अमर कलाकृती निर्माण करू शकले.
 
व्हॅटिकनच्या भेटीनंतर पिझ्झा आणि लसानियाचं जेवण केलं. थोडी खरेदी केली आणि बस घेऊन कोलोसियमला उतरलो. आधुनिक जगातले स्टेडीयम आणि क्रिडा संकुलांचं प्रेरणास्त्रोत्र असलेल्या या रोमन कोलोसियमचा अवाका पाहून अवाक व्हायला होतं. कोलोसियममध्ये शिरता शिरता पावसाची सर आली. छत्री होती तरी एका बांगलादेशी ठेल्यावरून पार्का विकत घेतला. इटलीत असे बांगलादेशी बरेच दिसले. त्यांच्याशी सहज संवाद मात्र साधता येत नाही. कोलोसियममध्ये विशेष गर्दी नव्हती. पहिल्या शतकात या कोलोसियमचं बांधकाम पुर्ण झालं. कोलोसियममध्ये पन्नास हजार लोक बसण्याची व्यवस्था होती. मधल्या प्रांगणात ग्लॅडीयेटर्स (योद्ध्यांच्या) स्पर्धा, जलसेनेच्या कवायती, प्राण्यांची शिकार, गुन्हेगारांचे शिरस्त्राण, युद्धांची प्रात्यक्षिकं आणि पौराणिक कथेवर आधारीत नाटकं आदींचं आयोजन व्हायचं. कोलोसियम बघून रोमन वास्तुशास्त्र आणि तंत्रज्ञान त्या काळात किती प्रगत होते याची प्रचिती येते. कोलोसियमला लागूनच आहे ते रोमन फोरम.

पॉम्पेच्या अवशेषात पाहिलेल्या फोरमची ही आद्य आवृत्ती. याच जागी प्रातिनिधिक सरकार आणि सेनेटच्या संकल्पनांचा जन्म झाला. याच जागी रोमन साम्राज्याची मुहुर्तमेढ रचली गेली. याच जागी सिजरने मोठे निर्णय घेतले. ऐतिहासिक रोम आता अंगावर येऊ लागलं होतं. रस्त्यावर कुठंही दृष्टीक्षेप टाकला तरी एखादी तरी ऐतिहासिक वास्तू दिसायचीच. आज रोममधला शेवटचा दिवस. ट्रेवी कारंज्याजवळ एका रेस्टरॉंमध्ये मनसोक्त खाणंपिणं झालं. इटलीच्या तिरामसू नावाच्या मिष्टान्नाचा आस्वाद घेतला आणि उद्याच्या फ्लोरेन्सच्या भेटीच्या तयारीला लागलो.

रोमच्या मेत्री स्टेशनवरून सकाळी बरोबर साडेसात वाजता ट्रेनिटालीयाची (भारतीय रेलचा इटालियन आविष्कार) फ्रेचिआर्जेन्तो (महालक्ष्मी एक्सप्रेसचा इटालियन अवतार) फ्लोरेन्सच्या दिशेने सुटली. फ्रेचिआर्जेन्तोचा वेग ताशी 250 कि.मी. पर्यंत जाऊ शकतो. गाडीमध्ये आम्हाला हा वेग काही जाणवला नाही. प्रत्येक वेळी बाहेर सुंदर दृष्य आलं की गाडी बोगद्यात जायची. गाडीचा वक्तशीरपणा काटेकोर होता. बरोबर नऊ वाजून वीस मिनिटांनी आम्ही फ्लोरेन्स स्टेशनवर दाखल झालो. स्टेशनवरच्या पर्यटन चौकशी केंद्राला सरकारमान्यतेची अवकळा होती. त्यांनी सांगितलेल्या दिशेचा उलटा अर्थ लावून आम्ही भलत्याच रस्त्याला लागलो. समोर एका बांगलादेशीच्या दुकानात गेलो तर त्यानं माझं इंग्रजी न समजल्याचा भाव केला. शेवटी शेजारच्या दुकानातल्या इटालियन मुलीला माझं इंग्रजी कळलं आणि तिने मला योग्य दिशा दाखवली. स्टेशनवरून बाहेर आल्या आल्या मात्र फ्लोरेन्स शहर डोळ्यांत भरत नाही. सगळीकडे जुनाट पिवळट इमारती दिसतात. आमच्या हॉटेलमधून तर फक्त जुनाट इमारतीच दिसत होत्या. आता उत्सुकता होती फ्लोरेन्स पाहण्याची.  

- राजीव भालेराव
rajivpost@gmail.com
(लेखक, मागील दोन दशके अमेरिकेत स्थायिक असून, सध्या महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका ) या संस्थेचे अध्यक्ष आहेत.)

वाचा इटली प्रवासवर्णनाच्या तीन भागांच्या मालिकेतील पहिला लेख:
प्रथम इटली पाहता... 

Tags: प्रवासवर्णन इटली रोम अनुभव वॅटीकन सिटी Rajiv Bhalerao Italy Rome Vatican City पाॅम्पे फोरम व्हॅटिकन पोप मायकलअँजेलो सिस्टीन चॅपेल कोलोसियम रोमन साम्राज्य Pompeii Forum Vatican Michelangelo Sistine Chapel Colosseum Roman Empire Load More Tags

Add Comment